कविता

एक कागद

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
27 Nov 2017 - 11:38 pm

एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ||धृ ।।

एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।

उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।

वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।

इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।

भावकवितामराठी गझलमार्गदर्शनमुक्त कविताकरुणकवितासमाजजीवनमान

ते...

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in जे न देखे रवी...
27 Nov 2017 - 1:40 pm

ते हायेत आपलेचं
असं समजुनं वागलो
केला इस्वासं म्हनून
असे भिकीले लागलो

फोळं ये लोक हाताले
असं दयन दयलं
पिठं भरुन नेतानी
आमी त्याईले पायलं

ताट आमच्या नावाचं
सफा त्याईनच केलं
खाली सांडलं खर्कटं
तेई सावळूनं नेलं

तेल घालून डोयात
केलं पीकाच राखन
देठा लांबोला त्याईनं
ठुली आमाले आकन

शिसी बसले ते आता
जीव काताऊनं गेला
हेला पखाली चा शेवटी
पानी वाहू वाहू मेला

कविता

ती त्सुनामी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Nov 2017 - 10:13 am

सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते
मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते
गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते
व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते
आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते

प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले उधळून जाते
साचले सांडून जाते
घडविले उखडून जाते
वेचले विखरून जाते
मांडले मोडून जाते

....ती त्सुनामी विप्लवी
पण केवढे शिकवून जाते !

माझी कविताकवितामुक्तक

फुलपाखरा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Nov 2017 - 4:36 am

का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?
कोण? मी? 
तू जागी आहेस ना म्हणून, 
मी पण जागतोय
.
चमचम चांदणीसारखी टिमटिमत राहतेस
कधी कधी वाटतं
दिवसभर 
थोडा थोडा मी 
जमा होत जातो
तुझ्या डोळ्यात
आणि मग रात्री
झोपेला तुझ्या डोळ्यात
उतरायला जागाच उरत नाही
.
असं होतय का रे फुलपाखरा?
त्रास देतो ना बाबा असा?
दूर निघून जातो
आणि लेकरु बाबाला शोधत राहतं!
.
एक गंमत करुया
आज झोपलीस ना की
बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं

कवितामुक्तक

एक सल नेहमीच - भावानुवाद

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Nov 2017 - 5:27 pm

एक सल नेहमीच

एक दरवळ नेहमीच
अंगावरून जातो
डोळ्यांदेखत नेहमीच
एक काठ नदीचा भरतो
एक नाव नेहमीच
किनाऱ्याशी थडकते
एक रीत मला नेहमीच, लांबून खुणावते
मी आहे तिथेच बसतो
एक दृश्य नेहमीच, धूळीत साकार होते

एक चंद्रही नेहमीच
खिशात सापडतो
धिटुकली खार झाडावर
सूर्य गिळून घेते
हे जग तेव्हा नेहमीच
वाटाण्याएवढे भासते
एका तळहातावर जणू अलगद मावते
मी आहे तिथून उठतो
एक रात्र नेहमीच, मुंगीच्या पावलांनी येते

कविता माझीभावकविताकविता

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
20 Nov 2017 - 3:12 pm

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे
….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे
….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे
….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे
...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे
…शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे
…फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे
…वास्तवाला तोलणारे यंत्र आहे
… प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे
…अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे
....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ...

....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

.....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे

माझी कविताकवितामुक्तक

जपमाळ

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
17 Nov 2017 - 8:14 pm

हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते

मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,

आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते

खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते

सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे
हसरे सारेच होते
-शैलेंद्र

gajhalकवितागझल

||संत ज्ञानेश्वर ||

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
17 Nov 2017 - 11:00 am

काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिवस होता . त्याचे निमित्त साधून मी खालील कविता केली होती

ज्ञानियांचे राजे तुम्ही
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर
आळंदीचा स्वर्ग करूनी
दाविला आम्हां ईश्वर ||धृ||

पिता विठ्ठलपंत कुलकर्णी
संन्यास धर्म आचरती
ज्ञानदेव सोपान मुक्ताई
आणि थोरले पुत्र निवृत्ती ||१ ||

बाळपणी माता पिता हरपले
होती चार भावंडे अनाथ
जगी तारण्या तूंचि विठ्ठला
तूंचि असे श्री गुरुनाथ ||३ ||

कविता

चंद्रमण्यांचे पाझर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
15 Nov 2017 - 3:40 pm

आज माझ्या ओंजळीत
चंद्रमण्यांचे पाझर
भले विझून जाऊदे
माथ्यावर चंद्रकोर

पायतळी आज माझ्या
अब्ज-रंगी पखरण
भले अंधुक होउदे
इंद्रधनूची कमान

आज माझ्या रोमरोमी
ब्रह्मकमळ फुलेल
कोडे गहन कधीचे
विनासायास सुटेल

मुक्त कविताकवितामुक्तक

अहेवपण ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
14 Nov 2017 - 3:56 pm

कातरवेळी अस्वस्थ मनाला
दुरच्या दिव्यांची वाटे आस
स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा
कितीक स्मरती हळवे भास

उगाच ओठी शब्द अडकती
दूर कोणी कोकिळ बोलतो
तुडुंब मनाचे आगर भरतां
उद्रेकाला मग वाट शोधतो

नाद खगांचे, स्वर समीराचा
कातळडोही अनाम खळबळ
विजनवास व्रतस्थ मनाचा
गर्द सावल्या सावळ सावळ

पैलतीरी उभे दुत प्रकाशी
कुणी छेडले सनईचे सूर
अहेवपण सजले सरणावर
प्रिया मनी हे कसले काहूर?

© विशाल कुलकर्णी

करुणकविता