मनातल्या मनात मी...
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे
अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे!
तुटून तारका क्षणात आसमंत लांघते
उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे!
गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!
कुठून ऊब एवढी मिळायची मला तरी?
तुझे फुलासमान शब्द ओठ पांघरायचे!
पहाट कोवळ्या उन्हात अंग वाळवायची
जशी सुरेल भैरवीच भूप आळवायचे!
असून ठाव नेमकी कुठे असेल डायरी
पुन्हा पुन्हा उगाच मी कपाट आवरायचे!
अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे...
—सत्यजित