मनातल्या मनात मी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
6 Nov 2017 - 11:14 pm

मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे
अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे!

तुटून तारका क्षणात आसमंत लांघते
उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे!

गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

कुठून ऊब एवढी मिळायची मला तरी?
तुझे फुलासमान शब्द ओठ पांघरायचे!

पहाट कोवळ्या उन्हात अंग वाळवायची
जशी सुरेल भैरवीच भूप आळवायचे!

असून ठाव नेमकी कुठे असेल डायरी
पुन्हा पुन्हा उगाच मी कपाट आवरायचे!

अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे...

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

एस's picture

6 Nov 2017 - 11:27 pm | एस

गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची

उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

वाह! अगदी 'तुझ्याच अंगणी स्वरांचा...' ची आठवण आली. खूपच छान!

पुंबा's picture

7 Nov 2017 - 10:33 am | पुंबा

वाह!!
सुंदर!

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2017 - 8:39 am | प्राची अश्विनी

छान!पण भटांची आठवण झाली.
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो..

सत्यजित...'s picture

9 Jan 2018 - 9:58 pm | सत्यजित...

एस,पुंबा,प्राची...मनःपूर्वक धन्यवाद!