एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराच्या डायरीच्या निमित्ताने

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
3 Jul 2009 - 2:38 pm

मायबापहो,

१० जुन पासुन मी दैनिक बोम्बाबोम्ब मधला प्रशिक्षणार्थी पत्रकार प्रमोद भोंडे (पम्या) याची डायरी मिसळपावमार्फत आपल्यापर्यंत घेवून आलो. जरी मराठी माणुस असलो अन वाचन हे माझे व्यसन असले तरी अशाप्रकारचे लिखाण मी करण्याची ही पहिलीच वेळ. अर्थातच त्यात अनेक त्रुटी होत्या. पण आपण माझा हा वानवळा गोड मानुन घेतला, रोज मी जे वेडेवाकडे लिहिले ते वाचले, माझे उदंड कौतुक केले, प्रतिसाद दिले अन प्रोत्साहनही यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत.

ही डायरी लिहीत असताना अनेक जणांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी अचुक अंदाज बांधले तर काहींनी मला तसे विचारलेही. प्रत्येकाला मी एकच उत्तर दिले, योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन. आता ती वेळ आली आहे.

मी कोण, मी काय करतोय! तसे पाहिले तर साधा सरळ प्रश्न पण हाच प्रश्न काही वेळा एव्हढा गहन होतो की त्यावर दार्शनिकांमधे वाद होतात! प्रत्येकजण या प्रश्नाला सामोरा जातो, अगदी जन्मापासुन म्हणुन तर नवजातच्या टॅहॅ च्या आवाजात दार्शनिकांना कोहं चा प्रश्न ऐकु येतो. मग प्रत्येकजण आपल्यापुरती त्याची उत्तरे शोधतो. हा शोधप्रवास म्हणजेच तर आयुष्य असते ना? माझाही हा प्रवास सुरुच आहे.

साध्या सरळ भाषेत सांगायचे तर मी एक पत्रकार... पुण्यनगरीतल्या एका इंग्रजी दैनिकात काम करणारा, अठरा-एकोणिस वर्षांचा या व्यवसायातला अनुभव गाठीशी जोडून मधल्या फळीत खेळणारा खेळाडू. पत्रकारीतेच्या अफाट सागरातला एक छोटासा बिंदु. मला खूप काही कळते असा माझा दावाही नाही अन समजही!

एव्हढे दिवस सगळ्यांची मापे काढत डायरी लिहिल्यावर मी जेव्हा म्हणतो की मी पत्रकार आहे तेव्हा ती वेळ असते माझ्या व्यवसायाच्या अन व्यवसायबंधुंच्या समर्थनार्थ उभे रहाण्याची. मला माझे ते कर्तव्य पार पाडलेच पाहीजे. या डायरीचा कथानायक प्रमोद भोंडे (पम्या) हे पात्र पुर्णपणे काल्पनिक आहे. या नावाचा कुठलाही पत्रकार मला माहिती नाही. डायरीत आलेल्या ईतर पात्रांबाबत आणि दैनिक बोम्बाबोम्ब बाबत ही असेच.

या डायरीत लिहिलेले किस्से खरे आहेत का? माझी मनोमनी इच्छा आहे की ते खरे नसावेत. पण अशा प्रकारचे अनेक किस्से मी माझ्या व्यवसायबंधुंकडुन अन काही वरिष्ठांकडुन पण ऐकले आहेत. प्रत्येकवेळी या किश्श्यांसंदर्भात मी व्यवसायात कार्यरत असलेल्या लोकांची नावे ऐकली आहेत अन ते खरे असल्याबद्दलचे निर्वाळेसुद्धा. काही किस्से तर मी स्वतः अनुभवलेले, पाहीलेले आहेत.

आता उरतो सर्वात महत्वाचा प्रश्न: मी स्वतः पत्रकार आहे, मला मी जे करतो त्याचा गर्व म्हणावा एवढा अभिमान आहे तर मी ही डायरी का लिहिली? कारण सरळ आहे, मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत. पण जेव्हा हा देव रुसतो, नाराज होतो तेव्हा माझ्यासारखा भक्त व्यथित होतो, त्यालाही देवाला काही सांगावे असे वाटते त्यासाठीच ही डायरी.

पत्रकार म्हणुन काम करताना रोज अनेक लोकांशी संबंध येतात, अन त्यांची मते ते व्यक्त करतात. अशा अनेक चर्चांमधे मला जाणवला तो पत्रकारितेचा दर्जा खालावलाय, पत्रकारांची अन वृत्तपत्रांची विश्वासार्हता संपली आहे हा सुर. प्रथम मी या सुराकडे नसती कुरकुर, असंतुष्टांची पोटदुखी म्हणुन दुर्लक्ष केले पण जसजशी व्यावसायीक उन्नती होत गेली, जबाबदार्‍या वाढत गेल्या, तसतसा माझा दृष्टीकोणही बदलत गेला. त्याबरोबरच आली प्रचंड अस्वस्थता. मला वाटले आपण प्रस्थापित झालोय अन त्यामुळे माझी समाजाशी नाळ तुटत चाललीय त्यामुळे असे होत असेल. मग एक दिवस मी निर्णय घेतला चांगली सुरु असलेली नोकरी सोडून स्वतः विस्थापित होण्याचा. तरी अस्वस्थता तशीच राहीली, अन कारणे शोधताना मला लक्षात आले, फक्त माझीच नव्हे तर समाजातील अनेक घटकांची, अन त्यात पत्रकारितातील अनेक लोक पण आलेच, समाजाशी नाळ तुटत चालली आहे. हा समाज एकसंध न रहाता अनेक न्युक्लीअर घटकांचा विस्कळीत समुदाय होत चालला आहे. अन त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावर प्रकर्षाने होणे साहजिकच आहे.

प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल? पत्रकारिता या व्यवसायात सामान्यता अनेक प्रकारचे लोक येतात. सामाजिक बांधिलकी वगैरे ध्येयवादी विचार बाळगणारे काही थोडे, पत्रकारीतेच्या ग्लॅमरला भुललेले काही अन कधीच काही करता येणार नाही असे ज्यांच्याबाबत सगळ्यांना वाटत असे बरेच टगे....

यातल्या बर्‍याचजणांना या व्यवसायात येताना त्याबाबत पुर्ण माहीतीदेखील नसते. पण एकदा व्यवसायात ते शिरले की हळुहळु ती होत जाते, व्यावसायीक कौशल्ये विकसीत होत जातात अन हळुहळु ते सामावले जातात. अशा वेळी कोणी समर्थ अन चांगला मार्गदर्शक भेटला तर तो पत्रकार चांगलाच होतो. पण ही प्रक्रिया सुरु असताना इतर अनेक घटक तीवर परिणाम करीत असतात.

सर्वात मोठे दोन घटक म्हणजे पत्रकारांना मिळणारे वेतन अन त्यांची जीवनशैली. बहुतेक वृत्तपत्रे पत्रकारांना कंत्राट पद्धतीने घेतात अन त्यांना कुठल्याच कायद्याचे संरक्षण नसल्याने पत्रकारांच्या आयुष्यात कायम असुरक्षितता रहाते. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या सर्व आयुष्यावर होतो. पत्रकारांची जीवनशैली देखील कमालीची विस्कळीत असते. केव्हा कुठली माहिती मिळेल अन काम सुरु करावे लागेल याचा भरवसा नसतो. बहुतेक पत्रकार दिवसाचे बारा-पंधरा तास काम करतात. व्यावसायिक संबंधांखेरीज अन्य अनेक गोष्टी, ज्या सामान्य माणुस त्याच्या खाजगी, सार्वजनिक आयुष्यात करतो, त्या त्यांना कधीच अनुभवता येत नाहीत. वेतन अन भत्ते अपुरे असल्याने अन खर्च भरमसाठ असल्याने पत्रकार आयुष्यभर भणंग रहाण्याचीच शक्यता अधीक. यामुळे अनेकदा पत्रकाराच्या मनात कायम द्वंद्व सुरु असते. बरे हा व्यवसाय नोबेल प्रोफेशन वगैरे असल्याने हे प्रश्न कुणाच्याच प्रायॉरिटी लिस्ट वर (खरे तर गिनतीत) नसतात.

असा हा पत्रकार पण गरीब बिचारा कधीच नसतो. खरेतर भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्याने मुक्त पत्रकारिता फोफावायला हवी पण या स्वातंत्र्याचा घास घेणारे अनेक फॅक्टर असतात अन त्याचा परिणामही होत असतोच. पत्रकारांवर अनेकदा आरोप होतो की ते प्रशासनावर पुरेसा अंकुश ठेवत नाहीत. पण अनेकदा पत्रकारांना भीती असते की सत्ताधारी, पैसेवाले बडे नोकरशहा इत्यादी मातब्बर अन निरंकुश कारभार करणार्‍यांवर जास्त टीका केली तर हे लोक त्यांच्या अधिकारांचा वापर करुन त्या पत्रकाराची कोंडी करतील, त्याला बातम्या मिळणार नाही अशी व्यवस्था करतील.

दुसरा मोठा मुद्दा येतो तो पत्रकाराच्या सामर्थ्याचा. वस्तुत: पत्रकाराला सामान्य माणसापेक्षा अधिक असे कोणतेही अधिकार नसतात. परंतु त्याच्या व्यवसायामुळे तो ज्यांच्याकडे जबरदस्त अधिकार असतो त्यांच्या खूपच जवळपास वावरत असतो अन त्या जवळीकीमुळे अनेकदा त्याला अप्रत्यक्ष अधिकार गाजवता येवू शकतात जसे क्राईम रिपोर्टरव्या एखाद्या मित्राला सिग्नल मोडल्याकरता पोलिसाने थांबवले अन दंड भरायला सांगितला तर तो मित्र पत्रकाराच्या एखाद्या फोननंतर दंड न भरता सुटतो. यामुळे अनेकदा गुर्मी येते अन असे करणे आपला अधिकारच असल्याच्या अविर्भावात पत्रकार वावरु लागतो. ही अर्थातच त्या पत्रकाराची चूक आहे पण त्याच्या जागी स्वतःला कल्पा अन पहा हे प्रलोभन टाळणे किती अवघड आहे ते!

हे सर्व ज्ञान (किंवा अज्ञान) मांडुन तुमचा छळ का? ही एका पत्रकाराची कैफियत आहे का? या प्रश्नांना माझे उत्तर सरळ आहे. आम्ही पत्रकार कारु-नारु जे काही करतो ते कश्यासाठी तर वृत्तपत्रात बातम्या छापुन माहिती तुमच्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग आम्ही जे काही करतो ते तुम्हाला आवडत नसेल, पटत नसेल तर तुमचे प्रश्न, तुमच्या आवडी आमच्यापर्यंत तुम्हीच पोहोचवायला हव्यात. हा विचार माझा स्वतःचा नाही किंवा नविनही नाही. याच कारणाकरता बहुतेक सर्व वृत्तपत्रे अन मीडीया गेली कित्येक वर्षे सिटीझन जर्नॅलिस्ट सारखे प्रयोग करत आहेत. पण त्याची फलनिष्पत्ती काय, काही लोक त्याचा वापर स्वतःची पोळी भाजुन घेण्याकरता करतात तर अनेकदा लोक त्यांचे अगदी वैय्यक्तिक प्रश्न सोडवण्याकरता, किंवा कुणालातरी "अद्दल घडवून सरळ करण्याकरता" अश्या व्यासपीठांचा वापर करतात. पण समाजाचे प्रश्न वगैरेचा विचार करण्याची कुवत असलेला विचारवंत, जो बहुधा मध्यमवर्गीय वगैरे असतो, तो या सगळ्यापासुन स्वतःला अलिप्त ठेवतो. जोवर हा समाजात बहुसंख्य असलेला वर्ग कार्यरत होत नाही तोवर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता मला स्वतःला वाटत नाही. हा जो विचार मी करतोय तसाच विचार करणारे अनेक पत्रकार मला माहीती आहेत.

मायबापहो, जरा स्वतःच स्वतःभोवती विणलेल्या कोशातुन बाहेर या! जरा आम्हा पत्रकारांनापण तुमच्या भावविश्वात सामील करुन घ्या. शेवटी आम्ही पण तुमच्यातलेच आहोत अन आमचे अस्तित्वही तुमच्याचसाठी आहे. अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा करण्याऐवजी तुमचे प्रश्न काय आहेत हे आम्हाला कळवा अन ते एकत्र मिळुन सोडवायला मदत करा. आपण सर्व जर एकत्र आलो तर खूप फरक पडु शकेल. हेच सांगण्यासाठी केलाय हा सगळा अट्टाहास!

आपलाच,
पुणेरी पत्रकार मित्र!
प्रसन्नकुमार केसकर

समाजनोकरीजीवनमानराहणीप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

अनंत छंदी's picture

3 Jul 2009 - 4:10 pm | अनंत छंदी

तुमच्या वरील मतांशी सहमत आहे.

स्वाती२'s picture

3 Jul 2009 - 4:14 pm | स्वाती२

असेच म्हणते

श्रावण मोडक's picture

3 Jul 2009 - 4:47 pm | श्रावण मोडक

प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल?
पूर्ण सहमत. सुंदर वाक्य. एका वाक्यात या निवेदनाचं सार येऊन जातंय.
अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा ...
हा का होतो आहे याचा आपणही विचार केला पाहिजे, प्रसन्न. मुळात असं आहे की. तुम्ही किंवा मी प्रिंटमधले आहोत. हा ओरडा होण्यामागचं एक कारण आहे तो आत्ता फोफावलेल्या वाहिन्या. एक उदाहरण - एका प्रतिष्ठीत इंग्रजी वाहिनीचे मुख्य संपादक. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमधील फरक त्यांच्याच मराठी वाहिनीवर सांगत होते, "अशोक चव्हाण एम.बी.ए. आहेत म्हणजे ते शंकररावांपेक्षा उच्च शिक्षीत आहेत." हसावे की रडावे? हे संपादक अनेकांचे आदर्श आहेत. त्यांच्या या अशा चुकांची यादी देऊ शकतो, त्यांनी केलेल्या पत्रकारितेविषयी आदर ठेवूनही. कारण त्यांचे सोर्सेस आदर्शच आहेत. पण म्हणून, त्यांच्या या चुका माफ कशा करता येतील? कोणी म्हणेल ही तपशिलाची चूक आहे. पण तुला पटेल अशी तपशिलाची चूक पुढे काय घडवू शकते ते...
अशी मंडळी जेव्हा पत्रकारितेच्या स्वतंत्र्याचा अधिकार घेत काही गोष्टी करतात तेव्हा हा ओरडा होतो. २६/११ च्या संदर्भात हे प्रश्न उभे ठाकले आहेत. अरूषी प्रकरणात उभे ठाकले आहेत. नटवरिसंह यांच्या सुनेच्या आत्महत्येसंदर्भात उभे ठाकले आहेत. इतकेच कशाला, तहलकासंदर्भातही आहेत. बारकाईने लक्ष दिले तर तेही समजून येतील. 'चमत्कारां'च्या हेच रिपोर्टिंग असे करणाऱ्या वाहिन्या असतात तेव्हाही हे प्रश्न येतात. हा सुमारपणा मारक आहेच.
असा ओरडा पूर्वी प्रिंटविषयीही व्हायचा. इंडियन पोस्ट आठवतो, यशवंतरावांविषयी झालेलं कव्हरेज? कुणी केलं होतं ते सांगायचं? नकोच.
पण त्याचे प्रमाण कमी असायचे. कारण वीण कमी. मला आठवते, केवळ ब्लॅकमेलींगसाठी निघणाऱ्या पत्रांच्या अनुषंगाने असे व्हायचेच.
त्या ओरड्यात थोडासा अर्थ आहेच. तो आपणही समजून घेतला तर... तर आपल्यात सुधारणा होईलच, आणि ओरडा करण्यासही वाव राहणार नाही. समजून घेतो का? २६/११ नंतर काहींनी घेतलेले पवित्रे पाहिले तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. हे काही म्हणजे कुणी कनिष्ठ नाहीत. सगळे असे आहेत की ज्यांनी नेतृत्त्व द्यायचे आहे...
तुमची भावना पूर्ण मान्य. पण सारेच तुमच्यासारखे नाहीत. म्हणूनच अळी - सुरवंट - फुलपाखरू न्याय इथे पक्का लागू होतो.

प्रसन्न केसकर's picture

3 Jul 2009 - 5:01 pm | प्रसन्न केसकर

तुमच्या सर्व विधानांशी पुर्णपणे सहमत आहे. मला एकच म्हणायचेय, या प्रकारच्या गोष्टी का चालतात तर त्या कुणाला तरी हव्या असतात म्हणुन. मुळात मी प्रिंट किंवा ऑडिओ-व्हिज्युअल, कुठल्याच मीडीयाची कैफियत मांडत नाहीये. मला या आरोपांना विरोध करायचाच नाही. माझे म्हणणे एकच आहे, की ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही.

-----
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

श्रावण मोडक's picture

3 Jul 2009 - 5:11 pm | श्रावण मोडक

ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही.
सहमत. शंभर टक्के सहमत. हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे.
वाचक-दर्शक चांगल्या अर्थाने ग्राहकाच्या भूमिकेत आला ना की मग या गोष्टी सुरळीतपणे पुढे सरकण्याचा वाव निर्माण होईल. मी नेहमी म्हणतो, वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवरील बुलेटीन हे एक प्रॉडक्ट आहे हे आधी स्वीकारूया. पण एकदा ते स्वीकारले तर प्रश्न येतो. हे प्रॉडक्ट काय आहे - 'टूथपेस्ट' की 'शेविंग क्रीम'. 'ट्यूब' सारखीच दिसते, आत काय आहे? 'पेस्ट' म्हणून 'शेविंग क्रीम' तर विकले जात नाही ना? किंवा 'शेविंग क्रीम' म्हणून 'टूथपेस्ट' तर विकले जात नाही ना? हा निकाल एकदा वाचक-ग्राहकाने घेतला की कलींग सुरू होईल. जे फसवे प्रॉडक्ट देतात ते 'खपतील'. न फसवणारे खपतीलच.

प्रसन्न केसकर's picture

3 Jul 2009 - 6:02 pm | प्रसन्न केसकर

असेच म्हणतो. पुन्हा एकदा स्पष्टीकरणः ओरड्याला माझा अजिबात विरोध नाही, उलट पुर्ण पाठिंबा आहे. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो!

----

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

श्रावण मोडक's picture

3 Jul 2009 - 6:07 pm | श्रावण मोडक

ओरड्याने काहीही होणार नाही या भावनेशी पूर्ण सहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Jul 2009 - 6:28 pm | प्रकाश घाटपांडे

हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे.

हेच म्हणतो. सहमतीतील विखुरलेपण यातुनच येते
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील's picture

3 Jul 2009 - 5:00 pm | सुनील

तुम्ही प्रत्रकार असाल ह्याचा अंदाज आला होताच. लेख आवडला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

3 Jul 2009 - 9:08 pm | रामदास

आपलं प्रामाणिक निवेदनही तितकंच आवडलं .धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jul 2009 - 9:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि तेवढाच श्रावण आणि पुनेरी यांचा संवादही आवडला.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jul 2009 - 12:23 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत...

बिपिन कार्यकर्ते

मला वाटते मी कोणत्याच भागाला आधी प्रतिसाद दिला नाहीये. पण मी तुमच्या सर्व भागांचे वाचन केले. भाग ओघवते आणि ऑथेंटिक वाटतात.
तुमचे ह्या भागातले विवेचनही अतिशय पटणारे आहे.
अभिनंदन!!

(संपादक)चतुरंग

सध्या अकरावीच्या प्रवेशाबद्दलचा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. बहुधा सोमवारी त्याचा निकाल लागेल. जेव्हा तो लागेल तेव्हा त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करता येईलच पण मला इथे जो मुद्दा मांडायचा आहे तो टाईम्स ऑफ इंडिया ह्या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या भूमिकेबद्दल.

एक वृत्तपत्र म्हणून एखादी भूमिका घेणे (ICSE विध्यार्थ्यांच्या बाजूने) एकवेळ समजू शकते परंतु त्या वृत्तपत्राने ह्या संपूर्ण प्रकरणाला जो एक मराठी-अमराठी रंग देण्याचा प्रयत्न केला, तो प्रकार मला अश्लाघ्य वाटतो. गरजूंनी गेल्या ३ आठवड्यातील अंक चाळून पहावेत, मी काय म्हणतो ते कळेल.

एक विचार मनात येतो, अशी एकांगी भूमिका मांडण्याची सक्ती संबंघित पत्रकारांवर व्यवस्थापनाकडून होत असेल का? व्यवस्थापनाचे न ऐकता सत्य मांडणार्‍या पत्रकारांची फरफट होत असेल का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

4 Jul 2009 - 6:59 am | सहज

लेखमाला तर छान होतीच पण हा संवाद जो साधला आहे तो आधीकच आवडला. धन्यवाद.

एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो!

ह्याबद्दल देखील तुम्ही, मोडककाका अजुन सांगावे. वर्तमानपत्र, वाहीनी हे सगळेच जाहीरातींवर चालते. (ग्राहकराजा महत्वाचा आहे पण तितकाही नाही.)जाहीरती देणारा वर्ग आपल्याला आपल्याकामाशी मतलब म्हणुन मोकळा होतो. थोडक्यात ही माध्यमं मालकांच्या मर्जीवरच चालतात. हा धंदा आहे. माध्यमचालकांचे आर्थीक व राजकीय हितसंबध गुंतलेले आहेत.

नक्की सामान्यवाचकाने काय करावे. परत दबावगट? परत अजुन एक सत्ताकेंद्र बनवायचे? मेधा पाटकर, अण्णा हजारे अश्या लोकांना जर सरकार दबत नाही तर आरडाओरडाशिवाय काय करायचे ते पण जरा सांगा. जे लोक सनदशीर मार्गाने अन्यायनिवारणासाठी लढा देत आहेत त्यांना सहानुभूती, आर्थीक मदत शिवाय अजुन काय आहे तरी काय आमच्या हातात?

सगळ्यांनी केबल टिव्ही, माध्यमांवर बहिष्कार टाकणे शक्य आहे का?

Nile's picture

4 Jul 2009 - 7:50 am | Nile

पत्रकाराचे निवेदन आवडले.

माझे तरी, biased (कोणी या बाजुने तर कोणी त्या), T.R.P. लोलुप (अनेक वाहीन्यांनी अत्यंत अशास्त्रीय, खोट्या बातम्या फक्त सनसनाटी स्वरुप देउन दाखवलेल्या मी स्वत: पाहीलेल्या आहेत) मीडीया बाबतीत अजीबात चांगले मत नाही. अर्थात ही परीस्थीती फक्त भारतात आहे असेही नाही.

त्यातल्या त्यात जी निरपेक्ष, to the business प्रसारमाध्यमं आहेत ती मी follow करतोच.

असो, ओरडा फारच कमी लोक करतात असं मला वाटत, बर्‍याच लोकांना प्रसारमाध्यमांचा झालेला "reality-show" प्रकार आवडतो आणि त्यामुळे ती माध्यमं बाजारात विकली पण जातच आहेत. असो चालायचंच!

प्रसन्नकुमारजी ,

फारच छान लेखमाला. त्याहीपेक्षा तुमचे निवेदन आवडले. मी माझ्याकडून २४ तास बातम्या वाहिन्या पाहणे बंद केले आहे. म.टा. सकाळ , टाईम्स, बंद करून. लोकसत्ता , डि.एन.ए लावला.( दगडापेक्षा विट मऊ!)

"तुम्हाला ग्राहकराजा जागा हो" म्हणजे नक्की काय कर हे मार्गदर्शन केले तर उपयुक्त होईल.

मोहन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2009 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुनेरी (शुद्ध शब्द) पुणेरी,
आपले निवेदन वाचले, आपल्या पत्रकारांविषयीच्या भावना समजल्या, तरीही पत्रकारांविषयी काही त्रोटक माहिती / अपेक्षा वरील निवेदनात वाटतात. पहिली गोष्ट पत्रकारांना सामाजिक भान किती असते, एखादी बातमी वाचतांना ही बातमी खरी असेल का ? अशी शहनिशा वाचकांना करावी लागते. अन्य दैनिकातल्या बातमीशी तुलना करुन मग त्या बातमीचा अंदाज यायला लागतो. पत्रकारांबद्दलची आपण म्हणता तशी विश्वासार्हता केव्हाच संपली आहे असे वाटते. बातमी कोणत्या दैनिकात आहे, दैनिकं कोणत्या विचाराचे आहे, राग येऊ देऊ नका, पण काही पत्रकारांना तर'एखाद्या बातमीचा' पाठपुरावा केल्यानंतर एखाद्या पार्टीकडून किती मलिदा मिळेल असा हव्यास आजच्या काही पत्रकारांना असतो. लोकप्रिय दैनिकात काही पत्रकार माझेही मित्र आहेत. एखाद्या घटनेची बातमी कशी सोयीने लावली जाते, हे मी जवळून पाहिले आहे.

बरं नंबर एकचा बाताड्या कोण असेल तर पत्रकार, असे माझे स्वत:चे मत आहे. सर्व विषयातील स्वतःला तज्ञ समजण्याची धडपड पाहिली की,मला त्यांची कीव येते. अर्थात हे काही सर्वांच्या बाबतीत नाही, त्याला काही अपवाद असतीलही.

>>मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत.

वाचायला चांगले वाटते. पण यातले काहीच खरे नाही, नसावे असे पत्रकारांकडे पाहून वाटते. दैनिकं व्यायवसायिक झाल्यामुळे 'अर्थ' याच उद्देशाभोवती पत्रकारिता फिरतांना दिसते. 'कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. असे म्हणतात ते उगाच नाही, असो...थांबतो.

वरील प्रतिसाद पुणेरी किंवा मिसळपावरील कोणा पत्रकारांना उद्देशून लिहिले आहे, असे कृपया समजू नका. एकूण पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे, याकडे मला अंगुलीनिर्देश करायचा होता.

अवांतर : आपल्या डायरीतल्या एक दोन भागावर फक्त क्लीक केले होते, वाचून प्रतिक्रिया लिहीन !

-दिलीप बिरुटे