त्यादिवशी युट्युबवर लेकासाठी योग्य अशी बडबडगीते शोधत असताना हे एक जपानी बडबडगीत सापडलं. "ओ-च्या ओ-च्या ओ-च्या च्या-च्या-च्या" अश्या गंमतीदार सुरुवातीने सुरु होणारं ते गीत एका लोभस जपानी चिमुरडीने मस्तपैकी डान्स वगैरे करुन छान सादर केलंय. (’जपानमध्ये सर्वात प्रेक्षणीय काय असेल तर ती मुले’ असं पुलंनी आधीच लिहून ठेवलं आहे त्याला स्मरुन त्या बाहुलीचं अधिक वर्णन करत नाही.) बडबडगीताचा अर्थ वगैरे समजून घेण्यापर्यंत चिरंजीव अद्याप पोचले नाहीयेत. पण ती चाल आणि ठेका आवडेल अशा हेतूने मी ते गाणं त्याला ऐकवलं आणि त्याला ते आवडलंही. तेव्हढ्यात ऑफिसमधून नवरोजी आले आणि चिरंजीव इतके कशात रंगलेत हे पाहत असताना त्याने मला विचारलं.
"कशावर आहे हे गाणं?"
आमच्याकडे मराठी/हिंदी/इंग्रजी सोडल्यास इतर काही अगम्य कानावर पडलंच तर ते बर्याचदा जपानी असतं हे आता त्याला कळलंय त्यामुळे गाणं जपानीच असणार अशी त्याची खात्री झालेलीच होती.
"म्हणजे?" मी.
"अगं म्हणजे काय विषय आहे गाण्याचा"
"ओह. अरे विषय आहे ’ओच्या’ म्हणजे आपला ’चहा’ रे!
"काय? जपानीत चहा ला ’ओच्या’ म्हणतात?"
"हो. आपला ’चहा’ तर त्यांचा ’च्या’. म्हटलं नव्हतं मी तुला मराठी आणि जपानी सारखी आहे म्हणून?" मी. (बाकी मला ’च्या’ म्हटलं की मराठी चित्रपटातली ’च्या घ्येनार का’ विचारणारी ठसकेबाज रंजनाच आठवते!)
यावर ’हा एक शब्द जरा मिळताजुळता असला तर काय लगेच भाषा अश्या सारख्या होतात काय’ असं त्याच्या चेहेर्यावरचं उमटलंय की कायसं मला वाटलं. तेव्हढ्यात चहा आणायला तो आत गेला. चहाचा कप घेऊन निवांत बसल्यावर मला म्हणाला, "पण मग ही ’ओ’ ची काय भानगड आहे?"
’ओ’ची भानगड? म्हंजे?" मला कळेना.
"अगं तूच मघाशी नाही का म्हणालीस ’ओ-च्या’. पण नंतर नुसतंच ’च्या’ म्हणालीस. म्हणून म्हटलं ही ’ओ’-’च्या’ ची भानगड काय?" हा म्हणाला.
"अरे ते होय! जपानीत ’ओ-’ हा एक आदरार्थी प्रत्यय आहे. जिथे आदर व्यक्त करायचाय अशा बर्याच ठिकाणी त्या त्या शब्दाआधी ’ओ-’ प्रत्यय लावतात जपानीत." माझा खुलासा.
"अच्छा". माझा खुलासा ऐकून अधिक खोलात जायच्या भानगडीत तो अर्थातच पडला नाही.
यावरुन मला मी जपानी भाषा नुकतीच शिकायला सुरुवात केली होती ते दिवस आठवले. साधारण ९-१० वर्षांपूर्वीचा काळ. काहीवेळा क्लासमध्ये हास्याची कारंजी उडायची.
"’ओ-च्या’ चं शब्दश: भाषांतर केलं तर काय होईल?" आमची एक सहध्यायिनी.
"(तुमचा) आदरणीय चहा!". कुणीतरी उत्तरलं आणि तेव्हाचा हशा आठवून मला आत्ताही हसू फुटलं. आता आदरणीय व्यक्ती असावी पण चहासुद्धा आदरणीय असतो का?
चहावरुन अजून एक उदाहरण आठवलं. ’ओ-सारा’.
’सारा’ म्हणजे ’बशी’. मग ’ओ-’ लावल्याने तीसुद्धा आदरणीय झाली म्हणायची! अजून उदाहरणं म्हणजे ’ओ-नामाए’ (नाव), ओ-शिगोतो (जॉब), ’ओ-तान्ज्योबी’ (वाढदिवस) आणि अशीच अजून चिक्कार आहेत. अशा प्रकारे बहुतेक निर्जीव गोष्टींना हा आदरार्थी प्रत्यय लावून खिदळायला आम्हाला एक चांगलं निमित्त सापडलं होतं. हे ’आदरणीय’ प्रकरण आम्ही पुढे बराच काळ आपापसात बोलताना मुद्दाम वापरत होतो. बाकी पुढे नोकरी लागल्यावर भारतीय बॉसला आणि इतर सर्वसामान्य जनतेलाही कळू नये ’असं काही’ बोलायचं असलं की आम्ही जपानीत बोलत असू. नव्हे, अजूनही बोलतो! आदरणीय (!) बॉसबद्दल बोलताना तर खाशी मज्जा यायची!;)
’च्या’च्या निमित्ताने मराठी आणि जपानी भाषांतील साम्यस्थळांची (स्थळं म्हणजे शब्द, वाक्प्रचार वगैरे) परत एकदा उजळणी करुन झाली आणि त्यातली गंमत तुमच्याबरोबरही शेअर करावीशी वाटली म्हणूनच हा लेखनप्रपंच! काय आहे की इंग्रजी आणि जपानी अगदी पूर्णपणे भिन्न भाषा आहेत. अगदी लिपीपासून ते उच्चार, व्याकरण इ. सर्व बाबींमध्ये या दोहोंत काडीचंही साम्य नाही. त्यामानाने मराठी जपानीला खूपच जवळची आहे. खासकरुन व्याकरणदृष्ट्या. (अर्थात लिपी पूर्णपणे वेगळी आहे) मराठीप्रमाणेच जपानीतही वाक्यातील पदांचा क्रम सारखाच आहे-कर्ता-कर्म-क्रियापद. जपानीतील अव्यये (particles) मराठीतील ’ऊन’, ’हून’ किंवा ’चा’, ’ची’, ’चे’ अश्या प्रत्ययांशी साम्य दाखवतात. या दोन्ही भाषांतल्या साम्यस्थळांमधला अजून एक समान धागा म्हणजे एखादा शब्द किंवा वाक्प्रचार अर्थाने किंवा उच्चाराने किंवा दोन्ही गोष्टींनी मराठीत आणि जपानीत एकच किंवा जवळपास सारखा असणे. हे साम्य जाणून घेणं नक्कीच मनोरंजक आणि गंमतीशीर आहे. कसं ते बघूया.
का???? का!!!!!
आता ’च्या’ पिऊन आपण सुरुवात केलीच आहे तर माझ्या सर्वात आवडत्या साम्यस्थळाकडे जाऊया. पुलंनीही याविषयी ’पूर्वरंग’ मध्ये नमूद केलंय. ते म्हणतात ’जपानी ’का’ आणि मराठी ’का’ चा अर्थ एकच असावा.’ आणि ते अक्षरश: खरं आहे!
मराठीतला ’का’ आणि जपानीतला ’का’ अर्थाने आणि उच्चाराने अगदी सारखा आहे. गंमत म्हणजे मराठीप्रमाणेच जपानीतही तो प्रश्नार्थकच आहे आणि मराठीसारखाच तो वाक्याच्या शेवटी येतो! उदा. ’पारी ए इकिमाश्ता का’ म्हणजे ’पॅरीसला गेला होतास/होतीस का?’ मधला ’का’ एकच काम करतो. प्रश्न विचारणे! (फक्त एकच फरक आहे, प्रश्नार्थक ’का’ नंतर आपण प्रश्नचिन्ह देतो तर जपानी पोकळ टिंब देतात.[。]असं. पण आताशा प्रश्नचिन्हही जपानीत वापरतात). इतकंच काय, मराठीतल्या या प्रश्नार्थक ’का’ मागे कधीकधी काही भावना किंवा हेतूही असतात उदाहरणार्थ, ’तुझं पुस्तक मी वाचलं तर चालेल का?’ (परवानगी/संमती मागणे), ’पण तू तिला असं म्हणालासच का? (संताप व्यक्त करणारा प्रश्न). या सर्व भावना जपानी ’का’ तूनही व्यक्त होतात, अगदी हुबेहूब!
याशिवाय अजून एक उदाहरण. कधी कधी आपण एखादी गोष्ट ऐकल्यावर ’हो का!’, ’असं का!’ म्हणून उद्गारतो. आता या ठिकाणी ’का’ प्रश्नार्थक नसून उद्गारवाचक आहे. अगदी हाच प्रकार जपानीतही आहे. ते म्हणतात ’सोs देस का!’ किंवा नुसतंच ’सोs का!’. तर या जपानी 'का!'चं कामसुध्दा अगदी तेच बरं का! उद्गारणे!! उदाहरणार्थ,
’गो-नेन गुराई निहोननी इमाश्ता’.
’सोs देस का!’
म्हणजेच,
’जवळपास ५ वर्षे मी जपानमध्ये होते/होतो’
’असं का!’
अजून गंमत म्हणजे आपण कधी कधी मुद्दाम ’हो का!’ च्याऐवजी ’होक्का!’ म्हणतो ना तर जपानी ’सोक्का!’ म्हणतात. :)
बरं ’का’चा महिमा इथवरच संपत नाही. आपण मराठीत कित्येकदा म्हणतो ना,"अमुक अमुक असं करुया का? का तसं करुया?" (किंवा आपण या ’का’ ऐवजी ’की’सुद्धा वापरतो). तर या ’का’ किंवा ’की’ने दोन प्रश्नार्थक पर्याय जोडण्याचं जे काम पार पाडलंय तेच काम जपानीतही तस्संच पार पाडलं जातं. उदाहरणार्थ, ’कोरे का सोरे’ (म्हणजे ’हे ’का’ ते?’)
जपानी शिकायला लागल्यावर लगेचच या साम्यस्थळाशी गाठ पडली होती....मला वाटतं आमच्या पहिल्या धड्यात ’आनाता वा निहोन्जीन देस का’ (तू जपानी आहेस का?) असं काहीसं वाक्य होतं आणि तेव्हाच आमच्या सेन्सेईंच्या* ’जपानी बोली बरीचशी आपल्या मायबोलीशी मिळतीजुळती आहे’ या सांगण्यावर आम्ही शिक्कामोर्तब करुन टाकलं होतं!
क्रमशः
*सेन्सेई= शिक्षक
प्रतिक्रिया
3 Jun 2009 - 2:31 am | टुकुल
ओ.. माझ नाव जपानी लिपित लिहुन देता का? (जपानी का) :-)
मस्त लिहित आहात.. अजुन येवुद्यात.
--टुकुल.
4 Jun 2009 - 12:04 am | वर्षा
ओ टुकुल-सान ,
काय नावाचा टॅटू करायचाय का?:) तुमचं खरं नाव मुकुल आहे असं धरल्यास तुमच्या नावाचा जपानी उच्चार 'मुकुरु' होईल आणि ते असं दिसेल ムクル
आणि टुकुल असल्यास त्याचा उच्चार 'त्सुकुरु' असा होईल आणि लिपीत असं असेल ツクル
(You need to have Japanese Language Text Support installed to view the Japanese script properly)
3 Jun 2009 - 7:23 am | रेवती
हा भाग बर्यापैकी समजला.
बाई, आजचा गृहपाठ देणार का?(हलके घेणे)
रेवती
3 Jun 2009 - 7:39 am | क्रान्ति
मस्त लिहिलाय लेख!
:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
3 Jun 2009 - 7:45 am | सुबक ठेंगणी
जपानी-मराठी भगिनी-भगिनी असं वाटत असतानाच येणारा एक इनोद (नक्की विनोदच का हे ज्याचे त्याने ठरवावे.)
जपानीत "आहो" म्हणजे "वेडा"
आपल्याकडे एजमानांना "अहो" म्हणायची जी पद्धत आहे ते जपानी "आहो"चेच अपभ्रष्ट रूप आहे असा काही भाषेच्या जाणकारांचा दावा आहे. :P
मस्त लेख. मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय.
3 Jun 2009 - 8:20 am | विंजिनेर
खरयं बुवा... बाकी पतीला असली काही नावं ठेवण्यात भाषांमधे स्पर्धाच असते बहुदा (त्यात पुन्हा "भाषा" शब्द सगळ्या भाषांमधे स्त्रीलिंगी :()
मराठीतला कायम बायकोच्या आज्ञेत राहून अखंड काम करणारा "नवरा" जेव्हा गुजरातीत जातो तो "रिकामटेकडा" होऊन जातो... चालायचंच...
जगाला भोळ्या, निरागस आणि निष्पाप अशा, नवर्यांची कदर नसते हेच खरं... :(
असो. जपानी भाषालेख छान... ती शितो-बितो ( कामबिम च्या चालीवर) ची गंमत पण सांगा ओ वर्षा-सान!
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
3 Jun 2009 - 8:29 am | प्राजु
अतिशय इंटरेस्टींग झाला आहे हा भाग. खूप आवडला.
लवकर लवकर लिहा पुढचे भाग. खूप उत्सुकता आहे बाकीच्या भागांबद्दल आणि जपानी भाषेबद्दल. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Jun 2009 - 10:57 am | स्वाती दिनेश
मस्त झाला आहे ग हा भाग, खूप इंटरेस्टींग झाला आहे. पुढचे भाग लवकर लवकर येऊ देत,
स्वाती
3 Jun 2009 - 11:12 am | सहज
छान लिहले आहे.
अजुन येउ दे.
3 Jun 2009 - 11:24 am | मस्त कलंदर
बाकी भाषेतली साम्यं बर्याच ठिकाणी आढळतात.. जाणकारांचं असंही मत आहे.. की इंग्रजी नि संस्कृत थोड्या जवळ जवळ्च्या भाषा आहेत.. जसं (इं) पाथ = (सं) पथ, इं) हजबंड = (सं) ह्स्तबंध(लग्नातली एक क्रिया तद्भव)... अर्थात.. यांतही मतांतरे आहेतच..
अवांतरः रूबरू या (बहुधा) मॉरिशस मध्ये चित्रित झालेल्या सिनेमात भारतीय नायक-नायिका तिथल्या बोलीभषेत धन्यवाद म्हणताना "कापून खा" असं म्हणतात.. :D
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
3 Jun 2009 - 11:38 am | सुबक ठेंगणी
अरे...कांपुन खा..हे तर थाई भाषेत पण धन्यवाद आहे...बहुतेक!
4 Jun 2009 - 12:14 am | वर्षा
>>बाकी भाषेतली साम्यं बर्याच ठिकाणी आढळतात..
खरंय. यावरुनच आठवलं,
"या मुंडा-ऑस्ट्रिक संस्कृतीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो आर्यांच्या भाषेवर, म्हणजे संस्कृतवर. भारतात बोलल्या जाणार्या भाषांचे साधारण तीन गट पाडता येतील. उत्तरेत बोलल्या जाणार्या संस्कृत व संस्कृतोद्भव भाषा, दक्षिणेतील तमिळ, व तिसरी मुंडांची आदिम भाषा. यांपैकी संस्कृत, पर्शियन व युरोपियन भाषा एकमेकींना अतिशय जवळ आहेत. तमिळ भाषेचे द्रविडी व फिनीश, एस्टोनियन भाषांशी साम्य आहे. यांपैकी पहिल्या दोन गटांतील भाषांनी ऑस्ट्रिक भाषेकडून बरीच उधारउसनवार तर केलीच, शिवाय आपापसातही त्यांची बरीच देवाणघेवाण झाली.
ऑस्ट्रिक भाषेतील अनेक शब्द संस्कृत व तमिळ भाषेत आले. उदाहरणार्थ, मुंडा भाषेत 'जोम' म्हणजे खाणे. या शब्दाचं रूप चोम-ला, आणि त्यापासून तयार झाला चावल. रागी, माष (माठ), मुद्ग (मुग), मसूर, तांदुल या शब्दांचा उगमसुद्धा मुंडा भाषेतच आहे. वतिंगन/ वार्टक/ वृंटक (वांगे), अळाबु (लाल भोपळा), तुंडी (तोंडले), पतोल (पडवळ), कदली (केळे), पनस (फणस) , नागरंग (नारिंगे, पुढे इंग्रजीत orange), चिंचा (चिंच), हरिद्रा (हळद), तांबूल (विड्याचे पान), गुवाक (सुपारी) हे सर्व संस्कृत शब्द मुंडा भाषेतून आले. मुंडा भाषेत न्यु/न्गाई म्हणजे तेल किंवा अर्क. कोलाई म्हणजे दाणा. हे दोन शब्द एकत्र आले आणि नारिकेल (नारळ) हा शब्द तयार झाला."
संदर्भः http://www.maayboli.com/node/2802
असो. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)
3 Jun 2009 - 12:00 pm | रोचीन
वर्षा-सान,
कोनिचिवा!!! दो देस का.
गो नेन माए ए.एस्.बी. दे हाताराइते इमाश्ता का. :?
कोनो किजी गा ईई ने!!!!मोत्तो काइते कुदासाइ ने!!!! :)
3 Jun 2009 - 12:41 pm | आनंदयात्री
सुंदर लेख वर्षा सान.
पुढले भाग पटापट येउ द्या .. वाचतांना मौज वाटतेय :)
वाताशिवा निहोंगो बेंक्युशिमास. :D
12 Jun 2009 - 2:53 pm | केवळ_विशेष
निहोंगोनो बेन्क्यो~ शिमासका?
3 Jun 2009 - 1:28 pm | शाल्मली
मस्त झाला आहे हा भाग!
आवडला.
जपानी शब्द छान वाटत आहेत. पुढच्या भागात अजून असेच शब्द येऊदेत..
यावरुन माझी एक मैत्रिण जपानी शिकत असताना तिने मला कुठलंतरी एक जपानी बडबडगीत शिकवलं होतं- फुलपाखरावर होतं. आता आठवत नाहीये पण साकोरे-चोचो असे काहीतरी शब्द होते. त्याची आठवण झाली. :)
--शाल्मली.
3 Jun 2009 - 11:30 pm | भाग्यश्री
हेहे.. जॅपनिज मला भयंकर आवडते.. आई, भाऊ, अनेक मैत्रिणी जॅपनिज शिकल्यामुळे मला फार आवडते ती.. कधी कधी कळते देखील.. पण स्वतः नीट शिकणे काही होत नाहीये! सुरवात बर्याचदा केली.. कांजी पण काढल्या! पण वाताशिवा भाग्यश्री देस! कोन्निचिवा अशा बेसिक्सच्या पलिकडे काही येत नाही! :)
तुम्ही जरा बेसिक्स पासून सुरू करा ना.. जॅपनिज येणारे खूप लोक्स असतात... शिकायला मजा येईल..
असो, मस्त लेख लिहील्याबद्दल अरिगातो गोझाईमाशिता!!! :)
www.bhagyashree.co.cc
3 Jun 2009 - 11:45 pm | बिपिन कार्यकर्ते
का एवढा लहानसाच लेख लिहिलात? वाचायला मजा आली पण अजून बरंच काही वाचायला आवडलं असतं. आता लिहा बरं लवकर लवकर... भाग्यश्री म्हणते तसं, जपानी भाषेच्या बेसिक्स पासून सुरूवात करा बरं...
बिपिन कार्यकर्ते
4 Jun 2009 - 12:18 am | वर्षा
सुबक,
>>मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय.
आतापर्यंत लिहिले का नाहीस? ओनेगाई शिमास! (प्लीज..) :)
बाकी भाग्यश्री, बिपीन, शाल्मली, आनंदयात्री, रोचीन, सहज, स्वातीताई, प्राजु, विंजिनेर, क्रान्ति, रेवती सर्वांना आरिगतो! (धन्यवाद) :)
4 Jun 2009 - 2:39 am | मस्त कलंदर
मला कांपुन खा नाही?? :''(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
4 Jun 2009 - 3:06 am | वर्षा
तुलापण कांपुन खा दिलंय की. वर बघ :)
6 Jun 2009 - 5:31 pm | विसोबा खेचर
वर्षा मॅडम,
भाषा अंमळ मजेशीर वाटते आहे! :)
छान लेख, येऊ द्या अजून..
तात्या.
6 Jun 2009 - 11:59 pm | सँडी
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो.
तानाका कायत्ता. (तानाका परत गेला/ली) या वाक्यात तानाका स्त्री का पुरुष हे समजत नाय.
記事が面白い。(चु.भु.दे.घे.)
7 Jun 2009 - 12:17 pm | सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Jun 2009 - 12:04 pm | सुनील
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो.
बंगालीतही पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात. इतकेच कशाला इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Jun 2009 - 2:01 am | वर्षा
>>इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे?
पण इंग्रजीमध्ये नावाआधी Mr./Mrs/Ms लिहिल्यामुळे असा गोंधळ होत नाही. पण जपानीत होतो. कारण जपानीत 'Mr./Mrs/Ms' साठी 'सान' हा कॉमन शब्द आहे. त्यामुळे सॅंडी म्हणाले तसं 'तानाका-सान' म्हटल्यास तानाका ही व्यक्ती बुवा की बाई हा बोध होत नाही! :)
हं पण तानाकाचं first name जर माहिती असेल तर असा गोंधळ होणार नाही. कारण जपानी मुलांच्या नावाच्या शेवटी साधारणपणे '-रो', 'रु' 'ता' अशी अक्षरे असतात (उदा. इचिरो, वातारु वगैरे) तर मुलींच्या '-को' किंवा '-ए' (मिचिको, सानाए वगैरे.) अर्थात हा ढोबळ नियम आहे. :)
8 Jun 2009 - 7:29 am | सुनील
म्हणजे हे थोडेसे शीखांसारखे झाले. कुलजीत सिंग हा बुवा तर कुलजीत कौर ही बाई! :)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Jun 2009 - 12:18 pm | मुक्ता
खुप मजा आली वाचताना.पुढचा भाग लवकर येऊदे.
../मुक्ता
7 Jun 2009 - 12:20 pm | सुनील
छान बडबडगीत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Jun 2009 - 6:53 pm | अनिल हटेला
मस्तच आहे जपानी भाषा ...
चला आता पूढचा भाग पटकन येउ देत !!
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)