कुठली खिडकी? कितवा मजला?

ॐकार's picture
ॐकार in जे न देखे रवी...
8 Feb 2008 - 8:32 am

कुठली खिडकी? कितवा मजला?

निळ्या पांढर्‍या भिंती दिसल्या
बावरलेल्या नजरा वळल्या
शब्दांनीही खाटा धरल्या
प्रश्न तेवढा एक राहिला
कुठली खिडकी? कितवा मजला?

मित्र,सोयरे सगळे जमले
नव्या घरी येताना दिसले
बंद लिफ्ट पाहून म्हणाले
किती पायर्‍या चढावयाला?
कुठली खिडकी? कितवा मजला?

मध्यरात्रीचा प्रहर नेमका
हेरून गेलो तसा बेरका
व्यवहारी मी मदन नेटका
पैसे मोजत खांद्यावरती हात टाकला
कुठली खिडकी? कितवा मजला?

रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी
विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी
मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी
झोपायाला जमीन, अंबर पांघरायला
कसली खिडकी! कसला मजला!

-ॐकार

कवितासमाजजीवनमानतंत्रराहणीविचारमाध्यमवेधप्रतिक्रियाप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Feb 2008 - 5:21 pm | विसोबा खेचर

रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी
विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी
मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी
झोपायाला जमीन, अंबर पांघरायला
कसली खिडकी! कसला मजला!

वा ओंकारा, क्या बात है! वरील ओळी आवडल्या...

तात्या.

प्राजु's picture

8 Feb 2008 - 6:45 pm | प्राजु

ॐकार
खूपच छान..
शेवटचे कडवे खास जमले आहे....

- प्राजु

सुवर्णमयी's picture

8 Feb 2008 - 10:32 pm | सुवर्णमयी

कविता खूप आवडली.
सोनाली

चित्तरंजन भट's picture

14 Feb 2008 - 4:51 pm | चित्तरंजन भट

वा!! कवितेतील सर्वच मजले आणि खिडक्या फार आवडल्या. त्यातील मिस्किलपणा विशेष.

नंदन's picture

14 Feb 2008 - 7:09 pm | नंदन

कविता आवडली. शब्दांनी धरलेल्या खाटा आणि शेवटचे कडवे खासच.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय's picture

14 Feb 2008 - 7:34 pm | धनंजय

बाकी सर्व कडवी इतकी घट्ट बांधलेली आहेत, की शेवटचे कडवे कवीने मुद्दामून सैल सोडले आहे (चुकून नव्हे) असे वाटते. पण का?

परतपरत प्रयत्न करून मी घसरून असेच वाचतो :
रिक्तहस्त मी एकभुक्त मी
विषय- वंचना- व्यसनमुक्त मी
देव, दानवहि, आणि भक्त मी
पाठी भू, नभ पांघरायाला
कसली खिडकी! कसला मजला!

पण बाकी कडवी तालबद्ध रचणारा ॐकार हे कडवेही त्याच तालात सहज बसवू शकला असता. मग ते जसे आहे तसे बसवण्यात काही विशेष काव्यमय दृष्टी आहे काय?

ॐकार's picture

19 Feb 2008 - 5:56 pm | ॐकार

पहिल्या ३ कडव्यांत लय साधल्याने कविता ओघवती होते. शेवटच्या कडव्यात त्याला लगाम घातला आहे. शेवटचे कडवे हे पहिल्या तीन कडव्यांशी विसंगती दर्शवते.
पहिले कडवे - कॅन्सर अथव तत्सम व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णाशी संबंधित.
दुसरे कडवे - जगण्यातला साधेपणा हरवून बसलेल्या प्रवृत्तीचे द्योतक.
तिसरे कडवे - तर्जनिनासिकान्याय करणार्‍याचे वर्णन.

चौथ्या कडव्यात फारकत घेऊन विषय, वंचना, व्यसन (पहिली ३ कडवी ) यापासून लांब असणार्‍या; देव, दानव, भक्ती अशा संकल्पनांत न रमणार्‍या ; पैसा, भूक आणि भोग यांनी न डळमळणार्‍या आणि विश्वात सर्वत्र संचार करणार्‍या प्रवृत्तीचे निवेदन आहे. ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. 'कसली खिडकी, कसला मजला' यातून प्रकट होणारा निष्काळजीपणा जरी नेहमीचा असला तरी वर्णन केलेली वृत्ती आढळणे कठीण!

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 6:02 pm | विसोबा खेचर

वा ओंकारा!

ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू.

खुलासा लै भारी केला आहेस बाबा..!

आता पुन्हा एक डाव तुझ्या खुलाश्याबरहुकूम कविता वाचून पाहतो..

तात्या.