दलाल स्ट्रीटची काही वर्षं. भाग ६

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
1 Mar 2009 - 7:00 pm

उन्हाळ्याची रात्र.गच्चीवर गाद्या घातल्या आहेत.जेवणानंतर पत्ते खेळून दमल्यावर गार गार गादीवर पडल्या पडल्या गप्पा मारत एकेक जण झोपी जाणार आहे.मग आपण हळूच उशाखालचा ट्रांजीस्टर काढून फक्त आपल्याला ऐकू येईल इतपत आवाज ठेवून ऑल इंडीया रेडीओवर उर्दू सर्वीसची गाणी ऐकायची.साडेअकरा वाजले की कुठल्यातरी अनोळखी भाषेतलं गाणं मिळेल त्या स्टेशनवर ऐकायचं. कंटाळून एक फेरी गच्चीत मारायची. वार्‍यावर मोहराचा उग्र सुगंध मोठ्ठा श्वास घेउन छातीत भरून घ्यायचा.वाघळं फडफडून उडली की दचकायचं.कोपर्‍यात पाण्याचा माठ ठेवलेला आहे. त्यात मोगर्‍याची फुलं न विसरता संध्याकाळी टाकली आहेत. दोन मोगर्‍याचे घोट घेउन आळसावून एक जांभई द्यायची.
अंथरुणावर पडल्या पडल्या आकाशाकडे एकटक बघत रहायचं .......आणि जागं व्हायचं ते उन्हाची तिरीप डोळ्यावर आली की..

मी लक्ष देऊन ऐकतो आहे म्हटल्यावर सदानंद नजर रोखून पुढे बोलायला सुरुवात करायचा
वेटरला खूण करून बर्फाचे दोन तुकडे टाक म्हणून सांगताना ते मोगर्‍याचे घोट कसे विसरलो.?
ऑल इंडीयाची गाणी ऐकणारा रसीक कॅसेटवाल्याकडे वीस रुपयाची नोट कशी सरकवायला लागला?
बारमधला वेटर ओशट हसल्यावर हात कसा खिशाकडे वळायला लागला ?
दहा दहा रुपयाचा दौलतजादा करताना बोटांवर बारबालेची बोटं कधीपासून रेंगाळायला लागली ?
खिशात पेपर नॅपकीन वर लिहीलेला फोन नंबर नक्की कुणाचा आहे हा विचार स़काळी कधीपासून छळायला लागला .?
सदानंद मला मार्केटमध्ये भेटला की असे काहीतरी प्रश्न विचारायचा.मी शक्यतो त्याला टाळायचो कारण त्याचे प्रश्न मला छळायचे. छातीवर बोट टोचून जागे करायचे .
खरं सांगायचं तर आधी एकच डान्स बार होता नरीमन पॉइंटला.सोनीया बार. एंट्री फी दिडशे रुपये. सोनीयाच्या डान्सर नंतर फिल्म इंडस्ट्रीत गेल्या आणि सोनीयामध्ये भाई लोकांची गर्दी सुरु झाली.छोटा राजन (तेव्हा खरोखरच छोटा होता.) अमर नाईक ,कधी कधी बाब्या खोपडे.
नंतरच्या वर्षी लिकींग रोडला एक सनराइज डान्स बार सुरु झाला. (तिथे आता मॅटर्नीटी होम आहे.)
नंतर मुंबईत डान्स बारची साथ आली.मार्केट मध्ये राहून बार पासून दूर राहणं शक्यच नव्हतं.जी माणसं दुपारी मार्केटमध्ये भेटायची तीच रात्री डान्स बार मध्ये भेटायची.
मुंबईत पैसा वहायला लागला आणि हर्षद मेहेताच्या तेजीतले पैसे इथे संपायला लागले. हर्षद मेहेता लेक्सस सिंड्रोमनी गेला आणि सब ब्रोकर डान्स बार मध्ये संपले.
मग एक फ्रॉडची साथ मार्केटमध्ये आली.कुरीअरवाले बाहेरगावचे शेअर चोरी करून विकायला लागले.हा प्रकार इतका कडेलोटाला पोहचला की मुंबई पोलीसांना इकॉनॉमीक ऑफेन्सेस विंग मध्ये एक शेअर बाजाराचा सेल तयार करायला लागला.चोरीचे शेअर ,ड्युप्लीकेट शेअर एकेक ही रोजची डोकेदुखी झाली.
माझं मन कधीच रमलं नाही डान्स बारमध्ये.मुलींची ऍलर्जी होती अशातला काही भाग नव्हता .मुली भरपूर ओळखीच्या होत्या पण त्या प्रीपेड फोन कार्डासारख्या .एका बाजूला हसणारा चेहेरा आणि पाठच्या बाजूस टर्म्स अणि कंडीशन्स.कधी पैसे तरी संपायचे नाहीतर व्हॅलीडीटी तरी.
समस्या वेगळीच होती.
ब्रोकींग सुरु केल्यापासून एकच विचार कायम डोक्यात घोळत असायचा. उद्या पैसे आणायचे कुठून .पैशाची कमी नसायची पण कॅश फ्लो मॅनेज करणं ही चिंतेची बाब असायची.डबा करायची सवय असल्यामुळे स्टॉक हातात भरपूर असायचा.काही वेळा लेण(खरेदी) ऍडजस्ट करायला हातातला स्टॉक विकून मोकळा व्हायचो पण प्रत्येक वेळेस ते काही शक्य नव्हतं.ब्लु चिप्स म्हणावे असे शेअर्स ट्रान्सफर ला पाठवले की चार चार महिने ट्रान्सफर होउन यायचे नाहीत आणि ज्याच्या शेअर्सचा डबा केला आहे त्याला तर वेळेवर पैसे द्यायचे.काहीवेळ विचेत्र कात्रीत सापडायचो.एखादा दिवस लिक्वीडीटी मॅनेज करण्यात निघून जायचा.बाजारात त्या दिवशी दुर्लक्ष व्हायचं.संध्याकाळी भावकॉपी वाचताना कळायचं की नफा कमावण्याची एकेक संधी हातातून जात चालली आहे.
मॉर्गन स्टॅनलेचा इश्यु आला आणि मार्केटची तरलता (लिक्वीडीटी) आक्रसायला लागली.मी डबा बहाद्दूर झालो होतो पण अधून मधून वित्तखुडूक पण व्हायला लागलो होतो.हे दोन्ही शब्द सदानंदचेच.
काही झालं तरी हातात पैसा खेळता पाहीजे.
काही झालं तरी.
त्यासाठी हातात बँक पाहीजे.
कोलॅटरल पाहीजे.
एक दिवशी पेपर चाळता चाळता ग्रींडलेज बँकेची जाहीरात वाचली.
कॅशेट नावाची एक स्कीम त्यांनी डिक्लेर केली होती.शेअर्सच्या समोर पैसे देणारी रीटेल स्किम .ग्रींडलेज ही काही पहीली बँक नव्हती अशी स्किम आणायला.
स्किमस्टर बॅकेत पहीला नंबर सिटी बँकेचा. ग्रिंडलेज ब्रिटीश बँक असल्यामुळे थोडी उशीराच काम करायची (ब्रिटीश मानभावीपणा.)
ज्या संधीची मी वाट बघत होतो ती समोरून चालत आली होती.सरळ मार्गानी ग्रींडलेज कधी पैसे देणारच नव्हती.
ठीक आहे.काढून घेउ.जयकुमारनी विचार करायला शिकवलं होतंच आता अंमलबजावणी करू.मनाची तयारी करायला वेळ लागला नाही.चढतं मार्केट डोळ्यासमोर दिसत होतं.पैसे काढून घ्यायचे म्हणजे कर्ज घ्यायचं.लायकी नसली तर ....फड्डा करायचा.
फ्रॉडचे दोन प्रकार असतात.
पहीला म्हणजे न परतावा करण्यासारखा.एकदाच एका बँकेत करता येतो. दुसर्‍यांदा करायचा झाला तर शाखा आणि माणसं बदलावी लागतात.खर्च वाढत जातो आणि त्यातली गोम कळली की आपले पित्ते साईडशो सुरु करतात आणि गेम संपते.
दुसरा म्हणजे परतावा करता येण्यासारखा फड्डा(फ्रॉडचं दिल्ली स्टाईलचं नाव)
आपतधर्म म्हणून सगळ्या कंपन्या हा फड्डा करत असतात. बँकांना हे माहीती असतं पण कस्टमर टिकवायच्या नादात त्या थोडंस दुर्लक्ष करतात.बिल डिस्काउंटींगच्या धंद्यात याला ऍकोमोडेशन बिलींग म्हणतात.परंतू ह्याचा परतावा करावाच लागतो.परतावा जेव्हढा वारंवार तेवढी विश्वासार्हता वाढत जाते.
कॅशेटची स्किम सुरु केली तेव्हा ग्रींडलेजला खरं म्हणजे त्या कामात रस नव्हता पण बाकीच्या बँका करतात म्हणून त्यांनीही शेअर्सच्या समोर पतपुरवठा सुरु केला.साहजीकच त्यामुळे ज्या दिवशी मी बँकेत पेपरचं कात्रण घेऊन गेलो तेव्हा पी.एम.रोडच्या मॅनेजरला बॅकेनी स्किमची सुरुवात केली आहे हेच मूळात माहीती नव्हतं.डी.एन. रोडच्या शाखेत फोन करून त्यानी जुजबी माहीती मला दिली आणि किती क्रेडीट पाहीजे हे विचारलं . मी सांगीतलेली रक्कम ऐकल्यावर हातात इस्पीकचा एक्का असलेला माणूस किलवरच्या सत्तीकडे जेव्हढं तुच्छतेनी बघेल तेव्हढं बघीतलं .त्याचं अदबदार इंग्रजी संपलं आणि दिल्लीच्या राठ हिंदीत त्यानी उद्या सकाळी बॅकऑफीसला संपर्क करायला सांगीतलं .
बरीच वर्षं बुद्धीबळ खेळण्याची सवय असल्यामुळे मी लगेच दुसर्‍या दिवशी बँकेत गेलो नाही.
आधी बोर्डाचं निरीक्षण करायचं हा पहीला नियम.
एक गोष्टं माझ्या लक्षात आली होती की फॉरेनच्या बँकेत फ्रंट ऑफीस ते बॅक ऑफीस अंतर फार मोठं असतं.
मॅनेजर फक्त धोरणात्मक निर्णय घ्यायला आपल्याला इथे ठेवलं आहे अशा अविर्भावात काम करत असतात.(म्हणजे काहीच करत नसतात)
बँकेतला इस्ट इंडीअन स्टाफला पाच चाळीसची विरार आणि आपलं टेबलच्या पलीकडे दुनीया आहे हे माहीती नसतं .
बँकेचे क्रिटीकल कांपोनंट म्हणजे फ्रंट ऑफीसची दोन टेबलं. एक क्लीअरींग मॅनेजर आणि दुसरा कॅश ऑफीसर.(बाकीचा स्टाफ आठवड्यातून एकदा आला तरी पुरतं.)
सतत खदखदणारं आणि महत्वाचं म्हणजे बॅक ऑफीस.खरे कामकरी इथे असतात. बॅक ऑफीसला प्रमोटीज आणि सिनीअर माणसांना ठेवतात.
ग्रींडलेज या नियमाला अपवाद नव्हती. माझ्या अपेक्षेप्रमाणेच मोहोरी त्यांच्या त्यांच्या जागेवर होती.
बुद्धीबळाचा दुसरा नियम क्रिटीकली इंपोर्टंट मुव्ह करायचं टायमींग.
शनीवार बँकेत जायचा चांगला दिवस.
तेव्हा शनीवारी क्लीअरींग नसायचं .हाय वॅल्यु पण नसायचं .
बॅकेतली काम करणारी माणसं शनीवारी गाफील असतात.
मॅनेजर केवळ उपचार म्हणून आलेले असतात.
मी गुरुवारी बँकेत फोन केला.परत एकदा ब्रँच मॅनेजरशी बोललो
नाखूषीच्या सुरात बॅक ऑफीसला भेटायला सांगीतलं होतं ना असा उलट प्रश्न त्यानी विचारला.याचा अर्थ तो विसरला होता आणि आता दुसर्‍या दिवशी जायला हरकत नव्हती.
शनीवारी सकाळी मी बँकेत पोहचलो आणि इकडे तिकडे न बघता सरळ बॅक ऑफीसला गेलो.
क ऑफीस बॅक ऑफीस सारखं होतं.सरकारी बँकेत आल्यासारखं वाटायला लागलं.फायली,फोल्डरचे गठ्ठे,सुतळी धाग्याचे तुकडे,दरवाजे उघडी असलेले गोदरेजची कपाटं.स्टेशनरी,व्हावरचरचे बाईंडर,खिळ्यावर टांगलेले कपडे,त्यात मध्येच दोन स्टूलं ,चार खुर्चा आणि दोन टेबलं.हा खरा बँकेचा ऍक्टीव्हीटी हब.इथे काम करणारे एमबीएच्या डिग्र्या न घेता वर्षानुवर्षं काम करत असतात.ते इथेच रिटायर होणार असतात .नंतर मुंबईत नक्की राहणार नसतात.जोतीबा, आंगणेवाडी वगैरेच्या सुट्ट्या वगळता बारा बारा तास काम करत असतात.बारा तासात विरंगुळा म्हणजे क्लीअरींग हाउसचे येणारे प्युन, कुरीअर बॉईज,सोलंकी किंवा परमार नावाचे भंगी (व्हावचरचं पेमेंट घ्यायला.).बाकी मानमोड काम.
माझा चेहेरा फारच मराठी माणसाचा दिसत असावा.
"काय पाहीजे साहेब" या शब्दात स्वागत झालं .माझा जीव भांड्यात पडला.पिच अनुकुल असण्याची चिन्हं होती.
मी थोडसं मुद्दाम चाचरत माझ्या येण्याचं प्रयोजन सांगीतलं .सावंत(त्यांचं नाव सावंत आहे हे नंतर कळलं)बुचकळ्यात पडले.
"हे काय नवीन थेर आहे बॉ." हा मॅनेजर काही सांगत नाही आणि पाठवून देतो बॅक ऑफीसला.पटकन उठून ते मॅनेजरला भेटायला गेले.पाच दहा मिनीटानी परत आले.
"बरं का साहेब .ही स्किम आहे नवीन आणि स्टेशनरी काही अजून आलेली नाही काय करायचं मग ?"
मी म्हटलं "मलाही काही घाई नाही येतो दोन दिवसानी."
सावंतांचं माझ्या उत्तरानी समाधान झाल्यासारखं वाटलं .
बघा मराठी माणूस आहात म्हणून सांगतो हां .काय ?
काय? मी विचारलं.
"ह्या बँकेत काम टाळायची असली तर बॅकऑफीसला पाठवतात."
तुम्हाला किती क्रेडीट पाहीजे म्हणताय ? सावंत म्हणाले.मी सांगीतलं .
त्यांनी मान डोलावली.
"आणि बघा आम्हाला काही ते शेअरबाजाराचं काही शाट कळत नाही.तुम्हालाच सगळी मदत करायला लागेल हां .काय समजलांत ?" (माझ्या मनात हायसं झालं दान हवं तसं पडत होतं.)
एव्हढ्यात चहा आला. मलाही मिळाला. पंधरा वीस मिनीटं तुम्ही कुठले आम्ही कुठले ह्याची चर्चा झाली. मॅनेजरच्या आवशीचा घो झाला आणि आमचं बोलणं राणी पार्वतीदेवी शाळेपर्यंत पोचलं .
अर्ध्या तासानी दोन चार गजालींची देवाणघेवाण करून मी बँकेतून बाहेर पडलो.
पटावर घोडं पुढे दामटण्याइतपत जागा तयार झाली होती.
ट्रेझरीच्या मॅनेजर्सना रिटेलमध्ये काहीच रस नव्हता.
सावंतांच्या सोबत बसून मी त्यांना शेअरबाजाराची संथा दिली.त्यांना कळावं इतकच शिकवलं .त्या आठवड्यात एक आणखी माणूस कर्ज मागायला आला. त्याचा अर्ज मी आणि सावंतांनी मिळून प्रोसेस केला.
हा अर्ज प्रोसेस केल्यावर मला कळलं की सावंत कुठेच सही करत नाहीत.ते प्रमोटी असल्यामुळे क्रेडीटच्या कागदावर त्यांची सही नसायची.ते कागद बनवायचे आणि सेठी(मॅनेजर) सही करायचा.
माझा जीव भांड्यात पडला.म्हणजे मी काही गेम केली तरी माझं प्यादं सुरक्षीत राहणार होतं.
आता या जागेवरून मी शिड्या लावायला हरकत नव्हती.त्याच्या पुढच्या आठवड्यात माझा अर्ज मी टाकला. रणबक्षी,मुकंद,सेसा गोवा असे लगडी(मार्केटचा शब्द) शेअर टाकले.पहीला चेक दोन लाख सत्तर हजाराचा मिळाला.दुसर्‍या आठवड्यात कल्याणी स्टील .क्रेडीट सात लाख झालं .नंतरच्या महीन्यात जैन इरीगेशन आणि बजाज ऑटो.क्रेडीट चौदा लाख.सावंतांना माझं फार कौतुक वाटायचं.दोन महीन्यानी सगळे शेअर काढून घेतले .बँकेला रीप्लेसमेंट म्हणून इंगरसोल रँड आणि ग्लॅक्सोचे शेअर दिले.बॅकेतून काढलेले शेअर विकून टाकले.अशी ट्रँजॅक्शन चार पाच झाल्यावर येण्याजाण्याचा रस्ता स्मूथ झाल्याची खात्री पटली.
आपत कालीन रस्ता म्हणून सावंतांना कधीही वापरता आलं असतं.
चाचपणी करून एकदा खात्री झाल्यावर पुढची खेळी केली.बुध्दीबळाच्या खेळात आणि या खेळात एक महत्वाचा फरक असा होता की बँक मला अपोनंट समजत नव्हती आणि मी बँकेला अपोनंट समजत होतो.त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळी काय असेल याचा अंदाज नव्हता.म्हणून त्यातल्या त्यात एक सॉफ्ट गेम सुरु केली .त्यावेळी शेअर सर्टीफीकेट कागदी असायचं .फिजीकल फॉर्म. ट्रान्सफर करताना त्याला एक ट्रान्सफर डीड जोडून सह्या करून ,योग्य रकमेचे सरकारी स्टँप लावायचे आणि ट्रान्सफर एजंटकडे पाठवायचे. ते परत कधी येतील याची काहीच खात्री नसायची.कधी दोन महीने तर कधी तीन .एव्ह्ढ्या काळात काही शेअरची किंमत अर्धी व्हायची पण इलाज नव्हता.
नव्हता कसा .? होता.सोपा होता.
मार्केटमधून डिलीव्हरी आली की ओरीजीनल ट्रान्सफर डीड काढून बाजूला ठेवायचं .
मागच्या बाजूस जिथे नविन मालकाचं नाव लिहायची सोय होती तिथे आपलं नाव लिहायचं किंवा टाईप करायचं.(एक काळजी इथे घ्यावी लागायची.काही कंपन्या हाती एंडॉर्समेंट करायच्या तर काही टाईप करायच्या.काही कंपन्या तिसर्‍या रकान्यात गोल शिक्का मारायच्या तर काही कंपन्यांचा सेक्रेटरी फक्त इनीशीअल करायचा.)
मग हे शेअर बँकेत द्यायचे आणि पंचाहत्तर टक्के घेउन आपला लिक्वीडीटीची समस्या सोडवायची.
या शेअरची किंमत वाढली की बाजारात विकायचे.दुसरे शेअर बँकेत ठेवायचे.मागील पानावरून कहाणी पुढे चालू.
झालं .समस्या संपल्या. हातात अमर्यादीत तरलता आली.आणि उद्दामपणा पण आला.
आणि उद्दामपणाची पुढची पायरी सहा महीन्यात मी गाठली.
पाचशे कंपन्या. त्यांची पाचशे रंगाची सर्टीफीकटं.बॅकेला कधीच कळणार नाही कीखरं सर्टीफीकेट कुठलं आणि खोटं कुठलं.
माज वाढला.बँकेची लायकीच नाही खरी सर्टीफीकेट ठेवण्याची.
शेवटची खेळी केली.फसवी चाल.अपोनंट गाफील. रीस्क मोठी पण फायदा पण मोठा.....
क्रेडीट अठरा लाखाला पोहचलं आणि ग्रींडलेज मधली सगळी स्टॉक सर्टीफीकेट नल्ला होती.
हातात डबा करून जमा झालेला कॅश प्रॉफीट एकवीस लाख आणि बॅंकेचे अठरा लाख.वय वर्षं एकतीस.
नशा डोक्यात जायला इतकं कारण पुरेसं होतं.
हँगओवरचा त्रास कळायला दुसरा दिवस उजाडत होताच.
पण रात्र बाकी होती.
(अपूर्ण)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

1 Mar 2009 - 7:12 pm | अवलिया

बेस्ट बेस्ट बेस्ट

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Mar 2009 - 7:14 pm | बिपिन कार्यकर्ते

ढिश्क्यांव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2009 - 7:28 pm | परिकथेतील राजकुमार

लै भारी !!

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

मदनबाण's picture

1 Mar 2009 - 7:33 pm | मदनबाण

खतरनाक खेळी !!!
मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2009 - 8:49 pm | प्रकाश घाटपांडे

मुली भरपूर ओळखीच्या होत्या पण त्या प्रीपेड फोन कार्डासारख्या .एका बाजूला हसणारा चेहेरा आणि पाठच्या बाजूस टर्म्स अणि कंडीशन्स.कधी पैसे तरी संपायचे नाहीतर व्हॅलीडीटी तरी.

दोन्ही जमल तर ऍसिडिटी चा त्रास:T :-T
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चतुरंग's picture

1 Mar 2009 - 9:04 pm | चतुरंग

माय नेम इज फ्रॉड! अल्टिमेट फ्रॉड!! ००७ -------->>>!! B)

चतुरंग

विनायक प्रभू's picture

1 Mar 2009 - 9:15 pm | विनायक प्रभू

एका वर्षात विकले. कालच २०० युनीट नावावर आहेत चे पत्र आले. किंमत ६१४८
बाकी टर्म्स अँड कंडीशन लय भारी

प्राजु's picture

1 Mar 2009 - 11:27 pm | प्राजु

रामदास,
आपल्याला मानलं...!
ग्रेट!..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

2 Mar 2009 - 2:24 am | घाटावरचे भट

कहर!!!

संदीप चित्रे's picture

2 Mar 2009 - 3:03 am | संदीप चित्रे

तुमची ही लेखमाला वाचताना :)

सहज's picture

2 Mar 2009 - 5:38 am | सहज

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये!!

ही लेखमाला भलतीच उत्कंठावर्धक. पुढे मागे बर्नी मॅडॉफने लिहले तर ते वाचताना ह्याची आठवण नक्की येणार :-)

पुढचा भाग लवकर येउ दे.

रामदास's picture

2 Mar 2009 - 9:48 am | रामदास

बर्नी मॅडॉफच्या अगोदर आणखी एक अवतार होऊन गेला.त्यानी तर हॅनोवर ट्रस्ट बॅंकच टेकओव्हर केली होती.
बघू या नंतर कधीतरी ही गोष्ट लिहीन.

अनिल हटेला's picture

2 Mar 2009 - 8:09 am | अनिल हटेला

पू भा प्र.................

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भडकमकर मास्तर's picture

2 Mar 2009 - 8:29 am | भडकमकर मास्तर

शेअर बाजारातल्या इतक्या खाचाखोचा माहित नाहीत पण हे लेखन वाचताना मजा येते...
अवांतर : तो शून्य प्रहराचा पुढचा भाग आला का हो?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वानंद's picture

2 Mar 2009 - 9:02 am | स्वानंद

१८ लाख भरून गपगुमान ते ५०० रंगाची कागद घेऊन जा!!!!

-मॅनेजर
स्वानंद कदम
ग्रींडलेज बँक

दशानन's picture

2 Mar 2009 - 9:08 am | दशानन

:)

सही... अत्यंत सुंदर !

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 9:52 am | विसोबा खेचर

रामदासभावजी,

जबरा लेखमाला...!

तात्या.

सुनील's picture

2 Mar 2009 - 11:19 am | सुनील

ऑल इंडीयाची गाणी ऐकणारा रसीक कॅसेटवाल्याकडे वीस रुपयाची नोट कशी सरकवायला लागला?
बारमधला वेटर ओशट हसल्यावर हात कसा खिशाकडे वळायला लागला ?
दहा दहा रुपयाचा दौलतजादा करताना बोटांवर बारबालेची बोटं कधीपासून रेंगाळायला लागली ?
खिशात पेपर नॅपकीन वर लिहीलेला फोन नंबर नक्की कुणाचा आहे हा विचार स़काळी कधीपासून छळायला लागला .?
[(

हर्षद मेहेता लेक्सस सिंड्रोमनी गेला आणि सब ब्रोकर डान्स बार मध्ये संपले.
हे असं सगळीकडेच होतं. सब ब्रोकरकडून पैसा त्या मुलींकडे आला खर पण तो त्यांचाकडेतरी कुठे राहिला? विनासायास मिळालेला पैसा अगदी सहजच जातो!!

मुली भरपूर ओळखीच्या होत्या पण त्या प्रीपेड फोन कार्डासारख्या .एका बाजूला हसणारा चेहेरा आणि पाठच्या बाजूस टर्म्स अणि कंडीशन्स.कधी पैसे तरी संपायचे नाहीतर व्हॅलीडीटी तरी.
काय मस्त लिवलय रामदासशेठ!!! =))

बाकी पुढचं मार्केटमधलं तांत्रीक काय फारसं कळलं नाही, पण मजा येतेय वाचायला! लवकर पूर्ण करा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंदयात्री's picture

2 Mar 2009 - 6:21 pm | आनंदयात्री

मस्त लिहलय रामदास काका. पुढला भाग येउ द्या.

शिवापा's picture

3 Mar 2009 - 12:12 am | शिवापा

फक्त एवढचं. सलाम साहेब सलाम!

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 7:32 pm | लिखाळ

मस्त.. शेअर मार्केट बद्दलची माहिती नाही पण तर्काचं घोडं कुठल्याही पटावर सारखंच चालतं.
वाचायला जाम मजा येत आहे.
-- लिखाळ.

रामदासकाका, पुढे काय झालं?

विजुभाऊ's picture

12 Aug 2013 - 1:59 am | विजुभाऊ

तेच विचारतो. पुढे काय झाले?
साले हे रामदास भौ.. ना एक लंबरचे बदमाश...अर्धी मान कापून ठेवतात आणि जीव टांगणीला लावून ठेवतात

खटपट्या's picture

12 Aug 2013 - 10:28 am | खटपट्या

मस्त

पहील्या ५ भागान्ची लिन्क मीळेल का ?

खटपट्या's picture

12 Aug 2013 - 11:55 am | खटपट्या

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2013 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आहे ! भाषा एकदम ओघवती आहे... शेवटपर्यंत पकड कायम.

पहिले पाच भाग तर वाचणारच, पण पुढ्चे भाग कोठे आहेत त्यांचे दुवेही कोणितरी टाका...

आदूबाळ's picture

12 Aug 2013 - 1:28 pm | आदूबाळ

नाहीच्चेत ना पुढचे भाग, द्याटस धी प्राब्लेम!

जेपी's picture

12 Aug 2013 - 12:49 pm | जेपी

हा लेख वर आणल्याबद्दल आदुदादुला धन्यवाद .एखाद्या लेखकाचे सर्व लेख एका ठिकाणी वाचायची सोय हवी . मागे श्रामोंचे सर्व लेखन एकाच ठिकाणी मिळाले

अशी सोय आहे. त्या लेखकाच्या प्रोफाईल वर जायचं. त्या लिंकच्या पुढे /authored असं लिहायचं.

उदा. http://www.misalpav.com/user/22284/authored

जेपी's picture

12 Aug 2013 - 1:52 pm | जेपी

आता समजल आणी बराच वेळ हि वाचेल

सविता००१'s picture

12 Aug 2013 - 2:11 pm | सविता००१

काका, अतिशय सुरेख लिहिता हो तुम्ही. आता फटाफट पुढ्चे भाग पण येउद्या.

किसन शिंदे's picture

14 Aug 2013 - 11:14 am | किसन शिंदे

आता फटाफट पुढ्चे भाग पण येउद्या.

वाट बघा.. ;)

द-बाहुबली's picture

30 Sep 2015 - 11:05 am | द-बाहुबली

अफलातुन लिखाण. पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत. या पुढील भाग सापडले नाहीत... कोणी लिंक देइल का ?

अवांतरः- प्रत्यक्ष रामदास काका इथे आहेत व इतर काही सदस्यही त्यांच्यासारखे हुशार अन प्रतिभावान लिखाणचा मनापासुन प्रयत्न करतात म्हणूनच मी मिपावर आहे.

दिवाकर कुलकर्णी's picture

30 Sep 2015 - 12:01 pm | दिवाकर कुलकर्णी

वंडरफूल !!,
मी पण यातून गेलोय पण कोल्हापूरातून,मलाहि स्फूर्ति येऊ घातलीय,
लिहायची,पण तुमची प्रतिभा कोठून आणू?
बढिया,बहोत बढिया
तुमच्या लेखाच्या पुस्तकाचे हक्क घेणे आहेत कलावे!!!!!!!!!!

प्रसाद गोडबोले's picture

30 Sep 2015 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले

पुढे काय झाले ?

विजुभाऊ's picture

1 Oct 2015 - 11:25 am | विजुभाऊ

पुढे काय झाले?
आपल्याप्रमाणेच रामदासकाकाना सुद्धा हा प्रश्न पडलाय?

वैभव.पुणे's picture

7 Oct 2015 - 8:36 pm | वैभव.पुणे

पुढे काय झाले याची सर्वाणाच् उत्सुकता आहे।

पण हा लेख २००९ चा आहे।

गेल्या ६ वर्षात एकहि नविन पोस्ट नाही।

त्यामुळे पुढचे भाग नाही वचावयास मिळणार बहुतेक।।