दलाल स्ट्रीटची काही वर्षं.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
14 Aug 2008 - 8:20 pm

चौदा ऑगस्ट १९९६. मी जीजीभाई टॉवर्सची पायरी खाली उतरलो.सोबत एक जुना मित्र होता.
सो, पती गयु? त्यानी विचारलं.
येस. नो रीग्रेट्स.मी उत्तर दिलं.
वो बेड डिलीवरी का क्या करेगा? त्यानी सहज विचारलं असावं.
राईट ऑफ किया है.तेरेको चाहीये तो लेके जा.सुधार ले.बेच डाल.मी उत्तर दिलं.
बिचारा काहीच बोलला नाही. आम्ही वळून युनीयन बँकेकडे आलो होतो.
सेंडविच खायेगा?कलसे तो तू नही आनेवाला.
चल खा लेते है.
रात्री घरी जायचं की नाही हा पण विचार केला नव्हता.मनात प्रचंड हलकल्लोळ माजला होता.आज दुपारी बसून ब्रोकरचा हिशोब संपवला होता. चेक जेमतेम पस्तीस हजाराचा आणि बॅड डिलीव्हरीचा गठ्ठा हातात होता. पुढे काय? काहीही ठरलं नव्हतं.दलाल स्ट्रीटवर आलेला माणूस इथेच कायम राहतो.सौदा असू दे वा नसू दे. उन ,पाऊस, वारा, बंद ,दंगल ,जयंती , श्राद्ध, काहीही असू दे पाय इथून हलता हलत नाही.
संध्याकाळी स्टॉकमधला शेवटचा पतंग कटल्यानंतर हातात मांज्याचा गुंता आणि रिकामी फिरकी घेउन घरी जाताना खरचटलेले गुडखे जास्तच चुरचूरून दुखायला लागतात तसं काहीसं वाटत होतं.डोळ्यांच्या कडा जळजळायला लागतात ताप आल्यासारखं वाटायला लागतं .लक्षणं तशीच होती सगळी पण हा खेळ नव्हता.उद्या परत नविन पतंग मिळणार नव्हता.
परमेशाच्या स्टॉलवर आलो. सेंडविच खायेंगे .वोल्गा का पान खायेंगे.तेरेको आज फेअरवेल पार्टी.माझा मित्र म्हणाला.
वाक्य संपता संपता तो रडायला लागला.पोस्टाच्या पायरीवर बसून अम्ही दोघही मनमोकळं रडलो.
स्साला ,तू स्पॉटका काम नही करना चाहिये था. अच्छा एनालीस्ट है.इलीयट तूच सिखाया ना जयंतीभाईको?
अब ये सोचके क्या फायदा. दिवालीया तो बोल दिया ना वो. सौदा तो कभी नही लिखना नही है.असं म्हणता म्हणता मी परत एकदा रडायला लागलो.
जाने दे आगेका क्या सोचा है.त्यानी विचारलं.
कुछ नही. थोडी मूडी है. देखो क्या होता है.
सँडविच संपवून आम्ही निघालोच.
वोल्गा का पान?
नही. अब वोल्गा को भूलना है.
मै आता हूं व्हीटीतक .
नही यार तू जा. मी जवळ जवळ ओरडलोच.बिचारा रडवेला झाला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावलं .
लेकीन तू सिध्धा घर जायेगा ना? त्यानी विचारलं.
हा बाबा . एव्हढं बोलून निघालोच.
गाडीत बसल्यावर मनु मंगळचा एक जॉबर दिसला. गाडी सोडून दिली.कुर्ला गाडी पकडली.विंडो जवळ बसून विचार करायला लागलो.
१९८२ साली या मार्केटमध्ये आलो तेव्हा जे हातात होतं तेव्हढंच आज हातात होतं.म्हणजे काहीच नव्हतं.
आलो नाही गेलो नाही. मध्यंतरी झाले ते सगळे भास.
----------------------------------------------------------------------------------------------माझा पहिला ब्रोकर बिपीन देवाणी. माझ्या मित्राचा मोठा भाऊ.तेव्हा सब ब्रोकरला पण ब्रोकरचा मान होता.एका ब्रोकरला सहा बेच(बॅच) मिळायचे.माझ्या मित्रानी माझी ओळख करून दिली.
तुम्हारा बेंक अकाउंट है क्या? पहिला प्रश्न.
हा. है ना. मी माझं पासबुक काढून दाखवलं.पेण अर्बन कोऑपरेटीव बँकेचं पासबुक पाहिल्यावर तो पण गडबडला.पंकज राच नावाचा त्याचा पार्टनर होता.
त्यानी सांगीतलं ये नही चलेगा. बेंक ओफ इंडीया का खाता चाहिये.
त्यानी माझ्या मित्राकडे पाह्यलं.माझ्याकडे पाह्यलं.हताश मुद्रा करून म्हणाला
बोलो कौनसा शॅर लेनेका है?
मी यादी काढली.
एशीयन हॉटेल पाचसो शेअर लेनेका है.
सूं भाव छे.
बारा रुपया पचास पैसा.
केश मा छे.
मी खिशातून पैसे काढून दाखवले.
देखो केश है.
आ घाटीने क्यांथी ले आयवो? माझ्या मित्राला त्यानी विचारलं.
मला राग आला होता. मी म्हटलं मै घाटी नही.ब्राम्हण है.त्याच्यावर काही फरक पडलेला दिसला नाही.
इ बद्धो एकच असं काहीतरी तो म्हणाला.पहिला सौदा लिहीताना त्यानी कंडीशन घातल्या होत्या. दलाली दो टक्का.
मेरा काम तारवणी का है.तारवणी म्हणजे जॉबींग.एका ब्रोकरला सहा बेच(बॅच) मिळायचे.
छोटा सौदा नही मिला तो रोनेका नही.
कन्फर्मेसन शामको मिलेगा.चेक तभीच तयार चाहिये.
वायदेका सौदा नही लिखूंगा. माना हलवत सगळ्या अटी मान्य केल्या होत्या.नेहेमी घ्यायला गेलं तर त्या दिवशीचा हाय्येस्ट भाव. विकायला गेलं तर लोएस्ट भाव. हुज्जतघालायचा प्रश्नच नाही. सौदा बंद.
आताचे दलालीचे दर बघताना कळतं ब्रोकर किती पिळत होता. भावफरक आणि दोन टक्के.
मी राग गिळला. महाराष्टीयन ब्रोकर एक दोनच.आगाशे आणि नाबर.नाबर आणि कंपनी. तिथे जाऊन प्रयत्न करून आलो होतो.पण तिथे नाबर कोणी नव्हताच. सगळेच सुरेस, रमेस ,राजेस आणि सिनीअर सगळे कांतीकाका किंवा कानजीभाई.मराठी माणसाकडे फारच संशयानी बघायला लागायचे.(कदाचीत माझा चेहेरा असेल तसा.)
पण मी घाटी हा सल कायमचा मनात राहीला.हा राग प्रचंड होता .मार्केट सोडेस्तोवर मी कुठल्याच ब्रोकरला भाई म्हणून हाक मारली नाही.
एशियन हॉटेल कम डिवीडंड होता हे मला माहिती नव्हतं.शाळेत शिकलेला समभाग आणि कर्जरोखे हा धडा इतकचं ज्ञान.दोन दिवसानी बिपीन कडे गेलो तेव्हा मला बघून म्हणाला अगले पतावट मे डिलीव्हरी आयेगा. अभी चेक दे दो.फायदा है .देड रुपया डिवीडंड का.और भाव भी बढ गया.भाव साडेपंधरा रुपये झाला होता.
आता हळूहळू दलाल स्ट्रीटचा कारभार समजायला लागला होता. मी फारच वेगानी एकेक गोष्ट शिकत गेलो.हातात ब्लॉक घेऊन ,कोट घालून तो कधी येतो याची वाट दुसर्‍या मजल्यावरच्या जिन्यावर आम्ही थांबायचो.आपला ब्रोकर दिसला की धावत जाउन ऑर्डर हातात द्यायची. ह्या बाबाचं तोंड पानानी गच्च भरलेलं असायचं.
इतना सौदा लिखनेका टाईम नही है आज.अशीसगळी मग्रूरी ऐकायची आणि शक्य तेव्हढे सौदे पदरात पाडून घ्यायचे
एशियन होटेल नंतर अल्कील अमाइन , ग्रिंडवेल नॉर्टन, सगळे पेनी शेअर्स. सहा सात महिन्यानी पन्नास साठटक्के भाव वाढले.
बिपीन पंकज आता मला विचारायला लागले होते क्या ध्यान लगता है?
आमच्या घरी मात्र फार कौतुक . पोस्टात पैसे ठेवणं आणि अडीअडचणीला काढणं या पलीकडे माहिती नाही.पोस्टातून रंगीबेरंगी ऍन्युअल रीपोर्ट यायला लागल्यापासून भाव सॉलीड वधारला होता.
कायनेटीक होंडाच्या इश्यु नंतर मात्र एका नविन वळणाला सुरुवात झाली.सिटी बँकेपासून बद्रीमहल पर्यंत रांग होती इश्युचे फॉर्म भरायला.माझ्यासारखे मध्यमवर्गीय बाजारात यायला सुरुवात झाली होती.
----------------------------------------------------------------------------------------------
एकदा दुपारी मार्कॅटमध्ये संतोष रत्नाकर भेटला. भाऊ, इकडे कुठे?
तू काय करतोयस इथे ते सांग.
व्ही.डी. सोंडे नावाचे इन्कम टॅक्स कमीशनर मार्केटचे एम.डी झाले होते.संतोष त्यांच्या ओळखीनी बोर्डात (शेअरबाजार चालवणारी संस्था) लागला होता.त्याच्याबरोबर वर सत्ताविसाव्या माळ्यावर गेलो.साहेबांशी ओळख झाली.बोर्डात ९०%माणसं मराठी. बाकी गुजराती. नोटीस इंग्रजीसोबत गुजरातीत पण इश्यु व्हायच्या म्हणून .
आता लक्षात आलं बोर्ड आणि बाजार गुजराथी आणि मारवाडी व्यापार्‍यांचा. नोकर सगळे मराठी. मराठी म्हणजे घाटी .घाटी म्हणजे नोकर असं समीकरण .
तायशेट्ये नावाचे गृहस्थ एक हाती सत्ताविस माळ्याची देखरेख बघायचे.ते मला म्हणाले बघा बरं संभाळून रहा. आपण पैशानी कमी पडतो या लोकांपुढे.लुबाडले जाल बरं.
थोड्या वेळानी म्हणाले ,
असं का करत नाही. दुसर्‍या मजल्यावर कापली रूम च्या बाजूला एक कँटीन करायचा बोर्डाचा विचार आहे. तुम्ही ते चालवा.
मी नाही म्हणालो पण आज वाटत होतं तेच करायला पाहिजे होतं.
----------------------------------------------------------------------------------------------
क्रमशा आहे वाचकांना आवडलं तर.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2008 - 5:47 pm | बिपिन कार्यकर्ते

येऊ द्या पुढे.... (पण साहेब जुने बरेच धागे तसेच पडले आहेत त्याचं काय?)

बिपिन.

सहज's picture

15 Aug 2008 - 6:03 pm | सहज

वाचतो आहे.

प्राजु's picture

15 Aug 2008 - 6:48 pm | प्राजु

येऊद्यात. आतातरी कंटाळवाणे वाटत नाहीये.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

15 Aug 2008 - 6:59 pm | चकली

interesting वाटतय..अजून येउ द्यात.

चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

15 Aug 2008 - 7:10 pm | विसोबा खेचर

अजूनही येऊ द्या, दलाल स्ट्रीट ही तर आमची आजही रोजीरोटी आहे! :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Aug 2008 - 7:14 pm | डॉ.प्रसाद दाढे

तुम्हा॑ला शेअर बाजारातही गती आहे? धन्य तुमची!
पुढचे वाचण्यास खूप उत्सूक!

विनायक प्रभू's picture

15 Aug 2008 - 7:33 pm | विनायक प्रभू

प्रिय रामदास,
होजो बाबा बघतोय हो.
विनायक प्रभु

सर्वसाक्षी's picture

15 Aug 2008 - 8:09 pm | सर्वसाक्षी

वाचायला आवडेल. लिहित रहा

मदनबाण's picture

16 Aug 2008 - 3:45 am | मदनबाण

पुढचा भाग वाचण्यास उत्सूक..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अवलिया's picture

16 Aug 2008 - 10:23 am | अवलिया

रामदास शेठ

येवु द्या
हा तर आमचा आवडीचा प्रांत
अभिनंदनाचे लाडु बरेच खावुन तोंड ओढीस आले आहे
चमचमीत खुमासदार व अंजन घालणारे असे काहितरी आवश्यक होते

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

आनंदयात्री's picture

16 Aug 2008 - 12:40 pm | आनंदयात्री

मस्त सुरुवात आहे काका ?
पण त्या आधीच्या लेखमालेचे काय ?

झकासराव's picture

22 Aug 2008 - 3:03 pm | झकासराव

येवु दे पुढचा भाग.
रंजकदार असाव अस वाटतय.

स्वगत : ह्या काकाना किती फिल्ड मधल डिटेल माहिती आहे हे बघ झकासा.
नायतर तु.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुनील's picture

22 Aug 2008 - 3:18 pm | सुनील

अहो, तुमचे क्रमशः जरा लवकर टाका. मजा येतेय वाचायला...

(दलाल स्ट्रीटपासून चार हात दूर राहणारा) सुनील म्युच्युअल फंडवाला

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनस्वी's picture

22 Aug 2008 - 3:19 pm | मनस्वी

इंटरेस्टिंग आहे. येउदेत अजून!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

अभिरत भिरभि-या's picture

22 Aug 2008 - 3:21 pm | अभिरत भिरभि-या

पुढचा भाग लौकर येऊ द्या

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 3:36 pm | भडकमकर मास्तर

नेहमीप्रमाणे झकास...
शैली आणि डीटेलिंग... ही तुमची बलस्थानं...
स्वगत : पन रामदासभौ...प्येंडिंग कामं सोडून लै फुडं फुडं धावाय लाग्लाय जनु....मागचं काय?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रामदास's picture

22 Aug 2008 - 3:41 pm | रामदास

पीसीजेसी चा एक शेवटचा भाग बाकी आहे खरा.

मेघना भुस्कुटे's picture

22 Aug 2008 - 4:22 pm | मेघना भुस्कुटे

आणि ती सुपरहीरोची गोष्ट?

रामदास's picture

22 Aug 2008 - 4:25 pm | रामदास

http://www.misalpav.com/node/3116 दुसरा भाग टाकलाय.
तीसरा मंगळवारी .

सुमीत भातखंडे's picture

22 Aug 2008 - 7:01 pm | सुमीत भातखंडे

छान सुरुवात.
पुढील लेखास शुभेछा.

विजुभाऊ's picture

22 Aug 2008 - 7:08 pm | विजुभाऊ

संध्याकाळी स्टॉकमधला शेवटचा पतंग कटल्यानंतर हातात मांज्याचा गुंता आणि रिकामी फिरकी घेउन घरी जाताना खरचटलेले गुडखे जास्तच चुरचूरून दुखायला लागतात तसं काहीसं वाटत
तुम्ही फारच मोजक्या शब्दात जाणीव करुन देता बॉ

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सुमेधा's picture

29 Aug 2008 - 5:51 pm | सुमेधा

रामदास भाऊ,

मस्त लिहिलय :) , जुन्या बाजाराचे स्वरुप डोळ्यासमोर आले आणि मि पण तुमच्याच बिरादरितलि आहे...पुढिल लेखाचि वाट बघत आहे ,

सुमेधा