मार्केट तेव्हा बोर्डाच्या नियमाप्रमाणे चालायचं.कंट्रोलींग अथॉरीटी सरकारी असल्यामुळे थोडक्या पैशात हवा तेव्हढा गोंधळ घालता यायचा. नविन समभाग विक्री ,अग्रहक्कानी करायची समभाग विक्री, प्रमोटर कोट्यातून समभागाची विक्री वगैरेसाठी आता जसे कडक नियम आहेत तसे तेव्हा नव्हते आणि असलेल्या नियमाची पायमल्ली करणे फार सोपे होते.प्रमोटर , डायरेक्टर यांना पैशाची गरज भासली की इश्यु जाहीर व्हायचा. गूंतवणूक करण्यासाठी संधी फारशा नसल्यामुळे इश्यु भरभरून वाहायचा. पाच कोटी हवे असले तर पंधरा कोटी जमा व्हायचे. २०%टक्के जादा जमा ठेवण्याची अशी काहीतरी सवलत असायची. पाचाऐवजी सहा कोटी जमा व्हायचे. उरलेले नऊ कोटी चार पाच महिने घासून वापरून जमल्यास गूंतवणूकदाराला परत करायचे असा हिशोब.
गुजरात अंबुजा सिमेंटचा व्यापार आणि नाव जसं वाढायला लागलं तसं गुजरात अंबुजा या नावाच्या पाच दहा नविन कंपन्या बाजारात आल्या. मग त्या गुजरात अंबुजा प्रोटीन्स-पोलीस्टर अशी नाव घेउन यायच्या. गुजरात अंबुजा सिमेंटशी काडीमात्र संबंध नाही. अहमदाबाद मध्ये बाप गुजरात अंबुजा प्रोटीन्सचा इश्यु काढायचा तर इंदोरमधून मुलगा गुजरात अंबुजा फूड्स नावाचा इश्यु काढायचा.हा केवळ नावापुरता उल्लेख नव्हे तर त्यातल्या काही कंपन्या अजूनही बाजारात आहेत.फक्त या कंपन्या पटापट नावं बदलतात.हैद्राबाद आणि सुरत अशा फँटम कंपन्या तयार करण्यात फार हुशार. त्यांची रेसीपी फार सोप्पी आहे.आधी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विकत घ्यायची.अशा कंपन्या बनवून ठेवणारे आणि कालांतरानी विकणारे लोकं आहेत. कंपनी घेतली आता त्यात भरपूर ट्रँझॅक्शन दाखवायची. ट्रँझॅक्शन पण पाव टक्क्यात विकत मिळतात. आयात केलेल्याचे उल्लेख दाखवायचे. नफा दाखवायचा. लाभांश दाखवायचा. हे सगळं कागदावरच.फक्त हे बघायचं की सध्याचा विकला जाणारा माल काय आहे.सिमेंट-पॉलीस्टर-स्टील-आणि आता सॉफ्टवेर. नव्वद सालापर्यंत मिनी स्टील प्लँटची चलती होती. सगळे जण रांगेनी मिनीस्टील च्या मागे.गुप्ता कंपनी औरंगाबादला कॉमेट स्टील चा प्लँट टाकायची तर जावई नांदेडला सिप्टा कोटेड नावानी प्लँट टाकायचा.गुंतवणूकदारांचा पैसा.प्रमोटर होल्डींगसुद्धा खोटंच. फक्त एक अकाउंटींग एंट्री.मग बाजारात जायचं आणि एखादा पब्लीक इश्यु मॅनेज करणारा शोधायचा.पाच कोटीच्या इश्युत दिड ते दोन कोटी खर्च करायचे.राहीलेल्या तीन कोटीपैकी एक कोटी घरी नेऊन ठेवायचे. बँकेकडे जायचं.स्टेट फायनांस कंपन्यांकडे जायचं.आयएफसीआय कडून पैसे फार सहज मिळायचे. पण तिथल्या मॅनेजजर्सची सुरी फार धारदार .मोठा कट काढून घ्यायचे.मग दहा कोटीच्या कर्जासाठी बँका कन्सॉर्शियम तयार करायच्या. हळू हळू फॅक्टरी उभी करायची.बाजारात जाहीरात करायची. एखाद पेपरवाल्याला बोलावून त्याला प्लँट दाखवायचा.त्याच्या हातात एक पाकीट द्यायचं. दुसर्या आठवड्यात बातमी. शेअरची किंमत वाढायची. प्रमोटर घरचा शेअरचा साठा विकायचे. वर्षभरानी ऑडीटेड रीजल्ट बनवून आणायचे. छापायचे . भाव वाढावायचे. परत घरचा माल विकायचा. नंतर युनीयनवाल्याला हाताशी धरून संप घडवून आणायचा. युनीयन वाला नसला तर पर्यावरणवाल्याला सांगून फॅ़क्टरील सिल लावायचं. भावा खाली पडायचे. पडलेल्या भावात परत घरचे शेअर विकायचे. भाव रसातळाला गेले की सगळे समभाग विकत घ्यायचे. दोनेक महिन्यानी परीस्थीती पूर्ववत झाल्याची घोषणा करायची.भाव वाढायला सुरुवात व्हायची. सात आठ टक्के लाभांश जाहीर करायचा. (कारखान्यात एक रुपयाचं प्रॉडक्शन नसायचं .अदर इन्कम नावाखाली उत्पन दाखवायचं).समभागाचे भाव वाढायचे.आता भाव वाढला की टप्याट्प्यानी समभाग विकायचे. साधारण चौथ्या वर्षी कंपनीला घरघर लागायची.पब्लीकच्या पैशाची माती व्हायची. प्रमोटर नविन कंपनी काढायचे.
असाच एक दिवस पैसे मिळवायचा फास्ट ट्रॅक मिळाला.प्रायव्हेट प्लेसमेंट.
हे सगळं सांगायचं अशासाठी की या दरम्यान मी माझी भूमिका विसरलो आणि एका नव्या प्रवाहात सामील झालो. हे सांगणं मॅच संपल्यावर केलेल्या समालोचनासारखं आहे.तेव्हा असं काही वाटत नव्हतं. या अशा कंपन्यांचे प्रमोटर प्रायव्हेट प्लेसमेंटसाठी इश्यु आधी सहा सहा महिने फॉर्म छापायचे.(जीजीभॉय टॉवरच्या पायरीवर हे फॉर्म विकणारा माणूस बसायचा.) यात काही गैर होते का? हो आणि नाही.
आता विचार करतो तेव्हा असं वाटतं की ते काम चूकीचं होतं.तेव्हा वाटायचं लोकं मागतायत ना फॉर्म मग विकायला काय हरकत आहे?यातल्या नव्वद टक्के कंपन्या प्रायवेट प्लेसमेंटचे शेअर गूंतवणूकदाराच्या हातात दिले की इश्यु आणायचेच नाहीत.एबीसीएलचे शेअर मी तेव्हा नव्वद रुपये प्रिमीयम घेउन विकलेले आठवतायत.त्यापैकी फक्त सहा रुपये प्रिमीयम कंपनीकदडे पास ऑन केला होता.एका शंभर शेअरच्या अर्जापाठी आठ साडेआठ हजाराची कमाई.
एनीपीसी मायकॉन, युरोपीअन सॉफ्टवेअर, रीचीमेन सिल्क मिल्स, मोदी सिमेंट,स्नोसेम इंडीया, यादी काढायला बसलं तर फार मोठी आहे.त्या वेळी ट्रेडींग पेक्षा प्रायव्रेट प्लेसमेंटचे शेअर विकण्यत जास्त फायदा आहे हे कळल्यावर दिवसभर तेच काम. इश्यु नंतर आला काय किंवा नाही काय जबाबदारी अंगाला चिकटवून घ्यायची नाही.गुंतवणूकदार इतके अधाशी झाले असायचे की मागू तो प्रिमीयम द्यायचे.यात वाईट गोष्ट ही की कंपनी डब्यात जाणार हे माहीती असूनही मी ते शेअर विकत होतो.
रोख दलाली कमवत होतो. राहणीमान हळूहळू बदलत गेलं. कपडे लाफान्स चे. शूज काफ लेदरचे. हातात रेमंडविलचं घड्याळ.इकोलॅकची ब्रीफकेस.आपण आपलं ब्रीद सोडून काही वागतोय याची जाणीव बोथट होत होती.
शेअरबाजारचा माझा घोडा आता चौखूर उधळायला लागला होता. हात टाकला तिथं यश मिळत होतं. हातात शकूनीचे फासे आले होते. मागू ते दान पडत होतं. पण अएक तत्त्व मी सांभाळत आलो होतो. ते म्हणजे उमर खय्याम च्या या चार ओळी. नफा घेउन , माल विकून सुखी होत होतो. बिमल एस्.गांधी सारखा चांगला ब्रोकर मिळाला होता.
Ah, take the Cash, and let the Credit go,
Nor heed the rumble of a distant Drum!
रोज पैसे मिळवायची इतकी सवय झाली होती की रविवार कानतुटक्या कपासारखा भुंडा भुंडा वाटायचा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझा बाजाराचा हिशोब लिहीण्याचं काम वडील करायचे. ते सेवानिवृत्त राजपत्रीत अधिकारी होते.विचारांनी पुरोगामी होते.हिशोब फार व्यवस्थीत लिहायचे. एकूण टापटीप आणि कामातली शिस्त फार वेगळीच होती. सरकारी नोकर म्हणून त्यांच्या खात्यात त्यांचा फार दबदबा होता. त्यांचं चारीत्र्य इतकं शुध्द की खात्यातले वरीष्ठ पण बोलायला घाबरायचे.दहा बारा जणांचं कुटुंब सांभाळताना त्रास व्हायचा पण डोक्यावर एक रुपयाचं कर्ज मरेपर्यंत कधीच नव्हतं.एक नेमस्त आयुष्य. माझे हिशोब लिहीताना त्यांना फार आनंद व्हायचा. डिव्हीडंड, बुकबंद, रेकॉर्ड डेट, सगळं.काही वेळच्यावेळी. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ताळेबंद हिशोब तयार असायचा.मी नको नको म्हणतं असताना १९८४ पासून आयकर विवरण भरायला लावायचे.(या आयकर विवरणाचा उपयोग मला जामीन देताना नंतर फार उपयोगी पडला.)
गणपतीत आमच्याकडे ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम असायचा. बहिणी ,आत्या, चुलते, सख्खी चुलत सगळी भावंड एकत्र यायची. माझ्या वडलांचा मान मोठा होता. आमच्याकडे ब्राह्मण भोजनाला जायचे म्हटल्यावर आमंत्रण डावललं जायचं नाही. दुसरं असं होतं की सगळं कुटुंब एकत्र येण्याचा वर्षभरातला हा एकच मोका होता. आपलं वैभव समृध्दी भरभराट दाखवण्याची संधी वर्षातून एकदाच मिळायची. यात दांभीकपणा, गर्व , कशाचाही लवलेश नसायचा. पण माझ्या वडलांनी केलेल्या कौतुकाला फार महत्व होतं.त्या वर्षी नेहेमीप्रमाणे ब्राह्मण भोजनाची तयारी झाली.
हा सोहळा या वर्षी माझ्यासाठी फार खास होता. कुठल्यातरी इश्युत मी दाबून पैसे कमावले होते. माझ्या एका सिंधी मित्राने बँकॉकहून रेशमी तागा आणला होता. हलक्या केशरी रंगाचा.त्यातून कद बनवून घेतला होता.दहा सेंटच्या आठ हिर्यांची अंगठी बनवली होती. हातात चांदीचं नविन भांड होतं.पहिली पंगत बसली. वडलांनी संकल्प म्हणायला सुरुवात केली.
हरीर्दाता हरीर्भोक्ता ..
मी हातात दक्षीणेचं भांडं घेउन उभा होतो. वडलांनी खूण केल्यावर दक्षीणा ब्राह्मणांसमोर ठेवायला सुरुवात केली.चार पानांवर दक्षीणा ठेवून झाली होती. एका दूरच्या नातेवाईकानी वडलांना म्हटलं
"आप्पा, या वर्षी दक्षीणा देणारा हात बदलला वाटतं?"
क्षणभर वडलांच्या कपाळावर आठी उमटली. दुसर्या क्षणी माझ्या हातातून भांडं काढून घेतलं.उरलेल्या पानांसमोर दक्षीणा त्यांनीच ठेवली. मला काही कळलं नाही. नंतर डोक्यात प्रकाश पडला. माझ्या हातातलं नविन भांड आणि हिर्याची अंगठी कुणाला तरी खुपली होती. गणपती गेले.मी परत माझ्या कामाला लागलो.तीस संप्टेंबरला वडलांनी मला बोलावलं. मला म्हणाले
"त्या अंगठीचे पैसे द्यायचे असतीला ना? उद्या बँकेतून काढून ठेवतो."मी नकारार्थी मान डोलावली.
"पैसे देऊन झालेत आप्पा"
"तुझ्याकडे एव्हढी रोख रक्कम कशी?"मला विचारलं.
"थोडी दलाली कमावली." मी उत्तर दिलं.
"पण खातेवहीत नोंद कशी आली नाही?"पुढचा प्रश्न आला.
"रोखीतली दलाली होती."मी उत्तर दिलं.
"तू दलाल कधी झालास?"पुढचा प्रश्न.
माझी चुळबुळ वाढली.
"थोडं नव्या इश्युचं काम केलं होतं".
मी नेटानी किल्ला लढवला.पण खोटे बुरुज लगेच पुढच्या प्रश्नात ढासळले.
"मग ते कमीशन चेकनी का घेतलं नाही."
आता उत्तर द्यायला शब्द नव्हते.
हे सगळं त्यांना अपेक्षीत असावं.त्यांनी माझ्या हातात हिशोबाच्या चोपड्या दिल्या.
"आजपर्यंतचे हिशोब लिहून झालेले आहेत.जे पैसे खातेवहीत येतात त्याचाच हिशोब मला लिहीता येतो. तुझ्या उत्पन्नाच्या बाबी बदलल्या आहेत. मला काही जमणार नाही दुहेरी हिशोब लिहायला."त्यांच्या आवाजात एक निर्धार होता.
अपील करण्याची ताकद माझ्यात नव्हती.
त्यांच्या चोख स्वत्वापुढे माझां नाणं फार बद्द वाजत होतं.
विषय संपला.पण एक दुरावा आमच्या दोघांमध्ये आला. कुंपणाच्या तारेवर चिमण्या काटे टाळून बसतात तसं आम्ही बोलायचो.
त्यामुळे माझे उद्योग थांबले नाहीत. पण हिशोब कधीच धड लिहीले गेले नाहीत.आणि कधीच टॅली पण झाले नाहीत.
-----------------------------------------------------------------------------------------------
सोपकेसमध्ये साबणाच्या लहान मोठ्या झिजा जमा होतं राहतात .रंगही विटला असतो,तो सुगंध परत येत नाही. उपयोगही काही नसतो.या आठवणींच्या झिजा नकोशा वाटतात पण टाकून द्यायचा मुहूर्त मिळत नाही .
प्रतिक्रिया
15 Sep 2008 - 10:02 am | मदनबाण
जबरदस्त...काका पुढच्या भागाची वाट पाहतोय..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
15 Sep 2008 - 10:07 am | सहज
खिळवुन ठेवणारं कथानक.
एक विनंती, ही लेखमाला संपवा मग दुसरी घ्या.
15 Sep 2008 - 10:37 am | घाटावरचे भट
अ प्र ति म ! ! !
प्र
ति
म
!
!
!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
15 Sep 2008 - 11:04 am | विसुनाना
सिद्धहस्त!
केवळ...
नव्हे,अशा झिजा की साबणाच्या की चंदनाच्या?
15 Sep 2008 - 11:22 am | सुनील
अजून लिहा. आवडतय...
रोज पैसे मिळवायची इतकी सवय झाली होती की रविवार कानतुटक्या कपासारखा भुंडा भुंडा वाटायचा.
च्यामारी! आमच्यासारखे चाकरमानी रविवारची चातकासारखी वाट पाहतात आणि तुम्हा xxxxनां तो कानतुटक्या कपासारखा वाटतो??
कुंपणाच्या तारेवर चिमण्या काटे टाळून बसतात तसं आम्ही बोलायचो
उपमा झकास!
त्यामुळे माझे उद्योग थांबले नाहीत. पण हिशोब कधीच धड लिहीले गेले नाहीत.आणि कधीच टॅली पण झाले नाहीत.
रोखीचे हिशोबही "लिहिता" येत असतीलच की. हां, आता टॅली होतात की नाही ही बाब वेगळी!
अजून लेख येउद्यात..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Sep 2008 - 11:30 am | जैनाचं कार्ट (not verified)
>>>रोज पैसे मिळवायची इतकी सवय झाली होती की रविवार कानतुटक्या कपासारखा भुंडा भुंडा वाटायचा.
हे मात्र १००% खरं.... शनीवार व रविवार जिवावर उठतो राव ;)
पुढील भाग लवकर लिहा !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
15 Sep 2008 - 11:47 am | अवलिया
कुठेतरी रामदास च्या जागी नाना आहे असे वाटत राहीले
स्थळ काळ पद्ध्त भिन्न पण ....नशा तीच.
उत्तम
नाना
15 Sep 2008 - 12:02 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ह्या नशेतच कधीतरी साबणच्या झिजा गोळा करुन आंघोळ करायची पाळी येते.
स्वनुभववरुन सांग्तोय.
वि.प्र.
15 Sep 2008 - 12:45 pm | नंदन
या भागात थोडा कौटुंबिक रंगही भरतोय कथानकात. भुंडा रविवार, काटे टाळणार्या चिमण्या, झिजलेल्या वड्या हेही मस्तच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Sep 2008 - 3:07 pm | भडकमकर मास्तर
हेच म्हणतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Sep 2008 - 3:03 pm | प्रकाश घाटपांडे
अनुभवाची ताकद व प्रतिभा यांचा सुरेख संगम. माणसाला खिळवुन ठेवणारे लेखन
प्रकाश घाटपांडे
15 Sep 2008 - 3:21 pm | मेघना भुस्कुटे
काका, तुमचे पाय कुठेत हो?
कुणीतरी वर म्हटलंय तसं - सिद्धहस्त खरोखर.
एका वेळी इतक्या ठिकाणी जीव का म्हणून अडकवून ठेवणार आमचा? अजिबात बरोबर नाही हे. तीव्र निषेध.
15 Sep 2008 - 3:41 pm | मनस्वी
शेवटी स्ट्रायकींग वाक्ये टाकायची पद्धतही सॉल्लिड!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
15 Sep 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर
रामदासभाऊ,
केवळ सुंदर लेखन...
औरभी आनेदो प्लीज....
तात्या.
15 Sep 2008 - 4:04 pm | झकासराव
सुरेख :)
काटेरी कुंपणावरच्या चिमण्या, झीजलेल्या साबणाच्या वड्या, कानतुटका कप सगळच जबरा आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
15 Sep 2008 - 4:09 pm | पप्पु
उत्तम लेख..
चला.. शेयर बाजाराच्या बाजाराचा स्पष्ट अंदाज तरी आला..
15 Sep 2008 - 5:13 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
पैसे इन्वेस्ट करताना इन्वेस्टर साठी -
ज्याच्यात इन्वेस्ट होतात त्याला - ईन
ज्याचे इन्वेस्ट होतात त्याला - वेस्ट
तुमचे काय मत आहे.
रामदास काका उत्तर इथेच अपेक्षित आहे.
आपला विनायक प्रभु
15 Sep 2008 - 7:21 pm | baba
सुंदर लेखन...
अजुन येउ द्या!!
15 Sep 2008 - 10:02 pm | अभिज्ञ
रामदासजी,
आपल्यासारखी अनुभवी लोक मिसळपाव वर आहेत हे आमचे भाग्यच.
अतिशय सुंदर अनुभवकथन.
रामदासजी,एक विनंती,
आता तुम्हि तुमच्या अनुभवांवर आधारित एक आधुनिक दासबोध लिहावा असे वाटते.
अभिज्ञ.