http://www.misalpav.com/node/3056
बहुतेक दुसरीच्या वर्गात ही गंमत झाली होती. एका शनीवारी आमच्या वर्गातला एक मुलगा सकाळी आला तेव्हा त्याच्या कपाळावर लाल काळा डाग दिसत होता. कपाळावर मारुती आला म्हणून मिरवत होता. थोडा मस्का मारल्यावर त्यानी रहस्यभेद केला.कपाळावर बोटानी एकशे अकरा वेळा मारुतीचं नाव घेऊन कपाळ घासलं की मारुती येतो. मधल्या सुटीपर्यंत वर्गातल्या बहुतेक कपाळांवर मारुतीराया प्रकटले होते.त्यानंतरच्या रामायणाला सोमवारी सगळे पालक हजर होते. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे असं की मार्केटमध्ये रोज असा काहीतरी फंडा यायचा. एक कुठलीतरी अफवा यायची मग दिवसभर तेच तेच सारखं एकमेकांना ऐकवायचं.
अशा आवया आणि त्यानुसार गुंतवणूकीचे निर्णय खरं म्हणजे अशास्त्रीय निर्णयाचा कळस.पण त्यावेळी इंटरनेट किंवा संगणक काहीच उपलब्ध नव्हतं .क्लच ऑटोची टिप दर तीन महिन्यानी यायची. क्लचऑटोचा काऊंटर जोरात चालायचा.आदल्या आवईच्या वेळी फसलेले गूंतवणूकदार मोकळे व्हायचे आणि नविन अडकायचे.अशी खबर देणार्या माणसाला खबरी म्हणायचे.ब्रोकरच्या किंवा कंपनी डायरेक्टरच्या पुठ्ठ्यातली माणसं फिरत असायची.त्याच्या पाठी लोंबत्यासारखे फिरून छातीठोक बातम्या आणणारी ही माणसं एकच डायलॉग सारखा मारायची.एकच उपदेश करायची घरदार विकून हे शेअर घेऊन टाक.त्यांना घरदार विकणं शक्य नसायचं कारण ते भाड्याच्या घरात रहायचे.या सगळ्या "ढ" क्लासच्या शेअर्सना धारावी म्हणायचे. रींगच्या एका टोकाला धारावी ट्रेडींग करणार्यांचा दलालांचा एक वेगळा जथा असायचा.पण धारावी ते ब्ल्यु चीप असा प्रवास करणार्या कंपन्या पण बघीतल्या आहेत.मोझर बेअर एके काळची धारावी स्क्रीप.
आता संगणकाच्या युगात ही जमात नाहीशी झालेली नाही .आता हे लोक फक्त टाय लावून सीएनबीसी वर बोलत असतात.
गुंतवणूकीच्या नाना तर्हा. काहीजण लो बजेटवाले. ते फक्त दोन -अडीच-साडेतीन रुपयांचे शेअर्स घ्यायचे. एखादा मेगाइश्यु येऊन गेला की या लोकांना भयंकर आसूरी आनंद व्हायचा .सुरुवातीची गरमागरमी संपली की तो शेअर जो पडायचा तो सरळ लो बजेटवाल्यांकडे. मंगलोर पेट्रो केमीकल- जिंदाल विजयनगर कित्येक उदाहरणं.माझ्या ओळखीचे एक बँक मॅनेजर आहेत. त्यांनी जिंदालचे वीस हजार समभाग साडेचार रुपयाच्या हिशोबानी घेतले होते.बघा आजचा भाव काय आहे.असा हिशोब केला तर आतापर्यंत त्यांच्याकडे काही कोटी असायला पाहीजेत पण नाहीय्येत.जिंदालचा भाव बारा रुपये झाल्यावर सगळे शेअर विकून त्यांनी दोन रुपयात मोदी सिमेंट घेतले.
मोदीचं सिमेंट नंतर एव्हढं घट्ट झालं की गुंतवणूकदार अडकूनच पडले.
असे नाना पंथ. नाना जमाती. त्यांचे देव .त्यांचे पुजारी आणि पुजक.
काही मंडळी सकाळपासून मोठ्या ब्रोकरपाठी फिरत असायची.तेव्हांचे मार्केट आयडॉल म्हणजे मनू माणेक .शांती बाळू. जी. एस.दमाणी. घनश्याम बागडी, पल्लव सेठ.(हर्षद मेहेता कंचनलालच्या दुसर्या मजल्यावरच्या ऑफीसमध्ये उभा असायचा.मी मार्केटमध्ये आलो तेव्हा त्याच्या बॅंकरप्टीचा दुसरा एपीसोड चालला होता.अजय कान(कलकत्ता)आणि हर्षद मेहेता ही कुस्ती अनिर्णीत होती.)
पण हे सगळं नंतर.
शांती बाळू दुर्योधनासारखा मांडी दाखवत धोतर वर घेउन उभा असायचा. त्याच्याकडे दोन कार्ड होती एक शांती बाळू आणि दुसरं हरीश शांती. शांती बाळू मध्ये फक्त सट्टा. एका हातात धोतराचं टोक. दुसर्या हातात इकोलॅकची काळी छोटी ब्रिफकेस.इकोलॅकची बॅग तेव्हा स्टेटस सिंबॉल होतं. त्याच्या पुढे पाठी त्याचे भक्त.फुटपाथवरून हाताची बोटं नाचवत सौदे करायचा.
दुपारच्या वेळी पल्लव सेठ यायचा. आयटीसी बुल त्याचं टोपण नाव. शांती बाळू आणि त्याच्यासारख्या जुन्या स्टाईलच्या ब्रोकरांपेक्षा वेगळीच स्टाईल. पल्लव सेठ सी.ए. असल्यामुळे कार्ड प्रोफेशनल कॅटेगरीमधून मिळालेले. ब्रँडेड शर्टस्, टाय असा वेश. पेरीग्रीन बरोबर टाय अप. त्याला येताना पाह्यलं की शांती बाळूच्या आसपासची माणसं त्याच्यापाठी धावत सुटायची. तो ज्या लिफ्टमध्ये जाईल त्या लिफ्ट मध्ये माणसं घुसायची. एखादा शब्द तरी बोलावा याच्यासाठी वेड्यासारखी त्याच्या चेहेर्याकडे बघत रहायची.हर्षद मेहेताबरोबर पल्लव सेठ पण संपला.किशोर जनानी पण संपला.एक दोघंच टि़कले . त्यापैकी एक वल्लभ भन्साळी आणि दुसरा निमिष शहा. एखाद्या कंपनीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून गुंतवणूक करायचे तंत्र वल्लभ भन्साळीनी आणले.त्यामुळे तेजी-मंदी चा काहीही असर एनॅमवर कधीच पडला नाही.एक आथवण येण्यासारखा बिचार जीव म्हणजे बिमल गांधी. अत्यंत प्रामाणिक.सेसा गोवाचा हाउस ब्रोकर्.त्याच्या सगळ्या ग्राहकांनी आपापली जिंदगी बनवली त्याच्या जीवावर. संगणकाचा उपयोग करणारा पहिला ब्रोकर.
परदेशी कंपन्या आल्यावर फक्त प्रोफेशनल दलाल टिकले बाकी सगळे काळाच्या पडद्याआड गेले.हेमेंद्र कोठारी , महेंद्र कंपाणी .हे सगळे जुन्या पठडीचे सेठ . त्यावेळी सरकारी कर्जरोख्यात सगळेच बनवाबनवी करायचे.ते जे करत होते ते हर्षद मेहेतानी नंतर हजार पट मोठ्या प्रमाणात केलं.*
या दोन्ही कॅटेगरीला पुरून उरला तो मनू माणेक. कच्छी विसा ओसवाल. पैशाची मूर्तीमंत ताकद. मंदीचा बारमाही पुरस्कर्ता.खरंम्हणजे व्याज बदल्याच्या जोरावर बहुतेक दलालांना अंगठ्याखाली दाबून ठेवायचा.टेरर माणूस.
हे सगळे नजारे बघता बघता माझं पहिलं वर्ष आणि बिगीनर्स लक पण संपलं.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाजारात गेल्यापासून तिथल्या काही सवयी मला पण चिकटल्या होत्या.
१ घरून जेवूनच बाहेर पडायचं.
२ मार्केट संपल्यावर तिथंच रेंगाळत रहायच.
३ देव ,देवाचा फोटो, देवा ची मूर्ती यांना उठसूट नमस्कार करत रहायचं.
४ मोठ्ठ्यानी पादायला लाजायचं नाही.
५ तोंड बंद न करता समोरच्या माणसाच्या तोंडावर ढेकर द्यायची.
६ संध्याकाळी रस्त्यावर उभं राहून वांझोट्या चर्चा करायच्या.
बरोज वेलकम चा सट्टा करायचं ठरवलं तेव्हा रोज फायनान्सर शोधायची मोहीम सुरु झाली.पहिला फायनान्सर भारत कटलरीवाला जैन. यांचं चांदीच्या भांड्याचं मोठ काम होतं. उपयोगात नसलेले पैसे रास पडलेले असायचे.व्याज बदला फक्त ए ग्रूपच्या शेअरमध्ये ऑफीशिअली अलाउड होता.ज्यांना बी टाईपच्या शेअरमध्ये बदला करायचा असेल त्यांना खाजगी पैसे मिळायचे. व्याज भरमसाट .पण सट्टा सही चालला तर काही फरक पडायचा नाही. त्यांनी साडेसात लाख कबूल केले. आणखी पंधराएक लाख उभे करायचे होतें. नरेंद्र नावाचा एक दलाल मला प्रिया डायकेम नावाच्या कंपनीत पोद्दार चेंबरच्या ऑफीसमध्ये घेऊन गेला. त्याच्या दलाली पद्धतीने पार्टीविषयी भरपूर माहिती दिली होती. दुपारी चार वाजता मी, नरेंद्र आणि माझा सी.ए. मित्र ऑफीसला पोहचलो. फायनान्सर (त्यांना बाबूजी म्हणायचे) त्यांच्या केबीनमध्ये नव्हते. त्यांच्या पीएनी आत बसायला सांगीतलं. पाच मिनीटानी बाबूजी आत आले. त्यांनी धोतर लुंगीसारखं गुंडाळलं होतं. नमश्कार असं म्हणून आम्हाला वळसा घालून त्यांच्या खुर्चीत बसायला गेले. ते कुठून आले होते हे सांगायला नको होतं .मागच्या बाजूला धोतर ओलं होउन ठिकठिकाणी चिपकलं होतं.खुर्चीत बसून एक लांबलचक ढेकर देऊन म्हणाले
"बोलो मालीक. कितना रोकडा चाहीये?
चाय ला रे."
चहा आला.
मी म्हटलं "पंधरा लाख."
सट्टा कौनसे आयटम मे करोगे . परत ढेकर.दुपारी कांदा खाल्ला असावा.
"कितने दिन के लिये?"
"त्रण महीना . "नरेंद्रनी उत्तर दिलं.
आता बाबूजींनी समोरच्या फायलीतून काहीतरी शोधायला सुरुवात केली. आम्ही आदल्या दिवशी आमची फाईल पाठवली होती.
आमच्या अपेक्षा वाढल्या. इथं काम झालं असतं तर आणखी फिरायची आवश्यकता नव्हती.
"हमारा अंदाज से तुमको जादा पैसा लगेगा. "बाबूजी म्हणाले.
फायलीच्या गट्ठ्यातली शोधाशोध चालूच.
"अगर फाईल नही मिलता है तो दुसरा....."
असं म्हणेपर्यंत बाबूजींना हवी असलेली वस्तू सापडली.
गठ्ठ्याखालून त्यांची चड्डी बाहेर काढली.
इलास्टीक चेक केलं . एकदा उलटीसुलटी केली,उभे राहिले. साटकन आवाज करत चड्डी घातली.
"बोलो अभी बोलो."त्यांच्या चेहेर्यावर एक सात्वीक समाधान झळकायला लागलं
काय कप्पाळ बोलणार. माझ्या नाकातून चहा बाहेर येत होणार होता.
व्याजाची बोलणी सुरु झाली.
मध्येच बाबूजींच्या चेहेर्यावर एक त्रासीक भाव आला.
माझ्या मनात आलं "आता काय?"
काही नाही.बाबूजी खुर्चीत ज..र्रा अपीश झाले आणि ट्रँव ट्रँव करून दिर्घ पादले.
"चलो आगे बोलो."
त्या दिवशी जे हसू दाबण्यासाठी प्रचंड प्रयत्न करायला लागले त्याची तुलना कशालाच नाही.
नरेंद्र सारखा म्हणत होता इतना हसनेका क्यु?
बाबूजीने जराक गेसनी तकलीफ छे.
खरं म्हणजे ह्या आठवणींचा उपयोग एकच.
आता पोटात काही नसताना हा किस्सा आठवून हसायला बरं पडतं. दोन मिनीटं भूक पोटाला कमी कुरतडते.
बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
29 Aug 2008 - 2:48 pm | अवलिया
१ घरून जेवूनच बाहेर पडायचं.
२ मार्केट संपल्यावर तिथंच रेंगाळत रहायच.
३ देव ,देवाचा फोटो, देवा ची मूर्ती यांना उठसूट नमस्कार करत रहायचं.
४ मोठ्ठ्यानी पादायला लाजायचं नाही.
५ तोंड बंद न करता समोरच्या माणसाच्या तोंडावर ढेकर द्यायची.
६ संध्याकाळी रस्त्यावर उभं राहून वांझोट्या चर्चा करायच्या.
आणि गुटखा?
नाना
29 Aug 2008 - 2:21 pm | भडकमकर मास्तर
बाबूजी खुर्चीत ज..र्रा अपीश झाले
बाबूजी किस्सा भन्नाट....
मोठमोठ्याने हसतोय इथे मी...
शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
डार्क ह्यूमर म्हणतात तो हाच काय??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Aug 2008 - 2:23 pm | आनंदयात्री
वाटच पहात होतो दुसर्या भागाची. झकास जमलाय हा पण भाग. शेअरबाजरात फेरफटका मारुन आल्यासारखे वाटले.
>>बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
बापरे, शेवट दुखांत दिसतोय.
29 Aug 2008 - 2:50 pm | नंदन
असेच म्हणतो. छान जमलाय हा भाग.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Aug 2008 - 2:26 pm | बिपिन कार्यकर्ते
काका,
छान चाललंय, पण स्पीड वाढवा राव, म्हणजे २ भागातलं अंतर कमी करा. :) तुमच्या डिटेलींग बद्दल काय बोलावे... तद्दन गुजराती शेअर वाल्यांचे वर्णन वाचून, मी सकाळच्या शेवटच्या गोरेगाव लोकल मधे आहे असे वाटले. सगळं 'मार्केट' वालं पब्लिक असायचं त्या गाडीला. पर्फेक्ट. १,३,४,५ हे माझे पण निरीक्षण आहे.
तुम्ही मूड असा लाईट करत करत शेवटी एकदम धप्पकन टर्न दिलाय, मस्तच.
खरं म्हणजे ह्या आठवणींचा उपयोग एकच.
आता पोटात काही नसताना हा किस्सा आठवून हसायला बरं पडतं. दोन मिनीटं भूक पोटाला कमी कुरतडते.
बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
आणि नरेशन ची स्टाईल पण थोडी बदलली आहे असे वाटले. रीडेबिलिटी छान आलिये. प्राजुचा सल्ला मनावर घेतला का?
बिपिन.
अवांतरः काका, या एका आयुष्यात किती आयुष्य जगलात हो? मार्केट वर लिहिता तेव्हा वाटतं की तुम्ही तिथलेच, अगोचर वाचताना वाटतं की तुम्ही एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचे डीन वगैरे असाल, ते पिसीजेसी वाचून वाटलं की आत्ताच एक मोठी सजा काटून आलेला माणूस असेल. बरं ते तळ्याकाठचं लिहिलंत तर थेट एखाद्या साहित्यिकासारखं. आत्तापर्यंत मिपावर मला यमीच स्प्लिट पर्सनॅलिटीची वाटली होती. (अदिती, संहिता, यमी वगैरे...) आपका भी वैसाइच कुच प्राब्लेम नै ना? ;)
:)
29 Aug 2008 - 5:36 pm | विदुषक
एक माणूस वेग वेगले आय डी करुन लिही शकतो हे महीती आहे
पण रामदास साहेबान्चे लेखन बघून ... चार माणसे एकच 'रामदास' ह्या नावाने लीखाण करतात असे वाटते आहे :)
मजेदार विदुषक
29 Aug 2008 - 2:53 pm | सुनील
भन्नाट लिहिलय. मजा आली वाचताना. अजून येऊद्यात....
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Aug 2008 - 2:59 pm | विसुनाना
आणि अचाट लेखन...
रामदास म्हणजे एकदम आर्थर हेली!
29 Aug 2008 - 9:55 pm | डॉ.प्रसाद दाढे
खो खो हसलो! घरातले विचित्र नजरेने पाहतायत्.(बाकी मी मिपावर बसलो की घरातले असेच पाहतात माझ्याकडे :)
बाकी एका रामदासा॑त नक्की किती रामदास आहेत ह्याचा अजून काही अ॑दाज येत नाहीये.
29 Aug 2008 - 10:25 pm | पिवळा डांबिस
लिखाण मस्त आकार घेतंय, रामदासजी!
आ मारकॅटना डिस्क्रिप्सन घणा चोक्कस!!:)
बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
क्या बात है!!
आपण लिहीत रहा, आम्ही पुढील भागांची (शांतपणे!) वाट पहात आहोत...
आपला,
पिवळा डांबिस
30 Aug 2008 - 1:46 am | चतुरंग
पर्सनालिटी स्प्लिट नसून श्रेडेड आहे असे म्हणावेसे वाटते. असंख्य धागे, असंख्य अनुभव आणि कोणत्याही क्षेत्राबद्दल सांगताना तेवढंच कसब.
अजब रसायन आहात!
चतुरंग
31 Aug 2008 - 9:48 am | मेघना भुस्कुटे
असेच म्हणते.
पण वाट पाहायला लावता ब्वॉ खूप. :(
2 Sep 2008 - 2:00 pm | मनस्वी
+१
मस्त!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
30 Aug 2008 - 2:30 am | घाटावरचे भट
खूप भारी लिखाण रामदासजी.....पुढचे भाग कृपया लवकरात लवकर टाकावेत अशी नम्र विनंती..
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
30 Aug 2008 - 4:24 am | मदनबाण
व्वा मस्त..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
30 Aug 2008 - 7:22 am | विसोबा खेचर
मालक, वाचतो आहे बर्र का! लै छान, येऊ द्या अजूनही...:)
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
30 Aug 2008 - 12:24 pm | सुमेधा
मस्तच रामदास काका,
तुमचे हे अनुभव वाचुन पुर्वी बाजारात काय काय घडत असेल याची कल्पना आली...तुमचा अनुभव खुप दाडंगा दिसतो आहे बाजाराचा .
(बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.) हे मात्र एकदम बरोबर बोललात तुम्हि.
30 Aug 2008 - 6:55 pm | सर्वसाक्षी
रामदासबुवा,
वाचायला मजा येतेय. येउद्यात पुढचे भाग
30 Aug 2008 - 7:49 pm | ब्रिटिश
जेआयला मना शेर मार्केट चा कई बी कल्ला नय पन
ही गुजराती म्हातारी नी आमचे डोकरे यान कई बी फरक नाय बगा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला नावानच सगला हाय )
31 Aug 2008 - 7:10 pm | शैलेन्द्र
ज्या भना, बाला, आप्ल्या चालिन बी वास मारतो पाप्राचा... आता मना कल्ला.. भारेकरु थेव्ताना ये बी बगयना पायजे
31 Aug 2008 - 8:35 pm | विनायक प्रभू
काही चे पुढे काळी होणार तर नाही ना?
वि.प्र.
1 Sep 2008 - 10:26 am | वेताळ
"अगर फाईल नही मिलता है तो दुसरा....."
असं म्हणेपर्यंत बाबूजींना हवी असलेली वस्तू सापडली.
गठ्ठ्याखालून त्यांची चड्डी बाहेर काढली.
बाबुजीची पुरी काढली कि हो तुम्ही (चड्डी)...हा हा हा हा हा
30 Sep 2015 - 12:23 am | गामा पैलवान
रामदास,
तुमचं लेखन खिळवणारं, मर्मग्राही आणि प्रवाही आहे. दलाल स्ट्रीटचे सगळे भाग अधाशासारखे वाचून काढले. हर्षद मेहताच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या एक मित्र म्हणायचा की, त्याचं लग्न हर्षदनेच लावून दिलं. ;-) त्यावेळच्या घोटाळ्यात जराही सहभाग नसतांना पैसे कमावलेला माझ्या माहितीतला एकमेव पांढरपेशा माणूस ! त्याने सांगितलं की रोखेबाजारात दरवर्षी एखाददोन दलालांच्या आत्महत्या होतातंच. मला वाटतं तुम्ही यावर देखील प्रकाश पाडू शकाल. ही बाजू फारशी आनंददायी नसणारे हे उघड आहे.
महेंद्र कंपाणीवरून आठवलं की त्याची हत्या झाली. सकाळी फेरफटका मारायला निघालेल्या त्याला घराबाहेरच फियाटने उडवला. फियाट गायब. हा अपघात आहे हे कोणीही खरं मानायला तयार नाही. रोखेबाजारात आत्महत्यांसोबत हत्याही होत असणार. म्हणतात ना, अंडरवर्ल्ड रूल्स द वर्ल्ड ! तुमच्यासारख्या जाणकाराकडून वाचायला आवडेल.
आपला नम्र,
-गामा पैलवान
30 Sep 2015 - 12:53 am | दिवाकर कुलकर्णी
मस्त लेख,
आँखो देखा हाल,मजा आणतोय,
विधवेन लग्नाचा आल्बम चालणं,मनोरंजक उपमा
पुढचे लेख लवकर येउ देत