...आणि मग हर्षद मेहेताचं पर्वं सुरु झालं. आतापर्यंत बाजारात न येणारी माणसं बाजाराच्या कोपर्याकोपर्यावर उभं राहून चर्चा करताना दिसायला लागली. राजीव गांधींसारखा पुरोगामी पंतप्रधान आला होता.मुक्त बाजारपेठेची चाहूल लागली होती. पैशाचा ओघ वाढायला लागला होता.थोडंफार इकडचं तिकडचं ट्रेडींग करून चार पैसे हातात आल्यावर माणसं सट्टा बाजाराला मंदीर समजायला लागली. आणखी थोडा नफा झाल्यावर स्वतःला अर्थतज्ञ समजायला लागली.इकोची घडी आणि दलाल स्ट्रीट किंवा कॅपीटल मार्केटसारखी मासीकं मिरवत लोकं ब्रोकरच्या ऑफीसात गर्दी करायला लागले. कष्टानी जमा केलेले पैसे पेनी शेअर्समध्ये गुंतवायला लागले.पन्नास पॉइंट सेन्सेक्स वाढला की टॅक्सी करून व्हिटी स्टेशनला जायला लागले.न विचारता एकमेकांना शुअरशॉट टिप्स द्यायला लागले. हर्षद मेहेता एक आयकॉन झाला.खरं म्हणजे आयकॉन/ आयडॉल हे शब्द तेव्हा यायचे होता.इंग्रजी पेपर त्याला हिरो किंवा डार्लींग ऑफ इन्व्हेस्टर्स वगैरे म्हणायचे.संध्याकाळी भाव कॉपीची वाट बघत , मग भावकॉपी मिळाली की वाचत वाचत चर्चा करत आज किती कमावले याचा अंदाज घेत पब्लीक घरी जायचं.भाव कॉपी ब्लॅकनी विकली जायची. ऑफीशिअल कॉपी नाही मिळाली तर खाजगी भावकॉपी मिळायला लागली. दुसर्या दिवशी हेच भाव पेपरात छापून येणार हे माहीती असूनही गुंतवणूकदारांची अधीरता त्यांना स्वस्थ बसू द्यायची नाही.
भाव जसे वाढत गेले तशी हाव वाढत गेली. शेअर्स विकून श्रीमंत व्हावं असं कुणालाच वाटत नव्हतं.
फक्त कागदावरची कागदी श्रीमंती.भाव आणि मूल्य यांच्यातलं तारतम्य समजण्याची कुवत लयाला गेली.
मास्टरगेनचा इश्यु ज्या दिवशी संपला त्या दिवशी मी हातातले सगळे शेअर्स विकून मोकळा झालो होतो.
टाईम्स ऑफ इंडीयाच्या पहील्या पानावर एका चौकटीत ज्या दिवशी स्टेट बँकेतून दिसेनाशा झालेल्या सहाशे कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची बातमी सुचेता दलालनी छापली त्या दिवशी माझ्या हातात रोकड एकवीस लाख जमा होती.हा माझ्या कमाईचा पहीला हप्ता होता.दुसरा हप्ता मार्केट धुळीला मिळालं तेव्हा मिळाला.
या बिगबुलच्या तेजीत मी पैसे कमावले ते एकाच प्रिन्सीपलवर.
व्हेन आय ऍम बुलीश आय बाय. व्हेन आय ऍम मोर बुलीश आय सेल.
यासोबत एक तंत्र वापरलं होतं ते म्हणजे ऑर्डरचा डबा करणं. हे म्हणजे खास जयकुमारच्या ठेवणीतलं अस्त्र होतं जे त्यानी मला शिकवलं नव्हतं पण त्याच्या नकळत मी ते शिकत गेलो होतो.
बाजाराच्या भाषेत डबा म्हणजे समांतर खाजगी बाजार.
सगळे सौदे पाटीवर लिहीले जायचे. काँट्रॅक्ट नोट , बिलं वगरे काही नाही. साधारण वीस ते पंचवीस माणसं ठरावीक शेअर्सची उलाढाल आपसात करायची .ज्यांच्या सौद्याला मॅच न होणारा बायर किंवा सेलर नसेल त्याचा सौदा डब्बा चालवणारा लिहायचा.दुपारी मार्केट संपलं की हिशोब व्हायचा आणि लेन देन पूर्ण करून ,पाट्या पुसून ,रोकड खिशात टाकून मंडळी घरी.टॅक्स नाही. बिलं नाही .काँट्रॅक्ट नोट नाही.शुध्द सट्टा. या डब्यात सगळ्यात फेमस मधुभाईचा डब्बा.मधुभाई ठक्कर मूळचा एरंडावाला.एरंडा म्हणजे कॅस्टर ऑईलवाला.मुंबई आणि राजकोट अशी एरंड्याच्या सट्ट्याची लाईन होती.फॉरवर्ड मार्केट कमीशननी एरंड्याच्या सट्ट्यावर बंदी घातल्यावर मधुभाईनी जीजीबाय टॉवरच्या बाजूच्या इमारतीत एसीसी. रीलायन्स , ओर्के,अपोलो टायर,अशा काही शेअरमध्ये डबा सुरु केला होता. या सटोडीयात बसून मला जिंकणं कठीण होतं .
मी डब्यात बसून माझं एक नविन तंत्र विकसीत केलं .आता हे तंत्र वापरायचं म्हणजे मला ग्राहकांची आवश्यकता होती. आमच्या सी.ए.चा सल्ला घेउन मी माझी एक कंपनी सुरु केली.निकेल अँड ग्रीनबॅक लिमीटेड.
एक ब्रोकरेज कंपनी. माझ्या मूळ भूमीकेपासून किती दूर जातो आहे याची कल्पना मला तेव्हा आली नाही. मी गुंतवणूकदार होतो .रस्ता बदलून आता मी दलाल झालो. आता इंटरेस्ट दलालीत.मला आतल्या आत कळतं होतं की मी दलाली पण करणार नाही आहे. बाजारात येणार्या नविन मध्यमवर्गीय माणसाच्या पैशाचं मुंडण करणार आहे.ते सुध्दा त्यांच्या नकळत.
उंदीर चावण्यापूर्वी फुंकर घालतो असं म्हणतात. माझ्याकडे फंडामेंटल टेक्नीकल ऍनालीसीसची फुंकर घालायचं कसब होतं .माझ्याकडे येणार्या ग्राहकाला हे काहीच ज्ञान नव्हतं.मी जाहीरात करण्याची आवश्यकता नव्हती. नव्यानीच दाखल झालेल्या लाखो गुंतवणूकदारांचं पीक कापणीसाठी तयार होतं .
सकाळी सात वाजेपासून ऑर्डर बुक लिहायला सुरुवात व्हायची. बँक, इन्शुरन्स, पोर्ट ट्रस्ट ची नोकरदार माणसं ऑफीसला जाण्यापूर्वी खरेदी विक्री च्या ऑर्डर देऊन जायची. संध्याकाळी शेअर्सची डिलीव्हरी देउन जायची. खरेदी करणारे १००टक्के अगाऊ रक्कम देउन जायचे. स्वतःच्या शून्य गुंतवणूकीवर दिवसाला आठ ते दहा टक्के कमाई व्हायची.त्यावर दोन टक्के दलाली.सरकारी नोकर रोखीत पैसे द्यायचे.त्यांना चेक देताना वटणावळ म्हणून अर्धा टक्का कमी. सरकारी व्यवस्थेचा अभाव, गुंतवणूकदारांचं अज्ञान , ब्रोकरच्या गुंतवणूकदारांबरोबरच्या थेट संबंधाचा नकार याचा पुरेपूर फायदा आणि जोडीला टेक्नीकल ऍनालीसीसचा दोन वर्षाचा अभ्यास.कमाई सुध्दा बाजाराच्या भाषेत सांगायचं तर अंधी कमाई.
सकाळी ऑर्डर आली की त्याची यादी व्हायची. त्यात असलेल्या कंपन्यांचे चार्ट बघायचे.ज्या कंपन्यांमध्ये तेजीची सुरुवात झाली आहे असा अंदाज यायचा त्या कंपनींचे शेअर्स बाजारात न विकता विकण्याची ऑर्डर स्वतःच्या अंगावर घ्यायची. संध्याकाळी त्या दिवशीच्या लोएस्ट भावावर दोन टक्के चढवून काँट्रॅक्ट नोट इश्यु करायची. दोन दिवसानी भाव वाढले की आपल्या खात्यात ते शेअर विकून टाकायचे.भावफरक(जॉबींग मार्जीन)+दलाली + वाढीव भावाचा फायदा हा माझा एकूण नफा.वाचताना आता काही कळणार नाही पण एकूण आठ ते दहा टक्के सुटायचे.
कधी कधी या उलट, विकण्याची ऑर्डर ज्या शेअर्सची आली असेल तो शेअर जर ब्ल्यु चीप असेल आणि मार्कॅट ओव्हर्बॉट असेल तर ओरीजीनल शेअरचा ट्रान्सफर फॉर्म बदलायचा. नवीन टीडी जोडून खोटी सही जोडून डिलीव्हरी मार्केटमध्ये उतरवायची.दोन महीन्यानी बॅड डिलीव्हरी आली की मार्केटभावात सौदा भरून द्यायचा.मार्केट तोपर्यंत चांगलंच खाली आलेलं असायचं.अशा सौद्यात काही वेळा चाळीस ते पंचेचाळीस टक्के सुटायचे.
हे झालं शेअर विक्रीचं .आता खरेदीत पण असाच हात धुवून घ्यायचा. एक दिवस माझ्याकडे राजीव प्रसादे नावाच एक मुलगा आला.
त्याला ऍबट कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे होते.त्याचे काका म्हणे त्या कंपनीत काम करत होते.
ऍबटचा भाव आदल्या दिवशीचा होता साडेसहाशे रुपये....
ज्या दिवशी बोनस साठी मिटींग होणार होती त्या दिवशीच सकाळी हा माझ्याकडे आला होता.
खरं सांगायचं तर बोनस ची न्यूज आधीच मार्कॅटनी डिस्काउंट केलेली होती.पण हे त्याला सांगण्यात अर्थ नव्हता.
माझ्यासोबत आणखी एक ग्राहक बसले होते. मी त्यांच्या समोर मुद्दाम त्याला पंधरा मिनीटं लेक्चर दिलं.
मार्केट रायजेस ऑन एक्स्पेटेशन्स अँड फॉल्स ऑन न्यूजचं तत्व समजावलं.
जेव्हा तो ऐकेनाच तेव्हा मला वाटलं की आता याला कापावं.
त्याला सांगीतलं "बघ रे बाबा हा रिस्की सौदा मी काही लिहीणार नाही."
त्यानी काही न बोलता माझ्यासमोर साठ हजार रोख ठेवले.आणि म्हणाला" आतातरी काम करा".
मी म्हटलं "ठिक आहे.बाकीचे पैसे संध्याकाळी द्या."
प्रसादे दिलेल्या पैशाची पावती घेऊन निघून गेला.
त्या दिवशी ऍबटची बोर्ड मिटींग सुरु झाली तेव्हा भाव साडेनउशे झाला.
मी शंभर शेअर घेण्याऐवजी शंभर शेअर विकले.
दिड तासानी जो बोनस डिक्लेर झाला त्याचं गुणोत्तर अपेक्षेप्रमाणे न आल्यानी भाव सातशे रुपयांपर्यंत खाली आला.
मी सातशे चौतीस रुपयात माझी पोझीशन कव्हर केली .एकूण नफा एकवीस हजार.
संध्याकाळी प्रसादे आला तेव्हा त्याच्या हातात नउशे चाळीस रुपयाच्या खरेदीचं काँट्रॅक्ट हातात दिलं.
बाकीच्या चौतीस हजाराची मागणी केली.बिचार्याच चेहेरा पडला होता. त्यानी मुकाट पैसे काढून दिले.
तिसर्या दिवशी ऍबटचा भाव साडेपाचशे झाला. मी शंभर शेअर खरेदी केले.माझा नफा चाळीस हजार.
एकूण नफा एकसष्ट हजार.
प्रसादेच्या हातात डिलीवरी आली तेव्हा भाव आणखी पडला होता. मला दया वाटायला पाहीजे होती पण नाही आली.
प्रसादे नंतर कधीच आला नाही.मलाही त्याचा विसर पडला कारण आणखी दहा प्रसादे रांगेत उभे होते.
दोनेक वर्षांनंतर एकदा बाजारात भेटला तेव्हा चांगलाच मॅच्युअर झाला होता.मला बघून त्याच्या चेहेर्यावर एक वेदनेची ,रागाची सणक उमटलेली मला दिसली .
मी ओळख न दाखवता पुढे गेलो तेव्हा माझ्यामागून धावत आला.
"शेठ ,विसरलात का मला ?"
मी निगरगट्टासारखं म्हटलं "अरे सॉरी बॉस, माझं लक्ष नव्हतं "
"मी फसलो हो तुमच्याकडे".तुमच्या कंपनीचं नाव निकेल अँड ग्रीनबॅक वाचून आलो होतो "
मला काय बोलावं ते कळेना .
मी म्हणालो "त्याचं काय मग..."
काही नाही."तुम्ही आमच्या हातावर निकेलच ठेवलात. आणि ग्रीनबॅक तुमच्या खिशात.."
त्याला आणखी काहीतरी बोलायचं होतं पण रागारागानी तरातरा चालत दिसेनासा झाला.
मला वाईट वाटायला हवं होतं पण वाटलं नाही .
पौर्णीमेच्या रात्री लांडगा होणार्या माणसाची कथा मी वाचली होती पण दिवसरात्र लांडगा होणार्या माणसाची गोष्ट प्रसादेनी वाचली नव्हती.
============================================================================================
प्रतिक्रिया
9 Feb 2009 - 8:41 pm | नितिन थत्ते
लिहिण्याची शैली जबरा. कोणास वाटेल तुम्ही खरंच असले धंदे करता.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
9 Feb 2009 - 8:50 pm | llपुण्याचे पेशवेll
झक्कास. परत एकदा रामदास स्टाईल लेख. जेसिपिसी पासून कोरांटीपर्यंत. बाटलीतल्या राक्षसापासून लोकप्रभेतल्या लेखापर्यंत लिहीणारा हाच माणूस असेल असे वाटत नाही.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
10 Feb 2009 - 3:56 am | मुक्तसुनीत
सहमत !
सव्यसाची लिखाण ! उत्कंठावर्धक , अस्सल !
10 Feb 2009 - 7:41 am | दशानन
हेच म्हणतो !
सव्यसाची लिखाण ! उत्कंठावर्धक , अस्सल !
मनातील वाक्ये !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
9 Feb 2009 - 9:05 pm | प्राजु
दंडवत तुम्हाला.
आणखी काय सांगू?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Feb 2009 - 9:45 pm | सुनील
अप्रतिम. अजून येउदे.,, मला कधीच न उमजलेल्या दुनियेबद्दल वाचताना एक वेगळीच मजा येतेय...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
9 Feb 2009 - 9:53 pm | विनायक पाचलग
आम्ही ज्यांचे ज्यांचे फॅन आहोत त्यात आणखी एकाची भर
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
9 Feb 2009 - 9:52 pm | अवलिया
मस्त.... आता जास्त वेळ न लावता पटपट पूर्ण करा...
--अवलिया
9 Feb 2009 - 10:16 pm | विसोबा खेचर
रामदासभाऊ,
उत्तम शैली.. येऊ द्या अजूनही..
तात्या.
9 Feb 2009 - 11:00 pm | पिवळा डांबिस
झक्कास लिहिलंय तुम्ही......
दलाल स्ट्रीटवरचं असं जबरदस्त रिगिंग पाहून (आणि आपण त्याच्यात नेहमीच हरणार याची जाणीव होऊन!) आम्ही थोड्याश्या लॉसनंतर त्यातून कायमचे बाहेर पडलो......
तुमच्या सुरस आणि रोमांचकारी कथा वाचून जुन्या आठवणी जागृत झाल्या.....
:)
9 Feb 2009 - 11:54 pm | चकली
मस्त!
चकली
http://chakali.blogspot.com
10 Feb 2009 - 6:18 am | सहज
रामदासजी असे तर नाही ना सुचवायचे की स्टॉक मार्केट पासुन माहीती नसलेल्यांनी दुरच रहाणे इष्ट?
म्युच्युअल फंड किंवा किमान १० ते २० वर्ष गुंतवणुक कालावधी हा मुदत ठेव, पीपीएफ, पोस्टापेक्षा जास्त परतावा देणार नाही का?
रामदासजी तुमचे लेख मेंदुचा भोवरा करतात. :-)
10 Feb 2009 - 6:28 am | घाटावरचे भट
नेहेमीप्रमाणे उत्तम!!! आणि मागच्या भागांच्या लिंक्सही नेहेमीप्रमाणे विसरलात :P
10 Feb 2009 - 6:34 am | अनिल हटेला
एकदम फर्मास लिखाण !!!
पूभाप्र.................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
10 Feb 2009 - 6:55 am | महेंद्र
अरे काय लिहिता तुम्ही. अगदी बाजार डोळ्यापुढे उभा केलात.
ते भाव कॉपी चं वाचुन जुने दिवस आठवले.
त्या काळी सगळं काही , ब्रोकर्स च्या हाता मधे होतं आणि त्या मुळे तुम्ही सेल करा म्हणुन सांगितलं तरी पण इंट्रा डे मधे ब्रोकर भरपुर कमावुन घ्यायचा.
आजकाल , डायरेक्ट नेट वर व्यवहार असल्यामुळे आणि बोल्ट घेणं सहज शक्य झाल्या मुळे, अशी फसवणुक होउ शकत नाही.
पण रामदास भाउ, तुमचा लेख अगदी उत्क्रॄष्ट!! फेटे उडाले की हो आमचे......
10 Feb 2009 - 7:25 am | चतुरंग
एका सेकंदात दलाल स्ट्रीटवरच्या गर्दीत फेकून दिलेत की!
बावचळल्यासारखा वाचत गेलो, एक झाला की दुसरा झोल, सुरुच! वाचून कधी संपले ते समजलेच नाही, अर्थात तुमच्या लिखाणात हे नेहेमीच होते. आत्ताच तर कुठे आलाय म्हणताना सचिन अचानक सेंचुरी पूर्ण करतो ना तसेच काहीसे!
एकच प्रश्न, पुढचा भाग कधी?
चतुरंग
10 Feb 2009 - 7:53 am | प्रमोद देव
मीही सुरुवातीला असाच फसलोय. विशेषतः रिंगमध्ये जाणार्या पंटरकडून.
नंतर थोडाफार सुधारलो. हर्षद मेहताच्या काळात एकवेळ अशी आलेली होती की माझी गुंतवणूक जवळ जवळ ६पट झालेली होती. मात्र त्या सुमारास पैशाची जरूर नसल्यामुळे कागदी फायदा पाहूनच खुशीत गाजरे खात होतो. एकदिवस हर्षद मेहताचा फुगा फुटला आणि बघता बघता आम्हीही धाराशाही झालो. अजूनही त्या काळात गुंतवलेले पैसे कागदाच्या रुपात साक्ष म्हणून आहेत. कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या त्या बहुतेक सर्व कंपन्या केव्हाच आपली दुकाने बंद करून गायब झालेत. :) आता केवळ आपल्या मुर्खपणाचा पुरावा म्हणून जपून ठेवलेत.
10 Feb 2009 - 8:12 am | प्रकाश घाटपांडे
रामदास यांचे लेखन अप्रतिम असते. मागील भाग
दलाल स्ट्रीटची काही वर्ष भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
प्रकाश घाटपांडे
13 Feb 2009 - 12:57 am | संदीप चित्रे
तुमचे लेख इतके वेगवान असतात की आपणही त्या सट्टाबाजारात गोंधळून फिरतोय असे वाटते.
अशाच अजून खूप खूप उत्तम लेखनाठी खूप शुभेच्छा.
13 Feb 2009 - 7:55 pm | शंकरराव
पंत,
विषयाच्या मांडणीतच तूम्ही जिंकलात. लेखनाला वेग आहे, घटनांचा वेग सांभाळतांना कथानुरूप भाव जपला हे विषेश जाणवत.
विषयाला साजेल अशी अप्रतिम लेखन शैली. कथा वाचतांना घटना प्रत्यक्ष अनुभवतो आहे असेच वाटते.
कथेतून ज्ञानार्जन देणे हा विषय गौण ठरावा.. प्रकटन मनाला चटका लावून जाते..
विषेश आवडले असेच म्हणतो.
शंकरराव
13 Feb 2009 - 8:19 pm | लिखाळ
उत्तम..वेगवान..
भारी शैली...
-- लिखाळ.