आफ्रिका!!! आफ्रिका!!!

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
1 Jan 2009 - 4:41 am

माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो. पृथ्वीच्या गोलावर एखादं गावाचं नाव घ्यायचं आणि ते कुठे आहे ते दुसर्‍याने शोधून काढायचं. हाच खेळ त्या ऍटलस मधे बघून खेळायला जास्त मजा यायची. तिथे तर जामच कळायचं नाही. पण हे सगळं चालू असताना 'आफ्रिका' हा शब्द मात्र कुठे तरी घट्ट जाऊन बसला होता मनात. तो शब्दच काहीतरी वेगळा वाटायचा. काहीतरी अनामिक, गूढ असं वाटायचं.

माझा आफ्रिकेशी पहिला संबंध आला तो अगदी लहानपणी, ५-६ वर्षांचा असताना, आमच्या कडे नुकताच टीव्ही आला होता, तेव्हा. एका शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'पेडगावचे शहाणे' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो. मला त्या झांझिबार शब्दाने अक्षरशः वेड लावले होते. पुढे कितीतरी दिवस तो शब्द माझ्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होता. साला, गावाचं नाव काय? तर झांझिबार!!! गंमतच आहे. कसं असेल ते झांझिबार? तिथल्या लोकांना आपल्या गावाचं नाव सांगताना थोडं विचित्र नाही वाटत? असले विचार यायचे माझ्या मनात. :)

हळू हळू ते थोडं ओसरलं. तेवढ्यात आमच्या बिल्डिंगमधले एक जण नोकरी निमित्त 'नायजेरिया'ला गेले. तिथे लागोस मधे होते ते. त्यांची धाकटी मुलगी आमच्या बरोबरीचीच एकदम. रोजच्या खेळण्यातली. ती एकदम विमानात बसून कुठे गेली? तर आफ्रिकेला!!! कसली जळली होती आमची. पण चला आपण नाही तर कमीत कमी आपली मैत्रिण तर जातेय हाच आनंद होता. ती जेव्हा सुट्टीवर यायची तेव्हा तिच्या तोंडून तिथले उल्लेख, चमत्कारिक नावं, तिचं इंग्लिश (आम्ही मराठी माध्यमवाले, ती तिथे जाऊन एकदम इंग्लिश मिडियमवाली झालेली) वगैरे ऐकून आम्हाला फारच सुरस आणि चमत्कारिक असं वाटायचं. माझे आजोबा रेल्वेत मोठे अधिकारी होते. आणि मागे एकदा नायजेरियामधले काही अधिकारी तिथे रेल्वे सुरू करायच्या प्रयत्नात भारतात आले होते. त्यांचे काढलेले स्वागत समारंभाचे फोटो मला बाबांनी दाखवले. त्यात ते लोक एकदम धिप्पाड आणि काहीतरी वेगळेच झगे (गाऊन) आणि लांब टोप्या घातलेले पाहून गंमतच वाटली.

आफ्रिका डोळ्याना पहिल्यांदा दिसायचा योग आला तो अजून पुढे, साधारण ७५-७६ साली. मुंबईत, कुलाब्याला रीगलला 'हतारी' (http://en.wikipedia.org/wiki/Hatari!) हा सिनेमा आला होता. तो पूर्णपणे आफ्रिकेतच आहे. बाबांनी मला आणि ताईला मुद्दाम तो बघायला नेला होता. त्यातले एक एक प्राणी आणि ते निसर्ग सौंदर्य बघून केवळ वेडच लागायचं बाकी राहिलं होतं. सिनेमा संपल्यावर बाबांनी जवळ जवळ ओढतच बाहेर काढलं होतं. पुढे शाळेत भूगोलाच्या तासाला आफ्रिकेतले प्राणी, तिथले मौसमी वारे, हवामान, पिकं, तुआरेग जमातीच्या लोकांची घरं कशी असतात आणि त्याला काय म्हणतात वगैरे अतिशय नीरस गोष्टी पण माझ्या मनातली आफ्रिका अधिकाधिक संपन्न करत गेल्या. इतिहासाच्या तासाला बाई मध्ययुगातील गुलामांच्या व्यापाराबद्दल शिकवायच्या. ती वर्णनं ऐकून खूपच वाईट वाटायचं.

असं होता होता, नववी दहावी मधे असताना, माझ्या हातात प्रसिध्द संशोधक, भटक्या (एक्स्प्लोरर) सर रिचर्ड बर्टनवर बाळ सामंतांनी लिहिलेलं पुस्तक पडलं. त्यात त्याने आफ्रिकेत अतिशय दुर्गम आणि भयानक टोळ्या वास्तव्य करत असलेल्या प्रदेशात केलेली भटकंती छान वर्णन केली आहे. आफ्रिकेतले विविध लोक, त्यांचे जीवन, नरभक्षक टोळ्या, त्याने नाईल नदीच्या उगमाचा लावलेला शोध आणि त्या प्रवासातले अनुभव जबरदस्तच आहेत. त्याच्या स्वतःच्या लिखाणातले उतारेच्या उतारे आहेत. ह्या माणसाचा माझ्यावर अजूनही विलक्षण प्रभाव आहे. कॉलेज मधे परत आफ्रिका भेटली, तेव्हा इदी अमिनवर एक सिनेमा आला होता. तो बघितला, त्यातल्या काही गोष्टी बघून धक्का बसला होता. त्याच वेळी द. आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा चालला होता. नेल्सन मंडेला हे नाव पूर्ण जगात अतिशय प्रसिद्ध झालं होतं. इथियोपियातला दुष्काळपण खूपच गाजला होता. त्या साठी पैसे वगैरे पण गोळा केले होते.

अशी अगदी लहानपणापासूनच माझ्या मनात आफ्रिका घुसत गेली आणि कधी जायला मिळेल असं वाटत नसल्यामुळे मी माझ्याच मनात एक चित्र उभं करत गेलो.

असं सगळं असताना, २००७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मधे एक दिवस माझा बॉस अचानक माझ्याकडे आला. म्हणाला, 'नैरोबीला एक अर्जंट काम आहे. तुला जावं लागेल'. खरं तर माझा तसा काहीच संबंध नव्हता पण माझ्या नावाची निवड झाली होती. मी अक्षरशः थरारलो. ध्यानी मनी नसताना एकदम आफ्रिकासफर घडणार!!! मी तसंही नाही म्हणू शकत नव्हतो, आणि मी नाही म्हणायचा प्रश्न ह्या जन्मात तरी उद्भवणार नव्हता. जनरितीपुरते थोडे आढेवेढे घेऊन मी जायचे मान्य केले. दुबई ते नैरोबी जवळ जवळ ५ तासाचा प्रवास आहे. फ्लाईट रात्रीची होती. पहाटे पोचणार होतो. मला तर अति एक्साईटमेंटमुळे झोप आलीच नाही. चेक इन साठी मुद्दाम पहिला नंबर लागेल इतक्या लवकर जाऊन, खास 'कॅन आय हॅव अ विंडो सीट, अवे फ्रॉम द विंग्ज, प्लीज?' अशी विनंति करून, छान सीट पटकावली. जसजसं नैरोबीजवळ यायला लागलं तसतसं मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं होतं. हीच ती आफ्रिका जी लहानपणा पासून डोक्यात आहे. हीच ती आफ्रिका जिथे आपला हीरो 'सर रिचर्ड बर्टन' वणवण करत भटकला. आधुनिक मानवाचा उगम इथलाच. डिस्कव्हरी / नॅशनल जिऑग्राफी मधून दिसणारी, आफ्रिका आज प्रत्यक्ष दिसणार. खिडकी बाहेर अंधार होता. नैरोबी आलं. तो पर्यंत बाहेर पहाटेचा लालसर पिवळा संधिप्रकाश बर्‍यापैकी फुटला होता. त्यामुळे तर अजूनच अद्भुत वगैरे वाटायला लागलं. वैमानिकाची 'पट्टे आवळा, विमान उतरतंय' अशी हाक आली. विमान हळूहळू खाली सरकलं. आणि एका क्षणी मला त्या धूसर, लाल प्रकाशात आफ्रिकेचं पहिलं दर्शन झालं. तो क्षण मी विसरणंच शक्य नाही. एकदम 'कोडॅक मोमेंट'च.


वरील छायाचित्र आंतरजालावरून साभार

त्या जादूभरल्या प्रकाशात उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर खास आफ्रिकेत असतात तश्या एका 'फ्लॅट टॉप' झाडाचं दर्शन झालं. नैरोबीच्या बाहेर एका प्रचंड मोठ्या पठारावर एकुलतं एक झाड उभं होतं. वरच्या चित्रात आहे तसा एखादा जिराफ नाहीतर एखादा हत्तींचा कळप वगैरे दिसला असता तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. ते विमान त्याक्षणी उतरताना खाली धपकन् पडलं असतं तरी मला कळलं नसतं. माझा मित्र बाजूला बसला होता. मस्त घोरत होता. एक अतिशय सोनेरी क्षण घालवला त्याने. बिच्चारा.

'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असं साक्षात गदिमाच म्हणून गेले आहेत. पण माझ्या बाबतीत नेमकं उलटं झालं. 'प्रतिमेहून प्रत्यक्ष भन्नाट' अशी माझी अवस्था झाली. पुढे नैरोबी मधे थोडासाच मुक्काम घडला. तिथलं जीवन अगदी थोडं का होईना पण जवळून बघता आलं. आपण प्रत्येक बाबतीत आपल्या मनात एक स्टिरीओटाईप बाळगून असतो. जो पर्यंत आपण वास्तवाला डोळसपणे सामोरे जात नाही तो पर्यंत ते आपण घट्ट पकडून वर कुरवाळतही बसतो. पण डोळे, कान आणि मन उघडं ठेवून वावरलं की ह्या आभासातून सुटका होते. 'लॉ ऑफ फिफ्टी-फिफ्टी' प्रमाणे कधी सत्य धक्का देतं कधी सुखावतं.

आपल्याला वाटतं की आफ्रिकन लोक म्हणजे एकजात सगळे धिप्पाड, काळे कुळकुळीत, कुरळ्या केसांचे वगैरे असतात. माझा पण असाच समज होता. पण तिथे तर मला चित्र थोडं वेगळंच दिसलं. माणसं काळीच पण त्या काळ्या रंगाच्या एवढ्या विविध छटा दिसल्या की बस्स. तेच केसांचं. कधी कुरळे, कधी सरळ आणि लांब (पण जास्तीत जास्त खांद्या पर्यंत, त्या खाली कधीच नाही), आणि कधी.... नाहीतच. :) असं सगळं. काही लोक एकदम धिप्पाड तर काही एकदम पाप्याचं पितर वगैरे. पुढे आफ्रिकेत अजून थोडं फिरलो तसं अजून वैविध्य दिसलं. माणसांचे तोंडावळे पण किती निरनिराळे!!! साधारण चेहर्‍यावरून, रंगावरून ते कुठले असावेत त्याचा अंदाज बांधता येतो. गोलसर चेहर्‍याचे धिप्पाड पश्चिम-आफ्रिकन, तसेच दिसणारे पूर्वेकडचे, टिपिकल उभट चेहर्‍याचे आणि अगदी भारतिय गहूवर्णाचे इथिओपियन, खूपच उंच आणि बर्‍यापैकी उजळ असलेले सुदानी. नाना प्रकार.

मी नायजेरियात एक गंमत ऐकली. तिथला माझा एक कस्टमर मला तिथल्या पराकोटीच्या विषमतेबद्दल सांगत होता. तो म्हणाला की ९५% संपत्ति ही फक्त ५% लोकांच्या हातात आहे. एखादा नायजेरियन यु.के., अमेरिका वगैरे देशांचा व्हिसा एखाद्या भारतियापेक्षा सहज मिळवतो. कारण काय तर जो नायजेरियन तिकडे जाऊ शकतो तो आर्थिक दृष्ट्या एवढा श्रीमंत असतो की त्याला तिथे सेटल वगैरे व्ह्यायची किंवा नोकरी वगैरे करायची गरजच नसते. तो शिकायला तरी जातो किंवा धंद्याच्या निमित्ताने तरी जातो. त्या उलट आपण भारतिय. काय वाट्टेल ते झाले तरी तिथून परत यायचे नाही असंच बहुतेक लोक करतात.

पण एक मात्र सतत जाणवतं. तरूण मंडळी मात्र अधिकाधिक शिक्षणाकडे ओढली जात आहेत. जग जसं जसं जवळ येत आहे, तसं तसं अगदी सामान्य माणसालाही इतर देशांत कशी प्रगति होत आहे, समृद्धी आहे हे घरबसल्या दिसतं आहे. पूर्वी असं नसावं. पण ह्या मुळे तरूण मंडळी जागरूक होत आहेत असं वाटतंय. अर्थात भायानक गरिबी आणि त्याहून भयानक राज्यकर्ते हा शाप आफ्रिकेच्या कपाळी कधीचाच लागला आहे. पण ही नविन जनता बाहेर नजर ठेवून उ:शापाचा मंत्र शिकायची धडपड करत आहे. इंग्लंड, अमेरिका, भारत इत्यादी ठिकाणी जाऊन शिकणार्‍यांचं प्रमाण वाढतंय. बाहेर शिकून परत मायदेशी येणारे किती तरी लोक मी पाहिले आहेत. अनेक शतकांच्या अंधारातून वर यायला वेळ आणि श्रम लागणारच पण तशी सुचिह्नं मात्र दिसत आहेत. कालचक्राचा नियमच आहे, प्रत्येक समाज वर खाली होत असतो. आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. (तिथे वावरताना पदोपदी हा विचार मनात येतो की आपल्या थोर इ. इ. राज्यकर्त्यांना ही दूरदृष्टी आहे का? आफ्रिके बरोबर आपले पूर्वापार संबंध आहेत. पण ते अजून वाढवणे, जोपासणे वगैरे होत आहे का? कुठे दिसले तरी नाही. पण ह्याच्या उलट चिनी. आज आफ्रिकेत जिथे पहावे तिथे चिनी दिसतात. एकेकाळी इंजिनियर म्हणला की तो भारतिय असायचा. आज चिनी असण्याची शक्यता ५०% असेल!!! नैरोबी विमानतळ ते शहर ह्या रस्त्याचं काम करणारे मजूर आणि तंत्रज्ञ दोन्ही चिनी होते. अजून काय बोलणार? असो.)

तर अशी ही आफ्रिका. 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला.

प्रवाससमाजजीवनमानभूगोललेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

अनामिक's picture

1 Jan 2009 - 5:46 am | अनामिक

खुप छान झालाय लेख बिपिन दा!

आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.

नक्किच!!

(अफ्रिका याच देही याच डोळा एकवेळ पहायची इच्छा असलेला) अनामिक.

मुक्तसुनीत's picture

6 Jan 2009 - 8:50 pm | मुक्तसुनीत

लेख आवडला. खूप उशीरा प्रतिक्रिया देतोय , पण बेटर लेट द्यान नेव्हर. लेखकाची प्रवाही , चित्रदर्शी शैली आता चांगलीच परिचयाची झाली आहे. नवीन दुनियेचे समृद्ध अनुभव उत्तम टिपले गेलेत.

आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.

या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jan 2009 - 10:46 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.

या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.

खरं सांगायचं तर माझ्या विधानाला खूप तर्काचा असा वगैरे आधार नाही किंवा मी अभ्यासपूर्ण लिहिलंय असं नाहिये. हा केवळ आशावाद आहे असं थोडंसं म्हणता येईल. पण त्याला थोडा आधार आहे. प्रथम हे स्पष्ट करतो की आफ्रिकेच संभाव्य उत्थान हे १००-२०० वर्षात होईल असं मला म्हणायचं नाहिये. किंबहुना तो कधी होईल हा मुद्दा नाहीच. पण जे काही थोडंफार जागतिक इतिहासाबद्दल मला माहित आहे त्यावरून मला नेहमीच असं वाटतं की 'कालचक्र' हे अव्याहत आणि निष्ठूर आहे. जगातील प्रत्येक संस्कृति, समाज, भूभाग इ. कधी भरभराटीत असतात. पण काही काळाने पार रसातळाला जातात. परत काही काळाने वर येतात. आफ्रिकेचा भूतकाळ प्रचंड नसला तरी बर्‍यापैकी सशक्त होता. मोठमोठी साम्राज्य होती. लोक तुलनेने सुखी समाधानी होते. मग दैन्यावस्था आली. आणि मी ज्या काही आफ्रिकनांना भेटलोय त्यातले बरेच चांगले शिकलेले पण स्वेच्छेने मायदेशी परत येऊन देशासाठी काही तरी करत होते. म्हणून मला असं वाटलं कदाचित ही सुरूवात असेल. अर्थात १०-१००-१००... किती वर्षं लागतील ते काही माहित नाही. :)

बिपिन कार्यकर्ते

विकास's picture

1 Jan 2009 - 5:55 am | विकास

लेख आणि आत्मकथन आवडले... त्या निमित्ताने मला देखील लहानपणी पाहीलेल्या हातारीची चित्रपटाची आठवण करून दिलीत :-)

शितल's picture

1 Jan 2009 - 6:12 am | शितल

बिपीनदा,
आफ्रिके बद्दल सुंदर लिहिले आहेस. :)

>>>तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला.

:)

सुनील's picture

1 Jan 2009 - 6:43 am | सुनील

लेख फारच छान.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jan 2009 - 8:11 am | llपुण्याचे पेशवेll

सुंदर. खरोखर सुंदर. फार आवडले. काढलेला फोटोही फार सुंदर.

पुण्याचे पेशवे
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2009 - 1:58 pm | बिपिन कार्यकर्ते

श्रीमंत, तो फोटो आंतरजालावरून घेतलेला आहे. तशी तळटीप टाकायची राहिली होती. :)

बिपिन कार्यकर्ते

सखाराम_गटणे™'s picture

1 Jan 2009 - 9:19 am | सखाराम_गटणे™

छान लेख

आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील.

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सखाराम_गटणे™'s picture

1 Jan 2009 - 9:19 am | सखाराम_गटणे™

छान लेख

आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील.

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झुमाक्ष's picture

1 Jan 2009 - 9:21 am | झुमाक्ष (not verified)

शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'जगाच्या पाठीवर' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो.

'पेडगावचे शहाणे'.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

टारझन's picture

1 Jan 2009 - 10:01 am | टारझन

बिपीण भाव !! आपण तर बॉ एका फोटूतच खल्लास झालो !!! ते सुर्य मावळतो णा , तेंव्हा आम्ही फारच भावूक झालेलो असतो ... आणि तो फोटू "के व ळ अ ति अ प्र ति म " आहे ... तोडच णाही !! अफ्रिका आपल्या लेखणीतून प्रसवली आम्ही ती तशीही अणुभवली आहे ! एकदम एक्ग्जाक्टली सांग्या आपणे !! लेखाची लांबी योग्य होती , आपल्या ओघावत्या भाषेचे आम्ही खोबारापासूनच (चालणारे)फैन आहोत , आपल्या बोटांमधून असंच बरंच काही प्रसवो !! आम्ही मात्र पुण्हा 'मसाईमारा' बघायला जाणार हे णक्की !! लाष्ट टाईम "नाकुरू" वर समाधाणी होतो.

इट्स अफ्रिका ब्वाना !! सेबो यू पुट द फिंगर ऑण रेड बटण (हे आपलं काहिहि)

- (मुइंडी कम मुझुंगू) टारझन
आम्ही मच्छर मारणारे क्षत्रिय आहोत

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2009 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते

योग्य ती सुधारणा केली आहे. चुकून मिष्टिक झाल्याली. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद!!!

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

1 Jan 2009 - 9:53 am | विसोबा खेचर

तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला.

मस्त रे बिपिनभौ! :)

अवलिया's picture

1 Jan 2009 - 10:14 am | अवलिया

आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.

क्या बात है !!!

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

1 Jan 2009 - 10:56 am | विनायक प्रभू

चांगलीच प्रसवताहेत.

सहज's picture

1 Jan 2009 - 12:32 pm | सहज

लहानपणापासुन तुमच्या मनात बसलेल्या अफ्रिकेचा लेख आवडला.

भविष्यात अफ्रिकेचे उज्वल दिवस येतीलच!

तुमच्याकडूनच द अदर साईड ऑफ अफ्रीका वाचायला आवडेल [सोमालिया, सुदान, कॉंगो, रवांडा, लायबेरिया,झिंब्बावे, आयव्हरी कोस्ट]

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2009 - 1:59 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रयत्न करतो नक्की!!!

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

2 Jan 2009 - 7:08 am | नंदन

आहे, लेख अतिशय आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jan 2009 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार

अफ्रिकन सफारी एकदम मस्त्त वाटली. मस्तच केले आहे एकुण वर्णन. सुंदर लेख.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मदनबाण's picture

1 Jan 2009 - 1:58 pm | मदनबाण

मस्त..

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

ऋषिकेश's picture

1 Jan 2009 - 4:41 pm | ऋषिकेश

लेख आवडला.. आटोपशीर आणि नेमका!.. मस्त!
- ऋषिकेश

शाल्मली's picture

1 Jan 2009 - 4:52 pm | शाल्मली

तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे.
सुंदर वर्णन. आवडले.

--शाल्मली.

लिखाळ's picture

6 Jan 2009 - 10:19 pm | लिखाळ

तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे.
सुंदर वर्णन. आवडले.

सहमत.
फार छान शब्दयोजना. वैमानिकाची हाक, पत्यक्षाहुनी प्रतिमाचा वापर. आवडले.

आफ्रिका म्हटली की 'द घोस्ट अँन्ड द डार्कनेस' चित्रपटातील वेगवान पार्श्वसंगीत माझ्या मनात रुंजी घालायला लागते.

आफ्रिकेबद्दल अजून लिहा. तिथल्या सामाजिक-अर्थिक-राजकीय परिस्थितीबद्दलसुद्धा लिहा.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्रदीप's picture

1 Jan 2009 - 5:50 pm | प्रदीप

लेख. खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ.

केवळ काही दिवसांच्या तेथील वास्तव्यात आपण आफ्रिकन लोकांचे चेहरे व शरीरयष्टीवरून ते कुठल्या प्रांतातून आले आहेत, ह्यावर अंदाज बांधू शकलात, हे आपल्या तीव्र निरीक्षण शक्तिचे द्योतक आहे, हे विशेष आवडले.

तेथे चीन्यांनी भरपूर हातपाय पसरवले आहेत. एकतर त्यांच्याकडे जी आता अमाप परकिय चलनातील गंगाजळी आहे, त्याचा व्यवस्थित ठरवू, दूरदृष्टिने ते आफ्रिकेत वापर करत आहेत, कारण तेथील तेलसाठे त्यांना महत्वाचे वाटतात. चिनी कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल- संबंधित उद्योगांतच गुंतवणूक केली आहे असे नव्हे, तर तेथील काही देशांत त्यांनी 'मदतकार्ये' ही सुरू केली आहेत, हे इतक्या पद्धतशीरपणे चालू आहे, की खरोखरीच ते पाहिल्यावर आपले सरकार व नोकरशाही ह्या दृष्टिने काय करत आहे, असा प्रश्न तुम्ही विचारला आहे, तो मलाही पडतो.

अवांतरः काही शहरांची, गावांची नावे भूल पाडणारी असतात, हे 'झांझिबार' बद्दल आपण जे म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. 'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.

झुमाक्ष's picture

1 Jan 2009 - 5:59 pm | झुमाक्ष (not verified)

'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.

'बंदर सेरि बेगावान' हे शहराचे नाव 'बंदर श्री भगवान'वरून उद्भवलेले असावे.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

प्रदीप's picture

1 Jan 2009 - 6:30 pm | प्रदीप

ह्यात काहीतरी तथ्य असावे असे दिसते. मलेशियाच्या पूर्वेकडे असलेल्या ब्रूनेईच्या सुलतानाच्या राजधानीचे हे नाव आहे. विकीपेडिया ह्या नावाबद्दल अशी माहिती देतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jan 2009 - 7:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला टिंबक्टू या नावाबद्दल प्रचंड आकर्षण आहे.

बिका, लेख उत्तम हे.वे.सां.न.ल.

प्रदीप's picture

1 Jan 2009 - 9:12 pm | प्रदीप

आणि ह्या नावावरून किशोरचं एक धमाल गाणंही लगेच आठवतं: " घे घे घे, घे घे जरा टिंबक्टू, काठमांडू अरे काठमांडू..."

असो, हे सगळे फाजिल अवांतर झाले.

श्रावण मोडक's picture

6 Jan 2009 - 3:00 pm | श्रावण मोडक

सुंदर लेख.
खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ.
याविषयी सहमत. कधी लिहिताय असं?
एक (आगाऊ) सूचना - लेखाला राऊंड-अपचा फॉर्म नका ठेवू. टॉकेटिव्ह होऊ द्या, अनुभव लिहा, घटना-प्रसंग येऊ द्या. अशा घटना-प्रसंगातून तुमच्यासमोर व्यक्त होणारी आफ्रिका समजून घेणंही अधिक आवडेल. म्हणून म्हणतो राऊंड-अपचा फॉर्म नको.

रामदास's picture

1 Jan 2009 - 7:07 pm | रामदास

आमच्या ओळखीचे एक गृहस्थ डेंकाली इथे रहायचे.त्यांना शहरात आल्यावर मि.वॉकर म्हणायचे.त्यांच्या बायकोचे नाव डायना.घरगड्याचे नाव गुर्रन्.त्यांच्याबरोबर नेहमी आफ्रीकेत जायचो.आफ्रीका फार आवडायची.पण एक दिवस माझ्या एका मित्रानी आफ्रीकेचा एक नवा फोटो पाठवला.त्याला या फोटोचे खूप सारे पैसे मिळाले म्हणे.
हा फोटो पाह्यल्यावर डेंकाली ,वॉकर, वाघ्या, गुर्रन सगळं काही विसरलो.सापडला तर टाकतो तो फोटो.
बिपीन तुमचा लेख आवडला .सुंदर आहे. नेहेमीचे यशस्वी कलाकाराच्या यादीत तुमचं नाव आता झळकायला लागलं आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2009 - 7:21 pm | बिपिन कार्यकर्ते

काय योगायोग बघा. हा वॉकर आपला कॉमन फ्रेंड निघाला की हो. :)

हा फोटो बघितला होता. खरंच अतिशय भयंकर आहे. पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा मी पण हादरलो होतो.

बिपिन कार्यकर्ते

सुनील's picture

1 Jan 2009 - 7:26 pm | सुनील

हा फोटो आणि त्यावर झालेली चर्चा आठवली.

मरणासन्न मुलाला थोडे पाणी / अन्न देण्याऐवजी त्याचा फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्याची हाव असणे चांगले का, अशी काहीशी ती चर्चा होती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2009 - 7:52 pm | बिपिन कार्यकर्ते

ह्या फोटो बद्दल थोडे गूगलवले. धक्कादायक माहिती कळली. केविन कार्टर नावाच्या पत्रकाराने हा फोटो काढला आणि नंतर हे दृश्य सहन न झाल्याने २ महिन्यांनी आत्महत्या केली. :(

http://realchoice.blogspot.com/2008/09/vultures.html

बिपिन कार्यकर्ते

चित्रा's picture

1 Jan 2009 - 8:16 pm | चित्रा

लेख आवडला, पण या छायाचित्राने एका भागातील वास्तवाची जाणीव करून दिली.

प्रदीप's picture

1 Jan 2009 - 9:18 pm | प्रदीप

मीही हा फोटो पाहिला होता, पण हेही त्याचबरोबर वाचलेले आठवते की त्या फोटोग्राफरने फोटो काढल्यावर गिधाड हुसकावून लावले आणि मुलाला सुरक्षित स्थानी हलवले. कदाचित माझा काहीतरी गोंधळ होत असण्याची शक्यता आहे.

चतुरंग's picture

1 Jan 2009 - 10:14 pm | चतुरंग

आत्मकथनाच्या धाग्यांची रेशमी वीण असलेला तुझा लेख सुंदरच झालाय. आफ्रिकेत जायची इच्छा आणखीनच प्रबळ झालीये.

(काय योगायोग आहे बघ बिपिनदा! कालच माझ्या एका मित्राला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचा फोन केला आणि त्याच्या बायकोने सांगितले की तो कैरोला गेलाय आणि आजच निघालाय परतीच्या प्रवासाला, त्यावेळी मला पिरॅमिड्स, ईजिप्त आणि त्यामुळे एकूणच आफ्रिका प्रकर्षाने बघायची इच्छा झाली आणि आज बघतो तर तुझा हा लेख!)

चतुरंग

रेवती's picture

1 Jan 2009 - 11:00 pm | रेवती

मुद्देसूद झालाय. अगदी लहानपणापासून असलेली इच्छा आणि खरच तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास छान लिहिला आहे.
(खरंतर आपल्या मनानं प्रवासाला लहानपणापासूनच सुरूवात केली होती असं वाटलं.)

रेवती

लहानपणापासून आलेले आफ्रिका या नावाशी संबंध.. आणि नंतर प्रत्यक्षात पाहिलेली आफ्रिका.. मस्तच लिहिले आहेस.
खासक्रून विमान प्रवास वर्णन एकदम खास.
माझे बाबा एक वर्ष होते आफ्रिकेमध्ये. टांझानिया मध्ये होते. एक एक अनुभव मस्त होते बाबांनी सांगितलेले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

2 Jan 2009 - 8:26 am | अनिल हटेला

लेख आवडेच .....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठी_माणूस's picture

2 Jan 2009 - 8:35 am | मराठी_माणूस

खुप आवडले.

बाहेर शिकून परत मायदेशी येणारे किती तरी लोक मी पाहिले आहेत.

हे विशेष वाटले

झेल्या's picture

2 Jan 2009 - 11:09 am | झेल्या

खूप छान...!

नकाशापासून प्रत्यक्षापर्यंत पोहोचायची ष्टाईल लै भारी...!

पण..
अजून डिट्टेल मध्ये आफ्रिका फिरवून आणा की...
-झेल्या

एकलव्य's picture

3 Jan 2009 - 7:16 am | एकलव्य

लेखाचा विषय आणि मांडणी सगळेच आवडले.

सुरेख's picture

2 Jan 2009 - 7:55 pm | सुरेख

नाईजेरीया येथे एक हवा आहे Financial Controller स्म्पर्क करा: nach_sam@yahoo.com. पश्चिम आफ्रिकेसंबंधी काही विशिष्ट माहिती हवी आहे का, चिन्य बद्द्ल लिहिलेले बरोबर आहे, आपले भारतीय बहुतांशी चित्रपटाबद्दल चर्चा करण्यात अधिक उत्सूक असलेले आढळ्ले. चिन्य बद्द्ल चुकले आहे, क्षमस्व. तसे पाहिले तर आफ्रिका फार सुंदर ही आहे आणि गरीब ही. पण चिक्कार अंतर्गत व न वापरलेली क्षमता असलेली. भारताविषयी त्यांना फार आपुलकी आहे. पूर्व आणि पश्चिम प्रदेशात फार फरक आहे. पण त्यांची गावे आणि शहरे ( गावे विशेष करून ) म्हणजे मी पाहिलेली तरी आपल्यापेक्षा अधिक नेटकी आहेत, कारण तिथे परका टोळीवाला किंवा पर प्रांताताला कोणी जाऊन सहजा सहजी अनावश्यक ढवळाढवळ करू शकत नाही; मारला जाईल. इथे बरीच क्षेत्रे अविकसित आहेत, आणि त्यात फार प्रगती होऊ शकेल असे आहे असे चित्र दिसत आहे. हुशार लोकांना इथे चांगला वाव आहे, विशेष करून तांत्रिकी क्षेत्रात.

संदीप चित्रे's picture

3 Jan 2009 - 12:09 am | संदीप चित्रे

बिपिन,
आफ्रिकेबद्दल मस्त लेख रे मित्रा....

'आफ्रिका' म्हटलं की मला हमखास आठवतं ते म्हणजे 'लायन किंग' ह्या नितांत सुंदर ऍनिमेशनपटातले 'circle of life' गाणं
(इतक्या सुरेख चित्रपटाला 'कार्टून' म्हणवत नाही !!)

ह्या गाण्यातला सूर्योदय आहे ना तो तर खल्लासच आहे एकदम.... आणि हे गाणं जेव्हा प्रत्यक्षात साकार झालेलं ब्रॉड वे शो मधे पाहिले तेव्हा तर पार वेडाच झालो होतो :)
गाण्याचा 'तू नळी' दुवा इथे देत आहेच.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jan 2009 - 12:26 am | बिपिन कार्यकर्ते

अरे मस्तच क्लिप रे. हा सिनेमा एक बघायचा राहूनच गेलाय बघ.

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

3 Jan 2009 - 2:03 am | संदीप चित्रे

लहान मुलांना तर खूप आवडतोच पण मोठेही आवडीनं बघतात.
बरं.. कथा म्हणशील तर एकदम थेट ७०/८० च्या दशकातल्या मसाला हिंदी सिनेमासारखी... म्हणजे दुष्ट काका वगैरे असं !!

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

चतुरंग's picture

3 Jan 2009 - 4:59 am | चतुरंग

आत्ताच बघितले रे संदीप. हा सिनेमा मात्र राहून गेलाय आता नक्की बघणार पण.

चतुरंग

शशिधर केळकर's picture

4 Jan 2009 - 9:48 pm | शशिधर केळकर

बिपिन भौ
सुंदर लेख. थोडक्यात पण बरीच माहिती आहे यात.
मी स्वतः सध्या टांझानिया मधे आहे. इथले काळे लोक नायजेरिया किंवा केनिया पेक्षा जरासे मवाळ आहेत.
लहान पणापासून आफ्रिकेचे आकर्षण अशा तर्‍हेने प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हा योग ही फार विलक्षण आहे.
लिहित राहा. छान चालू आहे!

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2009 - 3:07 pm | प्रभाकर पेठकर

बिपिनराव, मला वाटतं डिसेंबरच्या १५-१६ तारखेस मी शारजात आलो होतो तेंव्हाही आपण आफ्रिकेच्या सफरीवर निघाला होता, त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. असो.
वरील लेख सुंदरच आहे. त्यात थोडी छायाचित्रांची रांगोळी असती तर अजून मजा आली असती.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

म्हणजे तुझ्या अप्रतिम लिखाणाच्या शैली च्या प्रेमात !
वा ! Bip मान ग ये तुम्हे !
Hatts off म्हणजे काय ते पगडे / फेटे सगळे च उ डवा रे !

~ वाहीदा

आनंदयात्री's picture

5 Jan 2009 - 6:37 pm | आनंदयात्री

बिपिन तु या लेखात लहानपणीच्या भावविश्वात छान रमवले आहेस.
आफ्रिकेबद्दल अन इजिप्तबद्दल असेच कुतुहल मनात दाटुन आहे. कुणीतरी माझ्या आयुष्यातला एक तुकडा जगलय अन त्याचा सलग्न तुकडा जादुच्या आयन्यात दाखवुन गेलय असे वाटले. लहानपणापासुन आफ्रिका म्हणजे घनदाट जंगले, उंचच उंच पहाड, खोल अंधार्‍या गुहा त्यात आदिकालीन मनुष्यवस्तीचे अवषेश, त्यांना शोधणारे हिमती/ हिकमती संशोधक असे प्रायमरी चित्र येते. नंतर येते ती अनन्वित गरीबी, एडसचा राक्षस, अत्याचारी शासनं !

तु अजुन लिही अफ्रिकेबद्दल ब्वाना !!

आकाशी नीळा's picture

6 Jan 2009 - 2:49 pm | आकाशी नीळा

मजा आली अफ्रीका सफारी वाचताना....