नमस्कार मंडळी,
या शनिवारी ८ नोव्हेंबरला दक्षिण कॅलिफोर्नियातील पहिला मिसळपाव कट्टा - मराठी वाहिन्यांच्या भाषेत सांगायचे तर - मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी डांबिसकाका सॅन डिएगो मुक्कामी आले असताना त्यांची प्रथम भेट झाली होती. तेव्हाच मुंबई, पुणे, बंगळूर, जर्मनी, अमेरिकेचा पूर्व किनारा आणि बे एरियातील मिपाकरांप्रमाणेच लॉस एंजेलीस - सॅन डिएगो परिसरातही लवकरच एक कट्टा भरवावा अशी मनीषा पिडांकाकांनी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे मिपावर हाळी देऊन घाटावरचे भट, भाग्यश्री आणि मी यांनी काकांच्या घरी भेटायचं असं ठरवलं. मी सॅन डिएगोहून, घाटावरचे भट लॉस एंजेलिसहून एकत्र काकांच्या घरी संध्याकाळी पोहोचलो. भाग्यश्री आणि तिचे यजमान निनादही थोड्या वेळात आले. आमचे नमस्कार-चमत्कार होईतो दोन मिनिटं, जो काही थोडा औपचारिकपणा होता तेवढाच. लगेच गप्पांना सुरूवात झाली.
आमच्या स्वागताची काकांनी जय्यत तयारी केली होतीच. सर्वप्रथम वायद्याप्रमाणे तात्या अभ्यंकरांच्या चरणी शिवाज रीगल पोहोचती केल्यावर, काकांनी स्कॉच उघडून कट्ट्याचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
...
हिज रॉयल नॉटीनेस कट्ट्याचे उद्घाटन करतेवेळी :)
...
सहनौड्रिंकतु - डावीकडून घाटावरचे भट, नंदन, निनाद आणि भाग्यश्री
...
प्रथमच सगळे एकत्र भेटत असल्याने गप्पांचा पहिला विषय अर्थातच मिपाचा होता. आपण मिपावर प्रथम कसे आलो, लिहिते कसे झालो, अनेक मित्र कसे भेटले, मिपावर होणारं वेगवेगळ्या विषयांवरचं लेखन ह्यावर बोलणं एवढं रंगलं की, पिडांकाकूंना मिसळ तुमची वाट पाहते आहे याची आठवण करून द्यावी लागली :). पिडांकाकांनी 'खुद के हाथोंसे' ठाण्याच्या मामलेदार मिसळीची आठवण करून देईल अशी फर्मास तर्रीदार मिसळ बनवली होती.
एरवी ज्या मिसळीचे चित्र फक्त मिसळपावच्या मुखपृष्ठावरच पाहून समाधान मानावं लागतं, ती कितीतरी दिवसांनी चाखायला मिळाली. पुन्हा एकदा गप्पांचा फड जमला, आणि त्यात तात्पुरता खंड पडला तो काकूंनी खपून केलेल्या चारी ठाव जेवणाला सुरूवात केल्यावरच. जेवणाचे मांडलेले टेबल पाहूनच, काय खावं आणि काय नाही असा प्रश्न पडावा.
कोबीच्या वड्या, कोथिंबीर वडी, टोमॅटो-काकडीची कोशिंबीर, फ्लॉवरची भाजी, भोपळ्याची भाजी, छोले, बटर चिकन, श्रीखंड-पुरी आणि जिरा राईस!
इतक्या वेगवेगळ्या परीचे पदार्थ आम्ही महिन्याभरातही करत नाही, यावर माझे आणि घाटावरच्या भटांचे एकमत झाले :). रिच ग्रेव्हीचे बटर चिकन, छोले, अस्सल मर्हाटमोळी कोथिंबीर वडी नि भोपळ्याची भाजी हे पदार्थ सुरेख झाले होतेच, पण श्रीखंड-पुरीचा बेत तर अ प्र ति म होता. त्याबद्दल लिहित बसलो, तर मूळ कट्ट्याच्या वृत्तांतापेक्षा तो भाग मोठा व्हायचा. पण रंगलेल्या गाण्याला प्रकट दाद जाण्याआधी जशी नि:स्तब्ध, मूक दाद जाते; तशी पुढची काही मिनिटं आम्ही आधी तावातावाने चाललेल्या गप्पा विसरून आपापल्या ताटांतील पदार्थांना न्याय देण्यात गुंगलो होतो :).
अंतरीचा तळीराम तृप्त झाल्यावर मग मंडळी छानपैकी सैलावून गप्पांत रंगली. या गप्पांचीही एक मजा असते, नाही? 'गजालीन घो खाल्लो' काय किंवा 'गप्पांचे गुर्हाळ आणि पायलीचा फराळ' काय - त्यात गप्पा म्हणजे वेळेचा अपव्यय अशी धारणा दिसते. तसे व्यवहाराकरता किंवा आपले काम साधण्यासाठी अनौपचारिक बोलून मग मुद्द्यावर येणारे अनेक लोक असतात. पण कट्ट्यावर बसून मित्रांशी मारलेल्या निर्हेतुक गप्पांसारखे, किंवा घरी जेवणं आटोपल्यावर एकत्र बसून मारलेल्या शिळोप्याच्या गप्पांसारखे दुसरे सुख नाही. फोनवरच्या संभाषणाला, किंवा चॅटिंगलाही त्याची सर नाही. (या गप्पांच्या आवडीचे वर्णन अगदी उत्तररामचरितात भवभूतीनेही राम आणि सीतेच्या रात्रभर चालणार्या गप्पांचे वर्णन 'अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत' असे करून ठेवले आहे.) या गजालींना, कट्ट्यावरच्या गप्पांना विषयाचे बंधन नसतेच. एकातून एक असे वेगवेगळे विषय कसे निघत जातात ते कळतही नाही. ईस्ट कोस्टमधला बर्फ आणि व्हाईट ख्रिसमस, सध्याची अर्थव्यवस्था, मिपावरचं लेखन, क्रिकेट, ब्लॉग्ज, राजकारण - एक ना दोन. पिडांकाकांच्या अधूनमधून येणार्या मार्मिक, हजरजबाबी टिप्पण्यांमुळेही धमाल आली. फार दिवसांनी, मालवणीतूनही प्रत्यक्ष गप्पा मारता आल्या :). खाणं हा तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. तुडुंब भरलेल्या पोटावर आप्पाच्या खिचडीपासून ते समर्थपर्यंत, कवळ्यातल्या मासळीच्या जेवणापासून ते ९९ रँचमधल्या ट्राऊटपर्यंत मग सगळी खाद्ययात्रेची उजळणी झाली. बोलण्याच्या नादात रात्रीचे साडेअकरा वाजले, तेव्हा भाग्यश्री आणि निनाद यांनी निरोप घेतला.
त्या रात्री मग काकांच्या घरीच मुक्काम केला. दुसर्या दिवशीही छानपैकी उपमा, रव्याच्या वड्या, बेसनाचे लाडू असा दणदणीत नाश्ता करत सकाळी कालच्या गप्पा कमी पडल्या की काय, म्हणून अजून निवांत दोन-तीन तास गप्पा झाल्या. शेवटी मग सॅन डिएगोपर्यंत पुन्हा परत जायचे असल्याने पिडांकाका-काकूंचा निरोप घेतला.
या कट्ट्यात 'घाटावरचे भट' अर्थात मयंक हा उत्तम शास्त्रीय संगीत गातो ही माहिती जरी समजली असली, तरी त्याचे गाणे ऐकण्याचा योग मात्र गजालींच्या नादात आला नाही. पण बिचार्याने परतीच्या प्रवासात माझ्या अज्ञानमूलक प्रश्नांना अगदी शांत, सखोल उत्तरे दिली. यमन आणि यमनकल्याणातला शुद्ध मध्यमाचा फरक काय किंवा मालकंसापासून कौशिकानड्यापर्यंत अनेक रागांची प्रवृत्ती, त्यातल्या बंदिशी /चिजा यांची माहिती काय -हे सारे उत्तमपैकी समजावून सांगितले. पुढचा द.कॅ.मि.कट्टा सॅन डिएगोत किंवा एल. ए. मध्ये जेव्हा होईल, तेव्हा त्याचे गाणे ऐकण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. भारतातून इथे आलेले किंवा इतर राज्यांतले मिपाकर तेव्हा येऊ शकले तर दुधात साखरच. (खरं तर एक अखिल कॅलिफोर्निया मिसळपाव कट्टा करण्याचाही मानस आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जर कॅलिफोर्नियात संमेलन भरवते, तर अखिल कॅलिफोर्निया मिपाकरांनी मागे का रहावे? :).)
अगदी परफेक्ट होस्ट म्हणावे अशा पिडांकाका-काकूंचे आणि ज्या मिपामुळे काही महिन्यांपूर्वी एकमेकांना अजिबात न ओळखणारी आम्ही काही मंडळी परवा काही वेळ एकत्र आलो, गप्पा मारल्या, काही काळ आनंदात घालवला त्या मिपाचे आभार मानणे औपचारिक होईल. पण इथल्या ह्या पहिल्यावहिल्या कट्ट्याचे श्रेय त्यांनाच!
प्रतिक्रिया
11 Nov 2008 - 7:14 pm | आनंदयात्री
नंदन अभिनंदन !!
वृत्तांत मस्त !!
मोठ्या माणसांचे दर्शन झाले :) भरुन पावलो !!
11 Nov 2008 - 7:15 pm | आनंदयात्री
पिडाकाका कोणत्या मराठी नटासारखे दिसतात बॉ ??
:?
11 Nov 2008 - 7:22 pm | टारझन
पिडाकाका कोणत्या मराठी नटासारखे दिसतात बॉ ??
अगं बाई अरेच्चा मधला संजय नार्वेकरला स्कुटरवर लिफ्ट देणारा तर नाही ना महाराजा ?
बाकी जेवणाचं टेबल पाहून अंमळ अंमळ लाळ गळाली हो ... लै लै लै ... घाटावरचा भट प्रत्येक फोटूत येगळा दिसतो ...
पिडा काकांना साष्टांग णमस्कार्स
- पिवळा खविस
11 Nov 2008 - 8:21 pm | गणा मास्तर
आयला डिट्टो विनय येडेकर
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
11 Nov 2008 - 8:25 pm | आनंदयात्री
नायरे .. विनय येडेकर नाय .. तो कायतारीच आहे.
पिडा म्हणजे अट्टल राजकारणी किंवा साखर कारखान्याचे चेअरमन वाटतात.
अनंत जोग पण म्हणता येणार नाही .. डोळे घारे नाहीत.
11 Nov 2008 - 8:25 pm | बिपिन कार्यकर्ते
डेव्हिड धवन???
बिपिन कार्यकर्ते
11 Nov 2008 - 8:27 pm | आनंदयात्री
=))
11 Nov 2008 - 7:24 pm | कपिल काळे
मित्रांनो, तोडलत!!
http://kalekapil.blogspot.com/
11 Nov 2008 - 7:31 pm | छोटा डॉन
पिडाकाकांनी स्वतः पुढाकार घेऊन भरवलेला कट्टा अपेक्षेप्रमाणे व नंदनच्या भाषेत मोठ्ठ्या थाटामाटाने पार पडल्याचे पाहुन आनंद झाला.
एकंदरीत कट्टा व वॄत्तांत झक्कास !!!
++++१, सहमत आहे ...
एकदम सौ टके की बात की है नंदनभाय ...
असो. आम्हाला आनंद झाला सर्व वाचुन ...
कट्टाधिपती आणि हिज रॉयल नॉटीनेस श्री. डांबिसकाका यांचे हाबिणंदण !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
11 Nov 2008 - 7:31 pm | यशोधरा
मस्त लिहिला आहेस वृत्तांत नंदन :)
तुला आणि इतर सगळ्या मिपाकरांना भेटून छान वाटले.
पिडांकाकाऽ ऽ ऽ _/\_
11 Nov 2008 - 7:38 pm | सहज
जॉर्जच्या प्रिय विद्यार्थ्याचे, खानदोस्ताचे अर्थात हिज रॉयल नॉटीनेस भारदस्त दर्शन !!
पिडाकाकुंनी केलेला जंगी बेत क्या कहने!!
11 Nov 2008 - 7:49 pm | शिंगाड्या
पिडा काका काकुंनी अगदी मनापासुन केलेला पाहुणचार!
मस्त वाटला..
11 Nov 2008 - 7:49 pm | शिंगाड्या
पिडा काका काकुंनी अगदी मनापासुन केलेला पाहुणचार!
मस्त वाटला..
11 Nov 2008 - 7:51 pm | ऋषिकेश
वा! वा!
तमाम जालावरच्या नावांना लाभलेल्या चेहर्यांच्या दर्शनाने आनंद झाला :)
वृत्तांत तर लै भारी!... वृतांत देण्याची इष्टाईल आवडली :)
टारोबाशी सहमत.. फक्त "अंमळ" हा शब्द "जरा जास्तच" असा वाचावा. पिडाकाकुंचा बेत मस्तच होता :)
पिडाकाकांच्या एकूण व्यवस्थेबद्दल अभिनंदन :)
- ऋषिकेश
11 Nov 2008 - 8:06 pm | शितल
कट्टा वृत्तां त आणि फोटो मस्तच.
आमचा कट्ट्याचा वृत्त्तांत ही येईल आज असे वाटते. :)
11 Nov 2008 - 8:16 pm | मुक्तसुनीत
हपिसात फ्लिकर दिसत नाही त्यामुळे चित्राना दाद यथावकाश देऊच. पण नुसती वर्णने ऐकून खलास झालो आहे. मी तर तिकडे येलोनॉटी म्याकेन्रो आणि नंदनबियाँ बोर्गची फैनल पहायला यायला हवे होते ! आणि हो , भटांना असेतसे सोडलेत हे काही ठीक नाही झाले. हे म्हणजे जास्वंदाबाई जैसिंगपूरकरीण होती न् बैठकीची लावणी झाली नाहीसे झाले की.
बाकी मेन्युचे फोटु पहायचेत ; पण जी वर्णने ऐकली त्यावरून .........पिडाकाकींना शिसानविवि , लाख दुवा , मिलियन कॉम्प्लिमेंट्स. आणि येलोनॉटीबद्दल काय बोलणार ? मालवणी अघळपघळपणा असणारा पण शिष्टपणा नसणारा , "मध्यरात्री नभघुमटाखाली " दिलखुलास गजाली करणारा, आख्खा बार ओपन करणारा , दिलखुलास गप्पा मारणारा डांबिसखान ! भाग्यश्री , भट , नंद्या , लेको गेल्या जन्मी पुण्ये तरी काय काय केली आहेत ?? ;-)
बाय द वे, साक्षात येलोनॉटी यांची बोलती बंद करणारे त्यांचे चिरंजीव नव्हते काय ? ;-)
11 Nov 2008 - 8:24 pm | बिपिन कार्यकर्ते
काय ते फोटू... अंमळ वगैरे काही नाही, चांगली बादलीभर लाळ गळली, तिच्यायला. मस्त धमाल केली आहे. सर्व फेमस मिपाकर 'दिसती कसे आननी' ही उत्कंठा होतीच. दिसले सगळे.
मिसळीच्या फोटोतल्या मिरच्या भारीच दिसताहेत. मस्त....
आणि हिज रॉयल नॉटीनेस पण दणदणीत, वर परत हातात अमृतकुंभ!!!
बिपिन कार्यकर्ते
11 Nov 2008 - 8:48 pm | एकलव्य
आम्हालाही मैफिलीत सामील झाल्यासारखे वाटले.
छायाचित्रे, वर्णन आणि पिडांकाकूंची तयारी सारेच अगदी झोकात!!
- एकलव्य
11 Nov 2008 - 8:53 pm | रेवती
तुमचा कट्टा भारीच झालेला दिसतोय.
पिडाकाकूंच्या पाककौशल्याबद्दल बोलायलाच नको.:)
आमचाही कट्टा झाला त्याच दिवशी. कसा झाला ते प्राजु लिहितीये.
तीला प्रश्न पडला असेल की मुलांच्या दंग्याचं आणि पसार्याचं वर्णन कसं टाळावं.;)
आमचे चिरंजीव आघाडीवर होते हे सांगायला नकोच (कोण म्हणतं यशराज खूप दंगा करतो?)
पिडाकाकांचा फोन आल्यावर मी त्यांच्याशी बोलले पण त्यांनी ओळखले नाही हो मला.
( मला फोनवर रंगाशेट म्हणाले तेच राहून राहून आठवतयं.).:(
रेवती
11 Nov 2008 - 9:02 pm | प्राजु
कट्ट्याच्या मेनूचे फोटो मस्तच.
पिडा काकूना खास निरोप असा कि, खास तुमच्या हातचं बटर चिकन खाण्यासाठी मी तिकडे नक्की येईन.
एक घोळ झाला.. नेहमीप्रमाणेच, पिडा काकांबद्दल मी जसा विचार करत होते.. त्यापेक्षा ते जरा 'भारी" निघाले. मला वाटलं होतं.."बारिक शरिरयष्टी, नाकावर सोनेरी चष्मा आणि डोक्याची अर्धी चांदी झालेली" असे असतील काका.
बट काका, यू आर टू यंग!!!!!!!!!! :) पण तरीही माझे काकाच तुम्ही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Nov 2008 - 9:34 pm | भाग्यश्री
अगदी सेम!! :) काकांना काका कसं म्हणावं असा प्रश्न पडला.. सगळी चुक तुझी आहे असंही काकांनी आम्हाला सांगितलं.. :)
कट्टा सह्ह्हीच झाला.. खाणं-पिणं,गप्पा गॉसिपिंग ;) ... फुल्ल टू धमाल!
नंदन मस्त लिहीला वृत्तांत..!
http://bhagyashreee.blogspot.com/
11 Nov 2008 - 9:05 pm | रामदास
अस्सा गुलाबी रंग चेहेर्यावर .(फक्त स्कॉच आणि स्कॉचच)
कट्टेकरांचं अभिनंदन.
11 Nov 2008 - 9:12 pm | सुनील
जळवा जळवा लेको. नरकात जाल सगळे!
(नाडी परीक्षक) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Nov 2008 - 1:42 pm | राघव
असेच म्हणतो...
मी प्राजुताईंचे कट्टावर्णन आधी वाचले.. त्यातच अर्धा खल्लास झालेलो... अन् इथे संपूर्ण!! अर्थात् आपण शाकाहारी.. अन् हार्डड्रिंक्सही घेत नाही... पण तरिही जळजळ होतेच की राव :( सगळे दोस्त एकत्र भेटणे हेच कारण पुरेसे आहे त्यासाठी!!
स्वगतः पुण्यात मिपा कट्टा व्हायलाच हवा आता. :W
मुमुक्षु
11 Nov 2008 - 9:23 pm | ऍडीजोशी (not verified)
हाबिणंदण !!!
हाबिणंदण !!!
हाबिणंदण !!!
11 Nov 2008 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नंदन साहेब,
कट्टा वृत्तांत झकास..पिडासाहेब, घाटावरचे भट, नंदन, निनाद भाग्यश्री आपल्या सर्वांच्या दर्शनाने आम्हालाही आनंद झाला :)
-दिलीप बिरुटे
13 Nov 2008 - 8:56 am | चित्रा
असेच म्हणते!
छानच वृत्तांत.
11 Nov 2008 - 10:24 pm | लिखाळ
अरे वा ! थाटात आणि पोटभर कट्टा झालेला दिसतोय :)
सर्वांना भेटून आणि वृत्तांत वाचून मजा आली.
असेच सर्वत्र कट्टे होवोत ! :)
-- लिखाळ.
11 Nov 2008 - 11:15 pm | चतुरंग
पहिल्याच चित्रात काकांची डांबीस छबी हातात रीगलचा अख्खा खंबा धरुन बघताच भरुन पावलो! (आणि अंमळ चक्रावलोसुद्धा कारण माझ्या डोक्यातल्या चित्राशी काकांचं हे रुप अंमळ विसंगतच आहे. )
पिडाकाकूंच्या पाककौशल्याबद्दल काय बोलावे? जेवणाच्या मेजावरची एवढी रेलचेल बघून खात्रीच पटली की त्यांचे घर हे सुगरणीचे घरटे आहे (मुख्य फरक एवढाच असावा की इथे सुगरण 'ती' आहे एरवी 'तो' सुगरण असतो!!;))
घाटावरचे भट, नंदन, श्री व सौ. भाग्यश्री ह्यांना सदेह बघून धन्य झालो!
(काकू आणि ज्यु.डांबीस ह्यांच्या छबी न दिल्याने पिडाकाकांचा निषेध!)
नंदन वृत्तांत छानच झालाय रे! :)
(खुद के साथ बातां : रंगा, पिडाकाकांकडे 'बघता' तुझे फोटो साईडने काढायला काहीच हरकत नसावी! B) )
चतुरंग
11 Nov 2008 - 11:27 pm | टारझन
रंगा, पिडाकाकांकडे 'बघता' तुझे फोटो साईडने काढायला काहीच हरकत नसावी!
=)) =)) =))
णाकात पुलावाचा भात गेला न भो .. केवढा ठसका प्लस हसण्याचा लोंढा आला ...
आडवा फोटू काढू शकणार्यांचा एक क्लब स्थापन व्हावा ...
13 Nov 2008 - 10:03 pm | संजय अभ्यंकर
सहमत!
पिडां साहेबांच्या प्रकृतीवरून खात्री पटते!
चिअर्स!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
12 Nov 2008 - 12:08 am | विसोबा खेचर
क्या बात है, क्या बात है..!
सुंदर, सुरेख वृत्तांत आणि फोटू..!
पिडां तर लैच स्मार्ट दिसतो आहे.. बाय द वे, माझ्या चरणी वाहिलेली शिवास रिगल पावली बर्र का मला! :)
तात्या.
13 Nov 2008 - 10:01 am | चन्द्रशेखर गोखले
आवशिक खाउ वरान, फ्टकीची मासली खय दिसाक नाय ती जेवनात....! कसलेरे माल्वणी तुम्ही... अरे सगुती तरी बनवायचीत....? बाकी मस्त हां .. एकदम इंटरनाशनल.......!!!!!!!
13 Nov 2008 - 10:31 am | मनस्वी
+१
मस्त!
13 Nov 2008 - 11:08 am | केवळ_विशेष
सर्व फेमस मिपाकर 'दिसती कसे आननी' ही उत्कंठा होतीच
लैच भारी झालेला दिसतोय बॉ...:)
13 Nov 2008 - 1:20 pm | स्वाती दिनेश
नंदन,वृतांत लय भारी ,कट्टाही जोरदार झालेला दिसतोय.. मजा आली वाचून.. एका दिवशी दोन दोन कट्टे!!
स्वाती
13 Nov 2008 - 6:42 pm | घाटावरचे भट
मस्त वृत्तांत नंदनराव (हो, आम्हाला आज वाचायला मिळाला. धन्य तो मिपाचा सेवाप्रदाता). ह्या कट्ट्याच्या आठवणी मनात बरेच दिवस रेंगाळत राहातील.
13 Nov 2008 - 7:46 pm | मदनबाण
पिडा काकांनी जबरा पोझ दिली आहे!!!
या वृतांता बद्दल नंदन भाऊ आपले आभार !!! :)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
14 Nov 2008 - 12:58 am | पिवळा डांबिस
सर्वप्रथम या कट्ट्याला आलेल्या नंदन, मयंक, भाग्यश्री आणि निनाद यांचे मनापासून आभार!!
वेळात वेळ काढून कट्ट्याचा वृत्तांत लिहिल्याबद्दल नंदनचे विशेष आभार मानायचे होते, पण तो असा औपचारिकपणा दाखवल्याबद्दल माझ्या कानाखाली आवाज काढेल म्हणून ते करत नाही....
काल प्रतिसाद देण्यासाठी मिपावर येण्याचा (निष्फळ) प्रयत्न केला. साईट ओपनच होईना!! मनात दोन शंका.....
१. पाठवलेली बाटली त्या तात्याने ताबडतोबच उघडलेली दिसतेय!! आणि त्या नादात मग सर्व्हरची ऐशी की तैशी केलेली दिसतेय!!
२. आपल्या मिपावरच्या काही संगणक अतिविशारदांनी आमचं खातं ब्लॉक केलं की काय? ("कट्टे भरवताय काय साल्यो, बघतोच तुम्हाला!!!")
दिवस अतिभयाण गेला. अहो उपक्रम आणि नमोगत व्यवस्थित उघडतायत आणि मिपा मात्र उघडत नाही असं दिसलं की काय काय शंका मनात येतात!!! जगबुडीच की हो ती!! मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काही खोटं नाही.....
आज आता मिपा उघडलं (अर्थातच ऑफिसातून!!) तेंव्हा कुठे जिवाला बरं वाटलं.....
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं.....
मिसळीच्या फोटोतल्या मिरच्या भारीच दिसताहेत. मस्त....
बिपिनराव, त्यांना हालापिन्यो (उच्चारी आलापिन्यो) मिरच्या म्हणतात. बिया काढून खाल्या तर एकदम नरम, पण जर चुकुन बी चावली गेलीच तर एकदम आगजाळ!!!
मालवणी अघळपघळपणा असणारा पण शिष्टपणा नसणारा , "मध्यरात्री नभघुमटाखाली " दिलखुलास गजाली करणारा, आख्खा बार ओपन करणारा , दिलखुलास गप्पा मारणारा डांबिसखान !
बस्स मुक्तसुनीतराव, भरून पावलो!!!
आपल्याला उभ्या आयुष्यात इतका चांगला काँप्लीमेंट कुणी दिला नव्हता!! मिपाकरांनो, आजपासून मुसुराव आमचे जानी दोस्त!! कुणी त्यांच्या खोड्या काढाल तर त्यांच्या विद्वत्ताप्रचुर (मुलुख मैदान) आणि आमच्या शिवराळ (लांडा कसाब) अशा दोन तोफांना तोंड द्यावं लागेल!!!:)
बाय द वे, साक्षात येलोनॉटी यांची बोलती बंद करणारे त्यांचे चिरंजीव नव्हते काय ?
होते, पण नंदनने त्यांना त्यांच्या आवडीचा फुटबॉल भेट दिल्यामुळे ते आमच्यात दंगा करत नव्हते....
नेहमीप्रमाणेच, पिडा काकांबद्दल मी जसा विचार करत होते.. त्यापेक्षा ते जरा 'भारी" निघाले. मला वाटलं होतं.."बारिक शरिरयष्टी, नाकावर सोनेरी चष्मा आणि डोक्याची अर्धी चांदी झालेली" असे असतील काका.
बरं झालं!!! प्राजु, तुला सांगितलं कोणी होतं असल्या येडचाप कल्पना करायला?:)
बट काका, यू आर टू यंग!!!!!!!!!! पण तरीही माझे काकाच तुम्ही...
होग्गं माझी शाणी शोनी पुतणी ती!!! (इथे एक करकच्चून शाब्दिक गालगुच्चा!!)
तुझा मी काकाच बरं!!!
पिडाकाकांचा फोन आल्यावर मी त्यांच्याशी बोलले पण त्यांनी ओळखले नाही हो मला.
( मला फोनवर रंगाशेट म्हणाले तेच राहून राहून आठवतयं.).
अहो तसं नाही रेवतीताई, मला रंगाने मेसेजमध्ये फक्त फोन नंबर ठेवला, मला वाटलं की तो त्याचा सेल नंबर असेल. फोन रिटर्न केला तर तो तुम्ही उचललात!! आता मला तुमचं आणि या रंग्याचं गोड गुपित काय म्हायती? त्यामुळे थोडासा गोंधळ झाला इतकंच!! तुम्हाला मी रंगा कसं बरं समजीन?
(खुद के साथ बातां: त्याचे वेगळे स्वतंत्र उधळलेले गुण रोज दिसतायतच की!!!):)
अस्सा गुलाबी रंग चेहेर्यावर .(फक्त स्कॉच आणि स्कॉचच)
रामदासजी, मात्र तो रंग स्कॉच पिण्यापूर्वीचा आहे हो!! फोटोत बघा, अहो बाटली उघडायची आहे अजून!! ओन्ली शिवास!!
(अवांतरः स्कॉच घेतल्यावर पिवळा डांबिस "तांबडा" होतो!!)
पिडा म्हणजे अट्टल राजकारणी किंवा साखर कारखान्याचे चेअरमन वाटतात.
अनंत जोग पण म्हणता येणार नाही .. डोळे घारे नाहीत.
नाय रे बाबा, आमी कसले राजकारणी!!
आणि डोळे खरंच घारे नाहीत, हिरवे आहेत...
बाय द वे, माझ्या चरणी वाहिलेली शिवास रिगल पावली बर्र का मला!
चला तात्या, ते बरं झालं!! मला वाटलं की कस्टम्सवाले उडवतात की काय मधल्यामधे!!!
आवशिक खाउ वरान, फ्टकीची मासली खय दिसाक नाय ती जेवनात....! कसलेरे माल्वणी तुम्ही... अरे सगुती तरी बनवायचीत....?
अरे तसां नाय, पण मासळी आणल्यावर तेची तिर्फळां घालून लालभडक आमटी करांक नको? आणि मग आमटी तिखट, मिसळ तिखट मगे ह्या पोरांका हगरड लागली नस्ती काय? आणि पुना मासळीबरोबर सोलाची कढी करूचीच लागतां. मग तो बेत श्रीखंडपुरीबरोबर बरो दिसणां नाय....
हो मालवणी कट्टो नाय होतो, मिपाचो कट्टो होतो....
अर्थात् आपण शाकाहारी.. अन् हार्डड्रिंक्सही घेत नाही...
जेवणाचा ८०% मेन्यू शाकाहारी होता हां!!!! आणि आणलेली सॉफ्ट ड्रींक्स् कमी पडतील की काय म्हणून काकूने भाग्यश्रीसाठी मुद्दाम पीच ची नॉन अल्कोहोलिक स्पार्कलिंग वाईनही आणली होती.
तेंव्हा आमच्या पुढल्या कट्ट्याला निशं:कपणे या, आपली सर्व व्यवस्था करू!!!
पिडाकाकांकडे 'बघता' तुझे फोटो साईडने काढायला काहीच हरकत नसावी!
हे बघ रंगा, जगणार्याने जगत जावे, लोकं फोटो कुठुन काढणार त्याची चिंता करण्यात वेळ घालवू नये!! आपण आपल्या आयुष्यात (आणि संसारात!) जर संतुष्ट असू तर बाकीचे लोक काय म्हणतात याला काय किंमत आहे?:) महात्मा गांधी चिंता करत होते का की कुठल्या ऍन्गलने फोटो काढल्यावर त्यांच्या बरगड्या कमीतकमी दिसतील? त्याचाच व्यत्यास करायचा!!!!:)
असो. सर्व मंडळींचे पुन्हा मनःपूर्वक आभार!
असाच लोभ ठेवा!!
आपला,
पिवळा डांबिस
14 Nov 2008 - 9:48 am | विसोबा खेचर
अहो उपक्रम आणि नमोगत व्यवस्थित उघडतायत आणि मिपा मात्र उघडत नाही असं दिसलं की काय काय शंका मनात येतात!!! जगबुडीच की हो ती!! मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काही खोटं नाही.....
हा हा हा!
खरं आहे रे डांबिसा.. साले हे मनोगती तसेही तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले आहेत. ते जेव्हा काहितरी तांत्रिक क्लुप्त्या वापरून मिपा साफ बंद पाडतील तेव्हाच सुखाने श्वास घेतील! :)
आपला,
(डोईजड!) तात्या. :)
14 Nov 2008 - 3:15 pm | जैनाचं कार्ट (not verified)
ह्याची काळजी नको तात्या !
निलकांत आहे... व निलकांतचे मित्रमंडळ देखील आहे समाचार घेण्यासाठी !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
14 Nov 2008 - 2:15 pm | भाग्यश्री
हो, त्या पीच फ्लेवर्ड वाईनबद्द्ल सांगायचंच राहीलं!! अप्रतिम होती! स्कॉचही असावी... निनाद भलताच खुष झाला कट्ट्याला येऊन.. त्या अर्थी स्कॉच मस्तच असेल.. :) कारण जेवण अप्रतिम होतंच ! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
14 Nov 2008 - 8:46 pm | रेवती
कोणते पदार्थ शिकलीस काकूंकडून ते सांग ना.
रेवती
14 Nov 2008 - 10:46 pm | भाग्यश्री
शिकतीय कसली! आधी गप्पा, आणि नंतर जेवण इतका मस्त प्लॅन असताना तिथून उठून काही शिकून घेणं वगैरे अवघड होतं.. :) आता मात्र काकूंचं शिष्यत्व पत्करायला हवं ! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
15 Nov 2008 - 7:56 am | अघळ पघळ
अय्या भाग्यश्री, मला किनई वाईन फक्त ग्रेप्सचीच बनवतात असं वाटायचं. ही पिचची वाईन देखिल ट्राय केली पाहिजे हा आता ;) ह घ्या.
15 Nov 2008 - 7:54 am | अघळ पघळ
डांबीसाचा फोटू बघून 'अब्दुल खान' हे व्यक्तिचित्र काल्पनीक नसुन खरे आहे ह्याची आता खात्री पटली..पण मग तो सुलेश कोण हो डांबीस काका?;)
15 Nov 2008 - 10:22 am | पिवळा डांबिस
त्यातले अब्दुलखान आणि सुलेश हे दोघेही काल्पनिक आहेत......
15 Nov 2008 - 10:20 am | पिवळा डांबिस
अभिप्राय दोन वेळा प्रकाशित झालाय!!१