मराठी शाळांतील घटती पटसंख्या हा कोण्या चर्चेचा विषय होऊ शकतो असे आम्हास बिलकुल वाटत नाही. किंबहुना त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे असाच विचार आमच्या मनात येतो.
तसे पाहता मराठी ही फार प्राचीन भाषा आहे. कित्येक मराठी भाषाकोविदांप्रमाणे संस्कृत पश्चात जी भाषा जन्मास आली ती मराठीच. यापेक्षा पुढे जाऊन काही (अतिरेकी) मराठी प्रेमी मराठी ही अश्मयुगीन कालखंडापासून असल्याचे पुरावे देखील सादर करू शकतील. (सध्या तर या अशाच अतिरेक्यांचे पेव फुटलेले दिसते. कालांतराने ही मंडळी मंडळांतून फुटतात किंवा यांना कोणीतरी हातापायाने फोडते ती गोष्ट वेगळी). असो....
तर मुद्दा आहे मराठी शाळांतील घटती पटसंख्या. मराठ्यांवर इंग्रजांचे आक्रमण झाले, नंतर ते संपूर्ण भारतावर राज्य करत टिच्चून उभे राहिले. अशाच प्रकारे मावशी मायबोलीवर आक्रमण करत्येय. त्याने घाबरून जावयाचे काय कारण? उभ्या भारतावर राज्य करून इंग्रज शेवटी कंटाळून निघून गेले कारण त्यांना आपल्यामधील त्याच त्याच भांडणांचा कंटाळा आलेला, इतकी साधी गोष्ट. ते काही महात्माजींनी "चले जाव" म्हटले आणि अगदी आज्ञाधारकपणे ते निघून गेले, किंवा त्या हिटलराने चर्चिल च्या पुढ्यात असंख्य बॉम्ब फोडुन त्यास जेरीस आणले आणि त्यांची भारतावरची पकड ढिल्ली झाली, हा अगदीच चुकीचा इतिहास आहे. (इतके बॉम्ब फोडल्यावरही चर्चिल फुटला नाही म्हणून हिटलर ने स्वतःच्या पिस्तूलाने त्याचे डोके फोडून घेतले हे मात्र निर्विवाद सत्य).
अंतिम सत्य हेच की इंग्रजांना आपल्या घरातले तंटे मिटवता आले नाहीत तेव्हा ते नैराश्याच्या शिकारीस बळी पडून हिंदोस्तां सोडून गेले. हिंदू मुसलमान भांडणे, ब्राह्मण दलित भांडणे, पोलीस गुंड भांडणे, प्रांताप्रांतात भांडणे, घराघरांत भांडणे, गावागावांत भांडणे, भावाभावांत भांडणे, बांधाबांधाची भांडणे त्यांना शेवटपर्यंत मिटवता आली नाहीत. ईंग्रज त्यांनाच कंटाळून गेलेत. आमची ही भांडणे ते गेल्यावरही चालूच आहेत आणि ती आहेत म्हणून आमच्या दैनंदिन जीवनात मजा आहे. ती त्या बावळट आंग्लन्ना समजलीच नाहीत. असे आपण सगळे.
त्यातही मराठी माणसाचं वैशिष्टय म्हणजे त्याचा ताठ कणा, न वाकणारा. एका ऐकीव घटनेनुसार दोन मल्याळी कुटुंबे महाराष्ट्रात मराठी शिकले पण त्यांच्या शेजारच्या मराठी गड्यांना शेवटपर्यंत अम्मा, निरु, आणि आँ या (सर्वप्रांतीय) प्रश्नार्थक अव्ययापलिकडे कणभर प्रगती झाली नाही. आता ईतकी कठोर व मायबोलीवर प्रेम असणारी, कधीही कोणत्याही भाषेचा प्रभाव स्वतःवर पडू न देणारी माणसे असताना मराठी वर परिणाम होईलच कसा? मायबोलीवर इंग्रजीच होणारं आक्रमण आणि मराठीचा कमी होणारा टक्का या केवळ वल्गनाच ठरतात. ही इतरत्र फिरणारी पाखरे फिरून फिरून आपल्याच घरट्यात येणार याबद्दल आम्हांस पूर्ण छप्पन्न इंच छातीठोक खात्री आहे.
इंग्रजी शाळांत होणारी अपत्याची फरपट सोबतीला आईबापाची फरपट म्हणजे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याच्या अगदी उलटा प्रकार पाहिल्याचा अतीव आनंद तुम्हास शब्दांत सांगता यावयाचा नाही. येथे नळ्यामुळे पुरा गाडा बिघडला जातो. बरे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा व्हावा असेही दिसत नाही. येथे सर्वांनाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून पहावयाचे आहे. बरे इतुके शिकून दिवे लावून हे दिवे पुढे गेल्यावर इतके दिवे लावतात की मायबापाचे डोळे दिपून जातात.
A फॉर apple शिकणाऱ्या पोरांबद्दल मात्र माझ्या मनात फार कळवळा आहे. ते लहान असताना ज्याच्या फोडी चघळत यांस Apple म्हणतात असे ज्ञान घेते, त्यास त्याचे आजी आजोबा सफरचंद म्हणतात, त्याची आई भाव करतांना बाजारात " भैय्या, आधा किलो सेब के साठ देगी, उपर कुछ भी नही।" अशी कचा कचा भांडते तेव्हा त्याचं मन हे निराशेत बुडतं. नक्की बरोबर काय? Apple सफरचंद की सेब! त्याला आता सगळंच unsafe वाटायला लागतं आणि मग शेवटी तो दिवा लावून दाखवतो, याचं कारण त्याला मागच्या १०-१२ वर्षांच्या असल्या अभूतपूर्व ज्ञान प्राप्तीचा बदला घ्यायचा असतो.
त्या तुलनेने मराठी शाळा पहा. त्यातही सरकारी मराठी शाळा तर फार सुंदर! तिथे शक्य झाले तरच दर इयत्तेस नवीन शिक्षक मिळतो. त्यामुळे गुरू शिष्य संवाद सलग चार इयत्ता तरी असतोच असतो. महान गुरुकुल परंपरांच्या या शाखा पाहून ऊर भरून येतो. यात गुरुवर्यांच्या मुखातून बाहेर पडनारे शब्द शिष्य अगदी जसेच्या तसे मुखोद्गत करतात. या मौलिक ज्ञान प्राप्तीवर आक्षेप घ्यायला ना त्यांच्या आईला वेळ असतो ना त्यांच्या बापाला. (वेळ असता तर ती कार्टी सरकारी शाळांत कशाला शिकली असती?)
आजही कित्येक सरकारी शाळांत बसायला भूमातेवरच आसने असतात. भविष्यातील गुढगेदुखी त्यामुळे कमी होते हा त्यामागचा निष्कर्ष आम्हास कोणीतरी ऐकवलेला. बरेचदा वर्गात न राहणारे, न शिकवणारे किंवा निद्रादेवीच्या आराधनेत मग्न गुरुवर्यांमुळे स्वयंभू शिक्षणाचा पाया पक्का होतो याबद्दल आम्हास पूर्ण खात्री आहे.
छपरांशीवाय शाळांत आकाशस्थ तारे दिवसा पाहता येतांत. सोबतच कित्येक गावांतल्या शाळभिंतींशीवाय आहेत, तिथे शांतिनिकेतनचे वर्ग भरतात.
खाजगी शाळांत एका आचार्यकडून सांभाळता न येऊ शकणारी पट्टशिष्यांची संख्या असते तर सरकारी शाळांत हर गुरूंस हर शिष्याबद्दल अचूक आणि खोलवर माहिती असते. कोणाचा बाप गवंडी आहे आणि कोणाचा प्लंबर, आणि त्याचा आपल्या घरातल्या फुटक्या मोरीच्या डागडुजीत कसा वापर करता येईल याची गणिते मनात तयार करत दिवस आरामात निघून जातो.
परंतु तरीही सरकारी शाळांतली मुले शिकतातच, यच्चयावत शिवीगाळ करत पुस्तकांच्या ढीगभर पसाऱ्यात न गुंतता आणि आपल्या गरीब मायबापाबद्दल वाईट वाटून जीवापाड मेहनत करणारे शिष्यगण सरकारी शाळांत असतातच असतात. सातासमुद्रापार देशाचे गुणगान गात जाण्याची धमक ठेवणारे सर्व आंग्ल शाळांतील शेंडेफळे नसतात.
आमच्या सरकारी शाळांतील मुले सर्वांगीण विकसित होतात कारण त्यांच्या शाळेत मैदान असते आणि ते त्यांच्या एकट्याच्या हक्काचे २४ तास उघडे असते. संध्याकाळी शाळा सुटल्याच्या घंटेबरोबर ते बंदही होत नाही आणि कोण्या खाजगी शिकवणीला जावे लागेल असा बोजाही त्यांच्या मनावर नसतो.
मावशीच्या शाळेत ज्या प्राण्याला Bitch म्हणतात, त्याला सरकारी शाळांत कुत्री म्हणतात एवढाच काय तो फरक. आणि लोकलच्या प्रवासात bitch म्हणणाऱ्या (?)सदगृहिणीस कुत्री म्हणणारी कोळीण भारीच पडते हे गमक ज्याला कळेलना तोही माझ्यासारखाच निर्धास्त होईल, मराठी शाळांच्या घटत्या पटसंख्येबाबतीत......
प्रतिक्रिया
7 Dec 2017 - 8:12 am | nishapari
चांगलं लिहिलं आहे पण या सगळ्यातून तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं, नेमका काय मुद्दा मांडायचा होता तेच समजलेलं नाही .
7 Dec 2017 - 8:33 am | nishapari
इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही काळाची गरज आहे . मराठी भाषा कितीही सुंदर , श्रीमंत , अमृतासही पैजेत जिंकणारी वगैरे असली तरी व्यवस्थित इंग्रजी बोलता , लिहिता , वाचता येत नसेल तर उच्चशिक्षण , करिअर , नोकरी चा मार्ग कठीण होतो हे साधं स्वच्छ सत्य आहे ... कटू असलं तरी ... इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना मातृभाषाही व्यवस्थित समजावी - बोलता यावी ही पालकांची जबाबदारी असते ... माझ्या आतेबहिणीची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत .. आता ती 16 - 18 वर्षांची आहेत . चौथी पाचवीत मुलांना मराठी शब्द समजत नाहीयेत , नीट मराठी वाचता येत नाहीये हे लक्षात येताच माझी ताई आणि तिच्या मिस्टरांनी जाणीवपूर्वक मुलांना मराठी पुस्तकांची गोडी लावली ... आता ही मुलं गो.नी. दांडेकरांच्या कादंबरीमय शिवकाल सारख्या जड मराठीतली पुस्तकंही आवडीने वाचतात . आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकंही आरामात वाचू शकतात , फ्लूएंटली इंग्रजी बोलू शकतात . मी 21 वर्षाची आहे , माझं शिक्षण चौथीपर्यंत मराठी , दहावी पर्यंत सेमी इंग्रजी आणि पुढे इंग्रजी माध्यमातून झालं . मला इंग्रजी बोलता येत नाही . आणि ज्या काठिण्य पातळीची इंग्रजी पुस्तकं माझा भाचा आणि भाची वाचू शकतात तीही मी वाचू शकता नाही . गेली चारपाच वर्षे माझी इंग्रजी सुधारण्यासाठी मी प्रयत्न करत आहे व त्यात मला बऱ्यापैकी यशही मिळत आहे . अजून एक दोन वर्षात मी इंग्रजी व्यवस्थित बोलू वाचू शकेन असा आत्मविश्वास वाटतो . पण जर माझ्या आईवडिलांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं असतं तर एवढे प्रयत्न करावे लागले नसते व आज मी सहज इंग्रजी बोलू , वाचू , समजू शकले असते हे नक्की ..... ह्या विचाराने काही फारसा खेद होत नाही पण क्वचित हा विचार मनात तरळून जातो हे मात्र खरं .
13 Dec 2017 - 12:38 am | थॉर माणूस
माझे शिक्षण दहावीपर्यंत मराठी आणि त्यापुढे अर्थात इंग्रजी माध्यमातून झाले. अजूनपर्यंत कसलेही नुकसान झालेले नाही. परदेशवार्यांमधे क्लायंट्स अनेकदा "तुमचे इंग्रजी उत्तम आहे, आणि उच्चारसुद्धा सहज समजतात" असे स्वतःहून म्हणालेत म्हणजे इंग्रजीसुद्धा बर्यापैकीच असावी (गंमत म्हणून ielts च्या मॉक टेस्ट दिलेल्या, ९ पैकी ८-८.५ सरासरी रेटींग आले होते.)
मुलांना भाषाच काय कुठल्याही विषयाचे ज्ञान व्यवस्थीत मिळावे ही पालकांची जबाबदारी असते. त्यामूळे जर इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी नीट समजावी म्हणून प्रयत्न करता येत असतील तर मराठी माध्यमातील मुलांना इंग्रजी नीट समजावी म्हणून प्रयत्न करणे अशक्य नसावे.
7 Dec 2017 - 8:56 am | babu b
संघाने आता गुरुकुल सुरु करण्याचे मनावर घ्यावे.
7 Dec 2017 - 8:58 am | nishapari
आपल्याच वयाची किंवा लहान वयाची मुले अस्खलित इंग्रजी बोलत आहेत आणि आपण मात्र तशी बोलू शकत नाही या विचाराने खूप कमीपणाची भावना जाणवते ... केवळ पालकांच्या मराठीच्या अट्टाहासर्वपोटी मुलांवर ह्या न्यूनगंडाला सामोरे जायची वेळ येऊ नये असं मला वाटतं . मातृभाषा नीट बोलता लिहिता येण्यासाठी 10 वर्षे मातृभाषेच्या माध्यमाच्या शाळेत काढायची निश्चितच गरज नसते ... पालक सहज मुलांना मातृभाषा व्यवस्थित शिकवू शकतात . अर्थात सुमार इंग्रजी शाळेत घालून आणि घरीही मराठीकडे लक्ष न देऊन ना धड मराठी ना धड इंग्रजी अशी मुलांची धेडगुजरी अवस्था करण्यापेक्षा सरळ मराठी शाळाच बरी त्यातून मुलांचे अन्य विषयांचे ज्ञान तरी पक्के होईल ..... पण चांगल्या दर्जाची इंग्रजी शाळा उपलब्ध असेल तर मुलांना तिथे घालणेच श्रेयस्कर . हे ज्यांच्या मुलांना कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी , करिअर , बिजनेस वगैरे करायचा आहे , उच्चशिक्षण घ्यायचे आहे , पुढेमागे परदेशी जायचे आहे किंवा मायदेशातच उत्तम पगाराची नोकरी मिळवायची आहे त्यांच्याकरता आहे . इंग्रजीची मुळीच आवश्यकता पडणार नाही अशीही करिअरची - उद्योगधंद्यांची क्षेत्रे आहेत , त्यांतच मुलाला पाठवायचे असेल तर काही प्रश्न नाही ... पण हा चॉईस करण्याचा अधिकार मुलाकडे असावा असं मला वाटतं ... पुढे मोठेपणी इंग्रजी येत नसल्याने अशा क्षेत्रांपैकी एखाद्या क्षेत्राची निवड करण्याची वेळ मुलावर येऊ नये .
7 Dec 2017 - 9:07 am | शब्दबम्बाळ
हि भावना आजूबाजूला कोणी अस्खलित कानडी, तामिळ, कोकणी, हिंदी इत्यादी भाषा बोलताना ऐकल्या तरी येते कि इंग्रजी स्पेशल केस आहे?
आणि इंग्रजी हि फक्त एक भाषाच आहे मला वाटते, तीही व्यवस्थित शिकवली कि यायला काही हरकत नाही! त्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीमध्ये घेणं "हाच" उपाय आहे का??
शाळांच्या दर्जाबाबत मात्र सहमत!
13 Dec 2017 - 1:10 am | nishapari
बहुतांश मराठी शाळांमध्ये इंग्रजी व्यवस्थित , म्हणजे बोलता येण्याइतपत व्यवस्थित शिकवली जात नाही , आणि सगळेच पालक इंग्रजी बोलू शकत नाही की ते घरी शिकवतील ... त्याउलट बहुतेक सगळे पालक मराठी व्यवस्थित बोलू वाचू लिहू शकतात त्यामुळे ते मुलांना मराठी नीट शिकवू शकतात . आणि शाळेत मुले इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात .
अस्खलित तामिळ , कानडी , कोकणी इत्यादी भाषा बोलणाऱ्यांना पाहून कमी पणाची भावना जाणवत नाही , कारण ती त्यांची मातृभाषा असते . मी माझी मातृभाषा अस्खलित बोलू शकते , ते त्यांची बोलू शकतात , त्यामुळे ते माझ्यापेक्षा सरस ठरत नाहीत . त्याचप्रमाणे इंग्रजी बोलणारा फॉरेनर पाहूनही मला कमीपणाची भावना वाटणार नाही कारण तो त्याची मातृभाषा बोलत असेल त्यात काही ग्रेट नाही . पण स्वतःची मातृभाषा उदा. मराठी / हिंदी / तामिळ + इंग्रजी अशा दोन भाषा येणाऱ्या व्यक्तीसमोर मात्र मला कमीपणाची भावना जाणवेल कारण त्याचा अर्थ मी त्या व्यक्तीपेक्षा कुठेतरी कमी आहे असा असेल .
9 Dec 2017 - 11:30 pm | अँड. हरिदास उंबरकर
माझी बुद्धि कमी पडली.. दोन वेळा लेख वाचला पण 'मूळ' लक्षातच येत नाही..इंगजी येत नाही म्हणुन दुःखः करावे की मराठी नामशेष होते म्हणुन आक्रोश.. हेच समजत नाही..
12 Dec 2017 - 6:20 pm | ss_sameer
निर्धास्तपणे पटवून दिलंय की माय मराठी ची चिंता वाहण्याचे कारण नाही....
साभार....
राहुल
13 Dec 2017 - 12:54 am | थॉर माणूस
सारकॅजम चा टॅग पण टाकायला हवा होता लेखासाठी.
जमलाय. लगे रहो. :)