ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग २)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
4 Jan 2016 - 11:59 am

भाग १
________________________________________________________________________________________
ऑर्फिअसने अट मोडण्याची कारणे आणि ऑर्फिअसच्या कथेचे प्राथमिक आकलन

काही कथा म्हणतात, ऑर्फिअस वेस ओलांडतो आणि मागे बघतो. पण युरीडीसीने वेस ओलांडली नसते. प्लुटो म्हणतो दोघांनी पाताळ लोक सोडून पृथ्वीवर पोहोचायच्या आधी मागे बघितलस, माझी अट मोडली म्हणून युरीडीसीला परत पाताळलोकात यावे लागणार. या कथेप्रमाणे ऑर्फिअस साधाभोळा दिसतो आणि प्लुटो शाब्दिक कसरती करून माणसाला फसवणारा दुष्ट मृत्युदेव दिसतो. यात ऑर्फिअस आणि युरीडीसी दोघंही सहजीवनाची आस असलेले पण नियतीच्या अगम्य चक्रात अडकून देवाकडून फसवले गेलेले प्रेमी जीव दिसतात.

दुसऱ्या एका कथेप्रमाणे अधीर होऊन ऑर्फिअस वेस ओलांडायच्या आधीच मागे बघतो. कारण एकच संयमाचा अभाव. आणि मग अट मोडते. दु:ख्खी युरीडीसी करूण किंकाळी फोडत पुन्हा पाताळलोकात पडते. या कथेप्रमाणे ऑर्फिअस उतावळा, अधीर आणि अविचारी वाटतो. त्याच्या आणि युरीडीसीच्या दु:ख्खाला तोच कारणीभूत ठरतो. प्लुटो केवळ कराराच्या अटी पूर्ण करून घेणारा निर्लिप्त देव ठरतो. युरीडीसी जीवनाकडून दुसऱ्यांदा लाथाडली गेलेली अबला ठरते आणि ऑर्फिअस प्रचंड ताकदीचा पण उतावळा आत्मघातकी संगीतकार ठरतो.

तर तिसऱ्या कथेप्रमाणे वेशीजवळ आल्यावर ऑर्फिअस घाबरतो. त्याला वाटू लागते कि प्लुटोने मला फसवले तर नसेल. मागे युरीडीसी खरंच येतेय की आपण प्लुटोवर विश्वास ठेवून फसवले गेलोय. अश्या विचारांच्या आणि शंका कुशंकांच्या आवर्तात सापडून तो न रहावून वेस ओलांडायच्या आतच मागे वळून बघतो. अट मोडली जाते. करुण किंकाळी फोडून युरीडीसी पाताळलोकात परत जाते. या गोष्टीतही प्लुटो नामा निराळा राहतो, युरीडीसी अबलाच रहाते पण ऑर्फिअस मात्र उतावळा, अधीर, अविचारी न वाटता गोंधळलेला प्रेमी वाटतो. मला वाटते हीच गोष्ट आम्हाला शाळेत इंग्रजीच्या धड्यात होती.

सातवी आठवीच्या वयात येऊ शकणाऱ्या समजूतीप्रमाणे मला आणि माझ्या मित्रांना ऑर्फिअस वेडा वाटला होता. जर फक्त खात्री करायची होती कि युरीडीसी येतेय कि नाही तर मागे कशाला वळून पहायचे ? फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय कि नाही ते. त्यामुळे त्यामुळे ऑर्फिअस चे माझे पहिले आकलन, बावळट आणि डोकं न चालवणारा उतावळा प्रेमिक असेच झाले होते.

मग कुठेतरी वाचताना कळलं की ग्रीक तत्वज्ञ प्लेटो तर ऑर्फिअसला शेपूटघालू आणि सुमार दर्जाचा प्रेमी मानतो. त्याच्या मताप्रमाणे, मेलेल्या युरीडीसीला परत आणायला पाताळलोकात जाणे हाच एक वेडेपणा. जर ऑर्फिअसचे प्रेम उदात्त असते तर युरीडीसीला परत आणण्याऐवजी त्याने स्वत:च मृत्यूला कवटाळले असते. आणि मग पाताळलोकात तो त्याच्या प्रियतमेबरोबर राहू शकला असता. जे स्वत:च्या प्राणाची आहुती देऊ शकते तेच खरे प्रेम असा काहीसा त्यागवादी प्रेमाचा विचार प्लेटो मांडतो. आणि “कयामत से कयामत तक” वाल्या माझ्या किशोर वयीन मनाला ऑर्फिअस अजूनच मूर्ख वाटू लागला.

मग दहावी अकरावीत असताना वाचली ती या गोष्टीची जी एंनी केलेली पुनर्मांडणी. तेंव्हापासून हा ऑर्फिअस खास छळणारा मित्र झालाय.

जी एंचा परिस स्पर्श

'युद्ध, शस्त्रांच्या आधुनिकतेमुळे नाही तर सैनिकाच्या काळजातील शौर्यामुळे जिंकली जातात', अश्या अर्थाचं एक वाक्य आहे. त्याच चालीवर मी म्हणीन की, 'निरर्थक भासणाऱ्या जीवनातील अर्थ आणि सौंदर्य केवळ साहित्यामुळे नाही तर साहित्यिकाच्या सर्वस्पर्शी प्रतिभेमुळे कळू शकतो.' या ऑर्फिअसच्या कथेच्या बाबतीत असंच झालं आहे माझ्यासाठी. परीक्षेसाठी वाचून मत बनवलेल्या आणि प्लेटो साहेबांचे नाव मोठे असल्याने त्यांच्या मतावर विचार न करता टाकलेल्या विश्वासामुळे जी कथा माझ्यासाठी सुमार दर्जाची शोकांतिका होती तिला जी एंच्या सर्वस्पर्शी प्रतिभेने एका अतुलनीय उंचीवर नेवून ठेवले.

क्रमशः ...

कथासाहित्यिकसमाजविचारआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

4 Jan 2016 - 2:04 pm | पद्मावति

वाचतेय. पु.भा.प्र.

पगला गजोधर's picture

4 Jan 2016 - 2:06 pm | पगला गजोधर

लिहीत रहा....वाचयला आवडेल....

सस्नेह's picture

4 Jan 2016 - 3:26 pm | सस्नेह

उत्कंठा ताणली आहे. अजून जीएंची जादू दिसली नाहीये.

अजया's picture

5 Jan 2016 - 10:41 am | अजया

वाचतेय.पुभाप्र

जी ए सारखा निगेटिव लिहिणारा लेख अजून तरी सापडलेला नाही
एकही कथा सुखांत नाही,

पिंगळावेळ तर शॉट आहे,चांगल्या मूड ची वाट, बाकी साहित्य पण असंच उदास ,गंभीर
बरेच लोकं म्हणतात
ह्या , तुला काय कळतात जी ये ? म्हटल बऱ नसेल माझी मानसिक लेवल तेवढी =))

सस्नेह's picture

5 Jan 2016 - 11:23 am | सस्नेह

हे परीकथा लिहिणारे बाल-साहित्यिक नसावे बहुधा.

सिरुसेरि's picture

5 Jan 2016 - 1:10 pm | सिरुसेरि

जी.ए. यांनी बाल-साहित्यामध्ये "बखर बीमची" हे पुस्तक लिहिले आहे .

मानसिक लेव्हल बद्द्ल बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असेच मी देखील सांगीन. आज तिसरा भाग टाकतोय. मोठा आहे . तो ही वाचा. उद्या चौथा आणि शेवटचा भाग टाकीन. शक्य झाल्यास तो ही वाचा आणि मग सांगा जी ए खरंच निगेटिव्ह लिहितात का ते ? :-)

सांगितल्याप्रमाणे मी चौथा भाग टाकला आहे. जर अजूनही उत्सुकता बाकी असेल तर नक्की वाचून पहा. आणि जी ए निगेटिव्ह वाटतात का ? ते सांगा.

मोरे साहेब तुम्ही छानच लिहिता, पण जि ए रडकथाकारच आहेत हे.मा.व.म

पैसा's picture

6 Jan 2016 - 8:36 pm | पैसा

जी ए वाचायचे म्हणजे दु:खाला आमंत्रण. लहान वयात खरी दु:खं फार अनुभवलेली नसतात तेव्हा जी ए, श्याम बेनेगलचे सिनेमे वगैरे जादू टाकतात. पण खरी दु:खं अनुभवली की अजून शोकांतिकांबद्दल विचारही करायला नको वाटतो.

अरेरे पेसा ते, तुला जि ए कळलेच नाहीत.

चल आपण बिमची बखर वाचु

पैसा's picture

7 Jan 2016 - 1:09 pm | पैसा

दे पाठवून लौकर.

मोरे साहेब तुम्ही छानच लिहिता, पण जि ए रडकथाकारच आहेत हे.मा.व.म

स्पा-मालक प्रशंसेबद्दल धन्यवाद, पण मी सरकारी नोकरीत नसल्याने, मला साहेब म्हणून तुमचे कुठलेही काम होणार नाही. आणि जी एंच्या काही कथा रडवतात हे जरी खरे असले तरी त्यांना रडकथाकार म्हणायला माझी जीभ धजावत नाही. मला वाटते जी ए, राखाडी आयुष्यातला गडद काळा रंग अधिक प्रभावीपणे मांडतात, पण त्याचा अर्थ त्यांना आयुष्यातील शुभ्र पांढरा रंग जाणवलाच नसेल असे नाही. फक्त तो आपल्यासमोर आणण्यापेक्षा ते काम त्यांनी आपल्यावरच सोपवले आहे.

जी ए वाचायचे म्हणजे दु:खाला आमंत्रण. लहान वयात खरी दु:खं फार अनुभवलेली नसतात तेव्हा जी ए, श्याम बेनेगलचे सिनेमे वगैरे जादू टाकतात. पण खरी दु:खं अनुभवली की अजून शोकांतिकांबद्दल विचारही करायला नको वाटतो.

पैसा भाऊ, माझे थोडेसे उलटे होते. खरी दु:ख्खे सतावू लागली की शोकांतिका वाचून आपले दु:ख्ख इतके काही मोठे नाही असे वाटून जरा भार हलका होतो.

सस्नेह's picture

7 Jan 2016 - 1:12 pm | सस्नेह

खरी दु:ख्खे सतावू लागली की शोकांतिका वाचून आपले दु:ख्ख इतके काही मोठे नाही असे वाटून जरा भार हलका होतो.

अगदी खरं. इव्हन, जिव्हारी दु:ख भोगल्याशिवाय जीएंच्या लेखनाची खोली, आर्तता आणि गूढार्थ आत पोचतच नाही.

स्पा's picture

7 Jan 2016 - 1:25 pm | स्पा

ओह आय सी