उर्जा घड्याळ

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
26 May 2015 - 7:48 pm

कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू.

उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं. ऑडीट करा- त्रुटी दाखवा - तांत्रिक किंवा आर्थिक अडचणी काढून एक वर्षभर कृती लांबवा - मग पुन्हा ऑडीट करा. हे जे प्रकार चालतात त्याने भल्या माणसाला उद्विग्नता येते आणि नको तो व्यवसाय म्हणून बाहेर पडावेसे वाटते. असाच भला माणूस असल्याने संधी मिळताच मीही त्या प्रकारच्या व्यवसायातून इतरत्र गेलो. तर ते असो! (म्हणजे खरं तर नसो - पण आपला इलाज नाही !)

या काळात साहजिकच खूप जनसंपर्क वाढला. अनेक कामाची आणि बिनकामाची माणसं भेटली आणि अनुभव समृद्ध व्हायला मदत झाली. विद्युत ऊर्जेबाबत जागरूकता आली ते वेगळेच.

एक एनर्जी ऑडीटर याच काळांत भेटले. ते आहेत उर्जाविषयक तज्ञ, एक अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्व. भारतातल्या विद्युत उर्जा क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलू शकणारे हे गृहस्थ आम्हाला काही प्रकल्पात मार्गदर्शन करत असत. आमच्यात अजून एक समान दुवा होता तो म्हणजे आम्ही दोघेही एकाच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. त्यातून त्यांच्या चार पिढ्या तिथून इंजिनियर झालेल्या. त्यामुळे असेल पण इतक्या व्यस्त कार्यक्रमातून एकूण मला ते चांगला वेळ देत असत. उर्जासाक्षारतेवर त्यांचा मोठा भर असे. लोकांना उर्जा समजली की ते बचत करतीलच असा त्यांचा विश्वास होता, आणि प्रबोधन करण्यासाठी त्यांची विनामोबदला काही गोष्टी करण्याची तयारी असे.

एकदा असेच उर्जासाक्षरते बद्दल बोलत असताना त्यांनी पाश्चात्य देशांत रुळलेली एक भन्नाट कल्पना सांगितली. मला ती नवीन होती, म्हणजे उर्जा घड्याळ. '' एखादी गोष्ट नियंत्रित करायची असेल तर ती आधी अचूक मोजली पाहिजे'' या बेसिक तत्वानुसार सामान्य माणसाला त्याचा रोजचा वीजवापर किती तो कळायला हवा म्हणजे तो कमी करण्यासाठी तो कृती करू शकेल - थेट महिन्याचं बील आल्यावर यांत्रिकपणे विचार न करता ते भरले जाते. उर्जा घड्याळामुळे रोजचा वापर कळत राहतो. मला त्यांनी उर्जा घड्याळ कसे असते ते सांगितले. मग त्यांच्या कल्पनेनुसार मी तशा इलेक्ट्रोनिक घड्याळाचा संपूर्ण आराखडा तयार करून त्यांना दाखवला. आणि तो त्यांना पसंत पडला.

कसे असणार होते हे उर्जा घड्याळ?
भिंतीवरच्या घड्याळाची तबकडी असेल, आणि काटे गायब असतील - पण मागे यांत्रिक किंवा क्रिस्टल घड्याळाऐवजी इलेकट्रोनिक उर्जाघड्याळ असणार होते. समजा तुमच्या घरी एक किलोव्याटची जोडणी आहे आणि सरासरी पांच युनिट्स रोजचा वापर आहे. तर हे घड्याळ बारा ते पुन्हा बारा या ''वेळेत'' (प्रत्यक्षात चोवीस तास ) पाच किलोव्याट अवर्सचे एक परिचालन पूर्ण करेल. प्रत्येक घरासाठी हे कॅलिब्रेशन करता येईल अशी सोय ठेवलेली असेल. रोज रात्री बारा वाजता घड्याळ रिसेट होणार !!

उर्जा घड्याळाचे संकल्पचित्र

ao EC

थोडक्यात, सामान्य माणसाने डोके बाजूला ठेवून उर्जाघड्याळात बारा वाजणार नाहीत असे बघायचे! रात्री झोपताना घड्याळ दहा किंवा नऊची वेळ दाखवत असेल तर तुम्ही भरघोस बचत केलीय. आणि जर घड्याळात बाराच्या पुढे गेले तर तुम्ही प्रमाणाबाहेर वीज वापरताय हे समजेल आणि फक्त एक लाल एल.ई.डी. दिवा चमकत राहील. आता ही ''वेळ'' दाखवण्यासाठी यांत्रिक काटे फिरवणे हे खर्चिक आणि मेंटेनन्सला महाग झाले असते. म्हणून मी काट्याऐवजी एल ई डी दिव्यांची योजना केली. हे दिवे प्रत्येक तासावर हिरव्या रंगात चमकतील आणि एकच लाल दिवा त्यादिवशीच्या अतिवापराची सुचना देईल.

वीज मोजायसाठी ती घरात पोहोचते तिथे आणि मीटरनंतरच हे घड्याळ बसवणे आवश्यक होते. घरगुती वायरिंगमध्ये कसलेही प्रमाणीकरण नसल्याने हे घड्याळ बसवणं आणि वापरणं कठीण आहे. त्यावर दोन तीन पर्याय शोधून काढले गेले. पण पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष वापरताना त्याला चालण्यासाठी लागणारी वीज मुख्य प्रवाहातून घ्यावी लागणार होती. अडाणीपणामुळे त्याला विरोध झाला असता. बॅटरी वापरायला आणि ती बदलायला लोक तयार झाले नसते. वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर परत सुरु झाला की जुने रीडिंग लक्षात ठेवायला त्यात स्मृती ठेवावी लागणार होती. त्याने किंमत वाढली असती. एकुणात आमचे कन्सेप्ट डिझाईन, प्रत्यक्ष हव्या असलेल्या उर्जा घड्याळापासून बरेच दूर होते !

इथेपर्यंत ठीक होते. पुढे खरे आव्हान होते ते याचा नमुना तयार करणे- तो प्रत्यक्ष वापरायसाठी आवश्यक असे वरील अनेक बदल करणे, आणि मोठ्या प्रमाणात,लाखो घड्याळे कमी किमतीला तयार करणे. माझ्याकडे पूर्वी एका लेखात म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे हॉबी गराज आणि मदतीला एक नवोदित अभियंता होताच. आम्ही बराच वेळ घालवून याचे आरेखन, सर्किट आणि बिल ऑफ मटेरियल (BOM ) तयार केले होते. वर्षाला एक लाख घड्याळे तयार केल्यास अवघ्या दोनशे रुपयात हे उर्जा घड्याळ तयार होऊ शकणार होते. त्यावेळी मला आठ दहा लाख रुपये खर्च करणारा एक गुंतवणूकदार लागणार होता, त्याशिवाय सरकारी प्रक्रियेतूनच हे लोकांपर्यंत जाऊ शकणार होते, संबंधित मंत्रालयाला हे पटवणे , टेंडर वगैरे आले. पण ' टेंडर बिंडर नको बाबा ! ' त्याची मानसिक तयारी नव्हती. शांत सुखी आयुष्य बदलून कदाचित पोटाला चिमटे घेऊ शकणाऱ्या अशा नव्या व्यवसायात पडायला त्या वेळेला तरी मन 'नाही' म्हणालं !

एकदा त्या व्यवसायातून बाहेर पडल्याने हे सगळे आरेखन आणि डेव्हलपमेंट बोर्ड्स माळ्यावर अडगळीत पडले. परवा घर आवरताना हे भूतकाळातलं भूत माळ्यावरून उतरलं! त्यावेळी जाणीव झाली की मीही आरंभशूर ठरलो तर ! ही काही जगात पहिल्यांदा सुचलेली कल्पना नव्हती. फक्त प्रत्यक्ष उत्पादन सुरु करायची गरज होती - पुढे युरोपात या कल्पनेचे रीतसर पेटंट घेतले गेले. आता पुढे कधी हे करायचं झालंच तर क्लिष्ट कायदेशीर प्रक्रियांना तोंड देत करावं लागणार.

एकूण काय, आयुष्यात चुकलेल्या अनेक बसेसपैकी ही एक बस म्हणून हे घड्याळ नेहेमी मनाच्या कोपऱ्यात टिक-टिक करत राहील !

( घड्याळाच्या मूळ डायलचे चित्र जालावरून साभार …. )

मांडणीवावरसमाजजीवनमानतंत्रविज्ञानप्रकटनविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

26 May 2015 - 7:59 pm | सुबोध खरे

एखादी गोष्ट नियंत्रित करायची असेल तर ती आधी अचूक मोजली पाहिजे'
अगदी सत्य आहे
आजच मी माझ्या नेटचा वापर ८०० एम बी झाला हे लक्षात आल्यावर ५०० एम बी चा रिचार्ज केला अन्यथा १ जीबी नंतर भरमसाट बिल भरावे असते.
अशीच सोय घरच्या वीजबिलावर असणे अतिशय आवश्यक आहे कारण आपण किती वीज वापरतो हे मुलांना जर समजावता आले तर विजेची बचत कशी करायचे याचे बाळकडू लहान पणा पासून मिळाल्याने एक पिढीचे प्रशिक्षण झाले असते आणि विजेचा अपव्यय नक्की कमी होईल.
आपण आपला हा विचार पंत प्रधान श्री मोदिसाहेबाना इ मेल वर कळवून पहा. एखादे वेळेस फायदा होऊ शकेल.

सस्नेह's picture

26 May 2015 - 9:23 pm | सस्नेह

फारच विधायक कल्पना !
राष्ट्रीय संपत्ती म्हणून गणल्या जाणा-या विजेच्या वापराबाबत म्हणावी तितकी जागरूकता अजुनी नाही हे खरय !

श्रीरंग_जोशी's picture

26 May 2015 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी

ही संकल्पना प्रत्यक्षात येवू शकली असती तर खूप चांगले काम घडले असते.

उर्जा व संसाधन बचतीची मला खूप आवड आहे. मिपावर नवा असताना मी हा धागा काढला होता.

अतिशय चांगली कल्पना आहे. विजेप्रमाणेच, पाणी, पेट्रोल, नेटपॅक, वेळ वगैरेची केलेली बचत दर्शवणारी साधने निघायला हवीत. अमेरिकेत एक ऑटो इन्शुरन्स कंपनी, कार चालकाच्या, कार चालविण्याच्या पद्धतीविषयी माहिती देणारी सिस्टीम बसवून देते. ती वापरल्याने कार कशी चालवली जाते, किती वेळा अचानक ब्रेक्स दाबायला लागले, किती वेळा ठराविक वेगापेक्षा जास्त वेगात चालवली, वगैरे गोष्टी कळायला मदत होते. तो सर्व deta ऑटो इन्शुरन्स कंपनीकडे गोळा होता आणि जर ड्रायव्हर कार चांगली चालवत असेल तर वर्षाच्या इन्शुरन्सवर थोडा डिस्काऊंटही मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्व:ताला आपले ड्रायव्हिंग स्किल हे निपक्षपातीपणे कळते.

किती चांगला प्रकल्प होता/आहे.
छान माहिती.

फारच छान कल्पना आहे.

असं मोबाईल अ‍ॅप आहे: EnergySaver

अमेरिकन मार्केटसाठी ($9.99) उपलब्ध केलेलं असलं तरीही निर्माते (राज ऑर्गनायझेशन) भारतीय असावेत, म्हणजे भारतात चालेल बहुधा....

असं अ‍ॅप बऱ्याच कमी किमतीला - (बहुधा तीनचार डॉलर्स) देता येईल. किंवा एक्सेलशीट वरही करता येईल. पण त्यात आपण प्रत्यक्ष वापर मोजत नाही.

'ही' घड्याळाची कल्पना प्रत्यक्ष वीजमोजणी वर आधारित आहे - तीही २% अचूकतेने ! अंमलात आल्यास कमालीची यशस्वी होऊ शकेल. फ्रीज, हीटर अशी उपकरणे लोकांनी जपून वापरली तरी बराच फरक पडू शकतो. LED आणि CFL दिवे यांबद्दल जागरूकता आता आली आहे.

पण भारतात उपयोग करताना मर्यादा येतात. तांत्रिक समज आणि क्रयशक्ती असलेले लोक पाच टक्केही नसतील. त्यातल्या अर्ध्या मंडळींची हे वापरायची इच्छाशक्ती नसू शकते.

वेगवेगळ्या गावांत / राज्यांत वेगळी परिस्थिती असल्याने वीज / पाणी / ग्यास यांचे वितरण अनियमित आणि काहीसे अनियंत्रित आहे. मागासलेल्या वस्तीत रहिवासाचा पत्ता सुद्धा शंभर कुटुंबांचा मिळून एकच आहे! अशा परिस्थितीत आधी सुव्यवस्था आणून मगच तंत्रज्ञान देतां येईल.

मी डिझाईन केलेले घड्याळ या फॉर्ममधे तरी अद्याप अमेरिकेतही वापरले जात नाही असे दिसते. कदाचित त्याची अजून तितकी निकड नसावी. कदाचित कॅलिफोर्नियाचे मिपाकर त्याबद्दल सांगू शकतील!

अरुण मनोहर's picture

27 May 2015 - 5:48 am | अरुण मनोहर

एकदम उत्कृष्ट कल्पना आहे.
थोडे पेशन्स, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवून मागे लागला असतात, तर आज ते सगळीकडे वापरात आलेले दिसले असते.

सिंगापूरमधे सरकार उर्जेच्या आणि पाण्याच्या बचती साठी खुप जागरूक आहे. नुसते जागरूकच नव्हे, तर अनेक योजनां द्वारे लोकांना जाणिव करून देत असते. ह्याचाच एक भाग म्हणजे, दर महिन्याच्या बिलापाठीमागे, तुमच्या घराचा पाणि आणि विजेचा वापर गेल्या सहा महिन्यांचा आलेख काढून दाखविला असतो. विज पाणि दर ह बदलू शकतो, म्हणून डॉलर्स मधे न दाखविता विज किलोवौट युनिट आणि पाणि मिटर क्युब मधे असते. आणि हा मागच्या सहा महिन्यांचा आलेख सोबत राष्ट्रीय वपर रेखा देखील दाखवतात. त्यामुळे आपल्याला इतरांच्या तुलनेत आपण कमी वा जास्त वापरतोय ते अचुक कळते.
कुठलीही चांगली गोष्ट लोकांच्या गळी उतरवायला लोक जागृती आणि शिक्षणाची आवश्यकता असते. आपल्याकडे मोदीजी सततच्या जनसंपर्का मधून आणि प्रसारणांमधून तेच करीत आहे. पण काही करंटे त्यांच्या ह्या स्टाईलला आत्म स्तुती असे हिणवितात. असो!

खेडूत's picture

27 May 2015 - 11:34 am | खेडूत

हो. सहमत.

इंग्लंडमध्ये अगदी असंच ग्यास आणि विजेचं एकत्र एनर्जी बिल येतं. पाण्याचंही असंच येतं.

बाकी चिकाटी कमी पडली हे खरंच. अजूनही प्रयत्न केल्यास अशक्य काही नाही! पण त्याच कामात झोकून द्यावं लागतं .

मदनबाण's picture

27 May 2015 - 6:41 am | मदनबाण

छान कल्पना आणि माहिती.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeel

खटपट्या's picture

27 May 2015 - 6:51 am | खटपट्या

खूप छान माहीती आणि लेख.

चतुरंग's picture

27 May 2015 - 7:49 am | चतुरंग

हा प्रोजेक्ट खरंच खूप चालेल. अजूनही इथे अमेरिकेत अशा प्रकारची घड्याळे वापरात असलेली बघितली नाहीयेत. ऊर्जा वापर आणि त्याची सतत वाढती किंमत हा अतिशय ज्वलंत विषय इथेही आहे. त्यामुळे वीजबचतीवर लक्ष ठेवता येत असेल तर ते ग्राहकांसाठी नक्कीच उत्साहवर्धक असेल. आणि वीजकंपन्याही बचतीला हातभार लावतच असतात त्यामुळे त्यांच्याकडूनही ग्राहकाला कदाचित सबसिडी मिळू शकते!
एक इलेक्ट्रॉनिक्स अभियंता म्हणून मला तुमच्या प्रोजेक्टबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांसाठी अधिक माहिती :
अल्ट्रा- लो पॉवर मायक्रोकंट्रोलर टेक्सास - MSP ४३० वापरणार होतो. त्याकाळी तोच चांगला होता. आता अजून चांगले इतर आले आहेत. मेमरीज तुलनेत स्वस्त झाल्यात. ऑन बोर्ड बॅटरी असणार होती. पी डब्ल्यू एम आउटपुट्स उपलब्ध आहेतच. अजून काय पाहिजे? एसेम्डी असेंब्ली करणारे आता पुण्यात पण आहेत.
करन्ट ट्रान्सफ़ोर्मर्स चार किलोवॉट पर्यंतचे आणि सिंगल फेज साठी निवडले होते.

अपव्यय ( अर्थातच नासाडी) अन्नाची असो की पाण्याची-विजेची ती थांबवायलाच हवी.

या निमित्ताने "पानात अन्न न वाय घालव्ल्यास ५% सूट देणार्या थाळी भोजनगृहाची आठवण झाली.

ही कल्पना मूर्त सव्रूप घेवो ही वरच्या "पॉवर" कडे प्रार्थना.

अजूनही वीज हिशेब न जमणारा
नाखु

पैसा's picture

27 May 2015 - 10:06 am | पैसा

मात्र आता कोणी या कल्पनेवर काम करायला तयार झालाच पेटंटच्या भानगडीत सापडेल.

सर्व वाचक आणि प्रतिसादाकांचे खूप आभार!

खूप छान कल्पना! दुर्दैवाने याचं पेटंट आपल्या हातून निसटलं याचं वाईट वाटतं आहे.

अशाच अजून कल्पना येऊ द्यात आणि प्रत्यक्षात नाही येऊ शकल्या तरी त्यांचे बौद्धिकस्वामित्व घेऊन ठेवा.

एखाद्या गोष्टीची नोंद करणे हा शास्त्राचा पाया असतो.ठराविक प्रमाणाने सर्वानी तशीच नोंद घेतली की तुलना करून निष्कर्ष काढणे सोपे होते.
लेख आवडला.