अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली.
तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना.
तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,... निसता उच्छाद असतुया.
पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये. ते पाईकं घिऊन लागलीच मामांच्या दुकानात जायाचं. कंदी शिरिखण्डाच्या गोळ्या, कंदी आंबावडी, कंदी चाकलेटं, कंदी आईसप्रूट, कंदी काय, तं कंदी काय नं कायतरी घियाचं. येकदा तर पैकं उरलं म्हून पोरांनी मामाच्या दुकानातून लोणचं घिऊन खाल्लं बगा. ह्ये समदं पोरांबरुबर गाडवालाबी (मला) भ्येटायचं.
जत्रंत पैलवानांची जंगी कुस्ती लागायची. येकदा गावच्या पैलवानला बक्षिसी लागली. पल्याडच्या गावच्या बाजीरावाला त्येनं आस्सा घोळासलाय, आस्सा घोळासलाय, आस्सा घोळासलाय, की ब्येणं येकदम पानीच मागाया लागलं. पर पैलवान लै भला मानूस. बक्षिसी लागल्यालागल्या त्येनं गावच्या सम्द्या पोरांन्ना पिरूटसल्लाड आन् जिलंबी खाऊ घातली. अक्षी मज्जा आली म्हनाना... तवापासून आपल्याला पिरूटसल्लाड आन् जिलंबी लै आवाडते.
जत्रंला कंदीमंदी भौरुपी यायचा, कंदी वासुदेव. सांजंला वाघळं घुमाया लागल्यापासून जे जत्रंत घुस्सायचं त्ये पार चांद डोईवर येईस्तोपावेत्. मंग मध्यानरातीची घुबाडं वडाच्या पारंबीआडून त्येंच्या आयेला "आ SSS य", "आ SSS य" म्हून हाकं मारायां लागायची. तोवर आमी तिथंच... गच्-घुम्माळ झिम्माड व्हायाचा निस्ता!
आमचं येक गुर्जी हैती. त्यांस्नी ह्ये जत्रं बित्रं काय बी खपायचं नाय. त्ये म्हनायचं ह्यो जत्रा म्हंजी अक्षी येळ घालिवणं. कोनी देवीच्या जत्रंचं नाव बी काडलं तरी यांचं डोसकं तापायचं. हाSS यावडा फॉक घ्येऊन त्ये येकेकाचं Xचंच गराम करायचे. वर पुन्ना पोराटोरांच्या घरच्या थोरल्या मंडळींची बी कानं भरायचे. आन् आमचं आयबापबी आस्सं हाय ना.. त्ये आमालाच रागं भरायच्ये.
गुर्जेन्न्ला बगलं की समदे पोरं पोरी लै टरकायचं. लै म्हंजी लैच. "गुर्जी नमस्ते" बोलून जे सुस्साट पलत सुटायचं त्ये गुर्जी दिसेनासं होईस्तुवर.
पर आता समदंच बदलून ग्येलंया. कायकाय आवलीं पोरं हैती आता गावात सांगटो.. लै म्हंजी लैच ब्येक्कार, त्ये बेनं उल्टंच गुर्जेंन्ला वाकुल्या दावाया लाग्लंय की वो. म्या त्यांणा सांगटो, गुर्जेण्ला तरास द्येऊ णका, त्येण्लाबी मण हाय. पर कोन् बी आयिकत नाय बगा. मंग मला लै म्हंजी लैच वाईट्ट वाट्टं बगा.
तसा गुर्जी लै कामाचा मानूस है,... हाSS. कोनचाबि इषय द्या, क्काय शिक्किवतो, क्काय शिक्किवतो.... मोट्टा कळाकार मानूस हाय. अंगात लै कळा त्येंच्या. काय झग्गास निबंद लिवतो... आन् काय जंक्षण गातो... येकदा आयिकूणच बगा. तुमांस्नी म्हून त्यांचा येक गुप्पिट सांगतो. कुनास्नी बी सांगू णाका. लै वर्सांमागची गोष्ट हाय. गावात गिर्जादेवीची जत्रा लागलीवती. आमचं गुर्जी तवा जत्रंत घुसलं होतं... ते बी सोत्ताहून. तं झालं काय, गावाचे भामटे लै आगाऊच. आमच्या गुर्जेंचं पाकीटच मारलं की वो त्येंणी. तवापासून गडी आस्सा रुसलाय, आस्सा तापलाय, आस्सा कावलाय, की जत्रंचं नाव काडलं की मारायांच धावतुया.
निरवताप गाव तसा चांगला हाय.... गुर्जेंला आवडात नाय म्हून गावच्या थोरल्या मंडळींनी जत्रा कमीच करून टाकल्या. तसं बी अताशा लोकांस्नी टैम लै कमती अस्तुया. देवीला आता कोन इच्चारतो? पैकाच लै मोट्टा झालाया. पर तुमाला सांगटो, लैच मज्जा असायची निरवतापात.
पर जाऊंद्यात. त्ये आता जुणं झालं. आता तुमीच कायतरी नवं सांगा.
समस्त मणुष्यमंडळींना प्रणाम.
प्रतिक्रिया
12 Oct 2014 - 9:52 pm | स्वप्नज
<<<< पर जाऊंद्यात. त्ये आता जुणं झालं. आता तुमीच
कायतरी नवं सांगा.>>>>>
असं म्हणताय....?सांगतो. कालचा सामना जिंकला भारताने.....
12 Oct 2014 - 10:00 pm | कवितानागेश
ह्ही ह्ही ह्ही.
12 Oct 2014 - 10:14 pm | पैसा
तुम्ही कोण आहात माहीत नाय, पण लिहिलंय लै भारी!
निरवताप कुटंशीक आलं म्हनायचं ह्ये? नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय.
गिर्जादेवीच्या जत्रंत पाकीट मारलं का? अरेरे अरेरे!
12 Oct 2014 - 10:20 pm | निराकार गाढव
तुम्चा ह्यो प्रतिसाद वाचूण म्या मेघविव्ह्ळ जालो बगा.
12 Oct 2014 - 10:25 pm | पैसा
हे असलं कधीपासून होतंय तुम्हाला? तरी सांगत होते, सगळ्यांनी आधी सोपी पुस्तकं वाचत जावा. नाय नाय ते वाचलं म्हणूनच हे असले 'निरवताप' 'मेघविव्हल' वगैरे शब्द आठवतायत तुम्हाला.
12 Oct 2014 - 10:27 pm | प्यारे१
अरे का बरे तुझी प्रतिभा अशी व्यर्थ दवडतो आहेस गर्दभा?
एक लकेर घेतलीस तर सारं नभांगण दुमदुमेल, एका लत्ताप्रहारानं भूमी हादरवशील, योग्य प्रसंगी आणखी काही 'आरंभशील'. कामाचा तर गाढव आहेसच.
का असं गुर्जींच्या मागे लागला आहेस बरे?
13 Oct 2014 - 12:04 pm | अत्रुप्त आत्मा
@मेघविव्ह्ळ>>> =)) अशक्य आहे हे गाढव! =))
13 Oct 2014 - 12:20 am | मुक्त विहारि
झक्कास...
13 Oct 2014 - 2:37 pm | बोका-ए-आझम
ढेचूं ढेचूं
29 Nov 2019 - 12:24 pm | श्रिपाद पणशिकर
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली ;)