हरवले ते गवसले का? व कसे? भाग 7 किस्सा चोराला धोपटल्याचा...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 11:37 pm

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.
काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.

----

भाग 7 - किस्सा मोबाईल चोराला धोपटल्याचा...!

थाड थाड 7-8 थपडा बसता गालफडावर बोटांचे वळ चोळत, ‘नको नको, प्लीज मला माफ करा! मी नाही चोरी केली!’ म्हणणारा खाली वाकला तशी पाठीत एका मागून एक पुन्हा 10-12 धपाटे लगावले, शर्टाची क़लर पकडून ‘साल्या, बऱ्या बोलाने मोबाईल काढून दे नाही तर आणखी मारतो!’ मी ओरडलो.
तोंडाने शिव्यांचा दांडपट्टा चालू असताना, ‘जाऊ द्या हो, कशाला असल्या लोकांच्या नादी लागता’ असे आधी सोज्वळपणे गांधीगिरी करणारा टीसी खाली ओणवा झालेल्या त्या चोराला बुटाच्या लाथांनी तुडवायला लागला! तोवर 15-20 जण काय भानगड आहे म्हणत ट्रेनमधे चाललेल्या ठिकाणी गर्दीकरून आले.
व्हाSSटीज गलाटा गोइंग ओन म्हणत एक तमिळ मामा मला हाताने थोपवायला लागले. त्यांना एका हाताने, ‘डोंट कम इन बिट्वीन एल्स यू विल गेट थरो बीटींग! अंडरस्टँड? गाठ आर्मीवाल्याशी आहे!’, असे दटावल्यावर ‘अयय्यो’ म्हणत ते मागे सरले, एसी अटेंडंट तोवर पोलिसाला बोलवायला सटकला होता. कारण ते प्रकरण त्याच्यावर शेकत होते, ते अचानक या चोरावर उलटल्याने त्याने उत्साहाने धावाधाव केली.
त्या चोराने माझ्या हातून मार खाल्ला. मग मी टीसीला म्हटले, ‘पहा पुन्हा त्याच्या झोपायच्या जागी हात घालून’, ‘य़स्सSSर म्हणत आता सेवा तत्परता दाखवत त्याने चादरी, ब्लँकेट्स व उशा ठेवायच्या जागेत शिरून बाहेर येताना एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून माझा मोबाईल बाहेर काढला. तो मी तात्काळ हातात घेतला व उघडून पाहतो तो आतले सिमकार्ड गायब होते. पुन्हा चोराला खोपच्यात घेत बदडले व सिमकार्ड दे काढून म्हणून आणखी धोपटले. पँटच्या खिशातून ते हळूच काढून मला देत असताना मला पोलिस आलेला दिसला. मी त्याला ते हातात घ्यायला लावले व मोबाईल मधील मोकळा स्लॉट दाखवत ते सिम कार्ड माझे आहे म्हणून पोलिसाकडून ते मी हाती घेतले व मोबाईल चालू केला.
तोवर अनेक लोक आपापसात बोलताना ‘सिंपली, नो सेक्युरिटी, इन एसी आलसो’,
‘गुड, बिकॉज आफ बीटींग ही गॉट मोबाईल बॅक‘ एका वयस्क बाईंनी शेरा दिला.
‘आणखी काही लोक आपापसात, पोलिस कंप्लेंट न करता असे मारतात का? ‘ वगैरे बडबड करताना मी ऐकत होतो व काही मिनिटात घडलेल्या नाट्याची उजळणी करत होतो.
हे घडले ते बंगलोर ते मैलाडुदुरई या रेल्वेच्या प्रवासात. मी व दिल्लीचे एक निवृत्त विंग कमांडर शर्मा आम्ही एसी 2 ने प्रवास करताना ते उतरले तंजाऊर स्टेशनवर पहाटे 5ला. त्यांच्या बरोबर मी उतरून जरा कॉफी प्यायली व गाडी चालू व्हायला लागल्यावर परत आत चढलो. मला शेवटपर्यंत पुढे प्रवास करायचा होता. लवंडायच्या आधी नजर गेली जिथे मोबाईल चार्ज करायला लावला होता त्या सॉकेटपाशी पाहतोत तो चार्जर सकट मोबाईल गायब! इतक्या कमी वेळात अन्य कोणी डब्यात चढले वा उतरले नसताना! क्षणभर काय करावे सुचेना. पण मग टीसीला शोधायला निघालो. तो आणि आणि एक त्याचा साथीदार डब्यात घोरत होते. मी मोबाईल चोरीला गेलाय म्हणत त्याला उठवताच ‘सॉरी सर आय डोंट नो, कांट हेल्प.’ म्हणून चक्क तोंड वळवून झोपला. मला झटपट काही तरी करायचे होते. मी एसी अटेंडंट कुठाय ते पहायला लागलो. तर बेड देणारा एक पोरगेलासा मला शर्मांच्या बेडवरील उशी व ब्लँकेटच्या घड्या करताना दिसला त्याला विचारले, ‘काय रे कोणी जाताना पाहिलास का? माझा मोबाईल कोणी चोरलाय, चार्जर सकट’
‘नो, नो’ म्हणून तो त्याच्या बेडरोल्स ठेवायच्या जागी गेला. एसी अटेंडंट गायब होता तो मला दिसला तेंव्हा मी त्याला सांगून म्हणालो की कोणाला जाताना पाहिलेस काय? मानेने नाही म्हणत त्याने माझे सामान पहा म्हणत काही पिशवीतले सामान दाखवले. मी विचार केला की बेडरोलवाल्याला पुन्हा विचारावे. मी त्याच्याकडे गेलो. मी विचारायच्या आत तो मला टाळतोय असे वाटले म्हणून मी त्याला हात धरून विचारले, ‘माझा मोबाईल कुठाय? तूच घेतलायस, तुझ्याशिवाय कोणी इथे जागे नाही, बऱ्या बोलाने सांग!’
माझा हात सोडवत मला टरकावत मला म्हणाला, ‘हमने नही लिया’ तोवर मी बेडरोल ठेवतात त्याजागेत आत हात घातला तर वायर लागली ती ओढून काढता माझ्या मोबाईलची ती होती. पाहिल्यावर माझा पारा असा चढला की बऱ्याच महिन्यानंतर मला हातांनी इतके धोपटून काढायची संधी आली. मग असा ठोकला अन मोबाईल व सिमकार्ड त्याने दिले.
मला माझा माल मिळाला होता. पण मी गप्प बसणाऱ्यातला नव्हतो. ‘पोलिसांना बोलावून आण’ टीसीला मी फर्मावले. मी आर्मीवाला आहे असे मी वेळोवेळी ओरडून सांगत असल्याने बाकीचे माझ्या त्या अवताराला टरकून ‘धिस कॅन बी सिंपली डन ओनली बाय आर्मीवालाज’ असा सूर धरलेला मी ऐकला. पोलिस आला. ‘येस यू वांट टू लाज कंप्लेंटा?’ असे तमिळमधे म्हणताना मी ‘स्पीक इन इंग्लीश’, सांगितल्यावर तो परतला व एका सीनियरला घेऊन आला. तो मिसाळ हवालदार मला म्हणाला, ‘सर कंप्लेंssटा?, मी त्याला ‘कंप्लेंट बुक कुठाय? मला नोंद करायची आहे’ म्हणताच, ‘बट आय डोंट कॅरी बुका.’ मला टरकावणीच्या भाषेत म्हणाला. ‘बेटर यू ब्रिंग फास्ट ऑर यू आर गोईंट फोर ट्रबल’ मी ते म्हणताच दोघे परतले व काही ताव घेऊन यावर लिहा मी ते मायिलाडूदुरईला उतरून भरतो. टीसी , ’सर प्लीज. वी विल थ्रो दॅट फेलो. ही इज नॉट रेल्वे एम्प्लॉयी. बेड रोलदेणाऱ्या कॉंट्रॅक्टरचा माणूस आहे. वगैरे वगैरे...’ सांगून मला इम्प्रेस करायच्या प्रयत्नात होता.
मी टीसीला व पोलिसाला साक्षिदार करून ठेवले होते म्हणून त्यांना काम करावे लागणार होते. मला ही या वेळ काढू कामासाठी वेळ नव्हता. मी लेखी दिले व सर्वांचे मोबाईल नंबर घेऊन उतरलो. मजा म्हणजे मी एका विदेशी मित्राचे ब्रह्मसूक्ष्म ताडपट्टीचे वाचन करून टॅक्सीने परत तंजावूरला गणेशनच्या केंद्रात आलो व नंतर पुन्हा त्याच ट्रेनने बंगलोरला परत जाण्यासाठी शर्मांच्या बरोबर तंजावूरच्या रिटायरिंग रूम मधे बसलो होतो. त्यावेळी एक जण माझ्या जवळ येत म्हणाला, ‘सर, आय मायसेल्फ प्लीडरा, कोर्ट केस ओवर, रिटर्निग टू वेंगलूरू. बट यू टॉट व्हेरी गूड लेसन. आय वाज इन द ट्रेन इन मार्निंग..आssडाssडाडा व्हाट बीटींगा...
विंको शर्मा मला म्हणाले, ‘शशी, यू नेव्हर टोल्ड मी अबाऊट इट?’
‘सर व्हेन वी गॉट सच ग्रेट रींडींग फ्रॉम ब्लँक पाम लीफ आय फरगॉट ऑल धिस...!!’

ते रीडींग नंतर यू ट्यूबवर लोड केले गेले...

मौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

29 Jul 2014 - 5:19 am | खटपट्या

मस्त अनुभव !!
बिचारा मोबाइल चोर

ब़जरबट्टू's picture

29 Jul 2014 - 8:49 am | ब़जरबट्टू

त्यांच्या बरोबर मी उतरून जरा कॉफी प्यायली व गाडी चालू व्हायला लागल्यावर परत आत चढलो. मला शेवटपर्यंत पुढे प्रवास करायचा होता. लवंडायच्या आधी नजर गेली जिथे मोबाईल चार्ज करायला लावला होता त्या सॉकेटपाशी पाहतोत तो चार्जर सकट मोबाईल गायब!
येथे चोरीला आमंत्रण तुम्हीच दिले आहे... नशीब म्हणून भेटला वापस... :)

शशिकांत ओक's picture

29 Jul 2014 - 6:23 pm | शशिकांत ओक

म्हणून तर हा धागा धावता झाला!

मुक्त विहारि's picture

30 Jul 2014 - 12:18 am | मुक्त विहारि

आवडला