४. चिन्मयचे अपहरण नाट्य - हरवले ते गवसले का? व कसे? भाग १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
9 Apr 2014 - 8:53 pm

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.
काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.

४. चिन्मयचे अपहरण नाट्य
भाग 1

सन असेल 1986 साधारण ऑगस्ट - सप्टेंबरचा महिना. त्यावेळी आम्ही जनकपुरी, दिल्लीहून पोस्टींगवर पुण्याला 311बी क्वार्टरमधे राहात होतो. मी सुट्टीवर घरीच होतो म्हणून नेहमीप्रमाणे पावणेसहाला न उठता जर आरामात ताणून देत असे. एकदम, ‘उठा, उठा.’ तुम्हाला काय आहे माहिती? असं म्हणून पत्नीने मला हलवून जागं केलं. मी आळसावत, ‘काय त्रास आहे!’ असं म्हणत तिच्याकडे पाहिलं.
‘आपल्या घरातली काम करणारी घाबऱ्या-घाबऱ्या आत्ता घरात आलीय आणि म्हणतेय, ‘माझा नवरा तुमच्या चिन्मयला पळवून नेऊन खंडणी मागण्याचा घाट घालतोय!’ मी पटकन विचारलं, ‘अगं चिन्मय कुठं आहे?’
आमचे चिरंजीव चिन्मय त्या मोलकरणीच्या नवऱ्याबरोबर दररोज सायकलवर डबलसीट केंद्रीय विद्यालय नं.1च्या आपल्या शाळेसाठी जात असत. ‘नेहमीप्रमाणे तो निघालाय’. असं सांगण्यात आलं. मला आश्चर्य वाटलं. कारण रोजच त्या मोलकरणीचा नवरा चिन्मयला शाळेत सोडत आणि आणत असे. ‘यात नवीन काय?’ असं मी जरा बेफिकीरीने विचारलं. ‘ती म्हणतेय, ‘या साहेबांना मी काय आता सोडणार नाही. दहा हजार रूपये घेतल्याशिवाय, त्यांच्या पोराला सोडणार नाही! बघ आता तू!’ असं म्हणून तो बायकोला धमकी देऊन गेलाय.
‘जा-जा उठा आणि पहा पटकन कुठं गेलाय तो’. मी थोड्या अनुत्साहाने पटकन उठलो. काय करावं सुचेना. तेवढ्यात एअरफोर्सचा युनिफॉर्म घालावा असं मन झालं आणि मी युनिफॉर्ममध्ये बाहेर जायला निघालो. आमच्या क्वॉर्टरपासून दूरवरचा रस्ता दिसत असे. पाहिलं तर आज चिन्मय हलत डुलत पाठीवरची बॅग घेऊन चालत जाताना दूरवर दिसला. ‘अरे तो काय दिसतोय जाताना’ मी मनात म्हटलं.
‘काही असु दे. जाऊन या बरं पटकन.’ असा घरचा आदेश मिळाल्यावर मी तातडीने स्कुटर काढली आणि त्याच्या मागे गेलो. मी त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो शाळेच्या फाटकापाशी पोहोचला होता. आता शाळेत आत जाण्याची गरज नव्हती. एकदा तो शाळेच्या फाटकात आत गेल्यानंतर त्याला पळवून नेण्याची काही शक्यता नाही असं मला वाटलं असं म्हणून मी विजयी मुद्रेने परत घरी आलो आणि सांगितलं, ‘काहीही झालेलं नाहीये. तो आता शाळेत गेलेला आहे.’
तोपर्यंत घरातलं वातावरण बदलेलं होतं. ती काम करणारी मोलकरीण बुटकीशी दिसायला नकटी, गोरी परंतु चिपाडासारखी वाळलेली, नऊवारी कर्नाटकी साडीत सांगत होती. ‘काय सांगायचं तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल! अहो तो एक नंबरचा चोरटा आहे. तो सायकली चोरून विकतो. तो घरातल्या आसपासच्या वस्तु उचलुन त्या विकून त्याच्यावर चैन करतो’ असं म्हणून तिने बऱ्याच काही गोष्टी आधीच्या ठिकाणी राहिलेल्या भागात त्याने काय-काय प्रताप केले ते सांगत होती. पुढे म्हणाली, ‘हे तर काहीच नाही तो एमएसईबीच्या तांब्याच्या तारा चोरून त्या विकतो. मोठमोठ्या कन्स्ट्रक्शनच्या कामापाशी जाऊन तेथून रातोरात मोठ्या प्रमाणात तारा चोरून हजारो रूपये कमावले.’
मी जरा थोड्याशा आश्चर्याने आणि ‘काहीतरी बोलतेय झालं’ अशा भावनेने ते ऎकत होतो. पुढे ती म्हणाली, ‘हा माणुस नुसता चोरटा असता तरी ठीक होतं. पण हा माणूस ढोंगी पण आहे. याने मलाच जीवे मारण्यासाठी गोव्याला जाऊन समुद्रात बुडवायचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून मी कशीबशी येऊन किनाऱ्यावर पडलेली लोकांनी पाहिली आणि मला वाचवली. काही वर्ष हा कुठे गायब असतो काही माहित नाही. पैसे संपले की, तो पुन्हा माझ्यात दारात येतो आणि भावाकडून मला गयावया करून पुन्हा संसार नीट करीन म्हणून घेऊन जातो. माझे घरचे ‘गेली एकदाची पिडा’ असं म्हणून मला त्याच्याबरोबर जायला भाग पाडतात. असेच करत करत मी व तो लोहगावात आलो आणि तिथून कोणीतरी सांगितलं म्हणून तुमच्या क्वॉर्टरमध्ये आम्ही जागा मागितली. तो एम.ई.एस.मध्ये काम करतो असं म्हणतो परंतु ते सगळं खोटं आहे. पूर्वी केव्हातरी त्याने एम.ई.एस.चा पास काढला होता. तोच खाडाखोड करून दाखवतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी सिक्युरिटीचा क्लिअरन्स मिळवून तिथे रहायची परवानगी मिळवतो.’
‘अगं पण आमच्या मुलाला पळवून नेण्याचे कारण काय?’ परत हिने प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, ‘त्याला कारण असं काही लागत नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, तुमच्या गॅरेजमध्ये असलेल्या प्रत्येक बॉक्सच्या कुलुपाच्या डुप्लिकेट चाव्या त्याने आता एक-दोन आठवड्यापूर्वी एका कुलुप दुरूस्तीवाल्याकडून तुमच्या गॅरेजमध्ये बसुन तयार करून घेतल्या आहेत’
‘आणि आम्हाला कसं कळलं नाही?’ पत्नीने प्रश्न केला.
‘अहो, तुम्ही नव्हतात का गेला मध्ये गावाला त्या वेळेला त्यांनी डाव साधलाय आणि झालंय काय की साहेबांनी त्याला चिन्मयला सायकलवरून शाळेला घेऊन जा आणि परत आण असं सांगितल्यामुळे तो वैतागलाय. त्याला असं कुणी काम सांगितलेलं आवडत नाही.’
मी म्हटलं, ‘चांगला टिपटॉपमध्ये रहाणारा माणूस, वर छानपैकी केसांचा कोंबडा, दाढी रोज, पॅन्ट आणि फुल शर्ट खोचलेला, पायात चकचकणारे शुज, सायकल पहावी तर नवी ऐटदार, एकदम चकाचक, बोलण्यात अदब, कुठल्याही माणसाला यांचे धंदे हे असे आहेत हे लक्षातसुध्दा येणार नाही! पण आमचे एअरफोर्सचे पोलीस काय करत होते? माझ्या मनात प्रश्न पडला.
‘बरं ते जाऊ दे. आता काय करायचे ते बोला? पत्नीने सध्याची तातडी लक्षात घेऊन प्रश्न केला. ‘ताबडतोब ऊठा आणि शाळेत प्रिन्सीपलंना सांगा की यापुढे मुलाला घ्यायला आणि न्यायला मी येईन म्हणून. जा. आताचा आत्ता जा शाळेत.’
‘मी हो.. हो.. ‘असं म्हटलं आणि अंघोळ वगैरे करून पुन्हा तयार झालो आणि प्रिन्सिपलांच्या आफिसचा दरवाजा ठोठावला. प्रिन्सिपल सर आणि काही स्टाफ माझ्या ओळखीचे होते. त्यांना साधारण कल्पना दिली आणि क्लासरूम टिचरना बोलावण्यात आले. तिच्या कानावर घालण्यात आले. पण मी विशेष विनंती करून त्यांना सांगितले की मुलाला असं काही आहे असं सांगू नका किंवा भासवू नका. त्या हो हो म्हणाल्या आणि मग त्या दिवसापासून रोज मी त्याला शाळेत न्यायला, आणायला लागलो. शाळा फार लांब नव्हती. एखाद दुसरा किमी असेल आणि पायी जाणं बहुतेक शाळेतली मुलं करायची.

या बाईचा नवरा बऱ्याच वेळेला कपडे बिपडे तयार करून निघतो म्हणून मी त्याला बागेत फिरत असताना त्याला हटकलं होतं, ‘काय रे काय करतोस सध्या?’ तर तो हसला आणि म्हणाला, ‘साहेब आजकाल नोकरी कुठ मिळतेय? चाललाय प्रयत्न माझा.’ मी त्याला म्हटलं होतं, ‘ठीक आहे जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत सकाळी चिन्मयला शाळेला घेऊन जा आणि परत आण.’ तो अदबीने ‘ठीक आहे’ म्हटला आणि तेव्हापासून चिन्मयला नेणं हे त्याचं काम झालं.
त्या घटनेपासून तो गायब एकदम झाला. पण ते सांगायचं राहिलं. मी ज्यावेळी चिन्मयला तो शाळेपर्यंत जातोय की नाही हे पहात होतो तेव्हा हा मला चिन्मयच्या मागे-मागे जाताना दिसला. साधारण पन्नास मिटरचा अंतर सोडून आणि ज्यावेळेला वळण येई रस्त्याला तेव्हा हा रस्त्याच्या झाडाखाली असा तोंड करून ऊभा राही त्यामुळे त्याचे लक्ष जाऊ नये. असं करत करत तो त्याच्या मागे-मागे होता एवढं नक्की. तेवढ्यात स्कुटरवरून मी त्याला शोधायला म्हणून निघालो आणि त्याने मला पाहिलं. मी त्याला पाहिलं. परंतु मी सावध झालोय असं दाखवलं नाही.
आमच्या सकाळच्या झालेल्या चर्चेनंतर तो जो गायब झाला तो गायबच झाला. आलाच नाही परत. झाले असतील दोन-चार दिवस. ती बाई रडत-रडत सांगायला लागली, ‘काय सांगू तुम्हाला माझा नवरा जो गायब झालाय तो कुठं गेला काही कळत नाही. परंतु एकदंरीत दुसऱ्या आफिसर्सच्या सर्वंट क्वार्टर्समधून रात्रीच्या वेळेला फिदी फिदी हसण्याचे आवाज येतात. त्यावेळेला दबक्या आवाजात कोणीतरी बोलत असतं आणि मला संशय येतो की माझा नवरा तिथेच असला पाहिजे.’
हे जरा आणखीन कोड्यात टाकणारं होतं. पण ती बाई होती शहाणी आणि तिच्यावर झालेल्या अत्याचारांमुळे ती थापा मारत असेल असही वाटत नव्हतं. ‘पण तु आम्हा का सांगतेस हे सगळं? तू तर त्याची बायको त्यामुळे तू पण त्याला सामील असली पाहिजेस असा मला संशय येतो. पत्नीने एक मनातलं बोलून दाखवलं. ती म्हटली, ‘अहो बाई, मला काय करायचय, तुमची ही गोजिरवाणी पोरं आणि त्यांना हा राक्षस पळवून नेणार असं मला तो त्या दिवशी सांगत होता ते ऐकून मला कळवळा आला. मी माझ्या जिवाची पर्वा न करता तुम्हाला सांगायला धावत-धावत आले. आता तुमचं तर सोडाच त्याला जर कळलं की मी तुम्हाला सांगितलय तर माझा जीव केव्हा घेईल याची मला चिंता लागलीय.
क्वॉर्टरमध्ये राहून असं नोकराचं काम करणारी माणसं भेटणं किती कठीण आहे, ते मला आठवलं. कारण ह्याच्या आधीची जी एक बाई होती तिला तिच्या नऊवारी साडीच्या ओट्यातून तांदुळ घेऊन पळून जाताना माझ्या पत्नीने पकडली आणि अभावितपणे तिच्या ओट्याचा हात सटकल्यामुळे ते तांदुळ सगळे जमिनीवर पडून तिची चोरी उघड झाली होती. त्यावेळी मी पुढाकार घेऊन त्या कुटुंबाला एअर फोर्सच्या गेटच्या बाहेर काढलायला कारणीभूत झालो होतो. त्यामुळे अशा ह्या नोकरांच्या संदर्भात मी स्ट्रिक्ट अँक्शन घेणारा असा असल्याचा गवगवा झाल्यामुळे नोकरलोक मला व आमच्या कुटुंबाला टरकून होते पण प्रकरण इथे संपलेले नव्हते! खरा फटका पुढच होता...!
भाग दोनमधे... स्कूटरची चोरी !

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अमित खोजे's picture

9 Apr 2014 - 9:45 pm | अमित खोजे

वाचतोय

आदूबाळ's picture

9 Apr 2014 - 9:54 pm | आदूबाळ

अपहरण झालंच नाही ना?

शशिकांत ओक's picture

9 Apr 2014 - 10:19 pm | शशिकांत ओक

मित्रा,
अपहरण करता आले नाही. म्हणून तो वाचला. पण म्हणून अपहरण झालेच नाही असे नाही.

खेडूत's picture

9 Apr 2014 - 10:40 pm | खेडूत

अनुभव आवडले ! :)

आत्मशून्य's picture

9 Apr 2014 - 11:23 pm | आत्मशून्य

रोकींग वाटलं.

शशिकांत ओक's picture

10 Apr 2014 - 12:22 pm | शशिकांत ओक

हे प्रकरण पुढे कसे रंगले?

आता पुढे काय झालं ?कॉलनीतले कडक साहेब काय करतात याची उत्सुकता वाढली .

शशिकांत ओक's picture

10 Apr 2014 - 7:32 pm | शशिकांत ओक

थांब, त्यांची अकड़ ठीक करतो...
त्या मानेचे प्रताप! त्या व्यक्तीने अनेक नावे धारण केली होती, पैकी मला सांगितलेले नाव हा प्रतिसाद देता देता आठवले.