हरवले ते गवसले का? व कसे?
प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.
काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.
----
2. महागात पडले बॉससाठी पीक कॅपची धावाधाव करणे!
गोष्ट जुनी. मी तेंव्हा हवाईदलात नुकताच सामील झालो होतो. पगार वाटपाचे काम हे माझ्या कामाचा महत्वाचा भाग होता. त्याकाळी संपुर्ण स्टेशनभरच्या एयरमन व अन्य सिव्हिलियन्स सर्वांना पगार रोखीने वाटला जाई. आजकाल तो ज्याच्या त्याच्या बँक अकौंटमधे जमा होतो. लाखो रुपयांची उलाढाल होत असे. स्टेशनभरात चाळीस पे पॉईंट्स मधून रोख पैशाच्या थैल्या आदल्या दिवशी तयार करून ठेवाव्या लागत. असाच जुलै 1972 च्या पगाराचा दिवस 31 जुलै उगवला. तो माझा वाढदिवस असल्याने मी हस्तांदोलनासह 'हॅप्पी बर्थ डे' च्या अभिष्टचिंतनाला अभिवादन करून जरा खुशीत होतो. मला ‘बच्चा’ मानून पगाराच्या वाटपातील त्यातल्या त्यात सोपे व कमी जोखमीचे म्हणून ऑफिसर्सना पगार वाटपाला बसवले होते. प्रत्येकाची पे पॅकेट्स तयार केली गेली होती. मला पगार पत्रकावर त्या ऑफिसरची सही घेऊन त्याचे पॅकेट हवाली करायचे असा प्रघात होता. काम चालू झाले. अनेक ऑफिसर मला प्रथमच पहात होते तर काहींच्या बोलण्यातून माझा वाढदिवस असल्याचे समजल्यावर ते परतून शुभेच्छा द्यायला येत होते. त्यांच्या त्या वर्तनाची छाप माझ्यावर पडत होती. काही ऑफिसर ज्यांची पॅकेट्स तयार केली गेली नव्हती अशांसाठी काही पैसे मला दिले गेले होते त्यांना पैसे वाटपासाठी मी त्वरेने कामाला लागत होतो. त्याच दिवशी वीस रुपयांच्या शेंदरी रंगाच्या कोऱ्याकरकरीत नोटा पाहून ऑफिसरांची त्या मिळवायसाठी शंभराच्या नोटा देऊन त्याच्या बदल्यात विसाच्या नव्या नोटा मिळवायची घाई होत होती. मी ते पैसे देताना एकदा, दोनदा मोजून माझ्या सहाय्याला दिलेल्या एयरमनने ते नंतर पुन्हा मोजून देत होतो. असे सगळे सुरळीत चालले असताना आमचे वरिष्ठ लेखा अधिकारी विंग कमांडर नायर मी कसे काय काम करतोय याकडे लक्ष द्यायला माझ्याजवळ आले. तितक्यात त्यांना कमांडींग ऑफिसरांचा 'ताबडतोब भेटायला या' असा निरोप आला. त्यांच्याकडे तेंव्हा पीक कॅप जवळ नव्हती. गडबडीत जायचे ठरले म्हणून त्यांनी मला बोलावून माझी पीक कॅप मागितली. पण ती मी रूमवर ठेवली होती. ‘तुझी ऑफिसर्स मेस मधली खोली जवळच आहे म्हणून जाऊन पटकन आण’ असा हुकूम दिला. मी तरातरा रूमवर गेलो व धापा टाकत परत येत कॅप बॉसच्या हवाली केली. मला धन्यवाद देत मला म्हणाले, ‘तुझ्या करता मी उभा राहून तुझे पगार वाटपाचे काम केले आहे. मी ‘थँक्यू सर’ म्हणून खूष होत म्हटले... काम संपत आले तेंव्हा सर्व पे पॉईंट्समधून पैसे परत यायला लागले. मला ही आता आवरा असा आदेश मिळाला. मी उरलेले पैसे मोजून हिशोब करत राहिलो. उरलेल्या पैशाचा हिशोब लागेना. परत परत मोजूनही कमी पडणाऱ्या रकमेचा मेळ बसत नव्हता! तोवर माझे अन्य लेखा अधिकारी, ‘काय रे काय भानगड आहे?’ असे विचारत मदतीला आले. शेवटी असे ठरले की ‘कमी पडलेले पैसे तुला खिशातून भरायला हवेत!’ असे प्रेमळ भाषेत सांगत माझ्या पहिल्या पगारातून जड मनाने मी ते पैसे खिशातून परत भरायला लागलो. ती रक्कम म्हणजे माझ्या महिन्याच्या पगाराचा अर्धा भाग होता! शिवाय वाढदिवसाची पार्टी पण करायची होती! म्हणून विशेष वाईट वाटले. वरिष्ठ ऑफिसर्स ‘अरे असे होते अधून मधून! आपल्या कामाचा तो एक धोकादायक भाग आहे. आता यातून धडा शीक!’ वगैरे डोस पाजून घरी गेले.
‘सर, तुम्ही कॅप आणायला गेल्यावर बडे साबनी मला ‘मी बघतो. तू थांबला नाहीस तरी चालेल’ म्हणून सांगितले मग मी तुम्ही येईपर्यंत त्यांनी पैसे देताना मी मोजले नाहीत. मला मदत करणारा हळूच म्हणाला. पीक कॅप आणण्याची धावाधाव अशी मला महागात पडली होती! उरलेल्या दोनशे रुपयांकडे पहात मी हवाईदलातील माझे काम म्हणजे पैसे हरवण्याची टांगती तलवार डोक्यावर घेऊन केलेली तारेवरील कसरत आहे याचा झणझणीत हिसका बसला... पैसे मिळाले नाही पण आयुष्यभराचा धडा मात्र मिळाला!
प्रतिक्रिया
6 Apr 2014 - 3:17 am | आत्मशून्य
तिथेही अशी चिंधीचोरी चालते ? का नायर भौंच्या हातून प्रमाद चुकुन घडला असावा ?
कठिन आहे. घोर कलियुग
6 Apr 2014 - 10:16 am | शशिकांत ओक
मला असे अनुभव नाहीत. मजा अशी की त्या बॉसची व माझी गांठ नंतर पडलीच नाही. ते दुसऱ्या दिवशी पासून दोन महिने रजेवर गेले परतले तेंव्हा मला अन्य ठिकाणी पाठवले गेले. मी तेथून परतलो तोवर त्यांची बदली होऊन ते गेले होते. माझ्या वरिष्ठांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट लक्षात आणून दिली होती. पैसे त्यांच्याच हातून गमावले असे कसे नक्की म्हणणार ही त्यांची पंचाईत असावी असो.
ते व मी नंतर कधीच भेटलो नाही!
याच्या नेमके उलटे घडले वो किस्सा फिर कभी!
6 Apr 2014 - 12:03 pm | आत्मशून्य
चुकुन हिकडचे तिकडे झालेली रक्कम मुळ ठिकाणी परतली नाही हे खेद जनक आहे. जो कोणी ही अतिरिक्त रक्कम बाळ्गुन होता त्याला माहीत होते तुम्हाला तो भुर्दंड बसणार आहे. परंतु तुमची परीक्षा /गम्मत वगैरे म्हणून हे केले असेल तर ठीक आहे
6 Apr 2014 - 6:53 am | खटपट्या
मला हि असा अनुभव आला आहे,
6 Apr 2014 - 10:02 am | शशिकांत ओक
लिहायच्या खटपटीला लागा. प्रेमळ विनंती!
6 Apr 2014 - 11:52 am | खटपट्या
लिहायचा प्रयत्न केला आहे
6 Apr 2014 - 10:11 pm | शशिकांत ओक
धागा आवडला...
6 Apr 2014 - 10:09 pm | शशिकांत ओक
मित्रा,
ज्याला जादा पैसे मिळाले असावेत त्यांच्या लक्षात आलं नसेल! कारण असे अनेक असतात की ते मिळालेले पैसे मोजतही नाहीत! असे अनुभवावरून वाटते.
6 Apr 2014 - 11:35 pm | अप्पा जोगळेकर
पीक कॅप बॉस विसरला ही त्याची चूक. बॉसचे खाजगी काम करावेच का ? लष्करात येस सर संस्कॄती असते त्यामुळे का ? बाकी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात अर्धा पगार जाणे फार वाईट.
6 Apr 2014 - 11:58 pm | सुबोध खरे
मी पण लष्करात( आर्मीत) पगार वाटपाचे काम केले असता मला असाच कमांडिंग ऑफिसरचे(मेजर जनरल= मुंबईच्या कमिशनरच्या हुद्द्याच्या अधिकार्याचे) तातडीचे बोलावणे आले तेंव्हा मी शांत शब्दात सांगितले होते कि पैसे वाटप पूर्ण होई पर्यंत मी येऊ शकत नाही. यावर माझ्या वरिष्ठाने मला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला शांतपणे सांगितले कि मला जर अर्ध्या रात्री अत्यंत तातडीसाठी पैसे पाहिजे असतील तर तुम्ही तिजोरी(ट्रेझरी) उघडून पैसे द्याल का. ते म्हणाले तसे करता येत नाही यावर मी शांतपणे सांगितले जर माझी निकड निकड नाही तर कमांडिंग ऑफिसरची पण निकड हि निकड होत नाही. यावर माझे दोन्ही वरिष्ठ निरुत्तर झाले.
असाच दणका मी एका अकाउन्ट्स ऑफिसरला दिला होता त्याला तातडीने वैद्यकीय सर्टीफिकेट हवे होते. मी त्याला विचारले कि मला आत्ता माझ्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे पाहिजेत मिळतील काय? तो म्हणाला एकदा तिजोरी बंद झाली कि ब्रम्हदेव आला तरी पैसे मिळणार नाहीत. मी त्याला सांगितले कि मग कार्यालय बंद झाले तर तुम्हाला सुद्धा सर्तीफिकेट मिळणार नाही. मग तुम्ही कितीही 'वजनदार' असा.औषधोपचार हवे असतील तर देतो. अर्थात "नाराज" होऊन तो गेला
नियम १ - सरकारी नोकरीत कोणीही तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही
नियम २ - आर्थिक व्यवहार करताना काटेकोरपणा बाळगलाच पाहिजे.
त्यात हा माणूस तिरसट आहे अशी तुमची ख्याती होण्याचा धोका असतो
7 Apr 2014 - 12:17 am | आत्मशून्य
एक नंबर. दंडवत. _/\_
डायरेक्ट वरीष्ठ सोडुन बहुतेक ..?
आपले ओक काका हे मनाने बरेच निर्मळ स्वभावाचे आहेत. त्यांच्या स्वभावाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे आजही दिसतात. :(
नक्कि लात कोणाला व का दिली हे जाणुन घ्यायची बौध्दीक क्षमता विकसीत झाली नसल्याने अथवा मुद्दाम म्हणून बरेचदा सगळीच अचानक सुरात सुर मिसळुन एकसाथ उगाचच विरोधी आवाज काढु लागतात हे मात्र खरे आहे. अगदी इथे तिथेही हा अनुभव पुन्हा पुन्हा येतो.
10 Apr 2014 - 7:23 pm | शशिकांत ओक
आमच्या कामाचे स्वरूप असे की नियमात असेल ते व तेवढाच पैसा मिळेल. त्याच्याकडे साठी योग्य खमकेपणा हवा.
10 Apr 2014 - 7:13 pm | शशिकांत ओक
एकदा सेफबंद की बंद इमर्जेंसी काही ही असो... अशी अक्कल बाळगणाऱ्याना बरा धडा दिलात.
7 Apr 2014 - 12:38 pm | शशिकांत ओक
आत्नमशून्यमित्रा,
निर्मल मनाचे असणे चांगले. पण तो भोळेपणात गणला जाऊ लागला की सुरात सूर मिळवून डरांव डरांव करणाऱ्याकडे काही दुर्लक्ष करणारे अनेक भेटतात. तर काहींना खमकेपणाने व खेळकरपणाने गोष्टी सांगाव्या लागतात.
तुमच्या माझ्या जुळल्या तारा तरी खूप झाले!
11 Apr 2014 - 4:18 am | कंजूस
इकडे आड नी तिकडे विहिर .
वरिष्टांची साक्ष काढणार कोण ?अशा काही गोष्टी झाल्या की कायमचेच सल राहातो आणि सरसकट आदर ठेवायचा नाही हे मी नक्की करून टाकले .
11 Apr 2014 - 10:02 pm | मुक्त विहारि
आवडला.