शिव: मूर्तीशास्त्र

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
19 Jan 2014 - 6:04 pm

भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात.

लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या.

वेदांमध्ये शिवलिंगाचे वर्णन कुठे येत असल्याचे मला ठाऊक नाही पण रूद्राचे वर्णन मात्र येते. हा रूद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आजही कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरूप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रूपांमध्ये दिसून येते. ह्या रूद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले.

ऋग्वेदात रूद्राचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.

ऋग्वेद मंडळ १, सूक्त ४३

गाथपतिं मेधपतिं रुद्रं जलाषभेषजम |
तच्छंयोः सुम्नमीमहे ||
यः शुक्र: इव सूर्य: हिरण्यमिव रोचते |
श्रेष्ठ: देवानां वसुः ||
शं नः करत्यर्वते सुगं मेषाय मेष्ये |
नर्भ्यो नारिभ्यो गवे ||

सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो.
हा देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे.
हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो

ऋग्वेद मंडळ २, सूक्त ३३

स्थिरेभिरङगैः पुरुरूप उग्रो बभ्रुः शुक्रेभिः पिपिशेहिरण्यैः |
ईशानादस्य भुवनस्य भूरेर्न वा उ योषद्रु॒द्रादसु॒र्यम् ॥
अर्हन् बिभर्षि सायकानि धन्व अर्हन् निष्कं यजतं विश्व:रूपं ॥
अर्हन् इदं दयसे विश्वं अभ्वं न वै ओजीयः रुद्र त्वत् अस्ति ॥

नानाप्रकारची रूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा भगवान् रुद्राची अंगयष्टि अत्यंत सुदृढ असून त्या आपल्या शुभ्रतेजस व सुवर्ण स्वरुपानेंच तो फार शोभिवंत दिसतो. सर्व भुवनांची समृद्धि, आणि सर्व भुवनांचा प्रभु अशा ह्या भगवान् रुद्रापासून त्याचे ईश्वरी सामर्थ्य दूर झालें असें कधींही होत नाहीं.
तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुलाच शोभतात, तर्‍हेतर्‍हेचे स्वच्छ आणि पवित्र पुष्पहार तू घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. हें विश्व येवढें अवाढव्य व भयंकर पण त्याच्यावरही तूं दया करतोस ही थोरवी तुझीच. कारण हे रुद्रा, तेजस्वीपणांत तुझ्यापेक्षां वरचढ असा कोणी आढळणारच नाही.

ऋग्वेद मंडळ ७ सूक्त ४६

मा नः वधीः रुद्र मा परा दाः मा ते भूम प्रऽसितौ हीळितस्य
आ नः भज बर्हिषि जीव:शंसे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥

आम्हाला मारू नको आणि दूर टाकून किंवा परक्यांच्या हातांतही देऊन टाकू नकोस. अथवा आमचा पराभव करू नकोस. तुझ्या क्रोधरूपाच्या पापरूपी बंधनांत आम्ही बद्ध न होऊं. हविचा स्वीकार कर. तुम्ही सदा सुवचनांनी आमचा प्रतिपाळ करा.

नमुन्यादाखल दिलेल्या वरील सूक्तांमध्ये रूद्राचे मूळचे अनार्य स्वरूप त्याच्या क्रोधरूपाने प्रकट होत्सेते दिसते.

रूद्राचे जसे भयानक म्हणून वर्णन आले आहे त्याच प्रमाणे तो भयनाशक अथवा कल्याणकारक असल्याचेही वर्णन ऋग्वेदांत आलेले आहे. जलाषभेषज अथवा जलौषधींचा प्रभू असे रूद्राला मानले गेले आहे. रूद्राला शिवाचे स्वरूप कधी आले ते नेमके सांगता येत नाही मात्र हा बदल वेदोत्तर काळात घडला आणि गुप्तकाळापासून (इ.स.३५०-५००) शिवाला आजचे स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही.

अर्थात हा लिंग,, रूद्र, शिव हा बराच मोठा विषय असून ह्याच्या फारश्या खोलात न जाता आपण आता शिवलिंगे आणि शिवमूर्तींचे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने काही प्रकार बघूयात.

शिवलिंगे

शिवलिंगाची रचना सर्वसामान्यपणे शाळुंका अथवा योनी व त्यामध्ये लिंग अशा प्रकारची असते. ह्यालाच सयोनीज शिवलिंग असे म्हणतात. हे आपल्या नेहमीच्या माहितीतले शिवलिंग.

पिंपरी दुमाला येथील यादवकालीन मंदिरातील सयोनीज शिवलिंग.
a

आता आपण यातील काही भन्नाट प्रकार पाहूयात. यातील काही प्रकार पूर्वीच माझ्या पाटेश्वर मंदिरावरील लेखात आलेलेच होते.

१. एकमुखलिंग

यामध्ये शिवलिंगावर एक मुख कोरलेले असते.

पाटेश्वर येथे अशा प्रकारचे एक शिवलिंग आहे. ह्या एकमुखलिंगाभोवती लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.

पाटेश्वर येथील एकमुखलिंग
a

२. चतुर्मुखलिंग

यातील शिवलिंगावर चार मुखे कोरलेली असतात. सर्वसाधारणपणे ही चार मुखे म्हणजे शिवाची चार रूपे असतात. अघोर, उष्णीषिन्. योगी आणि स्त्री.
महाभारतातल्या अनुशासनपर्वातील उमामाहेश्वर संवादानुसार तिलोत्तमा नावाच्या अत्यंत सुंदर अप्सरेला आपल्या भोवती फिरताना पाहून तिच्या फिरण्याच्या दिशेप्रमाणे शंकराला चार मुखे उत्पन्न झाली. तसेच त्यात शंकर पुढे म्हणतो की पूर्वेकडील मुखाने मी इंद्रपद भोगतो, उत्तरेकडील मुखाने मी तुझ्याशी रतीक्रिडा करतो, पश्चिमेकडील मुखाने मी सर्व प्राण्यांना सुख देतो तर दक्षिणेकडील मुखाने मी रौद्र असून त्याद्वारे मी संहार करीत असतो.

तर काही संशोधकांच्या मते ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य ह्यांची प्रतिके असतात.

पाटेश्वर येतीलच चतुर्मुखलिंग.

a

३. दिक्पालरूपी शिवलिंग.

हे ही शिवलिंग पाटेश्वर येथीलच आहे. यात शाळुंकेवरील शिवलिंगाभोवती चक्र, चांदणी, बदाम यांच्या आकृत्या आहेत. एकूण दहा चिन्हे यावर कोरलेली आहेत. यातील आठ चिन्हे म्हणजे अष्टदिक्पालांचे प्रतिक असावे तर उरलेली दोन सूर्य आणि विष्णूची प्रतिके असावीत.

a

४. अष्टोत्तरशत लिंग.

अष्टोत्तरशतलिंगामध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १०८ अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.

पाटेश्वर येथील अष्टोत्तरशत लिंग
a

५. सहस्त्रलिंग

सहत्रलिंगांमध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १००० अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.

पाटेश्वर येथीलच अजून एक सहस्त्रलिंग

a

६. कोटीलिंग

हा प्रकार पण सहस्त्रलिंगासारखाच पण यातील अयोनीज लिंगांची संख्या हजारापेक्षाही अधिक असते तेव्हा त्याला कोटीलिंग म्हणतात.

पाटेश्वर येथील कोटीलिंग
a

शिवलिंगांचे ढोबळमानाने काही प्रमुख प्रकार आपण बघितलेच. पाटेश्वरला यापेक्षाही अधिक प्रकारची लिंगे आहेत पण ती याधीही लेखात येऊन गेलेलीच आहेत आणि त्यातील बरीचशी तांत्रिक पंथाशी संबंधित आहेत म्हणूनच आता यावर अधिक काही न लिहिता आपण शिवमूर्तींकडे वळूयात.
यातील बहुतेक शिवमूर्ती वेरूळ येथील लेण्यांत आढळतात. वेरूळ लेण्यांविषयीच्या अधिक माहितीविषयी माझी वेरूळ लेणींविषयीची लेखमाला पाहावी.

शिवमूर्ती

सर्वसाधारणपणे शिवमूर्तींची मांडणी म्हणजे चार हात, हाती डमरू, त्रिशुळ, कमंडलु, अक्षमाला, गळ्यात नाग, वाहन नंदी अशी. पण शिवमूर्तींचेही अनेक प्रकार आहेत त्यातील काही मोजके प्रकार आता येथे बघू.

यातील पहिलीच मूर्ती पाहूयात ती लिंगोद्भव शिवाची.
ही मूर्ती लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही प्रकारांत गणली जाते.

१. लिंगोद्भव शिव.

एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.

वेरूळ कैलास लेण्यातील लिंगद्भव शिवप्रतिमा
a

पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील लिंगोद्भव प्रतिमा. a

२. लिंगिन शिवमूर्ती

हा एक शिवमूर्तीचा आगळावेगळा प्रकार. सर्वसाधारणपणे ही मूर्ती उमामाहेश्वर प्रकारात दिसते. यात शिवाने शिवलिंग धारण केलेले दिसते. यालाच लिंगायत मूर्ती असेही काहीजण म्हणतात. आजही लिंगायत लोक आपल्याकडे सतत शिवलिंग धारण करत असतात.
उमामाहेश्वर प्रकार (म्हणजे शिव पार्वती यांच्या एकत्रित मूर्ती) यातच अंतर्भूत असल्याने त्याचे वेगळे वर्णन करीत नाही.

वेरूळच्या कैलास लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुरावर असणारा हा लिंगिन शिव

a

वेरूळ कैलास लेणीच्याच प्रदक्षिणापथावर असलेला हा लिंगिन शिव
a

प्रदक्षिणापथावरच असलेली लिंगिन शिवाची अजून एक प्रतिमा.
ह्याने आपल्या उजव्या हातातील बोटांमध्ये शिवलिंग धारण केले आहे.

a

३. त्रिमुखी शिव.

ह्याला तीन मुखे असतात. त्रिमुखी शिवाची सर्वात प्रसिद्ध प्रतिमा म्हणजे घारापुरी येथील ब्रह्मा-विष्णू-महेश अशी मानली गेलेली शिवप्रतिमा. वास्तविक ही प्रतिमा ब्रह्मा-विष्णू-महेश अशी नसून शंकराच्याच सदाशिव रूपाची आहे.

वेरूळ येथील त्रिमुखी शिव
a

४. चतुर्मुख शिव.

ह्याच्या नावाप्रमाणेच ह्याला चार मुखे आहेत. काही संशोधक ह्यालाच सदाशिव (पंचमुखी शिव) असे मानतात ह्याचे पाचवे मुख हे दाखवले नसते व ते आकाशाच्या दिशेने असे मानले जाते.

पाटेश्वर येथील चतुर्मुख शिव

a

५. लकुलीश शिव

इसवीसनाच्या पहिल्या शतकानंतर व गुप्तकाळाच्या आधी लकुलीश नावाच्या मुनीने पाशुपतमताची स्थापना केली. हे मत ळूहळू मान्य होत जाऊन लकुलीश हा शिवाचेच प्रतिक झाला. ह्याची मुख्य लक्षणे म्हणजे ह्याच्या हातात सोटा अथवा लगूड असते आणि हा उर्ध्वरेता असतो. ह्याचा एक हात नेहमी वरदमुद्रेत असतो. लकुलीश शिवाची मूर्ती पद्मासनी अथवा उभ्या अशा दोन्ही प्रकारांत सापडते.

वेरूळ लेणी क्र. २९ मधील पद्मासनस्थ लकुलीश शिवाची मूर्ती

a

वेरूळ कैलास लेणीतील (लेणी. क्र. १६) उभ्या अवस्थेतील उर्ध्वरेता लकुलीश
a

६. अजएकपाद शिव

हा शंकराच्या मूर्तीचा एक अतिशय दुमिळ प्रकार. महाभारतात वर्णिल्याप्रमाणे हा रूद्र कुबेराबरोबरच धनाचे रक्षण करत असतो. याचे तोड बकर्‍याचे असल्याने हा अग्नीशी समान मानला जातो तर ह्याने आपले संतुलन एकाच पायांवर खुबीने साधलेले असते.

पाटेश्वर येथील अजएकपादाची दुर्मिळ प्रतिमा

a

७. नटराज शिव अथवा नृत्य मूर्ती

हा एक सर्वपरिचीत प्रकार. नटराज प्रकारात शिव हा नृत्यमुद्रेत दिसतो. शिवाने १०८ प्रकारे नृत्य केले अशी मान्यता आहे. तांडवनृत्यसुद्धा ह्या नटराज प्रकारातच येते.
नटराज शक्यतो चारापेक्षा अधिक हातांचा दर्शवला जातो. ८, १०, १६ हातांचेही नटराज आहेत. हातांमध्ये त्याने खङग, शक्ती, दंड, त्रिशुल, नाग, ज्वाला इत्यादी आयुधे धारण केलेली असतात.

वेरूळ लेणी क्र. २१ रामेश्वर येथील कटीसमनृत्यमुद्रेत असलेली शिवप्रतिमा
a

वेरूळ लेणी क्र. १६ येथील शिवतांडव प्रतिमा
a

८. कल्याणसुंदर मूर्ती

शिवपार्वती विवाहाचे अंकन दाखवणार्‍या मूर्तीस कल्याणसुंदर मूर्ती म्हणतात. ह्या मूर्तींमध्ये शिवाने पार्वतीचा हात आपल्या हाती घेतलेला असतो. ब्रह्मदेव हा भटाचे काम करत असतो तर दिक्पाल, विष्णू आदी देव शिवाच्या विवाहाप्रित्यर्थ आलेले असतात.

वेरूळ लेणी क्र. २९ मधली कल्याणसुंदर मूर्ती
a

वेरूळ लेणी क्र. २१ मधली कल्याणसुंदर मूर्ती
a

९. सोमास्कंदमूर्ती

या मूर्तीमध्ये शिव आणि पार्वती यांचे मध्ये लहानसा स्कंद अथवा कार्तिकेय असतो.. अर्थात स उमा स्कंद (उमेसहित स्कंद) तो उभा, बसलेला किंवा आईच्या किंवा बाबांच्या मांडीवरही दाखवला जातो.

वेरूळ कैलास लेणीमंदिराच्या अंतराळात सोमास्कंद मूर्ती कोरलेली आहे.
a

आतापर्यंत आपण उमामाहेश्वर आणि केवल शिव प्रकारच्या मूर्ती पाहिल्या आता शिवाच्या मूर्तींचे अजून काही प्रकार बघू.

यात येतात ते अनुग्रह आणि संहारमूर्ती

सुरुवातीस अनुग्रहमूर्ती पाहूयात.

१०. अनुग्रहमूर्ती

अनुग्रहमूर्ती म्हणजे शंकराच्या वरप्रदानास अथवा अनुग्रहास प्राप्त झालेल्या व्यक्तिची कथा.
ह्यात रावणानुग्रह आणि मार्केंडेयानुग्रह असे दोन उपप्रकार येतात.

१०.१ रावणानुग्रहशिवमूर्ती

कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची थोडक्यात कथा.

वेरूळच्या कैलास लेणीत रावणानुग्रहाचे अतिशय अप्रतिम शिल्प आहे.

शिल्पपटात कैलास पर्वत उठावात कोरलेला आहे तर त्याच्या खालच्या भागात खोबणी करून त्यात रावणाचे शिल्प कोरलेले आहे. रावणाची मस्तके सुटी आहेत. कैलास उचलताना रावणाने एक पाय गुडघ्यात मुडपून दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोविला आहे. आपल्या वीस हातांनी सर्व शक्ती पणास लावून त्याने कैलास अर्धवट उचललेला आहे. इतकी प्रचंड ताकत पणास लावताना साहजिकच रावणाची मान तिरकी झालेली असून कानातले एक कुंडल खांद्यावर टेकलेले आहे तर दुसरे कुंडल हवेत झुलत आहे. कैलास पर्वतावरील घनदाट वनराजी त्यावर झाडे आणि त्यावरील भयभीत मर्कटे कोरून दाखवली आहे. वृक्षराजीच्या वर भयभीत शिवगण तर शेजारी दोन द्वारपाल कोरलेले आहेत. पार्वतीच्या शेजारी असलेली एक दासी पाठमोरी होऊन पळून जात आहे. तर भयभीत पार्वतीला निर्विकार शंकर धीर देत असून एका पायाने कैलास दाबून धरत आहे. आकाशात अष्टदिक्पाल रावणाचे हे गर्वहरण पाहावयास जमले आहेत.

a

वेरूळ लेणी क्र २९ मधील रावणानुग्रहशिवमूर्ती
a

वेरूळ लेणी क्र. २१ (रामेश्वर) येथील रावणानुग्रहशिवमूर्ती. लक्ष्यपूर्वक पाहिल्यास रावणाचे दहावे मुख हे गर्दभाचे असल्याचे दिसेल.

a

a

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील बाह्यभिंतीवर कोरलेली रावणानुग्रहशिवमूर्ती
a

१०.२ रावणानुग्रहशिवमूर्ती प्रकार दुसरा

रावणानुग्रहशिवमूर्तीचा अजून एक प्रकार वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर पाहावयास मिळतो. या कथेप्रमाणे वरप्राप्तीसाठी रावण दहा हजार वर्षे तप करतो प्रत्येक सहस्त्र वर्षानंतर आपले एकेक मस्तक कापून शंकराला अर्पण करतो जेव्हा शेवटी आपले शेवटचे मस्तक कापून देण्यास सिद्ध होतो तेव्हा भगवान शंकर प्रकट होऊन त्याला वर प्रदान करतात.

अर्थात यातील गंमत म्हणजे ही कथा आहे मूळची ब्रह्मदेवासंदर्भात. वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण हा ब्रह्मदेवाला मस्तके अर्पण करून वरप्राप्ती करून घेतो. तर येथे मात्र शिवाची कथा कोरलेली आहे. एकंदरीतच वैदिक देवता विस्मृतीत जात असताना शैव, वैष्णव पंथांचे प्राबल्य कसे वाढायला लागले होते याचा हा एकप्रकारे पुरावाच.

मूळ वाल्मिकीरामायणातील श्लोक पहा.

दशवर्षसहस्रं तु निराहारो दशाननः ।
पूर्णे वर्षसहस्रे तु शिरश्चाग्नौ जुहाव सः ||

एवं वर्षसहस्राणि नव तस्यातिचक्रमुः ।
शिरांसि नव चाप्यस्य प्रविष्टानि हुताशनम् ॥

अथ वर्षसहस्रे तु दशमे दशमं शिरः ।
छेत्तुकामे दशग्रीवे प्राप्तस्तत्र पितामहः ॥

पितामहस्तु सुप्रीतः सार्धं देवैरुपस्थितः ।
तव तावद् दशग्रीव प्रीतोऽस्मीत्यभ्यभाषत ॥

शीघ्रं वरय धर्मज्ञ वरो यस्तेऽभिकाङ्‌क्षितः ।
कं ते कामं करोम्यद्य न वृथा ते परिश्रमः ॥

कथेचा थोडक्यात आशय वर दिलाच असल्याने आता याचे परत भाषांतर करीत नाही.

वेरूळ येथील कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील रावणानुग्रहशिवमूर्ती

a

१०.३ मार्कंडेयानुग्रहमूर्ती

अनुग्रहमूर्तीचाच पुढचा प्रकार म्हणजे मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती. अर्थात हीच मूर्ती शिवाच्या संहारमूर्तीमध्येही गणली जात असल्याने हिच्याबद्दल अधिक उहापोह मी पुढील संहारमूर्ती प्रकरणात करतो.

११. संहारमूर्ती.

ह्या मूर्तीचे शिवाचे संहाररूप अथवा रौद्ररूप दाखवतात. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी शिवाने रौद्ररूप धारण करून त्यांचा संहार केला. ह्या सर्व कथा संहारमूर्तींमध्ये कोरलेल्या असतात. संहारमूर्तींमध्येच भैरवाचाही समावेश आहे पण आपण भैरवमूर्ती नंतर एका स्वतंत्र प्रकरणात पाहूयात.

संहारमूर्तीमध्ये पहिली मूर्ती घेऊ ती म्हणजे कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहमूर्ती

११.१ कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती.

ह्या मूर्तीचा समावेश एकाचवेळी अनुग्रह आणि संहार अशा दोन्ही प्रकारांमध्ये होतो याचे कारण म्हणजे मार्कंडेयावर अनुग्रह करून शिव साक्षात कालरूपी यमाचे पारिपत्य करीत आहे.

याची थोडक्यात कथा अशी.

पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.

वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर असलेली कालारी शिव प्रतिमा
a

वेरूळ येथील कैलास लेणीमधील कालारी शिवप्रतिमा
a

११.२ व ११.३ गजासुरसंहारमूर्ती आणि अधकासुरवधमूर्ती

ह्या दोन्ही मूर्तीबाबत एकच कथा आहे.

अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणार्‍या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याच एक दात उपटतो आणि त्यानंतर त्याचे गजचर्म अंगाभोवती गुंडाळून एका हाती वाडगा धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. आपल्या त्रिशुळावर उचलून धरलेल्या अंधकाचे रक्त वाडग्यात गोळा करतो तसेच वाडग्याबाहेर पडणारे रक्ताचे चुकार थेंब त्वरेने शोषून घेण्यासाठी आपल्या योगसामर्थ्याने मातृकेची (चामुंडेची) उत्पत्ती करतो.

वेरूळच्या कैलास लेणीतील गजासुरवधाची ही मूर्ती

a

वेरूळच्या लेणी क्र. २९ मधील अंधकासुरवधाचे हे अतिशय प्रत्ययकारी शिल्प. पहा शिवाचे डोळे कसे भयानक क्रोधाने खोबणीतून पार बाहेर आलेले आहेत.

a

कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील अंधकासुरवधाचे अजून एक शिल्प

a

११.४ त्रिपुरांतकशिवमूर्ती

तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली. ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या पुरांमुळे अतिशय बलवान झाएल्या ह्या तीन्ही असुरांचा शंकराने विष्णूरूपी बाण करून त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा.

वेरूळ येथील प्रदक्षिणापथावरील त्रिपुरांतक शिवमूर्ती.

a

आता संहारमूर्तीपैकीच एक असलेल्या शिवाच्या भैरवरूपाबाबत आपण पाहू.

१२. भैरव

भैरव हे शंकराचे पूर्ण रूप होय. तो सर्व जगाचे भरण करतो आणि रूपाने भीषण आहे म्हणूनच ह्या रूपाला भैरवरूप असे म्हणतात. भैरवमूर्ती महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळतात. साक्षात यमरूपी काळही त्याला घाबरून असतो म्हणून त्याला काळभैरव असेही संबोधले जाते.
बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणारे दात, गळ्यात नरमुंडमाला, त्रिशुळावर किंवा हातात नरमुंड लटकावलेले, नरमुंडातील गळणारे रक्त चाटणारे एक किंवा अधिक कुत्रे (भैरवाचे वाहन्ही कुत्राच आहे), सर्परूपी दागिने ही भैरवाची प्रमुख वैशिष्ट्ये. भैरवमूर्ती बरेचदा नग्नावस्थेतही दाखवलेल्या असतात.

भैरवाबाबतची कथा अशी-
ब्रह्मदेवाने रूद्र उत्पन्न केला आणि त्याला कपालि या नावाने संबोधून पृथ्वीचे रक्षण कराण्यास सांगितले. या नावामुळे स्वतःचा अपमान झाल्याचे वाटून रूद्राने आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्माचे पाचवे मस्तक तोडून त्याला चतुर्मख केला. तथापि ते मस्तक त्याच्या हाताला चिकटून राहिले. ह्यापासून मुक्त होण्यासाठी ब्रह्मदेवाने त्याला १० वर्षे कापालिक व्रत करण्यास सांगितले. रूद्राने केसाचे जानवे आणि अस्थींचा हार घातला. जटामुकुटावर नरमुंड ठेवले व हातात रक्ताने भरलेले कपाल घेऊन तीर्थाटन केले व काशीस त्याच्या अंगठ्यास चिकटलेले मस्तक गळून तो मुक्त झाला.
शंकराच्या ह्या रूपालाच भैरवरूप म्हटले जाते.

भैरवमूर्तींचे असंख्य प्रकार आहेत. कोकणात आढळणार्‍या वेताळ मूर्ती म्हणजे असितांग भैरवाचाच एक प्रकार.
सामान्य, क्षेत्रपाल, चंड, स्वच्छंद, स्वणाकर्षण, आसितांग्, बटुक, कापाल, भीषण, घोर असे भैरवाचे विविध प्रकार.

वेरूळ येथील लेणी क्र. २१ येथील असितांग भैरव.
a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेली भैरवमूर्ती.
a

खिद्रापूर येथीलच गजारूढ भैरव
a

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील भैरवमूर्ती
a

भुलेश्वर मंदिर, पुणे येथील उजवीकडील दोन भैरवमूर्ती

a

पूरच्या कुकडेश्वर मंदिरावरील भैरव प्रतिमा

a

रांजणगावाजवळील पिंपरी दुमाला येथील दुर्लक्षित मंदिराच्या बाह्यभागावरील ही भैरव प्रतिमा

a

पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील भैरव मूर्ती
a

भैरव प्रतिमा पाहून झाल्यावर मी आता इशाण प्रतिमांकडे वळून लेखाचा समारोप करतो.

१३. इशण

हा अष्टदिक्पालांपैकी एक. इंद्र, अग्नी, वायु, वरूण, कुबेर, यम, निऋती आणि इशान्य दिशेचा पालन करणारा हा लोकपाल म्हणजे इशण अथवा इषान. हे शिवाचेच एक रूप. ह्याची लक्षणे सर्वसामान्यपणे शंकराचीच असतात. म्हणजे त्रिशुळ, डमरू वगैरे.

पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही इशण मूर्ती
a

टोके गाव, प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरातील विष्णू उपमंदिरावरील ही इशण मूर्ती
a

आतापर्यंत आपण काही प्रकारची शिवलिंगे तर बर्‍याच प्रकारच्या शिवप्रतिमा पाहिल्या. यातले बरेचसे प्रकार उदा. दक्षिणामूर्ती, भिक्षाटनमूर्ती, चंद्रशेखरमूर्ती, गंगाधरमूर्ती, वीरभद्र आदिंची छायाचित्रे माझ्याजवळ नसल्याने इथे द्यायच्या राहून गेल्यात. जर कुणाजवळ तशा मूर्तीची छायाचित्रे अथवा वर्णन असेल तर ते येथे अवश्य द्यावेत.

पुढेमागे क्वचित विष्णू, दिक्पाल, मातृका यांवरही लिहिण्याचा विचार आहे. बघू कधी आणि कसे जमते ते.

कलाधर्मइतिहासकथाछायाचित्रणमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

22 Jan 2014 - 12:25 pm | मृत्युन्जय

सुरेख लेख आणि सुंदर प्रतिक्रिया. असा योग क्वचितच जुळुन येतो.

पियुशा's picture

22 Jan 2014 - 12:52 pm | पियुशा

अप्रतिम , उत्तम सचित्र आणी माहीतीपुर्ण लेख :) किती छान कलेक्शन आहे तुझ्याकडे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jan 2014 - 7:07 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी

प्यारे१'s picture

22 Jan 2014 - 7:28 pm | प्यारे१

>>>पुढेमागे क्वचित विष्णू, दिक्पाल, मातृका यांवरही लिहिण्याचा विचार आहे.

कधी लिहीणार रे?

काही लघु प्रश्नः
बाकी शिवमंदीरांचं ट्रान्स्फॉर्मेशन देवीच्या मंदीरामध्ये सुद्धा बघायला मिळतं.
बाकी वल्ली, मूर्तीरुपातल्या शंकराची पूजा कुठे पहायला मिळते का?
गाभार्‍यात शंकराची मूर्ती आहे असं.
पिंड नाही पण मूर्ती आहे असं कुठं दिसतं का?

प्रचेतस's picture

22 Jan 2014 - 9:49 pm | प्रचेतस

कधी लिहीणार रे?

लिहिण्याची इच्छा होईल तेव्हाच. :)

बाकी वल्ली, मूर्तीरुपातल्या शंकराची पूजा कुठे पहायला मिळते का?

बर्‍याच ठिकाणी. हल्लीच्या बर्‍याच आधुनिक मंदिरांत मूर्त रूपातल्या शंकराची पूजा होते. इथे (पिंपरी चिंचवडला) सिंधी समाज बराच असल्याने मूर्त रूपातल्या शंकराची मंदिरे आहेत. पण तरीही जास्ती करून लिंगरूपच पुजले जाते.

पिंड नाही पण मूर्ती आहे असं कुठं दिसतं का?

तसं नाहीच म्हटलं तरी चालेल. काही ठिकाणी मूर्ती मुख्य असली तरी बाजूला पिंड असतेच्च. :)

बॅटमॅन's picture

22 Jan 2014 - 11:25 pm | बॅटमॅन

पर्वतीच्या देवदेवेश्वर मंदिरात असे दिसते, बरोबर? आयमीन पिंड असो पण मूर्तीरूप देखील?

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jan 2014 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते

पिंड की पिंडी की दोन्ही सेमच?

बॅटमॅन's picture

23 Jan 2014 - 2:51 pm | बॅटमॅन

मला तर वाटते सेमच आहे.

प्रचेतस's picture

23 Jan 2014 - 8:32 pm | प्रचेतस

पिण्ड / पिण्डी म्हणजे 'गोळा'. म्हणजे थोडक्यात एखाद्या पदार्थाचा एकत्र केलेला ढीग. शिवलिंगाचा आकार एखाद्या ढिगासारखाच असल्याने त्याला पिंडी म्हणत असावेत. पिण्ड हा शब्द पितरांच्या नैवेद्याच्या बाबतीत जास्त करून वापरला जात असल्याने (त्यास अशुभ समजून) शिवलिंगाच्या बाबतीत पिण्डाऐवजी 'पिण्डी' हा शब्द वापरला जात असावा.

बाकी पर्वतीवरचे मंदिर अगदी लहान असताना पाहिले असल्याने आता तेथील काहिही आठवत नाही. जाऊयात एकदा.

राईट. लिंगासाठी खरेतर पिंड-पिंडी असे दोन्हीही शब्द ऐकलेत. मिरजेकडे पिंड हा शब्दच जास्त ऐकलाय.

अन पर्वतीला जाऊ एनीटैम.

माहितीचा महासागर आहे हा लेख म्हणजे. त्यात परत ठीकठिकाणच्या भटकंतीद्वारे स्वतः मिळवलेली प्रत्यक्ष प्रमाणे जोडल्यामुळे एक वेगळेच वजन आलेय जे नुस्त्या ग्रांथिक माहितीने आले नसते.

लकुलिश, भैरव, एकपाद अज आणि बाकी तीनचार फॉर्म हे एकदम वेगळे वाटले. सहस्रलिंग व कोटिलिंग हे जबरीच आहे. शिल्पांबद्दल म्हणायचे तर वेरूळची शिल्पे सर्वांत जबराट वाटली.

चवीचवीने वाचून आस्वाद घ्यायचा लेख आहे हा. ही प्रतिक्रिया टोकनमात्र समजावी. आयकॉनॉग्राफीचा अत्युत्तम धडा म्हणून याचे मूल्य वादातीत आहे.

मराठे's picture

23 Jan 2014 - 1:39 am | मराठे

मस्त

भ ट क्या खे ड वा ला's picture

23 Jan 2014 - 12:00 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूपच माहिती पूर्ण आणि मूर्तिकले कडे नवीन दृष्टीने पाहण्याची जाणीव करून देणारा लेख
धन्यवाद

भ ट क्या खे ड वा ला's picture

23 Jan 2014 - 12:01 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूपच माहिती पूर्ण आणि मूर्तिकले कडे नवीन दृष्टीने पाहण्याची जाणीव करून देणारा लेख
धन्यवाद

हा फोटो मी बागडोगराला असलेल्या BSF च्या वसाहतीमध्ये असलेल्या मंदिरातून घेतला आहे. हे मंदिर जनतेसाठीपण खुले आहे. मंदिराच्या परिसरातून पाय हलत नव्हता. इतका छान निसर्ग की........................ बस्स........!!!

इतकी शांतता की............. फक्त शांततेचाच आवाज येत होता.

बाप्पा, आईबाबांच्या मांडीवर न बसता पुढ्यात बसले आहेत. आणि बाप्पाच्या पुढ्यात, खड्ड्यामध्ये शिवलिंग आहे.....

श्रीनिवास टिळक's picture

23 Jan 2014 - 11:15 pm | श्रीनिवास टिळक

प्राचीन विविध शास्त्र परंपरांची ओळख करून देणाऱ्या प्रसाद प्रकाशनच्या पालवी ह्या चर्चा सत्राचा पहिला कार्यक्रम २५ जानेवारी रोजी सुरु होत आहे. त्याचे पहिले पुष्प प्रा. गो. बं. देगलूरकर हे गुंफणार आहेत. त्यांचा विषय आहे: मूर्ती रचना, त्यामागील विज्ञान, मंदिरे, मूर्ती इ. कशी पहावी. स्थळ प्रसाद प्रकाशन मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे ३० वेळ: सायंकाळी ६ ते ८:३० फोन २४४७१४३७

शशिकांत ओक's picture

24 Jan 2014 - 1:04 pm | शशिकांत ओक

श्री निवासजी,
आपण सादर केलेल्या माहितीमुळे चर्चा सत्रात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायला आवडेल. जरूर प्रयत्न करून येईन. आपण ही तेथे असाल तर प्रत्यक्ष भेट होईल. माझ्या मो.वर मिस कॉल दिलात तर पटकन ओळख पटेल.

अवश्य; उद्या (२५/१) प्रसाद प्रकाशनमध्ये व्याख्यानाच्या आधी (किंवा नंतर) भेटू

मित्र वल्ली,
सुयोग्य शब्दात माहितीचा साज चढवलेले शिवतत्वाचे फोटोपाहून भारतीय शिल्पकलेच्या विविध अविष्कारांचा विहंगम परिचय सादर केल्याबद्दल धन्यवाद.
1

नुकतेच ‘भारतीय मूर्तीशास्त्र’ - लेखक - डॉ. नि. पु. जोशी, प्रसाद प्रकाशन, पुस्तक वाचनात आले. आवडले. जुन्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण असल्याने सध्याप्रमाणे रंगीत वा कृष्ण- धवल फोटोंची रेलचेल त्यात नाही. असो.
त्यातील विविध हस्त मुद्रा व नावे –
3

मित्र विवेक चौधरींनी कांचीपुरमच्या कांची-कामाक्षी मंदिरातील एका खांबावरील दक्षिणामुर्ती शिवांची शिल्पमुद्रेचा फोटो काढला होता तो सादर.

1

दक्षिण भारतात शिवाच्या रुपात ते विविध कला व ज्ञानाचे गुरू मानले जातात. त्यांचे तोंड दक्षिण (यम) दिशेला असून वडाच्या झाडाखाली ते एक पाय मांडीवर घेऊन आसनस्थ आहेत. त्यांच्या सोबत अनेक विषयाचे विचारक व साधक ज्ञान प्राप्तीसाठी दाटीने मिळेल त्या दगडाधोंड्यांवर बसून विचारविनिमय करताना दिसतात. कधी कधी नंदी बाजूला ते निरखनाता दिसतो. उजव्यापायांच्या खाली एका बुटक्या अपस्मार नावाच्या दैत्याला शिवांनी त्याने अज्ञान, संशय व दुर्मतीला पायाने दाबून धरलेले आहे असे मानले जाते. या रूपात शिव चार हाताचे असून एका मागच्या हातात धगधगता अग्नी वा मशाल तर दुसऱ्या हाती जपमाला तर कधी ताडपत्रांची चवड, धरलेली दिसते. काही ठिकाणी ते वीणावादन करताना किंवा वीणा बाजून ठेवलेली असे दिसतात. उजवा हात इथे त्यांनी आपल्या हृदयाला उजव्या बाजूला असल्याचा संकेत करताना दिसतो.
7

या चित्रात उजवा खालचा हात कर्तरिमुद्रेत तर डावा वरदमुद्रेत दिसतो. कर्तरी मुद्रा ज्ञान मुद्रेसमान असावी. पैकी तीन उघडलेली बोटे गर्व, दुष्कृत्य व स्वतः बद्दलची भ्रामक वा आभासी समजूत यांच्यापासून दूर अंगठा म्हणजे शिवतत्व आणि तर्जनी म्हणजे जीव तत्व यांचे एकत्र येणे असे मानले जाते.

9

या मंदिरातील आणखी एक मुर्ती श्वानवाहन कालभैरवाची आहे. यावर आणखी प्रकाश टाकला जावा ही विनंती.

प्रचेतस's picture

24 Jan 2014 - 12:35 pm | प्रचेतस

धन्यवाद.

भारतीय मूर्तीशास्त्र हे डॉ. नी. पु. जोशींचे पुस्तक सुरेख आहे पण अतिशय संक्षिप्त माहिती आहे.
दक्षिणामूर्ती शिवाचे वर्णन खासच. ही अशी एक मूर्ती बहुधा वेरूळ येथे आहे. पण माझ्या नजरेतून मात्र निसटली.
शेवटची मूर्ती पण जबरी. मस्तकी अग्नीज्वाळांसारखे उभे राहिलेले केस हे पण भैरवाचे एक लक्षण आहे.

वल्ली,
आपण दक्षिणेतील मंदिरे व शिल्पे, शीलालेख यावरही प्रकाश टाकावा. ही विनंती. अशी काही मोहीम आपण काढणार असाल तर सहभागी व्हायला आवडेल. हैयोहैयैयो विविध भाषा व प्राचीन शीलालेखांवर अभ्यास करणारे आहेत, त्यांना समाविष्ट होता आले तर फारच छान.
या कामाक्षी मंदिरातील खांबावर आणखी काही शिल्पदृष्ये आहेत त्यात कामदेव-रती, कन्नप्पन यांच्या कथानकाला सादर केले गेले आहे. विवेक यांना ते फोटो व त्यावरील त्यांचे कथन टाकायला विनंती करतो.

प्रचेतस's picture

24 Jan 2014 - 11:20 pm | प्रचेतस

दक्षिण स्वारी अजून केलेली नाही. ती मोहिम पूर्ण झाल्याशिवाय त्या विषयावर लिहिणेही होणार नाही. बघू कसे जमते ते. तुम्हाला नक्की सांगेनच.

कामाक्षी मंदिरातल्या स्तंभ शिल्पांविषयी वाचायला आवडेलच.

शशिकांत ओक's picture

1 Feb 2014 - 11:53 pm | शशिकांत ओक

भैरवमूर्ती बरेचदा नग्नावस्थेतही दाखवलेल्या असतात.

सध्या पिठापूरला आहे. तेथे भैरवनाथाची मूर्ति नग्न स्थाेे अवस्थेत आहे पाहून आपल्या वकील ओळींची आठवण झाली. ो

वल्ली मित्रा खरोखर तुझा लेख सुंदर आहे.

लिंग,, रूद्र, शिव हा बराच मोठा विषय असून ह्याच्या फारश्या खोलात न जाता आपण आता शिवलिंगे आणि शिवमूर्तींचे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने काही प्रकार बघूयात.

या वाक्यासाठी टाळ्या. लेख मुद्देसूद कसा लिहावा आणि होणारी पुढील चर्चा अपेक्षित चौकटीत कशी राहील याचा एक उत्तम आदर्श म्हणता येईल असे हे वाक्य आहे. !

पण लिंगपूजेविषयी वेदांमध्ये (किमान ऋग्वेदात) माहिती नाहिये. कारण तू म्हणतो तसे काळाच्या ओघात रुद्राचे पुढे शिवात रुपांतर केले गेले. पण रुद्र ही अनार्य देवता माझ्यामते नव्हती. कारण ऋग्वेदांत रुद्राचे उल्लेख आहेत त्यावरुन ती वैदिक देवता आहे हे मान्य करण्यास हरकत नसावी. अर्थात ऋग्वेदांत वेळोवेळी भर पडलेली आहे. रुद्राचा उल्लेख नंतर जोडला गेला आहे किंवा कसे याबद्दल मात्र मला कल्पना नाही. ही बाब अभ्यासकांवर सोडूयात.

३. दिक्पालरूपी शिवलिंग.
यामध्ये तू निदर्शित आणून दिलेल्या चिन्हांमुळेच हे शिवलिंग दिक्पालांचे आहे हे सिद्ध होते. तुझा तर्क योग्यच आहे.

सहस्त्र व कोटी लिंगेही आवडलीत. हजार पेक्षा जास्त अयोनिज लिंगाला कोटीलिंग म्हणणे सयुक्तीक ठरते कारण प्रत्यक्ष १ कोटी अयोनिज लिंगे कोरणे कारागिरांच्या वेळेचा अपव्यय आणि अशक्य"कोटी"तही आहे.

मूर्तींकडे वळताच पहिल्या ६ मूर्त्या पाहून एक क्षण माझ्या आवडत्या नटराजाचा विसर पडला होता. प्रत्येक लिंग व मूर्तीच्या ओघाने दिलेली माहिती सुंदर आहे. शेवटी आधीच्या वेरुळ मालिकेत पाहिलेला माझा आवडता नटराज ७ क्रमांकावर दिसला आणि अधिकच आनंद झाला.
शिवाने नुसते १०८ मुद्रांमध्ये नृत्य केले अशी मान्यताच नाही तर शिवाला नृत्यकलेचा उद्गाताही मानले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने नृत्य शिकण्यासाठी शिवाची आराधना त्यासाठीच केली जाते. मलाही ही माहिती सुदैवाने अलिकडेच वाचल्यामुळे कळाली.

१०.१ रावणानुग्रहशिवमूर्ती च्या ओघाने आलेली कथा ज्ञानात छान भर टाकते आहेच शिवाय मूर्तिचे विश्लेषणही चित्तवेधक आहे.

संहारमूर्ती नावाप्रमाणेच साजेश्या आहेत. त्यातली अंधकासुरवधाची संहारमूर्ति तुझ्या वेरुळच्या लेखात आधी पाहिली होती. ती खरोखर संहारक दिसते.

भैरवावर संक्षेपाने पण नेमकी माहिती तू दिली आहेस.
अधिक माहितीसाठी - भैरवावर रा.चिं.ढेरे यांनी लज्जागौरी ग्रंथात बरेच सुंदरपणे सांगितले आहे. मातृकांवरही त्यातच विपुल लेखन आहे. ते तू वाचले असशीलच. पण पुढील लेखनासाठी संदर्भ तपासून बघण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

दिक्पालांवर तुझ्या लेखाची मात्र प्रतिक्षा करतो आहे. दिक् पाल तू आधी लिही असा आग्रह करु इच्छितो. कारण दिक् पालांचे दिशांवर नियंत्रण असल्याकारणाने वैज्ञानिक भूमिकेतूनही या दिक् पालांचे महत्त्व आहेच. पण मूर्तीविज्ञानात त्याची दखल तू कशी घेतोस याची उत्सुकता आहे :)

पुन्हा एकदा एका सुंदर लेखाबद्दल तुझे अभिनंदन आणि धन्यवादही.
अशीच छान छान माहिती तुझ्या लेखनातून मिळू देत

प्रचेतस's picture

24 Jan 2014 - 11:18 pm | प्रचेतस

धन्यवाद रे मित्रा.
माझ्यामते तरी रूद्र मूळचा अनार्य. ऋग्वेदातील सूक्तांमधले असलेले रूद्राचे भयंकर रूप त्याच्या मूळच्या अनार्य रूपाचीच जाणीव करून देते. ती वैदिक देवतांमध्ये समाविष्ट झाली यात काहीच शंका नाही.
लज्जागौरी अजूनही वाचलेले नाही शिवाय संग्रहीपण नाही पण आता लवकरच घेईन निश्चित.

दिक्पालांवर नक्कीच लिहिन. बाकी उपदिशांबद्दलचा प्रश्न मला नेहमीच सतावतो. ह्या दिशा (आग्नेय, नैऋत्य, वायव्य, इशान्य) दिक्पालांच्या नावावरून आल्या की त्यांच्या देवतांवरून दिशांची नावे आली. :)

सागर's picture

28 Jan 2014 - 8:26 pm | सागर

बाकी उपदिशांबद्दलचा प्रश्न मला नेहमीच सतावतो. ह्या दिशा (आग्नेय, नैऋत्य, वायव्य, इशान्य) दिक्पालांच्या नावावरून आल्या की त्यांच्या देवतांवरून दिशांची नावे आली.

तुझ्या दिक्पालावरच्या लेखातून याची उत्तरे मिळतील याची खात्री आहे ;)

प्रचेतस's picture

28 Jan 2014 - 8:30 pm | प्रचेतस

हाहाहा.
अरे मला खरेच माहिती नाहीये.

श्रीनिवास टिळक's picture

25 Jan 2014 - 11:48 am | श्रीनिवास टिळक

सोमनाथचे (मूळ) शिवलिंग कोणत्या प्रकारचे होते? कुठेतरी वाचलेले आठवते कि ते लोहाचे बनविलेले असून प्रचंड लोहचुम्बकांच्या साह्याने गाभाऱ्यात अधांतरी (तरंगत?) ठेवलेले होते.

प्रचेतस's picture

25 Jan 2014 - 12:02 pm | प्रचेतस

ही सर्व मिथकं असावीत.
शिवलिंग हे नेहमी पार्थिवच असते.

शशिकांत ओक's picture

25 Jan 2014 - 11:54 am | शशिकांत ओक

आजच्या चर्चेत ह्यावर विचारणा करता येईल...

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jan 2014 - 1:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

अप्रतिम!!!! खुपच जबर व्यासंगी लेखन!! आवडले, माझे स्वतःचे कुलदैवत शिव आहे सो त्या पर्सनल टच सोबत ते वाचणे बेस्टच!!!

शंभो हर हर!!!!

-बाप्या

लेख आणि प्रतिक्रिया छान आहेत पण चार एमबी चा झाला आहे ,मोबाईलवर लोड होण्यास तसेच प्रतिसाद देतांना 'मेमरी फुल' होते .

पुढच्यावेळी दोन भाग करून लिहाल का ?

संपादकमंडळ
लेखामध्ये वरच्या बाजूस "शेवटी -जा" आणि
शेवटी "वरती -जा"
असे बटण टाकता येईल का ? अथवा लिहिणाराच
अशी बटणस योग्य ठिकाणी टाकू शकतो का ?/टाकण्याची सोय करता येईल का ?

श्रीनिवास टिळक's picture

27 Jan 2014 - 9:25 am | श्रीनिवास टिळक

माझे एक मित्र श्री. रवींद्र गोडबोले ह्यांनी शिव आणि १२ ज्योतिर्लिंगे या विषयावर भौतिक शास्त्रीय (astronomical) दृष्टीकोनातून नुकताच एक लेख English मध्ये लिहिला आहे आणि काल मला त्याची प्रत मिळाली. थोडक्यात वेद आणि पुराण या ग्रंथांतून शिव,मरुत, ज्योतिर्लिंग (जागृत किंवा स्वयंभू) यांबद्दल बरेच विवेचन आढळते. गोडबोलेंच्या मते त्याचा संदर्भ आकाशातील धुमकेतू उल्का आणि उल्कापात यांच्याशी आहे. उदाहरणार्थ शिवपुराणातील लिङ्गोद्भव हे कथानक. अधिक माहितीसाठी श्री गोडबोले यांच्याशी संपर्क साधावा ravindragodbole@aquariustech.net

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Jan 2014 - 7:42 pm | लॉरी टांगटूंगकर

उत्तम रे वल्ली.
आरामात वाचण्यासाठी बाजूला काढला होता. आता परत वाचला. एक प्रश्न आहे, सौथच्या मूर्ती बर्‍याचदा आक्रमक वाटतात. एकदम रौद्ररूपात. शिल्पकलेत असा इतका फरक का दिसावा??

प्रचेतस's picture

27 Jan 2014 - 8:40 pm | प्रचेतस

सौथ सर्किट अजून केलं नै त्यामुळे नक्की कै सांगता येत नै.
पण वेरूळ येथील मूर्ती बर्‍याचशा सौथ स्टाईलच्याच आहेत. पण तरीही नरसिंहाच्या काही मूर्तींमध्ये हा फरक स्पष्टपणे कळून येतो.
बहुतेक वेगवेगळ्या काळात अशा मूर्ती कोरल्या गेल्यामुळे शैलींमध्ये हा थोडासा फरक राहत असावा.

अर्धवटराव's picture

28 Jan 2014 - 11:50 am | अर्धवटराव

वल्लीला किडनॅप करण्याचा दिवस लवकरच येईल असं दिसतय. पुर्वाश्रमीचे प्यारे१ यांनाही सोबत नेण्यात येईल :)

शिव म्हणा, रुद्र म्हणा कि आणखी काहि. आर्य, अनार्य, द्रविड, वैदीक वगैरे संस्कृतींचे पडसाद त्या त्या काळच्या मुर्तीशास्त्रात आढळतात. पण हि मंदीरे आणि मुर्त्या केवळ काहि कथाबीजांवर आधारीत असतात का? कि त्या प्रदेशाचा राजा, मुर्तीकाराला अभिप्रेत भाव, अ‍ॅक्च्युअल स्थापत्य करणार्‍यांच्या सोयी-एक्स्पर्टीज-मर्यादा, उपलब्ध साधनं, जसं पाषाण वगैरे घटक कंसीडर केल्या जात असतील? सर्वात महत्वाचं म्हणजे प्राचीक काळापासुन अनेक प्रकारच्या उपासना पद्धतींच्या अनाकलनीय प्रॅक्टीस प्राचारात होत्या व आहेत. जर हि मंदीरं त्या विशिष्ट उपासनेकरता बनविली जात असतील, किंवा उपलब्ध मंदीरात एखादी उपासना सुरु करण्यात येत असेल तर त्या मुर्ती किंवा मंदीराच्या रचना व आवार त्या उपासनेला अनुकुल बनवण्यात येत असावं काय? अशी कुठली सिग्नेचर व्यवस्था दिसुन येते का? केवळ मातृभाव, प्रजजन गौरव किंवा शौर्य कौतुक करायला म्हणुन हि मंदीरं बांधण्यात आलि असं वाटत नाहि. व्हॉट माइट बी द अदर साईड?

ह्या मूर्ती शक्यतो ग्रांथिक वर्णनांवर आधारीत असतात. काही मूर्ती चक्क वेदांतील उल्लेखाबरहूकूम बनवलेल्या आहेत. उदा. पाटेश्वरातील अग्नी वृषाची अतिशय दुर्मिळ मूर्ती. पुराणांत, रामायण, महाभारत आदी महाकाव्यांत बरीच वर्णने आली आहेत. त्यानुसारही मूर्टी घडवल्या जातात. अर्थात प्रत्यक्ष पूजेच्या मूर्ती शक्यतो साध्या असून मंदिरांच्या अथवा लेण्यांच्या बाह्यभितींवर पुराणातले प्रसंग कोरलेले आढळतात.
मूर्ती कोरण्याच्या बाबतीत परंपरांचे दोन प्रकारे पालन केलेले आढळते जसे पहिला प्रकार म्हणजे विष्णू, ब्रह्मा, शिव, स्कंद किंवा इतरही बर्‍याच देवता. यांची लक्षणे सर्व ठिकाणी सारखीच आढळतात. उदा. शिवाच्या हाती त्रिशूळ - डमरू, विष्णूच्या हाती शंख-चक्र. ही परिस्थिती सहसा कुठेच बदलत नाहीच.
तर दुसरा प्रकार म्हणजे लेणी-मंदिरे कोरण्याच्या कलेतील बदल. माझ्या मते भारतात बौद्द लेण्यांपासून प्रेरणा घेण्यात आली. काळानुसार शैलीत बदल दिसत असला तरी मूळ गाभा एकच असल्याचे दिसते.

वेगवेगळ्या राजवटींमध्ये मूर्ती कोरण्यात फरक असला तरी मूळ मूर्तीची लक्षणे तीच असल्याचे दिसते. राष्ट्रकूट कला ही सहसा द्राविड पद्धतीची दिसते साहजिकच त्यांनी ऐहोळे, पट्टदकल, महाबलीपुरम इत्यादी प्राचीन मंदिरांच्या शैलीवरून प्रेरणा घेतल्याचे दिसते. तर होयसाळांनी मूळ गाभा तोच ठेवून मूर्ती अतिशय सालंकृत करून नवीनच होयसाळ शैली निर्माण केली जी आज होयसाळ स्कूल म्हणून ओळखली जाते. अर्थात ह्यात तिकडच्या ग्रेनाईट दगडाचा पण तितकाच महत्वाचा वाटा.

सहासा ही मंदिरे सर्वसाधारण उपासनेसाठी बनवली जात असावेत. प्रसंग कोरण्याचा सर्वात मोठा हेतू मला असा वाटतो म्हणजे त्याकाळी बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे मूळ वैदिक धर्मापासून दूर जाणार्‍या जनतेला परत आपल्या धर्माकडे वळवून घेणे. अर्थात त्याचा बौद्ध धर्मावर प्रतिकूल परिणाम झालाच. वेरूळसारख्या तिभव्य लेण्याच्या निर्मितीनंतर अजिंठा जवळजवळ विस्मृतीत गेले.
माझ्या मते तरी धर्मप्रसारासाठीच आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजवटींशी असलेल्या स्पर्धेतून देखणी मंदिरे उभारली गेली. उपासना हा हेतू बहुधा गौणच होता.
अर्थात हिंदूंमध्ये तेव्हाही तंत्र उपासना चालत होतीच पण सहसा यासाठी जनतेपासून फटकून असणार्‍या, एकाकी, निर्जन जागांचा उपयोग केला गेला. उदा: पाटेश्वर.

कंजूस's picture

29 Jan 2014 - 10:32 am | कंजूस

बरोबर आहे .

प्यारे१'s picture

29 Jan 2014 - 12:23 pm | प्यारे१

>>>वल्लीला किडनॅप करण्याचा दिवस लवकरच येईल असं दिसतय.

नाई म्हणजे विचार स्तुत्य वगैरे आहे, पण वल्लीचा फोटो एकदा बघून घ्या बरका विचार पक्का करण्याआधी. =)) आम्ही आहोतच.
त्यापेक्षा असं करुया का? त्याला नायिकांच्या मूर्ती बघायला जायचंय चल म्हणून नेऊ. ते सोप्पं. ;)

लेख बरेच वेळा वाचला.(तेव्हा कुठे इतक्या प्रचंड माहितीतली थोडीफार माहिती डोक्यात राहिली. अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण. नेहमीप्रमाणेच. वाचनखूण साठवण्याजोगे.
थोडे धार्ष्ट्य : वेगवेगळ्या प्रदेशांतील मूर्तींचे चेहरे पहाताना त्या त्या प्रदेशातील लोकांच्या चेहरेपट्टीशी ते मिळतेजुळते वाटतात. उदा.राणीवाव या लेखांतल्या स्त्रीमूर्ती या पातळ ओठांच्या आणि सडपातळ बाहू-दंड-मांड्यादि अवयवांच्या वाटतात. जैनांच्या महावीरमूर्तीचे ओठ हे अगदी वेगळे असतात. म्हणजे वरच्या ओठाच्या दोन पाकळ्या अर्धगोलाकार वरती वळलेल्या वगैरे. वेगवेगळ्या देशांतील बुद्धप्रतिमा पहातानाही असेच वाटते. दक्षिण भारतातील स्त्रीमूर्ती अतिसौष्ठवपूर्ण आणि धष्टपुष्ट वाटतात. हा माझा दृष्टिभ्रम आहे की खरेच असे काही असू शकते?
चित्रकलेतही वेगळ्या वंशाच्या लोकांनी काढलेली भारतीयांची चित्रे वेगळी म्हणून ओळखू येतात. अपरे आणि पातळ नाक, गोलसर (आपल्याकडले मीन, हरिण वगैरेसारखे लांबट असतात) डोळे ,लांब मान, उतरता आणि विस्तृत स्कंधप्रदेश असा थोडा वेगळेपणा दिसतो. असो. मूर्तिशास्त्राचा काहीच अभ्यास नाही तेव्हा इथेच थांबावे हे बरे.

आत्मशून्य's picture

4 Feb 2014 - 4:30 pm | आत्मशून्य

अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.

कमाल असते नाही अशा योगायोगांची ? विचक्राफ्ट संबंधि सर्व मुळ माहितिस्त्रोतात ते फक्त निसर्गधर्म/शक्ति/देवता मानतात व त्यात पुरुषाला होर्न(शिंग असलेला) गॉड ऑफ हंटिग अन स्त्रिला गॉडेस ऑफ फर्टिलिटी मानुन पुजा/विधी करतात.

आज हा धागा मिळाल्याने मस्त वाटले.

धन्यवाद

अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची.

बरोबर . म्हणूनच 'शिव' किवा 'रुद्र ' चा संबंध लिंगाशी लावू नये . 'लिंग' हा मराठी भाषेतील शब्द आणि शिवलिंग ह्यांचा अर्थ लावणार्यांच्या बुद्धीची कीव वाटते . लिंग चा अर्थ 'तेज' असा आहे . 'छोट्या स्वरुपात (ज्योती स्वरुपात ) सामावलेलं प्रचंड तेज' असा शिवलिंगाचा अर्थ आहे . म्हणून त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात .

खंडोबाची मूर्ती हाही शिवमूर्तीचाच एक प्रकार. ह्या प्रकाराला मल्लारी मूर्ती असे म्हणतात.

१००% चूक

काही मोरीच्या वाटेवर तर काही विहिरीतून पाणी शेंदताना उभे राहण्याच्या जागी बसवली गेलेली.

:-( असंच एक शिवलिंग मक्केच्या पहिल्या पायरीला बसवल्याच वाचण्यात आलं होतं मध्ये .

पॉइंट ब्लँक's picture

10 Dec 2015 - 4:12 pm | पॉइंट ब्लँक

आंध्रप्रदेशात गुडिमल्लम इथे इसापूर्व ३ शतकातील एक शिव मंदिर आहे. तिथे असलेली ही अनोखी मुर्ती. (फोटो विकिवरून साभार)

gudimallam