पाटेश्वरचा गूढरम्य लेणीसमूह

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
27 Nov 2012 - 12:38 am

वास्तविक ५० फक्त यांनी पूर्वीच येथे पाटेश्वरच्या अद्भूत लेणीसमूहाबद्दल लिहिलेले असल्याने पुन्हा त्यावर लिहायचा तसा विचार नव्हताच पण त्याबद्दलच जरा वेगळे काही लिहिता आले तर बघावे या उद्देशाने पाटेश्वरावर चार शब्द खरडायला बसलो.

तर मी, ५० फक्त, विलासराव, किसनदेव, पिंगू आणि नाद खुळा असे ६ जण पुणे- सातारा-देगाव अशी मजल मारून एक पाटेश्वरला पोचलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे हिरवेगार वातावरण होते. पाटेश्वराच्या मुख्य मंदिरापाही जायला दीड दोन किमी पायी चालावे लागते. सुरवातीची चढण सोडल्यास नंतर बराचसा रस्ता सरळ आणि दाट झाडीतून जाणारा आहे.
पाटेश्वर मंदिराच्या आधीच एक विशाल पुष्करिणी खोदलेली आहे. पुष्करणीच्या शेजारीच एक मठ असून त्याच्या बाजूने असलेल्या पायर्‍यांनी पाटेश्वरच्या मुख्य मंदिरापाशी जाता येते. वर चढत जाणार्‍या पायर्‍या , वाटेत दिवे ठेवण्यासाठी बाजूच्या भिंतीमध्ये खोदलेल्या खाचा आणि मधे मधे भिंतीच्या आतल्या बाजूच्या मूळच्या कातळात कोरलेल्या शिवपिंडी अशी या मार्गाची रचना. मुख्य मंदिर हेमाडपंथी बांधणीचे अजून त्याचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार १८ व्या शतकात सरदार अनगळांनी केला.

१. पाटेश्वराच्या मुख्य मंदिराकडे जाणारा पायरी मार्ग
a

२. पाटेश्वर मंदिर
a

३ नंदीमंडप
a

मंदिर सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त केले आहे. नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना. आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरे असून त्यात वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपात महिषासूरमर्दिनी, विष्णू, स्कंद, आणि स्त्रीरूपी गणेश म्हणजेच गणेशिनी किंवा विनायकी अशा मूर्ती कोरलेल्या दिसतात. तर गर्भगृहात पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग आहे. जणू काही हे एक शिवपंचायतनच.
शंकराची लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती ह्या मंदिरात दिसतात. पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंगरूपात तर बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्तरूपात कोरलेला आहे. हे मूर्तस्वरूप पण साधेसुधे नाही तर चतुर्मुखी आहे. एकाच धडावर एकाच रेषेत चार शिरे कोरलेली आहे. ही मूर्ती ब्रह्मदेवाची म्हणून अगदी सहजच फसगत होते पण नीट निरखून बघायला एका हातात त्रिशुळ तर दुसर्‍या हातात कमंडलू आणि दंडावर सर्पमुखी बाजूबंद तर डोक्यावर अर्धचंद्र कोरलेला दिसतो. अजूनच काळजीपूर्वक बघता प्रत्येक शिराच्या कपाळावर कोरलेला तिसरा डोळाच दिसायला लागतो आणि हा शंकरच याची अगदी खात्रीच पटते. आहे की नाही गंमत.

४. महिषासुरमर्दिनी अआणि विनायकी
a a

५. चतुर्मुख शिव
a

आता पाटेश्वर बघण्यातील खरी मजा मात्र हे मंदिर बघण्यात नाही तर ती आहे इथला अद्भूत लेणीसमूह बघण्यात, इथली तर्‍हेतर्‍हेची शिवलिंगे बघण्यात, इथल्या गूढरम्य वातावरणात हरवून जाण्यात आणि याची सुरवात होते ती मठाजवळच पायर्‍यापांशी असलेल्या एकमुखी शिवलिंगाने. एकाच वेळी सयोनी, अयोनी आणि मूर्तरूपात असलेली अशी शिवलिंगे विरळाच. सयोनी शिवलिंग म्हणजे आपण नेहमी शाळूंकेसहित जे शिवलिंग पाहतो ते तर अयोनी म्हणजे खालची शाळूंका नसून फक्त वरचा लिंगस्वरूपाचा भाग असलेली पिंडी. चौकोनी शाळूंका तिच्यात कोरलेले मुख्य दाढी मिशा असलेले एकमुखी शिवलिंग आणि बाजूने कोरलेली अयोनी पद्धतीची ५७ शिवलिंगे अशी याची रचना. तर याच्या बाजूलाच एका शिवपिंडीच्या शाळूंकेत एक मुख्य सयोनीज शिवलिंगे आणि त्याच्या बाजूने सरळ उभ्या रेषेत कोरलेली असंख्य लहान लहान सयोनीज शिवलिंगेच कोरलेली आहेत तर अजून थोडे पुढे जाताच एक आयताकार शिवलिंग दृष्टीस पडते शिवलिंग व त्यापुढच्या तीन शिल्पपटात ५ अयोनीज पद्धतीची लिंगे, मध्ये कलश तर त्याच्या बाजूला एका परत एका वर्तुळात कोरलेली पाच अयोनीज शिवलिंगे. जणू पंचमहाभूतांचे हे प्रतिकच.

६. एकमुखी लिंग
a

७. सयोनीज शिवलिंगे
a

९. पंचमहाभूतांचे प्रतिक असलेले शिवलिंग
a

आता मठाच्या बाजूने खालच्या बाजूने जाता जाता मुख्य लेणीसमूहाचा परिसर लागतो. ह्या लेण्या अत्यंत प्राचीन. ह्यांच्या काळाचा मागोवा घेतला असता त्या कमीतकमी १०००/१२०० वर्षे तरी जुन्या आहेत हे लक्षात येते. सातार्‍याच्या ह्या भागावर राज्य होते ते शिवभक्त शिलाहारांचे तेव्हा यांच्याच राजवटीत ही लेणी खोदली गेलेली असणे हे सहज संभवनीय आहे. पण हा सगळाच लेणीसमूह तांत्रिक शिवभक्तीचा प्रकार वाटतो. सुरुवातीच्या एका गुहेत सयोनी शिवलिंगे तर त्याच्या शाळूंकेभोवतीच कोरलेली लहान लहान शिवलिंगे अशा स्वरूपाचा शिवलिंगांचा एक समूहच दृष्टीस पडतो तर बाजूच्या दोन गुहांमध्ये विशाल शिवलिगे दृष्टीस पडतात एका गुहेमध्ये कमरेएव्हढे पाणी तर दुसरी गुहा कोरडी आणि त्यातही गंमत म्हणजे शिवपिंडीच्या शाळूंकेचा निमुळता भाग हा नेहमी लिंगाच्या उजव्या बाजूकडे असतो येथे मात्र लिंगाच्या डाव्या बाजूला कोरलेला आहे. हा तंत्रपूजेचा एक प्रकार दिसतो.

१०. विशाल शिवलिंग
a

११. शिवपिंडी समूह
a

ह्या लेणीच्या पुढ्यातच अजून एका गुहेत एक अद्भूत मूर्ती आहे. हा मुळचा गुहेचाच भाग पण याच्या बाजूने आता मंदिरासारखे बांधकाम केलेले आहे. आतली मूर्ती संपूर्ण कोरीव आहे. बैलासारख्या दिसणार्‍या चेहर्‍यात मानवी मुख कोरलेले आहे. ही मूर्ती आहे अग्नीची-अग्नीवृषाची. सात हात, प्रत्येक हातात कोरलेले आयुध किंवा हस्तमुद्रा, दोन मस्तके, तीन पाय असलेली ही मूर्ती समोरून न पाहता बाजूने पाहिली असता हुबेहुब नंदीचीच दिसते.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सूक्तातील तिसर्‍या श्लोकात याचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे आणि ही मूर्ती अगदी त्याबरहुकूम बनवण्यात आली आहे.

चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||

अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.

१२. अग्नीवृष
a
हा लेणीसमूह बघून थोडे अजून पुढे जाताच अजून एक लेणीसमूह दृष्टीस पडतो तटांनी बंदिस्त केलेले प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातच कोरलेला नंदी आणि आतल्या बाजूला तीन गुहांचा समूह अशी याची रचना. हा नंदी पण वेगळ्याच तर्‍हेने कोरलेला आहे. मूर्ती अतिशय देखणी आहे पण जणू काही हा नंदी कुठे पळून जाऊ नये म्हणून त्याला साखळदंडाची अतिशय घट्टपणे वेसण घातलेली आहे. भक्तीपेक्षा हा प्रकार भयाचाच जास्त वाटतो. पाटेश्वरातील सर्वात जास्त अद्भूत शिवलिंगे ह्याच लेणीसमूहात साकारली गेली आहेत. ह्या लेणीसमूहातील तीनही लेण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे इतल्या गुहांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीऐवजी शिवलिंगे कोरलेली आहेत. लिंगायतांच्या देवळांत हा प्रकार प्रामुख्याने पाहावयास मिळतो. गुहांच्या बाहेरील बाजूस दोन वेगळ्या प्रकारची शिवलिंगे कोरलेली दिसतात त्यातले एक म्हणजे चतुर्मुख शिवलिंग. शिवलिंगावर चार दिशांत कोरलेल्या चार मस्तकांनी हे शिवलिंग बनलेले आहे. ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचे प्रतिक. तर याच्या बाजूलाच असलेले दुसरे शिवलिंग याहूनही अद्भूत. याच्या शाळूंकेवर लिंगाऐवजी चक्क दोन उपडे घटच कोरलेले दिसतात. तर त्याच्या बाजूने काही अयोनी स्वरूपातील लिंगे कोरलेली दिसतात.

१३. लेणीसमूहाच्या प्रवेशद्वारातील नंदी
a

१४. शिवलिंगाची पट्टी कोरलेले प्रवेशद्वार
a

१५. चतुर्मुख शिवलिंग
a

१६. घट असलेले शिवलिंग
a

१७. लेणीसमूह एका वेगळ्याच कोनातून
a

ही शिवलिंगे बघून उजवीकडच्या गुहेत गेलो असता अजूनच काही वेगळ्या प्रकारची शिवलिंगे दृष्टीस पडतात. ही गुहा त्रिस्तरीय रचनेची जणू काही एकात एक तीन गुहा खोदलेल्या आहेत. हा भाग पूर्ण अंधारी आहे. सुरुवातीच्या भागात दोन चौकोनी शाळूंकांवर शिवपिंडीच्या जागी कमलफुलांची सुंदर रचना दिसते तर अंधारात जरा डॉळे सरावल्यावर ह्याच्याच बाजूच्या एका भिंतीत एक आगळी मूर्ती कोरलेली दिसते. बैलाच्या पाठीवर चक्क एक शिवलिंगच कोरलेले दिसते. जणू हा नंदी शंकराला आपल्या पाठीवर वाहून नेत आहे. ह्याच गुहेच्या आतल्या भागात एका शिवलिंगाच्या भोवती शाळूंकेवर अयोनी लिंगे कोरलेली आहेत तर दुसर्‍या एका शिवपिंडीचे लिंगच अयोनी लिंगानी भरून गेलेले दिसते. तर अजून एका बाजूला यज्ञवेदीसारखे एक सहस्त्र शिवलिंग दिसते त्यावरही हजार अयोनी लिंगे कोरलेली आहेत.

१८. कमलफुलाचे लिंग व शिवलिंगवाहू नंदी
a a

१९. अजून काही वेगळे प्रकार
a a

२०. सहस्त्र लिंग
a

त्या गुहेतून बाहेर येऊन डावीकडच्या एका गुहेत तर अजून वेगळीच गंमत. ह्या गुहेत विविध तर्‍हेची शिवलिंगे एकामागोमाग एक अशी रचलेली आहेत. काही शिवलिंगांवर लिंगाऐवजी दोन खड्डे तर काहींवर पिंडी मात्र ह्या सगळ्या शिवपिंडीच्या सभोवतीने असंख्य लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.

२०. डावीकडच्या गुहेतील शिवलिंगे

a

२१. तेथीलच एक शिवलिंग
a

ही गुहा बघून आता समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केला. ह्या गुहा अत्यंत रहस्यमय, सर्वात मोठी आणि शिवलिंगांचे विविध प्रकार असलेली. इथे मध्ये प्रमुख असलेले भलेमोठे शिवलिंग, त्यावर कोरलेली अयोनीज शिवलिंगे, आणि बाजूच्या तीन्ही भिंतीवर प्रत्येकी एक एक असे तीन शिल्पपट कोरलेले शिवाय बाजूला इतर शिवलिंगेही आहेतच. शिवलिंगाचे हे प्रकार मात्र अष्टोत्तरशत किंवा सहस्त्र लिंगाचे. यांमध्ये शाळूंकेवर असलेल्या शिवलिंगात १०८ किंवा १००० लहान लहान लिंगे कोरलेली आढळतात. येथेच बाजूला एक धारालिंगही दिसते. यामध्ये शिवलिंगावर उभ्या पन्हाळ्या पाडलेल्या असतात जेथे दोन नलिका मिळतात तेथे साहजिकच धार उत्पन्न होते म्हणून हे धारालिंग अथवा नलिकालिंग.

बाजूच्या भिंतीवरील एका शिल्पपटामध्ये देवीचे-पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. तर त्याभोवती लहान लहान अयोनीज लिंगे कोरलेली आहेत. ती आहेत एकूण ९७२. देवीची १०८ सिद्धपीठे आणि प्रत्येकी पीठाची ९ वेळा पूजा करायचा असलेला प्रघात बघता हा आकडा बरोबर येतो तो ९७२ म्हणजे हे प्रतिक आहे पार्वतीपूजेचे. मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागच्या शिल्पपटांत विष्णूमूर्ती कोरलेली असून त्याभोवती १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. विष्णूसहस्त्रनामाचे एक प्रतिक तर उजवीकडच्या भिंतीवरील शिवलिंगपटांत मध्यभागी सूर्याची मूर्ती कोरलेली असून त्याभोवतीने सुद्धा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. सूर्यसहस्त्रनामाचे हे प्रतिक. तर दोन कोनाड्यांमध्ये शंकर आणि ब्रह्मदेव मूर्तरूपात कोरलेले आहे. हे एक प्रकारे शिवपंचायतनच. याशिवाय मंदिरातल्या एका स्तंभावर शिवदंड तर दुसर्‍या एका स्तंभावर नाग कोरलेला असून त्याभोवतीही विविध प्रकारच्या अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे. एका स्तंभावर देवनागरीतील एक बराच अस्पष्ट झालेला एक शिलालेख आहे. तर मध्यभागी असलेल्या प्रमुख शिवलिंगावर एकूण १००५ लहान लहान लिंगे कोरलेली आहेत. हे आहे सहस्त्रलिंग. खूपच अद्भूत आणि दुर्मिळ प्रकार

२२. मुख्य गुहा त्यामधील सहस्त्रलिंगासह, मागच्या बाजूला एक शिवलिंगपट
a

२३. शिवलिंगपट
a

२४. सूर्यमूर्ती असलेला शिवलिंगपट
a

२५. शिवदंड
a

२६. नागप्रतिमा
a

२७. गुहेच्या मध्यभागातील प्रमुख सहस्त्रलिंग
a

२८. मिपाचे शिलेदार (डावीकडून-नादखुळा, मी, विलासराव, पिंगू, किसन शिंदे आणि ५० फक्त)
a

खरे पाहता पाटेश्वरचा हा परिसरच अशा गूढरम्य शिवलिंगांनी नटलेला आहे. काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच. पण एक मात्र आहे देवळांत नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही. एकाकी, निर्जन परिसर, घनदाट झाडी, दाट काळोख्या गुहा, वापरात नसल्याने येणारा कुबट वास, तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते.
एकूणात पाटेश्वराच्या अद्भूत लेणीसमूहाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या रहस्यमयतेत बुडून जाण्यासाठी पुन्हा पुन्हा खास इथे यायला मात्र हवेच.

प्रतिक्रिया

अमितसांगली's picture

27 Nov 2012 - 1:11 am | अमितसांगली

पुणे ते देगाव हे अतंर किती आहे?

दाढीवाले काका कोण आहेत ???

पिंगू's picture

27 Nov 2012 - 9:24 am | पिंगू

पूजा, ते परिक्रमावाले विलासराव आहेत..

जेनी...'s picture

27 Nov 2012 - 10:09 pm | जेनी...

ओह्ह ! ओके !

जयंत कुलकर्णी's picture

27 Nov 2012 - 6:49 am | जयंत कुलकर्णी

छान !

पैसा's picture

27 Nov 2012 - 8:35 am | पैसा

तुझ्या अभ्यासापुढे नतमस्तक आहे. १३ व्या छायाचित्रातला नंदी खूपच सुरेख आहे. १६ व्या चित्रातले घट हे जन्म मृत्यूचे प्रतीक म्हणून आले असावेत. अतिप्राचीन काळी घट हे गर्भाचे प्रतीक मानले जात होते. तसेच माणसाच्या मृत्यूनंतर कुंभात शरीर ठेवून पुरले जात असे. शिव हा लयाचा देव असल्यामुळे हे घट इथे तांत्रिकांनी आणले असावेत.

अग्निवृषाची मूर्तीही खासच आहे. अशी प्रथमच पाहिली. तिच्याबद्दल पूर्वीच माहिती दिली होतीस. त्यामुळे आणखी लिही असं म्हणत नाही!

किसन शिंदे's picture

27 Nov 2012 - 8:45 am | किसन शिंदे

ज्जे बात!!

यशोधरा's picture

27 Nov 2012 - 8:49 am | यशोधरा

सुरेख!

नाखु's picture

27 Nov 2012 - 8:54 am | नाखु

नेमकी (सटिप-सखोल) माहीती...अभिनंदन...
(या "गड्करींबरोबर" काही गड पाहण्याची ईच्छा असलेला गाववाला)
नाद खुळा

मूकवाचक's picture

27 Nov 2012 - 9:01 am | मूकवाचक

_/\_

मोदक's picture

27 Nov 2012 - 9:23 am | मोदक

+१ हेच बोल्तो...

ह भ प's picture

27 Nov 2012 - 9:14 am | ह भ प

हायला.. सातार्‍यात असताना इतक्यांदा गेलोय इथं पण ही जागा नक्की काय आहे हे आज कळतंय..

(बहुतेक नाद खुळाचा गाववाला) ह भ प

धन्यवाद वल्ली.. आमाला बी घिउन जात जा की रान तुमच्यासंगट कदीमदी..!!

नेहमी प्रमाणेच उत्तम वृतांत आणि सुंदर फोटो

खरे पाहता पाटेश्वरचा हा परिसरच अशा गूढरम्य शिवलिंगांनी नटलेला आहे. काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच. पण एक मात्र आहे देवळांत नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही. एकाकी, निर्जन परिसर, घनदाट झाडी, दाट काळोख्या गुहा, वापरात नसल्याने येणारा कुबट वास, तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते.
एकूणात पाटेश्वराच्या अद्भूत लेणीसमूहाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या रहस्यमयतेत बुडून जाण्यासाठी पुन्हा पुन्हा खास इथे यायला मात्र हवेच.

हे असल गूढ वेग्रे असल कि भारीच वाटत जाम , जायलाच हव एकदा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Nov 2012 - 9:40 pm | निनाद मुक्काम प...

@ स्पा
तुझी कल्पनाशक्ती अश्या वातावरणात बहरत असणार.
लवकर जा व आल्यावर एखादी फक्कड पैकी कथा लिही.

त्या मंदिरात मला मिळालेला प्रसाद आतापण आठवतोय.. :D

- पिंगू

पाटेश्वरची मंदीरे आणि तो परिसर एकंदरीत गूढच वाटला. त्याच्या उलट सज्जनगडावर समर्थं समाधीचे दर्शन घेताना आनंद वाटला.

- पिंगू

मस्तच व्रुत्तांत आणि फोटो पण सुरेख उपयुक्त माहिती वल्लीदा :)

ऋषिकेश's picture

27 Nov 2012 - 11:24 am | ऋषिकेश

नंदीचे आकार अतिशय आवडले.
सचित्र माहितीबद्दल आभार!

मालोजीराव's picture

27 Nov 2012 - 11:44 am | मालोजीराव

सगळे फोटू मस्त !! हे म्हणजे शंभू महादेवाचे कॉम्प्लेक्स वाटू राहिलंय...त्याकाळी भारतातील सर्व शिवमन्दिरांना इथूनच शिवपिंडी नेत असतील..
वेगवेगळे प्रकार पहिल्यांदाच पहिले ...थोडे गूढ आहेत पण आवडले

वल्लीजोन्स और खजानेकी खोज : वल्लीशेठ एखादी गुहेतली पिंड फिरवून,हलवून पाहिली कि नाई. म्हणजे फिरवल्यावर एखादी भिंत सरकली असती गुप्त दरवाजा उघडला असता तळघरात जाण्यासाठी :P

वल्लीशेठ एखादी गुहेतली पिंड फिरवून,हलवून पाहिली कि नाई. म्हणजे फिरवल्यावर एखादी भिंत सरकली असती गुप्त दरवाजा उघडला असता तळघरात जाण्यासाठी

अगदी अगदी.
बाकी तुला भेटल्यावर एकदा दंडवत घालायचा आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2012 - 1:43 pm | अत्रुप्त आत्मा

फोटोंइतकिच माहिती सरस........ त्यामुळे आपला सलाम.

१)कमलदलाचं शिवलिंग, म्हनजे त्याभोवतीचे कमलदल, हे आमचे लघुरुद्र....स्वाहाकारावेळी मांडायचे,रुद्रमंडल आहे.

२) अग्निचं मूर्त रुप... हे मी सुद्धा पहिल्यांदा पाहिलं,,,पण त्याचं वर्णन करणारा -चत्वारि:शृंगात्रयो... ,हा मंत्र कुठलंही होमहवन करण्यापूर्वी,केल्या जाणार्‍या अग्निसंस्कारात(अग्निमुखाच्या प्रयोगात) अग्निचं ध्यान करण्यासाठी म्हटला जातो...

''चत्वारि:शृंगात्रयो अस्य पादाद्वेशीर्षे सप्तहस्ता सो अस्या।
त्रिधाबद्धो वृषभोरो रवीति महोदेवो मर्त्यां आविवेशा॥'' >>> हा वेदमंत्र आहे..

आणी त्यानंतर खाली येणारे हे चार श्लोक म्हणजे, अग्निचं परिपूर्ण वर्णन करणारे पुराणोक्त श्लोक आहेत.

सप्तहस्तःचतु:शृंगः सप्तजिव्हो..द्विशीर्षकः।
त्रिपात् प्रसन्न वदनः सुखासीनः शुचि:स्मितः॥

स्वाहांतु दक्षिणेपार्श्वे देवीं वामेस्वधां तथा।
विभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचंसृवं ॥

तोमरंव्यजनं वामै र्घृतपात्रं च धारयन्न।
मेषारुढो..जटाबद्धो गौरवर्णो महौजसः॥

धूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चि: सर्व कामदः।
आत्माभि मुखमासीन एवं रूपो हुताशनः॥

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण धागा. धाग्याचं चेपु करणार्‍यांमध्ये असे माहितीपूर्ण धागे नेहमीच उजवे ठरतात.

सर्वज्ञ's picture

27 Nov 2012 - 2:03 pm | सर्वज्ञ

अप्रतिम...

प्यारे१'s picture

27 Nov 2012 - 2:53 pm | प्यारे१

फटु कुनी कारला रं बाला?

सा च्या सा जन फटुत... त्ये वर गूड ल्हिवलंय त्ये लगेच दिसलान का काय? ;)

वल्ल्या द जहापनाह, तुस्सी ग्रेट हो! ( फुरचं आश्लिल हे)

वल्लीच्या प्रत्येक धाग्यात माहिती खच्चून भरलेली असतेच, पण हा लेख वाचून काहीसे जी ए कुलकर्णीछाप आकर्षणदेखील वाटू लागलेय पाटेश्वरबद्दल!!!!

सुहास झेले's picture

27 Nov 2012 - 4:28 pm | सुहास झेले

जबरदस्त.... !!!

एकदा जाऊया पुन्हा आणि मला बोलवायला विसरू नका वल्लीशेठ :) :)

स्वाती दिनेश's picture

27 Nov 2012 - 4:41 pm | स्वाती दिनेश

फार सुरेख फोटो आणि माहिती.
तुम्हा लोकांची ट्रिप मस्तच झालेली दिसते.
स्वाती
अवांतर- मघाशी प्रतिक्रिया टाइप केली आणि सुपुर्त करताना मिपा गंडले. असे आज ४-५ दा होते आहे.

चौकटराजा's picture

27 Nov 2012 - 5:26 pm | चौकटराजा

वल्लींचा धाग म्हंजे माहितीची गॅरंटी. आडवाटेवरचा म्हाराष्ट्र दाखविणारे हे मिपाचे प्रके घाणेकरच आहेत. १३ नंबर मधील नंदीचा फोटो मस्त ! बाकी इतक्या प्रकारची शिवलिंगे पाहून भोळासांब सुद्धा चकित झाले असते. वल्ली बुवा आमच्या सूचने नुसार एक कट्टा एकांद्या गडावर ( सोप्या राव ) करा !

या धाग्यासाठी धन्यवाद . आपण पत्तडकल व उदेपूर येथील् नंदी मंडप लवकरच पहाल अशी शुभेच्छा देतो !

नि३सोलपुरकर's picture

27 Nov 2012 - 5:57 pm | नि३सोलपुरकर

वल्लीशेठ,
सुपर्ब,अप्रतिम आणी तुझ्या अभ्यासाला आपला सलाम.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण धागा बाकी ते "अग्नीवृष" चे छायाचित्र आणी त्या संबधीत ऋग्वेदातील श्लोक म्हणजे माझ्या सारख्या मुढ जनतेला "हा सुर्य आणी हा जयद्रथ".....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Nov 2012 - 9:43 pm | निनाद मुक्काम प...

नुसती चित्रे पाहून भारलेल्या अवस्थेत गेलो. आणि काही फोटोंकडे पाहून तर स्तंभित होऊन पाहत राहिलो.

मदनबाण's picture

30 Nov 2012 - 8:10 pm | मदनबाण

अद्भूत ! :)

गुल्लू दादा's picture

18 Sep 2021 - 9:17 pm | गुल्लू दादा

बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या. प्रचंड अभ्यास आहे. धन्यवाद.

गॉडजिला's picture

18 Sep 2021 - 10:45 pm | गॉडजिला

अवश्य कळवा, बाकी फुटु अन माहीती जबरा.

त्यातील मिपावर हजर कीती असतात ?

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2021 - 1:06 pm | चौथा कोनाडा

सुंदर .... अद्भुत .... अप्रतिम !

टर्मीनेटर's picture

19 Sep 2021 - 1:45 pm | टर्मीनेटर

भारी म्हणजे काय, एकदम भारी...
पाटेश्वरचा गूढरम्य लेणीसमूह जाम आवडला 👍 माझे मुळ गाव सातारा असले तरी तिथे खुपच कमी वेळा गेलोय. आता खास ही लेणी बघ्ण्यासाठी जावे लागेल!
वाचनात न आलेला हा लेख वर आणल्याबद्दल गुल्लुदादांचेही आभार.

धन्यवाद गुल्लू दादा, गॉडजिला, चौथा कोनाडा आणि टर्मीनेटर.

इथे अवश्य जाऊन याच. नक्कीच एक वेगळा अनुभव मिळेल.
पाटेश्वर, किकलीचे भैरवनाथ मंदिर एका दिवसात अगदी व्यवस्थित करता येतील.

अद्भुत ठिकाण दिसत आहे.छान!