असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नरिमन पॉइंट इथल्या सिनेमागृहा मध्ये निवडक काही केतकरांचे परिचित होते - राजकारण, फिल्म, माध्यम, उद्योग या क्षत्रातले आणि श्री अनिल काकोडकर .
एक अभूतपूर्व माहितीपट बघितला ! पारणे फिटले !! Frontier Gandhi, Badshah Khan - A Torch For Peace.

पश्तुन जमात म्हणजे पठाण त्यांच्या हे स्वभावानेच लढवय्ये. त्यांच्या बरोबर असतील त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे पण त्यांना डिवचले तर जीव घेतल्या शिवाय न थांबणारे. त्यांच्या स्वभावाचा परिचय आज सा-या जगाला आहेच आणि त्यात संपूर्ण जगच एका अर्थाने कसे ओढले गेले आहे याचा उहापोह इथे करण्याचे कारण इथे नाही. पण याच एका अर्थाने "हिंसक" समाजाने कधी खान अब्दुल गफार खान नावाच्या शांती दुताला ही जन्म दिला होता ज्याने महात्मा गांधीकडून प्रेरणा घेऊन चक्क पठाणी जनतेला अहिंसक बनायला शिकवलं त्यांचा स्फुल्लिंग चेतवून ! मिशनरी शाळेतून इंग्रजी शिकलेल्या या अत्यंत हुशार विद्यार्थ्याला तरुणपणी इंग्रजी सत्ता मात्र डाचू लागली. इंग्रजी सत्ता उलथवून टाकून भूमिपुत्रांच्या हाती राज्य पुन:प्रस्थापित करणे हे आयुष्याचे एकमेव ध्येय आपल्या समोर ठेऊन मार्गक्रमण करणा-या खान साहेबांना महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाने भारावून टाकले. त्यामुळेच सरहद्द गांधी असा त्यांचा लौकिक भारतात आहे.

अहिंसात्मक मार्गानेच आपले ध्येय आपण गाठायचे हा खान साहेबांचा निर्णय प्रचंड क्रांतिकारकच म्हटला पाहिजे. कारण महात्मा गांधींचे प्रत्यक्ष म्हणणे असे होते " माझा अहिंसेचा मार्ग सोपा आहे. मला लोकांना अहिंसेचे तत्व शिकवणे सोपे आहे. कारण माझ्या आधी भगवान बुद्ध, महावीर यांनी अहिसेचे धडे समाजाला दिले ते धडे गिरवणारे म्हणजे बौद्ध आणि वा जैन समाजाचे लोक इथे आहेत. पुष्कळसा समाज शाकाहारी आहे. त्यांना अहिंसा पचवणे अवघड नाही. पण पठाणी समाजाला अहिंसा शिकवणे हे महाकर्म कठीण आहे कारण एकतर संपूर्ण मांसाहारी आणि जे रक्ताने लढवय्ये आहेत त्यांना हिंसा नको म्हणणे अतिशय अवघड आहे. त्यामुळे खान साहेबांची अहिंसा खरी अहिंसा आहे " खान साहेब नियमित कुराणाचे पठण करायचे. कुराणाचे वाचन करताना ते कधी चष्मा विसरले तर गांधीजींचा चष्मा वापरीत. अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांशी लढा देणारी "खुदाई खिदमतगार" ( Soldiers Of God ) ही एक लाख पठाणांची फौज खान साहेबांनी उभी केली. त्यातले अनेक सैनिक आज ही हयात आहेत.

खान साहेबांच्या जीवनाचा पट अत्यंत प्रभावीपणे "Frontier Gandhi, Badshah Khan - A Torch For Peace" मध्ये चित्रित केलाय. खरे तर या माहितीपटाच्या निर्मिती प्रक्रियेवरच एक चित्रपट होऊ शकेल. कारण ज्या धाडसाने आणि तळमळीने हा माहितीपट कु. टेरी मॅकलुहान या अमेरिकी महिलेने तयार केलाय त्याला सलामच करावा वाटतो. अ-फ-ला-तू-न ! या बाईंनी आपल्या आयुष्याची बावीस वर्षे या विषयासाठी आणि हा माहितीपट खर्च केली आहेत. आत्ता हा माहितीपट ९२ मिनिटांचा असला तरी बाईंकडे जवळ जवळ शंभर तासांचे फुटेज तयार आहे. वैयक्तिक चर्चे मधून त्यांनी माहितीपटाचे काम करताना आलेले अनुभव सांगितले ते छातीची धडधड वाढवणारे आहेत. कारण अफगाणिस्तान मध्ये चित्रीकरण करताना तिथे प्रत्यक्ष तालिबानी राजवट होती. बाईंना तुरुंगवास तर भोगावा लागलाच पण अन्य ब-याच जीव घेण्या प्रसंगातून जावे लागले. या माहितीपटात सुत्रधार नाही खान साहेबांचा जीवन पट अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये असणा-या विविध व्यक्तींच्या बोलण्यातुन, मनोगतातून मांडलाय. त्यात खान साहेबांचा मुलगा आहे, नातू आहेत, बहिण आहे, करझाई, मुशर्रफ यांच्या सारखे नेते आहेत, आज हयात असणारे अनेक खुदाई खिदमतगार आहेत. भारत पाकिस्तानातले लष्करी अधिकारी आहेत, दिग्गज जुने जाणते पत्रकार आहेत. या सगळ्यांच्या मनोगतातून आणि काही स्थळांच्या प्रत्यक्ष चित्रीकरणातून हा पट उभा केला आहे. खान साहेबांच्या, महात्मा गांधींच्या अत्यंत दुर्मिळ चित्रफितींचा समावेश ही इथे आहे. काही अत्यंत दुर्मिळ फोटोंचा समावेश केलाय. खान साहेबांच्या काही लिखित स्वरूपातल्या मनोगताना प्रसिद्ध अभिनेता ओम पुरी यांनी आवाज दिलाय. ९२ मिनिटात एकदाही भानावर न आणणारी ही कलाकृती पाहिल्यावर अक्षरश: रोमांच उभे रहातात.
हा माहिती पट युट्युब वर वा अन्य कुठेही उपलब्ध नाही. भारतात गेल्या दोन वर्षात चार सादरीकरणे झाली. लडाख आणि गोवा फिल्म समारोहात. एक खास राष्ट्रपती महोदयांसाठी राष्ट्रपती भवनात आणि गेल्या आठवड्यात मुंबई मध्ये. खाजगीत बोलताना कधीतरी पुण्यात सादरीकरण करू असे आश्वासन मॅकलुहान बाईंनी दिलंय, केंव्हा हे निश्चित नाही. पण संधी मिळाली तर सगळे बाजूला ठेऊन बघावा असा अत्यंत देखणा आणि आयुष्यभर स्मरणात राहावा असा हा माहिती पट आहे.
( डावी कडून : टेरी मॅकलुहान, कुमार केतकर, आणि मी . फोटो सौजन्य : केसरी पाटील )

प्रतिक्रिया
8 Dec 2013 - 11:23 pm | विनोद१८
सुधीर धन्यवाद,
जर सन्धी मिळाली तर नक्की पाहु, जरुर कळवा.
विनोद१८
8 Dec 2013 - 11:43 pm | मुक्त विहारि
+१
8 Dec 2013 - 11:39 pm | अर्धवटराव
खरच संस्मरणीय असेल हा अनुभव. प्रत्यक्ष्य तो कालखंड, गांधीजींच्या स्फुल्लींगाने पेटलेले ते कष्टाचं पण अद्भुत विश्व... काय असेल त्या काळची परिस्थिती.
अवांतरः केतकरांबद्दल चार कौतुकाचे शब्द वाचायला मिळाले बर्याच दिवसांनी.
9 Dec 2013 - 12:17 am | डॉ सुहास म्हात्रे
बघायला नक्कीच आवडेल. पण इतका विरळ प्रदर्शित होत असेल तर बघायचा कसा?
(खानसाहेबांच्या कार्डिऑलॉजिस्ट असलेल्या नातवाला दुबईतल्या एका काँफरन्समध्ये भेटलेला) इए
9 Dec 2013 - 10:48 am | सुधीर मुतालीक
आपल्याला ही फिल्म बघायची आहे हे छान. भारतात ती कुठे कधी प्रदर्शीत होणार आहे याचा मागोवा घेऊन मी नक्की मिपावर वर्दी देईन.
9 Dec 2013 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
माहिती देण्याच्या आश्वासनासाठी अगोदरच आभार ! नक्की कळवा.
9 Dec 2013 - 1:44 am | प्यारे१
छान आढावा.
बाकी अबुधाबीमध्ये पठाणांना प्रत्यक्ष बघितलंय. हल्लीच्या काही अलकायदा वगैरेच्या व्हिडिओज मध्येही.
त्यांच्याबद्दल काही प्रेम वाटण्याची शक्यताच असू शकत नाही असं वागणं असतंय.
त्या पार्श्वभूमीवर हे लाखभर पठाणांना असं अहिंसा शिकवणं नि अमलात आणणं म्हणजे खरंच 'दिव्य' आहे.
खान अब्दुल गफार खान ह्यांना खरंच ह्या 'मेंढ्यां'ना एका चांगल्या कामाला लावल्याबद्दल सलाम!
9 Dec 2013 - 12:10 pm | पैसा
पण एवढ्या कष्टाने तयार केलेला हा चित्रपट व्यवस्थित प्रदर्शित का करत नाहीयेत?