दर दुसर्या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्याच्या फोनवरून कितीसे बोलणार.. पण आता बहुधा ती तिथे निवांत बसली असावी, आणि इथे माझी फोनाफोनी सुरू झाली होती.. सुरुवातीला रिंग जाऊनही न उचलला जाणारा तिचा हरवलेला फोन.. थोड्याच वेळात संपर्कक्षेत्राच्या बाहेर दाखवू लागला आणि काही काळाने बंद.. तेव्हाच लक्षात आले की फोन चुकीच्या हातात गेला आहे, ज्याची परत आपल्या हाती लागायची शक्यता आता नसल्यातच जमा.. त्वरीत सिमकार्ड बंद करणे हा प्रथमोपचार करायला म्हणून कस्टमर केअरला फोन लावला आणि लक्षात आले तिचाच नाही तर माझाही फोन तिच्याच नावावर होता.. त्याने ओळख पटवण्यासाठी विचारलेले सतरा प्रश्न.. मी माझ्या’च बायकोचा नवरा आहे हे आता मला त्याच्या रेकॉर्डला असलेल्या माहितीला अनुसरून त्याला पटवायचे होते.. ना मला तिच्या माहेरचा पत्ता सांगता येत होता ना इतर अकाऊंट डिटेल्स.. सुदैवाने एक क्ल्यू लागला, आणि बायकोची जन्मतारीख लक्षात ठेवण्याचा मला अजून एक फायदा समजला.. समोरची व्यक्ती फोनवर दिसत नसली तरीही बायकोची जन्मतारीख लक्षात ठेवणारा नवरा बघून नक्कीच त्याच्या चेहर्यावर कौतुकाचे भाव पसरले असणार.. अन त्याच खुशीत का असेना त्याने एकदाची माझी तक्रार नोंदवून घेतली..
कार्ड तर बंद झाले.... पण पुढे काय??
जेमतेम दिड महिन्यापूर्वी घेतलेला मोबाईल.. पुरेसा महागडा.. गेल्याचे दुख तर होतेच पण त्यापेक्षा मोठी चिंता, तातडीने नवा घेणे गरजेचे होते.. नव्हे पर्यायच नव्हता.. मोबाईल हि आपण एक अतिआवश्यक मूलभूत गरज बनवून ठेवली आहे, अन्यथा एकेकाळी संपर्काचे कोणतेही साधन नसताना सारे मित्र कसे न ठरवता भेटायचो, वगैरे वगैरे तत्वज्ञानाने भारलेल्या भावनेच्या सागरात पोहून आल्यानंतरही पुढे काय हा प्रश्न कायम होताच.. नुसते बोलण्यापुरतेच नाही तर कॅमेरा, ईंटरनेट, म्युजिक प्लेअर, विडिओगेम्स, काय काय आणि कश्या कश्यासाठी वापरला जाणारा मोबाईल.. नवीन घेईपर्यंत हे सारेच थंडावणार असल्याने पुढील पगारापर्यंत थांबणे शक्य नव्हते.. एकदा का सर्वसोयीसुविधांनी युक्त मोबाईल वापरायची सवय लागल्यावर परत फिरून साधा मोबाईल वापरायला तिला आवडणार नव्हते.. तर मोबाईलच्या बाबतीत आजवरचा तिचा धांदरटपणा पाहता पुन्हा तिला महागडा मोबाईल घेऊन देणे मला परवडणार नव्हते..
कधी नव्हे ते माझ्या बायकोचा थोडक्यात आटोपलेला फोन आणि त्यानंतर बदललेला माझा चेहरा, अन उडालेली धावपळ.. काहीतरी विपरीत घडलेय हे चाणाक्ष सहकार्यांच्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही.. काय झाले ते सांगितले तसे सल्ले यायला सुरुवात झाली..... अर्थातच, अगदी मोफत !
"मागे पण एकदा हरवलेला ना तिने फोन, कशी वेंधळी आहे रे तुझी बायको........ (अग्ग ए बाई, माझ्या बायकोने हे ऐकले ना, तर जीव घेईन... तुझाही आणि माझाही!)
"या बायकांना फोन वापरायची अक्कलच नसते........ (अरे बाबा, इथे मी माझ्या टेंशनमध्ये आहे आणि तू तेवढ्यात ऑफिसमधल्या बायकांना टोमणा मारायचा चान्स काय घेतोयस..)
"तिलाही आता तुझ्यासारखाच दगडी मोबाईल घेऊन दे........ (अच्छा ! आता हा टोमणा मला का... पण नकोच ते, एकाकडे तरी चांगल्यातला मोबाईल असलेला बरा रे..)
"आता एखादा चांगला फोन तू स्वताला घे आणि स्वताचा साधा फोन तिला वापरायला दे........ (अर्रे पण अश्यानेही नवीन आणि महागडा फोन हा घ्यावा लागणारच ना..)
"तिला मोबाईलबरोबर एक चैन विकत घेऊन दे आणि मोबाईल त्या चैनेला अडकवून गळ्यात लटकवायला सांग, म्हणजे कुठे हरवणार नाही........ (सादर प्रणाम __/\__ राजा तुला, हेच करू शकतो मी आता, तुर्तास या आयडिया आपल्याजवळच ठेव..)
......
...
अर्थातच, माझ्या सर्व प्रतिक्रिया मनातल्या मनातच होत्या.. अन त्या व्यक्त करताना चेहरा शक्य तितका शांत अन निश्चल.. नाही म्हणायला थोडेसे हसायला मात्र आले, जेव्हा शेजारच्या मुलीने न सांगता स्वताहूनच "चीपेस्ट मोबाईल इन ईंडिया" टाईप करत गूगलवर शोधायला घेतले.. खर्रंच, कोणाचे काय तर कोणाचे काय, म्हणतात ते उगीच नाही.. काही का असेना, एकंदरीत या हसतखेळत शेवट झालेल्या चर्चासत्रानंतर थोडेफार हलके मात्र वाटायला लागले.. त्यानंतर पुन्हा दोनचार वेळा तिच्या हरवलेल्या फोनवर रिंग मारून आता तो कायमचा आपल्यातून निघून गेला आहे याची खात्री केली आणि विचार मनातून झटकून टाकला.. आज्जीच्या एका सुरेख अन तितक्याच टिपिकल वाक्याची आठवण यावेळी झाली.. ती आज असती तर नक्कीच म्हणाली असती.. फोनच गेलाय ना.. कोणी नशीब तर नाही ना नेलेय तुझे.. त्याच धर्तीवर मनात आले.. कोणीतरी फोनच चोरला आहे ना, सुख तर नाही ना हिरावलेय माझे..... पण हे असे समजून आपल्याच मनाची समजूत काढणे तितकेच कठीण असते हे देखील जाणवले.
दिवसभरात सतर्यांदा येणारा तिचा फोन अन प्रत्येकवेळी वैतागतच उचलणारा मी... आज चक्क ती पुढचा फोन कधी कुठून करते याची वाट बघत होतो.. आज ना तिचा जेवलास का विचारायला फोन येणार होता ना गोळ्या घ्यायच्या आठवणीचा.. आला तो अगदी संध्याकाळीच जेव्हा मी निघायच्या तयारीत होतो.. नेहमीच्या जागेवर अन नेहमीच्या वेळेवर, ती माझी वाट बघत उभी राहणार होती जिथून आम्ही एकत्र घरी जातो..
...... "ओरडणार का रे आता बायकोला?" ... ऑफिसातून निघताना एका मैत्रीणीने सहजच विचारले..
"हि माझ्या बायकोची काळजी आहे, की तिला ओरडायची आठवण??" ........ अन माझ्या या प्रत्युत्तरावर आम्ही दोघेही खळखळून हसायला लागलो..
या हसण्याने तयार झालेला मूड शक्य तितका तसाच कायम राहील आणि ते तसेच चेहर्यावर दिसेल याची काळजी घेतच मी आमच्या नेहमीच्या जागी बायकोला भेटलो.. एकंदरीत काय घडले याची थोडीफार चर्चा झाली.. ज्यातून मला समजले की तिचा फोन हरवला नसून चोरीला गेला होता..
आता चोरी आली तिथे पोलिस तक्रारही आलीच.. पण त्याने मोबाईल काही परत मिळत नाही हे देखील ठाऊक होतेच.. त्यामुळे ती पायरी चढण्याचा प्रश्नच नव्हता.. तरी तिला कोणीतरी कल्पना दिली होती की मोबाईलचा कसलासा आयएमईआय नंबर असतो ज्यावरून फोन कायमचा बंद करू शकतो.. चारपाच हेलपाटे मारावे लागतील पण ज्याने तो चोरला आहे त्याच्यासाठी तो मोबाईल फक्त गेम्स खेळण्यापुरता आणि गाणी ऐकण्यापुरता शिल्लक राहील.. मोबाईल म्हणून त्याचा वापर शून्य ! आपल्या कामात नाही ना, तर ज्याने तो चोरला आहे त्यालाही तो पचू द्यायचा नाही.. हि त्यामागची धारणा !!
पण याची खरेच गरज होती का? तिच्या मैत्रीणीच्या नवर्याने असे केले त्याला समाधान मिळाले.. तो त्याचा स्वभाव अन तो आपल्या जागी बरोबर होता.. पण यातून आपल्यालाही समाधान मिळणार होते का.. नाही तर मग का उगाच ते चारपाच हेलपाटे घालायचे कष्ट घ्या, ज्यातून आपल्या हाती मनस्तापाशिवाय काही लागणार नाही.. पटलं तिला.. धुमसणेही शांत झाले.. समोर ट्रेन लागली होतीच.. मी म्हणालो, चल मग आता, जाऊया घरी........
"म्हणजे?? ... आपण शॉपिंग नाही करायची??" ... अगदी निरागस भावात अन भाबड्या स्वरात, अनपेक्षितपणे आलेला तिचा प्रश्न.. ऐकताक्षणीच आठवले.. अरे खर्रेच की, मॉलमध्ये सेल लागला आहे म्हणून परवाच आपण दोघांनी हा शॉपिंगचा प्लॅन बनवला होता.. अगदी कोणाला काय घ्यायचेय या मंथनात कालची रात्र जागवली होती.. अन आज दिवसभराच्या धांदलीत डोक्यातून निघूनच गेले होते..
बस्स मग काय... जेवढ्या किंमतीचा मोबाईल, जवळपास तेवढ्याच किंमतीची खरेदी झाली.. किंबहुना एखादा मोबाईल गेल्याने आपल्यावर आभाळ कोसळत नाही हे स्वतालाच दाखवून द्यायला जास्तच झाली.. जे जायचे होते ते केव्हाच गेले होते.. आता नवीन मोबाईल कोणत्या कंपनीचा आणि मॉडेलचा घ्यायचा याचे आमच्यात डिस्कशन सुरू झाले होते.. सोबतीला एकमेकांना आपापल्या ऑफिसमधील गंमतीशीर प्रतिक्रिया सांगत होतो.. कधीतरीच बायकोच्या धांदरटपणावर तोंडसुख घ्यायची संधी मिळते जी मी हक्काने बजावत होतो.. आजच नाही तर पुढचे काही दिवस आता हेच करणार होतो.. हे सुख नाहीतर आणखी काय होते..
- तुमचा अभिषेक
---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://misalpav.com/node/24985
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://misalpav.com/node/25031
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३) - http://misalpav.com/node/25051
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४) - http://misalpav.com/node/25068
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५) - http://misalpav.com/node/25116
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६) - http://misalpav.com/node/25499
---------------------------------------------------------------------------------------------------------