ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
14 Jun 2013 - 9:37 am

२९ मे २०१३

आज ऑफिसमधून घरी आलो, बॅग फेकली, कपडे भिरकावले, बाथरूममध्ये जाऊन झटपट शॉवर घेतला, तोपर्यंत माझा चहा रेडी होता. बस तो हातात घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर म्हणजे हॉलमधील भल्यामोठ्या खिडकीसमोर आरामखुर्ची टाकून बसलो, पाय पुढे पसरवून त्या खिडकीच्या कठड्यावर टेकवले अन लांबवर दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेल्या मुंबईकडे पहात, जिच्यासमोर एअर कंडीशन सुद्धा झक मारेल अश्या दहाव्या मजल्यावरील आमच्या खिडकीतून आत शिरणार्‍या वार्‍याच्या थंडगार झुळकीचा आनंद घेत हातातल्या कॉफी मगातील गरमागरम चहाचे घोट मारत.... बस्स ती पंधरा-वीस मिनिटे.. बायकोही खिडकीला रेलून उभी, सोबतीला, तिच्या बरोबर मारल्या जाणार्‍या इकडच्या तिकडच्या गप्पा अन हलकेफुलके विषय.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते.

.
.
.

३१ मे २०१३

काल महिन्याभराने गालावरचे केस साफ केले आणि माणसात आलो. आरशात स्वतःचे रुपडे पाहिले अन तेव्हाच समजले, आजचा दिवस खासच जाणार. बायकोला मी कसा दिसतो हे विचारणे आणि तिने छान दिसतोयस हे सांगणे, रोजचेच आहे. खरी मजा आहे तिने स्वताहून सांगण्यात. आज नेमकं तेच झाले. नेहमी मी तिच्यामागे माझा एखादा फोटो काढ म्हणून लागत असतो पण आज सकाळी तिनेच आणखी एक आणखी एक करत उशीर करवला. तिच्या नवीन घेतलेल्या मोबाईलचा हाई मेगापिक्सेल कॅमेरा हे केवळ एक निमित्त होते. ऑफिसमध्येही कौतुकाच्या नजरा झेलतच दिवस गेला. एक दोन नजरा लाजल्याही. त्या तेवढ्या वगळता घरी गेल्यावर बायकोला सारा वृतांत दिला, की आज ऑफिसला सारे कसे तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ चालू होते. तिनेच मग सकाळच्या फोटोचा विषय काढला. म्हणाली, छानच आलाय, उगाच ती दाढी वाढवतोस, कॉलेजगोईंग स्टुंडट वाटतोयस फोटोत. माझी सर्वात आवडती कॉम्प्लीमेंट, न मागता समोरून आली. छाती दोन इंच पुढे अन पाय चार ईंच हवेत. पुढचे चारचौघांत सांगण्यासारखे नसते, पण स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

बस्स आता इथे एखाद्याने विचारावे, अभ्या तो फोटो तर दाखव, म्हणजे सुखाचे एक वर्तुळ पुर्ण होईल !

.
.
.

१ जुन २०१३

पाच दिवस ऑफिसमध्ये, बसून बसून राबल्यावर, येणारा सुट्टीचा शनिवार हल्ली बेडरूममध्ये झोपण्यातच जातो. आज मात्र आम्ही दिवाणखान्यावर कब्जा केला.. आईवडील कोण्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले असल्याने संध्याकाळपर्यंत घरावर आम्हा दोघांचेच राज्य होते.. मिळून बनवलेले ब्रेडबटर, कडक चहाच्या साथीने अन टीव्हीवर बारा वाजताचा मॅटीनी शो - दिल तो पागल है. कित्येक वर्षांनी, कितव्यांदा ते आता आठवत नाही.. तसा वरचेवर लागत असतोच, पण आज चॅनेल बदलून पुढे जावेसे वाटले नाही. ना बायकोने तो हट्ट धरला.. काही सिनेमे काही ठराविक वेळीच बघण्यात मजा असते. हा त्यापैकीच एक, अन आज तश्यातलीच वेळ.. पुन्हा एकदा शाहरुखच्या प्रेमात पडलो. माधुरीच्या तर सदैव होतोच.. कोई लडकी है, जब वो हसती है.. गाणे सुरू झाले अन पायाने सहज ठेका धरला. तसा तो नेहमीच धरतो, पण आज अख्खा हॉल मोकळा मिळाला होता.. अचानक अंगातला शाहरुख बाहेर आला अन बघता बघता सहज ठेक्याचे रुपांतर नाचात झाले.. हे ही वरचेवर होतेच, पण आज सोने पे सुहागा म्हणजे बायकोनेही साथ दिली.. गाणे संपले अन जाहीरात लागली, पण मूड बदलू द्यायचा नव्हता. चॅनेल चेंज केला तर एक लडकी भिगी भागीसी.. शाहरुखचा किशोर कुमार व्हायला कितीसा वेळ लागणार होता. पुढच्या पाचदहा मिनिटांत रणबीर कपूरही येऊन गेला.. त्याच तालावर खुंटीवरचे टॉवेल खेचून बायकोने बाथरूममध्ये पिटाळले.. नच बलिये संपले अन सारेगामापा सुरू झाले.. फुल जोश अन फुल्ल फॉर्मात.. स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
.

३ जुन २०१३

आज संध्याकाळी नेहमीसारखे वाशी स्टेशनवर बायकोला पिकअप केले अन ट्रेन पकडली.. ठरलेली ट्रेन अन ठरलेली जागा.. रिकामे कंपार्टमेट अन खिडकीतला वारा.. पण आज वार्‍याबरोबर पावसाचे तुषारही चेहर्‍यावर थुडथुडत होते.. खिडकीसाठी आपसात भांडून झाल्यावर.. अन भांडणात नेहमीसारखेच हरल्यावर, मी मुकाट दारावर उभा राहायला गेलो.. वाशी खाडीच्या पूलावरून धडधडत जाणारी ट्रेन, अन दोन्ही बाजूला पसरलेला गोलाकार समुद्र.. नेहमीची निश्चलता विसरून पार खवळून उठला होता.. खिडकीतून त्याचे रौद्र रुप डोळ्यात सामावणे अशक्यच, म्हणून बायकोही उठून दारावर आली अन मला हरलेल्या भांडणातही जिंकल्यासारखे झाले.. वार्‍यावर भुरभुरणारे तिचे कुरळे केस, त्यांना सांभाळू की स्वताला सांभाळू.. एस्सेलवर्ल्डची राईडही झक मारेल, अशी ही आमची मुंबई लोकल ट्रेन.. आता तीनचार महिने रोजच नशिबी असणार आहे.. स्साले सुख म्हणजे आणखी असते काय..

.
.
.

५ जुन २०१३

काल संध्याकाळी पुन्हा पावसाने गाठले.. या मोसमातील हा तिसरा पाऊस.. की चौथा.. काय फरक पडतो.. पहिल्या दुसर्‍यातील नवलाई तशीही ओसरली होतीच.. ट्रेनमध्ये होतो तोपर्यंत काही वाटले नाही, पण स्टेशन जवळ येऊ लागले तसे कपाळावर चिंतेची एक लकेर उमटली.. तेच कपाळ जाळीच्या खिडकीला टेकवून वर आकाशावर नजर टाकली.. काळवंडलेल्या प्रतलाकडे पाहून काही समजत नसले तरी तोंडावर झालेल्या टपोर्‍या थेंबांचा मारा हवे ते सांगून गेला.. डॉकयार्ड आले तरी पावसाचा जोर काही ओसरला नव्हता.. पहिल्या पावसात भिजण्याच्या आनंदात छत्री शोधायचे नेहमीच राहून जाते.. अन मग दुसरा पाऊस असा खिंडीत पकडतो.. एका हाताने पॅंट आणि एका हाताने बायकोला सांभाळत, उतरणीच्या जिन्याने स्टेशनबाहेर पडलो खरे, पण इथून खरा प्रश्न सुरु होत होता ते चिखलपाण्याचा रस्ता तुडवत घरी जायचे कसे. टॅक्सीचे डबल भाडे देण्याची तयारी असूनही ती मिळणार नव्हतीच, नशीब तेवढे चांगले की मुसळधार पावसाची जागा रिमझिम बुंदाबांदीने घेतली होती. मनाचा ठिय्या करून चालायला सुरुवात केली, तो इतक्यात फोन खणखणला.. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. अभि'ज मॉम कॉलिंग.. येताना दूध आणि हार घेऊन यायचा आदेश.. आता बाहेरून फिरून जावे लागणार म्हणून बायकोची चिडचिड.. पण माझे विचार मात्र आता बदलले होते, असेही कमीजास्त भिजणारच आहोत तर का नाही पुर्णच भिजण्याचा आनंद घेत जावे.. तोच रस्ता अन तोच पाऊस, बघण्याची नजर बदलली अन वेगळाच भासू लागला.. दोनचार पावले चपचप करून पाय आपटत काय चाललो., मुद्दामच., अन चिखलाचेही अप्रूप वाटेनासे झाले.. बायको मात्र अजूनही वेगळ्याच ट्रॅकवर चालत होती.. समांतर असूनही न मिळणारा.. खेचूनच तिला भटाच्या टपरीवर नेले.. उकाळ्याचा तो वास, अन सैरावैरा सुटलेली वाफ., भिजलेल्या गर्दीतही उत्साह पेरायची किमया करून जात होती.. हिचाही मूड बदलला नसता तर नवलच.. दोन हातात दोन कटींग, गर्दीतून वाट काढत मी.. फूटपाथकडेच्या झाडाचा आडोसा पकडला. पावसाची रिपझिप थांबली होती मात्र हवेने गारवा पकडला होता.. अगदी रोमँटिक की काय म्हणतात तसले वातावरण., बस ती आणि मी.. सोबतीला होते ते झाडावरून ओघळणारे अन चहाच्या पेल्यात विरघळणारे, पावसाचे टपोरे थेंब.. पाण्यात विरघळणारी ती आणि तिच्यात विरघळणारा मी.. स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
.
- तुमचा अभिषेक

हे ठिकाणप्रकटनविचारआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

14 Jun 2013 - 9:37 am | तुमचा अभिषेक

नुकतेच मिपा बंद पडलेले अन त्यामुळे उडालेल्या लेखांत माझा हा लेखही गंडला. दुर्दैवाने त्यावरचे प्रतिसादही उडाले पैकी शेवटले काही वाचायचेही सुख नशिबी नव्हते.

असो, तरीही हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहे कारण याची पुढे मालिका बनवायची इच्छा आहे !

पैसा's picture

14 Jun 2013 - 9:52 am | पैसा

छोट्या छोट्या गोष्टीतले सुख जाणवले तर नशीब!

तुमचा अभिषेक's picture

16 Jun 2013 - 9:36 pm | तुमचा अभिषेक

धन्यवाद .. !!
मधील दोन दिवसांची परिस्थिती पाहता हे पुन्हा एकदा उडतेय की काय असे वाटले होते.. पण तगले.. :)

रेवती's picture

16 Jun 2013 - 11:00 pm | रेवती

chhaan lihile aahe.

आधी प्रतिसाद दिला होता - तो आठवत नाही. पण लेख आवडला होता इतके आठवते :-)
पुन्हा एकदा लेख वाचला आणि आवडला.

तुमचा अभिषेक's picture

22 Jun 2013 - 9:47 pm | तुमचा अभिषेक

प्रतिसाद महत्वाचे नाहीत असे नाही म्हणणार, लिखाणाचे कौतुक होने हे खरेच एक सुखच असते.. पण कोणाला पुन्हा वाचावेसे वाटने हिच फार मोठी पावती आहे :)

अप्पा जोगळेकर's picture

22 Jun 2013 - 6:23 pm | अप्पा जोगळेकर

मुंबईत गगनचुंबी इमारतीमधे तुमचे घर आहे, तुमचे लग्न झालेले आहे आणि तुम्ही फार्फार सुखात आहात हे समजले. अभिनंदन.
'सिगरेट पिणारी मुलगी' च्या लेखकाचे नाव वाचून अपेक्षा उंचावल्या होत्या. पण निराशा झाली. असे अपडेट फेसबुक वर टाकले तर दणकून चालतील.

तुमचा अभिषेक's picture

22 Jun 2013 - 9:42 pm | तुमचा अभिषेक

आपल्या प्रतिसादातील पहिली ओळ पाहून खेद वाटला, मी मुंबईतील गगनचुंबीच्या जागी उपनगरात एखाद्या झोपडीत राहात असलो तरीही तिच्या खिडकीतून दिसणार्‍या लोकल ट्रेनचे कौतुक केले असते.. किंवा जर मला असमाधानीच व्हायचे असते तर आमच्या समोरच आमच्यापेक्षा दुप्पट गगनचुंबी आणि चौपट भाव असलेली इमारत उभी आहे तिच्याकडे पाहून उसासे सोडने पुरेसे होते..
जर मी हे तुमच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून लिहिले असेल तर क्षमस्व !

दुसरी ओळ मात्र पटली.. हे खरेच फेसबूक अपडेट म्हणूनच लिहिले होते.. आणि दणकून की कसे माहीत नाही पण तिथेही काही जणांना आवडते.. पण ते ही वाचकच नाही का, त्यांना कमी का लेखायचे..
जर इथे कोणाला वाचायला हे आवडत नाही असे माझ्या लक्षात आले तर मी इथे प्रकाशित करने स्वताहून बंद करेन आणि जर उद्या मला स्वतालाच या लिखाणातून आनंद मिळायचा बंद झाला तर लिहिणेच बंद करेन :)

भावना कल्लोळ's picture

22 Jun 2013 - 6:47 pm | भावना कल्लोळ

तुमचा लेख वाचुन ३ वर्षापूर्वीचा दिवस आठवला. ऑफिसच्या कामानिमित्त ठाणे करायचे होते आणि तिथून आमच्या भाडेकरू असलेल्या वसईच्या घरीही जायचे होते. अनायासे आमचे यजमान घरीच असल्याने एक लॉंग ड्रावच्या निमित्ताने आमच्या दुचाकी वरून निघालो. गिरगाव - ठाणे- वसई व परत गिरगाव. पूर्ण प्रवासात साथ मुसळधार पावसाची. थंडीने थरथरत घोडबंदर वर टपरी वर पिलेला तो चहा, दोन बाजूची हिरवळ, आवडता पाऊस, आणि जीवापाड प्रेम असणारी आपली आवडती व्यक्ती. तो दिवस माझ्या स्मरणात पावसाच्या कधी हि न पुसणाऱ्या पाणेरी थेंबाने लिहिला गेला आहे. आज तुमच्या लेखामुळे पुन्हा तो चमकून आला. धन्यु त्याबद्दल.

तुमचा अभिषेक's picture

22 Jun 2013 - 9:51 pm | तुमचा अभिषेक

मस्त अनुभव.. पण हा प्रतिसाद माझ्या बायकोच्या नजरेस पडू नये याची काळजी घ्यायला हवी.. दुचाकी चालवणे जमत नाही यावरून मला बरेचदा सुनावत असते.. :(

प्यारे१'s picture

22 Jun 2013 - 10:48 pm | प्यारे१

वाह वाह!

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2013 - 5:08 pm | प्रसाद गोडबोले

भारी लिहिलय ... अगदी स्वतःचे अनुभव आहेत असं वाटले वाचताना कित्येकदा ...
कुठल्या तेरी लेखकाने म्हणले आहेच ना ...More you become personal ,...more you become universal ...

पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !!