----------------
पहिल्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
प्रतिक्रिया
18 Jul 2013 - 8:43 am | चौकटराजा
बर्यात वर्षानी ही कविता वाचतोय ! पहिल्या चार ओळी तर चित्रमयतेचा कळस ठरावा ! आपल्याला धन्यवाद !
18 Jul 2013 - 3:19 pm | यशोधरा
चौरा, माझ्या एका मैत्रिणीने दिली मला ही कविता, तुम्ही दिलेले धन्यवाद तिला पोचवते. :)
18 Jul 2013 - 10:34 pm | प्रचेतस
जगाचा गल्बला
जगात सोडुन
प्रेमाची मृणाल-
बंधने तोडून-
होता तो भ्रमिष्ट
भ्रमत एकला
नादात अगम्य
टाकीत पावला
वर्तले नवल
डोंगर-कपारी
गवसे प्रतिमा
संगमरवरी !
हर्षाचा उन्माद
आला त्या वेड्याला
घेऊन मूर्ति ती
बेहोष चालला,
आढळे पुढती
पहाड उभार
वेड्याच्या मनात
काही ये विचार
थांबवी आपुला
निरर्थ प्रवास
दिवसामागून
उलटे दिवस-
आणिक अखेरी
राबून अखण्ड
वेड्याने खोदले
मंदिर प्रचंड
चढवी कळस
घडवी आसन,
जाहली मंदिरी
मूर्त ती स्थापन !
नंतर सुरू हो
वेड्याचे पूजन
घुमते कड्यात
नर्तन गायन
रान अन् भोतीचे
स्फुंदते सकाळी
ठेवी हा वेलींना
ना फूल, ना कळी !
विचारी आश्चर्ये
तृणाला ओहळ
कोण हा हिरावी
रोजला ओंजळ ?
परन्तु मूर्त ती
बोलेना, हलेना,
वेड्याचे कौतुक
काहीही करीना !
सरले गायन
सरले नर्तन
चालले अखेरी
भीषण क्रंदन
पडून तिच्या त्या
सुन्दर पायाशी
ओरडे रडे तो
उपाशी तापाशी !
खुळाच ! कळे न
पाषाणापासून
अपेक्षा कशाची
उपेक्षेवाचून !
वैतागे, संतापे,
अखेरी क्रोधाने
मूर्तीच्या ठिकर्या
केल्या त्या भक्ताने !
रित्या त्या मंदिरी
आता तो दाराशी
बसतो शोधत
काहीसे आकाशी.
वाटेचे प्रवासी
मंदिरी येतात
आणिक शिल्पाची
थोरवी गातात.
पाहून परंतू
मोकळा गाभारा
पाषाणखंडांचा
आतला पसारा-
त्वेषाने बोलती
जाताना रसिक
असेल चांडाळ
हा मूर्तिभंजक !
------------
कुसुमाग्रज
18 Jul 2013 - 11:36 pm | बॅटमॅन
अतिशय जबरी कविता!
19 Jul 2013 - 8:14 am | यशोधरा
मस्त!
19 Jul 2013 - 9:26 am | यशोधरा
ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्मशानातली जत्रा
खांद्यावर घेऊनी शव फिरतो जन्म
राखेत अश्रूला फुटला हिरवा कोंब
नंतर लिहिते बाकीचे..
19 Jul 2013 - 5:23 pm | मोदक
या वळवाच्या सरीपरी तू आलीस माझ्या दारी गं
झाकळले नभ होय मोकळे गळे तयातून ऊन कोवळे
हे धन असले कधी न दिखले रवीच्या विभवागारी गं
या वळवाच्या सरीपरी तू आलीस माझ्या दारी गं
मळल्या राया न्हाऊनी नटल्या
निजलेल्या स्वरलहरी उठल्या
रुळवीत चरणी चपल लाजर्या सोनकिनारी भारी गं
मृद्गंधाच्या चवर्या ढाळीत
नाचत नाचत आले मारुत
कणाकणातून घुमवत मादक मदनाची ललकारी गं
थरारली बघ कमळे सगळी
मकरंदाला फुटली उकळी
जलदाची पिचकारी बसली निळ्या निळ्या कासारी गं
तृणातृणातून उठली तृष्णा
आवरसी मग का तव करुणा
खुले करी हे जीवन अडले वरुणाच्या भांडारी गं
या वळवाच्या सरीपरी तू आलीस माझ्या दारी गं
बाकीबाब!
19 Jul 2013 - 5:31 pm | यशोधरा
सुंदर!
19 Jul 2013 - 6:28 pm | बॅटमॅन
ए अबे बोरकरांच्या कवितासंग्रहाचे नाव काय???? चट्टशिरी विकत घेईन म्हंटो.
19 Jul 2013 - 6:39 pm | मोदक
बोरकरांच्या कविता खंड १ व २.
एक खंड रू ४५०. राज जैनकडे मी ऑर्डर नोंदवली आहे.
19 Jul 2013 - 6:45 pm | बॅटमॅन
वा थँक्स. आर्डर नोंदवतो.
20 Jul 2013 - 5:22 pm | मेघवेडा
विचारसी परोपरी मला 'आणखीन काय'?
शब्द मावळती सारे माझा होई निरुपाय
बोलायचें खूप खूप मनी येतो मी योजून
तुला पाहतां पाहतां जातो परी विसरून
कांचनाचीं निरांजनें तसे तुझे गडे डोळें
त्यांत कापरासारखा माझा जीव जळे, पोळे
खट्याळ त्या ओठांतून तोंच गुलाबाचें पाणी
गार गार सुगंधात माझे पंचप्राण न्हाणी
क्षणोक्षणीं ओलांडितो असे जीवन-मरण
जन्मताना मरताना कुणा शब्दांचें स्मरण?
असें मुकाट्याने वाटे तुला आजन्म पहावें
उदकात विस्तवात न्हात जळत रहावें
आणि तूंही विचारावें मला 'आणखीन काय?'
शब्दवैभव असून माझा व्हावा निरुपाय!
- बा. भ. बोरकर
20 Jul 2013 - 5:23 pm | यशोधरा
आई गं मेव्या, काय कविता टाकलीस! मस्त!
20 Jul 2013 - 5:23 pm | मेघवेडा
आकाश निळे तो हरी
अन एक चांदणी राधा
बावरी
युगानुयुगीची मन-बाधा
विस्तीर्ण भुई गोविंद
अन क्षेत्र साळीचे राधा
संसिद्ध
युगानुयुगीची प्रियंवदा
जलवाहिनी निश्चल कृष्ण
वन झुकले काठी राधा
विप्रश्न
युगानुयुगीची चिरतंद्रा
-- पु. शि. रेगे
20 Jul 2013 - 5:27 pm | कवितानागेश
मस्त!
:)
21 Jul 2013 - 10:58 am | ज्ञानोबाचे पैजार
घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात
माहरी जा, सुवासाची कर बरसात !
"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !
विसरली का ग, भादव्यात वर्स झाल,
माहरीच्या सुखाला ग, मन आचवल.
फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.
काळया कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?
कपिलेचया दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"
आले भरन डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीचया भेटीसाठी जीव व्याकूळला !
21 Jul 2013 - 11:20 am | ज्ञानोबाचे पैजार
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!
अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं
निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!
म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.
असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!
25 Jul 2013 - 7:25 pm | आदूबाळ
वसंततिलका!
25 Jul 2013 - 5:46 pm | अविनाशकुलकर्णी
मरतेसमयी स्वामीचं झाडाच्या कोंबाशी संभाषण...
=======================================
तू असाच वर जा
अंधार्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणार्या ईर्ष्येने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सुर्यप्रकाशाला भेट दे
तुला जर फ़ुले येतील-
आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फ़ुले यावीत आणि त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.
तुला जर फ़ुले येतील, तर अशा सहस्त्र फ़ुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.
तुला जर फ़ळे येतील-
आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फ़ळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सुर्यप्रकाशाचा एक एक कण सुखाने नांदावा.
तुला जर फ़ळे येतील , तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पहा. कारण अशा अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.
मग तुझ्या बीजाची फ़ळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणा एवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.
त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक कण जिंकून प्रकाशित केला आहे.
आभाळात एखादे लहान पाखरू दिसले तर त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे.
जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून ते पुन्हा आडवे उघडले, व पानाचा आरसा केला, किंवा कधी तुझे पिवळे फ़ूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखुन घेतली, अगर तुझे एक लाल फ़ुल खुडुन ते दोन बोटांत चेंगरत रसाचा लाल धागा काढला , तर तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
कारण, कुणास ठाउक, अब्जांमध्येच एक असे आढळणारे ते मूल असेल, ते देखील भोवतालच्या अंधार्या अजस्त्र भिंती फ़ोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल.
आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.
म्हणून तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही.
एक फ़ूल गेल्याने तुझे सौंदर्य उणॆ भासणार नाही.
एक फ़ळ गेल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.
इतके तुला वैभव आहे. इतके तुला वैभव मिळो !
या सार्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एकेक पान म्हणजे माझाच एकेक श्वास आहे. म्हणुन तु म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर मी केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.
मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या कारंजाप्रमाणे वर आलो आहे, हे देखिल इतरांना कळू दे.
म्हणून तू असाच वर जा....कथा : स्वामी :: कथासंग्रह: पिंगळावेळ
25 Jul 2013 - 7:34 pm | यशोधरा
भूमीपरी तुझी माया मुकी साठुनिया पोटी
वृक्षापरी आणि माझ्या फुले बोलकी ही ओठी
हवेपरी तुझी माया वेढूनीही निराकार
माझ्या श्वासाउच्छवासात एक तिचा अविष्कार
नभापरी तुझी माया नित्य आणि निरंजन
घाली सौंदर्याचे निळे माझ्या डोळ्यांत अंजन
ऐसी गडे तुझी माया न ये पहाया मापाया
जग विसरुन देवा लागे भक्ताच्याच पायां..
- बा भ बोरकर
25 Jul 2013 - 7:54 pm | यशोधरा
तुझ्या दु:खा वाणी आहे
माझे मात्र दु:ख मुके
तुझ्या उरी ज्वाला तरी
माझ्यांत फक्त धूर-धुकें
सराव तुला, पुलावरुन
भरल्या पुरात घेतलीस झेप
घाबरे माझे पाण्यात प्राण
भोवली अशी पहिलीच खेप
भोवर्यांच्या या बंडाळीत
तूच आता दे रे हात
तडीपार झाल्ये तर
दिली तशीच देईन साथ
- बा भ बोरकर
25 Jul 2013 - 8:01 pm | उपास
तेव्हांची ती फुलं..
सगळं संपलं असं समजून उभे होतो
एकमेकांसमोरः आणि एकमेकांपलिकडे
पानगळतीच्या ओंजळीत होती साठवलेली
आपण एकमेकांना दिलेली तेव्हांची ती फुलं..
फुलणं ही जशी फुलाची भाषा असते
तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा
कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी
एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..
न बोलता उभे होतो एकमेकांसमोर
यापुढे भेटलो तरी आपण परके असणार
कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाहीत
हे ज्यांना क्ळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..
- मंगेश पाडगांवकर
26 Jul 2013 - 11:42 pm | बहुगुणी
आठवणीतून लिहितो आहे, चुकलं असेल तर क्षमस्व!
---------
कुणी घर देता का घर?
एका तुफानाला कुणी घर देता का घर?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून,
माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगला-जंगलात हिंडतंय,
जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतंय.
कुणी घर देता का घर?
खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय,
झाडाझुडपात, डोंगरदर्यांत अर्धं अधिक तुटून गेलंय.
समुद्राच्या लाटांवरती, जंगलातल्या झुडुपांवरती
झेप- झुंजा घेवून घेवून तुफान आता खचून गेलंय.
जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडतंय,
खरं सांगतोय बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय.
कुणी… घर देता का घर?
तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको,
पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको
एक हवंय लहान घर पंख मिटून पडण्यासाठी,
आणि एक हवीय आरामखुर्ची तुफानाला बसण्यासाठी.
आणि एक विसरू नका बाबांनो,
एक तुळशी वृंदावन हवं मागल्या अंगणात... सरकारसाठी.
27 Jul 2013 - 12:07 am | पिशी अबोली
ही आधीच कुणी टाकली असल्यास क्षमस्व..
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कडे-कपारीमधोनी घट फुटती दुधाचे
माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा
माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात
माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी
27 Jul 2013 - 12:11 am | मोदक
बहुतेक पहिल्या भागात असावी.
संपूर्ण कविता यापेक्षा मोठी आणि अप्रतिम आहे. टंकतो आज उद्या..
27 Jul 2013 - 12:14 am | पिशी अबोली
हो.मला एवढीच येत होती..शोधते पहिल्या भागात.. :)
27 Jul 2013 - 12:23 am | मोदक
पहिल्या भागातही असली तरी अपूर्ण असेल. :-)
समग्र बोरकर खंड १ किंवा २ मध्ये संपूर्ण कविता आहे. टंकतो आजच!
27 Jul 2013 - 1:08 am | बहुगुणी
माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फुटती दुधाचे
माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फणसाची रास,
फुली फळांचे पाझर
कळी फुलांचे सुवास
माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी
माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा
माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा
माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफा पानाविण फुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले
माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात
माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी
- बा. भ. बोरकर
27 Jul 2013 - 4:06 am | मोदक
माझ्या गोव्याच्या भूमींत
गड्या नारळ मधाचे,
कड्याकपारी मधोनी
घट फुटती दुधाचे
माझ्या गोव्याच्या भूमींत
आंब्या-फणसाची रास,
फुली फळांचे पाझर
फळी फुलांचे सुवास
माझ्या गोव्याच्या भूमींत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी
माझ्या गोव्याच्या भूमींत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा
माझ्या गोव्याच्या भूमींत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा
माझ्या गोव्याच्या भूमींत
चाफा पानाविण फुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले
माझ्या गोव्याच्या भूमींत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात
माझ्या गोव्याच्या भूमींत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी
माझ्या गोव्याच्या भूमींत
जिव्या सुपारीचा विडा
अग्निदिव्यातुन हसे
पाचपोवळ्यांचा चुडा
माझ्या गोव्याच्या भूमींत
काळे काजळाचे डोळे
त्यांत सावित्रीची माया
जन्मजन्मांतरीं जळें
माझ्या गोव्याच्या भूमींत
लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत
शुद्ध वेदनांची गाणी
माझ्या गोव्याच्या भूमींत
खड्गा जडावाची मूठ
वीर शृंगाराच्या भाळी
साजे वैराग्याची तीट
माझ्या गोव्याच्या भूमींत
उंच धूड देवळांचे
ताजमहाल भक्तीच्या
अश्रूतल्या चांदण्यांचे
माझ्या गोव्याच्या भूमींत
तृणी सुमनांचे गेंद
सिद्ध कुणब्यांच्या तोंडी
शुद्ध सौंदर्याचे वेद
माझ्या गोव्याच्या भूमींत
सुखाहून गोड व्यथा
रामायणाहून थोर
मूक उर्मिलेची कथा
माझ्या गोव्याच्या भूमींत
सारा जीव माझा जडे
पुरा माझ्या कवनांचा
गंध तेथे उलगडे
- बा. भ. बोरकर
27 Jul 2013 - 5:10 am | बहुगुणी
शेवटची आठ कडवी माहीतच नव्हती, धन्यवाद!
27 Jul 2013 - 11:41 am | पिशी अबोली
अहाहा..अतिशय अप्रतिम!!
शतशः धन्यवाद! :)
27 Jul 2013 - 5:29 pm | बॅटमॅन
बोरकरांच्या चित्रदर्शी शैलीपुढे नतमस्तक होणे एवढेच शिल्लक उरते!!!!!
_/\_
27 Jul 2013 - 4:57 pm | मूकवाचक
खलिल जिब्रानच्या मरणोत्तर सभेत एक विख्यात अमेरिकन साहित्यिक म्हणाला: "जिब्रानच्या प्रेमजीवनाविषयी मला काहीही ठाउक नाही." यावर बार्बराचे भाष्य मोठे कुतूहलजनक आहे. म्हणते: "कसं ठाउक असणार? कारण राजस वृत्ती कुणाशी संयोग पावून विश्रांत होते याची ती स्वतः वाच्यता करीत नाही की प्रदर्शन करीत नाही. जीवनातील सौंदर्याचा आणि वेदनेचा सर्वांगाने आस्वाद घ्यावा हे तर जिब्रानचं ब्रीद होतं, अशी खातरजमा ज्याला आहे तो जिब्रान केवढे संपन्न जीवन जगला याविषयी कधीच संशय येणार नाही."
आपण त्याच्या संपूर्ण आंतरिक जीवनवैभवाचे निकटवर्ती मूक साक्षी आहोत, हेच अशा उद्गारातून बार्बरा सुचवते. तिला खोडून काढता येईल असे वाटत नाही. शिवाय तिचे शब्द किती आत्मविश्वासपूर्ण, मुलायम आणि पडदानशीन आहेत! आणखी पुढे ती धीराने सांगते: "कोणाही विरागी ब्रह्मचारी पुरूषाने जीवनाचा मधुमास सखोल अनुभवलेला असत नाही आणि कोणीही जातिवंत प्रेमिक, सेवन केलेल्या दैवी माधुर्याविषयी बोलघेवडा होत नाही. एवढंच म्हणेन की ते माधुर्य त्याच्या संगतीनं सेवन करणारी व्यक्तीही त्याच्या इतकीच मौनमग्न असणार."
एका प्रतिभाशाली पुरूषाच्या खासगी जीवनशैलीविषयी इतक्या समजदारीने आणि औदार्याने त्याच्या सहवासात काही वर्षे काढलेल्या सचिव - सखीने असे लिहावे, हा चरित्रदर्शनाचा एक हृदयस्पर्शी विष्कंभक आहे असे मला वाटते. जिब्रानचे वर्तन नेहमीच प्रेममाधुर्याने फुलून आलेले असे. त्याच्या मायदेशाच्या संस्कृतीला व आदबशीर चालीरीतींना अनुसरून सख्याचा जिव्हाळा त्याच्या नसानसातून वाहता असायचा. पण असा मुक्तपणा, अशी श्रीमंती वेगळ्या अर्थाने घेण्याची चतुराई, त्याच्या संगतीचा लाभ घेणार्या स्त्रिया करीत. हेही बार्बरा नमूद करते. म्हणते की, "याचा अर्थ समजून घेणारे घेतील. शब्दांनी फार सांगता येत नाही. माझ्यापुरतं म्हणाल तर या माणसाचं वादळी आयुष्य नितांत एकाकी होतं आणि ते सनातन आणि सर्वव्यापी स्त्रीसुखासाठी आसुसलेलं होतं, हे मी पाहिलं, आणि ईश्वरी कृपेनं त्याच्या अंतःकरणाला प्रतिसाद मिळाला हे मी अनुभवलं!." याहून शालीन तरी पारदर्शक उद्गार असू शकत नाही असे मला वाटते.
(कै. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या 'स्फटिकदिवे' पुस्तकातून ..)
6 Aug 2013 - 12:13 pm | यशोधरा
मी मुक्त म्हणे हा वृक्षावरचा पक्षी
आभाळ एकटे आहे त्याला साक्षी
पण कुणी दिले हे आभाळाला पंख
शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख..
**
ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला
ऋण फळाफुलांचे असते ह्या धरतीला
ऋण फेडायाचे राहून माझे गेले
ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले..
- - रॉय किणीकर
6 Aug 2013 - 12:42 pm | आदूबाळ
क्या बात! क्या बात!!
6 Aug 2013 - 2:04 pm | अन्तु बर्वा
"बेंबटया, ब्रह्मदेवान एवढी सृष्टी निर्माण केली, पण त्याचा आवडता प्राणी गाढव ! म्हणून मनुष्यप्राण्यातदेखील त्याने गाढवाचा अंश घातलाय. जगात कुंभार थोडे, गाढवेच फार ! तस्मात कुंभारांची चलती आहे. कुंभार हो, गाढवास तोटा नाही !"
पु ल देशपांडे
असा मी असा मी
6 Aug 2013 - 2:59 pm | यशोधरा
कवितांची नावे मला ठाऊक नाहीयेत. कोणाला माहिती असल्यास सांगा प्लीज.
ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी
हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि:संग
शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ
आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फुलांचे अंग
***
दुःख घराला आले
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागून
जणू दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासांनी धरते उचलून
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणू हृदयामागून माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
- ग्रेस
6 Aug 2013 - 5:31 pm | पिलीयन रायडर
ही माझी प्रीत निराळी साजणवेळा मध्ये ऐकलं आहेस का? अप्रतिम म्हणलं आहे मुकुंद फणसळकरने...
6 Aug 2013 - 7:18 pm | यशोधरा
आठवत नै :( मला देतेस का?
8 Aug 2013 - 8:42 pm | मोदक
........माझ्या क्रांतीच्या कल्पनेत रक्त, मुडदे, बंदुकीच्या गोळ्या, आगी लावणे, वगैरे बसत नाही. "कुर्यात् सदा मंगलम्" हा क्रांतीचा खरा मंत्र आहे. मनुष्यप्राण्यांतल्या "मनुष्या"ला मंगल घडावे आणि घडवावे ही ओढ असते. पण त्यांच्यातला प्राणी 'बलवत्तर' झाला की मग रक्त, मुडदे, जाळपोळ ही भाषा सुरू होते. दुर्दैवाने गोष्ट हीच आहे, की अजून मनुष्यप्राण्यातला प्राण्याला लवकर जागवता येते. द्वेषाच्या झेंड्याखाली माणसे फार लवकर जमतात. एरवीचा सौम्य माणूस कुणाचातरी 'मुर्दाबाद' करीत निघाला, की फुत्कारणार्या विराट सर्पासारख्या मोर्चात विषारी सापाचाच अंश होवून चालतो. असल्या ह्या प्राण्याच्या हातून जेंव्हा मंगल कृत्ये होतात तिथे मला क्रांतीचे दर्शन घडते. थोड्या वेळेपुरता असेल, पण त्याच्यातल्या प्राण्यावर मनुष्यत्वाने विजय मिळवलेला असतो. काशीची गंगा तृषार्त गाढवाच्या मुखी जेंव्हा एकनाथ महाराजांच्या हातून जाते, तेंव्हा तिथे मला क्रांती दिसते. आदिवासी घरट्यातून जेंव्हा बालआवाजीत वाचलेला धडा माझ्या कानी पडतो, तो क्रांतीचा मंजुळ सूर मला आवडतो. कॉलेजातील फॅशनेबल तरूण बसस्टॉपवर अनोळखी म्हातारीला हात देवून बसमध्ये चढवतो आणि क्यू मधला स्वत:चा नंबर खुषीने गमावतो हे दृष्य मला मोठ्या शहरात दिसते, तेंव्हा मला क्रांतीचे स्मित पहायला मिळते. आजारी मोलकरणीला जेंव्हा एखादी मालकीण, "तू चार दिवस विश्रांती घे; मी भांडी घासीन" असे सांगताना मला आढळते, तेंव्हा गोपद्मासारखी क्रांतीची पावले तिच्या दारी उमटलेली मला दिसतात. क्रांतीचा आदि, मध्य आणि अंत माणसाने माणसाला जवळ घेण्याच्या क्रियेतून झाला पाहिजे असे मला वाटते. असल्या क्रांतीचे संपूर्ण दर्शन जावूद्या, पण कुठे अंधुक दर्शन घडले, कुठे जराशी पावले दिसली, तरीसुद्धा "सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला" असे होऊन जाते.
- पुलं. "गुण गाईन आवडी" मधून.
आनंदवनामध्ये एकदा कुष्टरोग्यांच्या लग्नामध्ये मंगलाक्षता म्हटल्यानंतर..
__/\__
10 Aug 2013 - 1:09 am | आनन्दिता
माझी सर्वात आवडती कविता...
सत्कार
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार
उरि जेव्हा ज्वालरस झेलुन
धरतीने तप केले दारुण
सुकता सुकता नद्या म्हणाल्या हाच विश्वसंहार
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार.
त्या काळी धरणीच्या पोटी
या इवल्या बीजाच्या ओठी
थरथरली स्फुरली हो होती श्रद्धेची ललकार!
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार.
कवच भूमीचे आणि अचानक
भेदून आले हिरवे कौतुक
नचिकेताचे स्वप्नंच अथवा, अवचित हो साकार
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार.
मातीची ही मात मृत्युवर
मृत्युंजय श्रद्धेचा अंकुर
हा सृजनाचा विजयध्वज, हा जीवन साक्षात्कार
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार.
म्हटले स्वागतगीत खगांनी
केला मुजरा लवून ढगांनी
लाल मातीचा गुलाल उधळीत, पवन करी संचार
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार
कोसळली सर दक्षिण उत्तर
घमघमले मातीतून अत्तर
अष्टदिशांतून अभिष्टचिंतन, घुमला जयजयकार
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार
कवी :- मंगेश पाडगावकर
कवितासंग्रहः- जिप्सी.
10 Aug 2013 - 1:16 am | बॅटमॅन
लै दिवसांनी वाचली ही कविता, शेअर केल्याबद्दल बहुत धन्यवाद! :)
अभ्यासात कधीतरी होती असे वाटतेय, पण यत्ता आठवत नाहीये.
10 Aug 2013 - 3:58 pm | चौकटराजा
ब्याट्राव , आमच्यागत आपणही म्हातारे आहात काय बॉ...? मला ही कविता १९७० मधे अकरावीत होती.
28 Aug 2013 - 1:00 pm | बॅटमॅन
म्हातारा तर आहेच- किती वर्षांचा तेवढं फक्त विचारू नका ;)
(जन्मल्यापासून दिसामासाने "म्हातारा" होणारा) बॅटमॅन.
11 Aug 2013 - 2:36 am | आनन्दिता
@बॅट्मॅन... ही कविता मला अभ्यासक्रमात असल्याचे आठवत नाहीय... हा पण असलीच एक दुसरी कविता होती.. 'मी फुल त्रुणातील इवले'! तिला मस्त चाल बसायची त्यामुळे लक्षात आहे अजुन.
21 Aug 2013 - 7:12 pm | यशोधरा
आज हयात असते रामदास । तर भोवती बघून हरामदास ।
अंतरी जाले असते उदास । लागोन चिंता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठून सुचता असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥
भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश ।
दुर्जनां यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥
नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा ।
सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥
देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती ।
भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥
कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती ।
तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥
येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती ।
त्यातून कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥
कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुंड राज्य करी ।
प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥
दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे ।
काळा कटू गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी ।
भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद ।
काळा कडू आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥
21 Aug 2013 - 9:31 pm | पैसा
आजही तेवढेच लागू पडणारे भाष्य!
21 Aug 2013 - 10:58 pm | मोदक
सहमत.
********************************************
तसेच खालील गीत, चित्रपटाची कथा आणि चित्रपटामध्ये त्या काळी मांडलेले प्रश्न आजही लागू आहेत.
********************************************
उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ॥धृ.॥
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ॥१॥
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली ॥३॥
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली ! ॥४॥
उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली ॥५॥
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ॥६॥
गीत : सुरेश भट
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : सिंहासन [१९७९]
22 Aug 2013 - 9:52 am | आदूबाळ
संपूर्ण कवितेतल्या या सर्वात प्रभावी ओळी
21 Aug 2013 - 7:31 pm | यशोधरा
असू दे जीवन | गेले कोळपून |
त्यात मी ओतीन | संजीवनी ||
पहाटेचा तारा | नाही आला घरा |
तरीही मी धरा | जगवीन ||
सागराचा पेला | नाही मुखी गेला |
बाष्प आभाळाला | देववीन ||
ऋतूराज सहा | नाही आले गेहा |
तरी मी ह्या देहा | फुलवीन |
आवर्ताचे धुके | धूर क्षुब्ध ओके |
चुकलेली टोके | मेळवीन ||
सारे हलाहल | उग्र कोलाहल |
घोर दावानल | आचमीन ||
अश्रूंच्या थेंबांत | पेटवीन वात |
उजळीन पथ | जीवनाचा ||
माझी खरी शक्ती | आहे जनभक्ती |
तेथेच गा मुक्ती | चिरंतन ||
22 Aug 2013 - 10:24 am | शिवोऽहम्
मनात माझ्या उंच मनोरे, उंच तयावर कबुतरखाना
शुभ्र कबुतर घुमते तेथे, स्वप्नांचा खाऊनिया दाणा
शुभ्र कबुतर युगायुगांचे, कधी जन्मले आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे, अर्थावाचुन व्यर्थ न का रव?
प्रश्न विचारी असे कुणितरी, कुणी देतसे अगम्य उत्तर
गिरकी घेवुन अपणा-भोवती, तसेच घुमते शुभ्र कबुतर...
-विंदा करंदीकर
22 Aug 2013 - 10:25 am | शिवोऽहम्
तुझिया ओठावरचा मोहर
मम ओठावर गळला गं..
अन आत्म्याच्या देव्हार्यातुन
गंध मधुर दरवळला गं..
आज मधाची लाट मनावर
उसळत उसळत फुटली गं..
आज सखे मज नकळत अलगज
गाठ जिवाची सुटली गं..
आगांतुक हि आज दिवाळी
उंबरठ्यावर बसली गं..
आज घराची फुटकी कौले
अंधाराला हसली गं..
चार दिशांच्या चार पाकळ्या
चार दिशांना वळल्या गं..
विश्व-फुलातिल पिवळे केसर
खुणा तयाच्या कळल्या गं..
-विंदा करंदीकर
22 Aug 2013 - 1:40 pm | सामान्य वाचक
विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.
मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या..
मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला..
27 Aug 2013 - 12:30 am | अर्धवटराव
दैवी आनंदाच्या बासुंदीत हे परंपरेच्या ओझ्याचं लिंबु का हो पिळलंत? मनाच्या आनंददायी ऊर्मी शरीरभोगाच्या अतृप्त वासनेपेक्षा भिन्न असतात ना... कि आयुष्यभर हा आनंद मिळवलाच नाहि कविने??
23 Aug 2013 - 6:30 pm | यशोधरा
जाईच्या वेलीसारखी
माझ्यातील बाई
स्नेहाने लवलेली
भावनेने भिजलेली
माझ्याइतकेच सुकोमल
तिचे अबोल मन
तिची अनाम थरथर
जगण्याची.. जगवण्याची
फुलण्याची.. फुलवण्याची
माझं उमलणं हा तिचा ध्यास
तिचा छंद
मला वाटतं आभाळभर जावो
तिचा सुगंध
तिच्या डोळ्यांतून टपटपणार्या कळ्यांची
जाई होवो
बाईच्या जन्माची कहाणी
याच जन्मी सुफळ संपूर्ण होवो..
23 Aug 2013 - 6:35 pm | यशोधरा
हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात
पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेह्वा नदीहून
बेफाम होतात..
कोसळतात खोळ तेह्वा किती उंच जातात!
जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गंध, गळून पडतात.
नियतीचा सहज स्वीकार हृदय
देणारेच करतात
अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची
गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून
नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही
आप्ले हृदय देतात
हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात.
26 Aug 2013 - 8:14 pm | आनन्दिता
र. वा. दिघे यांच 'पड रे पाण्या 'नावाच एक अतिसुंदर पुस्तक आहे….
त्यातली जात्यावरची गाणी इतकी सुंदर आहेत की अक्षरश: काळजाचा ठाव घेतात. एक ना एक अक्षर सोन्यासारखं आहे. मिळालं तर नक्की वाचा.
त्यातली एक ओवी देतेय.
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी.
बघ नांगरलं नांगरलं, कुळवून वज केली,
सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली ….
तापली धरणी, पोळले चरणी मी अनुवाणी,
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
निढळावर हात ठेवून वाट मी किती पाहू?.?
खिंडीतोंडी हटवादया नको उभा राहू!!
वरड वरड वरडीती, रानी मोरमोरिनीं
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
पाण्या पड तू, मिरागाआधी रोहिणीचा,
पाळणा रे लागे भावाआधि बहीनिचा!!
आला वळीव खिंडीतोंडी शिवार झोडीत
जाईच्या ग झाडाखाली धनी पाभर सोडित.
पड रे पाण्या, पड रे पाण्या, भिजवि जमिनी
जेवण घेऊन शेतावरी चालली कामिनी!!!
27 Aug 2013 - 1:41 pm | मोदक
संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरीमधुनी शीळ घालितो वारा
दूर कमान पुलाची एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला कसले गुपीत विचारी
भरुन काजव्याने हा चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी वीज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही उघडुनी लोचन पाही
हळुच चांदणे ओले ठिबके पानावरुनी
कसला क्षण सोनेरी उमले प्राणामधुनी
संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने मौनाचा गाभारा
- मंगेश पाडगावकर
27 Aug 2013 - 8:21 pm | यशोधरा
किती सुरेख!
27 Aug 2013 - 10:14 pm | मैत्र
आयुष्याची आता । झाली उजवण । येतो तो तो क्षण । अमृताचा ॥
जे जे भेटे ते ते । दर्पणीचे बिंब । तुझे प्रतिबिंब । लाडे-गोडे ॥
सुखोत्सवे असा । जीव अनावर । पिंजऱ्याचे दार । उघडावे ॥
संधिप्रकाशात । अजुन जो सोने । तो माझी लोचने । मिटो यावी ॥
असावीस पास । जसा स्वप्नभास। जीवी कासावीस । झाल्याविना ॥
तेंव्हा सखे आण । तुळशीचे पान । तुझ्या घरी वाण । नाही त्याची ॥
तुच ओढलेले । त्यासवे दे पाणी । थोर ना त्याहूनी । तीर्थ दुजे ॥
वाळल्या ओठा दे । निरोपाचे फुल । ऊरी तरी भुल । शेवटली ॥
-
"बा.भ.बोरकर...."
एका एका ओळीसाठी दंडवत आहे. केवळ भाषाप्रभू ..
आणि याचं खरंच सोनं केलं आहे इथे
सलीलने..
27 Aug 2013 - 10:47 pm | आदूबाळ
या ओळीला सलाम!
27 Aug 2013 - 10:58 pm | आदूबाळ
"द इन्हेरिटन्स ऑफ लॉस" नावाची किरण देसाई या लेखिकेने लिहिलेली बुकर पारितोषिकप्राप्त कादंबरी नुकतीच वाचली. अरविंद अडिगा नावाच्या मथ्थडाला बुकर मिळाल्यानंतर या पारितोषिकावरचा विश्वास उडाला होता. काही अंशी तरी तो परत आणण्याचं काम या कादंबरीने केलं.
कालिम्पाँग या टुमदार हिमालयन गावात घडणार्या या कादंबरीला स्वतंत्र गोरखालँडच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. गोरखालँडसाठी पडद्याआडून सूत्रं हलवणारे चाणक्य आणि प्रत्यक्ष लढणार्या तरूणांचा भाबडेपणा असा छान पट मांडला आहे.
त्या भाबड्या तरूणांविषयी लेखिका लिहिते:
28 Aug 2013 - 1:00 pm | बॅटमॅन
मार्मिक अन विदारक!!
28 Aug 2013 - 9:37 am | यशोधरा
आसमंत दाराशी सुरु होतो.पायाखालच्या सावळ्या मखमलीपासून नक्षत्रांपर्यंत असमंताच्या अविष्कारांकडे चौकस, संवेदनाक्षम नजरेनं पाहिलं तर थक्क करणारी अनोखी अंतरंगं उलगडतात. प्रतिमांच्या पलिकडचं दिसू लागतं. कविता आशयघन होतात. निसर्गाच्या सान्निध्यात ताणतणाव दूर होतात. विश्वात आपण क्षुद्र आहोत हे उमगतं. अहंकार लुप्त होतो. निरागस आनंद मिळतो. निसर्गनिरीक्षणातून सृष्टीच्या निर्मितीचा विचार अस्वस्थ करतो, आणि मनाला थेट परमेश्वरापर्यंत पोचवतो. निसर्गात आश्चर्यांचा साठा अमाप आहे.निसर्गाच्या लोभस प्रतिमा पहायला कुठं दूरदेशी जायला नको. मंतरलेला आसमंत आपल्या दाराशीच आतुरतेनं साद घालतोय. त्याच्या अविष्कारांचा वेध घेण्यासाठी तरल मनाची कवाडं उघडा.
29 Aug 2013 - 12:26 pm | यशोधरा
कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?
- बा भ बोरकर.
30 Aug 2013 - 2:55 pm | अनिता ठाकूर
पुढील उतारा माझ्याकडे टिपून ठेवलेला आहे.त्याचा काहीच संदर्भ मी लिहून ठेवलेला नाही. पण, त्यामध्ये जे लिहीले आहे ते अद्भूत आहे.
' यवत - पुण्याहून दक्षिणेकडे जाणार्या रेल्वेचे प्यासेंजर गाडीचे एक स्टेशन. जवळ सर्वत्र टेकडया. दिवे घाटातून गेल्यावर एका टेकडीवर भुलेश्वरची लेणी व दुसर्या छोट्या टेकडीवर कानिफनाथांची वस्ती व कानिफनाथांचे देउळ. देवळात गेल्यावर वेगळीच संवेदना होते.गरगरल्यासारखे, अंगावर चारही बाजूंनी वजन आल्यासारखे वाटते. फार वेळ थांबवत नाही, थांबताच येत नाही. बरोबर होकायंत्र न्यावे. ते पाहिल्यावर असं दिसतं की काटे गरागर फिरत आहेत. ते स्थिरच होत नाहीत. नाथांचा निदर्शक म्हणून एक फक्त जमिनीचा उंचवटा आहे. त्या उंचवट्यावरच असा अनुभव येतो. बाहेर आल्यावर यंत्राचे काटे पूर्ववत होतात. यंत्र पुन्हा आत नेलं तर काटे गरगरतात.बाहेर आल्यावर आपणहि पूर्ववत होतो.'
ज्याला शक्य होइल त्याने हा अनुभव घ्यावा व मिपावर त्याचा वृत्तांत टाकावा.
30 Aug 2013 - 9:31 pm | मोदक
धन्यवाद. तुमच्याकडे या संदर्भात आणखी माहिती असल्यास जरूर कळावावी.
भुलेश्वरप्रेमी वल्ली यावर अधिक प्रकाश टाकतीलच!!
31 Aug 2013 - 2:54 pm | अनिता ठाकूर
माझ्याकडे ह्याबाबत अधिक काहीहि माहिती नाही. असे खरेच आहे का ह्याबाबत उत्सुकता मात्र आहे.
4 Sep 2013 - 3:27 pm | प्रचेतस
तसं काही नसतं हो.
कानिफनाथला गेलोय आणि तसा काहीही अनुभव आलेला नाही.
बाकी कानिफनाथ आणि भुलेश्वर एकमेकांपासून बर्यापैकी लांब आहेत. भुलेश्वर यवत पासून जवळ तर कानिफनाथ बोपदेव घाट ओलांडल्यावर.
4 Sep 2013 - 3:03 pm | मोदक
माणसाचे आयुष्य म्हणजे कर्म व दैव यांच्या एकत्रित परिणामाचा खेळ . त्यात कशाचा वाटा किती ह्याचे काही ठराविक गणित नाही. आपण क्यारम खेळताना
विशिष्ट ठिकाणी स्ट्रायकर ठेवून सोंगट्यांचा व्यूह फ़ोडतो. अगदी शंभर वेळा समोरच्या दोनही भोकात सोंगट्या अगदी हुकुमीपणे गेल्या तर फ़ोडला जाणारा बोर्ड दरवेळी सारखा असतो काय ? नक्कीच नाही . म्हणजे आपले कर्म म्हणजे त्या दोन सोंगट्या जाणे जिथे काही अभ्यासाने कौशल्य प्राप्त करून परिणाम हवा तसा मिळविता येतो पण दरवेळी निरनिराळ्या आकृती बंधासह समोर येणार सोंगट्यांचा पसारा म्हणजे दैव .त्याचा कोणताही नियम कोणालाही सापडलेला नाही.
--चौकटराजा