डोळे हे जुलमी गडे...

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
21 Jun 2008 - 12:14 pm

नमस्कार मंडळी,
शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर.... तिरळे असतील डोळे तर त्यांना कर्जत कसारा, पन्हाळा-ज्योतीबा किंवा जम्मू-कन्याकुमारी.. अशा प्रकारची लेबल्स सुद्धा लावली गेली. पण हे नक्की की माणसाच्या व्यक्तिमत्वातला एक असामान्य आणि अविभाज्य घटक म्हणजे डोळे. हे झालं माणसांच्या डोळ्यांबद्दल.

प्राण्यांत म्हणजे जनावरांत, एका म्हशीचे डोळे घारे होते ... मला ती त्यांच्यातली ऐश्वर्या रायच वाटली. मनांत म्हंटले हिच्या मागे किती अभिषेक, सलमान आणि विवेक (ओबेरॉय) लागले असतील कोण जाणे?? पण म्हशी या जमाती बद्दल माझं एक सर्वसाधारण मत असं आहे की, डोळ्यांवरून त्या निर्बुद्ध दिसतात. म्हणजे असं की, कुत्रा त्याच्या डोळ्यांवरून चिडका आहे की, प्रेमळ आहे हे कळू शकते. त्यावरून आपण त्याच्या किती जवळ अथवा लांब जायचे हे ठरवू शकतो. बैलाचे डोळे जवळून बघण्याचा संबंध कधी नाही आला. गाय सुद्धा बर्‍याच वेळेला प्रेमळ भेटली. डुक्कर या प्राण्याला डोळे असतात यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. कारण ते डुक्कर कितीही मोठं असलं तरी ते घाणीत लोळत असताना त्याचे डोळे कधी दिसतच नाहीत आणि घाणीत न लोळणारं डुक्कर मी कधी पाहिलं नाही. बकरी, शेळ्या यांचे डोळे काळे, पिवळट असतात. त्यांच्या डोळ्यात विलक्षण कारूण्य दिसतं मला. शेळीचं पिल्लू असलं तर अत्यंत गोजिरवाण्या त्याच्या डोळ्यांत थोडि भिती थोडासा अवखळपणा दिसतो. ... पण म्हैस.. छे!! तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे नक्की गोत्यात(की गोठ्यात??)येणे. मी एकदा कॉलेजला स्कूटीवरून जात असताना, रस्त्याच्या उजव्या बाजूकडून ६-७ म्हशी येताना दिसल्या. मी जरा जपूनच चालवू लागले.. पण उजव्या बाजूने जात होत्या त्या म्हशी त्यामुळे भिती नव्हती. आणि अचानक त्यांच्यापैकी एकीच्या मनांत काय आलं कोण जाणे.. संपूर्ण रस्ता ओलांडून ती एका ट्रकला आडवी आली आणि माझ्या पुढच्या एका सायकलस्वाराला धडकली.. तो पडला.. तशीच सरळ मलाही येऊन धडकणार हे उमजून मी पटकन स्कूटीवरून उतरण्याच्या बेतात असतानाच तिने मलाही खाली पाडलं आणि तशीच ती पुढे जाऊन एका रिक्शाला धडकली. पाठीमागून तिचा मालक पळत आला आणि तिने बाकी कोणाला आडवं करायच्या आत त्याने तिला धरून नेलं. हे असं असतं.. म्हशीचा मूड काय आहे हे तिच्या डोळ्यांत अजिबात दिसत नाही. म्हणून म्हशी डोळ्यांवरून तरी निर्बुद्धच दिसतात.
गोंडस दिसणारा ससा, त्याचे लाल चुटुक डोळे.. त्याच्या डोळ्यांमध्ये भिती आणि कुतुहल दिसतं. आपल्या जवळ आलेली माणसं नक्की आपल्याला का हात लावताहेत याचं कुतुहल आणि आपल्याला मारणार तर नाहीत ना.. ही भिती. कुत्र्याच्या डोळ्यांमधे इतक्या प्रकारचे भाव उमटत असतात की मीही कधी कधी हवालदिल होते. आपलं आवडतं माणूस जवळ आलं की, अतिशय प्रेमळ भाव दिसतात त्याच्या डोळ्यांत. कोणी अनोळखी असेल तर राग असतो.. माझ्या कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये मी राग पाहीला तो डॉक्टर लोकांसाठी. मग तो जनावरांचा डॉक्टर असो वा माणसांचा. घरातील कोणी आजारी असेल आणि डॉक्टर आले की, आमचं कुत्र ते डॉक्टर जाईपर्यंत त्यांच्या कडे रागाने बघत समोर बसून रहायचं. आणि इंजेक्शन देताना चुकुन "आईगं!!" किंवा तत्सम वेदनादायक आवाज झाला तर डॉक्टरचं काही खरं नाही मग. हरणाच्या डोळ्यांबद्दल काय बोलावं. अत्यंत रेखीव, निर्मळ, निरागस आणि नाजूक डोळे ते. एखाद्या सुंदर डोळ्यांच्या मुलीला मृगनयनी म्हणतात ते बहुतेक याच साठी.
आता हा लेख लिहिण्याचा खरा खटाटोप होता .... ते मांजर या प्राण्याच्या डोळ्यांबद्दल. मांजराचे डोळे. ....काय नसतं हो त्या डोळ्यांमध्ये??? सर्वात देखणेपणा लाभलेला प्राणी आहे हा. ३-४ दिवसांचं पिलू सुद्धा डोळे मोठे करून टुकुटुकु पहात असतं तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये किती कुतुहल असतं! मांजर या प्राण्याचा लहानपणापासून खूप जास्ती संबंध आला त्यामुळे असेल कदाचित, पण मांजराच्या डोळ्यांतले भाव मी नीट ओळखू शकते. लडिकपणे कागदच्या बोळ्याशी, रिबिनशी, शू-लेसशी खेळणारं मांजर पाहिलं तर त्याचे डोळे नेहमीच अवखळ, अल्लड, खट्याळ वाटतात मला. चिडलेलं मांजर, त्याच्या डोळ्यांतली बाहुली एकदम बरिक होते आणि डोळे रागीट होतात.. . शांत बसलेलं मांजर डोळ्यांमध्ये गरीब भाव घेऊन बसतं.. .. बागमध्ये हिंडणारं मांजर, इकडे तिकडे वास घेत.. अलगद चालत असतं .. तेव्हाचे त्याचे डोळे म्हणजे सतत काहीतरी शोध घेणार्‍या शास्त्रज्ञासारखे वाटतात. मांजराच्या डोळ्यांचे रंग तरी किती... पिवळ्या रंगाचे .. हिरवट रंगाचे, निळे.. काळे, लाल... दगडी रंगाचे... कितीतरी रंगाच्या डोळ्यांची मांजरं मी आतापर्यंत पाहीली. पण त्या सगळ्या मांजरांमध्ये एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांचे सगळ्यांचे दोन्ही डोळे.... एक सराखे होते... म्हणजे.. एक डोळा दुसर्‍या सारखा होता. पण नुकत्यात पाहिलेली मांजरी आणि तिचं पिलू दोघांचेही डोळे वेगवेगळे होते. म्हणजे आईचा एक डोळा निळा आणि एक डोळा हिरवा ... आणि पिलाचाही एक डोळा हिरवा आणि दुसरा निळा.... पण तरिही दोघं अतिशय देखणी आहेत... विश्वास नाही बसत.. हे फोटोच पहा त्या माय लेकरांचे... खूप खटाटोप करावा लागला त्या दोघांचे त्यांच्या त्या डोळ्यांसकट फोटो मिळवण्यासाठी. पहा.. आहे ना निसर्गाची किमया!!!!

- प्राजु.

माय्-लेकरं दोघं....

पिलू : काय नजर आहे.. !

शांत डोळ्यांची आई..

आईची एक मुद्रा

पिल्लाची भावमुद्रा

आईची नजर...रोखलेली..

पिल्लू..

हे ठिकाणमांडणीसाहित्यिकविचारलेखप्रतिसादआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Jun 2008 - 8:21 pm | प्राजु

मी कोणी निष्णात फोटोग्राफर नाही. मला जमतील तसे मी फोटो घेतले आहेत मी. इथे चढवण्यासाठी तात्यांची खूप मदत झाली आहे. धन्यवाद तात्या...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

21 Jun 2008 - 11:36 pm | भडकमकर मास्तर

मस्त लेख...
कसले फोटो आहेत मांजरांचे... एकदम आवडले...
दोन वेगळ्या लेन्सेस लावलेल्या फॅशन मॉडेलसारखी दिसताहेत माय लेकरं... :O
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

22 Jun 2008 - 10:03 am | विसोबा खेचर

लै भारी डोळे! :)

प्राजू, तू देखील इतकी चांगली फोटूग्राफर आहेस हे माहीत नव्हतं! जियो...!

अवांतर - मला हा प्राणी मुळ्ळीच आवडत नाही. पाळीव असला तरी याचा फक्त स्वत:शीच मतलब असतो. कुत्र्यांप्रमाणे माणसांवर याचं मुळीच प्रेम नसतं!

असो...

तात्या.

भाग्यश्री's picture

22 Jun 2008 - 10:23 am | भाग्यश्री

काय भन्नाट प्रकार आहे हा!! :O निळा आनि हिरवा डोळा!! अफलातून.. कलम केलेली झाडं असतात तसं वाटलं! गम्मतच आहे..
पण पिल्लु खूप क्युट आहे.. आणि ती आई पण छान आहे, पण हिरवा डोळा नुस्ता पाहीला तर वाघाची मावशी हे नाव अगदी खरे करतीय.. भिती वाटली.. :( सॉरी ग.. पण आईचे फोटो जरा डेंजर आलेत,शांत नजर नाही वाटली मला.. कोण काही करत नाहीय ना, असं डोळ्यात तेल घालून पाहतीय असं वाटलं! :) .. पिल्लू फार निरागसतेने बघतय म्हणून गोड वाटले!

पण एकंदरीत, प्रकार भारीय हा!!

http://bhagyashreee.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2008 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण मांजर आम्हाला आवडत नाही. कुत्र्याचं पिलु असते तर लगेच चौकशी केली असती, कुत्रे कोणत्या जातीचे आहेत म्हणुन, आणि केवढ्यापर्यंत देता हेही विचारलं असतं :)

बाकी आपण डोळ्यातले भाव ओळखतात म्हटल्यावर डोळ्यांचे म्हणाल तर घारे डोळे असणारे माणसे फसवणूक करण्यात तरबेज असतात म्हणे ? दगेबाजी करण्यात पटाईत असतात....इत्यादी-इत्यादी. :)
( ऐश्वर्या नाही सोडून गेली भविष्यात अभिषेकला, तर डोळ्याचा काहीही संबंध नसतो असे समजेन)

बाकी एक डोळा निळा आणि एक हिरवा गम्मतच आहे. डोळ्यांवरचे विवेचन आवडले.
'डोळे हे जुल्मी गडे खोकुनी मज पाहु नका' असे उगाच थोडी म्हटल्या जाते !!!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

II राजे II's picture

22 Jun 2008 - 11:37 am | II राजे II (not verified)

मस्त लेख...
कसले फोटो आहेत मांजरांचे... एकदम आवडले...

माझ्या एका मित्राचा एक डोळा घा-या रंगाचा आहे व एक तपकीरी :)

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2008 - 12:24 pm | स्वाती दिनेश

प्राजु,
मस्त फोटो. डोळ्यांची निसर्गाची करामत आहे! असे एक निळा आणि एक हिरवट घारा डोळे पाहून सत्ते पे सत्ता मधला दुसरा अमिताभ(बाबूच ना नाव त्याचे ?)आठवला.
आणि घाणीत न लोळणारं डुक्कर मी कधी पाहिलं नाही.
फिरंगी मंडळींना ह्या प्राण्याबद्दल काय ममत्व असतं आणि चक्क भाग्यदात्याचे प्रतिक मानून त्यांची प्रतिमा(चिनीमाती,पोर्सेलिन,सॉफ्ट टॉय इ.प्रकारे)ठेवतात. चॉकलेटांना वराह आकार दिलेला पाहून कित्येक दिवस चॉकलेट खायची इच्छाच होत नव्हती.एक नक्की! चक्क स्वच्छ डुकरे मात्र मी इथे पाहिली.(मला मात्र ती पाहून आणि त्यांचे लाड करणारे फिरंगी पाहून कसंतरीच होतं)
स्वाती

मदनबाण's picture

22 Jun 2008 - 12:48 pm | मदनबाण

अरे रंगांची तर कमालच आहे..गोंडस फोटो.....
दुसरा फोटो फार आवडला..

मदनबाण.....

सुचेल तसं's picture

22 Jun 2008 - 4:36 pm | सुचेल तसं

मला हे आधी माहितीच नव्हतं की मांजरांना वेगवेगळ्या रंगांचे डोळे असू शकतात.
माहिती आणि फोटो दोन्ही छान आहेत.

http://sucheltas.blogspot.com

प्रियाली's picture

22 Jun 2008 - 5:55 pm | प्रियाली

प्राजु, मांजरांचे फोटो अगदी गोजिरवाणे आले आहेत. मांजरांत असे दोन वेगळ्या रंगाचे डोळे सहज आढळून येतात. त्यामानाने माणसांत ते कमी आढळतात परंतु निळसर - हिरवट झाकेचे डोळे असणार्‍या माणसांच्या दोन डोळ्यांत वेगळ्या छटा असतात. याला हेटरोक्रोमिया असे म्हटले जाते.

टोबी मॅक्ग्वायर (स्पायडर म्यान) आणि ख्रिस्टोफर वॉल्कन या दोघांचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे आहेत.

मार्जारकुलाचे आणि माझे जमत नाही असे नाही पण मला कुत्री जेवढी आवडतात तेवढे प्रेम ह्यांबद्दल नाही.
पण तुझे फोटू मात्र एकदम झकास आले आहेत आणि लिखाणही एकदम चटपटीत झाले आहे! :)

चतुरंग

ऋचा's picture

23 Jun 2008 - 9:51 am | ऋचा

माझ्या कुत्र्याचे डोळे निळे आहेत.
आणि नजरेत इतका प्रेमळ भाव की बस्स!
पण अनोळखी माणसाची खैर नाही इतकी चिड असते त्याच्या नजरेत!!!

माझ्या २ मांजरांचे डोळे पण असेच वेग्ळ्या रंगांचे आहेत.
मांजर आई-हिरवट्-निळा आणि चॉकलेटी
मांजर पिल्लु- चॉकलेटी आणि हिरवा
गायीकडे कधीही पाहीलं तरी शांत वाटतं खुप प्रेम करणारी वाटते ती :)

(मांजर-कुत्रा प्रेमी ऋचा)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ध्रुव's picture

23 Jun 2008 - 10:08 am | ध्रुव

अरे काय हे :) हे म्हणजे सत्ते पे सत्ता मधला दुसरा अमिताभ जेव्हा एकाच डोळ्याला लेन्स लावतो तसलं काहीतरी वाटतय :)
तुमच्या माऊ लई भारी आहेत....

--
ध्रुव

अमोल केळकर's picture

23 Jun 2008 - 10:31 am | अमोल केळकर

फोतो मस्तच आहेत. या प्राण्यांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली की चश्मा, लेन्स , मोतीबिंदु या पासुन ही जनता बरीच दुर आहे.

उदय सप्रे's picture

23 Jun 2008 - 10:56 am | उदय सप्रे

प्राजु,
एकदम झकास लेख आणि फोटो पण ! खूपच छान !
उदय सप्रे

सुमीत भातखंडे's picture

23 Jun 2008 - 1:53 pm | सुमीत भातखंडे

आणि तितकेच छान फोटो.
पहिला फोटो सर्वाधिक आवडला.

वरदा's picture

23 Jun 2008 - 10:48 pm | वरदा

प्राजु
एकदम झकास लेख आणि फोटो पण ! कसलं आश्चर्य आहे ना...लेन्स घातल्यासारखे वाट्टायत डोळे हे नक्की....

शितल's picture

24 Jun 2008 - 5:23 am | शितल

मस्त च
अग किती सुरेख फोटो काढले आहेस, आणि मस्त दिसत आहेत पिल्ला॑चे डोळे.
लेख ही छान झाला आहे.