प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....तुमचे आणि आमचे अगदी सेम असते
हे जरी खरे असले...आपले ते अफ़ेयर आणि दुस-याची ती भानगड असे जरी म्हणत असलो तरी प्रेमात पडणे हे भाग्य सगळ्याना मिळतेच असे नाही.....न मिळणारी द्राक्षे आंबट मानुन काहीजण त्याची बोळवण करतात...
पण एक अनुभवलय तुम्ही....प्रेमात पडले की जग अगदी चांगले दिसायला लागते....सगळे लोक जणु आपल्याबद्दल बोलत आहेत असे वाटु लागते.ती विशेष व्यक्ती दिसली नाही की कसे तरी होते...आणि दिसली की इंग्रजीत बोलायचे तर "थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते. काळ थांबवणे आपल्या हातात असते तर घड्याळ तिथेच थांबवुन ठेवले असते.....
तुझ्या वाटेकडे डोळे लागले असतात. उगाचच फ़ोन व्हायब्रेट झाल्यासारखे वाटते.त्या वळणावरुन एखाद्या महाराणीसारखी चालत तू येशील.आणितुझे ते वेड लावणारे मिल्लीयन डॊलर स्माईल देशील......
तुझ्या त्या मुस्कुरहाटी च्या ओझरत्यासुद्धा दर्शनासाठी एका पायावर उभे राहुन तप:श्चर्या करावी लागली तरी चालेल असे आपण स्वत:शीच गुणगुणत असतो....मदनमोहनची गाणी पुन्हापुन्हा आठवत रहातात...प्रेम याबद्दल विचार करणंही खूप मस्त वाटु लागते..........आणि आपण चक्क कविता करु लागतो...
तुम दिखाई देती होती हो
तो युंही अच्छा लगता है
हर पेड और दरख्त; भी खुषमिज़ाज़ लगते है......
बस वही एक पल
हर चलता राहगीर
मासूम बच्चा लगता हैं.....
मै भी वही होता हुं
फ़िज़ा भी वही होती है
ये बदलाव कैसे होते है....
ये सोचना भी अच्छा लगता है
इस सोच मे हम कुछ उलझ जाते है....
और....तुम दिखाई देती हो......
कबीर म्हणतो "ढाई अक्षर प्रेमके" .खरंच काय जादू भरली असेल या अडीच अक्षरांत....
माझी तुझी कधीतरी भेट होईल... मनातली भावना तुला बोलुन दाखवु....मग तु ही माझ्यासारखीच मोहरुन येईशील......मनातल्या श्रावणसरींत चिंब भिजशील......खरंच होईल का असे....मला जे वाटते तेच तुलाही वाटत असेल? का मग हे आपल्या मनाचे सगळे खेळ....खरेच असेच असेल का....पण मग मी तुला आवडत नसेन तर? मी आवडत नसेन तरीही तु बोलशील माझ्याशी?
एक ना अनेक मन प्रश्नानी भरुन जाते.....उगाचच मुकेश ची गाणी आपलीशी होतात....
एखाद्या क्षणी तू दिसतेस ....मनात हिम्मत करुन आपण तुझ्या दिशेने पुढे होतो......मनातल्या मनात तुझ्याशी कसे बोलायचे याची हज्जारदा उजळणी होते...घसा उगाचच कोरडा होतो..छातीतली धकधक चौकातल्या सगळ्याना ऐकु येइल इतकी मोठ्याने होत असते. प्रेमात पडण्याच्या क्षणाची ती नांदी असते.पडदा वर जाणार असतो....आणि आपण सारे संवाद पुन्हा पुन्हा म्हणतो....या प्रवेशात प्रॊम्प्टर नसतो......असतो तो तुझ्या माझ्यातला एक अदृष्य अवकाश......तो कसा भरुन काढायचा हे कोणीच सांगितलेले नसते.....आपण पुन्हा प्रत्येक शक्यता पडताळुन पहात रहातो.... आलेला क्षण पकडणे हेच काय ते जमवायचे असते...
अब की बार आपसे मिलुंगा ....
कुछ सुनुंगा कुछ कहुंगा....
पता नही आप क्या कहोगी...
शायद यही सोचकर
हमने ये मुलाकात
खामोशी में गुज़ार दी है.........
स्वत:वर चरफ़डत मी तसाच घरी येतो...अंगातला टी शर्ट हवेत भिरकावत बेडवर पसरतो....झोपायचा प्रयत्न करतो...कितीतरी वेळ तुझाच विचार मनात असतो....
खरेच मी वेडा आहे...मी असा का वागतो.?.... मी खरेच तुला काय देउ शकतो? काय आहे असे माझ्याकडे ज्यावर तू भरोसा ठेउ शकशील ? माझे हे असे अधांतरी जगणे....ना अजुन नोकरीचा पत्ता ना कशाचा ? काय म्हणुन मी तुला काही बोलावे.....काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर...........उलट सुलट विचारानी मी कावराबावरा होतो....
हवा का झौका और...
सनसानाती तुम्हारी याद.....
मै कांप उठता हुं...
किसी बुढे बरगद सा.
अपनी ही जडोंको
और एक बार सहमाता हुं
किसी बुढे बरगद सा.....
सकाळी कधीतरी मला जाग येते....मी नक्की काय विचार करत होतो तीच आता संगती लागत नाही
या रब की सुनु या आपकी
ये सोचते हम जागते रहें
हर करवट की साथ नतीज़ा बदलता गया
सुबह होते होते....
क्या बताऊं अब...
क्या रब का क्या आपका
ये ही भूल गया
माझी नजर टेबलावर पडलेल्या माझ्या वही कडे जाते.....अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने टेबल भरलेले असते....त्या पसा-यातच जीवनाची शुश्क आकडेमोड लिहाणारे माझे पेन आणि क्यालक्युलेटर असतात......ते मला वास्तव जगात पुन्हापुन्हा खेचुन आणत असतात. केवळ भावनांवर अवलंबुन जगता येत नसतं....पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... ..... तुझे विचार मला बळ देतात...घराला भक्कम पाया असावा तसा माझ्या स्वप्नाना आधार देतात...
ये पेन और कैल्क्युलेटर
क्या बयां करेंगे मेरे ज़ज़्बात....
इस मंझील की हर बुनियाद;
इटोंकी जगह
तुम्हारी याद से रखी है..
कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ.....आपले भविष्य काय असेल....आपण काय करत असु.....याचाच विचार करत असु... मी तुझा मेहेंदी लावलेला हात हातात घेईन. त्यावरच्यी वेलबुट्टी निरखुन पाहीन.....भूतकाळ माहीत नाही पण आता आपला भविष्यकाळ मात्र एकत्र बांधला गेलाय एकमेकांसोबत..........पण ए...एक सांगशील?
आपके हाथ और ये मेहेंदी..
मै खो जाता हुं इन लकीरों मे...
भटक जाता हुं राह मे....खोजते हुवे....
बतादो इन मे से....
वो कौनसी....
..........मेरे तकदीर की लकीर हैं?
तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो..दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतं
रस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत.
जब तुम साथ होती हो
हर राह युंही अच्छी होती है...
हर मोड मंज़ील लगता है..
पैरों मे काटोंका कोई
.......हिसाब नही लगता हैं...
मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय. इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला...
कुछ अंधेरा कुछ रौशनी.....
बादलो की आडमे..
सूरज युं आधासा ढल गया था.
रेल की खीडकी से वो ओझल होता
तुम्हारा चेहरा याद आया
पलके भीगी; जमीन भीगी...
आज की बारीश मे..
कुछ मेरे आसूं भी शरीक थे
(क्रमश:)
प्रतिक्रिया
18 Jun 2008 - 11:09 am | मयुरयेलपले
व्वा विजुभाऊ ....
काय कल्पना केलिय... अप्रतिम... दुसरा शब्दच नाय...
आपला मयुर
18 Jun 2008 - 11:10 am | अनिल हटेला
ये विजुभाउ !!!
आठवणी ताज्या केल्यास यार !!!
हा लेख तु माझ्या वरच लिहीलायेस अस वाटतये रे...
" दयायचेच आहेत तर ,
जुणे प्रहर दे माझे....
दवानी चिम्ब झालेले ,
फुलाचे शहर दे माझे....."
18 Jun 2008 - 11:38 am | II राजे II (not verified)
जबरा...
अनुभवाचे बोल आहेत वाटतं ;)
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
19 Sep 2008 - 7:54 pm | श्रावणी
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी...
हे एकदम मस्त राव
18 Jun 2008 - 12:32 pm | भाग्यश्री
प्रेमावरचा मस्त लेख !! प्रेमात पडल्यावरचं ते झपाटून जाणं पर्फे़क्ट घेतलंय !!
http://bhagyashreee.blogspot.com/
18 Jun 2008 - 2:30 pm | भडकमकर मास्तर
विजुभाउ,
लेख चांगला झाला आहे ...
हुरहूर वगैरे काय ते बेष्ट....
तुमच्या अशा लेखांचं अधिकाधिक वाचन करायची इच्छा आहे...
येत राहूदे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
18 Jun 2008 - 2:35 pm | पद्मश्री चित्रे
आवडलं..
हिन्दी ओळी मस्तच...
18 Jun 2008 - 2:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ, तुम्ही अशा नाजुक विषयावर इतके हळवेपणाने लिहित जाऊ नका, आम्हाला त्रास होतो. !!! :)
तेरी बाते, तेरी यादे, तेरी कस्मे, ओ पल.....पुन्हा तीच हुरहुर...!!!
झकास लिहिले आहे, और भी आने दो !!!
18 Jun 2008 - 3:49 pm | प्राजु
प्रेमामधल्या मनाच्या स्थितीचं वर्णन अगदी खास...
मनातली खळबळ, भावनेचा गोफ आणि तिच्यासाठी झुरणारं हृदय ... सगळंच सुंदर लिहिलं आहे. मन एकदम हळवं झालं...
पुढचा भाग लवकर येऊद्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Jun 2008 - 3:59 pm | मनस्वी
मस्त लिहिलंय विजुभाऊ.
इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की है
की हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साज़िश की है|
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
18 Jun 2008 - 4:55 pm | शितल
काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर.
ही ही ही....
कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ.....
:)
तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो..दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतं
रस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत.
एकदम सह्ही......
आणी हि॑दी ग़झल /गाणी मस्त पेरली आहेत.
एका स्वप्नातुन बाहेर काढुन प्रेमाच्या दुनियेत नेलेत.
18 Jun 2008 - 5:06 pm | मनिष
विजुभाऊ एकदम 'फॉर्मात'... :)
मस्त जमलाय लेख...
हे विशेष आवडले. ह्या पंक्ती कोणाच्या आहेत? फारच भावल्या.....
18 Jun 2008 - 6:01 pm | विजुभाऊ
ह्या पंक्ती कोणाच्या आहेत?
ह भ प शायर विजुभाऊ सातारवी...
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
18 Jun 2008 - 6:20 pm | मनिष
'विजुभाऊ सातारवी' ना आमचा कुर्सिनात! :)
18 Jun 2008 - 6:21 pm | वरदा
मस्तच एकदम...
थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते.
अगदी अगदी आणि ते दिवस आठवले बरं का! अगदी अस्सच वाटायचं...
मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय. इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला...
कुछ अंधेरा कुछ रौशनी.....
बादलो की आडमे..
सूरज युं आधासा ढल गया था.
रेल की खीडकी से वो ओझल होता
तुम्हारा चेहरा याद आया
पलके भीगी; जमीन भीगी...
आज की बारीश मे..
कुछ मेरे आसूं भी शरीक थे
क्या बात है..हे प्रत्यक्ष अनुभवलं नाही पण कल्पना करु शकते काय होत असेल
मस्त शब्द, सगळीच गाणी/गझल सुंदर....
18 Jun 2008 - 7:54 pm | मुक्तसुनीत
प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. ..
19 Jun 2008 - 12:25 am | विसोबा खेचर
प्रेमाबद्दलचे मुक्तचिंतन आवडले. एखाद्या गाण्यात चांगल्या जागा असतात तशा अनेक चांगल्या जागा लेखामधे आहेत. ..
अगदी!
विजूभाऊ जियो..!
तात्या.
18 Jun 2008 - 11:03 pm | भडकमकर मास्तर
बघा लोकहो,
आणि हेच विजुभाऊ कट्ट्यावर म्हणत होते की मी काही विनोदी सोडून इतर लिहिलं तर मला लोक सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
18 Jun 2008 - 11:09 pm | पिवळा डांबिस
लिहिणार्याने लिहीत जावे, स्वतःच्या आनंदासाठी!
19 Jun 2008 - 5:01 am | सखी
छान लेख/ललित - शेवटचे हिंदी गाणे/गझल फारच आवडले, अजुन येऊ देत.
19 Jun 2008 - 7:11 am | hsodaye
अप्रतिम लेख,
विजुभाउचे वय लहान आहे, प्रेमाचि सुरुवात आहे, शेवट मला विचारा.....
20 Jun 2008 - 10:15 am | विजुभाऊ
मित्रानो तुम्हा सर्वाना धन्यवाद
मी काही विनोदी सोडून इतर काही लिहिलं तर लोक ते सीरियसली घेतील की नाही अशी भीती वाटते...असे मास्तराना म्हणालो होतो
तुम्ही माझी भिती खोटी ठरवलीत ...भरभरुन प्रतिसाद दिलात......
विषेश म्हणजे ( क्रमशः) पाटीवरुन अजुन तरी काही मार पडला नाही...:)
hsodaye चे स्पेश्यल आभार......
::::::लहान वयाचा विजुभाऊ :)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
19 Jun 2008 - 7:09 pm | प्रभाकर पेठकर
'स्वप्नांमधून' वास्तवात आलात हे पाहून विशेष आनंद झाला. लिखाण आपल्या शैलीनुसार छानच झाले आहे. आत्ता घाईत आहे. सवडीने सविस्तर लिहीतोच.
21 Jun 2008 - 2:45 pm | मदनबाण
व्वा गुरुजी व्वा.....
फारच आवडल..पुढचा भाग लवकर येऊदे.....
प्रेमात पडल्या नंतर
सारं कस रम्य असत
काय तुझं आणि काय माझं
यात काही गम्य नसत
(प्रेम पुजारी)
मदनबाण.....