पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
15 Jun 2008 - 2:14 am

पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती
प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : १२५ रु.
लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे

लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला.
हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्‍या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे... हे पुस्तक अत्यंत सरळ मनाने लिहिले आहे, कोणताही अभिनिवेश नाही..त्यांना कोणालाही चुकीचे किंवा बरोबर ठरवायचे नाही,आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत... डॉक्टर तेवढे चांगले आणि पेशंट वाईट असा कोणताही (ओव्हर जनरलायझेशन करणारा) पवित्रा नाही..

सुरुवातीच्या दोन वर्षांच्या काळात डॉक्टरांनी छोट्या गावामध्ये नोकरी केली.. तिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता, अस्वच्छ पाणी ( त्यातून नारूची भीती),गरीबी , ( गावात अजिबात दूध न मिळणे),अन्धश्रद्धा, ( भगत मंडळींचा सर्पदंशावर उपयोग)... ... गावात स्वच्छतागृह नसल्या्ने प्रातर्विधीला डॉक्टरांबरोबर पहाटे पाचच्या बॅचला (!!!) जाऊन शेजारीच बसून कन्सल्टिंग (!!!!) मागणार्‍या पेशंटचे किस्से अफ़लातून ..
रूरल हॊस्पिटलमधून अंथरूण- पांघरूणासकट पळून गेलेले विषबाधेचे पेशंट किंवा नसबंदीच्या गाडीला पाहून पळून जाणारे पेशंट असले अनेक किस्से आहेत..... कोटा पूर्ण करायच्या नादात निष्काळजीपणे नसबंदी केलेल्या केसेस फ़ेल गेल्यानंतर नवर्‍याने संशय घेतल्याने सार्‍या कुटुंबाची वाताहत होण्याची गोष्ट ऐकून फ़ार वाईटही वाटले..

पुढे स्वतंत्र व्यवसाय चालू केल्यानंतर त्यांना शहरी नमुने भेटले...यात मद्रासी, गुजराती,कच्छी, यूपीवाले भैये यांची निरनिराळी स्वभाववैशिष्ट्ये दर्शवणार्‍यागोष्टी आहेत. इंग्रजी शब्द पेरून अर्थाचा अनर्थ करणारे पेशंट, स्थळाच्या चौकशीच्या नसत्या कटकटीत अडकवणारे पेशंट, नंबर चुकवून मध्ये घुसणारे, खोटे कौतुक करून उधारी मागणारे, व्हिजिटला पळवणारे आणि फ़ी बुडवणारे पशंट, न्हाव्याने डॉक्टरांनी माझी दाढी केली असे अभिमानाने सांगणे असे अनेक किस्से आहेत..

त्यातल्या काही गोष्टी अगदी मनाला भिडणार्‍या आहेत. स्वत:च्या नवर्‍याच्या शून्य स्पर्म काउंटची गोष्ट वृद्ध सासू सासर्‍यांना कळून त्यांच्यावर मानसिक आघात होऊ नये म्हणून नवर्‍याला विश्वासात घेऊन प्रेग्नन्सी फ़ेक करून माहेरी जाऊन मूल ऍडॉप्ट करून आणणार्या जिद्दी स्त्रीची एक गोष्ट आहे...

त्यांचा दवाखाना रस्ता रुंदीकरणात जात असताना समोरच जागा घेण्यासाठी डिपॊझिटसाठी आर्थिक मदत देणार्‍या व्यापारी शेजार्‍यांची कथा आहे. (अजून माणुसकी आहे हे खरं..)

एकूणच बदललेला जमाना, बदलता डॉक्टरी व्यवसाय , अस्ताला गेलेली फ़ॆमिली डॉक्टर ही संकल्पना, फ़ास्टमफास्ट रिझ्ल्ट्सचा पेशंट्सचा आग्रह, त्यातून अधिकाधिक हायर ऎन्टिबायोटिक्स्चा वाढता वापर, त्यातून उद्भवलेला रेझिस्टन्सचा प्रॊब्लेम, CPA आणि डोक्टर आणि पेशंट यांचा एकमेकांवरचा वाढता संशय मग त्यामुळे अधिकाधिक टेस्ट्स करून घेणे यावर डोक्टरांचे चांगले भाष्य आहे..

शेवटच्या प्रकरणात त्यांना पुण्यात झालेला गाजरगवताच्या सीव्हिअर ऍलर्जीचा त्रास आणि त्यामुळे चांगली चालणारी प्रॅक्टीस सोडून डोंबिवलीला स्थलांतर करावे लागले परंतु ही घटना नंतर कशी इष्टापत्ती ठरली याचे वर्णन आहे... एकूणच पुस्तक वाचनीय आहे.. विविध किस्से असे पुस्तकाचे स्वरूप असल्याने कुठूनही पान उघडून वाचता येते... (सतत प्रश्न विचारणार्‍या पेशंटला डॉक्टरांनी दिलेली कंटाळून दिलेली उत्तरे आणि त्यातून निर्माण झालेला एक विनोद या पुस्तकात लिहिलेला आहे, तो अगदी एक नंबर आहे... मी तो वाचून बराच काळ हसत होतो..)...पुस्तकातील रेखाटने, छपाईचा दर्जा छान आहे...पुस्तक जरूर वाचा...

( एक सांगायचे राहिले, या पुस्तकाचे लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे हे आपले मिपाकर डॉ. प्रसाद दाढे यांचे वडील आहेत.)...

वाङ्मयसाहित्यिकसमाजविचारअभिनंदनअनुभवआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Jun 2008 - 2:57 am | विसोबा खेचर

वा मास्तर!

अरिशय उत्तम अन् नेमकं परिक्षण. माझं हे पुसतक बरचसं वाचून झालं आहे.

छोटेखानी, परंतु छानच पुस्तक आहे. साधी सोपी भाषा आहे त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. काही किस्से तर खरंच धमाल आहेत! :)

परवा पुण्याच्या भेटीत मिपाकर डॉ दाढ्यांनी स्वत:च्या वडिलांनी लिहिलेलं हे पुस्तक मोठ्या प्रेमाने मला भेट म्हणून दिलं त्याबद्दल मी डॉक्टर पितापुत्रांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो....

मध्यंतरी प्राजू ठाण्याला आली होती तेव्हा तिनेदेखील तिच्या आईने लिहिलेलं एक पुस्तक तिच्या आईच्या सहीनिशी मला भेट म्हणून दिलं आहे. या निमित्ताने मी प्राजू आणि तिच्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तिची आई एक उत्तम लेखिका आहे आणि नुकतीच त्यांची 'आवली' ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. मध्यंतरी नंदन इथे आला होता तेव्हा त्यानेही मला प्रकाश आमट्यांवरचं एक छान पुस्तक प्रेमाने भेट म्हणून दिलं होतं! असो..

अवांतर - हे या विषयाशी निगडित नाही परंतु प्राजूनेही मला एक छानशी फोटोफ्रेम भेट म्हणून दिली आहे याचा उल्लेखही मला या निमित्ताने येथे करावासा वाटतो!

असो,

मास्तर, तुम्ही पुस्तक परिक्षणदेखील इतक्या उत्तम तर्‍हेने करता हे माहीत नव्हतं! :)

पण खरंच, हे छोटेखानी पुस्तक अगदी अवश्य वाचण्याजोगे आहे..

तात्या.

मुक्तसुनीत's picture

15 Jun 2008 - 9:22 am | मुक्तसुनीत

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन !
पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अवांतर : पुस्तकपरिचय वाचून "इंग्लिश, ऑगस्ट" या कादंबरीची आठवण झाली. कादंबरीमधे डॉक्टरकीऐवजी सरकारी (आय ए एस ) अधिकारी हा फरक आहे.

स्वाती दिनेश's picture

15 Jun 2008 - 10:00 pm | स्वाती दिनेश

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन !
पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
असेच म्हणते,
स्वाती

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jun 2008 - 9:27 am | प्रकाश घाटपांडे

पुस्तक परिचय एकदम सुंदर. डॉ दाढे यांचे पुस्तक भारीच असणार. गाजर गवताला आमच्या कडे वजबुडी म्हणतात. त्यावर उपपत्ती म्हणुन आमचे गावातले डॉ जोशी म्हणायचे ही वंशबुडी आहे इतर वनस्पतींचा वंश बुडवते. काँग्रेस गवत ही त्याला म्हणतात. ऍलर्जी मुळे अंगावर काळे चट्टे उठतात.
गावातल्या डाक्तर कड फटफटी असते. त्याचच आकर्षण आम्हाला जास्त असायचं. यकदा साठे दाक्तर नी मला फटफटी वरुन फिरावल व्हत.
प्रकाश घाटपांडे

सखाराम_गटणे™'s picture

15 Jun 2008 - 10:01 am | सखाराम_गटणे™

मिपा सदस्य हे पुस्तक कसे विकत घेउ शकतात?

मनिष's picture

15 Jun 2008 - 10:47 am | मनिष

पुस्तक आधी वाचले होते, ते डॉ. प्रसाद दाढे यांच्या वडिलांचे आहे हे आता कळले..पुस्तक खरच छान आहे.

अभिज्ञ's picture

15 Jun 2008 - 11:11 am | अभिज्ञ

भडकमकरांनी एका चांगल्या पुस्तकाबद्दल अतिशय सुरेख ओळख करून दिली आहे.
विकत घेउन वाचावे असेच पुस्तक दिसते.
मुळ पुस्तकातील एखाद्या पानाची प्रतिमा इथे दिली असतीत तर
वाचकांना त्याचा अधिक आनंद घेता आला असता.

अभिज्ञ.

भडकमकर मास्तर's picture

15 Jun 2008 - 4:57 pm | भडकमकर मास्तर

पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि शेवटचे पान...

पुस्तकातल्या काही रेखाटनांची झलक...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

15 Jun 2008 - 5:45 pm | शितल

पुस्तका॑ची ओळख छान करून दिली आहे.
आणि रेखाटने ही मस्त आहेत.

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jun 2008 - 8:15 pm | डॉ.प्रसाद दाढे

अतिशय छान परिक्षण लिहिल्याबद्दल भडकमकर मास्तरा॑चे आभार! (एक योगायोग म्हणजे भडकमकरा॑चे आजोबा माझ्या वडिला॑ना मॅट्रिकला शिक्षक होते!) तात्या॑सारख्या चोख॑दळ रसिकास पुस्तक आवडल्याचे पाहून माझ्या वडिला॑नाही खूप आन॑द झाला.
सदर पुस्तक माझ्या माहितीनुसार सर्व प्रमुख विक्रेत्या॑कडे उपलब्ध आहे. त्यातून जर कुणास न मिळाल्यास मला व्यं. नि पाठवावा..

चतुरंग's picture

15 Jun 2008 - 10:25 pm | चतुरंग

मास्तुरे, चटकदार परीक्षण!
पुढच्या भारतभेटीत घ्यावेच लागेल.

(अवांतर - एक योगायोग म्हणजे भडकमकरा॑चे आजोबा माझ्या वडिला॑ना मॅट्रिकला शिक्षक होते!
ह्या वरुन माझ्या आजोबांनी सांगितलेला एक असाच योगायोग आठवतो. त्यांना फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला रँग्लर परांजपे होते आणि परांजप्यांना कोकणात शाळेत शिकवायला माझ्या आजोबांचे वडील (माझे पणजोबा) होते!)

चतुरंग

धनंजय's picture

16 Jun 2008 - 9:04 am | धनंजय

पुस्तक वाचायची उत्सूकता वाटत आहे.

सुमीत भातखंडे's picture

16 Jun 2008 - 11:45 am | सुमीत भातखंडे

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन !
पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेच म्हणतो.

वरदा's picture

18 Jun 2008 - 8:22 pm | वरदा

डॉ. दाढे आणि भडकमकर , दोघांचेही अभिनंदन !
पुस्तक परिचय पुस्तकाइतकाच खुमासदार झाला आहे. हे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेच म्हणते...भारतभेट आहेच जवळ नक्की घेईन...