पुन्हा सालं 'वैचारिक'

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
13 Mar 2012 - 2:01 pm

हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं.
वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो. विचार माणसांना 'कंझ्युम' करतोय, वापरुन घेतोय.. आपण आत्ता मेलो तरी त्याला काही घेणं नाहीय. कारणं थोड्‍या फार फरकानं तसलेच विचार फिड असलेले लाखो मानवी जंतू जगभर पसरले आहेत. आणि तेही त्या विचारामागं धावत आहेत.
माकडाची उत्क्रांती होऊन माणूस झाला म्हणतात. पण माणूस होऊन त्या तिथेच ती उत्क्रांती थांबलीय की काय? ती सुरुच आहे. आणि हे आजूबाजूला पसरलेलं सगळं तिचं हीणकस म्हणा, विकृत म्हणा, आनंददायक म्हणा जसा तुमचा मूड असेल तसा शब्द त्याला द्या - त्या उत्क्रांतीचं आजचं रुप आहे. एकतर कोट्यवधी इतरांप्रमाणं एक 'सब्जेक्ट' म्हणून स्वत:ला आपल्या विचारांकडून 'कंज्यूम' करुन घ्‍या. म्हणजे असुरक्षित वाटणार नाही - कारण इतर कोट्यवधी लोक तेच करीत आहेत. त्यांच्याकडे ते करीत असलेल्या गोष्‍टी कशा योग्य आहेत याचे दाखले आहेत.. हे दाखले युगानुयुगांपासून साचून राहिलेत.
उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यावर असलेल्या विचाराला सुस्पष्‍टता, एकरुपता हवीय. ती कधीच मिळत नाही.
कारण आपलं जे आताचं रुप आहे तेच पुरेसं सुस्पष्‍ट, एकरुप आहे. हे आताचं मानवी रुप टेक् ऑफचा पॉइंट आहे. कशात टेकऑफ करायचा ते नेहमीच अज्ञात राहिलं आहे आणि राहिल. कारण आपण हा प्रश्न विचारतो म्हणजे पुन्हा विचारालाच सुस्पष्‍टता देतो, 'ज्ञात' जे काही असेल ते विचाराचा भाग होऊ शकत असेल.. 'अज्ञात' नेहमीच विचारांच्या पार आणि आपल्याला अनोळखीच राहिल.
एरव्ही माणसात विचार येण्‍याचं काय प्रयोजन आहे? अवतीभवती अफाट पसरलेल्या एकन् एक वस्तूची, गोष्‍टीची, अगदी आपल्याला हव्या असलेल्या कशाचीही प्रतिमा‍ विचार झटकन खेचून आपल्यासमोर धरतात, पण जगातलं सगळंच असतं 'नो डायमेन्शन' मध्‍ये, तरीही प्रत्येक गोष्‍टीच्या असंख्‍य मिती जाणवतात, असंख्य पैलु जाणवतात कारण विचार ज्या बाजूनं, ज्या कोनातून, जी विशिष्‍ट वस्तू विशिष्‍ट बाब समजून घेण्‍यासाठी जगातल्या कुठल्याही बाबीला गवसणी घालत जातो तसतसा कॅलिडोस्कोप उघडत मिटत जातो.. मग नेमकं आपण काय करतोय काय?? विचाराच्या माध्‍यमातून आपल्या हाती पडलेल्या प्रतिमेच्या प्रेमात पडतोय, ती दुसर्‍यांना दाखवतोय.. त्यांच्या हातात दुसरीच प्रतिमा आहे. ती कदाचित त्यांना आवडेल, आवडणार नाही, कदाचित आपल्याच विचारांतून आपल्याच हातात पडलेली प्रतिमा आपल्यालाच आवडणार नाही आणि दुसर्‍यांच्या बाबतीत याउलटही होईल म्हणजे सगळा गोंधळ आहे. सगळी आंधळी कोशिंबिर सुरु आहे.
दिलाशाची बाब म्हणजे हवं तेव्हा हा सगळा वर मांडलेला कचरा अगदी दगडासारखा स्थिर होतो, होत्याचा नव्हता होऊन जातो आणि बहुतेकवेळा हा सगळा कचरा उडत नाही ते बरं आहे.. कधीतरी उडतो आणि खाली बसतो.

मांडणीव्युत्पत्तीप्रकटनविचारआस्वादअनुभवप्रश्नोत्तरेवाद

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Mar 2012 - 2:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

न था कुछ तो खुदाँ था, कुछ ना होता तो खुदाँ होता |
डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता ||

कवितानागेश's picture

13 Mar 2012 - 2:36 pm | कवितानागेश

'विचार ही जड वस्तू आहे' या उक्तीचा प्रत्यय आला. :)

यशवंता.. काय काय खाल्लंयस सकाळपासून.. नीट आठवून सांग बघू..

नाय हो.. नाय.. भांग नाय..
आज सकाळीच आलोय गावाकडून आणि आता ऑफिसमध्‍ये आहे..

ढुष्क्लेमर टाकावं म्हटलं होतं.. पण पुन्हा म्हटलं आपणच कशाला आठवण करुन द्यायची ;-)

सुहास झेले's picture

13 Mar 2012 - 4:14 pm | सुहास झेले

काय रे यशवंता, काय झालं एकदम? :) :)

स्पा's picture

13 Mar 2012 - 4:15 pm | स्पा

काअहीई कळलं नाही

मोहनराव's picture

13 Mar 2012 - 4:31 pm | मोहनराव

तुमचा हा विचार खुप विचार करायला लावणारा आहे, पण नको ते सालं पुन्हा वैचारिक!! ;)

मूकवाचक's picture

13 Mar 2012 - 4:43 pm | मूकवाचक

नेहेमीप्रमाणेच भन्नाट, चाकोरीबाहेरचे (ऑफबीट) आणि शैलीदार लिखाण. वैचारिक गोपाळकाला मस्त जमला आहे.
पुलेशु.

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 7:16 pm | चौकटराजा

यशवंत बुवानी फार फार तप केले. मग त्याना देव प्रसन्न झाला. देव म्हणाला " माग काय मागायचे ते !" यशवंतबुवा म्हणाले " नियंत्या, ईशा मला दुसर्‍याला चक्कर आणण्याचे सामर्थ्य दे ! " देव म्हणाला "मी मागे एकाला विचार करायला चौथी मिति दिली आहे, आता माझ्याकडे पाचवी मिति शिल्लक आहे. देउ का ? बुवा म्हणाले" त्याने काय होणार ? " देव उत्तरला " अरे आताशी त्याना ३ मिति माहितायत तू डायरेक्ट पाचवीत
शिरलास की ते सगळे फेल .....चक्क्कर ... चक्क्क्क.......................र "

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 7:17 pm | चौकटराजा

यशवंत बुवानी फार फार तप केले. मग त्याना देव प्रसन्न झाला. देव म्हणाला " माग काय मागायचे ते !" यशवंतबुवा म्हणाले " नियंत्या, ईशा मला दुसर्‍याला चक्कर आणण्याचे सामर्थ्य दे ! " देव म्हणाला "मी मागे एकाला विचार करायला चौथी मिति दिली आहे, आता माझ्याकडे पाचवी मिति शिल्लक आहे. देउ का ? बुवा म्हणाले" त्याने काय होणार ? " देव उत्तरला " अरे आताशी त्याना ३ मिति माहितायत तू डायरेक्ट पाचवीत
शिरलास की ते सगळे फेल .....चक्क्कर ... चक्क्क्क.......................र "

पैसा's picture

13 Mar 2012 - 8:14 pm | पैसा

अजिब्बात विचार करू नकोस! ऊठ आणि एक कार्टून फिल्म बघून ये.

राजेश घासकडवी's picture

13 Mar 2012 - 8:31 pm | राजेश घासकडवी

उत्क्रांती हा सोन्यासारखा शब्द कचकड्यासारखा वापरलेला पाहून वाईट वाटलं. बाकीच्या शब्दांविषयी मला या शब्दाइतकी आस्था नाही म्हणून त्यांचा निरर्थक वापर तितका बोचला नाही.

मन१'s picture

13 Mar 2012 - 11:09 pm | मन१

"बाळ , अध्यात्मातही आधी चमच्या चमच्यानं प्यावं म्हणजे मग अजीर्ण होत नाही"
असं काहिसं"आमचे देवासचे काकाजी "तुझे आहे तुजपाशी" मध्ये म्हणत होते ब्वा.
बादवे, हल्ली कुठल्या मंदिरातील तीर्थप्राशन करता ते कळले तर बरे होइल.

सांजसंध्या's picture

14 Mar 2012 - 11:36 am | सांजसंध्या

बापरे !
पुन्हा वाचायला लागेल लेख. छान लिहीता तुम्ही

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2012 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार

ह्याचा सुगम मराठी अनुवाद कुठे मिळेल ? ;)

जाई.'s picture

14 Mar 2012 - 1:19 pm | जाई.

=)) =))

मायला एवढं सोपं, साध्‍या रोजच्या शब्दांत लिहिलंय
कुठलेही जडजंबाल शब्द, बोजड संकल्पना नाहीत तरीही अवघड, चक्कर येणारं वगैरे झालंय म्हणजे कमाल आहे.
ठिक. आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो.

>>>आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो.

अरे येशा, कसं व्हायचं रे तुझं?
औट ऑफ द बॉक्स वि चार करणं सोड्णार म्हणतोस?
मग आमच्यात आणि तुझ्यात फरक तो काय राहिल रे चोच्या?
बाकी, काही लोकांची काहीही प्रतिक्रिया आली म्हणजे लेख छान छान आहे असंच मानायचं असतं बरं...
कौतुकाची परा- आपलं - परिसीमा आहे ती. ;)

तुला जे भावेल ते लिही बरं तू. २००० नाहीतरी २-५ वर्षांनी तरी वाचून लोक लेखाला 'चान चान' नी लेखकाला 'द्रष्टा' म्हणतातच रे!

>>>>>>अरे येशा, कसं व्हायचं रे तुझं?
औट ऑफ द बॉक्स वि चार करणं सोड्णार म्हणतोस?
मग आमच्यात आणि तुझ्यात फरक तो काय राहिल रे चोच्या?
बाकी, काही लोकांची काहीही प्रतिक्रिया आली म्हणजे लेख छान छान आहे असंच मानायचं असतं बरं...
कौतुकाची परा- आपलं - परिसीमा आहे ती.
तुला जे भावेल ते लिही बरं तू. २००० नाहीतरी २-५ वर्षांनी तरी वाचून लोक लेखाला 'चान चान' नी लेखकाला 'द्रष्टा' म्हणतातच रे!

-------- बास का राव? औट ऑफ द बॉक्स वगैरे विचार असतील नसतील माहित नाही आणि माझ्यात तुमच्यातला फरकही माहित नाही. पण छान छान प्रतिक्रिया चुकूनही येऊ नयेत असं नक्कीच वाटतं. कौतुक वगैरे कुणाला मनापासून वाटत असेल त्यासाठी मी कृतज्ञ आहे.
मुळात हे असलं लिहिण्‍याचा धंदाच यासाठी करतो की असले विचार कितपत बरोबर आहेत आणि ते कुणीकडे घेऊन जाणारे आहेत हे सांगणारे लोक इथे असतील.. पण कधीही बघा, समोरासमोर येऊन लोक चर्चा करीत नाहीत.. कुत्सित शेरेबाजीला तोटा नाही..
छान छान, वा वा वगैरे तर चालूच असते आणि मला त्याचा सोस नाहीय हे बरंय.
जेव्हा वेळ येईल तेव्हा मला खरोखरचा, प्रॅक्टीकल, क्षणात परिणाम दाखवणारे उपाय देणारा 'द्रष्‍टा' व्हायला नक्कीच आवडेल.
सध्‍या फक्त ‍तापदायक स्वर काढीत रियाझ सुरु आहे आणि त्यामुळं दोस्तलोक प‍रेशान आहेत.
:)
थँक्स तुझ्‍या दिलखुलास प्रतिसादामुळं हे लिहिण्‍याची संधी मिळाली म्हणून.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2012 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

मायला एवढं सोपं, साध्‍या रोजच्या शब्दांत लिहिलंय
कुठलेही जडजंबाल शब्द, बोजड संकल्पना नाहीत तरीही अवघड, चक्कर येणारं वगैरे झालंय म्हणजे कमाल आहे.
ठिक. आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो.

असेल असेल..

पण यक्कुशेठ कडून आम्हाला असल्या लिखाणाची अपेक्षा नाही. तुम्ही उगा हुच्चभ्रुंच्या नादाला लागलात का काय अशी शंका मनात डोकावली. ;)

>>>>>पण यक्कुशेठ कडून आम्हाला असल्या लिखाणाची अपेक्षा नाही.

--- पाठवून द्या तो तुमच्या मंदाकिनी का कोण तिचा अर्धवट ड्राफ्ट.
पुरा करुन टाकतो.
लै लै मज्जा येईल आणि ताटकळत राहिलेल्या पब्लिकचा दुवा पण मिळेल. ;-)
हाकानाका

विजुभाऊ's picture

14 Mar 2012 - 2:47 pm | विजुभाऊ

अज्ञाताचे ज्ञान व्हावे ही यज्ञयुगापासून मानवाला वटायचे. पण अज्ञात ज्ञात होऊ शकते याचे ज्ञान व्हायला एकोणविसावे शतक उजाडावे लागले. ज्ञातापासून अज्ञाता पर्यन्तचा प्रवास हा खरेतर स्वतःला शोधण्याचाच प्रकार आहे

गांभीर्याने चर्चा होत नाही हा यशवंताचा मुद्दा मान्य करुन माझी प्रतिक्रिया लिहायला बसलो आहे.

हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ?

हे प्रश्न एकाच मूळ प्रश्नाशी नेता येतात तो प्रश्न म्हणजे "का?".

"काय?"ची उत्तरं शोधत खूप खूप शोध लावत आपण जगत राहतो. "काय?"च्या उत्तरांनी "उपयोगी" शोध लागतात..

पण "का?" चं उत्तर कशानेच मिळत नाही. त्याविषयी विचार केला तर कोंडल्यासारखा फील येऊन पुन्हापुन्हा मनात प्रश्न आदळतात.. नाही केला तर काही होत नाही..

पण तरीही आपण आहोत हे गृहीत धरलं की "का?" चं उत्तर जाणण्याच्या पलीकडे आपण आलेले असतो..

"काय?" मधे जशी उपयुक्तता आहे तशी "का?" मधे नाही..

चटका का बसतो? या प्रश्नात "का?" आलेला असला तरी तो फसवा आहे.. या प्रश्नाचा अर्थ "चटका बसतो म्हणजे काय?" असा होतो.. चटका "का" बसतो याला अर्थ नाही.. या प्रश्नाचं उत्तरही चटक्यामागची प्रक्रिया काय हे सांगतं. नंतर चटका बसण्याचे "फायदे"ही सांगतं.

पण मुळात चटका बसावा अशी ईशणा कोणाची अन का? हे सांगणं आपल्या मितीत म्हणा किंवा ज्यामुळे आपण जिवंत आहोत असं आपण म्हणतो त्या स्थितीमुळे म्हणा, अशक्य आहे..

अशावेळी विज्ञान किंवा तत्सम माध्यमांतून काही उत्तर मिळणार नाही हे लक्षात घेऊन पुलंचं खालील पत्र वाचावं, असं सांगावंसं वाटतं.. इथे पेस्ट करतोय. अवांतर वाटणारा काही भाग काढून टाकला आहे.. महत्वाचा काही बोल्ड केला आहे.

यातलं एक वाक्य मी प्रासच्या यूजींवर लिहिलेल्या धाग्यावरही डकवलं होतं:

प्रिय चंदू

रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम
प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला
बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर
लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक
दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले
आठ दिवस मी राबतो आहे. आज ९॰३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून
गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला - फक्त थकवा च उरला आहे का?
वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही
लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले.
आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या
सहाय्याने विचार करणार आहे.

तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या
लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण
आहेस? कुठून आला आहेस?

पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा
प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं
उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला
आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या
पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान
प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.
तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर
त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं
तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि
अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.
पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा
अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण
निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.

तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज
सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा
अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं - नाटकं लिहायची - विनोदी साहित्य
लिहायचं-गायचं - गाणी करायची - कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे
विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री
आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं
असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत
असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू - कारकुनांनी तरी मानेचा काटा
मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी
बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं?
चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या
प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता
येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं
काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं
आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे
काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच
ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं.
कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ
आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो.
जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते.
आणि मग जीवनाला अर्थ येतो.

हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी
सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं
मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते
देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते
करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी
म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता
दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही
घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी
वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस.
वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा.
वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो.
क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही
ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.
तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की - गोर्की -
डिकन्स - शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि
माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय?
त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या
कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!

लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत
असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत
हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात
ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत
असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती
स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.
तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही
साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear
boy, whose deaths are justifiable?
माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील
अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या
आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि
हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं
जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.
जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं
सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण
की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत
नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.
तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.
कळावे,
भाई

प्रतिसादाबद्दल थँक्यू गवि.
पुलंचे लिखाण आणि त्यांचा जीवन जगण्याचा दृष्‍टीकोन मलाही आवडतो..
आणि अशा लेखकांमुळंच काकणभर अधिक आनंदात जगतो.
पण आयुष्‍याची एवढीच आखीव मर्यादा नसते (तुम्हाला वाईट वाटणार नाहीय हे मला माहित आहे म्हणून सांगतो, उठसूठ पुलंच्या काकाजीची उद्धरणे देणारे दोस्त झीट आणतात. अरे तो काय एकटाच माणूस होऊन गेला काय तुमच्याकडे कसं जगावं हे सांगणारा? मान्य आहे महान होता, पण तेच तेच किती?) आणि ती जगणार्‍याच्या नेहमीच हातातही नसते.
जिकडं जसं ओढलं जाईल, फरफटवलं जाईल तसं जाणं होतं.

मुळात कसं जगावं हा प्रश्न नाहीच.
का? हा प्रश्न आहे. आणि आहे हे असंच आहे हे उत्तर नाही, परिस्थिती आहे.
का? चा विचार नाही केला तरी काही फरक पडत नाही असा माझा अनुभव नाही.

अरे यात पुलं कसे महान किंवा "जीवन त्यांना कळले हो.." असं काही काही म्हणायचं नाहीये.. तसं नाहीच आहे मुळात.

काहीजणांना जीवन मला कळलं नाही याचा अ‍ॅक्सेप्टन्स येतो आणि त्यांना आनंद मिळतो इतकंच सांगायचं आहे..

का? चा विचार नाही केला तरी काही फरक पडत नाही असा माझा अनुभव नाही.

अर्थाची छटा वेगळी आहे.. जगण्याच्या अन उपयुक्ततेच्या नजरेने "का?" चा विचार न करता जगता येतं म्हणून त्याचा फारसा विचार होत नाही अशा अँगलने म्हणू इच्छितो..

पण आयुष्‍याची एवढीच आखीव मर्यादा नसते

असते...ते मान्य न करण्याने गुदमरा होतो..

>>>>अरे यात पुलं कसे महान किंवा "जीवन त्यांना कळले हो.." असं काही काही म्हणायचं नाहीये.. तसं नाहीच आहे मुळात.
----- नाही मलाही तसं म्हणायचं नाहीय..

पण सारखं सारखं सखाराम गटणे आणि तुझे आहे तुजपाशीमधले किंवा पुलंचे तसलेच ड्वायलॉग बोर होतात ना हो.. ते म्हणालो मी. आणखीही काही लोक असतीलच की.
बाकी पुलं/ पुलंचे लिखाण प्रत्येकाच्याच अंगात किती भिनले आहेतच हे वेगळे सांगणे नलगे..

>>>>अर्थाची छटा वेगळी आहे.. जगण्याच्या अन उपयुक्ततेच्या नजरेने "का?" चा विचार न करता जगता येतं म्हणून त्याचा फारसा विचार होत नाही अशा अँगलने म्हणू इच्छितो..
----- :)

>>>>असते...ते मान्य न करण्याने गुदमरा होतो..
----- नैसर्गिकपणेच मान्य होत नाही आणि गुदमरा होतो. ठरवून सगळं अमान्य करायला इथे कुणाला नसती आकाबाया सुचलीय.

नगरीनिरंजन's picture

14 Mar 2012 - 5:01 pm | नगरीनिरंजन

सहमत हो गवि.
'का?' याला 'चुकून' किंवा 'योगायोगाने' असे उत्तर असू शकते. रानात फूल फुलले म्हणून ढोल-ताशे वाजत नाहीत आणि ते सुकले म्हणून कोणी सूतक पाळत नाही तसेच जन्माला आलास ते का याचे उत्तर द्यायला कोणीही बांधिल नाही. ज्याला हवे त्याने शोधण्यात आयुष्य वेचावे; तसेही चुकून निर्माण झालेल्या या जाणिवेचा पुंजका कोणी कसा उधळायचा ते त्याचे त्याने ठरवायचे आहे.

मरण चाहूल
उतरते भूल
रानातले फूल
असे आयुष्य
कशास फुलले
कशास सुकले
कुणा उमगले
असे आयुष्य

>>> तसेही चुकून निर्माण झालेल्या या जाणिवेचा पुंजका कोणी कसा उधळायचा ते त्याचे त्याने ठरवायचे आहे.
---- वाक्य आवडले. मर्मभेदी असा आयडी घ्‍या तुम्ही ननि.

बाकी त्या चुकून निर्माण जाणीवेचा पुंजका सध्‍या तरी लहान मुलं म्हातार्‍या उडवतात तसे उडवतोय.
:)

पैसा's picture

14 Mar 2012 - 7:28 pm | पैसा

>>लहान मुलं म्हातार्‍या उडवतात तसे उडवतोय.

लहान मुलं या शब्दावर भर दे. म्हातार्‍या पिंजण्यावर नको.

कवितानागेश's picture

14 Mar 2012 - 10:14 pm | कवितानागेश

येस्स.
:)

चौकटराजा's picture

14 Mar 2012 - 4:37 pm | चौकटराजा

वास्तविक मी माझाच अध्यात्मिक गुरू आहे असे सांगत असतो. पण पीयेल ना मी त्या स्थानी मानतो. मी तसे त्याना फोनवरून बोललोही. तर म्हणाले माझा आता बुवा होणार . मी म्हणालो तुमच्या व माझ्या वाढदिवसात एकाच दिवसाचा फरक असला( वयाने अंतर बरेच तरी मी ७/११ ते ८/११ म्हणून गमतीने म्हणत " आशीर्वाद द्या ) तरी मी मांडीला मांडी लावायला कधीच येणार नाही. आदर राखून दुरूनच पाहीन . मी शेवटपरर्यंत त्याना भेटायला गेलो नाही. पण त्यानी दिलेली एक शिकवण इथे देतो.

एखादी घटना ही निसर्ग पातळीवर निरर्थकच असते. माणसाची त्याच्याकडे पहाण्याची संवय वा दृष्टी त्या घटनेचा अर्थ ठरवीत असते.
मतभेद हे आपल्यामुळे निर्माण होत असतात ते आपले अ‍ॅट्रीब्यूट आहे घटनेचे नव्हे. हा मी त्याचा काढलेला अर्थ !

मन१'s picture

14 Mar 2012 - 10:43 pm | मन१

स्वतःला पुरेसा काम्धंदा नसलेल्याने इतरांच्या कामधंद्याचा वेळ खराब करण्यासाठी धागा काढलेला दिसतोय.
गविंच्या प्रतिसादामुळे मात्र धागा वाचनखूणेत नेउन ठेवतो आहे.

स्पंदना's picture

16 Mar 2012 - 5:56 pm | स्पंदना

पण मग गवींना असा प्रतिसाद द्यावा लागला हे ही या धाग्याच यश नव्हे का? नसेल जमल अगदी पुलं सारख शब्द बांधण, पण ते पुल !, अन इथे तोच प्रश्न गुंता घेउन एक सेन्सीटिव्ह मन. मला तर दोन्ही एकाच पातळीचे वाटतात. म्हण्जे यश्वंतचा प्रश्न पुलं मुळ उलगडला म्हणा हवा तर.

यशवंत सुरेख! अन गवींना काही म्हणायची गरज नसावी होय ना?

मन१'s picture

16 Mar 2012 - 6:44 pm | मन१

मान्य.
इतर काहीही मान्य करु पण गुंता घेउन एक सेन्सीटिव्ह मन हा असला अघोरी आरोप आजवर यशवंत्यावर कुणीही केला नसावा.

स्पंदना's picture

17 Mar 2012 - 5:58 am | स्पंदना

पण मी थोडाफार जाणते त्याला त्याच्या लिखाणातुन अन प्रतिसादातुन. भात शिजलाय बघायला अख्ख पातेल कशाला पाट्यावर घायच नाही का? एखाद शित पुरत, मला.

तुझं युजींपासूनचं जवळ जवळ प्रत्येक लेखन वाचलेलं आहे. प्रतिसाद दिलेत / नाही दिलेत तो भाग निराळा. पण अगोदरपासूनच तुझं लेखन आवडत आलेलं आहे. शैलीच सर्व बोलून जाते. :)

एक वेगळंच सुचलं म्हणून -
अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवतांना बरेचदा असं होतं की एखाद्यानं आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीचं बरंचसं बनवून ठेवलं असतं. गूगल आजोबा नेहमीच त्याकामी मदत करतात. ते तसंच्या तसं आपण वापरत नाही. आपल्याला हव्या त्या पद्धतीनं त्यात बदल करतो अन् मग वापरतो. पण बहुतेकजण सुरुवातीपासून सर्व बनवायच्या फंदात पडत नाहीत. हे मात्र खरं की ते सगळं आपण स्वतःच बनवण्यात खूप मझा येतो.. ते समाधान वेगळंच. आणि आपण बनवलेलं अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर जेव्हा खरोखर युजरच्या कामास येतं तेही सुख निराळंच.
आपला कोणताही विचार प्रत्यक्षात उतरवल्यावर जे समाधान मिळतं ते शास्त्रज्ञांना मिळणार्‍या समाधानाहून कुठेच कमी नाही. पण तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे कष्ट लागतात ना त्याचं नावंच ते. त्यासाठी तहानभूक विसरून आपण काम करतो अन् मग ते मिळतं.

बाकी तुलासुद्धा जिथे अडचणी येतात तिथे म्या पामराची काय बिशाद काही बोलायची..!!

शुभम्

तुझ्‍या प्रतिक्रियेबद्दल थँक्स राघव.

>>>आपला कोणताही विचार प्रत्यक्षात उतरवल्यावर जे समाधान मिळतं ते शास्त्रज्ञांना मिळणार्‍या समाधानाहून कुठेच कमी नाही. पण तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे कष्ट लागतात ना त्याचं नावंच ते. त्यासाठी तहानभूक विसरून आपण काम करतो अन् मग ते मिळतं.

--- हे ठिक आहे. मनात आलेला विचार, तो मूर्त रुपात येणं, मग त्यातून मानवी जीवनात उपयुक्त नवनिर्मिती, तिचा आनंद हे सगळं ठिकच.
पण इथं एक होतंय की हे असेच नव्हे तर 'सगळेच विचार आपल्याला वापरुन घेतात', त्यात सगळे नष्‍ट होऊन जातात.
मग हे असंच नष्‍ट होऊन जाणंच खरं जीवन (कारण सगळे यावर सहमत आहेत) आहे की खरं जीवन कुणाकडून जगलंच जात नाही? हा गुंता आहे.

विचार आपल्याला वापरून घेतात असा विचार येण्याचं कारण मुळात काय असावं?
माझ्या मते,
विचारांचं ध्येय ठरलेलं असेल तर असा विचार येत नाही. ध्येय ठरलं नसेल तर ते विचारांचं जहाज दिशाहीन भरकटणारंच.
आता ध्येय कोणतं असायला हवं? हा प्रश्न वैयक्तिक आहे. ज्याला ज्या विचारांनी समाधान मिळतं ते त्याचं ध्येय ठरतं. प्रत्येकच जण कळत-नकळत असाच जगतो.
जेव्हा या ध्येयाची जाणीव होते, तेव्हा ते योग्य की अयोग्य हा प्रश्न येतो. आता हे ठरवणार कोण? त्यासाठी काहीएक अधिकार तर हवाच ना? तो अधिकार ज्याचा, तीच व्यक्ती ते सांगू शकेल. प्रत्येकासाठी ही व्यक्ती कदाचित निराळी. पण त्या व्यक्तीला अधिकार आहे किंवा नाही ते आपल्याला कसं कळणार हा प्रश्न येतो. जोवर त्या व्यक्तीचं म्हणणं आपल्याला समाधान देतं तोवर आपण त्याचं ऐकणार. नाही पटणार तेव्हा? सोडून देणार? कशावरून त्या व्यक्तीचा मूळ हेतू समजला आपल्याला? कशावरून आपण ठरवणार?
प्रश्नांना सीमा नाही. उत्तरांना आहे. तर्क संपतो तिथं उत्तरं सुचत नाहीत. कोण किती तर्क लावणार यावर किती वेळ उत्तरं देणार हे अवलंबून असतं. अन् उत्तर हे स्वतःच नवीन प्रश्नांना जन्म देऊन जातं. थांबायचं कुठं हे आपल्याच हाती आहे. त्यालाच शरणागती म्हणतात. अजुन काही नाही.

राघव

५० फक्त's picture

16 Mar 2012 - 7:26 pm | ५० फक्त

उत्तम धागा,

अशा ब-याचश्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत असा डांगोरा पिटायला मला आवडतं, पण त्यावर चर्चा करायला आवडत नाही. असा डांगोरा केला की समोरची माणसं स्वतामध्ये काहीतरी न्युन्य का नुन्य , का असंच काहीतरी आहे असं समजायला लागतात, आणि बाकीच्या रेघा लहान म्हणुन माझी रेघ मोठी दिसते, निदान जाणवते.
आणि मग पुन्हा जाणुन बुजुन निर्माण केलेल्या या जाणिवेचा पुंजका मी, कसा आणि कुठं उधळायचा या स्वप्नरंजनात म्हणा किंवा प्लँनिंगमध्ये मी पुन्हा दंग होतो.

असो, अजुन पुरी १५ वर्षे आहेत, अजुन असे बरेच पुंजके ब-याच ठिकाणी उधळायचे आहेत, एक आशा आहे की एखाद्यातरी पुंजक्यातुन एक बी बाहेर पडेल आणि रुजेल,कुठंतरी पुन्हा एक पुंजका होण्यासाठी आणि सुरु करेल पुन्हा एक शोध त्या पुंजका उधळणा-याचा.

>>>अशा ब-याचश्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत असा डांगोरा पिटायला मला आवडतं, पण त्यावर चर्चा करायला आवडत नाही.

--- आता तुमच्या आवडीला थोडी मुरड घाला. आणि इथं चर्चा करा, वर सगळे करताहेतच की.

>>> असा डांगोरा केला की समोरची माणसं स्वतामध्ये काहीतरी न्युन्य का नुन्य , का असंच काहीतरी आहे असं समजायला लागतात,

--- लोकांना जिथेतिथे 'मी' घेऊन जायची सवय असते. सर्वकाळ, सर्वक्षणी, सर्वठिकाणी तुलना.

डांगोरा वगैरेची काळजी सोडूनच दिलेली बरी - एरव्ही हमाम में सभी नंगे होते है.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2012 - 2:19 pm | प्रकाश घाटपांडे

जास्त ईचार केला तर डॉस्क बिघडतयं. कधी मानूस ईचार करतो पन निर्नय भावनेवर घेतो.

विजुभाऊ's picture

1 Jun 2022 - 12:50 pm | विजुभाऊ

यक्कू शेठ
दहाबारा वर्षे झाली हा लेख पुन्हा वाचण्याजोगा / चिंतण्याजोगा