पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्ये काहीही फेरफार संभवत नाही. कारण आपल्याला ती परिपूर्णपणे जाणवत नाही. काळाच्या उलटण्याच्या त्या नैसर्गिक गतीशी आपण तसे फारसे जोडले जात नाही. क्षणभर जोडले जातो, लगेच त्यापासून तुटतो. कारण आपल्या आतमध्ये आपल्याला आपल्या स्वत:च्या 'काळ' या संकल्पनेला संचालित करणारी कसलीतरी यंत्रणा आहे. उलटणार्या काळाची नैसर्गिक गती आणि आपली स्वत:ची गती यात ताळमेळ नसतो. कारण काळाच्या नैसर्गिक गतीच्या वेगानं जायचं म्हटलं तर त्यात दरक्षणी अनंत पैलू असलेल्या लाखो प्रतिमा निर्माण होत असतात. आणि आपण आपल्या स्वत:च्या काळाच्या उलटण्याच्या वेगानं जात असल्यानं त्यातल्या काही प्रतिमाच आपल्या नजरेस पडतात. आपली स्वत:ची काळाची व्याख्या असलेली गती काळाच्या नैसर्गिक गतीशी नेहमीच विसंगत असते. त्यामुळे फारसं वेगळं काही दिसत नाही. त्याच त्याच प्रतिमा पाहून जीव कंटाळतो. प्रत्यक्षात आजूबाजूला मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिमांची ये-जा सुरु असते. आणि आपण काही प्रतिमाच पुन्हा पुन्हा उलटून पहात असतो.
काळ, मग तो कोणताही असो तो अनंत आहे. आपण अनंत नाही. आपण उद्या मरु, काळ असाच पुढे जाईल. त्यात कशा का होईना पदरी पडतात तेवढ्या प्रतिमा पहायलाही आपण नसू. पण आपण आता जीवंत असताना, पण ज्या गतीशी आपला ताळमेळ नाही त्या काळाच्या उलटण्याच्या नैसर्गिक गतीमध्ये काळ अनंतपट आहे असे भासते. या नैसर्गिक गतीत काळ अनंतपट भासतो म्हणजेच प्रत्यक्षात काळ ही संकल्पनाच लोप पावते आणि अनंतत्त्व शिल्लक उरतं. अनंतत्वातच काळ विलिन झालेला असतो. आणि अनंतत्व पूर्ण ताकदीने अनुभवात येते. पूर्ण ताकदीने अनुभवास येते म्हणजे काळ लोप पाऊन अनंतत्व शिल्लक राहिल्यानं त्या अनंतत्वात होणारी प्रत्येक हालचाल आपला जीवंत, थेट अनुभव असतो. कोणत्याही स्तरावरील कोणतीही हालचाल कशी होत आहे हे आपण अनुभवू शकतो. उदाहरण पहायचंय? इथे तुमच्या डोळ्यांसमोर शब्द येत आहेत आणि त्यातून कसलीतरी प्रतिमा उलगडत जात आहे. प्रत्यक्षात एक विशिष्ट विचार, एक विशिष्ट रेखाचित्र मन:पटलावर चितारत आहे. विचार असंख्य आहेत आणि ते स्वयंभू हालचाली करीत असल्यानं त्या कित्येक विचारांपैकी एक प्रयत्नपूर्वक वेगळा काढून तो विचार ज्या प्रदेशात संचार करीत आहे तो प्रदेश पहावा लागतो. ही झाली विचारांच्या स्तरावर होणारी विचारांची हालचाल आणि ती कशी होते हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न. म्हणजे ही हालचाल प्रयत्नपूर्वक मांडावी लागली आहे कारण ती तुम्हाला वेगळी दाखवायची आहे.
काळाच्या उलटण्याच्या नैसर्गिक गतीमध्ये होणार्या अनंत हालचाली स्वत: अनुभवण्यासाठी त्या शब्दात मांडण्याची गरज नसते. कारण तो सगळा शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु असतोच आणि तो जेव्हा दुसर्यांसमोर मांडायचा असेल तेव्हाच 'हे तव कैसेनी गमे, परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे' अशी अवस्था असते.
तर मूळ मुद्दा आहे काळाच्या नैसर्गिक आणि काळाच्या आपल्या या दोन गतींचा. मला वाटते तो मी पूर्णपणे नसला तरी काही प्रमाणात मांडला आहे.
प्रतिक्रिया
24 Feb 2012 - 6:35 am | रामपुरी
काळ हा नेहेमीच सापेक्ष असतो ( पहा: सापेक्षतेचा सिद्धांत). पण काळ हा अनंत आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतील. ज्याप्रमाणे तो कुठेतरी सुरू झाला आहे त्याचप्रमाणे त्याचा कुठेतरी अंतही असेल. मग त्याला अनंत म्हणता येणार नाही. आता काळ ही संकल्पना आपल्या आयुष्याच्या भोवतीच फिरत असल्याने प्रत्येक प्राणिमात्र हा त्याला भासणारी काळाची गती हीच सत्य मानून चालत असेल तर त्यात चूक काहीच नाही. शेवटी "आपण मेलो जग बुडाले". :) तेंव्हा मी तरी या सगळ्या विचारात वेळ घालवत नाही. "येईल तो दिन माझा" बस्स...
( लेखातून सांगायचा मुद्दा नक्की हाच आहे काय? नसेल तर "टप्पा खाके गेंद उपरसे चली गयी")
24 Feb 2012 - 8:31 am | अत्रुप्त आत्मा
रामपुरि यांचेशी सहमत... :-)
अवांतर-यक्कू तुंम्ही या असल्या गूढ गोष्टीत शिरू नका हो... आंम्ही इंदौरला येतो,तुंम्ही पुण्याला या,,,धिंगाणा घालुन काळावर ही असली मोहोर उमटवू...हा फुकाचा कालापव्यय नका करु,आपल्या सारख्या सज्जन माणसानी या असल्या गुहेत शिरणं बरं नाही...
24 Feb 2012 - 9:59 am | बंडा मामा
पुन्हा युजी संचारलेले दिसतात. ते भुत मानगुटीवरुन उतरणे तसे कठीणच आहे खरे.
24 Feb 2012 - 11:48 am | विजुभाऊ
चला यक्कू.... परीक्रमेला जावून परीव्राजक होउयात.
बाकी काही नाही पण एखादा आश्रम काढायला नक्की जमेल.
जय गुरुदेव
24 Feb 2012 - 9:56 pm | विलासराव
मी पण.
24 Feb 2012 - 12:39 pm | पिंगू
यक्कु, तुझा लेख वाचून मला वेड लागायची पाळी येईल रे. मी असा विचार कधी करणार नाहीच. उगाच स्मशान वैराग्य येतं...
- पिंगूबाबा
24 Feb 2012 - 3:33 pm | असुर
कालाय तस्मै नम: खरं हो बरिक!!
पहाटे/सकाळी, "२ मिनिट अजून डुलकी काढू एक", असं म्हणून लोळतो तर त्या २ मिनिटात १५ मिनिट होऊन गेलेले असतात, आणि मग मरणाची धावपळ होते.
तेच कालेजात/हापिसात डोळे मिटून पाच मिनिट वाट पाहीली तर फक्त एखादाच मिनिट झालेला असतो. :-)
काळ आपल्या नकळतच स्वत:ची गती घेऊन निघाला आहे यकु, आपण त्यासमोर कोण?
बाकी डोक्याला षॉट लावून घेणेत आलेले आहे.
--असुर
24 Feb 2012 - 4:03 pm | कवितानागेश
एका क्षणात मनःपटलावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या; पण सगळ्या लिहिता येणार नाहीत.
माझी 'काळाची' जाणीव इतकी सूक्ष्म नै ना.... :(
अशा विषयांवर "वैज्ञानिक" म्हणवल्या जाणार्या द्रुष्टीकोनातून जरी लिहिले तरी आकाशातून बोळेवृष्टी होईल! :)
अवांतरः
१. रात्रीचे झोपत नै का हो तुम्ही? :P
२. अय्या!! तुम्ही "सायन्स स्टुडंट" नाही? ;) आइनस्टाईनला माहिती होते, 'काळ' कसा बदलतो ते...
24 Feb 2012 - 4:17 pm | सस्नेह
काळ हा सापेक्ष असतो खरच. काळाची खरी गणती मनातच असते. प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणाऱ्यांना काळाची मुळीच तमा नसते. परवा मी एका आरोग्यविषयक मासिकात असं वाचलं कि काळाचे भान विसरलेल्या लोकांचे आयुर्मान दीर्घ असते. म्हणजे काळवेळ विसरून कार्यात रमलेले किंवा ध्यानधारणा करणारे वगैरे. इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले. तेव्हा काळाचा विचार न करता जगा..म्हणजे चिरतरुण राहाल.....
24 Feb 2012 - 4:31 pm | अत्रुप्त आत्मा
@इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले.>>> द्येवा,,,मले येडा कर ;-)
24 Feb 2012 - 4:23 pm | मी-सौरभ
धाग्यातलं पहील वाक्य वाचल्यावर डायरेट प्रतिक्रिया वाचल्या..
डोक्याला शॉट लावून घ्यायचा नसल्याने धागा वाचला नाही :)
बाकी अत्रुप्त आत्म्याशी सहमत :D
24 Feb 2012 - 4:28 pm | चौकटराजा
आपल्या वावराला कशाचा आधार असतो. हे काय विचारण झालं ? आपल्या वावराखाली माती त्या खाली दगड त्या खाली क्र्स्ट मेंटल का कायते त्या खाली तप्त लाव्हा रस ! लई बहारदार रचना हाय आपल्या वावराची ! कारन व्होल वावर आपलं असतं ते त्याच आपलं असणं हे काल सापेक्श असतं. सात बाराचा उतारा बदलला की वावर दुसर्याचं होत> याला म्हणतात कालाला तिरका छेद जाणे. मग दिशा विरघळतात.
नंतर आपण व काळ एकाच गतीने थांबू वा पळू लागतो. सापेक्षता काळ्या विवरात खेचून घेतली जाते. मग बिंदूला लाबी रूंदी जाडी प्राप्त होते पण काळाचा माहिमा बिंदूच अस्तित्व च नष्ट होते. मग रेषा अंतर्धान पावतात . प्रतलाला ताण निर्माण होऊन ते फाटू लागते. घन आकार अक्राळ विक्राळ होऊन द्विमितीत परिवर्तित होतो.
24 Feb 2012 - 5:02 pm | मूकवाचक
दाद द्यावी असे शैलीदार लिखाण ...
अवान्तरः
जाणीव नेणीव भगवंती नाही , उच्चारणी पाही मोक्ष सदा
नारायण हरी उच्चार नामाचा , तेथे कळिकाळाचा रीघ नाही
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी , ते जीवजंतूसीं केवी कळे
हे आठवले ...
24 Feb 2012 - 5:47 pm | दादा कोंडके
"काळ हा सापेक्ष असतो" असं नुसतं म्हणायला ठिकय, पण ते अगदी आतून कळलं की च्यायला आख्खा दिवस वाईट जातो. :) गुरुत्वाकर्षणामुळे आणि गतीमुळे काळाची गती कशी बदलते ते आईनस्टाईनचं समीकरण समजून घेताना असाच डोक्याला शॉट लागला होता.
पण अशा अवैज्ञानीक दृष्टीकोनातून विचार केला नव्हता.
24 Feb 2012 - 6:39 pm | नंदन
लेख आवडला. वरील प्रतिक्रियांत मांडलेल्या सापेक्षतेच्या मुद्द्याबद्दलही सहमत आहे.
हे जवळजवळ विश्वरुपदर्शनाचा ध्यास घेतल्यासारखंच. थोड्या निराळ्या संदर्भात, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीचा
"हे अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे । गगन मुठीं सुवावे । मशके केवीं " हा श्लोक आठवला. ती मर्यादा स्वीकारणं भाग आहे.
(लेखाच्या संदर्भातच, पण थोडे अवांतर लिहिण्याचं स्वातंत्र्य घेऊन लिहितो)
तसं पाहिलं तर, प्रत्येक माणसाचे आयुष्य ही त्याच्यापुरती का होईना - पण छोट्या, छोट्या अनन्यसाधारण घटनांची एक साखळी असते. जितक्या बारकाईने त्या साखळीकडे पहावे, तितक्याच स्पष्टपणे त्यामागचे 'विश्वाचे आर्त' एखाद्या प्रतिभावंताला उलगडत जातं. 'व्हॉट इज मोस्ट पर्सनल, इज मोस्ट युनिव्हर्सल' असं ह्या प्रक्रियेबद्दल म्हणता येईल.
24 Feb 2012 - 11:25 pm | पिवळा डांबिस
सीताकांतस्मरण जयजयराम!!
बोला येशा आणि नंद्या, हऽऽरी विठ्ठ्ल!!!
काय ही तरूण मुलं! मिसळ खावी, थोडकी मदिरा (झेपत असल्यास) प्यावी, सुंदर पोरी पटवाव्यात, मनसोक्त भटकावं....
हे सगळं सोडून या वयांत ही कसली धुनी पेटवून बसलेत? श्या!!!
-पिडांकाका
किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी |
भजी जो खाई सारखी, अखंडित ||
:)
24 Feb 2012 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा
किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी |
भजी जो खाई सारखी, अखंडित || ---^---
25 Feb 2012 - 12:43 am | नंदन
हा हा हा, धुनी नाय हो. आता मार्दी ग्रा झाल्यानंतर, अॅश वेनस्डेच्या टेम्पररी वैराग्याचा परिणाम ;)
24 Feb 2012 - 9:15 pm | मराठे
कुठेतरी वाचलेलं एक वाक्य आठवलं!
काळाची लांबी आपण संडासाच्या दाराच्या कुठल्या बाजूला उभे आहोत यावर अवलंबून असते!
24 Feb 2012 - 10:30 pm | सुधीर१३७
शीर्षक वाचून वाटलं यक्कुंनी टी. व्ही. सीरियलवर लेख लिहिला की काय; पण भलताच षॉट मारला यक्कुंनी..............
25 Feb 2012 - 8:51 am | डॉ.श्रीराम दिवटे
इतकंच नव्हे तर एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्वेक्षणा नुसार ज्या वेडयांचे काळभान हरवले आहे अशांचे वय वाढूनही शरीर तरुणच राहिले आहे असे आढळून आले. तेव्हा काळाचा विचार न करता जगा..म्हणजे चिरतरुण राहाल.....
हे बाकी खरे आहे हं.
किती आयुष्य गेले, किती राहिले याची गणती करण्यात वेळ दवडण्यापेक्षा चालू घडीचा विचार करावा लागतो. लेख छोटा, आशय मोठा!
25 Feb 2012 - 9:05 am | मन१
असे विचारधन सह्सा काही विशिष्ट प्रकरचे तीर्थप्राशन केल्यावर होते असे निरिक्षणातून सांगू इछितो.
25 Feb 2012 - 2:06 pm | नगरीनिरंजन
फारच गहन विषय!
संतवाङ्मय आणि अध्यात्माचा अभ्यास नसल्याने संतमहात्म्यांनी काय म्हटलंय ते माहित नाही पण "काळ" या संज्ञेची व्याख्या आधुनिक विज्ञानात तरी अजून कोणीही करू शकलेले नाही. असे असताना आमच्यासारखे पामर काय बोलणार?
नॅनोटेक्नॉलॉजीची मेढ रोवणारा रिचर्ड फेनमन म्हणतो,"Don't even ask me. It's just too hard to think about."
खुद्द काळाच्या सापेक्षगतीचा सिद्धांत मांडणार्या आईनस्टाईनने भूतकाळ आणि भविष्यकाळ हे निव्वळ भासच आहेत असं म्हणून ठेवलं आहे.
मुळात काळ नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही की तो निव्वळ एक भास आहे यावर अजून एकमत झालेले नाही. प्रयोगशाळेत असे एकही उपकरण नाही जे काळाचा "नैसर्गिक" प्रवाह मोजू शकेल. कारण साधं आहे, जे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात आहे की नाही हेच माहित नाही ते मोजणार कसं?
त्यामुळे जी काय काळाची गती आहे ती आपलीच काळाची गती आहे, काळाची नैसर्गिक गती असा प्रकार अस्तित्वातच नाही.
काळ वाहतो आहे हा जो प्रत्येकाचा भास असतो, त्याच भासात गतीचा भासही अंतर्भूत आहे. या भासमान काळाचे जितके छोटे-छोटे तुकडे कराल तितका त्याचा वेग जास्त वाटतो.
आदिम काळात माणसासाठी काळ चक्रीय होता. ऋतुमानाप्रमाणे हा भास मोजला जायचा त्यामुळे काळाची गती कमी वाटत असेल. हळूहळू ऋतुंचे महिने, महिन्यांचे दिवस, दिवसाचे तास, तासांचे मिनिट आणि मिनिटांचे सेकंद करत आपण या भासाचे इतके छोटे तुकडे केलेत की काळ सतत वाहतोच आहे आणि आता जास्त वेगाने वाहतो आहे असे वाटते.
त्यामुळे,
या तुमच्या वाक्यात दोन गती मांडल्या असल्या तरी त्यातली एक (आपली) सापेक्ष आहे आणि दुसरी (नैसर्गिक) अस्तित्वातच नाही.
7 May 2014 - 12:39 pm | प्रमोद देर्देकर
आज यकुंची आठवण झाली म्हणुन हा त्यांचा अप्रतिम धागा वर काढतोय.