येडस...
तर ऐंशीच्या दशकात एका आफ्रिकन बयेला माकडचाळे करण्याची कुबुद्धी सुचली. अर्थात चाळेच ते. कसेही, कुठेही अन् कधीही करता येऊ शकतील इतकी त्यात ती रममाण होऊन गेली होती. म्हणजे तिने पाळलेल्या मर्कटाशी तिचे सूत जुळले होते. सूत जुळले म्हटल्यावर ऊत यायला वेळ लागत नसतो. त्याप्रमाणे उतू गेलेला तिचा त्यावेळचा ऊत आता सर्वांना चांगलाच भोवला आहे. गेल्या चाळीस वर्षात अधिक मृत्यू होणाऱ्या मलेरियाचा धसका कोणी घेतला नसेल इतका एड्सचा घेतला जातो. झाले भले, होवो भले पण यांमुळे लोकांच्या (अन् बायकांच्याही) ‘बिन’धास्त वागण्याला एकप्रकारे लगामच बसला म्हणायचा. ‘साधन’ बाळगल्याशिवाय बागडता येऊ शकणार नाही, असा नियमच बनून गेला. तसं हुंदडायचं-बागडायचं वय थेट सत्तर ऐंशी पर्यंत पोचल्याचं आपण पेपरांत वाचतोच की. इतके म्हातारचळ उघडकीस येत असतील तर या व्हायरसचा धोका किती वाढू शकतो याचा अंदाजच केलेला बरा... असो.
बाहेर जावे तर ‘टोपी’ आवश्यक असते, रपेट मारावी तर ‘हेल्मेट’ जरुरी होता है! असा एकंदर गोची करणारा मामला बनला आहे. ‘ते’ साधण्यासाठी ‘हे’ खिशात असलंच पाहिजे, ही अट मोठी जाचक ठरू लागलीय. पूर्वी कसं डोंगरकपारीत, झाडा-झुडपामागे, मुख्यत्वे उभ्या डोलणाऱ्या पिकांत ‘एक मौका दे, मौका दे, मौका दे’ म्हणत विनासायास घुमता यायचं, रमता यायचं. आता भितीच एवढी वाटते की जिला/ज्याला आपण स्पर्शतो आहोत ती/तो पॉझिटिव्ह तर नसेल ना? या नुसत्या शंकेनेच सेक्शुअल ड्राईव्ह पुरेसा ऍक्ट होत नाही! मुक्तपणा, स्वैर वागणे आता शक्य नाहीच. अशा ‘गैर’ ठिकाणी मग मनाची समजूत घालून भीत भीत मुख्य कार्यभाग पूर्ण केल्याचं समाधान मानून घ्यावं लागतं. असो.
सध्या भारतात जवळजवळ २.५ मिलियन लोक एचआयव्हीसह जगत आहेत. ही जी पॉझिटिव्ह व्यक्तींची आकडेवारी प्रसिध्द करून चिंता व्यक्त केली जाते, त्याहीपेक्षा भयाण वास्तववादी आकडे जाहीर झाल्यावर ग्लानीच येईल. आपणही तसे नाही ना? अशी शंका नकळत येत जाईल. इतका हा भस्मासूर फोफावला आहे. स्वतःहून एचआयव्हीची तपासणी कुणीच करून घेत नाही. बोटांवर मोजण्याइतकेच असतील. त्यामुळे खरी माहिती पुढे येत नाही. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही हा व्हायरस आपले काम चोखपणे बजावत चालला आहे. कितीही सावधगिरी बाळगली तरी त्या अधीरक्षणी संयम सुटतोच. त्याला व्यसनेसुद्धा पूरक ठरत असतात. ‘आपण हे काय करून बसलो?’ असा प्रश्न सकाळी उतरल्यावर पडतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. व्हायरसने आणखी एकाला लक्ष्य केलेले असते. आम्ही मेडिकल कॉलेजला असतांना नेहमी सांगितले जायचे, ‘सध्याचा एचआयव्हीचा प्रसारवेग पाहता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा पाचपैकी एक पेशंट एचआयव्ही ग्रस्त असणार आहे. तेव्हा प्रत्येक पेशंट हाताळतांना काळजी घेणे जरुरीचे आहे.’ परंतु तसे झाले नाही. जनता वेळीच जागरूक झाल्याने, तशा जाहिरातींचा भडीमार केला गेल्याने एचआयव्हीच्या संसर्गाला थोडाफार का होईना आळा बसला आहे. एक मात्र खरे जनमानसांत या व्हायरसची इतकी धास्ती घेतली गेली की कंडोमच्या बाजारपेठेत प्रचंड उलाढाल वाढली. यशस्वी मार्केटींग तंत्र वापरून काही कंपन्या त्यामुळे गब्बर झाल्या. (यावरूनही ‘बाहेर’ जाणे किती अगत्याचे असते, याची प्रचिती अभ्यासूंना घेता येऊ शकेल!) असो.
त्यानंतर एचआयव्हीला आटोक्यात ठेवण्याची औषधे उपलब्ध झाल्यावर बहुतेकांकडून सुस्कारा टाकला गेला. तोवर अनेक तथाकथित वैद्य व खानदानी तंबूवाल्यांनी चौका-चौकांत अशा एड्सग्रस्तांना गाठून पार लुटून नेले होते. कधीही बरा न होणारा आजार समूळ नष्ट केल्याचा दावा हे भोंदू लोक करीत असायचे. एका दाक्षिणात्य वैद्यबुवांनी तर अशी औषधी शोधून काढली होती की ज्यामुळे एचआयव्हीचा रिपोर्ट निगेटिव्ह येत असे! खरे तर ती शुध्द धूळफेकच होती. शरीरातील सी-डी फोर काउंट वाढवून दाखवीत तो वैद्य एड्स बरा केल्याचा आव आणायचा. त्याने या एका आजारापोटी भयंकर माया गोळा केली. आमचे काही पेशंटही त्याचा महागडा प्रसाद घेऊन आले होते. त्या वनस्पतीने थोडी तरतरी यायची मात्र एड्स वाढतच रहायचा. अशाप्रकारे त्याने अनेकांना गंडवले. भीतीच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला असे अनेक भोंदू टपलेले होतेच. असो.
दोन वर्षांपूर्वी ७२ तासांच्या आत घ्यावयाच्या गोळीची अमाप विक्री झाली तेव्हाही अनेक चर्चासत्रे झडली. ही गोळी ७२ तासांच्या अगोदर सेवन केली असता गर्भधारणा होत नाही अशी जाहिरात केली गेली. संततीनियमनासाठी ती वापरणे योग्यच होते. मात्र या गोळ्या कॉलेजपरिसरांतील मेडिकल्समध्ये इतक्या खपू लागल्या की समाजधुरीणांनी या विरुध्द आवाज उठवला नसता तर नवल. ‘विदाऊट कंडोम’ एकत्र येण्यासाठीची गुरुकिल्ली म्हणजे ही गोळी. असा समज भुकेल्या तरुण-तरुणींमध्ये पसरला. त्यामुळेच या गोळ्या प्रमाणापेक्षा अधिक खपल्या होत्या. परंतु या वापरणाऱ्यांच्या हे लक्षात येत नव्हते की ही गोळी फक्त गर्भ राहू देत नाही, इतर जंतू इकडे-तिकडे येणार-जाणार आहेतच. या गोळीच्या वापराने ‘एसटीडी’ बेलाशक पसरणार हे ठरलेलेच होते. ही भीती ओरडून सांगावी लागली तेव्हा कुठे या गोळ्या निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी जाहिरात मागे घेऊन हात आखडता घेतला. असो.
तर असे हे ‘येडं’स पुराण. गावे तितके कमीच ठरेल. खरोखर या आजाराला इतके घाबरून चालेल का? तर नाही. म्हणजे स्वैर वागावे असा म्हणायचा हेतू नाही. मुळात व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन मेथड सर्वांनी अंगिकारावी हेच खरे. एचआयव्ही पॉझिटीव्ह म्हणजे एड्स नव्हे, हे कायम लक्षात ठेवावे. एचआयव्ही हा विषाणू शरीरांत असणे म्हणजे मृत्यू नव्हे. तो योग्य औषधोपचारांनी कित्येक वर्षे लांबविता येतो, याची अनेक उदाहरणे आढळतील. यांमुळेच जे पॉझिटिव्ह झालेच आहेत, त्यांना मायेने जवळ करणाऱ्या अनेक संस्था पुढे येत आहेत. हे एक क्रिटीकल समाज कार्य असले तरी त्यातील उदात्त मेख जाणून घेऊन अनेक तरुण-तरुणी हात पुढे करून एचआयव्हीबाधितांच्या सेवेला हजर राहताहेत. त्यांच्या मनात किंतु नसतो का? त्यांना अनेक शंका येत नसतील का? ते का म्हणून अशांच्या दिमतीस हजर राहत असतील? असे कित्येक प्रश्न सामान्यांना पडत असतील. पण त्याची फिकीर न बाळगता त्यांचे सत्कार्य चालू आहे. रुग्ण कशाने एचआयव्हीबाधित झाला हे ते शोधीत बसत नाहीत. त्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यापेक्षा आपल्याला एड्स झालाय या भीतीतून बाहेर काढणे हे स्वतःचे आद्य कर्तव्य ते समजतात. समुपदेशन, औषधोपचार इ.इ. कार्ये त्यात अंतर्भूत आहेत. असो.
१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनी अशा अनेक मुद्यांचा ऊहापोह केला जाईल. त्यावरील नवनवीन औषधांची चर्चा होईल. सामान्यांना ज्याचे नाव उच्चारताच अंगावर काटा येतो तो आजार कसा रोखता येईल या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी व्हावयास पाहिजे ही अपेक्षा...
प्रतिक्रिया
1 Dec 2011 - 11:27 am | नगरीनिरंजन
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक!
(हे वाक्य लैंगिक स्वैराचारापासून मिपावरच्या लेखनापर्यंत सगळ्या गोष्टींना किती चपखल लागू होतं, नाही?)
लेख चांगला आणि समयोचित.
1 Dec 2011 - 11:12 am | मानस्
जागतिक एड्स दिनी जनजागॄती करणारं लेखन मस्तच.
आत्ताच कुठेतरी वाचलं लग्नाअगोदर 'हनुमान', लग्नानंतर 'राम' असं आचरण असावं :)
1 Dec 2011 - 11:25 am | धन्या
छान प्रासंगिक.
सकाळी हापिसच्या कॅम्पसमध्ये शिरलो आणि एक बाब्या आणि एक बाबी एडस संदर्भात वापरल्या जाणार्या लाल रीबिनींचा खोका घेउन दिसले. येणार्या प्रत्येकाच्या हातात ते रिबिनीने बनवलेलं चिन्ह ठेवत होते.
सहज जाणवलं की ही मेणबत्ती संस्कृती आहे. इथे कॅम्पसमध्ये मनगटावर ती रीबिन डकवून काय होणार आहे? लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे. त्यांच्या मनातील भीती, त्यांचे गैरसमज दुर करणे गरजेचं आहे. एडस कसा टाळता येईल यावर बोलणं गरजेचं आहे... असो, कुठलाही दिवस असो, त्यानिमित्ताने मिरवून घेणारी उच्चभ्रू संस्कृती ही... ते त्यांचं काम करत आहेत.
डॉक्टर, या लेखासाठी धन्यवाद !!!
1 Dec 2011 - 11:52 am | मानस्
लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे म्हणता,मग तुमच्या हापिसच्या कॅम्पसमधली माणसं पण लोकच आहेत ना? की त्यांच्यामधे एडस जनजाग्रुतीची गरज नाही असं म्हणायचय तुम्हाला?
एड्चा धोका हा सर्वांनाच आहे,उलटं उच्चभ्रू संस्कृतीत तर थोडा जास्तच.
तेंव्हा काहीच न करण्यापेक्षा जे काही थोड्फार लोक करताहेत त्यांच कौतूक करण्याए॓वजी मेणबत्ती संस्कृती म्हणून त्यांना हिणवू तरी नका रावं!
1 Dec 2011 - 11:52 am | मानस्
लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे म्हणता,मग तुमच्या हापिसच्या कॅम्पसमधली माणसं पण लोकच आहेत ना? की त्यांच्यामधे एडस जनजाग्रुतीची गरज नाही असं म्हणायचय तुम्हाला?
एड्चा धोका हा सर्वांनाच आहे,उलटं उच्चभ्रू संस्कृतीत तर थोडा जास्तच.
तेंव्हा काहीच न करण्यापेक्षा जे काही थोड्फार लोक करताहेत त्यांच कौतूक करण्याए॓वजी मेणबत्ती संस्कृती म्हणून त्यांना हिणवू तरी नका रावं!
1 Dec 2011 - 12:22 pm | धन्या
कितवीला आहात?
पास. ;)
1 Dec 2011 - 11:44 am | ५० फक्त
उत्तम लेख आणि परफेक्ट टायमिंग.
1 Dec 2011 - 12:03 pm | मदनबाण
ह्म्म्...एड्सचा व्ह्यायरस कसा पसरला यावर अनेक कथा आहेत्,मात्र तो आफ्रिकेतुन आला असे अनेक तज्ञांचे मत आहे.आफ्रिकेत असलेल्या चिपांझी माकडांकडुन झालेल्या जखमांमधुन हा व्ह्यायरस मनुष्यांमधे आला असे सुद्धा मानले जाते. या लेखात जे उदा. दिले आहे त्याची अधिक माहिती (लिंक) दिल्यास उत्तम !
उद्या जर असे कळले की अमेरिकेतल्या एखाद्या लॅब मधुन हा व्ह्यायरस बाहेर आला तरी नवल वाटणार नाही.!
बाकी टोपी वापरली तरी हा व्ह्यायरसचे संक्रमण होत नाही असा समज चुकीचा आहे.
एड्स हा एचआयव्ही संक्रमणा मुळे होणारा रोग असुन याच्या स्टेजेस आहेत...
दालचीनी (Cinnamon) हे या रोगावर होत असलेल्या उपायांवर लाभकारी आहे,व यावर सध्या यावर जोरात संशोधन सुरु आहे. दालचीनी मधे अनेक गुणधर्म असुन ते एक उत्तम ब्रेन टॉनिक देखील आहे. (उद्या दालचीनीचे भाव वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.)
मध्यंतरी एका हिंदुस्थानी मुलीने अनेकांना मुद्दामुन या व्ह्यायरसची लागण करुन दिली होती,तिच्या नवर्याकडुन तिला लागण झाली होती...जेव्हा तिला हे समजले तेव्हा तिची मानसिक अवस्था बिघडली ! ती दिसायला सुंदर होती आणि याचाच फायदा घेउन तीने ३०० पेक्षा जास्त जणांना स्वतःच्या जाळ्यात ओढुन संक्रमित केले होते अशी मध्यंतरी घटना वाचनात आली होती.
संदर्भ :--- http://www.khabarabtak.com/DetailNews.aspx?id=125
1 Dec 2011 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत रे बाणा.
हे लेखक महाशयांचे वाक्य नेहमीप्रमाणेच त्यांचा स्त्रियां विषयीचा आदर दाखवणारे. आम्ही तर नेमके उलटे ऐकले आहे, अफ्रिकन मागास जमातीतल्या पुरुषांकडे हा रोग माकडांकडून आला आणि तो मानवांच्यात पसरला :)
बाकी लेखक साहेबांनी फक्त स्वतःचे लेखन टाकण्यापुरता मिपाचा उपयोग न करता, अध्ये मध्ये इतरांच्या लेखनाला वाचण्याचे, प्रतिसाद द्यायचे कष्ट घेतले तरी चालतील.
2 Dec 2011 - 7:58 am | श्रीरंग_जोशी
दालचिनी हा हिंदी शब्द आहे. मराठीमध्ये कलमी असे म्हणतात. पण बहुधा दालचिनी हा फारच प्रचलित झालेला आहे.
1 Dec 2011 - 12:12 pm | प्रभाकर पेठकर
लेख उद्बोधक आहे ह्यात शंका नाही. अभिनंदन.
मात्र, पहिले दोन परिच्छेद हे स्वैराचाराचे (नकळत) समर्थन करणारे वाटले.
ह्यात स्त्रीयांचा ही सहभाग असला तरी पुरूषांचे प्रमाण कित्येक पटीत अधिक आहे. आणि अशा बाधित पुरुषांच्या निष्पाप स्त्रियांना कुठलाही गुन्हा नसताना फासवर लटकावे लागत आहे. ज्या बाहेरख्याली स्त्रियांमुळे त्यांच्या निष्पाप नवर्यांच्या नशिबी असे भोग येतात तेही समदुर्दैवी म्हणावे लागतील.
वेश्यावस्तीतही वैद्यकिय तपासणी सक्तीची आहे असे 'ऐकले' आहे. पण ती कितपत सचोटीने केली जाते? त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही अशी खात्री देता येईल का? एखाद्या बाधित वेश्येला 'आरोग्यपूर्ण' असे प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरवर भारतिय दंड संहितेतील 'सदोष मनुष्यवधाचे कलम' का लावू नये?
इस्पितळातून जो वैद्यकिय कचरा उकिरड्यावर टाकला जातो त्यातील 'वापरलेल्या' सुया पुन्हा बाजारात येतात. 'वापरलेला' कापूस प्रक्रियाकरून पुन्हा बाजारात येतो, नाकावाटे, मुत्रनलीकेवाटे शरीरात टाकलेल्या नळ्या पुन्हा बाजारात येतात. वास्तविक इस्पितळात हा वैद्यकिय कचरा जाळून टाकण्यासाठी भट्ट्या असतात पण कित्येक इस्पितळाच्या ह्या भट्ट्या नादुरुस्त अवस्थेत बंद आहेत, असे दूरदर्शनच्या एका बातमी पत्रात दाखविले होते. हा सदोष कचरा विकून पैसा कमाविण्यात इस्पितळातील काही व्यक्ती गुंतलेल्या असतात असा दावा त्या वाहिनीने केला होता. पण, त्यावर काही कारवाई झाल्याचे ऐकले नाही.
समाजाच्या सदाचरणा इतकेच इस्पितळाच्या कर्मचार्यांच्या, सदोष कचरा पुन्हा बाजारात आणणार्या दलालांच्या, जास्तीच्या नफ्यासाठी असा माल विकणार्या, ह्या सर्वांच्याच सदाचरणाच्या प्रतिज्ञेशिवाय (आणि ती पाळल्याशिवाय) ह्या मोकाट राक्षसाशी सामना करता येणार नाही, असे वाटते.
इथे, मस्कत मध्ये, दर दोन वर्षांनी (व्हिसा नुतनीकरणाच्या वेळी) वैद्यकिय तपासणी होते त्यात एच्. आय्. व्ही. तपासणी सक्तीची आहे. आपल्याकडेही असे करावयास पाहिजे.
1 Dec 2011 - 4:17 pm | इष्टुर फाकडा
येडस...
तर ऐंशीच्या दशकात एका आफ्रिकन बयेला माकडचाळे करण्याची कुबुद्धी सुचली. अर्थात चाळेच ते. कसेही, कुठेही अन् कधीही करता येऊ शकतील इतकी त्यात ती रममाण होऊन गेली होती.
********************************************************************************************************************************
डॉक्टर,
हे काय पटले नाही...नक्की हा वायरस आला कोठून याचे नुसते अंदाज उपलब्ध असताना हे असले लिखाण काही योग्य नाही असे माझे मत. बाकी तुम्ही याच क्षेत्रात असल्याने HIV बाबत नवीन काही संशोधनातील प्रगती किंवा दिशा याबद्दल याच लेखात लिहिले असते तर लेख अजून व्यापक झाला असता.
1 Dec 2011 - 7:37 pm | स्वाती२
>>येडस...
तर ऐंशीच्या दशकात एका आफ्रिकन बयेला माकडचाळे करण्याची कुबुद्धी सुचली. अर्थात चाळेच ते. कसेही, कुठेही अन् कधीही करता येऊ शकतील इतकी त्यात ती रममाण होऊन गेली होती. म्हणजे तिने पाळलेल्या मर्कटाशी तिचे सूत जुळले होते. सूत जुळले म्हटल्यावर ऊत यायला वेळ लागत नसतो. त्याप्रमाणे उतू गेलेला तिचा त्यावेळचा ऊत आता सर्वांना चांगलाच भोवला आहे.>>
याला काही पुरावा? आपण आपल्या नावापुढे डॉक्टर लावता आणि कुठलाच पुरावा उपलब्ध नसताना असे सेक्सिस्ट आणि रेसिस्ट विधान कसे करु शकता? बाकी लेख चांगला आहे पण सशक्त सुरुवात म्हणजे काहीतरी सनसनाटी नव्हे!
बाकी ओरिजिन बद्द्लच्या अनेक शक्यता http://www.avert.org/origin-aids-hiv.htm
1 Dec 2011 - 9:20 pm | बहुगुणी
डॉक्टरसाहेबः प्रासंगिक म्हणून लिखाणाची वेळ साधलीत ते एक बरं केलंत, पण स्वत:च्या नावामागे 'डॉ.' लावता येतं म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका! हे आणि इतर अशी संस्थळं लोकशिक्षणाचंही काम करतात, तेंव्हा द्याल ती माहिती सवंग लिखाण न करता जबाबदारीने दिलीत तर फार बरं होईल.
1 Dec 2011 - 9:36 pm | गणपा
स्वातीतै आणि बहुगुणी काकांशी सहमत.
2 Dec 2011 - 4:59 am | नेत्रेश
माणसाला प्रथम एच आय व्ही बाधा / संसर्ग कसा व केव्हा झाला याची माहीती संपुर्ण चुकीची दीलेली आहे
शास्त्रीय संशोधनात प्रथम संसर्ग हा २०च्या शतकाच्या सुरवातीस झाल्याचे आढळू आले आहे.
१९५९ साली जिवंत असलेल्या पुरुषाच्या नमुन्यातही एच आय व्ही मिळाला आहे.
आणी सर्वात जास्त संसर्गची शक्यता ही SIV बाधीत चिंपांझीचे मांस कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या माणसाने खल्यामुळे झाला असावा अशी आहे. दुसरी शक्यता ही SIV बाधीत चिंपांझीच्या हल्यात जखमी झाल्यामुळे आहे, व तीसरी शक्यता ही इंजेक्शनच्या सुया निर्जंतुक न करता वापरल्याने झाल्याचा आहे (चिंपांझीच्या हल्यात जखमी झालेल्या लोकांकडुन ईतराना झालेला संसर्ग).
बाकी काही थियरी नुसार 'पोलीओच्या तोंडातुन घ्यायच्या डोसामुळे' तसेच 'अमेरीकेचे जैविक अस्त्राचे कारस्थान' अशाही आहेत, पण त्या निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.
या सगळ्यात डॉक्टरांनी दीलेली थियरी कुठेच येत नाही. तेव्हा डॉक्टरांची थियरी ही काही विक्षिप्त मनांची निर्मीती असावी असे वाटते.
संदर्भः http://www.avert.org/origin-aids-hiv.htm
2 Dec 2011 - 8:14 am | शिल्पा ब
सर्वप्रथम लेख अजिबात आवडला नाही. जे काही लिहिलंय त्याचा कोणताही पुरावा नाही. रोग मानवजातीत आला त्याबद्दल आम्ही एका पुरुषाने माकडीणीशी संभोग केल्यामुळे असे वाचले आहे.
तुम्ही जरा तारतम्य बाळगुन लिहायला शिका. नावापुढे डॉ. लावता त्यामुळे लोकं तुमचं अशा विषयांवरचं लिखाण एका डॉक्टरचं आहे हे विसरत नाहीत.
बाकी तुम्ही इथे फक्त लेख टाकायलाच येता असे निरीक्षण आहे.