आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही. ती तशीच बाकी आहे.
किंचित सुटलेलं पोट ढगळ टी-शर्ट व जीन्सच्या आड लपवत 'शर्मा स्वीट्स'च्या बाहेर उभा असलेला बंड्या पाहून मी त्याला जोरदार हाळी दिली, ''काय बंड्या, काय म्हणतोस? '' (दचकू नका, मला अशी सवय आहे रस्त्यात जोरदार हाळी द्यायची!! ) बंड्याने हातातली सिगरेट घाईघाईने चपलेखाली चुरडली आणि ओळखीचे हसत माझ्या समोर आला, ''कायऽऽ मग!! आज बर्याच दिवसांनी!!''
हे आमचे सांकेतिक संभाषण प्रास्ताविक असते. किंवा खूप दिवसांनी भेटल्यासारखं ''वा वा! अलभ्य लाभ!! '' म्हणत हस्तांदोलन करायचं. (आम्ही भल्या सकाळी तापवायला ठेवलेलं दूध नासलं म्हणून चरफडत गल्लीतल्या वाण्याकडून किंवा डेअरीतून दुधाची पिशवी पारोशी, अजागळ अवतारात घेऊन येत असताना रस्त्यात एकमेकांशी झालेली नजर-भेट ही प्रत्यक्ष भेटीमध्ये गणत नाही हे प्लीज नमूद करून घ्यावे!) नशीब हेच की अजून तरी बंड्या ''लाँग टाईम नो सी यार.... '' ने गप्पांची सुरुवात करत नाही. तर, त्याही दिवशी त्या ''बर्याच दिवसांनी''च्या गजरानंतर अपेक्षित क्रमाने आजचे तापमान, पुण्याची हवा, रस्त्याचे ट्रॅफिक, वाढते बाजारभाव, सुट्ट्या आणि ऑफिसातले काम यांची ठराविक स्टेशने घेत घेत आमची गाडी एकदाची दिवाळीच्या खरेदीवर आली.
''काय मग, या वर्षी काय म्हणतेय दिवाळी? '' मी नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावर मला त्याचे नेहमीचेच उत्तर अपेक्षित होते. (लक्षात ठेवा, इथे अनपेक्षित उत्तरे येणे अजिचबात अपेक्षित नसते. कारण त्यावर तितका काथ्याकूट करण्याइतका वेळ दोन्ही संभाषणकर्त्या पक्षांकडे असावा लागतो! )
पण बंड्याने या खेपेस आपण बदललोय हे सिद्ध करायचेच ठरविले असावे बहुदा! दोन्ही हात डोक्यामागे घेत एक जोरदार आळस देत तो उद्गारला, ''आऊटसोर्स केली दिवाळी यंदा! ''
''आँ?? .... म्हणजे रे काय? ''
''अगं सोपंय ते.... तुला(ही) कळेल! ''
''अरे हो, पण म्हणजे नक्की काय केलंस तरी काय? ''
''काय म्हणजे... नेहमीची ती दिवाळीची कामं, सफाई, सजावट, फराळ, आकाशकंदील, किल्ला.... सगळं सगळं आऊटसोर्स केलं... ''
''ए अरे वत्सा, मला जरा समजेल अशा भाषेत सांग ना जरा! ''
''अगं, पहिलं म्हणजे ती घराची सफाई.... आई-बाबा, बायको जाम कटकट करतात त्याबद्दल. मला तर वेळ नसतोच आणि बायकोला देखील इतर खूप कामं असतात. मग मी पेपरमध्ये नेहमी जाहिरात येते ना एक... त्या घराची सफाई करून देणार्या एका कंपनीलाच आमचं घर साफ करायचं कंत्राट देऊन टाकलं. त्यांनी पार गालिचा, सोफासेट व्हॅक्युम करण्यापासून भिंती-छत-खिडक्या वगैरे सगळं साफ करून दिलं बरं का! है चकाचक! पैसा वसूऽऽल!''
''मग बायकोनं बाकीची किरकोळ स्वच्छता घरकामाच्या बाईंकडून करून घेतली. एक दिवस मी चार प्रकारच्या मिठाया, सुकामेवा घरी आणून ठेवला. फराळाची ऑर्डर बाहेरच दिली. श्रेयासाठी रविवार पेठेत एक मस्त रेडीमेड किल्ला विकत मिळाला. आकाशकंदील तर काय झकास मिळतात गं सध्या बाजारात! त्यातला एक श्रेयाच्या पसंतीने खरेदी केला. आणि हे सगळं एका दिवसात उरकलं, बाऽऽसच! तेव्हा दिवाळीच्या घरकामाचं नो टेन्शन! मलाही आराम आणि बायकोलाही आराम! ''
''वा! '' मी खूश होऊन म्हटलं, ''मग आता बाकीची दिवाळी मजेत असेल ना? ''
''येस येस! '' बंड्या खुशीत हसला. ''या वेळी बायको पण जाम खूश आहे! तिला पार्लर आणि स्पा ट्रीटमेंटचं गिफ्ट कूपन दिलं दिवाळी आधीच! मी देखील स्पा मध्ये जाऊन फुल बॉडी मसाज वगैरे घेऊन आलो. सो... नो अभ्यंगस्नान! आता दिवाळीचे चारही दिवस रोज सकाळी वेगवेगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटायला आम्ही मोकळे!! ''
''म्हणजे? रोज घरी बोलवताय की काय त्यांना? '' मी आश्चर्याने बंड्याचा घरी माणसांची गर्दी होण्याबद्दलचा फोबिया आठवत विचारलं.
''छे छे!! तसलं काय नाही हां! कोण त्यांची उस्तरवार करणार! त्यापेक्षा आम्ही रोज एकेका ग्रुपला एकेका दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला भेटतो. कार्यक्रम आवडला तर सगळा वेळ तिथे बसतो, नाहीतर तिथून कलटी मारतो. मग मस्तपैकी बाहेरच कोठेतरी ब्रेकफास्ट किंवा ब्रंच करायचा.''
''आणि बाकीचा दिवस?''
''रोज स्पेशल प्लॅन बनवतो आम्ही! लांब ड्राईव्हला जायचं... पुण्यात भटकायचं. कुठं प्रदर्शन असेल तर ते बघून यायचं. दुपारी मस्त डाराडूर झोप काढायची. संध्याकाळी सोसायटीत काहीतरी कार्यक्रम असतोच. परवा दीपोत्सव होता. ते रांगोळ्या, आकाशकंदील - किल्ला बांधायची स्पर्धा, फॅशन शो, कॉमन फराळ, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे असं असतंच काहीतरी... नाहीतरी फॅडच आहे त्याचं सध्या! आमच्या नाही तर शेजारच्या सोसायटीत, तिथं नाही तर जवळच्या बागेत असे कार्यक्रम असतातच गं! तुला मजा सांगू? आमच्या सोसायटीत तर आम्ही या वर्षीपासून फटाके फुल बॅनच केलेत. गेल्या वर्षी पाठाऱ्यांच्या पोरानं पार्किंगमधील वाहनंच पेटवायची बाकी ठेवली होती फटाके पेटवायच्या नादात! आगीचा बंब बोलवायला लागला होता. त्यामुळे नो फटाके.... नो ध्वनिप्रदूषण! सोसायटीत जायचं किंवा क्लबमध्ये. आणि तिथं बोअर झालो तर मग नदीकाठी फायरवर्क्स बघायला जायचं. भन्नाट मजा येते! येताना पुन्हा बाहेरच काहीतरी खायचं किंवा घरी पार्सल. रात्री डीव्हीडीवर किंवा टाटा स्कायवर मस्त पिक्चर टाकायचा.... किंवा गप्पा... अंताक्षरी... फुल धमाल! ''
''सह्ही आहे रे! खरंच मस्त एन्जॉय करताय दिवाळी तुम्ही. आता भाऊबीजेला बहिणींकडे जाणार असशील ना? ''
''नो, नो, नो! त्यांनाही आम्ही सर्व भावांनी बाहेरच भेटायचं ठरवलंय... प्रत्येकीकडे जाण्यायेण्यातच खूप वेळ जातो! शिवाय त्याही नोकऱ्या करतात... त्यांनाही काम पडतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय, तिथेच त्या मला व इतर भावांना ओवाळतील, त्यांना त्यांच्या गिफ्ट्स द्यायच्या, ट्रीट द्यायची की झालं! ''
''अरे ते नातेवाईकांचं ठीक आहे... पण तुझ्या कलीग्ज आणि बॉस लोकांकडे तरी तुला स्वतःला जावं लागत असेल ना? ''
''हॅ हॅ हॅ... अगं आमच्या ऑफिसात दिवाळी पार्टी त्यासाठीच तर अॅरेंज करतात.... तिथल्या तिथं काय त्या शुभेच्छा, गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज करायचं. फार कटकट नाही ठेवायची! ''
''गुड! म्हणजे ही दिवाळी अगदी टेन्शन-फ्री दिवाळीच म्हण की! ''
''मग!!??!! इथं रोज मर मर मरायचं कामाच्या अन् टेन्शनच्या ओझ्याखाली, आणि हक्काच्या मिळालेल्या दोन-तीन सुट्ट्या देखील ती लोकांची उस्तरवार करण्यात, घरात काम करण्यात नाहीतर नको असणार्या लोकांच्या भेटीगाठीत घालवायची म्हणजे फार होतं! हे कसं सुटसुटीत! ''
''अरे पण एवढे सगळे खर्च जमवायचे म्हणजे जरा कसरत होत असेल ना? ''
''ह्यॅ! तो खर्च तर तसाही होत असतोच! तू सांग मला... कुठं होत नाही खर्च?.... मग स्वतःच्या आरामावर खर्च केला तर कुठं बिघडलं? ''
बाप रे! यह हमारा ही बंड्या है क्या? मी डोळे फाडफाडून बंड्याकडे बघत असतानाच त्याचा सेलफोन वाजला आणि तो मला ''बाय'' करून फोनवर बोलत बोलत दिसेनासा झाला. पण माझ्या मनातलं विचारचक्र सुरू झालं होतं....
बंड्याचं लॉजिक तर ''कूल'' होतं. येऊन जाऊन खर्च करायचाच आहे, तर तो स्वतःसाठी का करू नये? स्वतःच्या व कुटुंबाच्या ''हॅपी टाईम'' साठी का करू नये? आणि तरीही त्याच्या बँक बॅलन्सची मला उगाच काळजी वाटू लागली होती. एवढे सगळे खर्च हा आणि ह्याची बायको कसे जमवत असतील? कदाचित वर्षभर त्यासाठी पैसे वेगळे काढत असतील.
एखाद्या गुळगुळीत कागदाच्या कॉर्पोरेट ब्रोशर सारखी बंड्यानं त्याची दिवाळीही गुळगुळीत, झुळझुळीत कशी होईल ते पाहिलं होतं. त्यात कचरा, पसारा, गोंधळ, धूळ, घाम, धूर, प्रदूषणाला किंवा टेन्शनला काहीएक स्थान नव्हतं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं?
बंड्याच्या आईवडीलांना पटत असेल का हे सारं? पण त्यांचा तरी तसा थेट संबंध येतोच कुठं? गेली दोन वर्षं बंड्या वेगळा राहतो. तो मजेत, त्याचे आईवडील मजेत. सगळेच तर मजेत दिसत होते....
मग माझ्या मनात ही कोणती सूक्ष्मशी कळ उमटत होती?
कदाचित बंड्याच्या लेखी दिवाळी हा फक्त एक ''एन्जॉय'' करायचा ''हॉलिडे'' म्हणून उरला होता, त्याबद्दल होती का ती कळ? की कोणत्या तरी जुन्या बाळबोध स्मृतींना उराशी कवटाळून ते चित्र आता किती वेगानं बदलतंय या रुखरुखीची होती ती कळ? गेल्या अनेक पिढ्या दिवाळी अमक्या ढमक्या पद्धतीने साजरी व्हायची, म्हणून आपणही ती तशीच साजरी करायची या अनुकरणशील धाटणीच्या विचारांना छेद जाण्याची होती का ती कळ? त्या वेदनेत आपली वर्तमान व भविष्याबद्दलची, आपल्या आचार-विचारांबद्दलची अशाश्वती जास्त होती, की आधीच्या पिढ्यांनी जे केलं ते सगळंच सगळं चांगलं, उत्तम, हितकारीच असलं पाहिजे हा भाबडा विश्वास?
कोणीतरी म्हटल्याचं आठवलं, ''Ever New, Happy You! ''
काळाप्रमाणे बदलत गेलं तर त्यात खरंच का आपला ''र्हास'' होतो? आणि र्हास नक्की कशाचा होतो.... व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा की देशाचा? की विचारांचा व मूल्यांचा? जे चांगलं असेल ते टिकेल हाही एक भाबडा विश्वासच, नाही का? नाहीतर आधीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी मुळात लयाला गेल्याच नसत्या! कुटुंबसंस्था बदलली तशी सण साजरे करायची पद्धतही बदलत गेली व बदलते आहे. नशीब हेच की आजच्या पिढीला किमान दिवाळी साजरी करायची असते हे तरी माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीही उठसूठ दिसणार्या व मनोपटलावर आदळणार्या जाहिरातींची व मालिकांची ती एक प्रकारे कृपाच आहे! संस्कृतीचे दळण लावून लावून ते जाहिरातदार व मालिका दिग्दर्शक एखादा सण साजरा करण्याचे व तो ठराविक स्टॅंडर्डने साजरा करण्याचे प्रेशरच आणतात तुमच्यावर! तुमच्या मानगुटीवर जाहिरातीतील सुळसुळीत कल्पना ते इतक्या बिनबोभाट बसवतात आणि त्या कल्पनांच्या तालावर आपण कधी नाचायला लागतो तेच आपल्याला कळत नाही....!!!
मग संस्कृती खरंच कुठे लुप्त पावते का? की एक अंगडाई घेऊन नव्या साजशृंगारात सामोरी येते? नव्या आचारतत्वांनुसार तिनेही का बदलू नये? कदाचित आणखी दहा-वीस वर्षांनी दिवाळी हा ग्लोबलाईझ्ड सण असेल. किंवा भारतात जगाच्या कानाकोपर्यातले, सर्व धर्म-संस्कृतींमधले यच्चयावत सण साजरे होत असतील. तसंही पाहायला गेलं तर दिवाळी किंवा इतर सणांमागच्या पौराणिक कथांशी तर नव्या पिढीचा संपर्क तुटल्यात जमा आहे. त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही. त्यांच्या १००१ प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. (कारण आम्ही ते प्रश्न कधी विचारलेच नाहीत.... ना स्वतःला, ना मोठ्या मंडळींना! ना त्यांच्यावर कधी विचार केला...!! ) आता ही चिमखडी पोरं जेव्हा पेचात टाकणारे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काहीतरी सांगून त्यांचे शंकासमाधान करावे लागते. पण त्यांचे कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.....
इतर ठिकाणी ग्लोबलाईझ्ड अर्थव्यवस्थेची मूल्ये अंगिकारायची - नव्या विचारधारा - आचार - जीवनपद्धती स्वीकारायची, मात्र सांस्कृतिक - सामाजिक चित्र जसे (आपल्या मनात) आहे तसेच राहावे अशी इच्छा ठेवायची यातील विरोधाभास कितपत सच्चा व कितपत मनोरंजक?
बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! आणि कोणास ठाऊक, कदाचित आणखी आठ - दहा वर्षांनी त्याची मुलगी श्रेया जरा मोठी होईल, तोवर त्याचं हेही समीकरण बदलेल. कारण तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!
-- अरुंधती
प्रतिक्रिया
29 Oct 2011 - 6:25 pm | नरेश_
माझी गाडी
माझी माडी
माझ्या बायकोची
गोल-गोल साडी
यापलिकडे या बंड्याची उडी जात नाही हेच खरं.
29 Oct 2011 - 8:24 pm | इंटरनेटस्नेही
वा! वा! चान!! चान!!
29 Oct 2011 - 9:41 pm | सुधीर
लेख आवडला, पण, गोंधळ अधिकच वाढला. :) कारण, काय बरोबर काय चूक हे न ठरवता दोन्ही बाजू (नव्या आणि जुन्या पिढीची सण साजरे करण्याची पद्धत) तुम्ही उत्तम मांडल्यात. कालाय तस्मय नमः| म्हणायचं, आणि काय? तरीही माझं मत असं की, काही रुढी परंपरा नवीन पिढीकडे नक्कीच संक्रमित कराव्यात. त्या का कराव्यात ह्यावर उत्तर (शास्त्रीय कारण) असो वा नसो. जसे, दारासमोर रांगोळी काढणे, अभ्यंगस्नान, कारीट फोडणे, कंदील बनविणे आणि अशा ब-याच! अट इतकीच, त्या प्रत्येकीतून लहानग्यांना आनंद मिळावा. दिवाळीच्या सणाचे वेगळेपण "फिल" व्हावे, आणि आयुष्यभराच्या गोड आठवणी मिळाव्यात.
31 Oct 2011 - 8:10 pm | रेवती
लेखन फारच चांगले झाले आहे.
साडेपाचशे वाचने होवूनही प्रतिसाद फारसे आले नाहीत हेच याचे यश मानायला हवे.;)
हे सगळं बाहेरच साजरं करायचं असेल तर दिवाळी हा घरचा सण कसा काय?
मुलं आजकाल पदार्थ खात नाहीत म्हणून बर्याचजणांकडे फराळाचं प्रमाण कमी झालं होतच. त्यातल्यात्यात आवडीचे पदार्थ म्हणून चकली, करंजी आणि चिवडा केला जाणारी घरे होतीच.
त्यानंतर आम्ही फराळ घरी बनवत नाही. कोण करणार एवढा उटारेटा? म्हणून गृहोद्योगातून आणला जाऊ लागला. नोकरदार नवराबायको म्हटल्यावर ते लवकर स्विकारलंही गेलं. आता तर कितीतरी जण आहेत की दिवाळीला फराळ न करणंच बरं वाटत असावं. निदान बाहेरून मागवा तरी असं म्हणावसं वाटतं. स्वत: पदार्थ न करणं हेही ठीक जेंव्हा दुसर्या फराळ बनवणार्यांना नावं ठेवली जातात तेंव्हा.
त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही.
हे १०० टक्के सत्य!
माझ्या भाचीला दिवाळी आणि हॅलोविनचं काहीतरी नातं आहे असं वाटायला लागलय.
साधारण जवळपास असणारे सण पाहून ती फोनवर हॅपी दिवाली हॅलोवीन म्हणत होती.;)
31 Oct 2011 - 11:16 pm | छोटा डॉन
लेख खुप आवडला.
तुर्तास ही पोच समजावी, उद्या सविस्तर खरडेन.
रेवतीताईच्या प्रतिसादांबाबतच्या अंदाजाबाबत सहमत, नक्की काय लिहावे हा प्रश्नच आहे.
- छोटा डॉन
1 Nov 2011 - 3:55 am | शेखर काळे
दिवाळी साजरी करण्याच्या मागची भावना काय होती - तर आपल्या सगे-सोयर्यांनी एकत्र जमून आनंद मनवायचा. दिवाळीचा सण साजरा करण्याची वेळ पहा - पिके भरघोस होतील याचा अंदाज आलेला आहे, हाताशी वेळ आहे, सगळे खर्चं जाऊन (थोडा-फार) पैसा ऊरलेला आहे, पाऊस थांबून हवामान सुधारलेले आहे. अशा वेळी सगळे मिळून काही चांगले-चुंगले खायचे अशा भावनेतून दिवाळी सण आलेला आहे.
आता नवीन पिढी आली, तर त्यांचा आनंद साजरा करायची पद्धत वेगळीच असणार - कारण आता ऊत्पन्नाचा मार्ग वेगळा आहे. तरीदेखील, ज्या घरांत शेतीजन्य ऊत्पन्न येते, त्यांचा दिवाळी साजरी करण्याचा मार्ग पारंपारीकच असणार.
अरुंधती यांनी दाखवली आहे ती शहरांत राहणार्या लो़कांची दिवाळी. आता फ्लॅट्मध्ये राहणार्या कुटुंबाने म्हटले की चला रे मुलांनो, आपण अंगणात किल्ला बांधू, तर ते कसे शक्य आहे ?
बंड्याच्या आई-वडिलांनी त्यांना शक्य होती त्या पद्धतीने दिवाळी साजरी केली असेल. आता बंड्या त्याला शक्य आहे, त्या पद्धतीने दिवाळी साजरी करतोय. आणि २० वर्षांनी त्याची मुले आणखी कोण्या पद्धतीने दिवाळी साजरी करतील. शेवटी तुम्ही लिहीलेत ते खरं - तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!
- शेखर
1 Nov 2011 - 10:08 am | छोटा डॉन
प्रतिसाद आवडला, मला असेच काही मुद्दे मांडायचे होते.
आता इथे वर म्हटल्याप्रमाणे सेपरेट प्रतिसाद लिहण्याऐवजी ह्याच प्रतिसादाला पुरक असे अजुन खरडतो म्हणजे मला जे म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल.
मुळात दिवाळी म्हणजे काय तर दिव्यांच्या सण. थंडी जस्ट सुरु व्हायच्या दिवसात जेव्हा शेतातली सर्व कामेधामे संपुन हातात पैसा आला असतो तेव्हा वर्षभर उन्हा, पावसात शेतात राबलेल्या लोकांना काही आराम मिळावा, शरिराची व तब्येतीची थोडी काळजी घेता यावी, काही गोडधोड खायला मिळावे व सोबत पाहुणे, आप्त, मित्रमंडळींना थोडा वेळ काढुन भेटता यावे व विरंगुळा मिळावा ह्या विचारातुन हे सर्व आले असावे असा कयास आहे.
हयच अनुषंगाने मग घरात दिवे लावणे, आकाशकंदिल बनवणे, गोडधोड बनवणे, नवे कपडे आणि वस्तु घेणे, घरात पुजापाठ आणि तत्सम देवधर्म करणे वगैरे इतर गोष्टी 'पुरक' म्हणुन आल्या व त्या दिवाळी सणाचा अविभाज्य भाग होत गेल्या.
आता नाही म्हटले तरी परिस्थिती बरीच वेगळी आहे, लोक आता शेती ह्या पर्यायासोबत इतरही उद्योग आणि नोकर्या करत आहेत, पहिल्यापेक्षा जरा जास्तच पैसा हातात येत आहे, लोकांची खर्च करण्याची मानसिकताही घडत आहे पण ह्या सगळ्यांसोबतच लोकांना 'स्वतःसाठी मिळणारा असा खास वेळ' मात्र कमी होत आहे, नोकरदार आणि व्यापारी वर्गाला तर प्लॅन करुन सुट्ट्या घ्याव्या लागतात. मग ह्याच सर्व बाबींनुसार सण साजरा करण्याची पद्धत बदलत असेल तर त्यात मला आश्चर्य वाटणार नाही.
पुर्वी काही सामाजिक आणि बहुदा आर्थिक कारणांमुळे दिवाळीतच 'नवे कपडे' घेण्याची पद्धत किंवा सवय होती, आता हातात पैसा आणि तो खर्च करण्याची इच्छाशक्ती असल्याने आपण केव्हाही कपडे घेत असतो, मग दिवाळीलाच नवे कपडे घेण्याचे एवढे अप्रुप राहिले नाही हे काही दिवाळीची व्याख्या बदलण्याचे कारण होत नाही. हेच काही बाबतीत इतर वस्तु अथवा तत्सम खरेदीबाबत म्हणता येईल. आता लोकांनी ही खरेदी करण्यासाठी दिवाळीची वाट बघावी लागत नाही हे चांगलेच नाही का ?
पुर्वी दिवाळीच्या काळात घरात केले जाणारे गोडाचे आणि चमचमीत फराळाचे पदार्थ आणि आजच्या काळात बाहेरुन मागवले जाणारे हेच पदार्थ ह्यात काही मला दिवाळीचा सांस्कृतीक पराभव किंवा व्याख्या बदलणे असे वाटत नाही. पुर्वी एरव्ही असे पदार्थ करण्याकडे कल नसायचा, रोज नेहमीचे साधेसुधे अन्न खाल्ले जायचे, केवळ सणालाच असे खास वेगळे पदार्थ केले जायचे व दिवाळी हा त्यातलाच एक मुहुर्त. आता मात्र हॉटेलिंग बिझीनेस तेजीत आल्याने व वाटेल तेव्हा वाट्टेल ते खायला मिळण्याचा जमाना आल्याने लोकांना त्याचेही अप्रुप राहिले नाही की काय चुकीची गोष्ट आहे काय ? पुर्वी केवळ दिवाळीतच केल्या जाणार्या चकल्या, लाडु, करंज्या आजकाल वर्षभर दुकानात विकत मिळतात, मग त्यासाठी खास दिवाळीचीच वाट का पहावी आणि केवळ दिवाळीतच ते खाण्याचा मानसिक बोज का पेलावा ? दुसरा मुद्दा असा की पुर्वी सर्व जण एकत्र जमुन ते घरात बनवत असायचे, आता तसे नाही, कामाच्या व नोकरीधंद्याच्या निमित्ताने आता एकत्र कुटुंब ही पद्धतही कमी झालीच आहे, मग उगाच अट्टाहासाने स्वतःला त्रास करुन घेऊन ते सर्व घरीच बनवावे ह्या हट्टाला काही अर्थ नाही. उलट ह्यातुन जो काही वेळ वाचेल तो इतर कामांसाठी वापरता येईल ना, तसाही सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात एवढा वेळ केवळ 'परंपरा' संभाळावी म्हणुन घालवणे जरी अगदी निरर्थक नसले तरी आवश्यकच आहे असे नाही. बदल होत आहे, ते स्विकारण्यात वाईट नाही, त्याने दिवाळीचे महत्व कमी होते अशातला भाग नाही.
असेच काही दिव्यांची रोषणाई आणि आकाशकंदिल ह्याबाबत म्हणता येईल. आता विजेच्या (इलेक्ट्रिसिटी) अगदी मुबलक नसले तरी पुरेश्या उपलब्धतेमुळे जर विजेची रोषणाई केली, बाहेरुन सुरेख सुंदर असा आकाशकंदिल विकत आणला आणि त्यानिमित्ताने 'खाण्याच्या तेलाची बचत' झाली तर ह्यात चुकीचे काय आहे ? राहाता राहिली बाब ही सर्व रोषणाई घरात तयार करताना मिळणार्या मानसीक समाधानाची तर मी असे म्हणेन की तेवढेच समाधान बाहेरुन सर्व विकत आणुन मिळत असेल तर त्यात फारसे चूक आहे असे वाटत नाही. उलट ह्यामुळे उत्सवाला जास्त शोभा येते, वेळ वाचतो आणि जरा जास्तच मानसीक समाधान मिळते असे मी मानतो.
अभ्यंगस्नान आणि त्यात वापरले जाणारे उटणे, डाळीचे पीठ, दही, सुगंधी तेल आदी गोष्टी शरिराला फ्रेश करण्यासाठी वापरत होते. आता ह्यासाठीच नवे साबण, शँपू, लोशन्स, अत्तरे आणि ह्याहुन पुढे म्हणजे स्पा किंबा ब्युटीपार्लर उपलब्ध असताना केवळ उटणे वापरल्यानेच अभ्यंगस्नान घडते, शरिर फ्रेश राहत व दिवाळी 'साजरी' होते असे म्हणण्याला काही अर्थ नाही. नव्या काळानुसार उत्तम पर्याय उपलब्ध होत असतील तर त्यामुळे संस्कृती बुडाली असे मानण्याचे कारण नाही. आजही ही पर्यायी सोय वापरुन अभ्यंगस्नानाचेच सुख मिळते असे मानतो, आता ते ही वर्षभर सर्व काळ उपलब्ध आहे ही अजुन आनंदाची गोष्ट.
राहता राहिला प्रश्न संस्कृती, देवधर्म आणि नैमित्तिक पुजापाठ व इतर परंपरांचा.
तर मी असे म्हणेन की नव्या काळातल्या वाढत्या सोईंमुळे उलट जास्त सुख मिळते व हे सर्व जास्त पद्धतशीरपणे करता येते. पुर्वी घरातच उपलब्ध असलेली साधने वापरुन केले जाणारे लक्ष्मीपुजन आणि आता बाहेरुन सर्व आणुन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन केलेले लखलखाटातले लक्ष्मीपुजन ह्यात फारसा काही फरक आहे असे वाटत नाही.
भाऊबीज वगैरे सणाला शक्य असेल तेव्हा परस्परांनी आपापल्या कुटुंबासगट दुसर्याच्या घरी जाणे उत्तमच आहे. पण ह्याला पर्याय म्हणुन एखाद्या हॉटेलात किंवा हॉल घेऊन व सर्व गोष्टी बाहेरुन आयात करुन त्याद्वारे वाचणार्या वेळात आपण केवळ एकत्र जमुन ४ क्षण मौजमजा, गप्पाटप्पा आणि सुखाची देवाणघेवाण करत असु तर ते जास्त चांगले होईल असे मला वैयक्तिकरित्या वाटते.
ह्यात फार काही परंपरा बदलली आणि संस्कृती बुडाली असे मानण्याचे कारण नाही.
उलट ह्या नव्या युगाच्या पद्धतीचे काही ठळक फायदे आहेत.
पुर्वी स्त्री वर्गाला बहुतांशी कामातच गुंतुन पडावे लागत असे ते आता राहिले नाही, आता स्त्री वर्गही ह्या सणात भाग घेऊ शकतो व इतर पुरुषवर्गासारखेच 'सुखाचा उपभोग घेऊ शकतो.
दिवाळी आता केवळ गोडाचे किंवा चमचमीत खाणे ह्यापुरती मर्दादित न राहता लोक ह्या काळात इतरही चांगल्या गोष्टी करतात, दिवाळी पहाट, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन केली जाणारी रोषणाई आणि जल्लोशाने साजरा केला जाणारा सण वगैरे चांगल्याच बाबी ह्या सणात अॅड झाल्या आहेत ना.
आता लोक ह्यापुढेही जाऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणुन मनापासुन समाजातल्या 'नाही रे' वर्गाला, अनाथ मुलांना आणि इतर तत्सम वर्गालाही फराळ, भेटवस्तु वगैरे देऊन त्यांचीही दिवाळी 'रोशन' होण्यात मदत करत आहेत हे उत्तमच आहे की.
असो, थोडक्यात सांगायचे तर सण किंवा उत्सव हे पुर्वी काय केले जायचे व त्या पद्धतीत आता काय फरक पडला ह्यावर न तोलता त्यातुन मिळणार्या मानसिक समाधानाच्या हिशेबात तोलले जावे असे वाटते, बहुतांशी ते समाधान पुर्वीइतकेच असते, अर्थात ते ही मानण्यावर आणि समजुन घेण्यावर आहे हे आहेच.
- छोटा डॉन
1 Nov 2011 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंड्याची आधुनिक पद्धतीने दिवाळी साजरा करण्याची पद्धत काही काही वाईट नाही. एकीकडे पारंपरिक सण हवे आहेत आणि त्याच्याबरोबर अधिकाधिक आधुनिकताही आजच्या पिढीला हवी आहे. पहिल्या बंड्याची दिवाळी समजली आणि दुसर्या बंड्याने (छोडॉ) अशा दिवाळीची योग्य अशी मांडणी केली आहे. :)
-दिलीप बिरुटे
1 Nov 2011 - 11:47 am | अरुंधती
छो डॉन यांनी शहरांतील तरुणांच्या मानसिकतेचे व आधुनिक स्वरूपातील दिवाळीचे उत्तम विश्लेषण केले आहे!
आणि माझ्या पाहण्यातील अनेक विवाहित तरुण तरुणी अशा आधुनिक दिवाळीबरोबरच वर म्हटल्याप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणुन मनापासुन समाजातल्या 'नाही रे' वर्गाला, अनाथ मुलांना आणि इतर तत्सम वर्गाला मदत करत त्यांचीही दिवाळी आनंदी करण्यास हातभार लावत आहेत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :)
1 Nov 2011 - 12:12 pm | मन१
प्रचंड सहमत.
बंड्या बनू लागलेला
1 Nov 2011 - 10:57 am | वपाडाव
मस्तच !!
पण कुठे झुकावं हे कळत नाहीये....
म्हणजे ह्या सर्व बदलत जाणार्या गोष्टींकडे का मायबापाच्या पारंपारिकतेकडे ?????
- (लौकर वुत्तर मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेला) वपाडाव...
दिल हि दिल मे - एकदा या बंड्यासारखी दिवाळी साजरी करुन बघतो, आली मजा तर ठीक आहे नायतर हाकानाका....
पैले पाढे पंचावन्न
1 Nov 2011 - 11:57 am | अरुंधती
तुम्ही म्हणताय तसं... कुठं झुकावं यासाठी मनाचा कौल विचारावा ....
जे आपल्या मनाला पटतंय ते करावं, ते करताना कसलाही अपराधी भाव किंवा संस्कृती/ परंपरा/ आधुनिक बदल इ. इ. चे दडपण बाळगायची गरज नाही. दिवाळी हा कुटुंबाचा सण आहे. एरवी शाळा-कॉलेजे-नोकरीमुळे फारशा सुट्ट्या नसतात किंवा त्या एकमेकांबरोबर घालवता येत नाहीत. पण दिवाळीत मुले, नवरा-बायको एकत्रितपणे सुट्ट्या साजर्या करू शकतात. आप्तस्वकीयांच्या, स्नेही सुहृदांच्या भेटीगाठी, मनोरंजन, प्रवास, आनंद साजरा करणे या गोष्टी महत्त्वाच्या. पुढे हेच आनंदाचे क्षण लक्षात राहतात.
परंपरा बदलत राहतात. त्या कितपत जोपासायच्या आणि कोणत्या नव्या परंपरा सुरु करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न! :)
1 Nov 2011 - 7:47 pm | रेवती
डॉनचा प्रतिसाद आवडला.
त्यात सोय म्हणून स्विकारलेल्या गोष्टी पटतात तरीही सणावारी ट्रीपला जाणे हे मला अजूनही पटत नाही.
एकूण काय तर पूर्वीही प्रत्येकजण आपल्याला परवडेल अशी दिवाळी करत होता आणि आज रुचेल अशी दिवाळी साजरी होताना दिसते. राहिली गोष्ट नातेवाईकांना भेटण्याची!
पूर्वी लग्नकार्यात व्हायच्या भेटी रजेच्या प्रश्नामुळे (किंवा परदेशी असल्याने) कमी होत चालल्यात. दिवाळी गेटटुगेदर नावाचे प्रकरण फक्त मित्रमंडळीत नाही तर नातेवाईकांमध्येही सुरु झाले आहे, अगदी हॉल भाड्याने घेऊन वगैरे. भेटी तश्याही कमी झाल्याने गप्पांचे विषय आटत चाललेत. नातेवाईकांनी एकमेकांची उणीदुणी काढणे आणि ती मनाला लावून घेण्याचे दिवस कधीच सरले इतकी आयुष्ये बिझी होऊन गेलेली आहेत. आमचा अनुभव तर सातत्याने असा आहे की थोडावेळ येतात, जेवतात, कसे आहात, आम्ही निघतो. भाड्याने घेतलेल्या हॉलचा पूर्णवेळ (चार सहा तासही) उपयोग होत नाही. म्हणून गाण्याचे कार्यक्रम ठेवायचेत तर बाहेर मैफिली असतातच! त्यावरून असे वाटते की सोय म्हणून स्विकारलेल्या गोष्टीही अतिसोयीमुळे आपले उद्देश पूर्ण करू शकत नाहीत. दिवाळी किंवा कोणताही समारंभ आपापल्या सोयीने, बजेटप्रमाणे कमीजास्त होईल पण काही गोष्टी ठरवून झाल्याच पाहिजेत अशी प्रेमळ सक्ती प्रत्येकाने आपल्यासाठी करायला हवी तर परंपरा नव्या स्वरूपात जपणे सोपे जाईल.
1 Nov 2011 - 10:28 pm | चतुरंग
केवळ दिवाळीच असे नव्हे तर एकूणच बदलत्या परंपरांवरती भाष्य आहे. सगळ्या सण समारंभातला आणि परंपरांमधला मुख्य धागा माझ्यामते माणूस आहे. आपली माणसे जोडायला, ह्यात नातेवाईक आणि मित्रपरिवार असे सगळे आले, आणि ते संबंध निभावायला असे प्रसंग उपयोगी पडतात आणि हेच त्यातले मुख्य सूत्र राहायला हवे. मग साजरे करण्याचे मार्ग आणि पद्धती वेगवेगळ्या असेनातका किंबहुना काळाबरोबर त्या तशा असणारच आहेत.
आज पैसा टाकून हवे ते हवे तेव्हा मिळते त्यामुळे सोय झाली आणि गोष्टींचं अप्रूप राहिलं नाही हे जरी बरोबर असलं तरी मला असं वाटतं की काही गोष्टींचं अप्रूप राहायला हवं. त्याशिवाय त्या गोष्टींबद्दल असोशी राहत नाही. माणसाला सतत कशाचीतरी ओढ असते आणि ही ओढ हा आयुष्य जिवंत जगण्याचा मार्ग असतो. त्या ओढीनं आपण पुढे जात राहतो. थोडं कष्टानं, मेहनतीनं, सगळ्यांनी मिळून असं करण्यानं सामाजिक ऊर्जेचं चलनवलन होतं आणि आपण ताजेतवाने होतो. मुलांना सतत खेळणी आणून दिलीत, सारखे नवीन कपडे आणून दिलेत तर ती नंतर नंतर त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत कारण त्याची असोशी संपलेली असते, हे तर मिळणारच आहे ही गृहित भावना त्यात आलेली असते. आपलंही तसंच होतं. एकदा गोष्टी कधीही मिळतात म्हंटलं की त्यातला रस संपून जातो.
वेळाची सबब तर आपण सततच देऊ शकतो अशी परिस्थिती आपणच आणलेली आहे! पण खरंच इतकं आपलं वेळापत्रक व्यग्र असतं का हो? दिवाळी अचानक येते असंही नाही तुम्हाला वर्षभर आधी कालनिर्णय वरुन समजते. तुम्ही प्लॅन करु शकता ना? वर्षातले चार दिवस एका वेगळ्या प्रकारे साजरे करणं इतकं अवघड का जावं? बर्याचदा मला वाटतं हा एक सामूहिक आळस असतो. इतर सगळेच करत नाहीत मग आपण तरी का करा अशी एक पळवाट असते. तेव्हा इतर बंडू होत असतील तर होऊदेत तुम्हाला खंडूच राहायचे असले तर तुम्ही राहू शकता तेही तुम्हाला हवे आहे म्हणून! :)
(खंड्या) रंगा
2 Nov 2011 - 9:16 pm | अरुंधती
रेवती व चतुरंग, दोघांच्याही भाष्याला 'अगदी अगदी'!
आपल्याला ज्या गोष्टींचे अप्रूप आहे / होते तसे ते नव्या पिढीला असेलच असे नाही. त्यातूनही प्रयत्न करत राहायचे किंवा सांगायचे काम करायचे एवढे मोठ्यांच्या हाती असते. पण अंतिम निर्णय ज्याने त्याने स्वतःला काय वाटतंय ते पारखून घेतलेलाच चांगला!
(अगदी सहज जाता जाता आठवलेले उदाहरण म्हणजे मी लहान असताना साधी रावळगावची गोळ्या-चॉकलेटं, जेम्सच्या गोळ्या किंवा क्रीमची बिस्किटं म्हणजेही चैन / चंगळ वाटायची. वर्षातून कधीतरीच, तेही खास प्रसंगांना ते मिळायचं. जसे वाढदिवस, चांगले गुण मिळाले म्हणून बक्षीस इ. इ.
आज माझ्या मित्रमैत्रिणींची मुलं चॉकलेट, आईसक्रीमला इतकी सरावली आहेत की दर आठवड्याला / रोजच्या आहारात त्यांचा समावेश झालाय. बरं आईवडिलांनी चॉकलेट दिलं नाही तरी बाहेर, नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे हा खुराक चालू असतोच! त्यातून जाहिरातींमुळे ती अधिकच चोखंदळ होतात. त्यांच्या आईवडिलांच्या डोक्याला हा आता नवा भुंगा असतो. मुलं एकमेकांशी चॉकलेटचं बार्टरिंग करतात.... पर्क, जेम्स, इक्लेअर, डेअरीमिल्कच्या पैजा लावतात. त्यालाही बंदी केली तर पॉकेटमनीतून घेतात. एवं च काय.... तुम्ही त्यांना सांगून समजावून धाक दाखवून, बळजबरी करून एका ठराविक मर्यादेपर्यंत उपयोग होतो. परंतु शेवटी त्यांना तसे पटल्याशिवाय उपयोग नाही.)
2 Nov 2011 - 9:24 pm | पैसा
प्रत्येकजण कधी बंडू तर कधी खंडू होतोच! जेव्हा जे कमी त्रासाचं आणि जास्त आनंद देणारं असेल ते करावं. बंडूलासुद्धा हा प्रघात नवा आहे तोपर्यंत मजा येईल. २/३ वर्षानी तेच रुटीन झालं की तो आपसूकच परत खंडू होईल. एकूणात काय, सगळंच "जुनं ते सोनं" जरी नसलं तरी सगळंच "नवं ते हवं" म्हणायचीही दर वेळेला जरूर नसते.
(गेल्या वर्षीची खंडी आणि या वर्षीची बंडी)
2 Nov 2011 - 9:26 pm | अतुल पाटील
लेख आवडला.