पॉप टेट्स ही व्यक्ती म्हणजे माझ्या माहितीनुसार "आर्चीस" कॉमिक्समधल्या पोरापोरींच्या टोळक्याचा अड्डा असलेलं जे आवडतं रेस्टॉरंट असतं त्याचा मालक.
"जगहेड" हे त्याचं बर्यापैकी खाबू गिर्हाईक. बस्स. पॉप टेट्सविषयी इतकी माहिती मला मिळाली आहे. पण हे नाव धारण करुन मुंबईत खूप ठिकाणी पॉप टेट्स "अनरेस्टॉरंट्स"ची मालिका उभी राहात आहे.
मिपावर खादाडीच्या ठिकाणांविषयी शेकडो धागे आलेले आहेत. त्यातले अनेक धागे आणि त्यांच्यावर आलेल्या प्रतिक्रिया या गावोगावच्या मिसळीच्या टपर्या, वडापाव अशा रोडसाईड चविट्ट पदार्थांपासून ते उत्तमोत्तम हाटेलांपर्यंत सर्वकाही वर्णन करुन सांगणार्या आहेत. त्यातून अनेक नवीनवी ठिकाणं कळून कोणत्याही गावात गेलं तरी पोटभरीचं एखादं झकास ठिकाण शोधणं शक्य झालं आहे. हा एक खजिनाच आहे.
आता अशात अजून एका ठिकाणाविषयी लिहून भर घालावी का अशा विचारात हे लिहिणं लांबणीवर पडायला लागलं. तरीही आपल्याला रसपूर्ण वाटलेली एखादी खादाडीची जागा मिपामित्रांसोबत शेअर करावीच या भावनेने उचल खाल्ली आणि हे लिहायला बसलो. "गविंकडून असल्या धाग्याची अपेक्षा नव्हती" वगैरे प्रतिक्रियात्मक जोखमी घेऊन आता मात्र थोडक्यात मुद्द्याचं लिहायला सुरुवात करतो.
ठाण्याच्या कोरम मॉलमधे काही दिवसांपासून "पॉप टेट्स इज प्रेग्नंट" असे अत्रंग फलक झळकताना बघूनच या "अनरेस्टॉरंट"चं वैचित्र्य जाणवायला सुरुवात झाली होती. एकदाची "डिलिव्हरी" झाली आणि ठाण्यात पॉप टेट्स सुरु झालं. खादाड अमिताताई या आमच्या खादाडीक्षेत्रातल्या गुरु आहेत आणि त्यांनी रेकमेंड केलेलं प्रत्येक ठिकाण अफलातूनच असतं असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पॉप टेट्सची शिफारस त्यांच्याकडून आल्यावर मी अन्य ठिकाणचं पॉप टेट्स तिथे भेट देऊन टेस्ट केलं होतं आणि बेहद्द खूष झालो होतो. आता तर काय माझ्या गावातच पॉप टेट्स निघालं...
मग मी तिथे भेट देणं अपरिहार्यच होतं.
साधारण कुलाब्याचं कॅफे माँडेगार किंवा पुण्याच्या कॅम्पातलं थाउजंड ओक्सची आठवण व्हावी असा माहोल दिसला.
इथे संध्याकाळी चार ते सात हॅपी अवर्स आहेत आणि त्यात एकावर एक ड्रिंक फ्री किंवा अशा अनेक मजामजा आहेत. एकूण पिण्याची चंगळ आहे त्या काळात असं माहिती वाचून दिसलं.
बाहेरच्या बाजूला ओपन एअर नॉन एसी भाग आहे आणि आत एसी.
आतल्या भागात भिंती जुन्या हॉलीवूड पिक्चर्सच्या पोस्टरनी सजलेल्या दिसल्या.
मेन्यूकार्डससुद्धा हॉलीवूडच्या थीमचंच..
मेनू भरपूर व्हरायटीयुक्त दिसला. कधीही न खाल्लेले बरेच आयटेम्स इथे दिसत होते.
म्हणजे नुसत्या फिशचंच पाहू.
-पेपर ब्लास्टेड स्पायसी फिश
-फिश अफ्रिकानो (रेड सॉसमधला मासा)
-ग्रिल्ड फिश स्पायसी पेस्टो
-पॉम्फ्रेट स्टर फ्राईड इन चिली गार्लिक
-टॉस्ड थाई फिश
-ग्रिल्ड प्रॉन्स
-
आणि असेच भरपूर काही
बाकी फिश फिंगर्स आणि स्टँडर्ड माश्याचे आयटेम होतेच.
चिकन घेऊ म्हणावं तरः
-गार्लिक पेपर चिकन
-चिकन शास्टीक (उच्चारातली चूभूदेघे)
-ग्रिल्ड चिकनचे पाचसहा वेगळे प्रकार (मेक्सी ग्रिल्ड चिकन, स्मोकी बार्बेक्यू सॉस, मशरूम सॉस आणि अनेक फ्लेवर्स)
-चिकन टिक्का
-चिकन स्टीक सिझलर्स
-चिकन नगेट्स
-चिकन मारिआंगो
-विंग्ज ऑफ फायर
-लॉलीपॉप
-कंट्री चिकन विंग्ज
-सिमर्ड चिकन विथ ब्रँबल सॉस..
तशा याहून खूप जास्त डिशेस मेनूत होत्या. पण मी सगळ्या इथे लिहू शकत नाही. एकूण मेनू खूपच आनंददायक होता..
पॉप टेट्सच्या अन्य एका आउटलेटमधे बियर बॅटर्ड प्रॉन्स नावाचा "ऑफ द मेनू" पदार्थ खास रिक्वेस्टने मिळतो. इथे मात्र तो अजून उपलब्ध झाला नव्हता.
मग दीर्घ श्वास घेऊन ऑर्डरींना प्रारंभ केला. मद्याबाबत इथे काही नाही असं म्हणायला जागाच नव्हती. कॉकटेल्स, बिअर्स, वाईन्स, वेगवेगळे अनवट ब्रँड्स..फारच इंप्रेस झालो..
पहिल्यांदा सोकाजीरावांचे स्मरण करुन मोहितो कॉकटेल आणि "थ्री जी" नावाचं मॉकटेल मागवलं. थ्री जी मधे "जी"ने सुरु होणारी तीन फळं रसरूपात होती. मोहितोविषयी सांगणे नलगे.
मोहितो आणि थ्री-जी..
त्यासोबत चावायला म्हणून क्रिस्पी फ्राईड चीज बॉल्स मागवले. प्रकार अत्यंत टेस्टदार होता. विशेषतः चीज बॉल्स किंवा कसलेही कबाब म्हणून कच्चट पिठूळ खायची अनेक ठिकाणी सवय आहे. इथे मात्र अगदी खुसखुशीत आणि खमंग चीज बॉल्स होते ही खास उल्लेखनीय बाब. यासोबत कसलंतरी अफलातून सॉसही होतं..
क्रिस्पी चीज बॉल्स
मग तेवढे कमी पडतील म्हणून चकण्यात अॅडिशन केली. बटर गार्लिक स्क्विड ऊर्फ म्हाकुळ मागवले. स्क्विडही चकणा म्हणून झकास लागत होते.
कोणत्याही नव्या ठिकाणी गेलं की तिथला लाँग आयलंड आईस टी मागवून पहायचाच अशी परंपरा मी ठेवली आहे. तिला जागून एक लंबबेट चहा हे कॉकटेल आले. (यात चहा नसतोच म्हणे..)
त्यासोबत पुन्हा काहीतरी चकणा हवा म्हणून मग गार्लिक ब्रेड मागवला..गार्लिक ब्रेड तर सगळीकडे मिळणारा इतका कॉमन पदार्थ. पण तोही इथे तब्ब्येतीने आणि नजाकतीने बनवला होता. अशातूनच क्वालिटी क्वालिटी काय म्हणतात ती कळते. अत्यंत ताजा लुसलुशीत ब्रेड आणि खरपूसही. कशात कंजुषी नाही..
मी सहसा भरपेट जेवणाचे आयटेम अशा "टेस्टिंग"च्या प्रसंगी मागवत नाही. कारण पोट एकदम फुल्ल होऊन जातं. पण तरीही एक सॅंपल चेक व्हायलाच हवा म्हणून रिसोतो मागवले.
काहीशी चीजमधे बनवलेली गव्हाची खीर कम खिचडी असावी तसा हा प्रकार लागत होता. पण चव मला फार म्हणजे फार आवडली. खादाड अमिताताईची रिसोतोची पाककृती पाहिल्यापासून हा प्रकार चाखण्याची इच्छा होती. ती पूर्ण तर झालीच पण "हा तर नुसता सुपात शिजवलेला भात" अशी हेटाळणीयुक्त समजूत मी मनात करुन घेतली होती ती सुखदरित्या दूर झाली. चविष्ट प्रकार होता.
रिसोत्तो
तरीही लाँग आयलंड टी उरला होता.. पोटाचा कौल घेतला आणि अजून काहीतरी मागायचं ठरवलं. फिश आफ्रिकानो आणि ग्रिल्ड फिश स्पायसी पेस्टो (किंवा पेस्तो) मधे द्वंद्व चालू होतं. शेवटी स्पायसी पेस्तोचा विजय होऊन ते समोर आलं. हा वेगळ्याच कसल्याशा मसाल्यात फ्राय केलेला मासा होता. लुसलुशीत आणि खुसखुशीत यांचं मस्त मिश्रण या प्रकारात होतं. असले अजून दोनतीन मासेही खाल्ले असते..
ग्रिल्ड फिश स्पायसी पेस्टो
माझ्या खाण्यातली व्हरायटी आणि आवाका बघून म्हणा किंवा काही अज्ञात कारणाने वेटरने मला उदार मनाने एक चॉकलेट मूस आणि आईसक्रीम पॉप टेट्सच्या वतीने चकटफु आणून दिलं.
चॉकलेट मूस.
चॉकलेट मूस यापूर्वी अनेकदा खाल्ली आहे पण ही मूस म्हणजे निव्वळ मोक्ष होता. तोंडात चमचाभरुन मूस विरघळताना डोळे आपोआप मिटले गेले. सुख सुख म्हणजे काय असा प्रश्न मिटतो असे काही दुर्मिळ क्षण असतात त्यातला हा एक...
कसलंसं आईसक्रीम..
याखेरीज इतरही डेझर्ट्सची रेलचेल होती. कॅरमेल कस्टर्ड हा प्रकार माझा वीक पॉईंट आहे. पण तो मागवण्याचं आता धाडस उरलं नव्हतं. ते पुढच्यावेळी नक्की असा मानसिक ठराव करुन जड उदराने उठलो.
जा.. अजून गेला नसाल तर जा पॉप टेट्समधे..एकदम १००% रेकमेंडेड... दोस्तलोकांना घेऊन "बसा" किंवा फॅमिलीला घेऊन जा. शक्यतो फक्त बायकोला किंवा गर्लफ्रेंडला.
अँबियन्स झकास आहे. मोठेमोठे टीव्ही स्क्रीन्स सगळीकडे आहेत. उत्कृष्ट साउंड सिस्टीमवर रिट्रो किंवा रॉक म्युझिक बर्यापैकी व्हॉल्यूममधे चालू असतं. पण थाउजंड ओक्स किंवा माँडेगारप्रमाणे बोलणंच अशक्य होईल इतक्या कानठळ्या नाहीत.. टेबल्सवर मजेदार मजकुराचे कागद मांडून ठेवलेले असतात. ऑर्डर द्यायची सोडून त्या कागदांवरचे पीजेज आणि धमाल जोक्स वाचत बसलेत असंही होतं बर्याच जणांबाबतीत.
बिलाचा अंदाज द्यायचा तर मी वर निर्दिष्ट केलेल्या सर्व पदार्थांचं मिळून पंधराशे बिल झालं.. अनेकजणांमधे मिळून बियरचा पिचर वगैरे मागवण्याची सोय दिसली. हॅपी अवर्समधे तर वसुली कराल तेवढी थोडी.
इथे मी सर्वांना एक विनंती करु इच्छितो. आपापल्या माहितीतली अशी आवडलेली रेस्टॉरंट्स सगळ्यांसोबत शेअर करा.. डीटेलवार मेनू आणि इतर माहिती शक्य नसली तर निदान आपल्या प्रतिक्रियेमधे त्या ठिकाणांचं नाव आणि पत्ता तरी द्या..
बाय द वे.. जाता जाता.. मी गेला बराच काळ कडक डाएटवर होतो. लठ्ठपणा आणि आरोग्यविषयक अनेक भीती पाठीशी लागल्या होत्या. नीरस खाऊन खाऊन क्लिनिकल डिप्रेशन म्हणावं असा प्रकार चालू होता.
पॉप टेट्समधे मी व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडलेला दारुडा रिलॅप्स होतो तसा रिलॅप्स झालो. मनात अपराधीपणा फणा काढायला लागण्याच्या तीव्र क्षणी पॉप टेट्सबाहेर असलेला हा बोर्ड बघितला आणि खुदकन हसलो..
हाय.. काय सुंदर व्यसनीपणा आहे हा..
प्रतिक्रिया
12 Sep 2011 - 1:32 pm | गणपा
बाबौ..
नुसते फोटु पाहुनच वाचा बसली आहे.
12 Sep 2011 - 1:33 pm | नंदन
छान माहिती दिलीत, गवि. पुढच्या फेरीत नक्की ट्राय करेन.
(समव्यसनी) :)
12 Sep 2011 - 1:35 pm | छोटा डॉन
गवि, तुम्ही हा लेख लिहला नसता तरीही चालले असते असे आमचे स्पष्ट मत आहे.
बाकी ठिक.
फोटो बघवले नाहीत आणि वर्णन तर अजिबात वाचू वाटले नाही.
तरीही ठिकच.
एवढे तुम्ही बसल्या बैठकीत खाल्ले/ पिले म्हणजे थोरच झाले.
ठिकच ठिक असेल नै.
- छोटा डॉन
12 Sep 2011 - 2:15 pm | आदिजोशी
आपल्या पार्ट्या विसरला का बे इतक्यात? आणि तू नसताना धम्या नी अभ्या ने घातलेला गोंधळ? निर्मयीने २ दिवस खपून बनवलेले जेवण ह्या दोघांनी अर्ध्या तासात संपवले. आणि तरी चेहर्यावर 'नाश्ता झाला, आता जेवण येऊ द्या' असे भाव होतेच.
12 Sep 2011 - 1:36 pm | मृत्युन्जय
गविंकडुन असल्या धाग्यांची अपेक्षा नव्हती ;)
जोक्स अपार्ट. हा लेखन प्रकार मिपावरती एक अॅडिशन होउ शकतो. ऑर्कुटवर पुर्वी एक पुणे इट आउट्स नावाची कम्युनिटी होती. तिथले रिव्ह्यु वाचुन वाचुन बरीच चांगली हाटेलं आणि तिथे मिळणारी खाद्यपदार्थ समजली होती. मिपावर टेस्ट बेसिस वर हा नविन लेखनप्रकार (पाकृ, जनातलं मनातलं, कलादालन, काथ्याकूट वगैरे सारखे) म्हणुन सुरु करायला हरकत नाही. मिपाचा हा एक यु एस पी सुद्धा होउ शकेल :)
बाकी ज्या क्याटेगरी बद्दल उपरोक्त परिच्छेदात लिहिले आहे त्या क्याटेगिरी साठी उत्कृष्ट लेख :)
12 Sep 2011 - 1:49 pm | गवि
हॉटेल/रेस्टॉरंट/ टपरी/ रोडसाईड ईटरीज यांसाठी वेगळा विभाग ही चांगली सूचना / कल्पना आहे. जनातलं मनातलं मधे लिहिण्यापेक्षा ते चांगलं..
अनेकदा नवीन गावी जावं लागतं आणि एखादी चांगली खाण्याची जागा माहीत असली की आनंद होतो.
कधीकधी अत्यंत वाईट रिपोर्ट आलेला असला की सावधगिरीची सूचनाही मिळते.
गणपतीपुळ्याच्या मंदिराला लागून असलेल्या शेडवजा हॉटेलांत अप्रतिम साबुदाणा खिचडी आणि मिसळ मिळते ही माहिती इथेच एका धाग्यावर कळली होती. आता प्रत्येक व्हिजिटमधे त्याच हॉटेलात जातो. एरव्ही असले काही कळणे कठीण..
12 Sep 2011 - 1:37 pm | मन१
चविष्ट माहिती!!
लेख वाचुनच किक बसायची शक्यता वाटते.
12 Sep 2011 - 1:37 pm | सुनील
कट्टा भरवायला ठाणेकरांना आणखी एक ठिकाण!
जाऊन बियरचा एक पिचर आणि जमतील तेवढे माशांचे प्रकार हादडायचा बेत आहे. (कोण येतय?)
12 Sep 2011 - 1:44 pm | आत्मशून्य
नूसते फटू बघूनही कालवाकालव होऊ रायली है, आज इनो पूरेसं ठरणारं नाही असं वाटतय.
12 Sep 2011 - 1:58 pm | स्पा
झकास लेखन...
पुढचा मिपा कट्टा इथे भरवायला हरकत नाही....
12 Sep 2011 - 2:02 pm | स्वैर परी
कुठे आहे म्हणालात हि जागा?
जुने मित्र मैत्रिणी भेटले कि कुठे जाउ बसायच आणि गप्पा मारायच्या हा प्रश्न पडतो. आता कदाचित पडणार नाही अस दिसतय. :)
12 Sep 2011 - 2:16 pm | आदिजोशी
१ नंबर जागा परिचय :)
12 Sep 2011 - 2:23 pm | रमताराम
जाता जाता.. मी गेला बराच काळ कडक डाएटवर होतो.
खो: खो: खो: तुमची खाण्याची लिष्ट बघता तुम्ही अजाबात या फंदात पडू नये असा अनाहुत सल्ला देतो. स्साला माणसाचा जन्म एकदा मिळतो. आयुष्यभर भात-वरण खात शंभर वर्षे जगण्यापेक्षा गात-खात-पीत ६० वर्षे जगलेले चांगले. 'आनंद' चित्रपटात आनंदच म्हणतो तसे 'ज़िंदगी बडी होनी चाहिये बाबूमोशाय, लंबी नही.'
लठ्ठपणा आणि आरोग्यविषयक अनेक भीती पाठीशी लागल्या होत्या. नीरस खाऊन खाऊन क्लिनिकल डिप्रेशन म्हणावं असा प्रकार चालू होता.
लठ्ठपाणाची समस्या नसली तरी सध्या याच अवस्थेतून जात असल्याने तुमच्या या लेखामुळे धीर आला. ('सॉलिस इन द क्राउड' का काय म्हणतात तसे) साधा गार्लिक ब्रेड किंवा चीज चिली टोस्ट खाऊन देखील युगं लोटली असं अलिकडे वाटू लागलं आहे. जातोच आता नि चांगले चापून येतो. या सार्याचे १५०० बिल म्हणजे मज्जा आहे.
13 Sep 2011 - 9:39 am | अर्धवट
>>गार्लिक ब्रेड किंवा चीज चिली टोस्ट खाऊन देखील युगं लोटली असं अलिकडे वाटू लागलं आहे.
या एकदा..
बाकी गवींनी हा लेख लिहिला नसता तर बरं झालं असतं.. ;)
13 Sep 2011 - 9:45 am | प्रभो
म्हातार्याला एकट्याला नेणार का रे अर्ध्या?
12 Sep 2011 - 2:31 pm | सुहास झेले
ठार मेलो फोटो बघून आणि वर्णन वाचून :)
तसं पॉप टेट्स.. जगहेडस् आवडती ठिकाण आहेत, हापिसातून डिस्काऊंट कुपन्स मिळायची. पण तिथे गेल्यावर मित्र खाण्यापेक्षा पिण्यावर जास्त जोर देतात. टॉवर्स, पिचर्स ;-)
12 Sep 2011 - 2:38 pm | मनराव
मस्तच......... !!!
12 Sep 2011 - 2:47 pm | यकु
पुढचा तंबू आम्ही या जागेच्या आसपास ठोकू अशी ग्वाही देतो!
:)
12 Sep 2011 - 3:05 pm | इष्टुर फाकडा
पॉप टेट्सचा नवैद्य गाविंना ठेवतो वाकून,
पॉप टेट्सचा नवैद्य गाविंना ठेवतो वाकून,
आणि गाविंच्या पोटाला साष्टांग करतो एक बिअर टाकून :D
12 Sep 2011 - 3:36 pm | शाहिर
आमच्या पुण्यात शाखा आहे का याम्ची ??
12 Sep 2011 - 3:41 pm | माझीही शॅम्पेन
जगहेडस् खुप आवडते ! पॉप टेट्स ट्रै करुन बघु !!!
लेख भन्नाट !!!
12 Sep 2011 - 4:18 pm | गवि
जगहेड्स आणि पॉप टेट्स एकच आहेत माझ्या मते. (पवईच्या जगहेड्सबद्दल बोलत असाल तर..)
12 Sep 2011 - 7:40 pm | माझीही शॅम्पेन
हो पवईच्या जगहेड्सबद्दल बोलत होतो , वाहवा जग-हेड म्हणजेच पॉप-टॅट असेल तर बहारच आहे.
..
पण कट्टा करायचा असेल तर पवईच जग-हेड खूपच आवाजी (नॉइस्सी) आहे (तसच पॉप-टॅट आहे का ?)
....
अजुन एक पवईच्या जग-हेड च्या आतल्या बाजूला एक पब् की डान्स फ्लॉर आहे इथे अस काही का :)?
12 Sep 2011 - 10:18 pm | सुहास झेले
यप्प... दोन्ही एकच :) :)
12 Sep 2011 - 4:03 pm | सोत्रि
गवि,
शोल्लिट ओळख करुन दिलीत पॉप टेट्सची. ठाण्यात नेमके कुठेशी येतो हा कोरम मॉल?
पुण्यात 'बांबु हाउस' मधे गेलात तर तिथला लाँग आयलंड आईस टी अजिबात मागवू नका ! मी तर म्हणतो लाँग आयलंड आईस टी सोडा तिथे कुठलेच कॉकटेल पिउ नका.
- (पॉप टेट्सने पुण्यातही बाळंत व्हावे अशी इच्छा असलेला ) सोकाजी
12 Sep 2011 - 4:12 pm | किसन शिंदे
मला पॉप टेट्स(हे पॉप टेट्स मुलूंड मधल्या आर मॉलच्या तिसर्या फ्लोअरला आहे) आठवतं ते तिथे नेहमी होणार्या हुच्चभ्रुमधल्या राड्यासाठी...त्यातलीच एक कायम स्मरणात राहणारी म्हणजे, २००६ च्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनल दरम्यान जर्मनी आणी इटलीच्या दोन समर्थकादरम्यान जोरदार धुमश्चक्री झालेली, आणी ते प्रकरण पार खिशातून पिस्तुल काढून रोखुन धरण्यापर्यंत गेलेलं.
12 Sep 2011 - 4:17 pm | गवि
असू शकेल. पण ते पॉप टेट्सचे कॅरेक्टर नक्कीच नव्हे. तसे तर लीओपोल्डमधे अतिरेक्यांचा गोळीबार झाला होता आणि ताज आख्खे त्यांनी वेठीस धरले होते.
मुलुंड पॉप टेट्सचाही मला तरी चांगलाच अनुभव आहे.
12 Sep 2011 - 4:19 pm | स्पा
पॉप टेट्स,सब वे वेग्रे प्रकरण हुच्चभृ साठीच असतात शिंद्या :)
--(मटार उसळ आणि शिकरण खाणारा) स्पा
12 Sep 2011 - 4:31 pm | गवि
स्पावड्या.. आपले मुनमून, मामलेदार, आमंत्रण, सत्कार, सन्मान, गजानन वगैरे नेहमीचे यशस्वी आहेतच रे.
पण उच्चभ्रूंसाठी असलेले असा शिक्का बसलेली सर्वच ठिकाणे टेस्टवाईज बेक्कार असतात असे नव्हे हे नक्की. म्हणून अशा ठिकाणांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न.. :)
12 Sep 2011 - 4:34 pm | स्पा
पण उच्चभ्रूंसाठी असलेले असा शिक्का बसलेली सर्वच ठिकाणे टेस्टवाईज बेक्कार असतात असे नव्हे हे नक्की. म्हणून अशा ठिकाणांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न..
प्रश्नच नाही .
उलट हटके taste असल्यानेच असे ब्रांड फेमस झालेले असतात .
(गविंकडून पार्टीच्या प्रतीक्षेत असलेला) स्पा
12 Sep 2011 - 4:27 pm | सहज
याला नेमके काय म्हणायचे कॅफे? ब्रिस्टो? पब? जाणकारांनी खुलासा करावा.
(फाईन डायनिंगप्रेमी) सहज
हे कोणाच्या मालकीचे आहे? कोणी सुरु केले मुंबईत?
(गणपा'ज या चेन रेस्टॉरंटस मधील एकतरी आपले असावे अशी मनोमन इच्छा असलेला) सहज
12 Sep 2011 - 4:33 pm | पियुशा
सही हो गवि भाऊ :)
12 Sep 2011 - 4:34 pm | ५० फक्त
स्पावड्या पुढचा कट्टा इथंच करा मी येतोच नक्की,
12 Sep 2011 - 4:44 pm | इरसाल
गविनी फारच उत्तम काम केले.सगळे फोटो पाहून लाळ सुकून गेल्यासारखे वाटत आहे.
माझ्याकडून काही भर.
१.पिंड बलुची : टिपिकल पंजाबी जेवणासाठी वेज/नॉनवेज दोहोंसाठी. पत्ता: लेझर व्ह्याली पार्क, ३२ माईल स्टोन च्या विरुद्ध बाजूला, गुडगाव.
२.हॉटेल राजदरबार : धाबा सदृश्य. तंदुरीसाठी प्रसिद्ध. पत्ता: सेक्टर १५ गुडगाव.
३.करीम्स : मुघलाई पदार्थ (कोणताही, तोही साजूक तूप आणि चांदीच्या भांड्यात बनवलेला) पत्ता: जामा मस्जिद गेट ३ समोर , दिल्ली.
४.राजेंद्र दा धाबा.: अप्रतिम नॉनवेज कबाब साठी : फक्त प्याकिंग किंवा मग रस्त्यावर उभे राहून खा. पत्ता: हौज खास. दिल्ली.
५.आंध्र भवन : चेट्टीनाड चिकन किंवा मटण, खास आन्ध्रीय चवीसाठी पत्ता: इंडिया गेट पासून पायी अंतरावर. दिल्ली
६.हॉटेल राजेंद्र : चिकन मसाला किंवा मटण मसाला साठी प्रसिद्ध पत्ता: जळगाव एस. टी.डेपो जवळ भजे गल्लीला लागून .
७.हॉटेल अजिंठा : वेज/नॉनवेज साठी. पत्ता: जळगाव आणि एनेमयु च्या टी पोइन्ट वर.
८.नाव विसरलो(नंतर सांगतो) : उत्कृष्ट काजुकरी आणि लाजवाब वेज साठी पत्ता: सोनगीरफाटा , सोनगीर, धुळे.
९.हवेली: पंजाबी वातावरणात पंजाबी जेवण, काही काळ जगाला विसराल. पत्ता: कुरुक्षेत्र, हरयाणा.
१०.विकास धाबा: कोणत्याही प्रकारचा तंदुरी पराठा.आलू, गोभी,पनीर,पालक,प्याज,मुली,मसूर,मेथी,मिक्स वेज पत्ता: पानिपत जवळ चंडीगड रोड.
११.मूरथल धाबा : डाळ कोणकोणत्या प्रकारात बनू शकते आणि तीही इतकी चवदार. पत्ता: जी. टी. करनाल रोड मूरथल.
१२.राव हॉटेल : नॉर्थ इंडिअन जेवणासाठी, गेलात आणि जागा मिळाली असे कधीही होत नाही. भिवाडी/धारुहेडा,जयपूर रोड,राजस्थान.
१३.बोंडे हॉटेल : शेवभाजी किंवा मटण मसाला बस्स. सिजनला बामणोदचे वांगे भरीत आणि सोबत पोळ्या/पुऱ्या किंवा बाजरीची भाकरी/पुऱ्या. पत्ता: नाहाटा कोलेज चौफुलीवरून नागपूर हायवेवर ३/४ मी. ड्राइव.भुसावळ.
१४.निटु दा धाबा : महाराष्ट्रात असून मस्त पंजाबी जेवण देणारा. पत्ता: चांदवड पासून ३/४ किमी,चांदवड.
बाकीचे नंतर.
12 Sep 2011 - 7:45 pm | शाहिर
टीव्र णिषेढ
12 Sep 2011 - 4:57 pm | रेवती
गवी श्टाइल लेखन आवडले.
तिथे जावेसे मात्र वाटले नाही.
12 Sep 2011 - 5:23 pm | चित्रा
छान ठिकाण दिसते आहे. पण याला "अनरेस्टॉरंट" का म्हणायचे बरे?
गार्लिक ब्रेड भयंकरच क्यालरीवाला दिसतो आहे.
स्पायसी पेस्तो वाले ग्रिल्ड फिश आवडले. पेस्तोमध्ये भारतीय चवीला साजेसे बदल केलेले दिसतात.
वरील सर्वाला १५०० रू म्हणजे महाग का स्वस्त? हल्ली याची कल्पना येत नाही म्हणून विचारते आहे. ३० डॉ. मध्ये आमच्याकडे यातील बहुदा दोन एक गोष्टी येतील.
12 Sep 2011 - 6:01 pm | रेवती
सहमत आहे.
भयंकरच क्यालरीवाला
असेच वाटले.
मागल्या अठवड्यात मी व्हेजी रिसोतो खाल्ला आणि एक पूर्ण दिवस भूक लागली नाही.
13 Sep 2011 - 12:33 am | शिल्पा ब
बहुतेक भरपुर वजन वाढवणार्याच गोष्टी दिसताहेत. चाकलेट मुस, गार्लिक ब्रेड इ. आधी मला तो गार्लिक ब्रेड आहे हेच समजले नाही.
बाकी लेख छान. फोटो छान. कधीतरी जायला आवडेल.
<<स्पायसी पेस्तो वाले ग्रिल्ड फिश आवडले
हेच म्हणेन.
12 Sep 2011 - 6:51 pm | प्रभो
पॉप टेट्स म्हणजे आमच्यासाठी बियर + फ्रेंच फ्राईस बस्स.... बाकी खातंय कोण?
12 Sep 2011 - 8:17 pm | प्रचेतस
गवि रॉक्स.
ओ गवि, एकदा खरच पुण्याला या, शाजीचं च्यालेंज घ्यायला.
12 Sep 2011 - 8:42 pm | सूड
अच्छाऽऽ, म्हणून त्यादिवशी ब्लु कोरलमध्ये तेलकट खात नव्हतात होय !! ( ह घ्या हो.)
लेखन आवडलं. ;)
12 Sep 2011 - 8:59 pm | गणेशा
अप्रतिम ....
12 Sep 2011 - 10:11 pm | कुंदन
महागडे असेल नै ?
13 Sep 2011 - 8:00 am | नगरीनिरंजन
गविंचा आवाका, रेंज आणि आवड पाहून त्यांच्याबद्दलचा आदर किमान पंचगुणित झाला आहे!
अजून अशीच नवनवीन पाणवठ्या-खानावळींची माहिती आल्यास बहार येईल.
13 Sep 2011 - 9:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गविंकडून असल्याच इनोच्या एजन्सी टाईप धाग्याची अपेक्षा होती. ;-)
दोन प्रश्न आहेत, तिथे धूम्रपानाबद्दल काय पॉलिसी आहे? अशा ठिकाणी बर्याचदा धुराचा त्रास होतो. दुसरा प्रश्न बॅकग्राऊंड संगीताबद्दल. अशा ठिकाणी फार जोरात गाणी लावतात आणि शेजारच्या माणसाशीही बोलताना केकाटावं लागतं. तुमचा काय अनुभव?
13 Sep 2011 - 10:03 am | गवि
पूर्णतः धूम्रपान बंदी आहे.
माशँच्या प्रतिसादात विचारल्याप्रमाणे डान्स फ्लोअरही दिसला नाही आणि नसावा. कोणत्याच पॉप टेट्समधे डान्सफ्लोअर नव्हता. रेस्टॉरंट सेटअपच दिसला.
आवाज पूर्णतः ऑडिबल पण एकमेकांशी बोलता येईल इतका. पण पूर्ण शांतता किंवा हलक्या आवाजात संगीत ऐकत जेवण्याची अपेक्षा नक्कीच ठेवू नये नक्कीच..
13 Sep 2011 - 12:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
एकदम रापचिक धागा आहे हा. आवडेश.
गवि, एकटेच गेला होतात का? (किंवा एकटेच का गेला होतात, एक फोन करायचा ना )
>>माझ्या खाण्यातली व्हरायटी आणि आवाका बघून म्हणा किंवा काही अज्ञात कारणाने वेटरने मला उदार मनाने एक चॉकलेट मूस आणि आईसक्रीम पॉप टेट्सच्या वतीने चकटफु आणून दिलं.
त्यांची पैज लागली असेल, इतके रिचवून पण तुम्ही अजून दोन डेझर्ट खाल का यावर ;-)
14 Sep 2011 - 6:22 am | स्पंदना
शेवटच खुदकन हसण वरच वाचता वाचता येणार टेंशन उतरुन गेल.
आमी सारी फॅमिली मिळुन सुद्धा (चौघे ) एव्हढ संपवु नाही शकणार. राहु दे उगा तुम्हाला कशाला नजर लावायची ना?
वर्णन फोटो सारच ऊत्तम हो भाउ !