विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा चालत ज्या झाडावर ते प्रेत लटकत होते तिथे तो गेला आणि झाडावरून प्रेत काढून ते खांद्यावर घेत तो चालू लागला. दहा-बारा पावले चालला नसेल तोच प्रेतात बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निग्रहाने विक्रम चालत राहिला. कसंबसं आपलं हसू आवरत वेताळ विक्रमाला म्हणाला, "विक्रमा, मला तुझं अत्यंतिक कौतुक वाटतं. ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही अशा गोष्टीत उठाठेव करण्याचा तुझा हा दुर्दम्य उत्साह खरोखरच कौतुकास पात्र आहे. आणि याचे कौतुक म्हणून तुला त्याबद्दल काहीतरी पारितोषिकही दिलेच पाहिजे. दुसरे काही नाही तर किमान तुझा श्रमभार हलका करण्यासाठी मी तुला अशाच उठाठेवी करणार्या एका समाजविशेषाची गोष्ट सांगतो. नीट कान देऊन ऐक."
विक्रमाने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
वेताळ गोष्ट सांगू लागला,
"सुजल सुफल म्हणवणारा एक देश होता. या देशात अनेक जातिधर्मपंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात असं म्हणण्याची पद्धत होती. खरं म्हणजे ते तसे राहातही होते पण त्या देशावर असलेल्या परकीय शक्तीच्या सत्ताकाळात दोन धर्मांमध्ये तेढ वाढवण्याचे काम परकीय राजसत्तेने मोठ्या कुशलतेने केले. त्यातला एक धर्म होता, त्या देशात अल्पसंख्येने असलेल्या लोकांचा अल्पसंख्य धर्म. त्याला आपण सोयीसाठी 'म' धर्म म्हणूया, आणि दुसरा होता त्या देशात बहुसंख्येने असलेल्या लोकांचा 'ब' धर्म. ब धर्म अत्यंत प्राचीन होता आणि त्याचे असे काही कडक नियम सद्यस्थितीत उरले नव्हते. या उलट म धर्माचे आपल्या अनुयायांसाठी अतिशय कठोर आचरणाचे नियम होते आणि ते नियम मोडल्यास अथवा धर्मचिन्हांचा अवमान होतोय असे वाटल्यास मृत्युदंडाचेही शासन करण्यास मागेपुढे पाहिले जात नसे. त्या धर्माच्या धर्मगुरुंचा लोकांवर असलेला वचक आणि नियंत्रण पाहून राज्यकर्तेही त्यांच्या विरोधात निर्णय घेण्यास कचरत असत आणि त्या देशात गणराज्य आल्यावर देशी राज्यकर्त्यांनी परकीय राज्यकर्त्यांचीच बहुतांश धोरणे पुढे राबवणे पसंत केले. का ते तुझ्यासारख्या राजनीतीच्या सूक्ष्म जाणकारास सांगण्याची गरज नाही.
म धर्माचे लोक त्या देशात अल्पसंख्य असले तरी जगात मात्र बर्याच संख्येने होते आणि बाहेरच्या काही देशांमध्ये म धर्माच्या तरुणांना धर्मयुद्ध करण्यासाठी त्याच धर्मातील काही लोकांकडून त्यांच्या फायद्यासाठी पद्धतशीरपणे भडकावले जात होते. अशा काही तरुणांनी भडकून जाऊन बराच रक्तपातही घडवला होता आणि त्या धर्मातल्या बहुसंख्य चांगल्या लोकांना अतिशय वाईट वाटेल असे वर्तन केले होते.
अशा परिस्थितीत त्या सुजल-सुफल देशातल्या आटपाट नगरीत एक तरुण आंतरजालावर एक संस्थळ चालवत असे. त्या देशातल्या तुझ्यासारख्याच स्वभावाच्या समाजविशेषाच्या भाषेत ते संस्थळ होते आणि त्या संस्थळाचे सभासद त्या देशाच्या समाजरचने प्रमाणेच बहुसंख्य ब धर्माचे आणि काही म धर्माचे होते. त्या देशात राहणारेच काय पण त्या देशात जन्मून परदेशात स्थायिक झालेलेही त्या संस्थळाचे सभासद होते. अशा या संस्थळावर अशा या परिस्थितीत एक विचित्र घटना घडली.
एका अज्ञात तरुणाने एके दिवशी त्या संस्थळाच्या कलादालनात एक चित्र चढवले. म धर्मातल्या परिस्थितीने उद्विग्न होऊन ते चित्र काढले असणार आणि तो तरुणही कदाचित म धर्मातला असावा असे वाटत होते पण ते इथे महत्वाचे नाही. त्या चित्रात रुक्ष अशा भूमीवर मानवी अवयवांचा सडा पडलेला दाखवला होता, विस्तीर्ण क्षितीजापर्यंत त्या अवयवांशिवाय काहीही नसलेल्या त्या जमिनीवर एक निष्पर्ण झाड मात्र होते आणि त्या झाडावर काही गिधाडे बसलेली दिसत होती. त्या जमिनीच्यावर आकाशात मात्र म धर्माच्या ध्वजासारखे भव्य चिन्ह दिसत होते आणि त्या चिन्हावर खाली झालेल्या कत्तलीमुळे रक्ताचे शिंतोडे उडलेले दिसत होते. काही लोकांच्या कृतीमुळे धर्म कसा बदनाम होतो हेच त्या तरुणाला दाखवायचे आहे हे स्पष्ट दिसत होते. चित्राची गुणवत्ता वादातीत होती आणि चित्र पाहणार्याच्या मनाला ते भिडल्याशिवाय राहात नसे.
असे हे चित्र संस्थळावर दिसल्यावर काही लोकांनी म धर्मात चाललेल्या प्रकाराबद्दल अत्यंत वाईट भाषेत टीका करणारे प्रतिसाद लिहीले, काहींनी संयमित भाषेत परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली तर काहींनी फक्त चित्राची समीक्षा करून त्यातले अधिक-उणे सांगितले.
असे हे चित्र संस्थळावर प्रकाशित होऊन बारा तास होत नाहीत तोच संस्थळचालक तरुणाला एक विरोप आला. त्या विरोपात म धर्मातल्या एका कुप्रसिद्ध संघटनेचे नाव होते आणि ते चित्र पुढील बारा तासात काढून टाकले नाही तर फार वाईट होईल अशी स्पष्ट धमकी होती.
संस्थळचालकाने तातडीने या विरोपाची माहिती आपल्या सभासदांना दिली आणि यावर काय कृती केली पाहिजे असा चर्चाप्रस्ताव टाकला.
आधी चित्रावर अत्यंत वाईट भाषेत प्रतिसाद देणार्या लोकांनी पुन्हा अत्यंत भडकावू भाषेत ते चित्र तिथून काढता कामा नये असे बजावून सांगितले, ज्या लोकांनी चित्रावर म धर्मातल्या परिस्थितीबद्दल संयमित चिंता व्यक्त केली होती त्यांनी 'चित्र काढले नाही पाहिजे पण पुरेशा संरक्षणाअभावी अथवा कोणत्याही आधाराशिवाय ते ठेवणे शक्य नसल्याने ते काढले जाईल' असे लिहीले. ज्या लोकांनी चित्राची समीक्षा केली होती ते मात्र तटस्थ राहिले आणि त्यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. एकूणच परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि कोतवालाशी चर्चा करून शेवटी साधारण पाच-सहा तासांनी ते चित्र त्या संस्थळावरून हटवण्यात आले." इतकं बोलून वेताळ थांबला आणि त्याने विक्रमाच्या प्रतिक्रियेचा अदमास घेतला. मान खाली घालून विचार करत काही न बोलता तो चालतो आहे हे पाहून वेताळ म्हणाला," हे नृपवरा, चर्चा प्रस्तावावर बहुतेकांनी चित्र काढले जाऊ नये अशा आशयाचा प्रतिसाद दिलेला असूनही चित्र का काढले गेले? चित्रसमीक्षकांनी मौन बाळगणे का पसंत केले? संयमी सभासदांनी नाइलाजाने चित्र काढावे लागेल असे का सुचवले? सगळे सभासद एकाच समाजविशेषाचे घटक असूनही त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या का?
या प्रश्नांची उत्तरे तू जाणत असूनही दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची सहस्त्र शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
विक्रमाने एक दीर्घ निश्वास सोडला आणि घसा खाकरून तो बोलू लागला,
"व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने प्रतिक्रिया वेगळ्या आल्या यात नवल ते काय? परंतु तू सांगितलेल्या माहितीवरून त्या सभासदांमध्ये तीन प्रमुख गट दिसतात. भडकावू भाषेत लिहीणारे प्रखर धर्माभिमानी लोक, संयमी लोक आणि निव्वळ चित्रसमीक्षा करणारे आणि धर्माधारित मुद्यांकडे दुर्लक्ष करणारे लोक. पैकी धर्माभिमानी लोक हे धर्माचे कट्टर अनुयायी आणि स्वघोषित रक्षणकर्ते असतात. यांच्या दृष्टीने धर्म हा नेहमीच संकटात असतो आणि दुसर्या धर्माच्या लोकांवर हल्ले करून आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे असे त्यांना वाटत असते. या लोकांच्या तेजस्वी भाषेमुळे आणि शेरास सव्वाशेर अशा प्रवृत्तीमुळे बर्याच लोकांना यांचे आकर्षण वाटते. परंतु सगळ्याच धर्मात असे लोक असल्याने त्यांच्यात फारसा फरक नसतो आणि या वृत्तीमुळे तेढ कमी होण्याऐवजी वाढतच जाते. या लोकांनी चित्रावर भडक भाषेत लिहीले कारण त्यांना ते निमित्तच हवे होते, दुसर्या धर्मावर शिंतोडे उडवण्याचे. चित्र काढून टाकायला त्यांनी विरोध केला त्याचे कारण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करणे हे नसून दुसर्या धर्माच्या लोकांना आपण घाबरू नये असे वाटणे होय. उद्या त्यांच्या विरोधात कोणी चित्र लावले तर ते अगदी दुसर्या धर्मातल्या लोकांसारखे वागतील यात काय संशय?
दुसरा गट, संयमी लोक, हे लोक खरोखर अल्पसंख्य असतात आणि या लोकांना खरोखर समभाव आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांची चाड असते. दोन्ही धर्मांना समान वागणूक दिली जावी असं त्यांना वाटत असतं. म्हणूनच त्यांनी चित्र काढले जाऊ नये अशी प्रतिक्रिया दिली. परंतु वास्तवाचे भान असल्याने आणि गणराज्यात कोणत्याही अल्पसंख्य, आक्रमक आणि एकगट्ठा समाजाला राज्यकर्ते दुखावणार नाहीत हे माहिती असल्याने ते चित्र काढले जाईल असे त्यांनी सुचवले. परंतु उद्या ब धर्मातल्या चिन्हांवर कोणी असे चित्र काढले तर त्या चित्रालाही ते नक्कीच विरोध करणार हे निश्चित. अभिव्यक्तिस्वातंत्र्य मारले गेलेच आहे तर किमान समभावतरी टिकवला जावा या साठी ते प्रयत्न करणार.
राहता राहिला तिसरा गट. या गटात उच्चविद्याविभूषित, सुखवस्तू आणि विद्वान लोक मोडतात. या लोकांना आपल्याकडे गुणग्राहकता, कलाप्रेम, व्यासंग इत्यादी वाखाणले गेलेले गुण असावेत असं मनापासून वाटत असतं आणि त्यासाठी ते विशेष प्रयत्नही करत असतात. आपण किती निरपेक्ष आणि न्यायबुद्धीचे आहोत हे स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी ते जात, धर्म, वर्ण आणि राजकारण यावर शक्यतो बोलायचे टाळतात, बोलले तरी ठाम भूमिका घेत नाहीत आणि घेतली तरी ती बर्याचदा अतिआदर्शवादी असते. स्वतःच्या गुणवाढीच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्वतःला हळूहळू इतर बहुजन समाजापेक्षा वेगळे समजायला लागतात, नेहमीच पोलिटिकली करेक्ट बोलायला लागतात आणि मग हळूहळू त्यांना समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या भावना कळणे बंद होते. सततच्या आदर्शतेच्या पाठपुराव्यामुळे हे लोक स्वतःच्या सद्य अस्तित्वाबद्दल समाधानी नसतात किंवा न्यूनगंड बाळगून असतात, त्यामुळे स्वतः ज्या परंपरेतून आले त्याचे रक्षण न्याय्य मार्गाने करण्याचेही विसरून जातात. उलट आपल्या परंपरेचा वगैरे कोणी अपमान केला तरी ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून त्यावर समीक्षा करू शकतात.
जेव्हा दुसरा आक्रमक गट अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आव्हान देतो तेव्हा यांच्यातही राज्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन लढण्याची शक्ति नसल्याने ते मूकपणे पाहणे पसंत करतात. परंतु उद्या कोणी ब धर्मावर असे चित्र टाकले तर हे लोक पुन्हा त्या चित्राची कलेच्या दृष्टीनेच समीक्षा करणार आणि यात समभावाचा खून होतोय हे सोयीस्करपणे विसरणार यात काय संशय?"
विक्रमाचे हे उत्तर ऐकून संतुष्ट झालेला वेताळ म्हणाला, " वा विक्रमा वा! तुझ्या विश्लेषणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! परंतु तू बोललास आणि मी निघालो. तरीही तू त्या समाजविशेषातल्या लोकांप्रमाणे नसती उठाठेव करत राहशील यात मला संदेह नाही."
इतके बोलून वेताळ प्रेतासह उडाला आणि पुन्हा स्मशानातल्या त्या झाडाच्या फांदीला जाऊन लटकू लागला.
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 5:56 pm | धमाल मुलगा
निर्या..निर्या..
अरे गप! गप की जरा. :)
13 Jun 2011 - 6:02 pm | नितिन थत्ते
सॅटायर चांगलं आहे.
वर वर्णन केलेला संस्थळावरील प्रसंग कोणता हे मात्र कळले नाही.
ब समाजातल्या भडकावू आणि सज्जन या दोहोंना आदरणीय असणार्या व्यक्तिमत्त्वावर अ समाजातली व्यक्ती काहीबाही लिहिते अशी कल्पना करून लिहिलेले लेखन ब समाजातील भडकावूंच्या दडपणाखाली संस्थळावरील सज्जनांना उडवावे लागल्याचे उदाहरण मात्र ठाऊक आहे.
13 Jun 2011 - 6:09 pm | छोटा डॉन
>>सॅटायर चांगलं आहे
+१, हेच म्हणतो.
बाकी <थत्तेचाचा मोड ऑन> गप्प रहायचे ठरवले आहे < /थत्तेचाचा मोड ऑफ >
- छोटा डॉन
13 Jun 2011 - 7:18 pm | नगरीनिरंजन
>>वर वर्णन केलेला संस्थळावरील प्रसंग कोणता हे मात्र कळले नाही
हा प्रसंग घडलेला नाही. घडणे अवघड नाही. पण चित्र काढून टाकायला १२ तासांची मुदत आणि चित्र काढून टाकल्यानंतरही संबंधितांच्या जीवाची हमी हे वास्तवात घडेल याची खात्री नसल्याने घडत नाही इतकेच.
13 Jun 2011 - 8:05 pm | नितिन थत्ते
>>हा प्रसंग घडलेला नाही. घडणे अवघड नाही.
म्हणजे 'अ' धर्माच्याच बाबतीत असे घडेल/घडू शकेल असे तुमचे कन्जेक्चर (पूर्वग्रह?) आहे.
परंतु ब गटातील सदस्यांकडून असे याच संस्थळावर घडल्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
13 Jun 2011 - 8:14 pm | नगरीनिरंजन
नाही. ब धर्माच्या बाबतीत जे घडले तेच आणि तेवढेच अ सॉरी म धर्माच्या बाबतीत घडेल याची खात्री नाही असे मला वाटते. तुम्हाला खात्री असेल तर मी तुमच्याकडे चित्र द्यायला तयार आहे. तुम्ही टाकून बघा.
13 Jun 2011 - 8:44 pm | नितिन थत्ते
ब गटाच्या बाबत प्रत्यक्ष घडलेली गोष्ट मी सांगतली आहे. मग अ गटाचे नाव मुद्दाम घेण्याची काय गरज?
ब गटाच्या ज्या व्यक्तीबाबत या संस्थळावर जे घडले (आणि त्याहून जास्त काही अ गटाच्या बाबत घडेल असे तुम्हाला वाटत आहे) ते त्याच व्यक्तीवरील लेखनाबाबत प्रत्यक्षात महाराष्ट्रात घडलेही आहे. आणि त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणार्यांना त्या हिंसक कृतीचे समर्थन करतानाच पाहिले आहे. त्यामुळे घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे दोन्हीकडे समानच प्रवृत्ती दिसत आहेत. काळे गोरे निवडायला फार वाव नाही.
13 Jun 2011 - 9:08 pm | नगरीनिरंजन
अगदी बरोबर. असे लोक दोन्हीकडे आहेत हे मीच लेखात नाही लिहीले का? प्रश्न काय होते त्याचा नसून, जे होते त्या बाबतीत सारखी भूमिका घेतली जाते की नाही याचा आहे. फरक धर्मांधतेत नाहीय हो, फरक आहे तो उच्च दर्जाच्या लोकांच्या वागण्यात. डेन्मार्कच्या पेपरात छापलेल्या चित्रांविरुद्ध झालेल्या उद्रेकावर जाहीरपणे टीका करणारा लेख लिहून त्यात त्या व्यंगचित्रांचे रसग्रहण करावे असे माझे इथल्या प्रत्येकाला आणि एकाच वेळी सगळ्यांना आव्हान आहे.
13 Jun 2011 - 9:39 pm | नितिन थत्ते
>>डेन्मार्कच्या पेपरात छापलेल्या चित्रांविरुद्ध झालेल्या उद्रेकावर जाहीरपणे टीका करणारा लेख लिहून त्यात त्या व्यंगचित्रांचे रसग्रहण करावे असे माझे इथल्या प्रत्येकाला आणि एकाच वेळी सगळ्यांना आव्हान आहे.
पण हे आव्हान तर ब गटाच्या देवांबाबत/व्यक्तीबाबतही तंतोतंत देता येईल. आणि त्याही उद्रेकाची उदाहरणे आहेत.
मग फरक आहेच कुठे?
13 Jun 2011 - 9:54 pm | नगरीनिरंजन
वा थत्तेचाचा वा! तो लक्ष्मीच्या चित्राच्या रसग्रहणाचा धागा अजून पहिल्याच पानावर आहे आणि त्यात त्या उद्रेकावर टीकाही आहे. आता तुम्हाला समभावाचा अर्थ सांगावा लागत असेल तर ते माझ्याच्याने यापुढे होणार नाही. माझ्या दृष्टीने हा विषय संपला. धन्यवाद!
13 Jun 2011 - 10:14 pm | नितिन थत्ते
धन्यवाद.
13 Jun 2011 - 6:07 pm | मृत्युन्जय
राहता राहिला तिसरा गट. या गटात उच्चविद्याविभूषित, सुखवस्तू आणि विद्वान लोक मोडतात. या लोकांना आपल्याकडे गुणग्राहकता, कलाप्रेम, व्यासंग इत्यादी वाखाणले गेलेले गुण असावेत असं मनापासून वाटत असतं आणि त्यासाठी ते विशेष प्रयत्नही करत असतात. आपण किती निरपेक्ष आणि न्यायबुद्धीचे आहोत हे स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी ते जात, धर्म, वर्ण आणि राजकारण यावर शक्यतो बोलायचे टाळतात, बोलले तरी ठाम भूमिका घेत नाहीत आणि घेतली तरी ती बर्याचदा अतिआदर्शवादी असते.
देवा पाय कुठेत रे तुझे? लिटर भर दूध वाहवे म्हणतो पायांवरुन.
13 Jun 2011 - 6:38 pm | मूकवाचक
हेच म्हणातो
13 Jun 2011 - 6:11 pm | अभिज्ञ
राहता राहिला तिसरा गट. या गटात उच्चविद्याविभूषित, सुखवस्तू आणि विद्वान लोक मोडतात. या लोकांना आपल्याकडे गुणग्राहकता, कलाप्रेम, व्यासंग इत्यादी वाखाणले गेलेले गुण असावेत असं मनापासून वाटत असतं आणि त्यासाठी ते विशेष प्रयत्नही करत असतात. आपण किती निरपेक्ष आणि न्यायबुद्धीचे आहोत हे स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी ते जात, धर्म, वर्ण आणि राजकारण यावर शक्यतो बोलायचे टाळतात, बोलले तरी ठाम भूमिका घेत नाहीत आणि घेतली तरी ती बर्याचदा अतिआदर्शवादी असते. स्वतःच्या गुणवाढीच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्वतःला हळूहळू इतर बहुजन समाजापेक्षा वेगळे समजायला लागतात, नेहमीच पोलिटिकली करेक्ट बोलायला लागतात आणि मग हळूहळू त्यांना समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या भावना कळणे बंद होते. सततच्या आदर्शतेच्या पाठपुराव्यामुळे हे लोक स्वतःच्या सद्य अस्तित्वाबद्दल समाधानी नसतात किंवा न्यूनगंड बाळगून असतात, त्यामुळे स्वतः ज्या परंपरेतून आले त्याचे रक्षण न्याय्य मार्गाने करण्याचेही विसरून जातात. उलट आपल्या परंपरेचा वगैरे कोणी अपमान केला तरी ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून त्यावर समीक्षा करू शकतात.
जेव्हा दुसरा आक्रमक गट अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आव्हान देतो तेव्हा यांच्यातही राज्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन लढण्याची शक्ति नसल्याने ते मूकपणे पाहणे पसंत करतात. परंतु उद्या कोणी ब धर्मावर असे चित्र टाकले तर हे लोक पुन्हा त्या चित्राची कलेच्या दृष्टीनेच समीक्षा करणार आणि यात समभावाचा खून होतोय हे सोयीस्करपणे विसरणार यात काय संशय?"
हा तर परिच्छेद सर्वात जास्त आवडला."विचारवंत" म्हणजे हिच लोक ना?
:)
अभिज्ञ.
13 Jun 2011 - 6:50 pm | चेतन
>>."विचारवंत" म्हणजे हिच लोक ना?
'वंत' नव्हे.... ;)
लेख ठीक अशीच दुसरी बाजुही लिहता येईल....
चेतन
14 Jun 2011 - 12:23 am | सांगलीचा भडंग
हेच म्हनतो
13 Jun 2011 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार
ननि __/\__
पण पालथ्या घड्यावर पाणी पडणार बघा.
13 Jun 2011 - 6:52 pm | तिमा
स्वतः त्रयस्थ, निरपेक्ष असल्याचे सोंग वठवून वेताळाने मोठ्या खुबीने त्या विवक्षित धर्माला 'अधर्म' म्हणून आपली सुप्त इच्छा पुरवली आहे.
13 Jun 2011 - 7:15 pm | नगरीनिरंजन
हे माझ्या लक्षात नव्हते आले. ध्यानात आणून दिल्याबद्दल आभार. स्वसंपादन करत आहे.
बरे झाले तुम्ही जोडून वाचून पाहिले. :)
अ धर्म हे अल्पसंख्य धर्मासाठी आणि ब धर्म हे बहुसंख्य धर्मासाठी होते. असो.
13 Jun 2011 - 6:55 pm | नीलकांत
हे सटायर आवडले. विशेषतः राहता राहिला तिसरा गट.
- नीलकांत
13 Jun 2011 - 7:35 pm | राजेश घासकडवी
जगाची तीन गटात सुबक, सोयीस्कर विभागणी करणाऱ्या विक्रमाकडे पाहून लिंडा गुडमनची आठवण आली. जगात तीन प्रकारचे लोक असतात, किंवा बारा प्रकारचे लोक असतात वगैरे म्हणणं हे राशीभविष्यापेक्षा फार उपयुक्त नाही.
पण मी देखील अशी गटवारी करण्याचा प्रयत्न करून बघतो. निरुपयोगीच गोष्टी करायच्या तर आपण का मागे रहावं?
१. गटवारीवर/गटबाजीवर मनातून विश्वास ठेवणारे. असे लोक अ व ब या लेबलांना फार महत्त्व देतात. किंबहुना जगातल्या सर्व घटनांकडे त्या काय आहेत हे पहाण्याऐवजी त्या कोणी केल्या व त्या करणाऱ्यावर कुठचं लेबल आहेत हे तपासून पाहून बघतात. अतिरेक्यांमध्ये अशा लोकांचा समावेश असतो. जातीभेद, वर्णव्यवस्था या संस्था असेच लोक सांभाळतात. ही स्त्री आहे, माता आहे असा विचार न करता, हिच्या कपाळावरचा शिक्का पुसला गेला आहे, तेव्हा हिने सती गेलं पाहिजे असं जोरकसपणे म्हणणारे गट १ मधलेच.
२. गटवारी चालवून घेणारे. हे प्रॅक्टिकल, प्रॅग्मॅटिक लोक. संख्येने सर्वाधिक. नाईलाजास्तव समाजवास्तव म्हणून गटबाजी चालवून घेतात. अ व ब यांच्या मर्यादा पाळतात. बऱ्याच जणांचा कल लिव्ह अॅंड लेट लिव्ह असा असतो. यांचा ओढा गट ३ कडे असला तरी, गट १ मधले लोक यांचा धिक्कार तरी करत नाहीत. कारण दुर्दैवाने गट १ मधल्यांना ते आपल्याच बाजूचे आहेत असं वाटत असतं. विक्रमासारखे सदाचरणी लोकमान्य राजे गट २ मध्ये असतात.
३. गटवारी न मानणारे. हे सर्व माणसांना समान मानतात. त्यामुळे अ विरुद्ध ब अशी भांडणं दोन्हींमधले गट १ मधील लोक करतात तेव्हा त्यांचा जीव तुटतो. अ असो की ब असो, माणूस म्हणून, कलाकार म्हणून काय कर्तृत्व आहे याकडे त्यांचं लक्ष केंद्रित असतं. गट १ मधले लोक यांचा धिक्कार करतात. गट २ मधल्यांना यांच्या भावना समजू शकतात. मात्र यांनी गट १ मधील लोकांच्या विचारांचं भान ठेवावं असं गट २ वाल्यांचं प्रामाणिक व प्रॅक्टिकल मत असतं. दुर्दैवाने हे संख्येने सर्वात कमी असतात. त्यांना आवाज उठवणं शक्य नसतं. पु. ल. देशपांडे वगैरे अपवाद - त्यांचं अधिकाााारच होतं की वो तसं...
जोपर्यंत गट २ मधले, गट १ वाल्यांची टिवटिव ऐकून घेतात तोपर्यंत या जगाचं काही खरं नाही.
13 Jun 2011 - 8:02 pm | नगरीनिरंजन
गट १ सगळीकडे असतो आणि गट २ त्यांचा सारखाच तिरस्कार करतो. पण गट ३ सर्वात ज्ञानी असूनही फावड्याला फावडं म्हणत नसेल तर या जगाचं काही खरं नाही. अशी चित्राची कल्पना सुचूनही ती प्रत्यक्षात आणण्याची भीती असल्यावर कलागुणांचेच महत्व वगैरे संकल्पनांना अर्थ काय राहतो?
बाकी जात, धर्म, वर्ण यांच्याएवढीच लेखातली गटवारी निरुपयोगी आहे हे मान्य.
13 Jun 2011 - 7:48 pm | शुचि
घासकडवी यांचा प्रतिसाद आवडला. हेच मनात येत होतं पण मांडता येत नव्हतं. नानाविध प्रकृतीच्या अमर्यादित लोकांचे इतक्या आत्मविश्वासाने मूठभर गट पाडणारे लोक पाहून मला न्यूनगंड येतो खरा.
लेखाची धाटणी - वेताळ-विक्रमादित्य आवडली.
13 Jun 2011 - 8:07 pm | अरुण मनोहर
>" वा निरंजना वा! तुझ्या विश्लेषणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! परंतु तू लिहीलेस आणि मी लॉग आऊटलो.><
---- भाषाळ .
13 Jun 2011 - 9:50 pm | आनंदयात्री
एक नंबर. फारच गंमतीशीर लेख झालाय. तिसर्या गटातल्यासारखे बनण्याचा प्रयत्न करणारापण एक गट असतो कारे ? 'लै भारी' नसणारे पण 'लै भारी' बनण्याचा जीपापाड प्रयत्न करणारे !!
13 Jun 2011 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साधारणतः अशातले काही लोकं स्नॉब असतात. लै भारी नसणारे, लै भारी बनण्याचा अयशस्वी (?) प्रयत्न करणारे आणि वर इतर लोकांना तुच्छ मानणारे!
राजीव साने यांचं पुण्यात एक व्याख्यान ऐकलं होतं. त्यात समाजाच्या प्रगतीबद्दल बोलताना त्यांचं एक वाक्य होतं, "सामान्यांनी आपलं सामान्यपण कमी केलं पाहिजे."
आपण 'लै भारी' नाही हे समजणं ही सामान्यपण कमी होण्यातली पहिली पायरी; आणि त्याचा प्रयत्न करणं हे त्याच्यापुढचं आव्हान. मला चित्रकला, चित्रभाषेतलं काही कळत नाही हे मान्य करणं ही पहिली पायरी आणि प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधल्या मंडळींच्या चित्रांना बराच खोल अर्थ आहे हे मान्य करून तो अर्थ समजून घेणं ही बरीच पुढची.
मूळ लेखाबद्दलः तीन गट होऊ शकतात ही थिअरी मान्य करून (संदर्भ: राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद) तिसर्या गटाचं विश्लेषण पुरेश्या आकलनाअभावी चुकीचं झालं आहे.
13 Jun 2011 - 10:50 pm | पैसा
भारी विश्लेषण.
14 Jun 2011 - 12:04 am | चिंतातुर जंतू
या धाग्याच्या निमित्ताने आमचाच एक धागा आठवला. आत्मप्रौढीचा धोका बाळगून हे दर्शवू इच्छितो की आमच्या 'महाराष्ट्रात फेसबुकवर बंदी?' या धाग्यावर आम्ही प्रेषित महंमदाच्या त्या कुप्रसिद्ध चित्रांचे दुवे दिले होते आणि त्यांपैकी 'आमचा ह्याच्यावर भारी जीव' असलेले असे एक चोप्य-पस्तेदेखील केले होते. ते या प्रतिसादात होते. ह. घ्या. असे सांगितल्यानंतरही ते संपादित करण्यात आले. निव्वळ त्याचा दुवा ठेवण्यात आला. त्याच धाग्यावरील काही सन्माननीय प्रतिसादकांच्या तिथल्या प्रतिक्रिया आणि गेल्या काही दिवसांतल्या प्रतिक्रिया यांचा तौलनिक अभ्यास करून काही उच्चविद्याविभूषित, सुखवस्तू आणि विद्वान लोक काही रोचक निष्कर्ष काढू शकतील कदाचित, पण इतर गटांत मोडणार्या काही साक्षरांनाही ते शक्य होईल याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी चालू द्या.
14 Jun 2011 - 1:20 am | चेतन
चिंतातुर जंतू त्या धाग्यावरील विचार आवडले होते
>>त्याच धाग्यावरील काही सन्माननीय प्रतिसादकांच्या तिथल्या प्रतिक्रिया आणि गेल्या काही दिवसांतल्या प्रतिक्रिया यांचा तौलनिक अभ्यास करून काही उच्चविद्याविभूषित, सुखवस्तू आणि विद्वान लोक काही रोचक निष्कर्ष काढू शकतील कदाचित
कदाचित त्यातील काहीजण नगरीनिरंजन यांना अपेक्षीत असलेल्या तिसर्या गटात मोडतील तर काही घासकडवींना अपेक्षित तिसर्या गटात.
चेतन
अवांतर: या प्रतिक्रियेला सडकी म्हणावी का?
14 Jun 2011 - 7:46 am | नगरीनिरंजन
तो धागा पाहून बरे वाटले. चिजंनी खरोखर समभाव दाखवला आहे (अर्थात तेव्हा त्यांना इतका उद्वेग आला नसल्याने त्यांनी बंदी घालण्याच्या मागणीला सडकी वगैरे म्हटले नसले तरी तो मनस्थितीचा मुद्दा असल्याने सोडून देऊ :) ). संपादकांनी अनाकलनीय कारणासाठी चित्रांचे फक्त दुवे ठेवले असले तरी आणि त्या चित्रांच्या दर्जाविषयीची वगैरे इतरत्र नेहमी दिसणारी उद्बोधक चर्चा अनुपस्थित असली तरी चिंजंनी जे योग्य ते न चुकता केले आहे हे पाहून आनंद वाटला. बाकीच्या असलेल्या आणि नसलेल्या प्रतिक्रियांना लेखातली गटवारी लागू होत असलेली पाहून खेद वाटला.
दुर्दैवाने प्रत्यक्षातल्या परिस्थितीचेच हे प्रतिबिंब आहे. वर्गवारीवरचे आक्षेप समजू शकतो पण हेच तीन गट आहेत असे मी म्हटलेले नाही, तर हे तीन प्रमुख गट दिसतात असे मी म्हटले. हेच जर एखाद्या प्रथितयश समाजशास्त्रज्ञाने किंवा विचारवंताने, विद्वान लोकांच्या अलिप्ततेबद्दल मत व्यक्त केले असते (तसे झालेही आहेच) तर असे आक्षेप आले असते का हा प्रश्नच आहे. असो.
14 Jun 2011 - 8:54 am | धनंजय
किती का लेख किंवा प्रतिसाद आले असोत, तुम्ही त्यांना अपवादात्मकच मानाल. आणि अपवादात्मक असल्यामुळे प्रत्यक्षातल्या परिस्थितीबद्दल तुमचा मूळ मुद्दाच सिद्ध होतो, असे मनापासून म्हणाल.
(परंतु चिंज या व्यक्तीला काही प्रमाणात तुम्ही ऑफ-द-हुक सोडवले आहे. हे मनाचा थोडासा मोकळेपणा दाखवते. हे नि:संशय प्रशंसनीय आहे.)
14 Jun 2011 - 9:42 am | Nile
समाजातील घटनांचा अर्थ स्वतःपूरता लावताना लेखकाने केलेले विचार गमतीदार आहेत, असे मला वाटते.
पण गटवारी करताना मात्र लेखक फारच एककल्ली झालेला दिसतो. पहिल्या गटातील लोक हे फक्त कट्टर अन धर्माभिमानी दिसतात, पण त्यांच्यात विद्वत्ता, सुखवस्तूपणा, संयम, विवेक वगैरे गूण घालण्यात लेखकाने जाणून बूजून निष्काळजीपणा केलेला दिसतो. (संस्थळाचा अभ्यास केला असता, हे स्वयंघोषित रक्षणकर्ते सुखवस्तू नसावेत असा निष्कर्ष तर अगदीच चुकीचा वाटतो.) दुसर्या गटातील लोकांमध्ये संयम पण विद्वत्ता, विद्या इ. चा अभाव कसा असावा हे काही मला कळत नाही.
असो, थोडक्यात विक्रमाचे उत्तर नेहमीच्या उत्तरांपेक्षा फारच 'फुसके' वाटले.(पण या उत्तराला पहिल्या गटातुन आलेल्या प्रतिसादाने लेखकाच्या न उल्लेखलेल्या त्याच गटातील गुणांच्या अभावाच्या दाव्याला मात्र बळकटी मिळालेली दिसते. ;-) )
14 Jun 2011 - 6:24 pm | चिंतातुर जंतू
विचारता कशाला? तुम्हाला असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात तुम्ही ते नक्कीच म्हणू शकता. हां, मात्र इथले काही सन्माननीय सदस्य त्यांना उद्देशून वापरलेल्या अशा शब्दांवरून जो थयथयाट करतात त्याची अपेक्षा मात्र तुम्ही आमच्यासारख्यांकडून करू नका, कारण आमच्या लेखी हे फारच फुटकळ आहे; त्यांच्या लेखी तो फार मोठा अपमान असावा असं किमान त्यांच्या जाहीर प्रतिक्रियांवरून तरी वाटतं. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो.
14 Jun 2011 - 7:24 pm | नगरीनिरंजन
खी: खी: खी: धर्माची गती सूक्ष्म असते असे म्हणतात ते खोटे नाही. एम एफ हुसेन गेले असे लिहीलेल्या धाग्यावर काही भडक भाषेतल्या प्रतिक्रिया आल्यावर त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्या ऐवजी त्रागा कोणी केला हे जाहीर आहे. तो त्रागा नसता झाला तर विषय तिथेच संपला होता. हुसेन यांना श्रद्धांजलीऐवजी शिव्यांची लाखोली वाहिल्याने त्यांची तुमच्या लेखी असणारी महत्ता कमी होणार होती का? तर नाही. पण तरीही कोणाला तरी मिरच्या झोंबल्या. पण हुसेनच्या चित्रांमुळे इतर कोणाला मिरच्या झोंबायचे स्वातंत्र्य मात्र नाही?
14 Jun 2011 - 9:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हुसेन यांच्या चित्रांवरून काही प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांसंदर्भात काही प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. प्रतिप्रतिक्रिया व्यक्त करण्यामुळे कोणाच्याही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा होतो?
जिप्सी यांनी या प्रतिक्रियेत दिलेलं व्यंकटेश माडगूळकरांचं वाक्य आठवलं:
कलावंत आणि संशोधक यांच्यात संशोधक जास्त सुखी कारण त्याचं म्हणणं जर आपल्याला कळलं नाही तर लोक आपली बुद्धी कमी आहे म्हणून गप्प बसतात,पण कलावंताचं अस नाही जर त्याची एखादी गोष्ट जर आपल्याला कळाली नाही तर आपण लोक त्याला भिकार ठरवून मोकळे होतात
दुसर्या भाषेतले काही शब्द ती भाषा माहित नसल्यामुळे अपशब्द, शिव्या वाटू शकतात.
15 Jun 2011 - 2:53 pm | नगरीनिरंजन
माझा तर्क हुकलाही असेल पण काही लोकांचा दुटप्पीपणा न चुकता दिसत आहे. जर काही लोकांना कलाकृती समजली नाही आणि त्यांनी ती भिकार ठरवली तर त्यात तरी कुठे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो? इथे रोज हजारो कलाकृतींची चिरफाड चालूच असते की. शिवाय काही लोकांना कलाकृतीत खोडसाळपणाही दिसू शकतो. एका विशिष्ट वर्गाला कळलंय तेच बरोबर हा अट्टाहास का? शिवाय कलाकार इतका थोर्थोर आहे तर त्याला समाजाची गरजच काय? ते ही लायकी नसलेल्या समाजाची?
असो, या तर्कवितर्कात मूळ मुद्दा हरवत चालला आहे. ज्ञानी, व्यासंगी आणि बुद्धिमान अशा लोकांना हे का समजत नाही की वास्तवात दोन धर्मात तेढ वाढत/ वाढवली जात असताना आणि दोन्हीकडे सारखेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य नसताना ते स्थापन कसे हे होईल हे पाहीपर्यंत तरी दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांच्या धर्मविषयक भावनांचा आदर केला पाहिजे. पण असे विचारवंत दोन्हीकडे सारखेच स्वातंत्र्य स्थापन होण्याआधीच एकांगी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ढोल पिटू लागतात. पिटा पिटायचे तर पण वर जे लोक त्यातल्या त्यात सहिष्णु आहेत आणि आपल्या नावाचा फतवा काढणार नाहीत त्यांना ते उपदेश करायला जातात किंवा नावं ठेवतात याची चीड येते.
मला विसंगती दिसली, मी लिहीले. जर ते तसे नाहीच याची खात्रीच असेल तर भिकार म्हणून सोडून द्या.
असो. चर्चा खूप झाली. मला माझ्या विदूषकी स्वरुपाकडे पुन्हा जाऊ द्या. कलाकृती न समजून घेण्याचं दु:ख जेवढं असतं, तेवढंच तर्क्दुष्टतेने आणि निरपेक्षतेच्या भ्रामक कल्पनांनी भावना समजून न घेणे दु:खदायक असते. धन्यवाद!
14 Jun 2011 - 7:38 pm | नगरीनिरंजन
दोआप्रकाटाआ
15 Jun 2011 - 6:50 am | यशोधरा
अतिशय चपखल लेख. खूप आवडला.
15 Jun 2011 - 9:33 am | ऋषिकेश
श्रीलंकेतील परिस्थितीवर समयोचित भाष्य करणारे हे सटायर आहे असा सुरवातीच्या परिच्छेदावरून संशय आला होता. (खरंतर कोणत्याही गटाधर्माचे नाव न घेता एकुणच छान 'जागतिक' अपिलिंग प्लॉट जमला होता) मात्र पुढे अनावश्यक वर्गीकरण करून आणि चर्चेला एका संस्थळापुरते व त्याच्या सभासदांपुरते मर्यादित करून आवाका आणि मजा कमी केली असे वाटते.
मात्र सटायरचा जो उद्देश होता तो परफेक्ट साधला आहे याबद्दल अभिनंदन. काहि परिच्छेद/वाक्ये वाचून खुपच धमाल आली
15 Jun 2011 - 2:59 pm | नगरीनिरंजन
>>एका संस्थळापुरते व त्याच्या सभासदांपुरते मर्यादित करून
असे वाटले हे माझे अपयश आहे.
15 Jun 2011 - 2:57 pm | llपुण्याचे पेशवेll
बाकी एका गटाला तिसरा गट किंवा तृतीय गट असे सहजच झाले आहे का मुद्दाम केले आहे?
बाकी कथा फार छान.