पाणी

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
23 Mar 2011 - 1:54 am

१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला. ज्या भाषेत पाण्याला देखील "जीवन" ह्या सार्थ शब्दाने संबोधले जाते, तेथे पाण्याचे महत्व नव्याने सांगायची गरज नसावी...

ह्या दिवसाच्या निमित्ताने जगभर स्वच्छ पाण्याची आठवण ठेवण्याचा आणि त्या निमित्ताने जागृती करायचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या दिनानिमित्त एक पाणीसमस्येवरून विषय ठरवला जातो आणि त्यावर जगभर कार्यक्रम होतात. या वर्षीचा विषय हा "Water for the Cities: Responding to the Urban Challenge" असा आहे. उपलब्ध असलेल्या जागतिक विदाप्रमाणे २००८ सालपासून ५०% हून अधिक जग आता अधिकृतपणे शहरात रहाते. अथवा याच्याच उलट म्हणायचे तर मानवी जगाचे ५०% शहरीकरण झाले आहे आणि २०५० सालापर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या ६९% जनता ही शहरी भागात रहाणार आहे. आजच्या घडीला, जगभरातील जवळ्पास नव्वद कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळत नाही. लाखो लोकं दरवर्षी दुषित पाण्याचे अथवा प्रदुषित सांडपाण्याचे बळी होतात. असे म्हणले जाते की एखाद्या युद्धापेक्षा, पाणी आणि सांडपाणी यांच्यामुळे दरवर्षी बळी जातात.

भारताच्या संदर्भात ताजे पाणी हे तुलनात्मकरीत्या किती आहे हे खालील नकाशावरून समजू शकेलः (संदर्भः www.undp.org)

थोडक्यात पाण्याचे पूर्ण दुर्भिक्ष नसले तरी अफ्रिकासोडल्यास इतर बहुतांशी प्रगत आणि विकसनशील राष्ट्रांपेक्षा आपल्याकडे पाणी कमी आहे. हे पाणी देखील ताजे आहे याचा अर्थ पिण्यायुक्त आहे असा नाही तर केवळ ते समुद्रातले नसून नद्या-तलाव, भूगर्भातील आणि साठवलेले पाणी आहे.

आज भारतात साधारण ८४% जनतेस पिण्यायुक्त पाणी मिळते असा अंदाज आहे. तरी देखील २१% रोगराई ही पाण्यामुळे वाढते असा देखील अंदाज आहे. शहरीकरणाचा विचार केल्यास अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत जिथे घरोघरी मोबाईलफोन्स आहेत पण प्यायला अथवा रोजच्या वापराकरता पाणी नाही अथवा सांडपाण्याची व्यवस्था नाही. या संदर्भात अजून बरेच काही लिहीता येईल. कमी लेखायचा तर त्याहूनही नाही. फक्त एक नागरीक म्हणून आपण काय करू शकतो याचा मात्र नक्की विचार करावासा वाटतो.

या निमित्ताने तीनएक वर्षांपुर्वी न्युयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये एक प्रदर्शन भरले होते त्यातील काही पोस्टर्सचे फोटो खाली देत आहे:

खालील पैकी प्रत्येक गोष्ट तयार करण्यासाठी किती पाणी लागते?

केवळ अमेरिकेत फक्त पाण्यासाठी १९९७ साली ३.३ बिलीयन्स प्लॅस्टीकच्या बाटल्या विकल्या गेल्या. तेच प्रमाण २००२ साली १५ बिलीयन्स इतके झाले. त्यातील १२% अंदाजे रिसायकल केल्या गेल्या. भारतात पण पाण्यांच्या बाटल्याचे प्रमाण खूप आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष. वास्तवीक हे काम करणे जास्त करून, अशा ठिकाणी मुलींच्या नशिबी येते. त्याचे म्हणून वेगळेच सामाजीक परीणाम पाण्यापेक्षा जास्त झिरपत जातात.

अफ्रिकेतील एका देशात मुले एका चाकावर खेळत आहेत. पण त्याच बरोबर ते मागे दिसणारी पाण्याची टाकी देखील भरत आहेत!


पर्यावरण बदलामुळे उत्तरधृवावर जे बर्फ वितळू लागले आहे त्यामुळे तिथल्या प्राण्यांना पण कसे तोंड द्यावे लागत आहे याचे हे प्रातिनिधीक छायाचित्र आहे.

आपण कमीतकमी काय करू शकतो?

  1. घराभोवती पाणी झिरपण्यासाठी जागा (सगळेच काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण करायचे नाही).
  2. कचरा रस्त्यावर जाणार नाही याची काळजी घेणे.
  3. बागेसाठी पाण्याचा मर्यादीत उपयोग
  4. गाडी धुण्यासाठी आणि घरातील जमिनी धुण्यासाठी देखील कमीत कमी उपयोग.
  5. झाडे लावणे / वाढवणे

अजून तुम्हाला काय सुचते आहे?

राहती जागासमाजजीवनमानभूगोलविज्ञानविचारबातमीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

प्राजु's picture

23 Mar 2011 - 2:41 am | प्राजु

उत्तम लेख!! समायोचित.
आणि बरीच नवी माहिती समजली.
आपणच प्रयत्न करू शकतो.. नक्कीच. :)

विचारकरायला लावणारा लेख आहे.
माहितीबद्दल धन्स विकासराव.

पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच जातेय, आणि जाणार आहेच. भारतात (शहरी भाग सोडून) पुर्वी पाणी मुबलक प्रमाणात वापरायला मिळायचं. हळुहळू दिवसातून दोनवेळा येणारं पाणी एकवेळ यायला लागलं... आणि आतातर एक दिवस आड येतं म्हणे (उन्हाळ्यात तर अजूनच प्रॉब्लेम). अशावेळी पाण्याचं योग्य नियोजन करायला यायलाच पाहिजे. पाण्याची साठवणूक आणि त्याचा नेमका उपयोगही करता यायला हवा. भारतात पाण्याच्या समस्यांमुळे आताशा खूप लोक पाणी व्यवस्थीत वापरताना दिसतात.

परदेशात असलेले कित्येक लोक आहे म्हणून पाणी अती-वाया घालवताना पाहिलेत. त्यांना एवढेच सांगावेसे वाटते की...

१. भांडी पुर्ण भरलेली असल्याशिवाय डिशवॉशर लावू नका
२. भांडी सिंकमधे घासत असाल, किंवा दाढी करतानाही टॅप फुल ओपन ठेवू नका.
३. घरातलं शॉवरहेड शक्यतो १ ते २ गॅलन्/मिनीट पाणी फेकत असेल तर चांगले. नाहीतर खूप पाणी वाया जातेय हे लक्षात घ्या.
४. वॉशींग मशीनही पुर्ण भरल्या शिवाय लावू नका (उगाच १-२ कपडे धुवायला पाणी आणि वीज दोन्ही खर्च होते).
५. घराभोवती आंगण आणि झाडे असतील तर रेनबॅरेल नक्की आणा. यात साठणार्‍या पाण्याचा उपयोग झाडांसाठी करा.
६. गाडी धुन्याकरता होजचा शक्यतो कमी किंवा व्यवस्थीत वापर करा, किंवा सरळ सरळ बादलीत पाणी घेऊन गाडी धुन्यासाठी वापरा.
७. रेस्ताँरेंट्मधे गेल्यावर उगाच बॉटल्ड वॉटर वापरण्यात काही फायदा नाही. ते जरी टॅपवॉटर म्हणत असले तरी त्यांना नियमाप्रमाणे फिल्टर्ड वॉटर सर्व करावे लागते. बॉटल्ड वॉटर मागवून तुम्ही जादा पैसे खर्च करतच आहात शिवाय कचरा वाढवायलाही मदत करताय.

आतातरी एवढंच आठवतंय.

"भारतात (शहरी भाग सोडून) पूर्वी मुबलक पाणी वापरायला मिळायचे."
शंका वाटते.पूर्वी बायकांना दोन-दोन मैलांवरून पाण्याचे घडे डोक्यावरून वाहून आणावे लागत असत, उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत आणि तलावांची डबकी होऊन त्यांत किडे पडून पाणी दूषित होई .त्यामुळे गावेच्या गावे उठून जात असत असे वाचले आहे. त्या काळी नळयोजना पाणीयोजना नसाव्यात. बारमाही नद्यांकाठी राहाणार्‍यांची गोष्ट कदाचित वेगळी होती असणे शक्य आहे.

अनामिक's picture

23 Mar 2011 - 9:17 pm | अनामिक

मला शहरी भाग सोडून म्हणजे अगदीच ग्रामीण भाग म्हणायचे नव्हते. शहरी भागात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, पाण्याचा एवढा तुटवडा जाणवत नाही बहुतेक. पण विदर्भ मराठवाड्यात म्हणाल तर पुर्वी छोट्या गावात (म्हणजे तालुका ठिकाणी) तरी पाणी व्यवस्थीत यायचं. मला वरच्या उदाहरणात पाणी पुर्वी होतं त्यापेक्षा कमी मिळतंय एवढच सांगायचं होतं. तुम्ही म्हणता तसं ग्रामीण भागाची अवस्था पुर्वी बिकट होती ती आता अजून जास्तं बिकट आहे असे म्हणावे लागतेय.

किशोरअहिरे's picture

25 Mar 2011 - 1:21 am | किशोरअहिरे

आपल्या प्रतिसादाशी सहमत..
अपुर्या पाणी पुरवठा ही गंभीर समस्या आहे मराठवाड्याची तरी..
त्यातल्या त्यात माझ्या घरी (मराठवाड्यात) १९९६-२००१ पाण्याचा ईतका प्रॉब्लेम नव्हता.. नळाला १ दिवसाआड पाणी यायचे..
आता २०११ साली कहर आहे.. चक्क ८ दिवसाला एकदा पाणी येते नळाला.. ते पण फक्त ३० मी.
हँड पंप (हापसा) बसवलेला आहे पण त्यातही बोंब अशी आहे की जमीनी खाली तब्बल ९० फुट पर्यंत पाणीच नाहीये आता..
जेंव्हा हँड पंप बसवला होता तेंव्हा २० फुट वर पाणी लागले होते.. १९९० साली
त्यानंतर २००३ - ०४ ला ५० फुट पर्यंत पाणी नव्हते म्हणुन आजुन ४० बोअरींग केले .. :(

चक्क ८ दिवसाला एकदा पाणी येते नळाला

लातुरात राहता वाट्टं !!!

५० फुट पर्यंत पाणी नव्हते म्हणुन आजुन ४० बोअरींग केले ..

४० फुट वाढविले का ४० बोअर वर मारले...

मदनबाण's picture

23 Mar 2011 - 8:14 am | मदनबाण

उत्तम लेख...

शॉवरचा अंघोळीसाठी केला जाणारा वापर टाळा, त्यामुळे देखील बरेच पाणी वाचेल.अंघोळीसाठी पाणी वापरताना बादली वापरा.
दात घासताना, दाढी करताना फक्त गरज असतानाचा नळ चालु करावा. इ.

जाता जाता :---

अतिशय उत्तम लेख.
बाकी.... आपणच बरंच पाणी वाचवू शकतो हे खरंच.

पैसा's picture

23 Mar 2011 - 9:57 am | पैसा

लेख विचार करायला लावणारा आहे. बर्‍याच लोकाना पिण्याचं पाणी उपलब्ध नसतं आणि आपण मात्र पाण्याची उधळपट्टी करतो याचा विचार करावाच लागेल.

डिश वॉशर, कपड्यांचं वॉशिंग मशिन, शॉवर या गोष्टीना पाणी खूप लागतं. त्यांचा वापर कमी होईल तेवढं बरं. पावसाचं पाणी साठवणं हे ही आवश्यक आहे. पाण्याच्या नियोजनात झाडांचा मोठा सहभाग आहे, जास्तीत जास्त झाडं लावली गेली पाहिजेत.

बेसुमार खाणींमुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक झरे आटत चालले आहेत. पर्यावरणाची हानी करणार्‍या अशा खाणीना परवानगी दिली जाऊ नये.

अशा काही गोष्टी सरकार आणि आम जनता यानी पाळल्या तर लेखातल्या फोटोतल्या लहानग्याना पाणी भरायचं काम करावं लागणार नाही.

शिल्पा ब's picture

23 Mar 2011 - 9:49 am | शिल्पा ब

उत्तम लेख...मी स्वतः पाणी अन वीज दोन्ही जेवढी शक्य आहे तेवढी वाचवते जसे खोलीतून जाताना दिवा बंद करणे, पूर्ण भरले असतानाच डिश वॉशर लावते, उन असेल तेव्हा दोरीवर कपडे वाळत घालते

मन१'s picture

23 Mar 2011 - 10:06 am | मन१

जितका पाण्याचा वापर अधिक होइल तितका अधिक खर्च द्याय्ला लावणे , ह अएक उपाय होइल काय जलबचतीचा?
ह्यामध्ये पाणी वाचवणे हे थेट वॉटर बिलचे पैसे वाचवण्याशी निगडित असेल. पर्यायाने जलबचतीसाठी एक लालुच/incentive मिळेल.

ज्याला पाण्याची जोडणी दिली आहे तो पाण्याचा अनिर्बंध वापर कसा करु शकतो हे आजवर मला उलगडलेलं नाही.

आपलाच
मनोबा.

मनोबा आपण सांगितलेला हा उपाय अतिशय प्रभावी आहे.

आमची कंपनी नागपूर शहराच्या काही भागात सध्या (गेल्या २ वर्षांपासून) प्रायोगिक तत्वावर मनपाच्या वतीने २४ तास पाणी पुरवठा योजना राबवते आहे. यामध्ये नागरिकांच्या नळ जोडण्या, पाईपलाईंस वगैरे सर्व तपासून गळती असल्यास ती सुधरवून घेतली जाते. लोकही स्वतःचा पैसा खर्च करून हे करवून घेतात कारण लीकेज मूळे पाणी वाया जाउन अव्वाच्या सव्वा बिलं येतात आणि ज्या लोकांनी रिपेअर करवून घेतले त्यांच्या बिलामध्ये लक्षणीय घट झालेली त्यांनी पाहीली आहे. लोकांना २४ तास पाणी मिळू लागले आहे. २४ तास पाण्यामूळे पाणी साठवण्याची गरजच आता संपलेली आहे. त्यामूळे आज आलेले पाणी साठवायचे आणि उद्या पाणी आले की आज्चे पाणी फेकून द्यायचे ही वृत्ती कमी होते आहे पर्यायाने पाण्याची बचत होते आहे म्हणूनच आता संपूर्ण नागपूर शहराला ही योजना लागू करण्याचा निर्णय आता मनपाने घेतला आहे. यातून पाण्याचे दुर्भिक्ष आणि अपव्यय अशा दोन्ही विरोधाभासी समस्यांमधून लोक मुक्त होतील असे चित्र दिसत आहे.

मन१'s picture

23 Mar 2011 - 5:38 pm | मन१

हा उद्योग झकासच दिसतोय हा. सगळिकडे पसरला तर बरं होइल.

बाकी, पाणी बचतीसाठी औरंगाबादला राज्याच्या इरिगेशन(जलसंधारण) खात्याच्या पुढाकारानं WAter And Land Management Insititute ह्यांनी बराच अभ्यास केलाय, निरिक्षणं केलीत. http://www.walmi.org/ हा त्यांचा दुवा आहे.
ते जल नियमन ह्या विषयावर फारच सुरेख सादरीकरण देतात. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्या सगळ्यांनी एकएकदा तरी खास औ बादला जाउन तिथे प्रेझेंटेशन बघणं उचित होइल.

त्यांच्या काही एकर पसरलेल्या हिरव्यागार आवारात त्यांनी बरेचसे प्रयोग केलेत. अत्यल्प पाण्यात प्रचंड भूभाग हिरवागार ठेवलाय. हे तिथं जाउन नक्की बघण्यासारखं आहे.
राजस्थान मध्ये माहाराष्ट्राच्या कैक पट पाणी कमी असतानाही त्यांनी बरीचशी त्यावर मात कशी केली हे त्यांनी दाखवलय.
आंतरराष्ट्रिय स्तरावर ह्याबद्दल बघायच म्हणजे इस्राइलनं थोड्याशा पाण्यात वाळवंटात तुफान यशस्वी शेत्ती करुन दाखवली आहे. जर त्यांना पाणी पुरु शकत, तर माझ्या देशाला का नाही?
आजुन एकः- ह्याबद्दल श्री राजेंद्र सिंग, एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हे जोहड च्या माध्यमातुन बरचसं काम करतात असं ऐकुन आहे. त्यांनी राजस्थानात प्रचंड काम केलय. इथे महाराष्ट्रात आल्यावर त्यांना बर्‍याच अडचणी साखरसम्राटांमुळं आल्या असं ऐकलय.(ऊस आणि केळी ही अति पाणी वापरणारी पिकं टाळा अशी काहिशी राजेंद्रसिंग ह्याअंची भूमिका होती.)

असो.

मनोबा.

प्रसन्न केसकर's picture

23 Mar 2011 - 6:07 pm | प्रसन्न केसकर

आपण म्हणता ते बरोबरच आहे. त्यासाठी आधी वॉटर ऑडीट व्हायला हवे, वॉटर मीटर्स हवेत. यामध्ये भर टाकुन वॉटर अ‍ॅव्हेलेबिलिटीनुसार झोनिंग पण करता येईल.
हे सर्व शहरी भागात योग्य ठरेल. ग्रामीण भागात खते, कीटकनाशके रन ऑफ मधे मिसळुन जे जलप्रदुषण होते त्यासाठी देखील काहीतरी करण्याची गरज आहे.

>>आपण म्हणता ते बरोबरच आहे. त्यासाठी आधी वॉटर ऑडीट व्हायला हवे, वॉटर मीटर्स हवेत. यामध्ये भर टाकुन वॉटर अ‍ॅव्हेलेबिलिटीनुसार झोनिंग पण करता येईल.

आस्की या हैदराबाद येथील संस्थेकडून वॉटर ऑडिट वगैरे सोपस्कार करूनच ही योजना इथे सुरू केली होती.

नगरीनिरंजन's picture

23 Mar 2011 - 10:36 am | नगरीनिरंजन

समयोचित लेख! दरवर्षी असे लेख येत राहोत ही सदिच्छा!
मी सुद्धा खूप पाणी वाचवतो. (एका मिनिटात आंघोळ करणे, आठवड्यातून एकदाच कपडे, फरशी धुणे, गरीब दयनीय माणसासारखं गाडी, डिशवॉशर न घेणे, शक्यतो कांदे न कापणे, न रडणे, आत्यंतिक गरज असल्याशिवाय मूत्रविसर्जन न करणे, वगैरे).
असंच पाणी वाचवून आपण नक्कीच भविष्यातल्या दीडपट लोकसंख्येसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ शकू याची मला ठाम खात्री आहे. मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळेच हे शक्य झाले आहे याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. शिवाय प्रगत देशांमधल्या जनतेच्या प्रचंड त्यागामुळेच आपण हे अवघड लक्ष्य गाठणार असल्याने त्यांचे विशेष आभार मानतो.

जय विज्ञान, जय तंत्रज्ञान!

वपाडाव's picture

23 Mar 2011 - 11:12 am | वपाडाव

(एका मिनिटात आंघोळ करणे, आठवड्यातून एकदाच कपडे, फरशी धुणे, गरीब दयनीय माणसासारखं गाडी, डिशवॉशर न घेणे, शक्यतो कांदे न कापणे, न रडणे, आत्यंतिक गरज असल्याशिवाय मूत्रविसर्जन न करणे, वगैरे).

ह्या लिस्टमध्ये ननि कदाचित " आठवड्यातुन फक्त दोनच वेळा आंघोळ करणे " लिहायला विसरले की काय अशी शंका आली?

आम्ही मात्र , महिन्यातुन एकदा आंघोळ करणे, २-३ महिन्याला एकदा कपडे धुणे, दात आठवड्याला धुणे, ताटाऐवजी पेपरात खाणे, हात त्याच पेपराला पुसणे (जेवणानंतर) ई. ई. कर्म करुन पाणी वाचवतो....

स्पंदना's picture

23 Mar 2011 - 2:13 pm | स्पंदना

ओ थांबा नगरी.

माझ्या इतक कुणीच नसेल पाणी वाचवत. मी काय करते माहिताय? आपण जेवतो कनी . होय कनी , जेवतो कनी? त्या नंतर तोंडात चुळ भरायला जेन्व्हा पाणे घेतो ना तेंव्हा एक एक बोट मी तोंडात घालुन खुळखुळवुन घेते. हाय कनी? बोट च्या बोट स्वच्छ, वर ते पाणी प्यायच म्हणजे ते वाया नाही जात!!!!!!

काय करायच आपण भर पाण्यात राहुन ही पाण्या वीना भिकारी!!

सहज's picture

23 Mar 2011 - 10:45 am | सहज

पाणी वाचवा, वीज वाजवा हा एकंदर साधी रहाणी, समाजवादी विचारसणी, उधळपट्टी/चंगळवाद नको याचा एक भाग आहे.

पृथ्वीचा ७०% भूभाग पाण्याने व्यापला आहे. अमुक गावाने पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्पात भाग घेउन पाणी टंचाई दूर केली अश्या बातम्या तसेच शास्त्रज्ञांनी समुद्राच्या पाण्यापासुन, दूषीत पाण्यापासुन तसेच हवेतून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान काढले आहे असे ऐकून बराच काळ झाला आहे. तर पाण्याचे दुर्भिक्ष्य ही भिती का आहे?

जाणकारांनी कृपया अजुन एक माहीती द्यावी. कोका कोला, पेप्सी ह्या कंपन्या जगात बहुदा सगळीकडे आहेत. अश्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन करण्याकरता किती शुद्ध पाणी भारतातून दिले जावे व किती उत्पादन देशाबाहेर निर्यात व्हावे यावर काही निर्बंध आहेत काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Mar 2011 - 11:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाणी शुद्ध करण्यासाठी इंधन खर्च करावं लागतं, सध्याचं इंधन हरित नाही म्हणून पाणी वाचवा हा युक्तीवाद मान्य आहे का?

विकास, समयोचित लेख आवडला. आठवण करून देत रहा, तेवढ्यापुरते तरी आम्ही शहाण्यासारखे वागू.

म्हणजे इथे खरी समस्या हरीत इंधन नसणे आहे. पाण्याची समस्या नाही. बरोबर?

गेले कित्येक वर्षे अपारंपारीक उर्जा स्त्रोत , विकास, सरकारि संस्था ऐकत आहे. सौर उर्जा, पवन चक्या, जैव इंधन, जिओ थर्मल एनर्जी(मराठी??) आता हे उर्जा स्त्रोत सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर आहेत असे मानले तरी सरकार अथवा मोठ्या संस्था ज्या पाणीपुरवठा करतात त्यांनी या उर्जेचा वापर करावा की नाही?

अपव्यय टाळा हे मान्य आहे पण समस्या काही वेगळ्याच आहेत व त्या प्राधान्याने सोडवल्या पाहीजेत. आज वाचवा म्हणत आहात उद्या तुम्ही माणाशी अमुक तांबेच पाणी वापरा म्हणाल, परवा म्हणाल आठवड्यातुन अमके दिवसच.. अज्याबात नाही चालणार. हवे तेव्हा बदाबदा (पक्षी: योग्य दाबाने) पाणी नळाला आलेच पाहीजे.

>तेवढ्यापुरते तरी आम्ही शहाण्यासारखे वागू

चक्क अदितीबैंनी असे म्हणावे म्हणजे... श्री विकास यांना 'पद्म विभूषण' मिळावा अशी मागणी करतो.

वपाडाव's picture

25 Mar 2011 - 9:15 am | वपाडाव

जिओ थर्मल एनर्जी(मराठी??)

भु-औष्णिक उर्जा..

सहज's picture

25 Mar 2011 - 10:40 am | सहज

धन्यवाद हो मिस्टर व्ही. पी. :-)

स्पंदना's picture

23 Mar 2011 - 2:15 pm | स्पंदना

सहज नी सहज टाकलेला प्रश्न अगदी सह्ह्ई!

कच्ची कैरी's picture

23 Mar 2011 - 11:06 am | कच्ची कैरी

उत्तम व खूपच माहितीपूर्ण लेख .

आपण जे अन्न खातो ते तयार होण्यासाठी किती पाणी लागते ते इथे पाहता येईल.

पृथ्वीवरच्या पाणीसाठ्यात वाढ होणार तर नाहीच (कमी होण्याची शक्यता नाकारता येईल काय याबाबत शंका आहे.) पण त्याचा वापर वाढत जात असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे आणि त्याचे गांभीर्य वाढतच जाणार आहे यात शंका नाही. त्यामुळेच असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य वापर करण्याला पर्याय नाही.
Water In A Changing World, The United Nations World Water Development Report 3 नुसार सध्या लॅटिन अमेरिका (जगाच्या एकुण पाणीसाठ्याच्या १/३ तेथे उपलब्ध आहे पाण्याबाबत सर्वात सुदैवी आहे. अन्यत्र पाणीसाठ्याची स्थिती अशी: अशिया (एकुण पाणीसाठ्याच्या १/४), उ. अमेरिका-प. युरोप-ऑस्ट्रेलिया (एकुण पाणीसाठ्याच्या २० %), सब-सहारन अफ़्रिका-पु. युरोप-मध्य अशिया (एकुण पाणीसाठ्याच्या १० %) अशी आहे तर उ. अफ़्रिका व मध्यपुर्वेत सर्वात गंभीर परिस्थिती (एकुण पाणीसाठ्याच्या १ %) आहे. उपलब्ध पाणीसाठ्याच्या ८५ % पेक्षा अधिक पाणी बाष्पीकरणाने तातडीच्या प्रत्यक्ष वापरास निरुपयोगी होते हे येथे लक्षात घेतले पाहीजे. अर्थात शास्त्रीय प्रक्रियेने हे पाणी परत मिळवता येऊ शकेल परंतु ही प्रक्रिया आर्थिक दृष्ट्या खर्चिक तर आहेच परंतु त्याचेही पर्यावरणावर व पर्यायाने उपलब्ध पाणीसाठ्यावर परिणाम होतात.
प्रदुषणामुळेदेखील वापरास उपलब्ध अश्या ऊर्वरित पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात (७०-८० टक्के) कपात होते. अश्या परिस्थितीत पाण्याचा वापर मोजुन मापुन करणे अनिवार्य आहेच.

सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे प्रत्येक सोसायटीने, बंग्लेवाल्यांनी गच्चीवर रेन वोटर हार्वेस्टिंग चा प्रकल्प उभारणे, साधारण याला ५०००० ते ३००००० पर्यंत खर्च येतो, पण याने होतं काय कि, अक्ख्या गच्चीवर विशेष पत्रे घातले जातात, पावसाळ्यात पडणारे पाणी या पत्र्यांवर पडून
पन्हाळी द्वारे जोडलेल्या पाईप मधून खाली जमिनीत सोडले जाते, अथवा टाक्यांमध्ये सुद्धा साठवले जाऊ शकते.

याचे फायदे

बिल्डींगच पाण्यापासून संरक्षण होत
सोसायटीच्या बोअरवेल ला वर्षभर गोडेपाणी येते
पाण्याची बचत तर होतेच , शिवाय ती सोसायटी पाण्याच्या बाबतीत तरी स्वयंभू होते

असे प्रकल्प मी, मराठवाडा भागात बघितलेले आहेत
पाणी वाचवण्याचा हा अतिशय सुंदर उपाय आहे

स्पावड्या...
अगदी हेच आमच्या पिताश्रींनी केलेले आहे....
त्यामुळेच अख्खा उन्हाळा आम्च्या बोअरला पाणी असते...
- (आदर्श) नांदेडवासी

त्याशिवाय कुठल्याही बिल्डारला हल्ली N O C किंवा completion certificate मिळत नाही!
हे मी माझ्या थेरगाव(पिंपरी चिंचवड मनपा) आणि बावधन(पुणे मनपा) ह्यांच्या अनुभवातुन सांगु शकतो.

फार पूर्वीपासुनच हे जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी चेन्नईत केलं होतं.

एक्ल गोष्ट नक्की की त्याची अंमल्बजावणी ही एक सगळ्यांनी थट्टा करुन ठेवली आहे.
वॉटार हार्वेस्टींग साठी पाणी मुरेल अशा ठिकाणी सोडणं आवश्यक आहे. (काळ्या मातीवर वगैरे.) आमच्या बिल्डरनं ते चक्क सिमेंटवर सोडल्य. नुस्तं वाहुन जातं किंवा वाळुन जातं ते.
एक दोनदा त्याच्याशी आम्ही बोललोही आहोत. पण आमचा उद्देश वॉटार हार्वेस्टींग नीट होणं हा होता.
त्याचा उद्देश सर्टिफिकेट मिळवणं हा होता, बोलणी फिसकटलीत पहिल्या राउंडची.
"तिच्या आयला लै शानपणा शिकिवतेत ही शिकलेली मान्सं" हे पुटपुटताना त्यानं मी ऐकलय.

आपलाच
मनोबा.

नगरीनिरंजन's picture

23 Mar 2011 - 4:34 pm | नगरीनिरंजन

शिवाय सांडपाणीही सूक्ष्म गाळण्या लावून शुद्ध करून वेगळ्या टाक्यांमध्ये सोडता येते. असे पाणी गाड्या धुवायला, बागेला वगैरे वापरता येते.

विचार करायला लावणारा लेख आहे.

प्रसन्न केसकर's picture

23 Mar 2011 - 5:11 pm | प्रसन्न केसकर

वॉटरलेस पब्लीक युरिनल्स हा देखील मार्ग आहे.

भारतात पब्लीक युरिनल्स हिच एक समस्या आहे. आणि असलेच पब्लीक युरिनल तर ते अनेक ठिकाणी वॉटरलेसच असते, नाही का? ;)

प्रसन्न केसकर's picture

23 Mar 2011 - 6:27 pm | प्रसन्न केसकर

पण जी आहेत तेथे सतत पाणी गळत असते. ही गळती खुप मोठ्या प्रमाणात होते.
माझी माहिती बरोबर असेल तर सुमारे वर्षाभरापुर्वी गेटवे ऑफ इंडिया परिसरात गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने एक वॉटरलेस युरिनल तयार केले होते.

वपाडाव's picture

23 Mar 2011 - 6:53 pm | वपाडाव

अधिक माहिती या ठीकाणी...

लेख आवडला असला तरी तुम्ही माझ्या कोणत्याही धाग्याला प्रतिसाद न दिल्याने मीही प्रतिसाद देत नाहिये असे समजावे.;)

नितिन थत्ते's picture

23 Mar 2011 - 6:51 pm | नितिन थत्ते

माझ्या अनुभवाने हॅण्ड हेल्ड शॉवरने आंघोळ केल्यास कमी पाणी लागते असे दिसले आहे.

अस्मादिकांच्या अनुभवातुन अंघोळ न केल्यास पाणी लागतच नाही असे दिसते....
- काम फत्ते
फुल्ल ह. घ्या......

विकास's picture

23 Mar 2011 - 8:29 pm | विकास

सर्व वाचक-प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.

@अनामिक: योग्य सुचना. मात्र बर्‍याचदा अशा सोप्या सुचना पाहून अनेकांना (केले अथवा नाही केले तर) "याने काय होणार" असे कुठेतरी वाटते. त्यामुळे त्या परत परत सांगाव्या लागतात. बाकी राहींशी सहमत की खेडेगावात सर्वत्र पाणी नसायचे/नसते. महाराष्ट्रात बारमाही नद्या हा प्रकार जास्त नाही. मात्र धरणे आणि कालव्यांमुळे अनेक ठिकाणी बागायती आणि त्याला अनुलक्षून पाण्याची देखील सुबत्ता आली.

@मदनबाणः जरी मी शॉवरच वापरत असलो तरी भारताच्या संदर्भात बादलीत पाणी घेणे पण योग्य वाटते आणि जरी त्यात एकापेक्षा अधिक बादल्या पाणी घेतले तरी देखील त्यामानाने कमी पाणी खर्च होते, असे वाटते. जे दाढीचे तेच ब्रशचे. (भारतात असलो की आपोआप केले जाते, येथे भरपूर पाणी असल्याने कधी कधी माज आला की काय असे वाटते.)

@पैसा: खाणींचा प्रश्न नक्कीच आहे. मात्र त्यामुळे झरे आटत आहेत का हे माहीत नाही. शक्य आहे. पण खाणींचा परीणाम हा प्रदुषण वाढण्यासाठी नक्कीच होतो.

@ शिल्पा ब: चांगल्या हवेत दोरीवर कपडे वाळवणे नक्कीच शक्य आहे. आमच्या कडे, जिथे आज स्प्रिंग चालू झाल्यावरही ४ इंच बर्फ पडणार आहे आणि उद्या बदाबदा पाऊस, तिथे थोडे (ह्युमिडीटीमुळे) अवघड जाते. :(

@मन१ : पाण्याला मीटर बसवायलाच हवेत. तसेच खर्‍या अर्थाने पाण्याचे अकाउंटींग केले पाहीजे. आमच्या येथे बर्‍याच ठिकाणी पाणीखाते हे स्वायत्त असते. म्हणजे जरी ते सरकारचा भाग असला तरी त्याचे व्यवहार आणि कारभार हा पाणीपट्टीवर स्वतंत्रपणे चालतो. (त्याला enterprise accounting असे म्हणतात.). त्यातून मिळणारी "अतिरीक्त रक्कम" (सरकारला "फायदा" करता येत नाही. ;) ) ही पाण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर नवीन करण्यासाठी वापरले जाते. आता प्रत्येक घराला वायफाय मीटर आहे आणि त्यातून सर्व विदा आपोआप कलेक्ट होतो...

@मी रुचा: तुमचा नागपुरी अनुभव एकदमच छान आहे. असे अनुभव सरकारी आणि माध्यमांच्या मार्फत प्रसिद्धीस येणे महत्वाचे असते. कारण बर्‍याचदा एक (स्थानिक) सरकार काय काय करू शकते हे इतर ठिकाणी माहीत नसते आणि मग reinventing wheel चालू रहाते...

@सहजरावः मला समाजवाद्यांच्या पंगतीत बसवल्याबद्दल माझे डोळे पाणावले (त्यांचे रागावले असतील कदाचीत) ;) . असो. You can't manage what you don't measure हे जुने तत्व आहे. पाण्याच्या बाबतीत तर ते चपखल आहे. वरील नकाशा पाहीलात तर लक्षात येईल की स्वच्छ पाणी सर्वत्र समान नाही. विज्ञानाने अनेक चमत्कार केले तरी ते नैसर्गिक बाबतीत उपयुक्त ठरायला कधी कधी पिढीचा/पिढ्यांचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आत्ता आपले कसे करायचे, ते देखील भारताच्या संदर्भात हा प्रश्न आहे.

@३_१४अदिती: मला नाही वाटत इथले सदस्य पाण्याचा अपव्यय करतात. त्यामुळे ह्या लेखाची मर्यादा सध्याची अवस्था (कंडीशन या अर्थाने) देणे इतकीच आहे. नाहीतर बुद्धीवाद्यांचे अंधश्रद्धानिर्मूलन केल्यासारखे होईल. ;)

@प्रसन्न केसकरः पाणीसाठा, प्रदुषण आणि तांत्रिक मर्यादा अगदी मोजक्या शब्दात संकलीत केल्या आहेत. त्यात अजून एक गोष्ट म्हणजे पर्यावरणीय बदल. डार्फरमधील नागरीयुद्धाचे कारण पर्यावरणीय बदल आणि पाण्याचे द्रुभिक्ष समजले जाते. किंबहूना ते नजिकच्या काळातील पहीले "पाण्यावरून युद्ध" तसेच पहीले "पर्यावरणीय बदलामुळे" होत असलेले युद्ध आहे, असे देखील म्हणले जाते.

वॉटरलेस युरीनल्स मुळे फिल्टर्सचा कचरा वाढतो. विशिष्ठ स्वच्छता ठेवावी लागते. ते वाईट आहे असे नाही, मात्र तसे करताना बर्‍याच व्यवस्था या उपलब्ध आहेत ना याची खातरजमा करणे देखील आवश्यक आहे.

रासायनीक खते वगैरेचा संबंध पाणीप्रदुषणाशी आहेच. त्यावर नंतर जमल्यास लिहीन...

@नगरीनिरंजन : आपण म्हणत असलेले फिल्टरेशन तंत्रज्ञान हे कुठच्या पातळीपर्यंत वापरले जाते यावर त्यासाठी किती उर्जा खर्च होऊ शकते ते ठरते. एकूणच हा प्रकार जरासा महागडा आहे. मात्र मोठ्या प्रकल्पांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आणि सुरवातीचा खर्च हा जस्टीफाय होऊ शकतो.

@चित्रेचा तारा: दुव्याबद्दल धन्यवाद. त्यात जर पाहीले तर लक्षात येईल की सर्वात जास्त पाणी हे बिफला दाखवले आहे. बाकी शिजवणे कसे चालते यावर पाणि कमी-जास्त वगैरे ठरू शकते.

@स्पा आणि मन१ : असे रेन वॉटर हार्वेस्टींग होत असले तर उत्तमच आहे. मला काँट्रॅक्टरचा उद्देश समजू शकतो. पण यात त्यांना देखील शिक्षण देण्याची गरज आहे. ती गिर्‍हाईकांपेक्षा सामाजीक संस्था आणि सरकार देऊ शकते असे वाटते. त्यांना (काँट्रॅक्टर, धंदेवाले यांना ) जर ते "part of the problem" पेक्षा "part of the solution" आहोत तर लक्षणीय फरक पडू शकेल असे वाटते.

@रेवती: तोंडचे पाणी पळाले असे म्हणू का? ;)

@नितिन थत्ते: हँड हेल्ड शॉवरने पाणी कमी लागणे नक्कीच शक्य आहे. तसेच पाणी कमीवापरणारे (लो फ्लो) शॉवरहेड्सचा पण उपयोग होतो. शॉवरमध्ये पाणी वाचवायचे असल्यास अजून एक उपाय म्हणजे गाणी म्हणणे बंद करणे. ;)

अनामिक's picture

23 Mar 2011 - 9:31 pm | अनामिक

उत्तम परामर्श विकास दा.

आपल्याला मिळतंय म्हणून त्याची किंमत नसते. ज्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही त्यांना विचारा म्हणजे महत्व कळेल. एवढ्यातच टिव्हीवर पाहिलेली एक गोष्ट सांगाविशी वाटतेय. कोण्यातरी एका कंपनीने हेटी मधे पोर्टेबल वॉटर फिल्टर्स डोनेट केले. त्याचं प्रात्यक्षि़क दाखवताना, लहान मुलांनी स्वच्छ पाणी प्यायल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि तृप्तता अवर्णनीय होती.

मी स्वतः विज आणि पाणी आवश्यक तेवढीच वापरतो आणि मित्रांनाही सांगतो. इकडे पेपर, प्लास्टीक रिसायकल करणे सहज शक्य आहे. माझी एक मैत्रीण म्हणाली की इट इज इझीयर सेड दॅन डन. पण हे काही खूप अवघड आहे असं मला नाही वाटत. तुम्ही कचरा टाकायला जाताच ना? मग एका एवजी दोन ट्रॅश बॅग नाही नेता येत का? नक्कीच नेता येतात!

आम्ही रहात असलेल्या आधीच्या टाऊनमध्ये रिसायकलींगचे वेगळाले ट्रक येत असत.
सध्याच्या टाउनमध्ये ही सेवा आहे पण नेमके आम्ही राहतो तिथे नाही.
यावर उपाय म्हणून दोन बीन्स (आधी ३ होती, पण काचेचे काढून टाकावे लागले) केलीत.
प्लास्टीक आणि पेपर हे साठवून रिसायकलिंग सेवा देण्यार्‍या भागात जी मैत्रिण राहते तिथे मंगळवारी नेऊन देते. ती बिचारी माझ्यासाठी दर बुधवारी तिच्या रिसायकल बरोबर माझ्याही वस्तू देते.:)

मुक्तसुनीत's picture

23 Mar 2011 - 8:32 pm | मुक्तसुनीत

लेख आणि सर्व प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण. विकासरावानी आताच घेतलेला सर्व प्रतिसादांचा परामर्शही उत्तम.

मुसु रावांशी सहमत.

उत्तम लेख व उत्तम चर्चा.

अभिज्ञ.

विकासदादा, मी चेष्टा करत होते.
टि. व्हीवर सध्या (फक्त अमेरिकेत) दरवर्षी किती प्लास्टीक बाटल्या (कचरानिर्मीती) वापरल्या जातात हे दाखवतात.
ब्रिटा फिल्टरची जाहिरात म्हणून. गेल्या दोन वर्षात निदान ४ ते ६ सुंदर दिसणार्‍या प्लास्टीक किंवा धातूच्या बाटल्या या ना त्या निमित्ताने भेट म्हणून मिळाल्या आहेत (वायएमसीए, नवर्‍याचे हापिस इ.). येत्या उन्हाळ्यात पोलंड स्प्रिंग च्या बाटल्या कमीतकमी वापरण्याचा मानस आहे. त्यानिमित्ताने गुंडाळून ठेवलेल्या नक्षीदार पुनर्वापर करण्याजोग्या बाटल्या बाहेर निघतील. त्या वेळेवेळी स्वच्छ मात्र ठेवण्याचे काम करावे लागेल.

पुष्करिणी's picture

24 Mar 2011 - 1:14 am | पुष्करिणी

उत्तम लेख.

अजून भारतातील शहरांत ( नविन बांधकाम ) आणि पाश्चिमात्य देशांत हमखास होणारी पाण्याची नासाडी म्हणजे फ्लश टॉयलेट्स आणि पेपर टॉवेल्स.

http://www.slate.com/id/2226155/

याबद्दल बराच विचार आणि अमंलबजावणी करण्याची गरज आहे.

सहज's picture

24 Mar 2011 - 6:05 am | सहज

ड्युअल फ्लश सिस्टीम, हाय एफीशियन्सी फ्लश सिस्टीम तसेच सिंक, बाथ व एयरकंडीशनींगचे पाणी रिसायकल करुन फ्लशकडे.

पिंगू's picture

24 Mar 2011 - 5:04 am | पिंगू

च्यायला माझ्या हापिसात उसरिटर्न गाढवे पण पेपर टॉवेल्स आणि फ्लश टॉयलेटचा आग्रह धरतात. त्या मागील कारण काही कळून आले नाही.

मी माझ्यापरीने शक्य तितका योग्य पाणीवापर करतो.

- (जलसाक्षर) पिंगू

वपाडाव's picture

24 Mar 2011 - 10:36 am | वपाडाव

मला सुद्धा असेच वाटते की लहानपणापासुन 'भारतीय' बैठकीच्या शौचालयांचा वापर करणार्‍या पब्लिकला हे सगळं 'न्यान' खूप लौकर आत्मसात होते.
पण तरीही फ्लशचा वापर न करता मगानेच (जग/लोटा) पाणी फेकावे (शक्य असेल तिथे).
राहिली गोष्ट पेपर टॉवेल्सची, ती रिसायकल होउ शकतात.
अवांतर :
@रेवतीजी, अनामिक ::
मी मागील ६-७ वर्षांपासुन शक्य तितके प्लॅस्टिक बॅग्स वापरणे टाळतो. साबण, पेस्ट, ब्रश किंवा यासारख्या लहान-सहान गोष्टी हातातच/कॉलेज्बॅगेत आणतो. लोक/मित्र ह्या वस्तु हातात पाहुन हसणे/उडवणे असे प्रकार करतात, पण सवय झालीए आता.

सहज's picture

24 Mar 2011 - 10:53 am | सहज

फ्लशचा वापर वेगळा, हँड स्प्रे / बीडे (Bidet) चा वापर वेगळा. उगा फेकाफेकी कशाला.

पेपर टॉवेल्स, हँड स्प्रे आणि ड्युअल फ्लश टॉयलेटचा वापर...

हे चित्र पहा.

पण सवय झालीए आता.
अभिनंदन!