२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू भाग ३

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
11 Feb 2011 - 11:10 am

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू भाग १)

(आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जीसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते ................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू भाग २)

जीसी सुनील खेर चार दिवसाच्या सुट्टीवर गेल्या पासून परत आला नव्हता. तो गेल्या पासून आजचा पाचवा दिवस होता. आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईल का परत? सुट्टी वरून उशीराने परत जरी आला तरी आय एम ए च्या नियमानुसार त्याचे काय होईल? त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही जीसी, एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो. त्यातून तो आमच्याच बटालियनचा, आमच्याच कंपनी मधला व आमच्याच प्लटूनचा. मला दोन गोष्टींची काळजी लागून राहीली होती. तो परत येईल का, व तो त्याच्या आईला कोठे सोडणार. त्याची आई घर सोडून कोठे जाइल, कोठे राहील व तीचे कसे होईल.

कोणाला जर का फर्मावले की, तुमचे राहाते घर तडकाफडकी खाली करा व चालते व्हा तर काय वाटेल त्या कुटूंबाला? कोठे राहतील, कसे होईल? त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल? कोणाच्या आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या अशा अचानक घडामोडी पाहील्या की पुर्व संचित म्हणून काही असते का असा विचार डोकावून जातो. वाटते, आपण असतो तर त्यांच्या जागी? त्यांनाच का ही पिडा? जी लोकं संचित मानत नाहीत, ते अशा घडामोडींकडे कसे पाहतात? लॉटरी लागण्या एवढी निसर्गात ही प्रोसेस रॅन्डम असते असे जे संचीत मानित नाहीत ते सुचीत करतात. संचीताला अंधश्रद्धा म्हणून त्याविरुद्ध बोलत राहतात. अंधश्रद्धा मानू नये हे खरे आहे. पण कोणती गोष्ट अंधश्रद्धा मानावी व कोणती नाही हे कोण ठरवणार? डोळस श्रद्धा असते का? का श्रद्धा हाच एक भंपकपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संचित म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांना जर स्वतः उद्या अशा परीस्थीतीला तोंड द्यावे लागले तरी ते निसर्गातील एक रॅन्डम प्रोसेसचा भाग आहे असे समजतील का त्या वेळेला सोयीने त्यांच्या दृष्टीकोनात फरक येईल? ह्याचे उत्तर मी अजून शोधत आहे. संचित जर नसेलच तर अशा घटनांना निसर्ग नियम म्हणून आपण विषय संपवू शकतो का. अशा घटना काहींनाच का भोगाव्या लागतात ह्या प्रक्रियेला काही नाव व कारण देऊ शकतो का.

सुनील खेर गेल्या पासून आमच्या डोक्यात एकच विषय – त्याचे काय झाले व आय एम एत परतला तर काय होणार.
आमच्या रोजच्या कार्यक्रमात सुनील गेल्याने काही बदल झाला नाही. नाही म्हणायला आमचा डि एस कॅप्टन गिल आम्हाला सांगून गेला होता की सुनीलच्याबद्दल काहीही माहीती समजल्यास त्वरीत कळवा. सुनील सुट्टीवर गेल्याच्या सहाव्या दिवशी जीसी सुनीलच्या खोलीत आम्हाला दिवा लागलेला दिसला. आमच्या जिवात जीव आला. आम्ही पि टी परेड ला जायच्या आधी त्याला भेटलो. कॅप्टन गिलनी निरोप पाठवला की जीसी सुनीलला आठ वाजता कंपनी कमांडरने त्याच्या ऑफीस मध्ये बोलावले आहे. आम्हाला त्याच्याशी बोलून गेल्या सहा दिवसांचा हिशोब घ्यायला वेळच नव्हता. तो आम्ही संध्याकाळसाठी सोडला, व आम्ही पि टी परेडला गेलो. त्याचे रेलीगेशन होणार का त्याला काढून टाकणार अशा अटकळी लावे पर्यंत संध्याकाळ झाली. जीसी सुनील दिवसभर दिसला नाही. संध्याकाळी जेवायच्या वेळेला भेटला. खुप थकल्या सारखा वाटत होता. पण चिंता कमी झाली होती. आम्ही आतूर होतो त्याच्या दोन्ही गोष्टी ऐकायला. एक तर तो सूट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा आला होता व त्यामूळे बटालीयन कमांडरने त्याचे काय केले हे ऐकायचे होते व दूसरे त्याच्या आईचे काय झाले, सुखरुप आहे का कशी आहे. ह्या दोन्ही गोष्टी ऐकूया त्याच्याच शब्दात...............

ज्या दिवशी भदराजवरून आल्यावर मला आईची तार मिळाली व त्या नंतर सुट्टी मिळत नाही असे कळले तसा मी खुप उदास झालो. कर्नल कटोच ह्यांचा भयंकर राग आला होता. आईची आठवण येत होती. काळजी लागली होती. कशातच लक्ष लागत नव्हते. डोक्यात गोंधळ उडाला होता. संध्याकाळ झाली तसा एक एक क्षण एक तासा सारखा जाणवत होता. शांत राहा, १ ते १० मोजा, उलटी गिनती करा, देवाचे नाव घ्या, डोळे मिटून स्वस्थ बसा हे सगळे डोके शांत ठेवण्यासाठी करायचे उपाय माहीत असून राहून गेले. हे उपाय करायचे सुद्धा स्वारस्य राहीले नव्हते. मलाच माहीत होते काय परिस्थीती होती खोऱ्यात ती. सगळ्यात वाईट वाटत होते ते कर्नल कटोच ह्यांचा माझ्या सुट्टी मागण्याच्या कारणावर विश्वास बसला नव्हता ह्या गोष्टीचा. खोऱ्यातले वातावरण हळू हळू बदलायला लागले होते. रोज जवळच्या मशिदीतून प्रक्षोभक भाषणे सुरू झाली होती. रोज कोणते न कोणते काश्मिरी हिंदू कुटूंब खोरे सोडून जाण्याचा विचार करत होते व जात होते. तेव्हा आम्हाला काय माहीती होते की काश्मिरी हिंदूंचे खोरे सोडून जाण्याच्या ह्या प्रक्रियेचा शेवट सगळ्यात मोठ्या विस्थापनात होणार आहे ते. ह्या आधी सहादा असे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंचे स्थलांतरण झाले होते. पहीले स्थलांतरण तेराव्या शतकात झाले – सुलतान शमसुद्दीनने मोठ्या प्रमाणात हिंदूं मंदिरांची तो़ड फोड करून हिंदूंना धाक दाखवून पळवून लावले असा इतिहास आहे. १४ व्या शतकात दुसरे व तिसरे स्थलांतरण, सुलतान अली शाहच्या जाचक सुलतानशाहीने उद्भवले. त्याने पहील्यांदा काश्मीर मध्ये हिंदूंवर झिझीया कर सुरू केला. १४ व्या शतकातच पूढे मीर शमसुद्दीन इराकी ह्या नवाबाने जोर जबरदस्तीने हजारो हिंदूंना पळवून लावले. चवथे व सगळ्यात मोठे स्थलांतरण १६ व्या शतकातले. औरंगझेबच्या बादशाहीत झाले. ह्या बादशहाशी लढता लढता शिखांच्या नवव्या गूरुंना गुरू तेग बहादूरांना प्राणाना मुकावे लागले होते. हा औरंगझेबच्या काळातील इतिहास पाहाता असे वाटते की जसे महाराष्ट्राला शिवाजी राजे मिळाले तसे काश्मीरला लाभले असते तर कदाचीत इतिहास काही वेगळा झाला असता. पण काश्मिरी हिंदूंपेक्षा महाराष्ट्रातल्या हिंदूंचे नशिब जास्त बलवोत्तर होते असेच म्हणावे लागेल. पाचवे स्थलांतरण, १७ व्या शतकात मुल्ला अब्दुल ह्याच्या नवाबीत झाले. सहावे स्थलांतरण, अफघाण सुलतांनांच्या क्रूर कारवायांमुळे झाले. १९८९-९० सालातले सातवे स्थलांतरण पाकीस्तानच्या ऑपरेशन टोपूक मुळे होत होते. ते त्यावेळेला आम्हाला अवगत नव्हते. कोणालाच माहीत नव्हते. कोठल्याही देशा पुढील समस्येवर देशातल्या जनतेचा मानसिक दृष्टीकोण बदलायला वेळ लागतो. खुपदा लोकांना समजे पर्यन्त वेळ निघून गेलेली असते. ह्या सगळ्या सहा स्थलांतरांने जे एकेकाळी काश्मीर मध्ये फक्त हिंदूच होते ते कमी होत होत, १९४८ मध्ये फक्त १० टक्के राहीले. हिंदूंची संख्या सातव्या स्थलांतरानंतर १ टक्का राहीली. ज्या समाजाला इतिहासाचा विसर पडला तो समाज संपला हे आम्हाला सातव्यांदा कळणार होते. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच फक्त सत्य आहे बाकी ह्या कलीयुगात सभ्यता वगैरे सोयीच्या गोष्टी आहेत. आपल्या जवळ ती लाठी का नसते कधी. सभ्यतेखातर आपण लाठी सोडली हे खरे पण त्याचबरोबर दुसरे सोडतात की नाही हे पाहीले नाही. दुसऱ्याने जर लाठी घेतली असेल व आपल्यावर उगारत असेल तर तेवढ्या पुरती तरी आपण लाठी घेतली पाहीजे नाहीतर शतकानुशतके आपण असेच भरडले जाणार. पुर्वी क्रृर सुलतानशाही होती आता एक क्रृर असे शेजारी राष्ट्र आहे.

१९८९ च्या सुरवातीला हिंदूंचे एखाद दुसरे कुटूंब सोडून गेल्याचे ऐकीवात होते. त्यात हळू हळू वाढ होऊ लागली. अतीरेकी प्रेरित हिंदूंच्या स्थलांतराची मोहीम पाकिस्तानच्या ऑपरेशन टोपूक प्रमाणे कशी घडत आहे ती आमच्या लक्षात यायला लागली. अतिरेक्यांचा डाव एकदम चपखल बसला होता. खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण करायचे. कोठच्यातरी गल्लीतल्या एका दोघा तरुणाला किंवा काश्मिरी हिंदूला मारायचे. त्याचे परिणाम लागलीच त्या गल्लीतल्या इतर हिंदूंवर व्हावयाचे. गर्भगळीत अवस्थेत ती गल्लीची गल्ली रिकामी होऊन खोरे सोडून जायची. ह्याच बरोबर सतत मशिदीदतून होणारी प्रक्षोभक भाषणे एक प्रकारचे भयानक तणावाचे वातावरण निर्माण करायचे. त्यात हिंदूना काफिर म्हणवून त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारण्याची मुस्लीम जनतेला हाक असायची. खोऱ्यात अशा प्रकारचा तणाव कायम आसायचा. कधी कोणा हिंदूला पळवून धाक निर्माण करायचा. कोणा हिंदूचे घर जाळून त्या गल्लीतल्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे, असे वारंवार घडू लागले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, राज्याचे प्रशासन दिलासा वाटण्यासारखे काही करत आहे असे आढळत नव्हते. तो विश्वास राहिलाच नव्हता. अतिरेक्यांना फार काही करावे लागायचे नाही. गल्लीतल्या कोणा हिंदूला मारले की गल्लीतले सगळे हिंदू आपले सामान घेऊन पसार व्हायचे. त्यामुळे जर कोणी मानव हत्या किती झाली ह्यावरच फक्त क्रुरता ठरवणार असेल तर मानव हत्या फार झाली नाही. साधारण २५० ते ३०० हिंदूंची हत्या झाली असेल. पण महीलांवर सततचे अत्याचार करून, हिंदूंना पळवून नेउन, धाक धप्पटशहा दाखवून, घाबरवून लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून स्थलांतरण करायला अनावृत्त केल गेले. वाईट ह्याचेच वाटत होते की पाकिस्तान हे हिंदूंना पळवून लावायचे व इथल्या मुस्लीम जनतेला चिथवण्याचे काम त्यांचे परराष्ट्रधोरण म्हणून ऑपरेशन टोपूकच्या नावा खाली राबवत होता, व आपल्या सरकारला हे समजत नव्हते. इथले मुस्लीम पण जिहादाच्या नावाखाली भरकटून जात होते व काश्मिरी हिंदूंच्या विरुद्ध शस्त्र घेऊन सज्ज होत होते. तशातच कलम ३७० लागू होते. त्यामुळे काश्मिरात एकीकडे कोणाला स्थायिक होता यायचे नाही व दुसरीकडे हजारोंच्या संख्येने असलेले काश्मिरी हिंदू लोकं खोरे सोडून जात होते. त्यामुळे साहजिकच खोऱ्यातल्या काश्मिरी हिंदूंच्या संख्येत घट पडत चालली होती.

संध्याकाळी कॅप्टन गिल माझ्या रुमवर आला. तो म्हणाला बटालीयन कमांडरला अजून सुद्धा वाटते की जीसी रोजच्या आय एम एच्या रगड्यातून काही दिवस सुटण्यासाठी हा कांगावा करत आहे. १९८९ च्या सुरवातीच्या काळात काश्मीरच्या बाहेर काश्मीरच्या स्थितीवर अगदी त्रोटक बातम्या यायला लागल्या होत्या. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या विस्थापना बरोबर उत्पन्न होणाऱ्या अडचणी, काश्मिरी हिंदू कुटूंबियांना झेलावे लागणारे प्रश्न ह्या बिकट परिस्थीतीशी बाकीची जनता अवगत नव्हती. काश्मीर बाहेर राहणाऱ्यांच्या कानावर पडणाऱ्या बातम्यांनी काश्मीर मधली खरी स्थिती किती गंभीर रुप घेत आहे हे त्या लोकांना समजले नव्हते. ह्याचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर व काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर होत होता. माझ्या सुट्टीच्या अर्जात दिलेल्या कारणा बद्दल सुद्धा हेच झाले असावे. बटालियन कमांडरच्या दृष्टीने माझा सुट्टीचा अर्ज अवाजवी होता. ह्या उलट कॅप्टन गिल जरी कठोर होता तरी आमचा प्लटून कमांडर असल्या मुळे आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ भेटायचा. आमचे प्रश्न तो जाणायचा.

तो मला म्हणाला की - संध्याकाळी बटालियन कमांडरने मला परत बोलावले होते. मी त्यांना सांगितले की जी सी सुनील खेरच्या घरची परिस्थिती गंभीर आहे. त्याचे वडील आधीच अतीरेक्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत व अजूनही बेपत्ता आहेत. आता हीच परिस्थिती त्याच्या आईवर येऊन ठेपली आहे. कर्नल कटोच ह्यांनी फक्त माझ्या शब्दाखातर तुला चार दिवसाची सुट्टी देऊ केली आहे. चार दिवसात परत ये नाहीतर मी दिलेला शब्द वाया जाईल. कॅप्टन गिलने चार दिवसाच्या सुट्टीचे पत्र माझ्या हातात दिले व म्हणाला सुट्टी जरी उद्या पासून सुरू होत आहे तरी आजच रात्री जायची परवानगी तुला देतो. माझ्या जिवात जिव आला. हूरुप आला. आता एक नवा प्रश्न उभा राहीला माझ्या समोर. चार दिवस – ह्या चार दिवसात डेहराडूनहून खोऱ्यात जायचे व आईचा राहण्याचा कोठेतरी बंदोबस्त करून परत यायचे. भदराजचा कॅंप मला ह्याच्या पुढे एकदम सोपा वाटायला लागला.

मला सुट्टी तर मिळाली आता चार दिवसात येण्याचा आराखडा ठरवत मी माझे मोजकेच सामान बांधले. मित्रांकडून काही पैसे उसने घेतले व रात्रीच्या बसने डेहराडूनहून निघालो. दिल्लीहून जम्मूला सुट्टीच्या पहील्या दिवशी रात्री पोहोचलो. कॅप्टन गिलने रात्रीच जाऊ दिले होते म्हणून बरे झाले नाहीतर अजूनच वेळ लागला असता. जम्मू ते श्रीनगर ह्या एक दिवसाच्या रस्त्याला दोन दिवस लागले पोहोचायला. बर्फवृष्टी मुळे बनीहाल घाटात असणारा जवाहर बोगदा बंद होता. त्यामुळे एक रात्र रामबन येथेच काढावी लागली होती. जवाहर बोगदा थंडीत नेहमीच असा मधून मधून बंद असतो. रामबनला थांबणे माझ्या जिवावर आले होते. कारण सुट्टीचा एक दिवस वाया जाणार होता. मजल दर मजल करत तिसऱ्या दिवशी सकाळी मी घरी पोहोचलो. मला बघून आईला आनंद व थोडे आश्चर्य वाटले. तिला वाटले नव्हते मला सुट्टी मिळेल असे. आम्हाला एकमेकांशी आय एम एतल्या गोष्टी करायला वेळच नव्हता. राहाते घर सोडून जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आईला खूप वाईट वाटत होते. सामान कसे घेऊन जायचे हा प्रश्न होता. वडीलांचा अजून पत्ता नव्हता. शेवटी आम्हाला दोघांना नेता येईल ईतकेच सामान घेऊन जायचे असे ठरले. मग सामान बांधायला वेळ लागला नाही.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो ......... ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)

http://rashtravrat.blogspot.com

इतिहासकथासमाजराजकारणलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

चावटमेला's picture

11 Feb 2011 - 11:32 am | चावटमेला

मागील भागांप्रमाणेच अतिशय छान आणि उत्कंठावर्धक लेख..

रणजित चितळे's picture

13 Feb 2011 - 11:08 am | रणजित चितळे

आपल्याला धन्यवाद

गणेशा's picture

11 Feb 2011 - 12:55 pm | गणेशा

निशब्द झालो...

आपले लेखन उत्कृष्ठ आहे म्हणायचे की ती भयानक परिस्थीती बद्दल राग व्यक्त करायचा काहीच कळत नाहिये.
आपल्या कथेमुळे माझ्या मनातील काश्मीर बद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळत आहे..
उत्तरे मिळत आहेत पण त्यांची भेदकता खुप जास्त आहे.. ती भेदकता फक्त बसुन सहन करण्यासारखे लज्जास्पद काही नाही असे ही मन म्हणत आहे..

लिहित रहा... वाचत आहे...

पैसा's picture

11 Feb 2011 - 7:33 pm | पैसा

लिखाण एकदम उत्कंठावर्धक होतंय.

रणजित चितळे's picture

13 Feb 2011 - 11:04 am | रणजित चितळे

पैसा आपल्याला धन्यवाद

रणजित चितळे's picture

13 Feb 2011 - 10:44 am | रणजित चितळे

धन्यवाद गणेशा साहेब

नितिन थत्ते's picture

11 Feb 2011 - 12:53 pm | नितिन थत्ते

चांगले उत्कंठावर्धक वर्णन.

विषयावर केंद्रित राहिले तर अजून उत्तम होईल.

रणजित चितळे's picture

13 Feb 2011 - 10:21 am | रणजित चितळे

धन्यवाद थत्ते साहेब

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 1:27 pm | मुलूखावेगळी

सुन्न झालेय वाचुन .
पुढील वाचण्यास उत्सुक.
लवकर येउ देत.

रणजित चितळे's picture

13 Feb 2011 - 11:14 am | रणजित चितळे

आपल्याला धन्यवाद

कर्नलसाहेब,
अंगावर शहारे आणणारे वर्णन आहे! पण पाकिस्तान झाल्यावर तिथून हिंदू पळून आले पण इथले मुसलमान मात्र इथेच राहिले. याचे श्रेय हिंदूंच्या सहिष्णू वृत्तीला कीं मुसलमानांच्या लढाऊ प्रवृत्तीला? खोर्‍यात हिंदू जनता कोट करून, शस्त्रे बाळगून कां नाहीं तिथेच राहिली असे प्रश्न मनात येतातच. (अर्थात् 'युद्धस्य कथा: रम्या:' किंवा 'सर सलामत तो पगडी पचास' यासारखी सुभाषितें माहीत आहेतच!)
लेखामधील तुमचे श्रद्धा वगैरेवरील चिंतन वाचून टॉम क्लॅन्सीच्या लेखनाची आठवण झाली. त्याची पुस्तके वाचली नसतील तर जरूर वाचा!
पुढच्या लेखांची वाट पहात आहे.

रणजित चितळे's picture

13 Feb 2011 - 10:49 am | रणजित चितळे

धन्यवाद काळे साहेब

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Feb 2011 - 1:25 pm | निनाद मुक्काम प...

कथेच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला जात आहे
ह्याबद्दल आभार .
वृत्त पत्रांवर आधारित बातम्या नि प्रत्यक्षातील वास्तव ह्यातील दाहकता दिसून येत आहे .
पु ले शु