२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
28 Jan 2011 - 6:42 pm

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)

आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जीसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत. आज पर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. हल्ली त्याच्या कुटुंबाने वडील परत भेटण्याची आशा सोडून दिली आहे.

तो आम्हाला काश्मीर बद्दलच्या गोष्टी सांगायचा. तो पर्यंत मला लोकसत्ता, म टा ह्या नियतकालिकामधून व वेगवेगळ्या मासिकातून वाचलेला तपशील एवढीच काय ती काश्मीर बद्दलची माहिती होती. आय एम ए च्या मुलाखती साठी केलेली तयारी, ती पण अशी तशीच. थोडक्यात काश्मीर प्रश्ना विषयी एकदम तोडकी कल्पना होती. मला इंडियन एक्सप्रेस नियतकालीकेत, १९८६- ८७ मध्ये छापून आलेला काश्मीर विषयीचा लेख वाचल्याचे आठवत होते. त्यात निवृत्त ब्रिगेडियर एन बि ग्रॅन्ट ह्यांनी लिहिले होते की १९४८, १९६५ आणि १९७१ मध्ये भारत पाक युद्धांमधून झालेल्या पाकिस्तानच्या जबरदस्त पराजयाचा धक्का पाकिस्तानाला सतत सतावत असतो. पाकिस्तानाला कळून चुकले आहे की, भारता बरोबर सरळ युद्ध केल्याने त्या देशाची वित्त व मनुष्य हानी फार होते आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करून पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटलीजन्स (आय एस आय) ने एक नवी योजना आखली आहे. त्या योजने नुसार सरळ युद्धा पेक्षा अतिरेकी संघटना उभारून भारत आतून पोखरून टाकायचा. मग अशा पोखरून अशक्त भारताला हरवायला वेळ लागणार नाही. योजना चार पदरी कार्यक्रमावर आधारित अशी राबवायची. पाहिला पदर – काही काश्मिरी युवकांना भडकवून पाक व्याप्त काश्मीर मध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन अतिरेकी बनवणे. काश्मीर मधल्या भारत पाक युद्ध विराम सीमे (लाइन ऑफ कंट्रोल) मधून अशा अतिरेक्यांना खोऱ्यात धाडायचे. एकदा अतिरेकी आत घुसले की मग त्यांचे थैमान चालू द्यायचे. अशा अतिरेक्यांना एके ४७, हॅन्ड ग्रेनेड्स व तत्सम साधन सामुग्री पुरवायची. दुसरा पदर – जम्मू काश्मीर राज्य प्रशासन अतिरेकी कारवायांनी व अतिरेकी फतव्यांनी खिळखिळे करायचे. तिसरा पदर – काश्मिरी हिंदूंना पहिल्यांदा खोऱ्यातून व नंतर उधमपूर जम्मू मधून हुसकवून लावून काश्मिरी हिंदूंची संख्या नगण्य करायची. त्याच युक्तीचे पुनरावर्तन कारगिल व त्याच्या वरती लडाख भागात मग करायचे. शेवटचा चौथा पदर – काश्मिरी मुस्लिम जनतेला भारता विरुद्धं जेहाद साठी उत्तेजित करायचे.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा जीसी सुनील खेरच्या रूपाने प्रत्यक्ष काश्मिरी हिंदू भेटला तेव्हा काश्मीर संबंधी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. आम्ही वेळ मिळेल तेव्हा सुनील खेर व अजून एक काश्मीरचा राहणारा जीसी हिरालाल गाडरू ह्या दोघां कडून काश्मीरच्या स्थिती बद्दल चौकशी करायचो. हिंदूंची होणारी गळचेपी व ससेहोलपट खरेच होते का, हे आम्हाला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा असायची. त्या दोघां कडून आम्हाला कळले की काश्मिरी हिंदूंची घरे रोज कशी जाळली जात आहेत व धमक्या कशा मिळत आहेत ते. आम्ही जीसी सुनीलला नेहमी सांगायचो की आईला घेऊन दुसरीकडे राहा म्हणून आणि त्यालाही तसे राहायचे होते पण दुसरीकडे राहायला लागणारे पैसे नव्हते व त्याची आई तयार नव्हती काश्मीर सोडायला. काश्मीर सोडून दुसरी कडे राहायचे म्हणजे काश्मीर मधले घर विकावे लागणार होते. दुसरी कडे म्हणजे कोठे स्थायिक व्हायचे हा प्रश्न होताच त्याला सतावणारा. आता पर्यंत खोरे सोडून कोठेही गाडरू कुटुंब राहिले नव्हते. त्यातून वडील सापडत नाहीत ह्याची सतत मनाला खंत लागून राहिलेली. सैन्यात जाऊन अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे सुनीलचे स्वप्न होते. सैन्यात राहायला सरकारी घर मिळते हे कळल्यावर तर सुनीलला त्याच्या अडचणीचे उत्तरच सापडल्या सारखे झाले होते. म्हणूनच जरी आई एकटी राहणार असली तरी तो तिच्याशी भांडून आय एम ए मध्ये दाखल झाला होता. आय एम ए चे शिक्षण पूर्णं करूनच आता घर बदलायचे असे त्याने ठरवले होते.

काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्यावेळेला मला पहिल्यांदा समजले. जीसी हिरालाल गाडरू (हा जीसी, वर्ष भर आम्हाला त्याच्या आडनावाचा उच्चार बरोबर कसा करायचा हेच शिकवीत राहिला व आम्हीही मुद्दामून त्याला गदरू असे बोलवत राहायचो. हा खेळच झाला जणू काही. शेवटी त्याचे नाव जीसी हिरालाल गाडरू ऐवजी - जीसी हिरालाल गदरू नहीं गाडरू - असे लांबलचक पडले. वीस वर्षांनी जेव्हा त्याची भेट पुन्हा झाली तेव्हा मी त्याला ह्याच नावाने संबोधले होते. ) ह्या गाडरू च्या वडलांची लाकडाची वखार होती ती जाळली होती अतिरेक्यांनी.

अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने टेलिव्हिजन वर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण तेवढेच दिसायचे. आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथ पर्यंत पोहचायचे नाही. लहानपणा पासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले. त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम. काश्मीर हून जम्मू भागाला जोडणारा असा एकच रस्ता – जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन. थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद व्हायचा. त्यामुळे एन एच वन बंद व आवक जावक बंद. रेल्वेचा प्रवास तर अजून सुद्धा नाही श्रीनगरला. ह्याच्या उलट पाक व्याप्त काश्मीर कडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे. काश्मीर खोऱ्यातल्या लोकांचे नातेवाईक व लग्न संबंध असायचे पाक व्याप्त काश्मिरात.

ह्या सगळ्याचा परिणाम काश्मिरी हिंदू मानसिकतेवर होत होता व अजूनही होत आहे. भोवतालची लोकवस्ती आपल्या बरोबर नसेल तर केवढी पंचाईत होते सगळ्या बाबतीत. आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकल्या सारखे वाटायला लागते. काश्मिरात त्या वेळेला अशी परिस्थिती होती की साधे घरा बाहेर सुद्धा पडता यायचे नाही. दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश सतत असायचे. दोन दोन महीने कर्फ्यू चालायचा. शाळातर नेहमीच बंद असायच्या. बऱ्याच शाळा हळूहळू सशस्त्रबलांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली होती. त्यांना तिथे छावण्या लावायच्या होत्या. सतत हिंदूंची घरे जाळणे, त्यांना पळवून नेणे, त्यांना धाक दाखवून घरे खाली करायला लावणे, त्यांना नोकऱ्या न देणे, मुली व महिलांवर अत्याचार होणे हे सगळे प्रकार हळूहळू १९८९ मध्ये वाढायला लागले होते. त्या मुळे जरी ती लोकं काश्मिरी हिंदू असली तरी बाकीच्या हिंदूंपेक्षा खूपच दूरचे झालेले व दुरावलेले असे होते. मानवी हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) त्या वेळेला मूग गिळून बसले होते का काय कोण जाणे.

आम्हाला कोर्स मध्ये आठ महीने झाले होते. आम्ही ८ दिवसांच्या भदराज कॅम्पला गेलो होतो. हा कॅम्प डोंगराळ प्रदेशात युद्ध कसे करायचे ह्या शिक्षणाचा भाग म्हणून असतो (माउंटन वॉरफेअर ट्रेनिंग). संपूर्ण कोर्स ४ बटालियनस मध्ये विभागलेला असायचा. ह्या ४ तुकड्यांचे नेतृत्व आलटून पालटून कोण्या जीसी वर सोपोवले जायचे. भदराज ह्या कॅम्प साठी त्या त्या तुकडीचा तेवढ्या वेळे पुरता नेमून दिलेला जीसी मग सेनापती असायचा. माउंटन वॉरफेअर संबंधी आय एम ए मध्ये जे काही शिकवले ते उपयोगात आणून भदराज वर धावा बोलायचा.

डेहराडूनहून मसुरी चे डोंगर दिसतात. त्या डोंगरांच्या रांगेतला भदराज नावाचे सगळ्यात डावीकडचे शिखर. त्या शिखरा वरती एक मंदिर आहे. भदराज साधारण ५५०० फुटा उंचीचा. त्या पर्वतराशीला लोअर हिमालयन रेंजेस असे म्हणतात. ते शिखर सर करून परत आय एम ए मध्ये यायचे. चारही बटालीयन् स मध्ये चुरस. जी बटालीयन भदराज सर करून पहिल्यांदा आय एम ए त पोहोचेल ती जिंकली. त्या बटालीयनला भदराज चषक मिळायचा. भदराज चढायला रात्री सुरवात करायची. पूर्णं युद्ध पोषाखात – जंगलात घालतात ते कॅमोफ्लॉज कपडे, तोंड ब्ल्यांको ने काळे केलेले, पाठीवर मोठा पॅक त्यात अत्यावश्यक लागणारे सामान. भूक शमवण्यासाठी शक्करपाऱ्याच्या वड्या, टेंट बांधण्यासाठी आवश्यक असे ताडपत्रीचे बिवोक, एक दुर्बीण व चुंबकीय कंपास. ह्या सगळ्याचे वजन साधारण १५ किलो भरायचे. कमरेच्या पट्टयाला लागलेली अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली. तेवढेच काय ते पाणी (माहीत नसलेल्या ठिकाणाहून पाणी पिण्यास सक्त मनाई कारण शत्रूच्या इलाक्यात शत्रूने इलाका सोडून पळताना विहिरींमध्ये विष घालून ठेवले असेल तर जिंकलेला इलाका पाण्याच्या लोभापायी घालवावा लागेल. आपली माणसे मरतील ते वेगळेच). हातात गवत कापण्यासाठी दाह किंवा खुरपे व खांद्यावर साडे पाच किलो वजनाची आता पर्यंत अंगाचाच भाग झालेली अशी रायफल. पहाटे पर्यंत भदराज सर करून आपला तिरंगा फडकवून आय एम ए कडे परत यायला लागायचे. परतीचा रस्ता दिलेल्या नकाशा वरून थोधत. असा तो भदराजचा कॅंप. साधारण ४० किलोमीटर चा तो शेवटचा मार्च म्हणजे चिकाटी, ताकद, शिस्त, धाडस, नेतृत्व व तुकडीतले सामंजस्य ह्या वर अवलंबून असायचे. परतताना आमच्या मानेकशॉ तुकडीचे नेतृत्व जीसी रोहित वर्मा ह्यावर सोपोवले गेले होते. आम्ही नकाशे पाहत आमच्या गटातल्या साथीदारांसह आय एम एत परतलो. ४० किलोमीटर चालून आल्याने सगळे जीसी दमले होते. पण साथिदारां बरोबर चालताना एवढे दमलो असे वाटत नाही. कदाचित एकट्याला एवढे अंतर जड गेले असते. पंढरपूरच्या वारीचे पण तसेच असेल. ग्यानबा तुकारामाचा गजर व आजूबाजूला वारकऱ्यांचा मेळा ह्या मुळे तेच अंतर समजून येत नाही, सहनिय होते व उलट आनंद मिळतो.

पोहोचल्या बरोबर शस्त्रागारात आपआपल्या रायफली, दुर्बिणी व चुंबकीय कंपास जमा झाल्यावर आमचे स्वागत गरम गरम चहा व बिस्किटांनी झाले. हा प्रत्येक कॅंप चा आमचा सगळ्यात आवडणारा भाग असे. आम्ही आतुरतेने ह्या मेजवानीची वाट बघायचो. आमचे शिक्षक कॅप्टन गिल - आय एम ए मध्ये अशा शिक्षकाला डायरेक्टींग स्टाफ (डी एस) असे संबोधले जाते. आमच्या डी एस ह्यांनी त्या दिवशीचे बाकीचे आय एम ए चे कार्यक्रम आमच्या साठी रद्द झाल्याची घोषणा करताच सगळ्या जीसी कडून उत्फुर्त पणे माणेकशॉ बटालीयन की जय निघाले. आमचे अर्धे दमणे तेथेच विरून गेले. आता प्रत्येक जण त्यांना आलेल्या पत्रांचे वाचन करण्यात गुंग झाला. १९८९ मध्ये मोबाईल काय असते ते कोणालाच माहीत नव्हते व दूरध्वनी सेवा नुकतीच सुरू झाली असल्या कारणाने ती फक्त आय एम एच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्येच असायची अन तेथे जायचे म्हणजे काही सोपे नव्हते. त्या मुळे आम्ही व आमचे आप्तेष्ट ह्या मध्ये असणारा पत्र हा एकच दुवा होता.

मी माझ्या आईचे पत्र संपवतच होतो तेव्हा माझ्या कडे जीसी सुनील खेर व जीसी हिरालाल गाडरू आले. सुनीलचा रडवेला चेहरा पाहून मी काय झाले म्हणून विचारले. मला म्हणाला – आईला अतिरेक्याचा धमक्या आल्या आहेत व त्यांनी महिना अखेर पर्यंत घर सोडायला सांगितले आहे. त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले. एक तर घर सोडून ती अशी एकटी जाणार कोठे. खोऱ्या बाहेर नवे घर घ्यायला पैसे नाहीत. असलेले घर विकता येत नाही अशी काश्मीर खोऱ्यात परिस्थिती आणि हे सगळे करायला सुनीलला सुट्टी कोण देणार व कशी मागणार सुट्टी. आमचा डि एस, कॅप्टन गिल असा कर्दन काळ होता की त्याच्या कडे जाणे म्हणजे शिक्षा घेऊनच येणे असे होते. आम्ही काही बोलायच्या आधीच, तो आमच्या चुका काढायचा. आमच्या पोशाखात जरा जरी खोट सापडली तर तेथेच आमची रोलिंग सुरू. आता हे रोलिंग काय तंत्र आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्या वर कोलांट्या उड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्या उड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे. आता हे रोलिंग कधीही कोठेही व कोणच्याही कपड्यांमध्ये होऊ शकते. आम्ही रोलिंग अंडरवेअर (फक्त) पासून कोट टाय मध्येही केलेले आहे. रस्त्यावर, खेळाच्या मैदानावर, उथळ वाहणाऱ्या टॉन्स नदीच्या पात्रात, ड्रिल स्क्वेअर मध्ये भर दुपारी असे वाटेल तिथे केलेले आहे. त्या मुळे आम्ही शक्यतोवर आमच्या डि एस कडे जायचे टाळायचो. पण आजचा दिवस वेगळा होता. एक तर आमच्यावर कॅप्टन गिल खूश होता कारण माणेकशॉ बटालीयन भदराज मध्ये सगळ्या बटालीयन् स मधून पहिली आली होती व म्हणूनच त्या दिवशी सुट्टी मिळाली होती. बाकीच्या बटालीयन् स आल्या आल्या कपडे बदलून पुढच्या कार्यक्रमाला लागल्या होत्या. धीर धरून आम्ही कॅप्टन गिल कडे गेलो. घाबरत घाबरत सुनीलने सगळे सांगितले. कॅप्टन गिलला सुनीलची घरची सगळी परिस्थिती माहीत होती. त्या मुळे त्याने सगळे नीट ऐकून घेतले. आज आमच्या पोषाखाची खिल्ली उडवली गेली नाही व शिक्षेचे नावही निघाले नाही. सगळे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला – मी समजू शकतो तुला सुट्टी हवी आहे. तू सुट्टी चा अर्ज लिही मी शिफारीश करतो बाकी पुढचे कंपनी कमांडर व बटालीयन कमांडर वर अवलंबून आहे. मी पण तुझ्या सुट्टी बद्दल त्यांच्याशी बोलेन. सुनीलने वेळ जायला नको म्हणून डि एस कडे जाण्या अगोदरच लिहून ठेवलेला अर्ज पुढे केला. कॅप्टन गिलने लागलीच त्याची शिफारिश लिहून तो कंपनी कमांडर कडे स्वतः गेला. सुनीलला रात्री कंपनी कमांडर कडून निरोप आला की त्याला बटालीयन कमांडरने मुलाखती करता सकाळी बोलावले आहे. आमचा डि एस कॅप्टन गिल ह्यांच्याशी रोजच्या रोज संबंध यायचा. पण कंपनी कमांडर मेजर शेखावत कडे जाण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रसंग गेल्या आठ महीन्यात क्वचितच आला होता. बटालियन कमांडर चे डर तर मग विचारुच नका. त्याचे ऑफिस जेथे असायचे तो रस्ता आम्हा जीसीज ना रहदारी साठी बंद होता. त्या रस्त्या वरून आम्हाला जाता यायचे नाही. आम्ही बटालीयन कमांडरला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा कॅंपस च्या वेळेला पाहीले होते. कर्नल कटोच नाव होते त्यांचे. ज्या जीसीच्या हातून त्यांच्या गेल्या जन्मात घोर पापे घडली असावीत तेच जीसी बटालीयन कमांडरच्या ऑफिस मध्ये जायचे असे काहीसे चित्र होते. ज्यांचे रेलीगेशन होणार असायचे त्यांनाच फक्त तो एकदा भेटायचा हे सांगायला की तु रेलिगेट झालास म्हणून. हे सांगायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कोणताही जीसी त्याच्या ऑफिस मध्ये दोन मिनटा पेक्षा जास्त वेळ कधीही उभा राहिला नव्हता. त्या मुळे जीसी सुनील खुप घाबरला होता. जेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटला तेव्हा त्याचा चेहेरा अजूनच रडवेला झाला होता. तो म्हणाला बटालीयन कमांडर ने सुट्टी चा अर्ज रद्द केला. म्हणाला हे काही कारण होत नाही सुट्टी मागायला. आम्हाला राग आला व खुप वाईट वाटले. जीसी सुनील खेर तर वेडापीसा झाला होता. खूप शिव्या घातल्या बटालियन कमांडरला. त्याला त्याच्या आई व्यतीरिक्त कोणीच दिसत नव्हते.

त्या संध्याकाळी कॅप्टन गिल आमच्या बरॅक मध्ये सुनीलला येऊन भेटला. सुनील म्हणाला त्याला पण खूप वाईट वाटत होते अर्ज रद्द झाल्या बद्दल कारण त्याने सूनीलच्या सुट्टी साठी कंपनी कमाडरला स्वतः भेटून जीसी सुनील वर बेतलेल्या संकटा बद्दलची कल्पना दिली होती.

कॅप्टन गिल ला संध्याकाळी भेटल्या पासून जीसी सुनील खेर मध्ये आम्हाला अचानक एक बदल जाणवला. तो जरी दुःखी होता तरी त्याचा रडवेला चेहरा जाऊन निश्चयी बनला होता. त्याचा चेहरा निग्रही वाटत होता जसा काही त्याला त्याच्या वर बेतलेल्या संकटावर तोडगा सापडला आहे असा.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com

धर्मइतिहासकथासमाजराजकारणविचार

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

28 Jan 2011 - 6:45 pm | नन्दादीप

वाचतोय....पु.भा.ल.टा.

पैसा's picture

28 Jan 2011 - 10:29 pm | पैसा

कुठे वाचायला न मिळणारी कथा. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

आत्मशून्य's picture

28 Jan 2011 - 10:33 pm | आत्मशून्य

पूढील भाग लवकर टाकावा.

संजय अभ्यंकर's picture

28 Jan 2011 - 10:50 pm | संजय अभ्यंकर

लवकर टाका पुढचा भाग!

सुरेख पण खूप क्लेश देणारा आणि खूप संताप आणणारा लेख.
स्वतंत्र भारतात भारताच्या राज्यकर्त्यांचे भारतीय प्रजेला संरक्षण न देण्याचे हे कसले धोरण आणि हे सहन करून घेणारे आपण कसले भारतीय नागरीक हेच मनात येतात!
इतक्या वाचनीय लेखाला इतके कमी प्रतिसाद याचेही वाईट वाटले.....

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 10:47 am | नरेशकुमार

इतक्या वाचनीय लेखाला इतके कमी प्रतिसाद याचेही वाईट वाटले.....

एखादी थेअरी वगेरे काही मांडता येते का बघा.

sagarparadkar's picture

29 Jan 2011 - 3:04 pm | sagarparadkar

काळेसाहेब, हे 'मानवाधिकार'वाले लोक मुळात हिंदूंना मानव मानतच नाहीत, मग त्यांचा अधिकार कसा मान्य करणार? त्यांच्या लेखी फक्त 'ते'च खरे मानव आणि त्यांचाच फक्त जगण्याचा अधिकार ...

बाकी ऊठ्सूट भंपक समाजवादी, फुसके गांधीवादी आणि काँग्रेजी च्या समर्थनार्थ धावणारे 'चाचा' अशा वेळी बरोब्बर गायब कसे होतात? का तेपण मानवाधिकारवादी आहेत?

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 10:46 am | नरेशकुमार

मानवी हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) त्या वेळेला मूग गिळून बसले होते का काय कोण जाणे.

हे नेहमीचंच आहे.

लेख छान.
नवीन माहीति समजत जाते.
पुढील लेख येउ द्या लवकर.

मुलूखावेगळी's picture

29 Jan 2011 - 11:10 am | मुलूखावेगळी

रीअल अनुभव असल्याने वाचन्यात इन्टरेस्टेड
आनि चान्गले लिहिलंय
पुढील भाग लवकर टाका.

लेखक फौजीभाई असून अद्याप गणवेषात (कर्नल) आहेत. फौजीभाईंच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे! कर्नलसाहेब लिहितातही झकास!! पुढील भाग नक्कीच 'क्लेषकारक पण वाचायलाच हवा' या पठडीतलाच असणार असे वाटते.

आवशीचो घोव्'s picture

29 Jan 2011 - 2:41 pm | आवशीचो घोव्

पु.भा.ल.टा.

भारतियान्चि सवेदनशिलताच सम्पलि आहे आसेच वाटत आहे.शिवाय निगरगट्ट सत्तापिपासु मतावर डोळा टेउन राजकारण करणार्याना काय पडलय, मते कशि मिळ्तात ते त्याना चान्गले माहित आहे.
जय भारत.

विनित

कधी-कधी 'जगाच्या पाठीवर'मधील एका गाण्यातील या ओळी आठवतातः
"बोरि-बाभळी उगाच जगती चंदनमाथि कुठार" आणि "पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार"

धमाल मुलगा's picture

1 Feb 2011 - 8:13 pm | धमाल मुलगा

सहमतीशिवाय आणखी काय बोलू....

इन्द्र्राज पवार's picture

29 Jan 2011 - 11:15 pm | इन्द्र्राज पवार

"...काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्यावेळेला मला पहिल्यांदा समजले. ....

कर्नलसाहेबांच्या खास लेखनशैलीने काश्मिरमधील नागरी आणि सैन्याची सध्याची स्थिती अगदी अधोरेखीत केली आहे. इतक्या प्रतिकुल परिस्थितीत (हवामान्+सततची अतिरेक्यांच्या हल्ल्याची शक्यता+सेनाधिकार्‍यांचे भावनाशून्य वर्तन) काम करावे लागत असतानाही आपल्या सैन्याने 'दिल' टाकलेले नाही याबद्दल त्यांच्या जिद्दीला सलामच केला पाहिजे. सुनील खेर यांचे लीव्ह अप्लिकेशन बटालियन कमांडर कर्नल कटोच यानी रीजेक्ट केले म्हणजे त्याना कृपया व्हिलन ठरवू नये. त्यांचेही हात नियमाला बांधले गेले असणार....किंवा नामंजुरीमागील जे काही कारण असेल त्याबाबत पुढे खुद्द कॅप्टन गिल यानीदेखील श्री.खेर याना सांगितले असेलच.

त्यामुळे कर्नल चितळे यांच्या लेखाच्या पुढील भागाची उत्सुकतेने वाट पाहात आहे.

इन्द्रा

जयंत कुलकर्णी's picture

31 Jan 2011 - 4:42 pm | जयंत कुलकर्णी

आपण ज्या प्रकारे लिहीत आहात तसे लिहू नका असा सल्ला आहे.
पुढे आपली मर्जी.

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 5:47 am | गुंडोपंत

सुरेख पण खूप क्लेश देणारा आणि खूप संताप आणणारा लेख.
स्वतंत्र भारतात भारताच्या राज्यकर्त्यांचे भारतीय प्रजेला संरक्षण न देण्याचे हे कसले धोरण आणि हे सहन करून घेणारे आपण कसले भारतीय नागरीक हेच मनात येतात!
इतक्या वाचनीय लेखाला इतके कमी प्रतिसाद याचेही वाईट वाटले.....
काळेंच्या प्रतिसादातल्या शब्दा-शब्दाशी सहमत आहे!

हे लेखन मराठीच नव्हे तर इतर भाषक वर्तमानपत्रातही यायला हवे असे वाटते.
पुढील लेखाची वाट पाहत आहे.

धमाल मुलगा's picture

1 Feb 2011 - 8:12 pm | धमाल मुलगा

वाचतो आहे.

काश्मिरी पंडीत/हिंदूंबद्दल काय बोलावं! 'मुकी बिचारी कुणी हाका' अशी गत.
अफजलगुरुच्या फाशीमाफीसाठी मोर्चे काढणारे आणी नरडी सुकेस्तोवर ओरडणारे 'ह्युमनराईट्स(?) वाले' तर तिडीकच आणतात. एक काचरु नावाचा मित्र आहे, त्याच्या वडिलांच्या तोंडून एकेक अनुभव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाते.
असो.

कर्नल चितळे, पुढील भागांची वाट पाहतो आहे.

कर्नल कटोच ने सुट्टी नामंजूर केली त्याबद्दलचा जर माझा अंदाज बरोबर असेल तर मला वाटतं, जयंत कुलकर्णी ह्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्या बाबत न लिहिणेच उत्तम रहावे.

इन्द्र्राज पवार's picture

2 Feb 2011 - 12:57 am | इन्द्र्राज पवार

श्री.ध.मु. आणि श्री.जयंत कुलकर्णी यानी जे मत व्यक्त केले आहे त्यास सहमती व्यक्त करताना असेही म्हणू इच्छितो की, कर्नल चितळे यांच्या लेखनशैलीमुळे (जी वाचनार्‍याला एकदम भावुक बनविते, हे नि:संशय) वाचक मनात कुठेना कुठे तरी 'कर्नल कटोच' या कमांडींग ऑफिसरला 'खलनायक' मानू लागतो... असे जर झाले तर एका ऑफिसरविषयी तशी भावना तयार होणे हे लष्करी शिस्तीच्या दृष्टीने योग्य नाही. रजा नामंजूर करण्यामागील त्यांचीही काहीतरी कारणमीमांसा असू शकेल जी आपणा सर्वांना अज्ञात आहे.

इन्द्रा

मराठे's picture

1 Feb 2011 - 9:05 pm | मराठे

नि:शब्द करणारा लेख!