'क्वीन' - फ्रेडी मर्क्युरीची जादूगारी

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
29 Jan 2011 - 4:16 pm

झांझिबार मध्ये भारतीय पारशी आई-बापाच्या पोटी जन्मलेला एक मुलगा फारोख बलसारा शिक्षणासाठी भारतात येतो, मुंबई मध्ये, दादर (पूर्व) च्या पारशी कॉलनीमध्ये राहतो आणि शालेय शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जातो. गीत-संगीतामध्ये लहानपणापासून रस असणारा फारोख लंडन मध्ये कलेचं रीतसर शिक्षण घेतो आणि संगीतामध्येच करीअर करतो. त्यात इतकं नाव मिळवतो की जगातल्या सर्वोत्तमांपैकी एक म्हणून गणला जातो. फारोख बलसारा म्हंटल तर चटकन कळणार नाही पण "फ्रेडी मर्क्युरी" म्हणताच दर्दी रसिक नि संगीतज्ञ कान टवकारल्याशिवाय राहायचे नाहीत.

'फ्रेडी'ने १९७१ मध्ये 'ब्रायन मे', 'रॉजर टेलर' आणि 'जोन डेकन' यांच्याबरोबर ग्रूप बनवला आणि त्याला नाव दिलं 'क्वीन'.

'फ्रेडी' नि 'क्वीन' ची अनेक गाणी गाजली. काहींचा इथेही परामर्श घेऊच पण सुरुवात एका अतिशय कॉम्प्लेक्स गाण्याने करुया.....

"Bohemian Rhapsody".'फ्रेडी'चं तुफान लोकप्रिय गाणं.

यातले 'फ्रेडी'चे सांगीतिक प्रयोग भल्याभल्यांना अचंबित करतात. सुरुवातीला त्याचे पियानोवरचे सुंदर इंट्रोडक्शन त्यानंतर बेले संगीत, पुढे 'ब्रायन मे'ची भन्नाट गिटार आणि अचानक सुरु होणारं ओपेरा स्टाईलचं संगीत, ते संपता संपता चालू होणारं हार्ड रॉक म्युझिक आणि शेवटाकडे जाता जाता आर्त करणारा 'फ्रेडी'चा पियानो आणि त्याचा स्वर.........

अशाप्रकारे आपल्यावर 'फ्रेडी' संगीतातून गारुड करत असताना त्याचे शब्द छळू लागतात. अजूनही या गीताचा अर्थ काय आहे यावर रसिकांच्या चर्चा झडतात. स्वत: 'फ्रेडी'ने हा भाग गुलदस्त्यातच ठेवलाय. तो म्हणून गेलाय,

"It's one of those songs which has such a fantasy feel about it. I think people should just listen to it, think about it, and then make up their own minds as to what it says to them...
...Bohemian Rhapsody" didn't just come out of thin air. I did a bit of research although it was tongue-in-cheek and mock opera. Why not?"

तेव्हा या "Bohemian Rhapsody" चा आनंद लुटू या......

http://www.youtube.com/watch?v=fJ9rUzIMcZQ&ob=av2n

'फ्रेडी' आणि त्याचा ग्रूप 'क्वीन' म्हणजे एक भन्नाट रसायन होतं.

मूळचा अंतर्मुख 'फ्रेडी' 'लाईव्ह' कार्यक्रम सादर करू लागला की प्रचंड बहिर्मुख व्हायचा. संपूर्ण स्टेजभर वावरायचा, जसा तिथला अनिभिषिक्त सम्राट, सळसळती उर्जाच जणू......

दोन वर्ष सलग टूरिंग केलं 'क्वीन'ने. अगदी पार दक्षिण अमेरिकेपर्यंत. एकेका शोमध्ये लाखालाखाने प्रेक्षक असायचे. संगीताचा ध्यास इतका की आंतरराष्ट्रीय बॉयकॉट असलेल्या दक्षिण आफ्रिकेतही कार्यक्रम केले.

गाणीही जबरदस्त. त्यांचं "We Are The Champions" हे गीत क्रीडाक्षेत्रात सर्वच खेळांमध्ये 'विजयगीत' म्हणून वाखाणलं गेलं.

'फ्रेडी'च्या गाण्यांचा आनंद घ्यावा त्याच्या लाईव्ह शोज मध्येच......

http://www.youtube.com/watch?v=04854XqcfCY&feature=channel

http://www.youtube.com/watch?v=hSTivVclQQ0&feature=related

'क्वीन'चं आणखी एक गाणं न देऊन राहावत नाही आहे.

'ब्रायन मे'चं "We Will We Will Rock You".

एका कार्यक्रमात 'क्वीन' प्रेक्षकांना आपल्या संगीतात सहभागी करत असताना प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून 'ब्रायन मे'ने या गाण्याची निर्मिती केली. शब्दही त्याचेच आणि 'फ्रेडी' गायक. रॉक संगीताचं हे 'एन्थम' बनून गेलं.....

केवळ पायाचे स्टेम्पिंग (आपटणे) आणि टाळ्या यांचा ताल असणा~या गाण्यात शेवटी 'ब्रायन'ची गिटार सोल्लिड वाजते.....

http://www.youtube.com/watch?v=-tJYN-eG1zk&feature=channel

"Another One Bites The Dust" हे 'क्वीन'चं आणखी एक chart Topper गाणं.

या गाण्याचं क्रेडीट जातं 'क्वीन'चा बेस गिटारीस्ट 'जोन डेकन'ला, गीत, संगीत आणि झकास वादनाचंही.... 'फ्रेडी' हे गाणं गातोही मस्त!

हेवी बास ~हिदम असलेलं हे गाणं एकदम झकास आहे......

http://www.youtube.com/watch?v=rY0WxgSXdEE&feature=channel

१९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकचं 'थीम साँग' बनवण्यासाठी 'फ्रेडी'शी संपर्क साधला गेला. बार्सिलोनामध्येच जन्मलेली आणि तिथेच वास्तव्यास असलेली प्रसिद्ध ओपेरा गायिका 'मोंटेसेरा कबाल' हिच्यासह ओपनिंग सेरेमनीमध्ये गाण्यासाठी द्वंद्वगीत बनवण्याची जबाबदारी 'फ्रेडी'वर टाकण्यात आली.

आणि 'फ्रेडी'ने गीत लिहिले "Barcelona!"

'मोंटेसेरा'चे स्पानिश बोल आणि 'फ्रेडी'चे इंग्लिश शब्द यांचा अप्रतिम मिलाप आणि त्याला कर्णमधुर ओपेरा संगीताची जोड..... अगदी अद्वितीय गाणं तयार झालं.....

http://www.youtube.com/watch?v=MGJJ3aKwjUI

पण ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनी मध्ये 'फ्रेडी'ला ते गाता आलं नाही. कारण त्यापूर्वीच १९९१ला त्याचं एड्सने निधन झालेलं. (या रोगाने घास घेतलेला पहिला मोठा कलाकार) पण तरीही या गाण्यातली त्याची जागा कोणी भरून काढूच शकणार नव्हतं.

ओपनिंग सेरेमनी मध्येही 'मोंटेसेरा'सोबत तोच गायला, फक्त त्याच्या ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे..... ती जागा केवळ 'फ्रेडी'चीच होती......

संगीतमौजमजाप्रकटनविचारमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

29 Jan 2011 - 9:57 pm | प्राजु

मस्त!!
लिहित रहा!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Jan 2011 - 9:52 am | निनाद मुक्काम प...

अप्रतिम माहिती . एक स्तुत्य उपक्रम
सांगितला भाषा नसते हे एकही शब्द न कळता अमेरिकन कलाकारांच्या संगीतावर जेव्हा जर्मन ठेका धरतात .तेव्हा पटते .
आतापर्यत ह्यांची नावे व एखाद दुसरे गाणे कानावर पडले होते .
सांग्रसंगीत माहिती मस्तच (आता ती नीट वाचणार परत एकदा नि लघु रिसबूड प्रमाणे गोर्यांच्या समोर एखाद दुसरे वाक्य फेकायच .
संगीत विशारद
मुक्काम पोस्ट जर्मनी

दैत्य's picture

30 Jan 2011 - 5:43 am | दैत्य

प्रास, फारच छान माहिती! धन्यवाद!

गवि's picture

30 Jan 2011 - 8:39 am | गवि

I am officially your fan now.

Queen..cant stop remembering all his Music.

Few more which I feel cant be missed:

-Living on my own..

-I want to break free

-Somebody to love. Made famous by George Michael

-Under pressure

प्रास's picture

30 Jan 2011 - 11:43 am | प्रास

गगनविहारीजी,
तुमच्या 'चूकचक्र' च्या वाचनापासून मीही आपल्या पंख्यांमध्ये गणला जाऊ लागलोय.....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Jan 2011 - 9:54 am | निनाद मुक्काम प...

आता लेख परत एकदा वाचला .नि जेवताना सहज बायकोपुढे विषय काढला .'' अग तुला माहिती आहे का फ्रेडी भारतीय आहे म्हणून ?''
ती: - कोण फ्रेडी ?
मी -- अग मर्क्युरी"
ती -- काय तो तर अमेरिकन........
मी ---चल .'' जरा जास्त गोरा दिसतो खरा पण तो पारशी आहे न म्हणून
(आमच्या लंडनच्या हिल्टन मधील माझा मुंबईकर पारसी मित्र कैझाद ह्याने हॉलंड च्या आमच्याच बरोबर काम करणाऱ्या गोड मुलीबरोबर लग्न केले .व मागच्या भारत भेटीत त्याच्याबरोबर महालक्ष्मी रेस कोर्स वर घोड्याची शर्यत पाह्यला गेलो होतो .( तो होता म्हणून .नाही तर आपले पाय कुठे लागणार होते रेस कोर्स ला .. आमची शर्यत लोकल ते बस पकडण्याची .)
सांगायचे तात्पर्य त्यामुळे पारशी आख्यान तिला व्यवस्थित समजून सांगितले होते तेव्हा आम्ही .)
बाकी तो समलैंगिक होता .
हि नवीन माहिती कळली बायकोकडून .व त्याचा मृत्य च्या बातमीपेक्षा तो कोणत्या नवीन रोगाने मेला व त्या रोगाचे खरे कारण जसे लोकांना कळले तसे तशी युरोपात खळबळ उडाली .
बाकी त्याची गाणी आणि तो आजही युरोपात भयंकर लोकप्रिय आहे .

प्रास's picture

30 Jan 2011 - 11:28 am | प्रास

निनादराव,

अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

फ्रेडी भारतीय खरा पण खरं तर त्याला युरोपियन, किंबहुना इन्ग्लिशच म्हंण्टलं पाहिजे, पुरेपूर लंडनर! त्याने त्याच्या सा-या आयुष्यात त्याचं भारतीयपण कुठेच उध्रुत केलेलं नाही.

खरं तर तो बायसेक्श्युअल होता असं म्हणायला हवं कारण सुरुवातीची अनेक वर्ष तो मेरी ऑस्टीन नावाच्या मुलीबरोबर राहिला होता आणि त्यानन्तरही त्याचे बार्बरा वॅलेन्टीन नावाच्या नटीबरोबर प्रेमसंबंध होतेच. (संदर्भ-विकी--) अनेक वर्षांच्या सहवासानन्तर झालेल्या ब्रेक-अप नंतरही फ्रेडी आणि मेरी यांची मैत्री टिकून राहिली आणि आपल्या आजारपणाच्या शेवटच्या काही वर्षात मेरीने त्याला प्रचन्ड साथ दिली, त्याची खूप सुश्रुशा केली. स्वतःचे लग्न झालेले असूनही आणि २ मुलगे असलेली मेरी फ्रेडीच्या प्रेमाखातर बरीच वर्ष 'हे' दोन संसार करत होती. फ्रेडीच्या म्रुत्युसमयी ती त्याच्याजवळ होती आणि फ्रेडीनेही आपली संपत्ती, आपलं लंडनचं घर म्रुत्युपत्रात तिच्याच नावे करून ठेवलं. अशाप्रकारे तो तिने त्याच्या कठीण प्रसंगी दिलेल्या साथीला आणि प्रेमाला जागला असंच म्हणता येतं.

आजही मेरी आपल्या २ मुलांसह फ्रेडीच्या त्याच घरात राहते.

धनंजय's picture

31 Jan 2011 - 12:31 am | धनंजय

ओळख आणि वर्णने छान आहेत. आता एक-एक करून गाणी नीट ऐकायला पाहिजे.

रॉक गाणी फार ऐकलेली नाहीत, पण या लेखाच्या अनुषंगाने लक्ष देऊन ऐकली. गाणी छानच आहेत. "वुई वुइल रॉक यू" मध्ये ठेक्याशी शब्दांचे जुळवणे फारच परिणामकारक आहे. हे गाणे कित्येक वेळा ऐकले आहे, पण आज जास्त लक्ष देऊन...

(उभय/समलैंगिकतेबद्दल फ्रेडी मर्क्युरी बर्‍यापैकी उघड असावा. "क्वीन" हे वर्णनात्मक नाव घेतल्यानंतर, आणि एखाददुसर्‍या मुलाखतींत ही माहिती सांगितल्यानंतर मग कदाचित परत-परत सांगत बसला नसेल. पण माहिती लपवलेलीही नाही. त्याची गाणी त्याच्या लिंग-आकर्षणाच्या खोक्यात बंदिस्त होत नाही, हे तर आहेच. पण कलात्मक शिखरे सर करताना कोणीही कुठल्याही खोक्यात बंदिस्त का व्हावे :-) )

श्री. प्रास यांनी वेगवेगळ्या संगीतकार-गायकांबद्दल लिहीत जावे ही विनंती.

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 6:31 am | गुंडोपंत

वेगळा विषय नि वेगळा लेख. वाचून बरे वाटले. अजून येऊ द्या!

सहज's picture

31 Jan 2011 - 6:48 am | सहज

प्रास आपले लेखन वाचत आहे. आधी एल्विस आता फ्रेडी..
छान. अजुन येउ दे.

बाकी >कारण त्यापूर्वीच १९९१ला त्याचं एड्सने निधन झालेलं. (या रोगाने घास घेतलेला पहिला मोठा कलाकार)

अभिनेता रॉक हडसन हे नाव या संदर्भात आधी ऐकले होते.

गोगोल's picture

31 Jan 2011 - 12:02 pm | गोगोल

फ्रेडी .. फ्रेडी म्हणजे आनिभिषिक्त सम्राट. कुणीच त्याच्यासारखा वरच्या टिपेचा आवाज लावू शकत नाही.

बाकी फ्रेडी म्हणाल की आम्हाला आठवते ते "Bohemian Rhapsody" हे mp3 शेअर करून मी कमीत कमी १००+ दोस्त माय स्पेस वर गोळा केले असतील ;) .. कारण खरी दोस्ती ही अशीच होत असते.

Only Some Massages Have Happy Endings ...

मेघवेडा's picture

31 Jan 2011 - 2:26 pm | मेघवेडा

वा. छान. लेखन आवडले. लिहित राहा. अजून येऊ दे!