सध्याच्या एकूण होपलेस परीस्थिताचा विचार केला तर फारच डीप्रेसिंग वाटू लागतं आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग माझ्या मते काही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हा आहे. अशी गोष्ट उत्तम संगीताशिवाय कोणती असू शकते? तेव्हा एका सुंदर संगीत प्रकारावर आपण आता प्रकाश पाडणार आहोत.
जाझ संगीत हे अभिजात संगीत आहे. त्याचा उद्गम अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या आफ्रिकन मूळाच्या संगीतातून झालेला असला तरीही त्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याला परंपरा आहे. मानवी मनातील अनेक भाव या संगीतातून फार छान प्रकारे दर्शवले जातात.
याच जाझ संगीताचा एक प्रकार आहे, स्कॅटिंग (Scatting). या संगीताच्या गायनामध्ये कोणत्याही प्रकारचे सार्थक शब्द नसतात तर केवळ काही निरर्थक शब्दांच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणा~या नादाने कर्णमधुर संगीत निर्मिती केली जाते. हे निरर्थक शब्दही काही वेळा वाद्यांच्या आवाजासारखे असतात.
या 'स्कॅटिंग'ला लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं 'लुई आर्मस्ट्रोन्ग' याला. १९२५ साली त्याचं गाणं आलं, "Heebie Jeebies". या गाण्याच्या काही ओळी अशा होत्या की त्यांना अर्थच नव्हता पण त्या निरर्थक शब्दांतून 'लुई'ने असं झकास संगीत निर्माण केलं की ही चाल देणा~या 'बोएड एटकिन्स'नेही याची कल्पना केली नसेल. यालाच नाव पडलं 'स्कॅटिंग'.
असं सांगतात की या "Heebie Jeebies" गाण्याच्या रेकोर्डिंगच्या दरम्यान 'लुई'च्या हातातून गाण्याचे कागद खाली पडले. चालू रेकोर्डिंग थांबवायला लागू नये म्हणून त्यावेळी त्याने मूळ शब्दांच्या ऐवजी हे निरर्थक शब्द वापरून वेळ मारून नेली आणि 'स्कॅटिंग'चा जन्म झाला. अशी ही एक किंवदन्ति सांगितली जात असली तरी त्यात तथ्य नाही असं संगीत तज्ञांच मत आहे.
तेव्हा तसं काही असो किंवा नसो पण 'लुई'ने एका वेड लावणा~या 'गान-स्टाईलला' जन्म दिलाय हे नक्की. एकदा इथे कान द्याच.....
http://www.youtube.com/watch?v=ksmGt2U-xTE
'लुई' व्यतिरिक्त इतर अनेक गायक-संगीतकारांनी स्कॅटिंग' मध्ये मुसाफिरी केलेली आहे. त्यात मुख्य नाव आहे 'एला फित्झराल्ड'. १९४०-५० च्या सुमारास 'एला'नं स्कॅटिंग' आणखी उंचावर नेलं. जाझ बरोबरच ब्लूज मुझिक प्रकारातही तिने 'स्कॅटिंग' गायला सुरुवात केली आणि ते ही खूप लोकप्रिय झालं.
http://www.youtube.com/watch?v=PbL9vr4Q2LU&feature=related
असंच एक आणखी नाव आहे, 'बेटी कार्टर'. 'एला' प्रमाणेच ४० च्या दशकात प्रसिद्धी पावलेल्या बेटी'ने ही जाझ आणि 'स्कॅटिंग' प्रकारात खूप गाणी गायली आहेत. तिची 'स्कॅटिंग' प्रकारात इतकी लोकप्रियता होती की तिला 'बेटी बेबोप' असं टोपण नावच मिळालेलं. यातलं 'बेबोप' हे 'स्कॅटिंग' करताना ब~याचदा वापरली जाणारी निरर्थक अक्षरं आहेत.
http://www.youtube.com/watch?v=IMsFeMANjPY
१९९४ साली या 'स्कॅटिंग' ला एकदम नवसंजीवनी मिळाली. मुख्य प्रवाहापासून जरा दूर गेलेल्या या संगीत प्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या साली केलं 'स्कॅटमन जॉन'ने. १९४२ला जन्मलेला, जाझ संगीतकार, प्रोफेशनल पियानो वादक असलेला आणि तोपर्यन्त फारसा कोणालाच माहित नसलेला, 'जॉन पौल लार्किंस' याला, त्याच्या 'स्कॅटिंग'ने आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवून दिली.
मूळ अमेरिकन असलेला 'जॉन', लहानपणापासून तोतरा होता. यामुळे त्याला शाळेत इतर मुलांकडून खूप त्रास आणि छळ सहन करावा लागला. या गोष्टीचा त्याच्या मानसिक जडणघडणीवर खूप वाईट परिणाम झाला. तो एकटा राहू लागला आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी त्याने जाझ संगीताचा मार्ग पत्करला. जाझ शिकत असताना त्याची 'लुई आर्मस्ट्रोन्ग'च्या 'स्कॅटिंग'शी ओळख झाली आणि तो त्यावर फिदा झाला. वयाच्या १४व्या वर्षापासून तो स्वत: 'स्कॅटिंग' प्रकारात गाऊ लागला कारण या प्रकारात त्याचं तोतरेपण आड येत नव्हतं.
दरम्यान एकटेपणामुळे आणि डिप्रेशनमुळे पुढे त्याला दारूचे आणि अमली पदार्थांचे व्यसन लागले आणि तो त्याच्या अगदी आहारी गेला. १९८६ साली त्याचा जवळचा संगीतकार मित्र 'जो फारेल' मरण पावल्यावर 'जॉन'ने आपल्या पत्नीच्या, 'ज्युडी'च्या मदतीने स्वत:ला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली.
साधारण ९० सालच्या सुरुवातीला तो आपलं जाझ संगीतातील करीअर मार्गावर आणण्याच्या प्रयत्नात बर्लिन इथं आला. इथे त्याने आपल्या जाझ संगीताला स्वत:च्या गाण्याची जोड दिली आणि 'स्कॅटिंग'च्या माध्यमातून त्याचा आणि त्याच्या करीअरचा जणू पुनर्जन्म झाला. इतर वेळी बोलताना त्याचं तोतरेपण जाणावे पण 'स्कॅटिंग'च्या दरम्यान तसं काहीच जाणवत नसल्याने त्याला यात तुफान लोकप्रियता मिळाली.
'स्कॅटिंग' प्रकाराने तोतरेपणावर उपचार केला जातो आणि अशा मुलांचा 'जॉन' अगदी रोल मोडेल बनून गेला. अमेरिकन 'स्पीच लँग्वेज हिअरिंग असोसिएशन'ने याबद्दल 'जॉन लार्किंस'चा 'एनी ग्लेन पुरस्कार' आणि National Stuttering Association Hall of Fame पुरस्कार देऊन गौरव केला.
१९९९ साली फुप्फुसाच्या कर्करोगाने 'स्कॅटमन जॉन लार्किंस'ला देवाज्ञा झाली.
'जॉन'चे 'स्कॅटिंग' ऐकाच......
http://www.youtube.com/watch?v=Geiq0FP13uQ
'स्कॅटमन जॉन लार्किंस'चा दुसरा अल्बम, 'एव्हरीबडी जॅम' मधलं आणखी एक छान गाणं......
प्रतिक्रिया
27 Jan 2011 - 4:08 pm | गवि
मस्त माहिती.
स्कॅटमॅन आवडायचा खूप. त्यामागे हे सर्व आहे हे माहीत नव्हतं..
स्कॅटमॅन्स वर्ल्ड आल्बम फेमस झाला होता ९६-९७ दरम्यान
27 Jan 2011 - 7:11 pm | प्राजु
तुमच्या लेखातून खूप चांगली माहिती मिळते. लिहित रहा.
हा वेगवेगळ्या प्रकारच्या संगिताबद्दल लेख लिहिण्याचा आपला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. :)
पु ले शु.