भाग १ http://www.misalpav.com/node/15817
भाग २ http://www.misalpav.com/node/15840
भ्रष्टाचार करून, किसन आणी त्याच्या कुटुंबाचा जीव घेतलेल्या, शेळ्क्यांवर त्यांचाच डाव उलटलेला असतो.... हळू हळू बदल्याचा अघोरी खेळ त्या बंगल्यात सुरु झालेला असतो.. आता पुढे ......
हातातल्या मांजराच्या 'केसांकडे'पाहून 'शेळक्यांच्या छातीतून तीव्र कळ उमटून जाते, ते तसेच धडपडत, खोकत उठतात आणि फोन कडे धावतात, नंबर फिरवणार तेवढ्यात मांजरी कुरतडलेली वायर त्यांना लोंबकळताना दिसते, ते मागे फिरतात, तो त्यांना एक भयानक मांजर टेबलावर उभं असलेलं दिसतं, ते दात-ओठ खाऊन, बाजूला असलेली पितळ्याची वजनदार फुलदाणी उचलून त्या मांजरावर हाणतात, पण अघटीत होतं, ती फुलदाणी मांजराच्या शरीरातून आरपार जाते, आणि मागे असलेल्या 'मेनस्वीच' आदळते, मेनस्वीचमधून मोठा जाळ बाहेर येतो, आणि लाईट जातात, त्या भयाण पठारावर ती बंगली आधारात गुडूप होते......
शेळक्यांच अवसानच गळत. ते थरथरत.. कडेकडेने बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात, पण काहीच कळत नसतं... तेवढ्यात त्यांना बंगल्यात पाणी साचल्यासारखं वाटत... काही कळायच्या आत मांडीपर्यंत पाणी येत...
काय घडतंय याचा अर्थ शेळ्क्यांना लागू लागलेला असतो... त्यांची वाईट कर्म समोर उभी ठाकलेली असतात.. पाण्यातून पुढेपुढे जात असतानाच, अचानक समोर तरंगत काहीतरी येत, पोर्णिमा असल्याने बाहेरचा चंद्रप्रकाश आता बंगल्यात येत असतो , त्या निळ्या प्रकाशात.... शेळ्क्यांना ते भयानक दृश्य दिसतं, गंगीच प्रेत तरंगत असतं, टरटरुन फुगलेलं, पांधरफटक पडलेलं.. हे असलं बघून शेळके बोंब ठोकतात, तेवढ्यात प्रेताचे डोळे उघडतात, डोळे नसतातच, नुसताच हिरवा पापुद्रा... शेळके किंचाळ्या मारत बाजूला होतात, तेवढ्यात पाण्यात दोन मुलीसुद्धा तरंगताना दिसतात.. दोघींची मुंडकी अर्धी चेचलेली.. फक्त एकच डोळा दिसतोय हिरवा गार... झपाट्याने त्या तीन सावल्या शेळ्क्यांकडे सरकायला लागतात.. वाकड्या तिकड्या .. घशातून विचित्रच आवाज काढत....
शेळके जीव घेऊन जिन्याने वरच्या खोलीकडे धावतात, खोलीत शिरून धडकन दरवाजा लावून घेतात... आणि एका कोपर्यात थरथरत बसतात, पोटात प्रचंड गोळा आलेला असतो.
त्यांचं हृदय तिप्पट वेगाने धडधडत असतं.. आपण हे काय करून बसलो... त्यांच्या मनात येत.. आता कोण थांबवणार हा जीवघेणा प्रकार...... ते डोके भिंतीला टेकवून डोळे मिटतात.. तेवढ्यात डोक्यावर एक चिकट द्रव पडायला लागतो. ते घाबरून वर बघतात.. आणि काय.. खिडकीत दादासाहेबांच फक्त 'धडच' असतं, त्यांचे ते लांब भयानक हात, शेळक्यांच्या दिशेने येतात.. शेळके रडत पळायला बघतात, आणि काय....... खोलीत दुसऱ्या बाजूने 'दादासाहेबांच्या धडाचा खालचा भाग त्यांच्या जवळ सरकत असतो... ते कसेबसे दरवाजा उघडून गच्चीत येतात.... बाहेर 'भणाण वारा' सुटलेला असतो.. त्यांच्या आरोळ्या कोणालाही आईकू जात नसतात... चिंचेचा वृक्ष त्याच्या भयानक फांद्या पसरून उभा असतो....
तेवढ्यात फरशीवर काही आकृत्या आकार घ्यायला लागतात.... बर्याच रेषा, वर्तुळ, त्रिकोण.. सगळंच विचित्र... अघोरी रांगोळीच असते ती एखादं दिवाळीचं तोरण चमकावं त्याप्रमाणे चमचमणारी ..... तेवढ्यात खाड.. असा आवाज होऊन, फरशी उचकटते.. कट कट आवाज करून.. हळू हळू खालून 'गंगीच' प्रेत वर यायला लागतं.. शेळके ते बघून भयानक आरोळी ठोकतात. रांगोळीत ते प्रेत गरागरा फिरत असतं.. गंगीच्या झिंझ्या वाऱ्यावर उडत असतात.... शेळके आजूबाजूला बघतात , तर दोन्ही बाजूंनी , गंगीच्या मुलींची मुंडकी नसलेली शरीर सरपटत. फरशी खरवडत, त्यांच्या दिशेने सरकत असतात.. हे बघून शेळक्यांच अवसानच गळत, ते जीवाची पर्वा न करता गच्चीवरून खाली उडीच मारतात, पण त्यांच्या सुदैवाने खाली रचून ठेवलेल्या गवताच्या गन्जीवरच ते पडतात. पडल्यावर ते उठून 'गेट' कडे धावायला लागतात.. तर समोर झोपाळ्यावर दोन सडलेली प्रेत जोरजोरात झोके घेत असतात आणी बाजूने एक आकृती त्यांच्याकडे त्याच वेगाने पळत येत असते.. शेळ्क्याना तीव्र झटका येतो , आणि ते खाली कोसळतात
********************************************************************************************************
साहेब साहेब उठा. म्या हनम्या...
शेळके डोळे उघडतात, ते परत आतमध्ये आलेले असतात, कंदिलाच्या प्रकाशात त्यांना समोर हणम्या दिसतो..
"हणम्या मला वाचव.. गंगी माझा जीव घेईल.. बघ तिचं आणि दादासाहेबांच प्रेत इथेच फिरतंय" दादासाहेब छाती बडवत ओरडत असतात..
"साहेब हिथ कोणीच नाय . आणि . लाईट चा बोर्ड कोनी तोडला? " हणम्या उत्तर देतो.
दादासाहेब घाबरत घाबरत इकडे तिकडे नजर फिरवतात... घर जसच्या तसं असतं व्यवस्थित लावलेलं.. फरशीवर पाण्याचा एक थेंबही नाही.. ना धूर, ना कुठलं प्रेत, अपवाद फक्त तुटलेल्या मेन स्वीच चा..
आपण स्वप्नात होतो कि जागे .. त्यांना काहीच कळेनासं होतं..
"तू कसा काय इकडे आलास?"
साहेब म्या घरला गेलो, आणि जेवून झोपणार तेवढ्यात माळावर लय कुत्री रडाया लागली.... मला भ्या वाटली तुम्ही इकडं एकटे.. आणि गावात घडणाऱ्या लय वंगाळ गोष्टी ..
त्यात तुम्ही आजारी.. म्हणून एक चक्कर टाकू ,असा विचार करून आलो.. तर लांबूनच तुमच्या ओरडण्याचा आवाज आला.. हिकडं येऊन बघतो तर काय तुम्ही गच्चीवरून उडीच टाकलीत...
काय झालाय काय मालक ?
शेळके त त प प.. करत त्याला सगळं सांगतात.. हनम्या ते ऐकून गोंधळतो आणि घाबरतो पण.. साहेब म्या जाऊन येतो गच्चीवर..... बघ्तु कोन हाय का तिकडं.. माझी कुर्हाड हाय बरुबर.. कोन मध्ये आलाच तर खान्डोलीच करीन एकेकाच्ची ..
शेळके त्याला विरोध करतात, पण सध्या हनम्या हाच एक आधार असतो..
"थांब हनम्या मी सुद्धा येतो, मला एकट्याला नको टाकुस" .. दोघे परत वर जातात ...
गच्चीवर गार वर सुटलेलं असतं... मगासच्या घटनेचा लवलेश सुद्धा नसतो.
न कुठली आकृती, न, तुटलेली फरशी..
"साहेब हिते तर कायच नाय.. हनम्या पुटपुटत. गच्चीच्या टोकापर्यंत जातो.. शेळके सुद्धा मधोमध उभे राहून विचारात पडतात.
तेवढ्यात घोगरा आवाज येतो... " तुम्ही लय वंगाळ काम केला हाय.. तुम्हाला हितच समदा हिशेब चुकवावा लागणार, आधी दादासाहेब, आनी आता तू"
शेळके 'हन्म्याच्या' पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून किंचाळतात , कोन आहेस तू........
ती आकृती उत्तर देते "साय्बानु मीच त्यो"
तो हनम्या नसतोच.. तो असतो. 'किसान गणपत शेलार' ... शेळके खाली कोसळतात....
आता खाली परत ती रांगोळी उमटलेली असते....
परत ते भेसूर रडणं सुरु झालेलं असतं
आणी आजूबाजूने 'किसन' , गंगी, तिच्या दोन मुली आनी दादासाहेब शेळ्क्यांकडे सरकत असतात ...
माथ्यावरचा चंद्रमा तसाच चमकत असतो.....आणी चिंचेच्या झाडाच्या फांदीवर.. चार काळी मांजरं जिभल्या चाटत असतात
प्रतिक्रिया
18 Dec 2010 - 10:25 pm | यकु
काय भयानक लिवलयस रे स्पा...J) J-) :crazy: J) J-) :crazy: J) J-) :crazy:
च्यायला एवढ्या थंडीत माझ्या रूममध्ये एकटाच झोपणार आहे.. झोप नाही येणार आज रात्री
ह्या: ह्या: ह्या: :D :-D :lol: :D :-D :lol: :D :-D :lol:
18 Dec 2010 - 10:36 pm | निनाद मुक्काम प...
मस्त लिहिलंय .व कथेचा शेवट चांगला .आहे .
जसे पेरावे तसे उगवते .(हि म्हण आपल्या राजकीय नेत्यांना लागू पडत नाही )
बाकी कथेची मांडणी लक्षात घेता भविष्यात अजून सकस भय कथा येऊ दे .
18 Dec 2010 - 10:59 pm | रन्गराव
सहिच!
18 Dec 2010 - 11:12 pm | नगरीनिरंजन
वा रे बोक्या! आहटचे एपिसोड्स आता तू लिहायला हरकत नाही.
20 Dec 2010 - 9:53 am | कवितानागेश
+१
आह्ट पाहिल्यासारखेच वाटले.
18 Dec 2010 - 11:17 pm | प्राजु
शेवट काहीसा अपेक्षित होता. पण लिहिण्याची पद्धत खूप आवडली.
19 Dec 2010 - 12:00 am | रेवती
शेवट अपेक्षित होता पण गोष्ट रंगलीये.
बरं झालं मी दुपारी वाचली.
19 Dec 2010 - 1:18 am | आत्मशून्य
शेवट काहीसा अपेक्षित होता, पण हनम्याच किसन दीसतो हे नाय गेस करता आले.
19 Dec 2010 - 8:26 am | सूड
चान चान
19 Dec 2010 - 8:40 am | गवि
नारायण धारप, द.पां. खांबेटे, रत्नाकर मतकरी यांची आठवण झाली.
झकासच..
पाठीवर थंड घामाचा ओघळ गेला.
19 Dec 2010 - 8:45 am | शहराजाद
छान.
नारायण धारप, रत्नाकर मतकरी आठवले.
19 Dec 2010 - 2:19 pm | इंटरनेटस्नेही
जबरदस्त कथा.. स्पा हे एखाद्या कसलेल्या लेखकासारखं लिहिण्यात यशस्वी झाले आहेत!
विरामचिन्हांचा सुकाळ हा एकमेव फ्लॉ वगळता कथा अतिशय उत्तम!
20 Dec 2010 - 9:05 am | चांगभलं
अनुमोदन.........
अतिशय प्रभावशाली गोष्ट...
स्पा.. तुझ्या लिखाणात अजून भरपूर चुका आहेत, पण 'जे निखळ मनोरंजन व्हायला हवं होतं' ते झालंय.
थोडक्यात काय, भरपूर मसाला, आणि पैसावसूल गोष्ट
नारायण धारपांची आठवण झाली...
किसन हन्म्याच रूप घेऊन आलेला असतो... हा एकदम सोलिड ट्विस्ट.
पुढील लिखाणास शुभेच्छा
19 Dec 2010 - 5:51 pm | स्वाती२
मस्त भयकथा. सलग वाचल्याने अजुनच मजा आली.
20 Dec 2010 - 1:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
छान गोष्ट !!! असेच लिहित राहा.
20 Dec 2010 - 1:31 pm | इन्द्र्राज पवार
तिसरा भाग (अकारण) दिवसाढवळ्या वाचल्याची चूक केली असे आत्ता वाटू लागले आहे. काही कथा (तसेच अशा तर्हेच्या वातावरणावर आधारित चित्रपटही) रात्रीच्या निवांत क्षणीच वाचण्यासाठी असतात त्यापैकी श्री.स्पा यांची 'सायबानू....' कथा आहे हे निश्चित.
तिन्ही भाग एकत्रित पुन्हा एकदा वाचणार आहेच. वर कित्येक सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे श्री.धारप, मतकरी यांच्या मुशीतील कथा वाटत्येय. श्री.स्पा यांची कथा फुलविण्याची हातोटी स्पृहणीय आहे. कथेचा शेवट पहिल्याच भागात अधोरेखीत झाला होताच, पण शेलार आत्मा 'हनम्या' च्या रूपात येतील हा अंदाज आला नव्हता.
असो. एक पकड घेणारी कथा दिल्याबद्दल श्री.स्पा यांचे अभिनंदन तसेच पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा !
इन्द्रा
20 Dec 2010 - 1:39 pm | अवलिया
मस्त कथा !
लिहित रहा !!
20 Dec 2010 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त रे भावड्या.
कथा एकदम वेगवान आहे आणि तीन भागात लिहिली असुनही कुठेही लिंक तुटली नाही.
मस्त एकदम.
20 Dec 2010 - 11:26 pm | रेवती
मस्त रे भावड्या.
भावड्या नव्हे 'स्पावड्या'!;)
20 Dec 2010 - 11:49 pm | टारझन
भावड्या हा शब्द माझ्याकडुन नेहमी चुकीचा वाचला जातो न अनर्थ होतो =))
20 Dec 2010 - 11:57 pm | रेवती
अनर्थ होतो
आपल्याकडून कोणत्या शब्दाचा अनर्थ होत नाही ते सांगा हो महाराज.;)
आपण शब्दांना, सह्यांना, लेखांना, काव्याला.....कोणालाही सोडत नाही.;)
20 Dec 2010 - 1:45 pm | sneharani
मस्त कथा! तीनही भाग छान जमलेत!
20 Dec 2010 - 3:22 pm | शिल्पा ब
छान लिहिलंय...पण रात्री वाचताना जम टरकली...आधी खफ वर उपाशी बोक्याने दिलेली लिंक आणि आता हे...:( :Sp :-S) :sick:
20 Dec 2010 - 11:20 pm | चिगो
आयला, मी हे वाचत असतांनाच बाहेर एक मांजर रडल्यासारखी म्यांवली, नी फाटली ना भौ...
मस्त जमीश, स्पाशेठ... फाडू आहे येकदम.
21 Dec 2010 - 12:08 am | पुष्करिणी
मस्त कथा, तिन्ही भाग एकत्र वाचले.
अगदी आहट / झी हॉरर शो बघितल्या सारखं वाटलं.
आज सकाळी मी ऑफिसला जाताना रस्त्यावर एक काळी मांजर माझ्याकडे बघून म्याँव म्हणाली ...

21 Dec 2010 - 6:42 pm | मेघवेडा
>> अगदी आहट / झी हॉरर शो बघितल्या सारखं वाटलं
अगदी अगदी. झकास रे स्पावड्या.
4 Mar 2011 - 1:49 pm | प्रचेतस
एकदम छान लिहिलियेस कथा. आज तिन्ही भाग सलग वाचून काढले. एकदम जबरा.....
4 Mar 2011 - 2:17 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय उत्तम कथा.. आवडली, हे पुन्हा एकदा नमुद करतो. :)
7 Aug 2015 - 5:24 pm | तुडतुडी
मस्त . नारायण धारपांची शैली वाटली . रत्नाकर मतकरींच्या कथेत असं काही नसतं . त्या भयकथांपेक्षा गुढकथा जास्त असतात .
29 Apr 2016 - 12:23 am | Rahul D
जबराट