जंगलकथा -२

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
20 Apr 2008 - 9:53 am

माकडांना पिटाळून लावल्यावर कांही दिवस हत्तींमध्ये साठमारी चालली. पण कुठल्याही परिस्थितीत, जंगलाची सत्ता गमवायची नसल्यामुळे, त्यांनी अखेर आपापसात जुळवून घेतले. माकडे परत सत्तेवर दावा सांगतील या भीतिने त्यांना कोल्ह्यांची व लांडग्यांची मदत घ्यावी लागली.
थोड्याच दिवसांत जंगलवासीयांना आपण काय चूक करून ठेवली आहे याचा बोध झाला. पण आता फार उशीर झाला होता. कोल्हे हे मांसाहारीच असल्यामुळे त्यांना शाकाहारी प्राण्यांपेक्षा वखवखलेल्या हिंस्र पशूबद्दल जास्त कळवळा होताच, कारण त्यांचे आस्तित्वच त्यावर अवलंबून होते. हत्तींना मात्र त्यांच्याबद्दल जवळीक वाटण्याचे काहीच कारण नव्हते. पण माणसांनी सोडून जाताना, शाकाहारी व मांसाहारी यांच्यात जी भांडणे लावून दिली होती ती त्यांच्या पथ्यावर पडली होती. ही भांडणे कधीही मिटू न देण्यातच त्यांचे सत्तेवर टिकून राहण्याचे रहस्य दडलेले होते. तशात त्यांना हत्तेरु, हत्तीरा यांच्या परंपरेत अगदी शोभून दिसेल अशी नवी हत्तीण - 'हत्तीया' मिळाली होती. ती जरी दुसर्‍या जंगलातून आली असली तरी हत्तीराच्या सहवासांत तिने हत्तेरू कळपाच्या एकूणएक चाली व युक्त्या आत्मसात केल्या होत्या. हत्तीसमाजात घराणेशाही ही एक अत्यंत आवडती प्रथा होती व या सगळ्या निकषांवर हत्तीया, ही त्यांना अगदी तारणहार वाटत होती. त्यामुळे हत्तीयाला त्यांनी उस्फूर्तपणे, एक सोंडेने, आपली 'राणी' घोषित केले. नाही म्हणायला काही तुरळक 'महत्वाकांक्षी' हत्तींनी तिला विरोध केला पण बहुमत तिच्या बाजूला आहे हे लक्षांत येताच बंडखोरांचा नेता 'हत्तार' याने लगेच तिच्याशी जुळवून घेतले आणि तिच्याच दरबारात तो मानाच्या जागी झुलू लागला!
हत्तीया अत्यंत धूर्त व हुशार होती. तिने सर्वांचेच पाणी चांगले जोखले होते. तसेच जंगलातल्या भोळ्याभाबड्या प्राण्यांना कसे मुठीत ठेवायचे यांत ती निष्णात झाली होती. 'हत्तार' व्यतिरिक्त प्रत्येक प्राणीसमूहाचे प्रमुख, सत्तेची लालूच दाखवून तिने आपलेसे केले होते. त्यामुळे अत्यंत लबाड, अस्वले, गेंडे, पाणघोडे व काही जिराफ, झेब्र्यांना तिने मंत्रीपद दिले होते. चारा खाऊन माजलेल्या एका 'वळू'ला सुद्धा या पंगतीत मानाचे स्थान मिळाले होते. स्वतः मात्र, जबाबदारी न घेता, तिने काही सिंहांना उच्चपद देऊ केले होते. 'हत्तुल' या आपल्या लाडक्या बछड्याला पुढे आणण्याचा तिचा प्रयत्न चालूच होता. जुन्या परंपरेप्रमाणे सर्व हत्ती या हत्तुलबाळाचे कौतुक करण्यात एकमेकांची स्पर्धा करत होते. हत्तुलला या जंगलाची काहीच माहिती नव्हती, अनुभव तर नव्हताच. तो कुठेही बेतालपणे बडबडत फिरत असे. मग त्यातून होणारा गोंधळ निस्तरण्यासाठी हत्तीसमाजाची तारांबळ उडायची. हत्तीयाने धोरणीपणे हत्तुलला पुढे केले असले तरी तिच्याकडे आणखी एक राखीव पर्याय होताच. पण त्याची एवढ्यात वाच्यता न करण्याइतकी ती हुशार होती.
एकंदरीतच, इतक्या वर्षांच्या गैरकारभाराला सरावलेल्या हत्तीसमाजाकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा कशी ठेवणार ? त्यातून काही दाखवण्यापुरते चांगले काम करायचा प्रयत्न केला की कोल्हे त्यांत लगेच कोलदांडा घालायचे. या कोल्ह्यांच्या निष्ठा 'बाहेर' असल्यामुळे त्यांना या जंगलाच्या भवितव्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. किंबहुना एक दिवस बाहेरून कुमक मिळवून या जंगलावर कोल्ह्यांचेच राज्य आणण्याचे त्यांचे मनसुबे होते. समान ध्येय असल्यामुळे कोल्हे व लांडगे एकमेकांना धरून होते तर समान ध्येय असूनही काही वाघांमध्ये 'सवतासुभा' निर्माण झाला होता. "आपणच काय ते खरे व दुसरे ते कागदी" असे दोन्ही गटांना मनापासून वाटत असल्याने निरपराध बोकडांवर हल्ले होत होते. सिंहसंप्रदाय अलीकडे तसा शांत होता. त्यांचाच एक ज्ञातिबांधव उच्चपदी बसल्याने स्वतःचे वेगळे जंगल स्थापण्याच्या त्यांच्या चळवळी थंडावल्या होत्या.
माकडे झालेल्या पराभवापासून काहीच शिकली नव्हती. संधीची वाट पाहून व्यूहरचना करण्याऐवजी ती एकमेकांनाच दात विचकून ओचकारत होती. वयोवृद्ध 'कपिराज' तर अगदीच निस्तेज झाले होते. त्यांचा प्रतिस्पर्धी 'हुप्प्या' परत सत्तेची स्वप्ने पाहत बसला होता. अतिनिराशेमुळे काही माकडे हिंसक बनली होती तर काही चक्क मांसाहारी झाली होती. सामान्य प्राणी भयभीत झाले होते तर हिंस्र प्राणी, रानटी कुत्रे व तरसे खूष होती. दिवसेंदिवस जंगलातले गवत व घनदाट झाडी कमी होऊ लागली होती. लांबच्या वस्तीतल्या माणसांचे लक्ष परत एकदा जंगलाकडे गेले होते. जंगलाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता.पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नव्हते. मूठभर शहाणे प्राणी, याकडे, जंगलवासीयांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. अगतिकपणे त्यांनी आपली सर्व भिस्त त्या सर्व शक्तिमान परमेश्वरावर ठेवली होती. आणि म्हणूनच ते आजपर्यंत जिवंत होते!

टीप : या कथेत कुणालाही कसलेही साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे.

इतिहासकथासमाजमतविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

20 Apr 2008 - 10:36 am | सहज

मजेशीर दोन्ही भाग आवडले.

कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी
:-)

प्राजु's picture

20 Apr 2008 - 10:42 am | प्राजु

हा भागही आवडला. :))

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

20 Apr 2008 - 11:43 am | स्वाती दिनेश

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे.
दोन्ही भाग अर्थातच आवडले,
आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते,
स्वाती

प्रमोद देव's picture

20 Apr 2008 - 11:45 am | प्रमोद देव

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे.

स्वातीशी सहमत

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

स्वाती राजेश's picture

20 Apr 2008 - 2:31 pm | स्वाती राजेश

हा ही भाग अगदी छान आहे, मजेशीर.
सपर्पक रूपक...

विसोबा खेचर's picture

21 Apr 2008 - 7:23 am | विसोबा खेचर

पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते.

वा! सह्ही लिखा है भिडू!

रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले..

व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे.

हे बाकी मस्तच! ;)

असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती...

तात्या.