जंगलकथा -१

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
20 Apr 2008 - 9:47 am

खालील कथा माझीच असून ती दुसर्‍या एका संकेतस्थळावर आधी प्रसिध्द झालेली आहे. अर्थात तिथे माझे नांव वेगळे आहे. तरी कोणाचा गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा. जास्तीतजास्त वाचकांना ही कथा वाचता यावी म्हणून हा उपद्व्याप!

ही गोष्ट फार प्राचीन काळातली आहे. तिच्यात अलिकडील काळातील स्थळांशी वा पात्रांशी साम्यस्थळे सापडल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
लाखो वर्षांपूर्वी भरतखंडात एक महाअरण्य होते. सर्व प्रकारचे प्राणी त्यांत रहात होते. पण त्यावर वर्चस्व होते ते माणसांचे! जंगलातल्या इतर प्राण्यांना याची फार खंत होती. स्वतंत्र होण्यासाठी त्यातील अनेकांनी माणसांशी अपेशी झुंज दिली होती, त्यांत प्राणार्पणही केले होते, पण ते व्यर्थ गेले होते. हळुहळू माणसांना या प्रदेशाचा कंटाळा आला होता. तरी वरकरणी तसे न भासवता त्यांनी काढता पाय घेण्याचे ठरवले होते. तुमच्या स्वातंत्र्यलढ्याला मान देउन तुमची चांगली व्यवस्था लावून मगच आम्ही जातो असा पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु जाताना त्यांनी जंगलाचे दोन असमान भाग केले. एका भागांत सदैव वखवखलेल्या मांसाहारींची सोय झाली. दुसरा भाग अर्थातच बहुसंख्यीय शाकाहारी प्राण्यांसाठी असावा अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शाकाहारींचा पहिला राजा हत्तीसमाजाचा होता. त्याचे नांव हत्तेरु. तर या हत्तेरुला मोठेपणा मिरवण्याची खूप हौस होती. त्याच्या बरोबरीचे अनेक हत्ती तशाच विचारांचे होते. त्याने असे फर्मान काढले की ज्या मांसाहारींना इथेच रहायचे आहे त्यांनी खुशाल इथे रहावे, शाकाहारी त्यांना त्रास देणार नाहीत. याचा परिणाम फार गुंतागुंतीचा झाला.
अनेक लबाड लांडगे, शिकारी कुत्रे, कांही वाघ सिंह मागेच राहिले. त्यांना खुष ठेवण्यासाठी त्यांची खास बडदास्त ठेवण्यात आली. तरसांना शिकार करता येत नसल्यामुळे प्रत्येकाने आपल्या शिकारीतला वाटा त्यांना द्यावा असा ठराव पास झाला. वाघ सिंहांनीही खास अधिकार मागून घेतले. बाकीच्यांच्या पदरात मात्र बहुसंख्य असुनही कांहीच पडले नाही. ते बिचारे, स्वतंत्र झाल्याच्या आनंदात "गेले घ्यायचे राहुनी" असा विचार करुन गप्प बसले.
हत्तेरु व त्याचा कळप दिवसाचा बराच वेळ पाणवठ्यावर जलक्रीडा करण्यात घालवायचे. सगळा कारभार त्यांनी गाढवांवर सोपवला होता. सामान्य प्राण्यांचा वाली कोणीच नव्हता. कोल्ह्यांनी या परिस्थितीचा फारच फायदा करुन घेतला होता. लांड्ग्यांनी हरणांवर हल्ला केला तरी हे कोल्हे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करायचे, गप्प बसून मजा बघायचे. पण कधी या हल्ल्यांना कंटाळून शाकाहारी प्राण्यांनी प्रतिहल्ला केला की जंगलभर नुसती कोल्हेकुई सुरु व्हायची. मग हत्ती सर्व प्रकरणाची चौकशी करुन हरणांना शांततेचा उपदेश करायचे आणि अन्य मोठ्या आकाराच्या शाकाहारींना ताकीद द्यायचे. माणसांनी केलेले कायदे पाळायला प्राणी बांधील नव्हतेच! वानरसेना सुरवातीच्या काळात अलिप्तपणे झाडावरची फळे खाण्यात आणि हत्तेरुचे नेमके काय चुकले यावर चर्चा करण्यातच धन्यता मानत होती.
एके दिवशी हत्तेरु मरण पावला. सर्व प्राण्यांना अल्पकाळ चिंता वाटली. परंतु हत्तींनी हत्तीराला महाराणी केले. तिने हत्तेरुच्या तुलनेने बरा कारभार केला खरा, पण सत्तालोलुप खुषमस्कर्‍यांची एक फौजच तिच्याभोवती तयार झाली. सर्व प्राण्यांना एकमेकांशी भांडत ठेवून आपली सत्ता मजबूत करण्यात ती यशस्वी झाली. याचा परिणाम काय होईल याचा फारसा विचार न केल्याने जंगलाचे आस्तित्वच धोक्यात येण्याची वेळ आली. पुढे फार उन्मत्त होऊन तिने सिंहांमधे भांडणे लावून दिली. तेंव्हा ते सहन न होऊन काही सिंहांनी ती बेसावध असताना तिला एकटे गाठून ठार केले. हत्तीराच्या मृत्युनंतर जंगलभर एकच हाहाकार उडाला. हत्तीसमाज तर गलितगात्रच झाला. त्यांनी एकदोन नेते सिंहासनावर बसवले खरे, पण ते सगळेच शेणाचे पुतळे ठरले! हत्तीराचा मुलगा, हत्तीव हा तर फारच अननुभवी, त्या बिचार्‍याचा या साठमारीत निष्कारण बळी गेला.
हत्तेरुच्या पश्चात माकडांनी सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण हत्तीरासमोर त्यांची डाळ शिजली नव्हती. हत्तीराच्या नंतर मात्र त्यांनी शाकाहारी का मांसाहारी हा एक जुना वाद उकरुन काढला. वर्षानुवर्षे हत्तींच्या गैरकारभाराला कंटाळलेल्या प्राण्यांना त्यांत तथ्य दिसू लागले, थोडे कुतुहलही वाटले. कोल्हे मात्र माकडांना तीव्र विरोध करत होते. पण कोल्हे हे बर्‍यावाईट सर्वच गोष्टींना विरोध करतात हे प्राण्यांना माहिती होते. तसेच कोल्हे कधीकाळी सत्तेत आले तर सर्वांनाच उपासमारीचे भय होते. अशा स्थितीत एकदा तरी माकडांना संधी द्यावी या विचाराने बहुसंख्य प्राण्यांनी त्यांचे समर्थन केले. माकडे सत्तेवर आली पण त्यासाठी त्यांना काही नाराज हत्ती, घोडे, गेंडे, जिराफ वगैरेंचे सहाय्य घ्यावे लागले. सामान्य प्राणीही आता जरा बरे दिवस येतील या आशेने हरखून गेले.
पण कसचे काय, माकडांनी सत्तासुरा चढताच माणसांनी त्यांच्यासाठी केलेल्या सर्व म्हणी खर्‍या करुन दाखवल्या!
सारे जंगल अशांत झाले. हत्तींच्या राज्यात कांही नाराज प्राणी, "यापेक्षा माणसांचे राज्य बरे होते" असे बोलून दाखवत. माकडांच्या धुमाकुळात तर यापेक्षा हत्तींचा गैरकारभार बरा होता अशा निर्णयाप्रत सर्व प्राणी आले. पण हत्तींमधे प्रचंड फाटाफूट झाली होती. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. फक्त लांडगे, कोल्हे व शिकारी कुत्र्यांचे फावले होते. माकडांना पर्याय मिळेपर्यंत सर्व प्राणी माकडांच्या हातातले कोलीत काढून घेण्याच्या प्रयत्नांत होते. माकडांचा प्रमुख एक वयोवृद्ध कपिराज होता. तो हताश झाला होता कारण त्याचे कोणीच ऐकत नव्हते. शेवटी कंटाळून त्यानेही नाचावयास सुरवात केली. मग तर सगळी वानरसेना उत येऊन सूरपारंब्या खेळायला लागली. कावळे नेहमीप्रमाणे कांवकांव करुन या गोंधळात भर घालू लागले. ऊंच झाडावर बसल्यामुळे सर्व बातम्या त्यांना आधी समजत, त्याला तिखटमीठ लावून त्या चिवडण्यातच ते धन्यता मानत. वाईट बातम्या ओरडून पसरवणारे हे कावळे चांगल्या बातम्यांमधे फारसा रस दाखवत नसत.
अस्वले या सार्‍या अराजकात अलिप्त राहून नदीकाठी मासे खाण्यात मग्न होती. शेवटी एकदाचा हत्तींनी पुढाकार घेऊन माकडांना पिटाळून लावले. सर्व प्राणी भयभीतपणाने आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची वाट पाहू लागली. पण हत्तींमधला कलह पुन्हा एकदा उफाळून आला. वाघ सिंहांमधल्या मारामार्‍या चालूच राहिल्या. माकडांनी आगी लावायला सुरवात केली.
मूठभर बलवान प्राणी सुखी झाले होते त्या जोरावर सगळ्या जंगलाची खूपच प्रगती झाली असल्याचा हत्ती, कोल्हे व कावळ्यांना साक्षात्कार झाला!!
सामान्य प्राण्यांच्या मते मात्र,
जंगलावरचे वखवखलेल्या प्राण्यांचे छुपे हल्ले चालूच राहिले.
कमजोर प्राण्यांची उपासमार चालूच रहिली.
बलवान प्राण्यांसाठी वेगळा न्याय चालूच राहिला.
जखमेवर मीठ चोळावे तशी "जंगल मे मंगल" ही घोषणा ऐकत रहावी लागली.
जंगलात खर्‍या अर्थाने सुराज्य यावे ही सामान्य प्राण्यांची अपेक्षा फोलच ठरली !!!
त्यांना बिचार्‍यांना कुठे माहित होते की माणसांच्या राज्यातही हेच चालते ??

इतिहासकथासमाजमतविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Apr 2008 - 9:56 am | प्राजु

प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही.

हा भाग आवडला.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश's picture

20 Apr 2008 - 2:29 pm | स्वाती राजेश

कथा छान लिहिली आहे. आवडली.

विद्याधर३१'s picture

20 Apr 2008 - 8:18 pm | विद्याधर३१

दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता.
पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती..
हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही.

हा ही भाग आवडला.

विद्याधर

व्यंकट's picture

21 Apr 2008 - 5:45 am | व्यंकट

हात्तिच्या !

व्यंकट

तिमा's picture

20 Mar 2016 - 11:15 am | तिमा

आत्ताच्या परिस्थितीलाही फिट बसतीये का ?