पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in जनातलं, मनातलं
1 Sep 2010 - 10:41 pm

पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १

एकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.

(टीप : मागील भागात कादंबरीच्या नायकाचे नाव लिहायचे राहिले होते. ते विन्स्टन स्मिथ असे आहे. अजून एक सांगायची राहिलेली गोष्ट म्हणजे समाजरचना बिग ब्रदर > इनर पार्टी > आउटर पार्टी > सामान्य जनता अशा उतरंडीची आहे. आपला कथा नायक आउटर पार्टीचा घटक आहे).

असा हा विन्स्टन स्मिथ ज्या खात्यात काम करत असतो त्या खात्याचे नाव मिनिस्ट्री ऑफ ट्रुथ असे असते. या खात्याचे काम सत्य फॅब्रिकेट करणे असे असते.
विन्स्टन स्मिथला एकदा एक सूचना मिळते. "अमुक दिवशीच्या बिगब्रदरच्या भाषणाचा वृत्तांतात अतिशय ढिसाळपणे (डबलप्लसअनगुड) दिलेला आहे. त्यात काही अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींविषयी (अनपर्सन्स्) उल्लेख आहेत." स्मिथ ते भाषण काढून वाचतो. त्या भाषणात बिग ब्रदरने कुणा एका कॉम्रेडच्या त्यागाबद्दल आणि निष्ठेबद्दल कौतुक केलेले असते आणि त्याला एक क्रॉस बक्षिस दिलेला असतो. सूचनेतील अनपर्सन या उल्लेखावरून स्मिथला कळते की हा कॉम्रेड बिग ब्रदरच्या मर्जीतून उतरला आणि त्याला ठार करण्यात आले आहे. आता स्मिथचे काम हे आहे की त्या कॉम्रेडचे नामोनिशान सर्व रेकॉर्डमधून पुसणे. तो कॉम्रेड जणू कधी अस्तित्वातच नव्हता.

असेच एकदा योगायोगाने त्याची गाठ एका मुलीशी पडते. ही मुलगी ऍण्टी सेक्स लीगची कार्यकर्ती असते. ऍण्टी सेक्स लीग ही पौगंडावस्थेतील मुलांची संघटना असते. लैंगिक व्यवहार हे राष्ट्रासाठी (पक्षी=पार्टीला कार्यकर्ते मिळावेत म्हणून) करायचे असतात त्याखेरीजच्या लैंगिक व्यवहारांचा निषेध करण्याचे काम ही संघटना करीत असते. त्या मुलीच्यामार्फत तो ओब्रायन नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात येतो.

हा ओब्रायन ब्रदरहूड नावाच्या भूमिगत संघटनेचा सदस्य असतो. ही संघटना बिग ब्रदरची आणि पार्टीची सत्ता उलथून टाकण्यासाठी कार्यरत असते. अशी संघटना अस्तित्वात आहे आणि गोल्डस्टाईन नावाची व्यक्ती तिचे नेतृत्व करते ही माहीती स्मिथला कुजबुज म्हणून माहिती असते. पार्टीच्या वर्तुळात या संघटनेच्या कुकर्मांची चर्चा होत असते. अनेकदा स्मिथला वाटत असते की अशी काही संघटना अस्तित्वात नाही आणि ती मिनिस्ट्री ऑफ ट्रुथचीच काल्पनिक निर्मिती आहे. पण ओब्रायनला भेटल्यावर अशी संघटना आहे अशी त्याची खात्री पटते.

ओब्रायन स्मिथला गोल्डस्टाईनने लिहिलेले पुस्तक वाचायला देतो. पार्टी कशाप्रकारे सर्व लोकांना कंट्रोल करून राज्य करते त्याची तत्त्वे त्या पुस्तकात लिहिलेली असतात. पार्टीच्या "फ्रीडम इज स्लेव्हरी", "इग्नरन्स इज स्ट्रेन्ग्थ" आणि "वॉर इज पीस" या घोषणांमागची विचार प्रेरणा काय याचे स्पष्टीकरण त्यात असते.

त्या पुस्तकातील एका प्रकरणाची थोडक्यात ओळख

वॉर ईज पीस

औद्योगिक क्रांतीच्या काळात यंत्रांचा शोध लागल्यापासूनच मानवी कष्ट, हालअपेष्टा यांपासून मुक्ती मिळण्याची स्वप्ने समाजातल्या विचारवंतांना पडू लागली. जसजसे उत्पादन वाढू लागले तसतसे सर्व जनतेला कष्टरहित आणि मुबलक जीवन देणे शक्य असल्याची जाणीव त्यांना झाली. काही दशकातच असा समाज निर्माण होईल की ज्यात लोक कमी तास काम करतील, त्यांना मुबलक प्रमाणात सर्व उपभोग्य वस्तू उपलब्ध होतील आणि त्यांना कलांचा आणि जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेणे शक्य होईल अशी चित्रे रंगवली जाऊ लागली.
परंतु असा समाज निर्माण होणे हे मुळातूनच धोकादायक असल्याचे समाजव्यवहाराचे नियंत्रण करणार्‍या लोकांना जाणवू लागले. ज्या समाजात सर्व लोक भरभराटीचे आयुष्य जगतात आणि सर्वांना सर्व सुखसोयी सहज उपलब्ध असतात अशा समाजात विषमतेची उघड चिह्ने शिल्लक रहात नाहीत. अशा भरपूर मोकळा वेळ असणार्‍या लोकांना स्वतःचा विचार करता येईल आणि केव्हा ना केव्हा तरी नियंत्रक सत्ताधार्‍यांचे इथे काय काम? असा प्रश्न त्यांना पडून ते त्या सत्ताधार्‍यांना बाजूस सारतील. म्हणून उतरंडीची समाजरचना दारिद्र्य आणि अज्ञानाच्या वातावरणातच शक्य आहे.

यावर उपाय म्हणून काहींनी शेतकीप्रधान भूतकाळाकडे परतावे असा प्रचार करायचा प्रयत्न केला पण औद्योगीकरणाची ओढ फार प्रबळ झालेली होती. शिवाय त्यातून लष्करीदृष्ट्या कमकुवत होण्याचा आणि त्यामुळे पराभूत होण्याचा धोका होता.

काहींनी उत्पादन कमी करण्याचा उपाय करून पाहिला. १९२०-४० च्या दरम्यान अनेक अर्थव्यवस्था कुजवण्यात आल्या, लोकांना बेकार करून त्यांना सरकारी मदतीवर जगवले गेले. परंतु यातूनही लष्करी कमकुवतपणाचा धोका टळत नव्हताच. पुन्हा टंचाई कृत्रिम असल्याचे लोकांना उघड दिसत होते. प्रश्न होता लोकांचा खरा फायदा करून न देता यंत्रयुगाची चाके फिरती कशी ठेवायची? वस्तू निर्माण करायच्या पण त्यांचे समाजात वाटप करायचे नाही. (किंवा वाटप करण्यायोग्य वस्तू निर्माणच करायच्या नाहीत).

हा दुहेरी हेतू सततच्या युद्धांनी साध्य होतो. लोकांना सुखसोयी पुरवण्यासाठी वापरता येण्याजोग्या वस्तूंचा नाश करण्याचा युद्ध हा मार्ग आहे. जरी युद्धात प्रत्यक्ष वस्तू नष्ट झाल्या नाहीत तरी त्यांचे उत्पादन चालू ठेवता येते; जेणे करून मनुष्यबळाचा वापर कुठल्याही प्रकारे उपयुक्त नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी करता येतो. प्रचंड खर्च करून आपण तरंगता किल्ला बांधत आहोत. थोड्या वर्षांनी हा तरंगता किल्ला कालबाह्य म्हणून टाकून दिला जाईल आणि नवा तरंगता किल्ला बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.

अशा रीतीने युद्ध हे संपत्तीचा आवश्यक नाश घडवून तर आणतेच पण त्याच बरोबर हे कार्य मानसिकदृष्ट्या स्वीकारार्ह रीतीने घडवून आणते. सततची युद्धमान परिस्थिती लोकांना (इथे आऊटर पार्टी) कायम त्यागासाठी तयार ठेवते. भविष्यात मिळणार्‍या काल्पनिक विजयाच्या आशेने सत्ताधार्‍यांना संपूर्ण अधिकार द्यायला लोक तयार होतात. मुळात युद्ध निर्णायक व्हायची शक्यता नसल्याने प्रत्यक्ष परिस्थितीत काही फरक पडण्याची शक्यता नसते. म्हणुन युद्ध हीच समाजात शांतता राखणारी गोष्ट आहे.

पुढे स्मिथ त्या चळवळीत ओढला जातो. काही काळ चळवळीचे काम केल्यावर त्याला एक दिवशी कळते की ओब्रायन...................

अतिशय सिनिकल वर्णनाची कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते ती त्यात सांगितलेल्या राजकीय तत्त्वज्ञानाने. तेही संपूर्ण निराशावादी वाटू शकते. पण त्या तत्त्वज्ञानात आपल्याला आपल्या आजूबाजूच्या समाजात पहायला / ऐकायला मिळणारी इतकी साम्यस्थळे दिसतात की चकित व्हायला होते. [याची संभावना कोणी आशावादी मनुष्य कदाचित - एखाद्या रोगाची लक्षणे वाचल्यावर आपल्याला तो रोग झाल्याचे वाटते अशी करेल]

न्यूस्पीक

वर दोन विचित्र भासतील असे शब्द वेगळ्या रंगात लिहिले आहेत. ते या राज्यातील नव्या भाषेतले आहेत. नव्या भाषेला न्यूस्पीक असे म्हतले जाते. ही इंग्लिशची मोडतोद करून मुद्दाम घडवण्यात आलेली भाषा आहे. या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे हिच्यात कमीत कमी शब्द आहेत. आणि जास्तीचे शब्द अनावश्यक म्हणून रद्द केले जात आहेत. उदा गुड आणि बॅड असे दोन शब्द न ठेवता गुड हा एकच शब्द आहे. बॅड ऐवजी अनगुड एक्स्ट्रीमली बॅड च्या ऐवजी डबलप्लस अनगुड वगैरे. दुसरा शब्द अनपर्सन. म्हणजे नसलेलि व्यक्ती.

असे अनेक शब्द आणि वाक्यरचना ऑरवेलने सांगितल्या आहेत. मला स्वत:ला या भाषेच्या खटाटोपाने लोकांची मने नियंत्रित करण्यात सत्ताधार्‍यांना काय फायदा होऊ शकेल हे कळलेले नाही. कुणाला कळले तर प्रतिसादातून प्रकाश टाकावा.

पुस्तक समाजव्यवहारावर भाष्य करणारे म्हणून वाचनीय आहे.

समाप्त.

समाजजीवनमानराजकारणप्रकटनआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

1 Sep 2010 - 10:58 pm | श्रावण मोडक

समाप्त? ते का? दोन भागात ही कादंबरी संपते? लिहा हो!

सुनील's picture

2 Sep 2010 - 12:41 am | सुनील

हेच म्हणतो.

राजेश घासकडवी's picture

1 Sep 2010 - 11:13 pm | राजेश घासकडवी

चांगलं लिहून ते पटकन गुंडाळल्याबद्दल थत्तेंचा निषेध. की आणखी लिहिलं होतं पण ते ट्रिपलप्लस अनगुड असल्यामुळे ते लेखन अनरीड केलं गेलं? अं अं? अनरीड करता येणाऱ्यांनी हे हलक्यानेच घ्यावं. नाहीतर आमचा अनआयडी व्हायचा.

न्यूस्पीकविषयी अजून लिहा...

चांगलं लिहून ते पटकन गुंडाळल्याबद्दल थत्तेंचा निषेध.
न्यूस्पीकविषयी अजून लिहा...

हेच म्हणतो!

विकास's picture

2 Sep 2010 - 12:16 am | विकास

चांगली चाललेली लेखमाला एकदम अनआर्टीकल करत आहात म्हणून आपले डबलप्लस अनअभिनंदन!

...त्या खात्याचे नाव मिनिस्ट्री ऑफ ट्रुथ असे असते. या खात्याचे काम सत्य फॅब्रिकेट करणे असे असते.

हे खाते जालावर पण काही ठिकाणी अजून सक्रीय आहे असे वाटते. ;)

सहज's picture

2 Sep 2010 - 6:56 am | सहज

आवडली.

राजेश घासकडवी's picture

2 Sep 2010 - 12:59 pm | राजेश घासकडवी

मला जे व्हेगली आठवतंय त्यावरून न्यूस्पीक नुसते संवाद सोपे करण्यासाठी नव्हती. मुळात सेन्सॉरशिपची ती पुढची पायरी होती. ती वापरल्यामुळे काही विचार आपोआपच करता येत नाहीत, व्यक्त करता येत नाहीत. व्याकरण व शब्दसंपदा यांवरच तशी बंधनं होती. (जुन्या काळपासून आपण विशिष्ट भाषेत विचार करतो असा समज आहे, सध्या तो मानत नाहीत बहुधा).

दुसरी आणखीन एक गोष्ट आठवते आहे म्हणजे ती भाषा मधुपर्यायोक्तीसारखी होती. म्हणजे वाईटासाठीचे शब्दच नाहीत. वाईट नष्ट करता आलं नाही तर त्याबाबतचे शब्द बदलायचे म्हणजे सगळं कसं आलबेल असल्यासारखं वाटतं, असं काहीसं. म्हणजे मूळ नीग्रो शब्द बदलून कलर्ड, किंवा ब्लॅक म्हणायचं, मग तेही बदलून आफ्रिकन अमेरिकन म्हणायचं - तसं. म्हणजे त्यांच्या परिस्थितीत काही फरक करण्यापेक्षा शब्द बदलून वरवर सगळं भलं करायचं.

च्यायला, तो भाग वाचायलाच पाहिजे पुन्हा. तुम्ही नसतं ओझं वाढवून ठेवलंत.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

चांगलं लिहून ते पटकन गुंडाळल्याबद्दल थत्तेंचा निषेध.

+१
थत्तेचाचा हाय हाय !!