माझ्या मनातले राऊळ

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
20 May 2010 - 9:45 pm

(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! )

देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते. त्यात जर ते दुर्योधनाचे, हिडिंबेचे, काळभैरवाचे, उंदरांचे किंवा रावणाचे देऊळ असेल तर? मग अश्या ठिकाणी कसली आली आहे मनःशांती? पण ह्या प्रकारच्या देवळांचेही काही निश्चित प्रयोजन असावे. मनुष्यातील सत्प्रवृत्ती जश्या पूजिल्या गेल्या तश्याच दुष्प्रवृत्तीही पूजिल्या जाव्यात? अखेर, सत्प्रवृत्ती व दुष्प्रवृत्ती - दोन्ही मनुष्यस्वभावाचीच अंगे आहेत ना! जे जे उदात्त, अद्भुत आहे ते ते, व जे जे रौद्र, बीभत्स, शृंगारिक, क्रूर आहे तेही - देवळांमध्ये या नवरसांचे मूर्त स्वरूप दिसते. अश्या ठिकाणी गेल्यावर पंचेंद्रिये जशी निवतात तसेच मनही निवते. पूर्वसंकल्पना गळून पडतात. आयुष्याबद्दल एका प्रकारची स्वीकृती येते. आणि विरक्तीही!

मी जेव्हा एखाद्या शांत - रम्य वेळी, निवांतपणे, स्वच्छ परिसर असलेल्या मंदिरात जाते तेव्हा तिथे येणारा अनुभवही खूप अनोखा असतो. अश्या वेळी का कोण जाणे, देवदर्शनाचा खरा आनंद मिळतो. भले देवळात देवाची मूर्ती असो अगर नसो! (गुरुद्वारा, बहाई मंदिरे). भले ते देऊळ प्रख्यात असो वा नसो, त्यावर रुपेरी मुलामे चढलेले असोत वा नसोत. दोन घटका देवळाच्या पायऱ्यांवर बसताना आपोआप माझे मन शांत होते. विचार थंडावतात. दृष्टी आत वळते. मनाचा मनाशीच सुखसंवाद सुरू होतो. त्यातूनच कधी मला अडलेल्या प्रश्नांची उत्तरे गवसतात, कधी अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते. पण सवाल हा आहे की त्यासाठी देवळातच का जायचे? अगदी कोठेही हा संवाद होऊ शकतोच की! पण, शांत देवळात ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा अंतर्ध्वनी ऐकू शकता, त्याप्रमाणे इतर कोठे येतो तरी का ऐकू हा आवाज?

शोध घेताना मला अचानक जाणवले....गेली अनेक वर्षे, खरे तर मला आठवत असल्यापासून, कोणत्याही निसर्गरम्य स्थळी गेले की माझी स्तिमित पुतळी होते. समोर त्या प्रवासी कंपन्यांच्या ब्रोशर्समध्ये असतो तसा विहंगम, नयनमनोहर निसर्ग-देखावा असतो. मोकळी हवा, प्रफुल्लित करणारा वारा आणि जे जे काही अप्रतिम आहे ते ते समोर माझ्या स्वागताला पसरलेले असते. अशा उत्फुल्ल वातावरणात आजूबाजूचे लोक प्रसन्न खिदळत असतात, हास्यविनोद करत असतात, फोटोज काढत असतात, निसर्गाच्या नजाऱ्यावर हर्षोद्गार काढत असतात..... आणि मी? मी ह्या सर्वांपासून काहीशी दूर, गुरफटलेली, अलिप्त असते. अबोल, स्तब्ध. बाहेर बघणारी, पण खरे तर दृष्टी आत वळलेली. अंतर्मुख. विस्मित. दिग्मूढ!

कारण त्या क्षणांना मी स्वतःत एका प्रकारे नसतेच मुळी! समोरच्या निसर्गाला मनाने आलिंगत असते मी... त्या अथांग आकाशाला कवेत घेण्याचा प्रयत्न करत असते, गगनाला गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगांना ह्या छोट्याश्या नजरेत सामावायला बघत असते.... कधी मऊशार गवतात मनानेच लोळण घेत असते, कधी समुद्राच्या उफाळत्या अजस्र लाटांवर मीही मनातल्या मनात आरूढ झालेली असते आणि स्वतःही एक लाट बनलेली असते, कधी झऱ्याच्या खळखळाटात हरवून गेलेली असते, कधी धुक्याने स्वतःला अंतर्बाह्य लपेटून घेत असते तर कधी मातीच्या गंधाने माझी वेडावलेली गत झालेली असते.... पंचमहाभूतांना पंचेंद्रियांनी समरसून अनुभवायचा, त्यांच्यात एकरूप होऊन जाण्याचा हा आवेग मला वेढत असतो. त्याची तीव्रता कधी इतकी दाहक असते की त्या स्तिमितावस्थेतही डोळ्यांत अश्रू येतात. कंठ दाटून येतो.

वाणी तर आधीच मूक, अबोल झालेली असते. आता मनाच्या अवकाशात फक्त तो निसर्ग व्यापून उरतो.

इतर कोणताच विचार नसतो. ना कसली चिंता, ना कसली आशा.

हीच का ती निद्रित जागृतावस्था? हाच का तो वर्तमान क्षण? हेच का उघड्या डोळ्यांनी लागलेले ध्यान?

मला माहीत नाही! पण एक नक्की.... ही अवस्था मला स्वतःतील अथांग अवकाशाची दृढ जाणीव मात्र करून देते. जेव्हा मनाची कवाडे खुली असतील तेव्हाच मला हे आकाश नजरेत सामावता येईल... तरच हा मातीचा, हिरवाईचा सुगंध रंध्रारंध्रात भरून घेता येईल... तरच समुद्राचे, झऱ्याचे, नद्यांचे संगीत माझे अस्तित्व व्यापून टाकेल!
झाडे, नद्या, डोंगर-दऱ्या, आणि त्यांना लपेटणारे आकाश. त्यांच्याशी एकरूप होताना, त्यांना आपल्यात सामावताना मला स्वतःतील लयही सापडते. त्यांच्याच तर तालावर ती नृत्य करत असते. आणि त्या अनुभवापाठोपाठ येते ती कृतज्ञता. मी खरंच असं काय केलं की मला ह्या निसर्गाने एवढ्या उदारहस्ते भरभरून द्यावं? माझ्या झोळीत त्याने हे जे उदंड वैभव घातले आहे त्याची उतराई मी कधी तरी होणार आहे का? त्याच्या अपार मायेच्या वात्सल्यस्पर्शाने माझे जीवन ओतप्रोत भरले आहे. बस्स! आता दुसरे काही नको. मागण्यासारखे काही उरलेले पण नाही. मागणाराही तूच आणि देणाराही तूच! तुझेच तुला मी काय देऊ?

मनात अपार समाधान दाटून येते. तृप्तीचा आल्हाद अनुभव.

हीच तर असते ना पूजा? हीच तर असते ना समाधी? हाच असतो ना आत्मसंवाद?

आता कळले की बोल अबोल का झाले.... विचार स्तब्ध का झाले.... भावना, बुद्धी यांच्यापलीकडचे काही का जाणवले....
हीच माझी पूजा. हा निसर्गच माझे देऊळ! त्याला फक्त चार भिंतींचे आवरण नाही की मानवनिर्मित आचार-उपचारांची झालर नाही! त्याच्या दारात बसले की सारे कष्ट मिटतात, हेवेदावे गळून पडतात, मनात आनंदलहरी उमटतात किंवा शांत गंभीर तरंग.

माझ्या ह्या देवळाच्या विराट वेगळेपणात, अमर्याद स्वरूपात मला धन्यता आहे. सर्वांना खुलं, बंधनमुक्त असलेलं हे देऊळ प्रत्येकाच्या मनातच दडलेलं आहे. पण निसर्गदेवतेच्या सान्निध्यात मनातल्या ह्या देवळाचे जे लख्ख दर्शन घडते ते केवळ शब्दातीत आहे!

-- अरुंधती कुलकर्णी

संस्कृतीवावरधर्ममुक्तकप्रकटनविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

शुचि's picture

20 May 2010 - 10:13 pm | शुचि

कालच एक पुस्तक वाचत होते. एका धर्मगुरुने विचारले - देव कोठे आहे? एका शिष्याने देवळाकडे बोट दाखवले. दुसर्‍याने निसर्गाकडे तर तिसर्‍याने पुराणाकडे. परत गुरुंनी विचारले "पण देव आहे कुठे?" शिष्यांना उत्तर देता आलं नाही. मग ते उत्तरले - "He is is found where you let him in"

नंतर लेखकाने उदाहरण दिले आहे - जॉगींग करायच्या आधी अतिशय कंटाळा येतो, ओझे वाटते. पण एकदा मोकळ्या हवेत गेलं जॉगींग करू लागलं, झपाझप चालू लागलं की मनावरचा ताण दूर होऊ लागतो. मन हलकफुलकं होतं, निसर्ग, गर्दी यांच्याशी एकरूप होऊन , काळजी विसरतं. Because you let him in.

मला वाटतं अरुंधती अगदी हाच मुद्दा तू देखील लेखात मांडलायस. समर्पक उदाहरणे देऊन.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मदनबाण's picture

20 May 2010 - 10:21 pm | मदनबाण

विचार आवडले... :)
उंदरांचे मंदीर बिकानेर मधे असुन त्या देवीचे नाव करनी माता असे आहे...डिस्कव्हरी चॅनलवर एकदा त्याचा माहितीपट पाहिला होता...
काळभैरवाच्या उजैन मधे असलेल्या मंदीरात जाण्याचा योग आला होता,तेव्हा मंदीराच्या आवारात वाईनच्या बाटल्या विक्रीस ठेवलेल्या होत्या...वाईन हा नैवेद्य म्हणुन दाखवला जातो...माझ्या हाताने त्या काळभैरवाला वाईन पाजली आणि त्याने ती प्यायली देखील !!!
मी मनात विचार केला देवळाच्या खाली कुठेतरी पिंपात ही सर्व वाईन जमा होत असेल आणि पुजारी ती तिर्थरुप समजुन ब्रम्हानंदात लीन होत असेल...
माणसातला (स्वतः मधला) देव लोकांना अजुन सापडत नाही हे विशेष...
"Who am I?" "Where did I come from?" and "Where am I going?"
हे प्रश्न माणसाने स्वतःला विचारावेत असं कुठे तरी वाचल्याचे आठवते...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

टिउ's picture

21 May 2010 - 12:25 am | टिउ

मी मनात विचार केला देवळाच्या खाली कुठेतरी पिंपात ही सर्व वाईन जमा होत असेल आणि पुजारी ती तिर्थरुप समजुन ब्रम्हानंदात लीन होत असेल...

नाहीतर तीच वाईन बाटल्यांमधे भरुन परत बाहेर विकायला ठेवत असतील...

लेख आवडला! :)

पंगा's picture

21 May 2010 - 7:04 am | पंगा

मी मनात विचार केला देवळाच्या खाली कुठेतरी पिंपात ही सर्व वाईन जमा होत असेल आणि पुजारी ती तिर्थरुप समजुन ब्रम्हानंदात लीन होत असेल...

तीर्थरूप? ऐज़ इन 'पिता'? ;)

"Who am I?" "Where did I come from?" and "Where am I going?"
हे प्रश्न माणसाने स्वतःला विचारावेत असं कुठे तरी वाचल्याचे आठवते..

अरे गुरु, कोणीतरी हे पण फरमावून राहिले, की "कहाँ से तू आया और कहाँ तुझे जाना है, खुश है वही जो इस बात से बेग़ाना है..." ऐकून नाही राहिले काय कधी?

- पंडित गागाभट्ट

sagarparadkar's picture

21 May 2010 - 5:36 pm | sagarparadkar

>> "Who am I?" "Where did I come from?" and "Where am I going?"
हे प्रश्न माणसाने स्वतःला विचारावेत असं कुठे तरी वाचल्याचे आठवते...

अहो हे तर अगदी सनातन प्रश्नं आहेत ...

आद्य शंकराचर्यांन्ना सुद्धा हेच प्रश्नं पडत असत:
कोsहं कथमिदं जातं , कर्ता कोवास्य विद्यते, उपदानं किमस्तीहः विचारः सोयमीद्रुषः

शुद्धलेखनाची खात्री नाही :)

मदनबाण's picture

21 May 2010 - 6:04 pm | मदनबाण

हे...गाणं बरचं काही सांगुन जाते...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

अरुंधती's picture

21 May 2010 - 6:46 pm | अरुंधती

पंच ''म''कारात मद्य, मांस, मत्स्य, मैथुन व मुद्रा येतात, आणि काळभैरव हा तर योगेश्वरी शक्तीचा पती! मग मद्याचा प्रसाद ओघानेच! मजेशीर माहिती.
:)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्पंदना's picture

20 May 2010 - 10:33 pm | स्पंदना

कुठे ही विस्कळीत पणा नाही आहे अरुन्धति. छान लिहितेस ग! कित्ती सुन्दर शब्द, अन या वेळी अनुभव न लिहिता स्वतःच परिक्षण? पण छान जमलय. तुझी स्वतःची अशी लेखन शैली आहे.

त्यात जर ते दुर्योधनाचे, हिडिंबेचे, काळभैरवाचे, उंदरांचे किंवा रावणाचे देऊळ असेल तर?

हे लोक आपल्यासाठी जरी व्हिलन असले तरी त्या त्या भागाचे राजे आणि प्रजेचे पालन कर्ते होते. त्या त्या वेळी त्यान्नी आपल्या प्रजे साठी हितकारक अस काही तरी केल असणारच ना? ही झाली मानव म्हणुन जन्माला आलेल्यान्च्या पुजनाची गोष्ट्......काळभैरव हा जोतिबाचा सेनापति! जोतिबा हे बारा ज्योतीर्लिन्गा पैकी एक्...शन्कराचा तेजोभाग.

राहिले उन्दीर आणि हिडिम्बा ....कदाचित ज्यान्च्या पासुन भय उत्पन्न होते...वा आपली काहीही मात्रा चालत नाही त्याना खुष करायचा प्रयत्न असावा.....उन्दीर ..गजाननाचे वाहन म्हणुन असेल?

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

बेसनलाडू's picture

20 May 2010 - 11:08 pm | बेसनलाडू

आवडले. विचार प्रामाणिक वाटले; आणि तुम्हांला लिहिण्यापूर्वी वाटल्यासारखे विस्कळीत वाटले नाहीत.
(नीटनेटका)बेसनलाडू
मी जेव्हा एखाद्या शांत - रम्य वेळी, निवांतपणे, स्वच्छ परिसर असलेल्या मंदिरात जाते तेव्हा तिथे येणारा अनुभवही खूप अनोखा असतो. अश्या वेळी का कोण जाणे, देवदर्शनाचा खरा आनंद मिळतो. भले देवळात देवाची मूर्ती असो अगर नसो! (गुरुद्वारा, बहाई मंदिरे). भले ते देऊळ प्रख्यात असो वा नसो, त्यावर रुपेरी मुलामे चढलेले असोत वा नसोत. दोन घटका देवळाच्या पायऱ्यांवर बसताना आपोआप माझे मन शांत होते. विचार थंडावतात. दृष्टी आत वळते. मनाचा मनाशीच सुखसंवाद सुरू होतो. त्यातूनच कधी मला अडलेल्या प्रश्नांची उत्तरे गवसतात, कधी अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते. पण सवाल हा आहे की त्यासाठी देवळातच का जायचे? अगदी कोठेही हा संवाद होऊ शकतोच की! पण, शांत देवळात ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा अंतर्ध्वनी ऐकू शकता, त्याप्रमाणे इतर कोठे येतो तरी का ऐकू हा आवाज?
हे अगदी पटले कारण माझाही हाच अनुभव आहे. देवळातले मंगल, शांत, काहीसे गंभीर वातावरण आत्मसंवादासाठी सर्वोत्तम असते, यात शंकाच नाही.
(सुसंवादी)बेसनलाडू

इन्द्र्राज पवार's picture

20 May 2010 - 11:20 pm | इन्द्र्राज पवार

"....सर्वांना खुलं, बंधनमुक्त असलेलं हे देऊळ प्रत्येकाच्या मनातच दडलेलं आहे...."

लेखाच्या सुरूवातीसच आपण जे आवाहन केले आहे ".....विचारतरंगातील सच्चाई समजून घ्यावी!..." हेच आपल्या लेखाचे परमोच्च बिंदू आहेत कारण विषयाची मूळ संकल्पना ही देवळाशी निगडीत नसून तिचे "रूट्स" आहेत ते निसर्गाशी आणि निसर्ग तर निखळ, दोषविरहीत जीवन जगण्याची, सादर करण्याची प्रेरणा देतो, दिशा दाखवितो....अन् लेख पूर्ण वाचल्यानंतर एक बाब मला प्रकर्षाने जाणविली की, स्वयंप्रेरित मन नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या तर्‍हेने पाहू शकते, अन् त्यातून मोठाले नियम निसर्गच काढू शकत असल्याने कळत नकळत आपली शिकवण, आपले मन आपली पाऊले निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यास रमणीमनसम आतुर होते, आणि देव असो वा नसो या वादापलिकडेही जाऊन निसर्गातच आपण आपले "देव आणि देऊळ" शोधतो.... जे तुम्ही केले आहे.

मानवी मनात "देव शोध" हा सातत्याचा आणि जिव्हाळीचा भाग असून शास्त्रात लिहील्याप्रमाणे त्याची आस अगदी सत्ययुगापासून चालत आली आहे. धर्मसंस्थापक म्हणविणार्‍यांनी चारचाळीस अनुयायांना घेऊन आपआपल्या धर्माच्या पिवळ्या, हिरव्या, निळ्या छाट्या त्रिकोणी, चौकोनी आकारात नाचवुन त्यावर अबीरगुलालाचा हैदोस घालुन प्रत्येकाने "माझाच धर्म कसा महान..." यावर स्वतः भरल्यापोटी प्रवचने देऊन समोर उपाशीपोटी मथ्थड होऊन बसलेल्या बकर्‍यामेंढ्याना आपल्या नशेचे गुलाम बनविले आणि समोर ठेवलेल्या एका दगडाला देव मानण्याचे आदेश दिले. बकरीच ती....तुकविली मान....आणि खरा देव ज्या निसर्गात वसला आहे त्याकडे पाठ फिरवून देवाचा एजंट "स्वामी" याचा अहंकार सुखाविण्यात तो धन्यता मानू लागला.

"माझ्या झोळीत त्याने हे जे उदंड वैभव घातले आहे त्याची उतराई मी कधी तरी होणार आहे का?"... हा आपला प्रश्न खरा तर लौकिक अर्थाने प्रश्न नसून ती आहे निसर्गाबद्दलची आपल्या मनी वसत असलेली भक्ती आणि त्या निसर्गाच्या प्रति मी उतराई व्हायचे तर ते कशा प्रकारे व्हावे, ही तळमळ ! भक्ती आणि उतराई या दोन्हीतील साम्य आणि संबंध शोधून काढणं, त्यातील कलात्मक सत्य समोर आणणे या बाबींचा आपण स्वतःच धांडोळा घेणे क्रमप्राप्त असते आणि अशा वास्तव क्षणी आपला मित्र, सखा, सोबती, मार्गदर्शक असतो ~~ "निसर्ग..." जो तुम्हाला लाभला आहे.

एका काव्यमय लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

श्रावण मोडक's picture

20 May 2010 - 11:48 pm | श्रावण मोडक

आठवण खूप जुनी आहे. या आठवणीचा किंवा अनुभवाचा देव या रूढ संकल्पनेशी थेट संबंध नाही.
नर्मदेच्या किनारी महाराष्ट्राच्या वायव्य टोकावर मणिबेली नावाचं गाव आहे. तिथं शूलपाणेश्वराचं मंदिर आहे. आज ते मंदीर पाण्यात बुडालं आहे. या हेमाडपंती मंदिरात राहण्याचा योग दोन-तीनदा आला. विलक्षण. या मंदिराच्या आवारात चारही बाजूंनी छोट्या मंदिरांची रांग होती. नदीच्या पात्रापासून वर मंदिरापर्यंत पंचवीस-तीस पायऱ्या होत्या. मंदिराचं नदीच्या बाजूचं प्रवेशद्वार तसं छोटंच. आत शिरलं की दोन्ही बाजूंनी छोट्या मंदिरांच्या रांगा. बहुदा नवग्रह वगैरे असावेत. इतरही देव होतेच. आज तिथली रचना नेमकी आठवत नाही. आठवणीत पक्का रुतून बसलेला भाग आहे तो मनोवस्थेचा. खालून नर्मदा वाहतीये, देवळाच्या दारात उभं राहून तिचं "दर्शन घ्यायचं". आतमध्ये कुठल्या छोट्या देवळात बसायचं. बास्स. शांतता, प्रसन्नता या दोन्ही गोष्टींचं नातंच मुळी माझ्या अनुभवात नर्मदेशी जोडलेलं आहे ते तेव्हापासून.
देवळातील देवाशी मी त्याचा संबंध आजवर जोडलेला नाही. जोडावासा वाटलाही नाही. पण म्हणून तिथं मिळणाऱ्या प्रसन्नतेचा थांगही लावण्याचा प्रयत्न केलेला नाही.
हे खरं की अशा आडबाजूच्या रानातल्या, नदीच्या साथीनं वसलेल्या देवळातील त्या वातावरणात प्रसन्नता लाभतेच. त्याची शास्त्रीय कारणंही आहेतच. पण मला त्याचाही उदो-उदो करावासा वाटत नाही. देवाचाही नाही. अर्थात, हा वेगळा मुद्दा.

भोचक's picture

21 May 2010 - 5:28 pm | भोचक

सहमत. आहे. नाशिकच्या गोदावरीच्या तीरावरचं नारोशंकराचं देऊळही आवडतं. तिथलं, शिल्पकाम गाभारा भरून नांदत असलेली शांतता. बाहेर कोलाहल नि आत शांतता. छान वाटतं. बाकी नर्मदा नि त्या योगे भारला गेलेला परिसर हा निव्वळ अनुभवाचा भाग आहे. महेश्वरच्या घाटावर जाऊन निवांत वाहणार्‍या नर्मदेशी निःशब्द संवादाची गंमतच काही न्यारी. आजूबाजूला नांदती देवळं असताना त्याच्या सानिध्यात बसून समोर वाहणारी नर्मदा पहायची. नि आतल्या आत शांत हो जायचं. निव्वळ शब्दांपलीकडचा अनुभव.

(भोचक)
जाणे अज मी अजर

श्रावण मोडक's picture

21 May 2010 - 5:39 pm | श्रावण मोडक

या विषयावरच्या प्रतिसादाखाली हे सहीचे वाक्य!!! क्या बात है!!!

अरुंधती's picture

21 May 2010 - 6:59 pm | अरुंधती

हो, देवळात प्रसन्न का वाटतं यावर मला वाटतं, अनेक लेख होऊ शकतील! पण प्रसन्न वाटतं हे महत्त्वाचं! :)

शूलपाणेश्वरापाशी राहाताना तुम्हाला विरक्तभावाचा प्रत्यय आला का हो? तीन दिवस मंदिरात राहायचा अनुभवही वेगळाच असेल, ना?

माझ्या मते अनेक शंकराच्या देवळांत एक प्रकारची विरक्ती अनुभवायला मिळते. कदाचित ते पुन्हा स्थानमहात्म्यामुळेही असेल (डोंगर, नदीकाठ, स्मशानघाट इ.) पण सातारजवळच्या कृष्णेकाठच्या शंकराच्या देवळात दोन्ही हातांनी कवेत येणार नाही एवढ्या घेराचे शिवलिंग, त्याचा गर्द अंधारा चिंचोळा गाभारा, काडेपेटीतील काडी शिलगावून घ्यायला लागलेले एकांत दर्शन आणि तिथे भरून राहिलेली गहिर गंभीर शांती अजूनही माझ्या मनात घुमते आणि आजूबाजूला विखरलेल्या जोग्यांच्या समाध्या....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

21 May 2010 - 12:15 am | शैलेन्द्र

मला मनापासुन आवडलेली मंदीरं

  • केशवराज
  • हरिशचंद्रगड

गुप्त भिमाशन्कर

संदीप चित्रे's picture

21 May 2010 - 8:01 am | संदीप चित्रे

>> मोकळी हवा, प्रफुल्लित करणारा वारा आणि जे जे काही अप्रतिम आहे ते ते समोर माझ्या स्वागताला पसरलेले असते. अशा उत्फुल्ल वातावरणात आजूबाजूचे लोक प्रसन्न खिदळत असतात, हास्यविनोद करत असतात, फोटोज काढत असतात, निसर्गाच्या नजाऱ्यावर हर्षोद्गार काढत असतात..... आणि मी? मी ह्या सर्वांपासून काहीशी दूर, गुरफटलेली, अलिप्त असते. अबोल, स्तब्ध. बाहेर बघणारी, पण खरे तर दृष्टी आत वळलेली. अंतर्मुख. विस्मित. दिग्मूढ!
>>
अगदी अगदी..
मला आठवतंय खूप वर्षांपूर्वी मित्रांबरोबर बुनिंदा-दा-ढाबा इथे दंगामस्ती करून, चिकन बिकन खाऊन दुचाक्यांवरून बुंगाट येताना वाटेत एका मोकळ्या ठिकाणी थांबलो होतो. पावसाळ्याच्या दिवसातल्या त्या हिरव्याकंच जागेवर उभं राहून भणाणता वारा अंगावर घेत शांतपणे नुसतं उभं राहणंही देवपूजेपेक्षा कमी नव्हतं.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अरुंधती's picture

21 May 2010 - 7:01 pm | अरुंधती

खरंय, जिथे जिथे वाणी अबोल होते, मन अंतर्मुख होते, आजूबाजूचा विसर पडतो आणि मन शांत स्थिरावते तेच तर आपले देऊळ! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

21 May 2010 - 7:03 pm | अरुंधती

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चित्रा's picture

22 May 2010 - 6:21 am | चित्रा

लेख आवडला.
एखाद्या अंधार्‍या रात्रीही आकाशात लक्ष गेलेच, तर आपण किती मोठ्या जगाचा एक लहानसा भाग असतो असे वाटते.

प्राजु's picture

22 May 2010 - 9:27 am | प्राजु

तुझा लेख म्हंटले की मेजवानी असणार ..!
अपेक्षेप्रमाणे छान लेख. आवडला.

अरू,
मी एकदा आमच्या परसात गेले होते. दुपरचि वेळ होती. बहुतेक घरातले सगळे वामकुक्षी घेत होते. मी बागेतल्या एका दगडावर बसून, लालबुंद जास्वंदीच्या आवतीभवती फिरणार्‍या आकाशी रंगाच्या फुलपाखराकडे पहात होते. कुठेच काही आवाज नव्हता.. एकदम शांत! आणि आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये मी स्वतःशी संवाद करत होते..! तेव्हा स्वतःशी संवाद साधणे याची खरच प्रचिती आली होती.
आठवण जागी झाली पुन्हा. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/