सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय....
अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली.
एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं....
नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी! पण तरीही मला त्याविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेणं फार म्हणजे फार अनिवार्य होतं हो!
झालं असं होतं की एक दिवस अस्मादिकांची स्वारी अशीच नेहमीसारखी वेंधळ्या धांदरटपणाची कमाल करत करत शाळेच्या आवारातून चालली होती. बहुधा डोक्यात ''आज आईने डब्यात कोणती भाजी दिली आहे कोणास ठाऊक!'' सारखे तद्दन निरुपयोगी विचार चालले असावेत. तेवढ्यात करड्या स्वरात हाक आली, ''कुलकर्णी!''
घाबरून काही सेकंद माझ्या छातीचे ठोके पुरते थांबलेच आणि मग ते काळीज सशाच्या काळजाप्रमाणे सैरावैरा वेगात धावू लागले. कारण मी ज्यांना अतिशय घाबरायचे अशातल्या माझ्या एका शिक्षिकाबाईंनी मला पुकारा दिला होता.
ह्याच त्या बाई, माझं खिडकीतून बाहेर दिसणार्या गुलमोहराच्या किंवा शिरिषाच्या झाडाकडं लक्ष असलं की मला हमखास पकडणार्या. ह्याच त्या बाई, ज्या मी शाळेच्या वहीच्या शेवटच्या पानावर राजकन्या, मोरपिसे, शंख शिंपल्यांची चित्रं काढत असताना मला तंद्रीतून जागं करून वर्गात अवघड अवघड प्रश्न विचारणार्या. ह्याच त्या बाई, मला पेंगुळल्यासारखे होत असले की ''कुलकर्णी, धडा वाच,'' असे सांगून माझ्या सुखनिद्रेवर संक्रांत आणणार्या.... ह्याच त्या बाई, माझा गृहपाठ झाला नसेल तेव्हाच माझी वही चाळायला मागणार्या.... त्यांना बहुधा माझ्याविषयी सहावे इंद्रिय असावे हा माझा समज एव्हाना दृढ होत आलेला....
अशा बाईंनी जाहीर पुकारा करणं म्हणजे थेट कडेलोटाची शिक्षाच की!
मी मनातल्या मनात थरथरत बाईंसमोर जाऊन उभी राहिले.
''क..क्क..काय बाई?'' माझा अस्फुटसा अडखळता प्रश्न.
''मला मधल्या सुट्टीत येऊन भेट स्टाफ-रूम मध्ये.'' इति बाई.
झालं. माझं लवकर लवकर डबा संपवून, बुचाच्या झाडाखाली उभं राहून, इतर डझनभर मुलींसारखी आकाशात नजर स्थिर करून, शरीरचापल्याच्या जोरावर बुचाची फुले झाडावरून थेट हातात ''कॅच कॅच'' करायचा प्रोग्रॅम बोंबलला!
मधल्या सुट्टीत बाईंनी जमेल तेवढ्या करड्या आवाजात फर्मान सोडले, ''तुला अहवाल लिहायचाय... ते इचलकरंजीला साहित्य संमेलन चाललंय ना, त्याचा...''
''बाई, पण मला काय माहीत तिथं काय चाललंय ते! मी कसं लिहिणार?'' माझा चाचरता प्रश्न.
''अगं, सोपं आहे. आता पेपरमध्ये येतातच आहेत त्याच्यावर लेख. ते जमा कर, लायब्ररीत जाऊन इतर वर्तमानपत्रांमधली कात्रणं चाळ जरा! आणि गेल्या , त्याच्या गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनांचे अहवाल पाहा जरा.. म्हणजे कळेल!''
''पण बाई, असं न पाहता कसं कळणार तिथं काय काय झालं ते... कोण काय बोललं, लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे...'' माझा पुन्हा एक बावळट प्रश्न.
''अगं काढ ना माहिती मग! इतकं अवघड नाहीए ते काम. विचार जरा आजूबाजूला, कोणी गेलं होतं का साहित्य संमेलनाला....''
आता ह्यांना काय खाऊ वाटत होता का, की माझ्या आजूबाजूचे लोक मला हव्या असलेल्या माहितीसाठी साहित्य संमेलनाला टपकतील म्हणून! आणि तेव्हा काही आतासारखी 'लाईव्ह टीव्ही कव्हरेज'ची सोयही नव्हती! पण कोण सांगणार त्यांना??!! असो. मी मुंडी होकारार्थी हालवली (तेवढं मात्र फर्मास जमतं आपल्याला!) आणि तिथून लगबगीनं काढता पाय घेणार एवढ्यात पुन्हा करडा आवाज गरजला, ''आणि हो, आठवडाभरात दे आणून! मग मी बघेन काय फेरफार करायचे ते!''
झाले! मेरी रातोंकी नींद, दिनका चैन...सब कुछ गायब हो गया| कधी तांदळातले खडे निवडले नसतील एवढ्या तन्मयतेने मी वृत्तपत्रे वाचू लागले. लायब्ररीतील बाईंचे डोके खा खा खाऊन झाले. त्यांनी दिलेल्या कात्रणांची, आधीच्या अहवालांची पारायणे करून झाली. खुनाचा तपास करणार्या गुप्तहेराच्या चाणाक्षपणाने मी इचलकरंजी किंवा त्याच्या आसपासच्या गावात नातेवाईक असलेल्या वर्गमैत्रिणी हुडकून काढल्या. त्यांना आपापल्या इचलकरंजीकर नातेवाईकांना विचारण्यासाठी एक प्रश्नावलीच दिली. अधून मधून आमच्या करड्या स्वराच्या बाईही मला बोलावून हातात माहितीचे काही कागद, कात्रणे इत्यादी इत्यादी कोंबत.
अखेर करत करत माझ्याकडे माहितीचे, साहित्य संमेलनाच्या इत्थंभूत घटनाक्रमांचे एक छोटेसे संकलनच तयार झाले.
मग एके सुदिनी सर्व भेंडोळी समोर ठेवली, कोरे कागद पुढ्यात ओढले, माता सरस्वतीचे स्मरण केले आणि त्या अदृश्य संमेलनाचा साग्रसंगीत अहवाल लिहायला घेतला.
पाहता पाहता सर्व लेख पुरा झाला. एक-दोन शंकांचे समाधान एका मैत्रिणीमार्फत तिच्या नातेवाईकांकडून करून घेतले. लेख घरच्यांना वाचायला दिला. ''आहे बुव्वा!'' वडिलांचा खोचक अभिप्राय, ''अगदी तू तिथे प्रत्यक्ष जाऊन संमेलन पाहिलंस असंच वाटतंय लेख वाचून!'' मनातल्या मनात मला एकीकडे स्वतःचा अभिमान वाटत होता आणि दुसरीकडे एक बोचरी भावना होती. बरं, मी काही टिळकही नव्हते ना नामदार गोखले! बाणेदारपणे, सचोटीने, स्वाभिमानाने तेजस्वी उत्तरे वगैरे देणे म्हणजे काहीतरीच!!!! आमचं आपलं सोयीचं गणित! मनात स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच स्पष्टीकरण : ''असे कितीसे लोक वाचणार आहेत हा लेख! आणि त्यांनी वाचला तरी त्यांना मी ते संमेलन प्रत्यक्ष अनुभवले किंवा नाही ह्याबद्दल काय असा फरक पडणार आहे? किती जण त्याचा नंतर विचार करणार आहेत? त्यांना सर्व संमेलनाचा धावता अहवाल तुझ्यामुळेच तर एका फटक्यात वाचायला मिळणार आहे! मग काय हरकत आहे? शिवाय तू जमवलेली माहितीही समर्पक आहे. केली आहेस मेहनत एवढी तर घे जरा मजा!!''
माझा लेख मोठ्या ऐटीत वार्षिक अंकात छापून आला. बर्याच जणांनी वाचला. माझे भरपूर कौतुकही झाले. लेखनशैलीची दादही देऊन झाली. माझे मन मात्र कधीचे त्या लेखिकेच्या नावापाशी जे थबकले होते, तसेच आजही थबकून आहे.
--- अरुंधती कुलकर्णी
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
30 Mar 2010 - 9:49 pm | शुचि
अरु नको ग नको याद देऊस त्या बुचाच्या फुलांची. महादू माळ्याची, दशरथ शिपायाची ...... अग ती बुचाची फुलं, ते बागेला पाणी घालणं, ते या कुंदेंदुतु, ते प्लेशेड, जंगलजिम (मला खूप उड्या यायच्या) मेले ते आठवून!!!!!!!!!!!!!!!!
तुझा लेख सर्वांगसुंदर ग. काय भन्नाट लिहीतेस . :* :* :*
त्या गवळी बाई का ग??? दाणी असतील. मी इथे इमोशनल होतेय बाई!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
30 Mar 2010 - 9:48 pm | अरुंधती
नाही गं.... त्या होत्या आजोबा! :-) लक्षात आल्या का कोण ते?
शाळेतल्या त्या धम्माल आठवणी लई भारी!
:X
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 10:07 pm | शुचि
बा-प-ट बाई =))
मी इथे लै एक्साइट झालेय उगाचच. लॉग इन -लॉग ऑफ्-लॉग इन -लॉग ऑफ् करू र्हायलेय दर २ मिंटागनीक.
अगं तुझा फोटो पाहीला , तुझ्यात काही बदल नाही. तशीच दिसतेस. गो- ड.
माझी पिकासा ची लिंक पाठवेन व्य. नि तून.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
30 Mar 2010 - 10:10 pm | अरुंधती
:)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 10:27 pm | शुचि
अगं तुझा मेल आय डी नाहीये ब्लॉग वर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
30 Mar 2010 - 10:33 pm | अरुंधती
त्यात प्रत्येक पोस्ट च्या खाली तुला पत्राची खूण दिसेल, किंवा माझ्या ब्लॉगवरील प्रोफाईलमध्ये गेलीस तर सेन्ड मेसेज हा ऑप्शनही येतो. काहीही निवड त्यातले. मला मेसेज/ ईमेल मिळेल :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 10:50 pm | शुचि
"Email post to a friend" is the caption ..... but "Friend's address" remains empty. how can it reach you?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
31 Mar 2010 - 12:44 pm | अरुंधती
शुचि, व्य. नि. पाठवलाय.... :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 11:45 pm | चतुरंग
अरुंधतीतैंची खव लवकरात लवकर चालू करुन द्या नाहीतर त्या आणि शुचितै वेगवेगळे धागे काढून अशाच गप्पा मारत राहतील! ;)
चतुरंग
31 Mar 2010 - 1:06 am | अनामिक
काय भारी लिहलंय.... मजा आली वाचताना...
माझं लवकर लवकर डबा संपवून, बुचाच्या झाडाखाली उभं राहून, इतर डझनभर मुलींसारखी आकाशात नजर स्थिर करून, शरीरचापल्याच्या जोरावर बुचाची फुले झाडावरून थेट हातात ''कॅच कॅच'' करायचा प्रोग्रॅम बोंबलला!
हा हा हा ... हे म्हणजे लै भारी... नकळत मोठ्याने हसलो आणि हापिसातल्या आजु-बाजुच्या गोर्यांनी "काय बावळट आहे" असा लूक दिला.
-अनामिक