कवितेची पाककृती ४ : मधुशाला व रूपकक प्रणाली

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
24 Mar 2010 - 1:27 pm

कवितेची पाककृती ४ : मधुशाला व रूपकक प्रणाली
(हरिवंशराय बच्चन यांच्या प्रतिभेला वंदन करून)

शब्दाला शब्द जोडून करण्याच्या कविता कवितकची प्रणाली वापरून कशा करायच्या हे आपण आधी पाह्यलं. कवितकमध्ये असलेल्या शब्दसंग्रहांमुळे व अतिशय सोप्या अशा जोडणी करण्याच्या पद्धतींमुळे असल्या सामान्य पण प्रभावी कविता सहज करता येतात. पण जरा कठीण, सखोल कविता करायच्या असतील तर नुसते शब्द पुरेसे नसतात. त्या शब्दांनी बनलेली रूपकं सहज हाताळता येणं महत्त्वाचं ठरतं. या लेखात कवितकच्या शक्तीपलिकडच्या कवितांमध्ये काय प्रणाली असते हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे शब्दाला शब्द जोडण्याआधी रूपकाला रूपक जोडून कवितेचा गाभा कसा तयार करायचा, यासंबंधी विचार करू.

कविता या रचना असतात. घरं, मंदिरं, बिल्डिंगी या जशा दगडाविटांच्या, संगमरवराच्या रचना असतात तशा कविता या शब्दांच्या रचना असतात. चार खुंट्या ठोकून त्यावर कापड टाकून तंबू बांधता येतो. किंवा परिश्रम करून नितांतसुंदर ताजमहालासारखं शिल्प तयार करता येतं. एखादी दगडा-विटांची रचना तयार करताना नुसत्या एकामागोमाग एक विटा ठेवून व त्या सिमेंटने चिकटवून चालत नाही, त्याप्रमाणेच कविता तयार करतानाही शब्दामागून शब्द ठेवून व ते बरोबर प्रत्यय लावून जोडणं पुरेसं ठरत नाही. आता तुम्ही म्हणाल की हे कवितकच्या तत्त्वज्ञानाविरुद्धच नाही का? तर ते अगदी विरुद्ध नाही. शब्द कसे जोडायचे हे माहीत असलंच पाहिजे. आत्तापर्यंत थोरामोठ्यांनी कुठच्या प्रकारे शब्द जोडले आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही जोडले तर तयार होणाऱ्या रचनांना आत्मा नाही हे थोरामोठ्यांशिवाय फारसं कोणाला कळत नाही. त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे, घरगुती वापरासाठी व अधूनमधून मराठी मनाची धडकन होण्यासाठी कवितकच्या कविता बेश होतात. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त यश. पण काहींना अशा झटपट यशाऐवजी जर खरोखरची उत्तम कविता करण्याची इच्छा असेल, तर मी कोण त्यांना प्रश्न विचारणारा? मी कवितक हे उत्पादन बनवतोय तर मला सर्वच कष्टमरांचा विचार करायला नको का? म्हणून हा प्रयत्न - कवितकाची क्षितिजं रुंदावण्यासाठी, रूपकक प्रणाली अंतर्भूत करण्याचा. कविता करणारा तो कवितक, त्याचप्रमाणे रूपकं तयार करणारा तो रूपकक. नुकताच महिला दिन झालेला असल्यामुळे झाडावर बसलेल्यांमधून मला काही आवाज आल्याचे जाणवले - पुरुषसंस्कृतीप्रधान डुक्कर वगैरे... त्यांनी सर्वांनी आपल्या गदा परजायला किंवा गोफणी फिरवायला सुरूवात केली तर माझी धडगत नाही. त्यामुळे मी ताबडतोब सांगतो की कवितक व रूपकक मुद्दामच लिंग-उदासीन आहे. मी लिहिताना सोपं पडावं म्हणून 'तो' असं लिहिलं आहे, पण ते दर वेळी 'तो (ती)' असं समजावं.

रूपककची प्रणाली ही कवितकाशी पूरक अशी प्रणाली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला काही पदार्थ, काही उपकरणं व यंत्रं लागतात. हे सगळं कवितकचा भाग आहे. पण त्यासाठी लागणारी रचना - स्वयंपाकघराची मांडणी, डब्यांमध्ये भरून ठेवण्याची सोय वगैरे रूपककचे भाग आहेत. या सर्वाशिवायही स्वयंपाक करता येतो, चटपट उपाहाराचे पदार्थ बनवता येतात, पण या ऑर्गनायझेशनमुळे अधिक कठीण पदार्थ तयार करता येतात. तसंच काहीसं कवितांचं आहे. मगाशी आपण म्हटलं की कविता या रचना आहेत, एखाद्या बिल्डिंगसारख्या. तर ही बिल्डिंग बांधताना तिचा (किंवा 'तिची'- झाडं फारच ओरडताहेत. दरवेळी नका हो लिहायला लावू...) आर्किटेक्ट जो आराखडा आखतो(ते) तो आखण्याचं काम रूपकक कवितेसाठी करतो. निदान करावं अशी इच्छा तरी आहे. अजून तरी रूपककचे आराखडे आखणंच चाललं आहे. (चला, सुरूवात तर चांगली झाली - कविता, पाककृती, स्वयंपाक, बिल्डिंगी, पदार्थ, आराखडे या सगळ्या रूपकांची छान मिसळ झाली...आता तिच्याबरोबर कसलातरी पाव असता तर... जाऊदेत) गेल्या लेखातच मी रूपकक हे नाव न घेता त्याचं थोडंसं सूतोवाच केलं होत. गहिऱ्या नात्याची मुक्तकं लिहिताना मी शब्दसमुदायांप्रमाणेच वाक्यसमुदायांविषयी लिहिलं होतं. म्हणजे संपूर्ण कवितेला काही एक आकार असावा, रचना असावी ही कल्पना होती. हीच रूपककचा गाभा आहे.

रूपकक या कल्पनेच्या विकासासाठी आपण एक केस स्टडी करू. त्यासाठी मधुशाला इतकं सुंदर उदाहरण दुसरं सापडणार नाही. एक तर ते थोर काव्य आहे, पण त्याचा थोरपणा आपल्यासाठी तितकासा महत्त्वाचा नाही. रूपककसाठी एखादं रूपक वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वापरलं जाऊ शकतं याचा अभ्यास करण्यासाठी तो उत्तम नमुना आहे. मधुशाला (किंवा ग्राम्य मराठीत दारूचा गुत्ता) हे जीवनासाठी रूपक कसं आहे हे कवीने (हरिवंशराय बच्चन) सुमारे दीडशे रुबायांतून दाखवून दिलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक चारोळी रुबाईत मधुशालेची तुलना जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या संकल्पनांशी (कवितकच्या भाषेत मौलिक शब्दांशी) केलेली आहे. ही तुलना करताना, मधुशाला या संकल्पनासमुहात असलेल्या वेगवेगळ्या लघुसंकल्पनांची व त्यांच्या नात्यांची त्या विशिष्ट संकल्पनेतल्या लघुसंकल्पना व त्यांच्या नात्यांशी साम्य दाखवलेलं आहे. गणितामध्ये असं करण्याला मॅपिंग, आयसोमॉर्फिजम वगैरे म्हणतात. हे जरा साध्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या पहिल्या धड्यात 'आयुष्य म्हणजे एक विडा असतो...प्रेमाने तो लाल लाल रंगवायचा असतो' लिहिलं. त्यात आयुष्याला एक विड्याच्या उपमेची पिंक टाकून आपण पुढच्या उपमेकडे गेलो. पण त्याऐवजी आयुष्य = विडा, नाती = गुलकंद, कष्टप्रद अनुभव = लागणारी सुपारी, आठवणी = चुना व कात, शरीर = पान, वगैरे उपमा करून मग त्या लाल रंगाचं वर्णन केलं तर कसं होईल, तसं. पण तेवढ्यावरच थांबून चालत नाही, पुढच्या रुबाईत आयुष्य = विडा ऐवजी निसर्ग = विडा म्हणायचं, आणि मग पृथ्वी/भूमी = तोंड, बीज = चुना व कात, फुलांचा बहर = लाल रंग वगैरे उपमांचं साधर्म्य दाखवून द्यायचं. असं देश, धर्म, प्रेम वगैरे सगळ्या मौलिक शब्दांसाठी करायचं. सूत्ररूपात मधुशालाची प्रणाली ही खालीलप्रमाणे.
र(र१, र२..) - आपलं मुख्य रूपक. र१, र२ हे त्याचे घटक, किंवा लघुरूपकं.

क्ष१(अ१, अ२...) - मौलिक शब्द, संकल्पना. अ१, अ२ हे घटक भाग.
क्ष२(अ'१, अ'२..) - दुसरा मौलिक शब्द, संकल्पना. अ'१, अ'२ हे घटक भाग.

प्रत्येक क्ष साठी
लिहा
अ१ म्हणजे जणू काही र१ (डागडुजी करा)
अ२ म्हणजे जणू काही र२ (डागडुजी करा)
.
.
त्यामुळे क्ष हा जणू काही र
रिकामी ओळ सोडा, व पुढचा क्ष घ्या

हरिवंशरायांच्या मधुशालासारखं काव्य करणं अशक्य नाही - पण त्यासाठी तुम्हाला १. सुंदर रूपक सापडलं पाहिजे. २. अनेक मौलिक संकल्पनांच्या घटकांशी त्या रूपकाचे घटक मिळते जुळते असले पाहिजेत. ३. प्रत्येक रुबाईत शब्दसौंदर्य, नादमाधुर्य, छंदबद्धता सांभाळली पाहिजे. (मधुशालेतले घटकशब्द एकमेकांशी यमक साधू शकतात - हाला, प्याला, साकीबाला, मधुशाला...) ४. तुमचं जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यातून दिसलं पाहिजे (बच्चननी चार्वाक दर्शन मांडलेलं आहे. आयुष्य हे रसरसून उपभोगण्यासाठी आहे.), ते लोकांना भावलं पाहिजे. ५. या प्रणालीबाहेरच्याही अनेक उत्तम रुबाया करणं आवश्यक आहे. ६. बच्चननी त्याहीपलिकडे जाऊन रुबायांचा क्रम देखील खुबीने केलेला आहे. सुरूवातीच्या रुबाया वाचकाला 'हे तुला सादर' म्हणणाऱ्या आहेत. पुढच्या काही 'मधुशाला म्हणजे काय, ती कुठे आहे, तीपर्यंत कसं पोचायचं' याच्या आहेत. क्रमाक्रमाने नंतर आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चिंतन व नंतर मृत्यूवर चिंतन आहे. तुम्हा आम्हा पामरांनी एवढं सगळं करण्याआधी आपण त्यांच्या काही रुबायांतल्या उपमांची रचना बघू.

द्राक्षवेल (मूळ स्रोत) = हिमालय; हाला (मद्य) = हिमजल; साकी = नद्या; पिणारे = शेतं; मधुशाला = भारतमाता;

द्राक्ष वेलिसम पसरि हिमालय, पाझरतो जीवन हाला
नद्या नाचऱ्या साकी बनुनी, भरून लाटांचा प्याला
रात्रंदिन तो मुक्तमृदू करि, फिरती झुळझुळ वाटाया
पिऊन शेते फुलुन डोलती, भारतमाता मधुशाला

(हिम श्रेणी अंगूर लता-सी फैली, हिम जल है हाला,
चंचल नदियाँ साकी बनकर, भरकर लहरों का प्याला,
कोमल कूर-करों में अपने छलकाती निशिदिन चलतीं,
पीकर खेत खड़े लहराते, भारत पावन मधुशाला)

साकी = वेली; प्याले = फुलं; मद्य (हाला) = मध; पिणारे = भुंगे; मधुशाला = बाग

वेली साकी आल्या घेउन रंगित पुष्पांचा प्याला
धुंद सुवासा जगी पसरती धरुनी गर्भी मधु-हाला
भ्रमरगणांच्या टोळ्या येती मागमागुनी मधु पीण्या
झिंग रिंगती गुंग गुंजती, बाग नव्हे ही, मधुशाला

(पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला,
भरी हुई है जिसके अंदर परिमल-मधु-सुरभित हाला,
माँग माँगकर भ्रमरों के दल रस की मदिरा पीते हैं,
झूम झपक मद-झंपित होते, उपवन क्या है मधुशाला)

साकी = प्रेमी, पुजारी; मद्य = गंगाजल; प्याला = मंत्राच्या माळेचे मणी; स्वत: = शिवमूर्ती; मधुशाला = मंदिर.

प्रियतम साकी बने पुजारी, पवित्र गंगाजल हाला
मंत्रघोष हा फिरवुन करतो मधु प्याल्यांची जपमाला
"घे ना, घे ना, अजून पी ना", लयीत अविरत गात असे
मी शंभूची स्वयंभु मूर्ती, मंदिर भवती मधुशाला

(बने पुजारी प्रेमी साकी गंगाजल पावन हाला
रहे फेरता अविरत गतिसे मधु के प्यालो की माला
और लिये जा और पिये जा इसी मंत्र का जाप करे
मै शिव की प्रतिमा बन बैठू, मंदिर हो ये मधुशाला)

(मी शब्दश: भाषांतर केलेलं नाही हे उघड आहे. हा भावानुवाद आहे, काव्याचा आत्मा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे....)

गृहपाठ म्हणून अर्थातच मी मधुशाला लिहायला सांगणार नाहीये. पण मधुशालेची एखादी नवीन रुबाई लिहून डकवा.
उदाहरणार्थ : साकी = शिक्षक; प्याला = पुस्तक; मद्य = ज्ञान; पिणारा = विद्यार्थी; शाळा = मधुशाला

शिक्षक येती साकी बनुनी, घेउनिया पुस्तक प्याला
ज्ञानधार ती ओतुनि करती धुंदधुंद विद्य़ार्थ्याला
मित्र सवंगडि चषक भिडवती, साथ पिऊनी आनंदे
शिक्षणाचि ही नशा चढतसे, शाळा होई मधुशाला

अधिक कठीण गृहपाठ - एकच रूपक घेऊन ते कुठच्यातरी दोन मौलिक शब्दांना लागू करा व दोन रुबाया (चारोळी) लिहा. बच्चनांची प्रत्येक ओळ दोन ओळींसारखी आहे, तेवढं मोठं वृत्त नाही घेतलं तर कदाचित सोपं जाईल. छंद, यमक वगैरे बंधनं थोडी ढिली झाली तरी चालेल. पण डकवा मात्र नक्की.

पाकक्रियाकवितातंत्रविचारआस्वादसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Mar 2010 - 3:13 pm | प्रचेतस

मोदी येई साकी बनुनी, घेउनी लिलाव प्याला
खेळाडू ते विकुनी करती आनंदीत मालकाला
खेळ खेळती, लोक रंजविती, सर्वे मिळून याला
पैशाची ही नशा चढतसे, क्रिकेट होई मधुशाला

--------
(रूबाया करण्याचा प्रयत्न केलेला) वल्ली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2010 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिले चार उतारे वाचायला मजा आली.
हाडाचा मास्तर असा असावा....! :)

बाकी 'रुबाई'चा प्रयत्नही करुन पाहू.
तोपर्यंत ही केवळ आपल्या उत्तम लेखनाला पोच.

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

24 Mar 2010 - 10:42 pm | धनंजय

**
बुंदीपाडू आणिक फंडू मिश्रित दाक्षे वेलाला
ग्रास्स्टांझा मग बनुनी साकी अल्गोचा देतो प्याला
मद्य त्यात नि:स्फूर्त कल्पना, आस्वादक ते हसत गिळे
खिदळत विसरे दर्जा अपुला कवितकमाला मधुशाला

**

ही लेखमाला विनोदी पद्धतीने अस्वादाबद्दल काही गंभीर मुद्दे सांगत आहे. म्हणून ती विशेष वाचनीय आहे.

"कवितांमध्ये कित्येकदा काहीतरी एक साचा असतो."
आणि
"फक्त साचा असला तर कविता निकृष्ट असते."
ही दोन मोठी तत्त्वे पटण्यासारखी आहेत.

पुढचे एक आस्वादतत्त्वही पटण्यासारखे आहे :
"उत्तम कवितेतही कवीने तात्पुरती चौकट निर्माण केलेली दिसते. ती चौकट लक्षात आली, तर बरे असते. त्या चौकटीमध्ये राहूनही कवीने कल्पनेच्या अचाट आणि मनोरम भरार्‍या मारल्या असतील, तर चौकट जाणल्यामुळे कल्पकतेचा पल्ला अधिक परिणाम करतो."
लेखमालेत तत्त्वाच्या पहिल्या वाक्याला स्पर्श होतो आहे, पण तिरप्या ठशातले स्पष्टीकरण खरेतर समजावलेले नाही.

आणखी एक आस्वादतत्त्व लेखात अर्धवट सांगितलेले आहे :
"कवीने घालून दिलेल्या मर्यादेत आस्वादकाने स्वतःहून कल्पनेच्या भरार्‍या मारून बघाव्यात. (म्हणजे गायकाने अवघड तान घेतल्यानंतर श्रोताही मनातल्या मनात तशी तान घेण्याचा आपोआप प्रयत्न करतो, करतोच. तसा प्रकार.) या प्रतिक्षिप्त कल्पनाभरारीमुळे कवीच्या कल्पनाशक्तीबद्दल आत्मीयता वाटते आणि आस्वादाचा स्तर बदलतो. आस्वादक घे-घे-ग्राहक न राहाता कवितेमध्ये अक्षरशः सहभागी होतो."
येथेसुद्धा तत्त्वाच्या पहिल्या वाक्याला लेखात स्पर्श होतो आहे, पण तिरप्या ठशातली पुढली वाक्ये हवी तशी पुढे नेलेली लक्षात येत नाहीत.

आता चौकट उत्कृष्ट-निकृष्ट दोन्ही कवितांमध्ये असली तरी उत्तम कवितेत वेगळे काय असते, याबाबत लेखामध्ये कुतूहल नसून फक्त दुय्यम उल्लेख आहेत. ("तुम्हा आम्हा पामरांनी एवढं सगळं करण्याआधी..." पण तुम्हा-आम्हा पामरांना कळते! उपमा चौकट कळल्यामुळे आपणा पामरांच्या अस्वादात भर पडते, की व्यंगामुळे त्या विचाराचे हसे होते आहे?)

अंतर्गत सिद्धांत सांगण्यात प्रगती न झाल्यामुळे मला चुटपुट लागून आहे.
उत्तम कवितेमध्ये चौकटीचा समावेश करून घेणारीही कुठली कल्पना सांगायची प्रामाणिक कळकळ कवीला असते. प्रामाणिकपणा जाणवतो. नेमके काय सांगायचे ते समजले नाही, तरी "काहीतरी सांगायचे आहे खास" याबद्दल आस्वादकाला नि:शंक जाणीव होते. आणि त्या जाणिवेचे एक कारण कवितेतला एकसंधपणा असतो. कवितेत एक शब्द कमी केला किंवा एक शब्द जास्त केला, तर काहीतरी चुकचुकते.
वरील मत माझे आहे. याबाबतीत श्री. घासकडवी यांच्या बिंदुगामी कल्पना असतील याबद्दल मला खात्री आहे. त्या त्यांना लेखामध्ये अत्यंत गमतीदार शैलीत आडवळणाने सांगता येतील, अशीसुद्धा माझी खात्री आहे.

"चौकट असते" हा सिद्धांत आता सांगून झाला आहे. पुढच्या भागांमधून नवीन सिद्धांत पुढे येत नाहीत. म्हणून वाटू लागले आहे की लेखमालेतील प्रत्येक भाग "कवितक-लेख" साच्यामधून पडू लागला आहे. श्री. घासकडवी यांचे हुन्नर आणि कौशल्य यापेक्षा खूप अधिक आहे. हा लेख विनोदी-वाचनीय आहे, तरी त्यांना जमेल त्या मानाने निकृष्ट आहे.

"कवितकलेख पाडायचा अल्गोरिदम = कवितकलेखक" अशा प्रकारचा अल्गोरिदम याच शैलीत लिहायची माझी इच्छा होती. परंतु ती इच्छा दोन कारणांमुळे मी बाद केली : (१) आळस (२) कौशल्याचा अभाव. पहिली अडचण कॉफी पिऊन संपवू शकतो, दुसर्‍या अडचणीसाठी माझ्यापाशी इलाज नाही.

- - -
मधुशालेबद्दल :

मधुशालेतील प्रत्येक रूपक-रुबाईचा अल्गोरिदम उघड्यानागड्या मोकळेपणाने हरिवंश राय बच्चन यांनी सांगितलेला आहे. इतक्या की पहिल्या तीन रुबाया वाचल्यानंतर शाळकरी मुलालासुद्धा अल्गोरिदम कळावा. तो गृहीत धरूनच कोणतीही साक्षर व्यक्ती त्याबद्दल चर्चा करेल.
(येथे मिसळपावावरील उदाहरण).

खरे तर अल्गोरिदम इतक्या साळसूदपणे देण्यात हरिवंशराय यांचे धाडस बघून मनात धडकी भरते.

मग जाणवते की एक-एक रुबाई वाचताना थोडासुद्धा कंटाळा येत नाही. "हे रूपक तर मी आधीच ओळखले होते" असे वाटत नाही. त्याहूनही अचाट कवित्व हे : या दीडशे रुबायांमध्ये "एक कलाकृती" असल्याचा भास होतो. बहुधा त्याच्यामध्ये अनेक रुबायांना जोडणारी एक चौकटही आहे, असा भास होतो. पहिल्या छूटला कवीने आपले सगळे अल्गोरिदम-पत्ते खाली सांडले नाहीत असे लक्षात येते. डाव संपेपर्यंत कवी हुकुमी एक्के-राजांची नवी-नवी उतारी करत राहातो.

येथे आणि येथे अनेक रुबायांना जोडणारी चौकट शोधण्याचा माझा प्रयत्न.

संपूर्ण मधुशालेची महा-चौकट काय आहे, त्याबद्दल माझे कुतूहल फार आहे. ती अजून शोधत आहे. तरी आस्वादासाठी तशी एकतरी चौकट आहे याबद्दल मला खात्री आहे. वर्णनासाठी या क्षणी शब्द नसले मला मधुशालेत एकसंधता जाणवते आहे.

श्री. घासकडवी यांनी सुद्धा याबद्दल सांगितलेले आहे -

सुरूवातीच्या रुबाया वाचकाला 'हे तुला सादर' म्हणणाऱ्या आहेत. पुढच्या काही 'मधुशाला म्हणजे काय, ती कुठे आहे, तीपर्यंत कसं पोचायचं' याच्या आहेत. क्रमाक्रमाने नंतर आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चिंतन व नंतर मृत्यूवर चिंतन आहे.

- - -

सर्वसामान्य फुटपट्टीने मोजल्यास हा लेखाचा दर्जा उंच आहे, हे मान्य. पण श्री. घासकडवी यांच्यासाठी बनवलेली मीटरपट्टी मोठी आहे.

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 3:00 am | राजेश घासकडवी

भावना थेट पोचवण्यात यशस्वी झालेली आहे.

तुम्ही लिहिलेल्यापैकी 'ठळक सरळ' लिहिण्याचा प्रयत्न होता. ठळक तिरकस (फॉंटमधील) हे भावगर्भी साक्षात्काराने वाचकाने अनुभवावं अशी आशा आहे.

उत्तम कवितांत वेगळं काय असतं याचे सिद्धांत बांधण्यापेक्षा शोध घेणं आहे. माझा तसा मूलभूत अभ्यास नसल्यामुळे, व केवळ हे चांगलं, हे वाईट असं जाणवत असल्यामुळे, फर्स्ट प्रिन्सिपल्स पासून काही काळं पांढरं करता येतं का हे लिहून बघतो आहे. हळूहळू अधिकाधिक क्लिष्ट रचना हाताळण्याचा लेखमालेत प्रयत्न केलेला आहे.

बाकी 'कवितक लेखक' प्रणाली म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. [एक क्ष काव्यप्रकार घ्या, त्यातली वाईट उदाहरणं लिहू शकणारं सूत्र लिहा, व त्याआधी तीन-चार परिच्छेद इकडचे तिकडचे विनोद-टवाळकी करा : विषयाच्या सूत्राशी इमान एखाद्या लांबलचक पट्टा गळ्यात असलेल्या बीगल इतकंच असू द्या...] पण मधनंच त्या प्रणालीबाहेरचं, कवितकच्या मर्यादांविषयीही बोलणं होतंच...

मधुशालेचा अल्गॉरिदम सोपा म्हणूनच निवडला. त्यात मर्ढेकरांच्या 'धुक्यात काळी दलदल व्याले किती मवाली इमलेवाले' सारखी रूपकांची सरमिसळ नाही.

विनोद हा सेलच्या जाहिरातीप्रमाणे आहे. तिच्यामुळे लोक दुकानात तरी येतात. कधी कधी तो मारक ठरतो हे मान्य आहे.

राजेश

मुक्तसुनीत's picture

24 Mar 2010 - 9:06 pm | मुक्तसुनीत

हरिवंशाच्या ताजमहाली लावू कस्टममेड विटा
काव्य-उपक्रम लाईव्ह जाण्या, बरा असे हा खचित "बिटा"
घासकड्व्याच्या नादी लागून भलेभले चळतील पहा
छटाक काव्ये प्रसवावाया सज्ज असे हा जालतिठा

चारोळींच्या पिचकार्‍यांची लाल ओलसर चढत छटा
इरेस पडल्या शीघ्रकवींच्या प्रतिभेचा या लुत्फ लुटा
कंटकशल्ये बोथटली मग काव्यतटाकी मत्त महा
यमक शोधण्या आणि जोडण्या सज्ज होतसे जालतिठा

चतुरंग's picture

24 Mar 2010 - 9:46 pm | चतुरंग

'घासू'बिनीचे शिलेदार अन 'मुसू'पाडती काव्यविटा
जालतिरावर जागोजागी पखरु आपण काव्यछटा
शब्द कालवुनि 'रंगा' तळतो रुबाईचे फर्मास भजे
साकी कोठे? वाट पाहता तिष्ठुन गेला जालतिठा

चतुरंग

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 12:04 am | राजेश घासकडवी

प्रथमदर्शनी तुला खुणवतो, नामफलक चमचमचमता
नाड्या धरुनि मधुर स्वरांनी, स्वागत करि मालक ताता
कविता, चर्चा, काथ्याकूटे, मेनू फक्कड जमलेला
चला मंडळी लेखन पिऊ, हा मिसळपाव दारूगुत्ता

मिसळ-भजीचा खमंग चकणा, लाल पानही रंगविता
काहिलीतले मेदुवडे अन्, साजणगहिऱ्या प्रेमगितां
चे वेफर चरता जमलेले हे सदस्य कवितापान्करण्या
साकिप्रतिक्षा हो प्रतिसादी, जालतिठा दारूगुत्ता

चला मंडळी झोकू आपण काव्यदारुच्या विविध छटा
विडंबनाचा देशी ठर्रा, विलायती भाषांतरिता
साके ती ना इराणि साकी, 'हाय कु'ठलिशी जापनिकी
रूसी 'व्होद्'का सह जमता, हा युनो बने दारूगुत्ता

राजेश

मुक्तसुनीत's picture

25 Mar 2010 - 12:20 am | मुक्तसुनीत

स्वागत करण्या वेळ कुठे मज , पुटपुटतो मालक ताता
"पटत नसे ? मग कल्टी !" ऐका , ब्रीदवाक्य जोडे खाता !
टीआर्पी शी देणेघेणे , जाणे मग चमडा-कुत्ता ;-)
घासू , मित्रा जाणून घे , हा मिसळपाव दारूगुत्ता....

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Mar 2010 - 11:06 pm | अक्षय पुर्णपात्रे

वा वा! असे टंकायला बोटे शिवशिवली असली तरी त्या प्रेरणेचे दमन करून हा प्रतिसाद टंकावा लागत आहे. वारंवार सांगुनही श्री सुनीत वर्गातले नियम पाळत नाहीत. गृहपाठ तर कधीच सोडवत नाहीत. त्यामुळे कसबाचे (स्किल स्किल (कसाब नव्हे)) कितीही कौतुक करावेसे वाटले तरी ते नियमाला धरून होणार नाही. वर एका 'दिपोटींनी' गुरुजींच्या वर्गाचे इन्स्पेक्शन केले तर खाली श्री सुनीत, श्री चतुरंग, श्री बिरुटे यांच्यासारखे विद्यार्थी नियम धाब्यावर बसवत आहेत. आता कुठे दाद मागावी बरे?

अवांतर (प्रस्तुत प्रतिसादासाठी): गुरूजी गृहपाठ सोडवण्याची इच्छा आहे पण हरिवंशरायांची रुबाई कुठे शोधायला जावे बरे?

____________________________________
निसर्ग आटला तेव्हा शस्त्रे आली
स्वातंत्र्य जाचले तेव्हा धर्म आला

धनंजय's picture

24 Mar 2010 - 11:18 pm | धनंजय

मूलपाठ्य येथे सापडेल.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Mar 2010 - 11:35 pm | अक्षय पुर्णपात्रे

तसेच त्यांनी सोडवलेला गृहपाठ न पाहता प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीरी.
____________________________________
निसर्ग आटला तेव्हा शस्त्रे आली
स्वातंत्र्य जाचले तेव्हा धर्म आला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2010 - 6:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री सुनीत, श्री चतुरंग, श्री बिरुटे यांच्यासारखे विद्यार्थी नियम धाब्यावर बसवत आहेत.

नियम तोडल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2010 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता नाही गझल नाही, शब्द घेऊन फिरतोस का ?
हौस मोठी प्रतिसाद नाही, वाचक माझ्यावर रुसले का ?
ओस पडल्या कविता इथे, जराशी बहार ये़ईल कधी
घासकडवीच्या नादी नाही, पण रुबाई मला जमेल का ?

-दिलीप बिरुटे

डावखुरा's picture

25 Mar 2010 - 6:19 pm | डावखुरा

एकाकी जिवन माझे , सन्मित्र होशिल का?
कनव्हास कोरा माझा , चित्र होशिल का?

"राजे!"

श्रावण मोडक's picture

25 Mar 2010 - 10:17 pm | श्रावण मोडक

दोन पेगबरोबर हा मजा चाखताना मजा आली. :)

Nile's picture

26 Mar 2010 - 9:33 am | Nile

जसजसा अभ्यासक्रम पुढे जाइल तसतशी क्लिष्टता वाढत आहे. विषय समजतोय पण गृहपाठ करायला मन धजेना! त्यात प्रेम, मधु, शाला असले कठिण विषय सुरु झाल्याने काहीही सुधरत नाहीए. त्यात हे दिपोटी सारखे सारखे येउन धडकी भरवत आहेत. (इथे इंचाचे वांदे आहेत आणि दिपोटी मिटरमध्ये मोजताहेत!) 'मोकळ्या मनाने' गृहपाठ करावा तर इतर विद्यार्थी नियम तोडला म्हणुन आरडा-ओरडा करतात! फारच डेंजर स्थिती आहे. हा कोर्स ऑडिट करावा लागेल की काय असे वाटु लागले आहे. मास्तरांकडुन अधिक वेळ मागुन घेत आहे, मागील धड्याचाच अभ्यास झाल्या नसल्याने कीती वेळ लागेल कोण जाणे?

राजेश घासकडवी's picture

26 Mar 2010 - 10:24 am | राजेश घासकडवी

पूर्ण करण्यासाठी प्रेम, मधु वगैरे गोष्टी आवश्यक नाहीत. ज्यांना त्याबद्दल ज्ञान व अनुभव आहे अशांसाठी पहिला गृहपाठ सोपा जाईल. (कोणी तो पूर्ण केला नाही ही बाब वेगळी. सगळ्यांनी स्वत:लाच शहाणं समजून आपापल्या रुबाया लिहिल्या...) पण ज्यांना मधुशालाची रुबाई लिहायची नसेल त्यांच्यासाठी दुसरा, अधिक साधारण पर्याय उपलब्ध आहेच ना. तुमच्या अनुभूतीतल्या रूपकांचा वापर करा. अनुभूतीशिवाय काव्य म्हणजे वांग्याशिवाय भरीत - नुसतं शब्दांचं भरताड...

आता उदाहरणच देतो. जर कुणाला अॅरिझोनामधल्या महोत्तम घळीविषयी अनुभूती असेल, तर तिचाच वापर करता येईल.

महोत्तम घळ - आयुष्य; कोलोरॅडो नदी - संज्ञाप्रवाह; वाहून गेलेले - विस्मृती; शिल्लक - आठवणी

महोत्तम घळ - विश्व; कोलोरॅडो नदी - काळ; वाहून गेलेले - अशाश्वत; शिल्लक - शाश्वत

महोत्तम घळ -ज्ञान; कोलोरॅडो नदी - वैज्ञानिक विचारपद्धती; शिल्लक राहिलेले - ज्ञानशिल्प कलाकृती (न्यूटन, आइन्स्टाईन, डार्विन वगैरे); वाहून गेलेले - मूर्खपणा, अज्ञान, अंधश्रद्धा (नाडी वगैरे...)

प्रयत्न करून बघा. निदान वाक्यं तरी लिहा - यमक, छंद वगैरे फाट्यावर मारा.

(मला नक्की नीट आठवत असेल तर आपण एका बालकवींच्या काव्य विडंबनापलिकडे कधी गृहपाठ म्हणून सबमिट केलेला नाही...हम्म्म्म्म... यावेळी जरा व्यवस्थित काहीतरी द्या नाहीतर एटीकेटी घ्यावी लागेल)

राजेश