कवितेची पाककृती ४ : मधुशाला व रूपकक प्रणाली
कवितेची पाककृती ४ : मधुशाला व रूपकक प्रणाली
(हरिवंशराय बच्चन यांच्या प्रतिभेला वंदन करून)
शब्दाला शब्द जोडून करण्याच्या कविता कवितकची प्रणाली वापरून कशा करायच्या हे आपण आधी पाह्यलं. कवितकमध्ये असलेल्या शब्दसंग्रहांमुळे व अतिशय सोप्या अशा जोडणी करण्याच्या पद्धतींमुळे असल्या सामान्य पण प्रभावी कविता सहज करता येतात. पण जरा कठीण, सखोल कविता करायच्या असतील तर नुसते शब्द पुरेसे नसतात. त्या शब्दांनी बनलेली रूपकं सहज हाताळता येणं महत्त्वाचं ठरतं. या लेखात कवितकच्या शक्तीपलिकडच्या कवितांमध्ये काय प्रणाली असते हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे शब्दाला शब्द जोडण्याआधी रूपकाला रूपक जोडून कवितेचा गाभा कसा तयार करायचा, यासंबंधी विचार करू.
कविता या रचना असतात. घरं, मंदिरं, बिल्डिंगी या जशा दगडाविटांच्या, संगमरवराच्या रचना असतात तशा कविता या शब्दांच्या रचना असतात. चार खुंट्या ठोकून त्यावर कापड टाकून तंबू बांधता येतो. किंवा परिश्रम करून नितांतसुंदर ताजमहालासारखं शिल्प तयार करता येतं. एखादी दगडा-विटांची रचना तयार करताना नुसत्या एकामागोमाग एक विटा ठेवून व त्या सिमेंटने चिकटवून चालत नाही, त्याप्रमाणेच कविता तयार करतानाही शब्दामागून शब्द ठेवून व ते बरोबर प्रत्यय लावून जोडणं पुरेसं ठरत नाही. आता तुम्ही म्हणाल की हे कवितकच्या तत्त्वज्ञानाविरुद्धच नाही का? तर ते अगदी विरुद्ध नाही. शब्द कसे जोडायचे हे माहीत असलंच पाहिजे. आत्तापर्यंत थोरामोठ्यांनी कुठच्या प्रकारे शब्द जोडले आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही जोडले तर तयार होणाऱ्या रचनांना आत्मा नाही हे थोरामोठ्यांशिवाय फारसं कोणाला कळत नाही. त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे, घरगुती वापरासाठी व अधूनमधून मराठी मनाची धडकन होण्यासाठी कवितकच्या कविता बेश होतात. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त यश. पण काहींना अशा झटपट यशाऐवजी जर खरोखरची उत्तम कविता करण्याची इच्छा असेल, तर मी कोण त्यांना प्रश्न विचारणारा? मी कवितक हे उत्पादन बनवतोय तर मला सर्वच कष्टमरांचा विचार करायला नको का? म्हणून हा प्रयत्न - कवितकाची क्षितिजं रुंदावण्यासाठी, रूपकक प्रणाली अंतर्भूत करण्याचा. कविता करणारा तो कवितक, त्याचप्रमाणे रूपकं तयार करणारा तो रूपकक. नुकताच महिला दिन झालेला असल्यामुळे झाडावर बसलेल्यांमधून मला काही आवाज आल्याचे जाणवले - पुरुषसंस्कृतीप्रधान डुक्कर वगैरे... त्यांनी सर्वांनी आपल्या गदा परजायला किंवा गोफणी फिरवायला सुरूवात केली तर माझी धडगत नाही. त्यामुळे मी ताबडतोब सांगतो की कवितक व रूपकक मुद्दामच लिंग-उदासीन आहे. मी लिहिताना सोपं पडावं म्हणून 'तो' असं लिहिलं आहे, पण ते दर वेळी 'तो (ती)' असं समजावं.
रूपककची प्रणाली ही कवितकाशी पूरक अशी प्रणाली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला काही पदार्थ, काही उपकरणं व यंत्रं लागतात. हे सगळं कवितकचा भाग आहे. पण त्यासाठी लागणारी रचना - स्वयंपाकघराची मांडणी, डब्यांमध्ये भरून ठेवण्याची सोय वगैरे रूपककचे भाग आहेत. या सर्वाशिवायही स्वयंपाक करता येतो, चटपट उपाहाराचे पदार्थ बनवता येतात, पण या ऑर्गनायझेशनमुळे अधिक कठीण पदार्थ तयार करता येतात. तसंच काहीसं कवितांचं आहे. मगाशी आपण म्हटलं की कविता या रचना आहेत, एखाद्या बिल्डिंगसारख्या. तर ही बिल्डिंग बांधताना तिचा (किंवा 'तिची'- झाडं फारच ओरडताहेत. दरवेळी नका हो लिहायला लावू...) आर्किटेक्ट जो आराखडा आखतो(ते) तो आखण्याचं काम रूपकक कवितेसाठी करतो. निदान करावं अशी इच्छा तरी आहे. अजून तरी रूपककचे आराखडे आखणंच चाललं आहे. (चला, सुरूवात तर चांगली झाली - कविता, पाककृती, स्वयंपाक, बिल्डिंगी, पदार्थ, आराखडे या सगळ्या रूपकांची छान मिसळ झाली...आता तिच्याबरोबर कसलातरी पाव असता तर... जाऊदेत) गेल्या लेखातच मी रूपकक हे नाव न घेता त्याचं थोडंसं सूतोवाच केलं होत. गहिऱ्या नात्याची मुक्तकं लिहिताना मी शब्दसमुदायांप्रमाणेच वाक्यसमुदायांविषयी लिहिलं होतं. म्हणजे संपूर्ण कवितेला काही एक आकार असावा, रचना असावी ही कल्पना होती. हीच रूपककचा गाभा आहे.
रूपकक या कल्पनेच्या विकासासाठी आपण एक केस स्टडी करू. त्यासाठी मधुशाला इतकं सुंदर उदाहरण दुसरं सापडणार नाही. एक तर ते थोर काव्य आहे, पण त्याचा थोरपणा आपल्यासाठी तितकासा महत्त्वाचा नाही. रूपककसाठी एखादं रूपक वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वापरलं जाऊ शकतं याचा अभ्यास करण्यासाठी तो उत्तम नमुना आहे. मधुशाला (किंवा ग्राम्य मराठीत दारूचा गुत्ता) हे जीवनासाठी रूपक कसं आहे हे कवीने (हरिवंशराय बच्चन) सुमारे दीडशे रुबायांतून दाखवून दिलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक चारोळी रुबाईत मधुशालेची तुलना जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या संकल्पनांशी (कवितकच्या भाषेत मौलिक शब्दांशी) केलेली आहे. ही तुलना करताना, मधुशाला या संकल्पनासमुहात असलेल्या वेगवेगळ्या लघुसंकल्पनांची व त्यांच्या नात्यांची त्या विशिष्ट संकल्पनेतल्या लघुसंकल्पना व त्यांच्या नात्यांशी साम्य दाखवलेलं आहे. गणितामध्ये असं करण्याला मॅपिंग, आयसोमॉर्फिजम वगैरे म्हणतात. हे जरा साध्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या पहिल्या धड्यात 'आयुष्य म्हणजे एक विडा असतो...प्रेमाने तो लाल लाल रंगवायचा असतो' लिहिलं. त्यात आयुष्याला एक विड्याच्या उपमेची पिंक टाकून आपण पुढच्या उपमेकडे गेलो. पण त्याऐवजी आयुष्य = विडा, नाती = गुलकंद, कष्टप्रद अनुभव = लागणारी सुपारी, आठवणी = चुना व कात, शरीर = पान, वगैरे उपमा करून मग त्या लाल रंगाचं वर्णन केलं तर कसं होईल, तसं. पण तेवढ्यावरच थांबून चालत नाही, पुढच्या रुबाईत आयुष्य = विडा ऐवजी निसर्ग = विडा म्हणायचं, आणि मग पृथ्वी/भूमी = तोंड, बीज = चुना व कात, फुलांचा बहर = लाल रंग वगैरे उपमांचं साधर्म्य दाखवून द्यायचं. असं देश, धर्म, प्रेम वगैरे सगळ्या मौलिक शब्दांसाठी करायचं. सूत्ररूपात मधुशालाची प्रणाली ही खालीलप्रमाणे.
र(र१, र२..) - आपलं मुख्य रूपक. र१, र२ हे त्याचे घटक, किंवा लघुरूपकं.
क्ष१(अ१, अ२...) - मौलिक शब्द, संकल्पना. अ१, अ२ हे घटक भाग.
क्ष२(अ'१, अ'२..) - दुसरा मौलिक शब्द, संकल्पना. अ'१, अ'२ हे घटक भाग.
प्रत्येक क्ष साठी
लिहा
अ१ म्हणजे जणू काही र१ (डागडुजी करा)
अ२ म्हणजे जणू काही र२ (डागडुजी करा)
.
.
त्यामुळे क्ष हा जणू काही र
रिकामी ओळ सोडा, व पुढचा क्ष घ्या
हरिवंशरायांच्या मधुशालासारखं काव्य करणं अशक्य नाही - पण त्यासाठी तुम्हाला १. सुंदर रूपक सापडलं पाहिजे. २. अनेक मौलिक संकल्पनांच्या घटकांशी त्या रूपकाचे घटक मिळते जुळते असले पाहिजेत. ३. प्रत्येक रुबाईत शब्दसौंदर्य, नादमाधुर्य, छंदबद्धता सांभाळली पाहिजे. (मधुशालेतले घटकशब्द एकमेकांशी यमक साधू शकतात - हाला, प्याला, साकीबाला, मधुशाला...) ४. तुमचं जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यातून दिसलं पाहिजे (बच्चननी चार्वाक दर्शन मांडलेलं आहे. आयुष्य हे रसरसून उपभोगण्यासाठी आहे.), ते लोकांना भावलं पाहिजे. ५. या प्रणालीबाहेरच्याही अनेक उत्तम रुबाया करणं आवश्यक आहे. ६. बच्चननी त्याहीपलिकडे जाऊन रुबायांचा क्रम देखील खुबीने केलेला आहे. सुरूवातीच्या रुबाया वाचकाला 'हे तुला सादर' म्हणणाऱ्या आहेत. पुढच्या काही 'मधुशाला म्हणजे काय, ती कुठे आहे, तीपर्यंत कसं पोचायचं' याच्या आहेत. क्रमाक्रमाने नंतर आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चिंतन व नंतर मृत्यूवर चिंतन आहे. तुम्हा आम्हा पामरांनी एवढं सगळं करण्याआधी आपण त्यांच्या काही रुबायांतल्या उपमांची रचना बघू.
द्राक्षवेल (मूळ स्रोत) = हिमालय; हाला (मद्य) = हिमजल; साकी = नद्या; पिणारे = शेतं; मधुशाला = भारतमाता;
द्राक्ष वेलिसम पसरि हिमालय, पाझरतो जीवन हाला
नद्या नाचऱ्या साकी बनुनी, भरून लाटांचा प्याला
रात्रंदिन तो मुक्तमृदू करि, फिरती झुळझुळ वाटाया
पिऊन शेते फुलुन डोलती, भारतमाता मधुशाला
(हिम श्रेणी अंगूर लता-सी फैली, हिम जल है हाला,
चंचल नदियाँ साकी बनकर, भरकर लहरों का प्याला,
कोमल कूर-करों में अपने छलकाती निशिदिन चलतीं,
पीकर खेत खड़े लहराते, भारत पावन मधुशाला)
साकी = वेली; प्याले = फुलं; मद्य (हाला) = मध; पिणारे = भुंगे; मधुशाला = बाग
वेली साकी आल्या घेउन रंगित पुष्पांचा प्याला
धुंद सुवासा जगी पसरती धरुनी गर्भी मधु-हाला
भ्रमरगणांच्या टोळ्या येती मागमागुनी मधु पीण्या
झिंग रिंगती गुंग गुंजती, बाग नव्हे ही, मधुशाला
(पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला,
भरी हुई है जिसके अंदर परिमल-मधु-सुरभित हाला,
माँग माँगकर भ्रमरों के दल रस की मदिरा पीते हैं,
झूम झपक मद-झंपित होते, उपवन क्या है मधुशाला)
साकी = प्रेमी, पुजारी; मद्य = गंगाजल; प्याला = मंत्राच्या माळेचे मणी; स्वत: = शिवमूर्ती; मधुशाला = मंदिर.
प्रियतम साकी बने पुजारी, पवित्र गंगाजल हाला
मंत्रघोष हा फिरवुन करतो मधु प्याल्यांची जपमाला
"घे ना, घे ना, अजून पी ना", लयीत अविरत गात असे
मी शंभूची स्वयंभु मूर्ती, मंदिर भवती मधुशाला
(बने पुजारी प्रेमी साकी गंगाजल पावन हाला
रहे फेरता अविरत गतिसे मधु के प्यालो की माला
और लिये जा और पिये जा इसी मंत्र का जाप करे
मै शिव की प्रतिमा बन बैठू, मंदिर हो ये मधुशाला)
(मी शब्दश: भाषांतर केलेलं नाही हे उघड आहे. हा भावानुवाद आहे, काव्याचा आत्मा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे....)
गृहपाठ म्हणून अर्थातच मी मधुशाला लिहायला सांगणार नाहीये. पण मधुशालेची एखादी नवीन रुबाई लिहून डकवा.
उदाहरणार्थ : साकी = शिक्षक; प्याला = पुस्तक; मद्य = ज्ञान; पिणारा = विद्यार्थी; शाळा = मधुशाला
शिक्षक येती साकी बनुनी, घेउनिया पुस्तक प्याला
ज्ञानधार ती ओतुनि करती धुंदधुंद विद्य़ार्थ्याला
मित्र सवंगडि चषक भिडवती, साथ पिऊनी आनंदे
शिक्षणाचि ही नशा चढतसे, शाळा होई मधुशाला
अधिक कठीण गृहपाठ - एकच रूपक घेऊन ते कुठच्यातरी दोन मौलिक शब्दांना लागू करा व दोन रुबाया (चारोळी) लिहा. बच्चनांची प्रत्येक ओळ दोन ओळींसारखी आहे, तेवढं मोठं वृत्त नाही घेतलं तर कदाचित सोपं जाईल. छंद, यमक वगैरे बंधनं थोडी ढिली झाली तरी चालेल. पण डकवा मात्र नक्की.
वाचने
7834
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
क्रिकेट होई मधुशाला
मस्त हं...!
थोडीशी असहमती
In reply to थोडीशी असहमती by धनंजय
उत्तम रुबाई
जालतिठा
In reply to जालतिठा by मुक्तसुनीत
वा वा क्या बात है!!
In reply to वा वा क्या बात है!! by चतुरंग
जालतिठा दारूगुत्ता
In reply to जालतिठा दारूगुत्ता by राजेश घासकडवी
मालक ताता
In reply to जालतिठा by मुक्तसुनीत
काय करावे?
In reply to काय करावे? by अक्षय पुर्णपात्रे
मधुशालेचा दुवा
In reply to मधुशालेचा दुवा by धनंजय
दिपोटींचे आभार
In reply to काय करावे? by अक्षय पुर्णपात्रे
श्री अक्षय पूर्णपात्रे
जमली का ?
एकाकी जिवन
वा वा...
जसजसा
In reply to जसजसा by Nile
गृहपाठ