अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (अंतिम भाग ६)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
9 Jan 2010 - 8:38 am

मागील भाग:
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

मंडळी, मागच्या भागात मी न पाहिलेल्या गुजरातमधल्या जंगलातील रस्त्याने रात्री केलेली भटकंती वाचलीत. आता हा पुढचा भाग. हा भाग एका अर्थाने माझ्या क्षेत्रभेटीचा पहिला अध्याय समाप्त करतो. हा भाग लवकर टंकन न केल्याने लेखमालाच आपल्या विस्मृतीत जाण्याचा संभव आहे. आपण समजून घ्याल ही आशा.
-------------------------------------------------------------
आज मला अक्कलकुवा तसेच धडगाव तालूक्यातील अनुक्रमे भांग्रापाणी व मांडवी या दोन आश्रमशाळांत जायचे होते. नवापुरहून अक्कलकुव्याला जाण्यासाठी उच्छलमार्गेच रस्ता जवळचा होता. म्हणजेच काल रात्री मी ज्या मार्गाने आलो होतो त्याच जंगली रस्त्यातून आज आम्हाला जायचे होते. मला त्या मार्गाने परत दिवसा जायची उत्सूकता होती. काल रात्रीचा प्रवास व आजचा दिवसाचा प्रवास यात दिवस रात्रीचे अंतर होते. सुनिलही या रस्त्यावरून स्थानिक असुनही कधी गेले नव्हते. त्याचप्रमाणे सातपुड्यातल्या गावांमध्येही त्यांचा पहिलाच चक्कर होता. एक नविन एक्सपीडीशन म्हणून आम्हाला दोघांना उत्सूकता होती. आम्ही कालच्याच रस्त्याने निघालो. काल रात्रीचा रस्ता व आज दिवसा बघीतलेला रस्ता यात खुपच फरक होता. रस्त्याने चार पाच छोटी गावे लागली. काल रात्री दिसणारे भेसूर जंगल आज लोभसवाणे दिसत होते. रस्ता एकूणच जंगली तसेच एका डोंगर चढउताराचा होता. काल रात्री जरा 'जाणवणारा' रस्ता होता तसलाच १० चा १५ चा रस्ता होता. काल रात्री वेलदा टाकी पर्यंत आम्ही आलो. तेथून आम्ही अक्कलकुव्याकडे जाण्यासाठी वळालो. रत्यात एकदोन ठिकाणी सुनिलभाउंना सिग्रेटची तलफ भागवण्यासाठी थांबावे लागले. आम्ही मोटरसायकल आलटून पालटून चालवत होतो. मी मागेही हेल्मेट घालूनच बसायचो. भाऊ मात्र आपले बागाईतदार (उपरणे) घालून होते. होता होता आम्ही अक्कलकुवा येथे पोहोचलो. गावाच्या मागेच सातपुड्याचा मोठा पर्वत दिसत होता. सातपुडा हा पर्वत गुजरात पासून महाराष्ट्र-मध्यप्रदेशात आडवा पसरलेला आहे. महाराष्ट्राची व मध्यप्रदेशाची सीमा याच भागातून जाते. अक्कलकुवा हे गाव डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. आम्ही तेथे चहा घेतला. येथून पुढे घाट चालू झाला. मोटरसायकल बर्‍याच वेळा पहिल्याच गियरमध्ये चालवावी लागत होती. समोरून काही जिप मधून लोकं थेट टपावरून प्रवास करत होते. एका बाजूला भली मोठी दरी व एका बाजूला पर्वत कडा असा देखावा होता. गाडी गरम होवू नये म्हणून घाटातल्या दोन पर्वतांच्या खिंडीत जावून थांबलो. तेथून अनेक मोटरसायकलस्वार पार होतांना दिसले. थोडावेळ थांबून आम्ही तेथून निघालो. आता आम्ही पर्वतांमधून चाललो होतो. काही वेळा मध्येच १०-१२ झोपड्या दिसायच्या. रस्त्याचा बराच भाग हा उंचसखल भागातून गेलेला होता. रस्त्यातून अनेक ओहोळ वाहतांना दिसले. तेथे रस्ता किंवा पुल हा भागच नव्हता. भांग्रापाणी ही आश्रमशाळा डोंगरउतारावर आहे. आजुबाजूला मोकळा परिसर होता. निसर्गसानिध्यात असलेल्या या आश्रमशाळा आपल्या शाळांसारख्या नसतात. मुख्याध्यापकांना माझे काम सांगितले. आजुबाजूचे शिक्षक सांगू लागले की येथे पावसाळ्यात तिन तिन महिने लाईट नसते. येथे तुम्ही बसने येवू देखील शकत नाही. रस्त्यात अनेक नद्या ओहोळ वाट अडवतात. तुम्ही देतात त्या कॉम्पुटरचे काय करणार? माझे सह्यांचे काम झालेले होते. आम्ही तेथून निघालो.
हा सातपुड्याच्या घाटाचा रस्ता उंच सखल होता. म्हणजे एकदम उंच चढ वैगेरे काही नव्हते. पण रस्ता वळणदार होता. काही छोटी गावे लागली. उंच घाटातून डोंगरउतारावर शेते मस्त दिसत होती. एकूणच मोसम मस्त होता. नंतर आम्ही मजल मारत मेघा पाटकरांनी प्रसिध्दीला आणलेले धडगाव येथे पोहोचलो. हा अक्राणी तालूका आहे. म्हणजे हेडऑफीस धडगावच आहे पण नाव अक्राणी तालूका आहे. वास्तविक येथून सरदार सरोवर काही किमी आत आहे. पण त्यांचे आंदोलन येथे बहूतेक सरकारी ऑफीसेस असावेत म्हणून येथेच चालले व बाकीच्या अधिकारी नेत्यांना या (शहादा गावाकडून चांगला रस्ता असल्याने) गावापर्यंत येता येत असल्याने ते याच्या पुढे जात नसावेत. येथे मात्र गर्दी होती. बरेचसे गावकरी बाजार करायला आलेले होते. आम्ही तेथे थांबलो. आता दुपारचे ३ वाजले होते. आम्हाला भुक लागली होती, म्हणून आम्ही तेथेच छोट्या हॉटेल मध्ये थोडे खावून घेतले. तेथे सुनिलभाउंच्या ओळखीचे एक शिक्षक भेटले. या भागात बरेचसे नोकरी करणारे लोकं आपले बिर्‍हाड करत नाही. एकटेच राहतात. शनिवार रविवार घरी जातात. बरेचसे शिक्षक हे आठवड्यातून एकदा येतात व पुर्ण आठवड्याच्या सह्या करून जातात. हा भाग म्हणजे सरकारी बदल्यांच्या शिक्षेचा भाग आहे. एखाद्या कर्मचार्‍याला कामाबद्दल शिक्षा द्यायची झाल्यास या भागात त्याची बदली केली जाते. नविन सरकारी कर्मचार्‍याला त्याच्या सुरूवातीची काही वर्षे येथेच काढावी लागतात. आम्ही तेथून निघालो. नंतर आमचे ठिकाण मांडवी हे होते. धडगाव सोडल्यावर मात्र रस्ता चांगला लागला. गावेही थोडी मोठी लागली. डोंगरचढ उतार मात्र तीव्र झाला. घाटात एके ठिकाणी काही छोटी मुले सिताफळे विकत होती. आम्ही ती विकत घेतली. या भागात सिताफळे फार मुबलक प्रमाणात मिळतात. रस्त्याने आम्हाला बरीच नैसर्गीक पणे उगवलेली बरीच सिताफळांची झाडे लागली होती.

साधारणपणे ५ च्या सुमारास आम्ही मांडवी या गावाच्या आश्रमशाळेत पोहोचलो. डोंगरात असल्याने सुर्य बुडाल्यासारखा होता. हि आश्रमशाळा फक्त मुलींसाठी आहे. आम्हाला सही शिक्के घेण्यासाठी ऑफीसात जावे लागले. काम आटोपले तेव्हा सुर्य बुडून अंधार झालेला होता. आता आम्हाला काळोखातून जाणे होते. ह्या रस्त्यांवर लुटालूटीची भिती होती. तरीही निघणे भाग होते. आम्ही तशीच गाडी दामटली. एकतर पुर्ण घाटाचा रस्ता अन त्यात असला भाग. त्यामूळे मनात सतत वाईट विचार येत होते. मोटरसायकल आता सुनिलभाऊच सावधगिरीने चालवत होते. रस्ता पुर्ण अंधारातच होता. केवळ बाजूच्याच रोडसाईन्स मुळे आम्ही कोठे चाललो आहोत ते समजत होते. होता होता आता आम्ही घाटाच्या उतरणीला लागलो. येथून एक रस्ता शहाद्याकडे तर एक रस्ता म्हसावद कडे जात होता. तेथूनच तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. तेथे अस्थंबा या गावी अश्वस्थाम्याचे मंदीर आहे. आजही अश्वस्थामा चिरंजीव असल्याने या भागात फिरतो अशी लोकांची श्रद्धा आहे. आम्ही आता बरेच थकलो होतो. शहादा जसेजसे जवळ येत गेले तसे आम्ही तेथेच मुक्काम करायचे ठरवले. साधारण ९ वाजता आम्ही शहाद्यास पोहोचलो. तेथे गेल्यानंतर पहिल्यांदा एक लॉज बुक केली. खुपच थकल्याने मस्त आराम व्हावा म्हणून एसी रुम बुक केली. ताजेतवाने होवून आम्ही जेवण केले. थकव्यामुळे जेवण झाल्यानंतर रुममध्ये टिव्ही चालू असूनही मला झोप लागली.

सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर नाश्टा करून आम्ही नवापूरकडे निघालो. नंदूरबार नंतर विसरवाडीला आल्यानंतर गाडीत पेट्रोल भरले.
दुपारच्या १२ च्या सुमारास आम्ही नवापूरला पोहोचलो. गाडीतील डिक्कीतील सिताफळे बघीतली असता त्यातली बरीचशी सिताफळे खराब झालेली होती.

दुपारचे जेवण करून मी लगेच नाशिककडे प्रयाण केले. अशा रितीने माझा प्रवासाचा एक अध्याय समाप्त झालेला होता, पण अजुन जळगाव, धुळे जिल्ह्यातल्या निम्या आश्रमशाळांना भेटी देणे बाकी होते.

प्रवासभूगोलआस्वादलेखअनुभव

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

9 Jan 2010 - 9:32 am | प्रमोद देव

प्रवासासारखेच 'प्रवाही' लेखन.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

jaypal's picture

9 Jan 2010 - 10:42 am | jaypal

म्हणतो. छान प्रवाही लेखन. अश्वथामा चे मंदिर मी प्रथमच ऐकतोय. जाउन यायला हव.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/