अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग ५)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
15 Dec 2009 - 6:32 am


अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग ५)


मागच्या ४ थ्या भागात
माझी गाडीच्या हेडलाईटने माझे लावलेले लाईट आपण बघीतले. आता आपण पुढे जावूया.

दुसर्‍या दिवशी चतुर्थी होती. सकाळी सकाळी घरातून निघालो. आता माझे प्रयाण ढोंगसागळी या गावाकडे होते. माझा मार्ग विसरवाडीपर्यंत कालच्या रात्रीच्याच रस्त्याचा होता. मस्त सुर्यप्रकाश, थंड हवा, आजुबाजूची हिरवीगार शेते, चांगला हायवे असलेला रस्ता आणि हातात मोटरसायकल. मी मोटरसायकल चालविण्याचा आनंद पुर्णपणे घेत होतो. मला फोर स्ट्रोक मोटरसायकल पेक्षा टू स्टोक मोटरसायकलच जास्त आवडते. टू स्टोक मोटरसायकलमध्ये इंजीनाचे दोन स्टोक्स अगदी कानात ऐकू येतात. त्यामुळे आपली दोन स्ट्रोक गाडी ही केवळ वाहन न राहता एक जिवंत माणूसच आहे असे फिलींग येते. हेच फोर स्टोक मोटरसायकलमध्ये आपल्याला ऐकू येत नाही.

सासर्‍यांनी कालच सांगितले होते की ढोंगसागळी हे रस्त्यावरचे गाव आहे. विसरवाडीच्या अलीकडून एक रस्ता नंदुरबार कडे जातो त्या रस्त्याला मी लागलो. दहा एक किमी गेल्यानंतर गाव जसे जवळ आले तसे काही मुले आश्रमशाळेचा गणवेश घालून शाळेत जातांना दिसली. उजव्या हाताला आश्रमशाळांच्या इमारती दिसू लागल्या. हमरस्त्यावरून गावात जाण्यासाठी एक फाटा होता. गावाच्या जवळूनच आश्रमशाळेचा रस्त्याला एक नदी वाहत होती. शाळेच्या बाजूलाच एक छोटा बंधारा होता. शाळेचे आवार मोठे होते. इमारतीही व्यवस्था राखलेल्या, रंगवलेल्या होत्या. बाजूलाच एका इमारतीचे बांघकाम चालू होते. आधीचे संगणकांसाठी स्वतंत्र बैठी इमारत होती. एकूणच येथील वातावरण प्रसन्न होते. तेथील अध्यापकांना माझे काम सांगीतल्यानंतर जास्त काही विचारपूस न होता काम झाले व मी तेथून निघालो.

मला कालच ऑफीसातून नंदुरबारला कलेक्टर ऑफीसात जाण्याचे सांगण्यात आले होते. तेथे लँड रेकॉर्ड विभागातील संगणकाची यादी पुढील संदर्भासाठी लागत होती. तेथे आमचाच सप्लाय झालेला होता. नंदुरबार याच रस्त्याला साधारण ४०-४५ किमी होते. माझ्या नियोजीत मार्गातच ते येत असल्याने तेथे जाण्यासाठी नंतर लागणारा एक दिवस वाचल्याचे समाधान झाले. रस्ता थोडा खडखडीत होता पण आताशा मला अशा रस्त्यांची सवय झालेली होती. रस्त्याने तर एकही वाहन माझ्या पुढे गेलेले आठवत नाही. एकदोन ठिकाणी वन विभागाचे मोठे डेपो दिसले. तेथे सागवान व इतर लाकूड रचून ठेवलेले होते. काही गावे लागली. पन्नास एक किमी पुढे गेल्यानंतर नंदुरबारच्या जवळ तीन रस्ते एकत्र आलेले होते. बर्‍याचशा सरकारी इमारती होत्या. नंदुरबार हा जिल्हा १९९८ ला तयार करण्यात आला. त्यामुळे सरकारी इमारती 'सरकारी' छापाच्या नव्हत्या. त्यातीलच एका इमारतीत माझे काम होते. मी माझे काम सराईतपणे केले. तेथून लगोलग निरोप घेतला.

आताशा दुपारचा १ वाजलेले होते. सकाळचा चहा सोडला तर पोटात काहीच नव्हते. तशातच आज माझा चतुर्थीचा उपवास होता. नाही म्हणायला बरोबरच्या डब्यात खिचडी होती पण मी कोठेही वेळ वाया घालवायच्या विचारात नव्हतो त्यामुळे डबा नंतरच खावू हा विचार केला. आता मला लोभानी ता. तळोदा या गावी जायचे होते. तेथे जाण्यासाठी मला नंदुरबार गावातून जावे लागले. नंदुरबार शहर बाल हुतात्मा शिरिषकुमार याचे आहे. ब्रिटीशांनी तो आणि त्याचा सवंगड्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मला काही त्याच्या स्मृती स्थळाच्या रस्त्याने जाता आले नाही. रेल्वे गेट ओलांडून मी माझ्या शहादा रस्त्याला लागलो. रस्त्याने मला पुष्पदंतेश्वर सहकारी साखरकारखाना लागला. अजून तो चालू झालेला नव्हता. एका मेंढपाळाला मी लोभानी गावाबद्दल विचारले. त्याला काही सांगता येईना. बरे हे गाव नकाशातही दिसत नव्हते. मला फक्त लोभानी गावाचा तालूका तळोदा आहे हे सांगण्यात आलेले होते. म्हणजेच मला ते गाव शोधण्यासाठी जास्तीत जास्त तळोदा या तालूक्याच्या ठिकाणी जावे लागेल असा मी विचार केला. पण मी दोन चार जणांना विचारून जवळचा एखादा मार्ग आहे का हे विचारण्याचे ठरवले. एका मोटरसायकल स्वाराला थांबवून मी त्याला त्याबद्दल विचारले. त्याने मला तळोद्याला जाण्याची काहीच आवश्यकता नसल्याचे सांगितले. आता आपण जेथे आहोत त्याच्या पुढे चार एक किमी गेले तर उजव्या हाताला जाणार्‍या रत्याने तुम्ही निझर या गावाहून पुढे सरळ तळोद्याच्या पुढे निघाल व त्याच्याच पुढे लोभानी हे गाव आहे असे त्याने सांगितले. त्याला त्याची माहीती भक्कम व ठाम असल्याची मला खात्री झाली व मी थोडा निश्चिंत झालो. मी त्याप्रमाणे पुढे निघालो. निझर हे गाव गुजरात मध्ये आहे. मी महाराष्ट्र ओलांडून निझर रस्त्याला लागलो. आजुबाजूला बाभळीची भरपूर झाडे होती. बरेच किमी पुढे गेल्यानंतर मला गाव काही लागले नाही. एक दोन जणांना आश्रमशाळेबद्दल विचारावे लागले. त्यांनी शाळा ही अगदी रस्त्यावरच असल्याचे सांगितले. शेवटी मला शाळेच्या पाच सहा इमारती दिसल्या. गाडी झाडाखाली मोटरसायकल उभी केली. तडक मी शाळेच्या ऑफिसात गेलो. शाळेच्या मैदानातूनच एक ओढा जात होता. त्याला पाणी नव्हते पण पावसाळ्यात एकूणच वातावरण मस्त करत असावा असा देखावा होता. मी शहरातल्या आपल्या शाळांचे आजूबाजूचे वातावरण आठवले. आपल्याकडील शाळांना तर खेळाचे मैदानही नसते. शाळा म्हणजे नुसते कोंडवाडे असतात आपले. येथे तर निसर्गात एकरुप होवूनच शाळा उभी असते. हां, त्यातील शाळेच्या गुणवत्तेबाबत चर्चा होवू शकते. एकूणच गावाकडच्या शाळा मुलांना प्रॅक्टिकल बनवतात. त्या शाळांमधूनही शिकण्याची ईच्छा असणारे शिकतातच.

माझे काम ठरवल्याप्रमाणे लवकर झाले. तेथील शिक्षकांनाच मी पुढच्या म्हणजे शिर्वे या गावाच्या शाळेबद्दल विचारले. ते गाव येथून फार काही लांब नव्हते. असेल ६/७ किमी. हा जो रस्ता होता तो अंकलेश्वर (गुजरात) कडे जात होता. याच रत्याला पुढे शिर्वे गावाचा फाटा होता. तेथून ३ किमी आत आश्रमशाळा होती. पुढे निघाल्यानंतर मला काही विचारण्याची गरज पडली नाही. बाहेर रस्त्याला पाटी होतीच. पण आत जाण्यासाठी रस्ता नव्हता, एक बैलगाडी जाण्याईतपत बैलगाडीच्या चाकांनीच तयार झालेला रस्ता होता. मला थोडी कसतत करावी लागली पण मी शाळेजवळ पोहोचलो. शाळा तर अगदी भकास वाटत होती. तेथे कोणीही विद्यार्थी दिसत नव्हते. मी शाळेच्या आवारात काही शिक्षक भेटतात का ते पाहीले. एक जण मला शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरी घेवून गेले. मुख्याध्यापक नुकतेच त्यांच्या घरून म्हणजे धुळ्याहून आलेले होते. आमचा परिचय झाला. त्यांनी मला चहा घेण्याचा आग्रह केला. तीन साडेतीन होत आलेले होते. त्यांनी शेजारून दुध आणून चहा केला. ते एकटेच येथे राहत होते. कुटूंबीय धुळ्याला होते. नंतर आम्ही ऑफीसात गेलो. कागदपत्रांवर सही शिक्के घेतले. नंतर मी तेथून त्यांना लोय या माझ्या कालच्या राहीलेल्या आश्रमशाळेत कसे जायचे ते विचारले. त्यांना काही माहीत नव्हते. नकाशात शिर्वे या गावातून गुजरात ओलांडून परत लोयकडे जावे लागेल असे दिसत होते. मी त्यांचा निरोप घेतला.

आता मी थोडा पुढे अंकलेश्वर रस्त्याला लागलो. वाटेत एक गुजराती आदिवासी जोडपे दिसले. त्यांना मी महाराष्ट्राकडे जाणार्‍यारस्त्याबद्दल विचारले. मी हिंदीत विचारले असता त्यांना हिंदी येत नव्हते. तरीही त्यांनी मला हावभावावरून पुढे असलेल्या कुकूरमुंडा या गावी जाण्यास सांगीतले. मुख्य रस्त्यापासून २ किमी पुढे जावून मी डाव्या हाताला वळालो. थोड्या अंतरावर कुकूरमुंडा हे गाव लागले. कुकूरमुंडा हे गाव महाराष्ट्रातल्या हद्दीतले पहिले गाव आहे. ते गाव लागेपर्यंत गुजरातमधील रस्ता १० चा १२ होता व महाराष्ट्रात जसा प्रवेश केला तसा हा रस्ता १० चा १६/१७ झाला. सगळीकडे धुळीचाच रस्ता होता. गाव सोडल्यानंतर तापी नदीवरील एक मोठा पुल लागला. नदीचे पात्रही भरपूर मोठे होते. नंतर मी चाररस्ता या ठिकाणी आलो. तेथे चार रस्ते एकत्र येत होते. तेथे एका पानटपरीवर मी लोय कडे जाण्याचा रस्ता विचारला. त्याने त्याच्या टपरीच्या मागे हात दाखवून मागेच लोय गाव आहे असे सांगितले. बहूतेक लोकं दिशा दाखवतांना भलतीकडेच हात दाखवतात. म्हणजे आपण जेथे उभे आहोत तेथून आपले गंतव्य ठिकाण जर डावीकडे असेल तर ते अगदी विरूद्ध दिशेला हात दाखवून सांगतात की, 'ते काय सरळ जा इकडे'. मला त्याच्या सांगण्याची शंका वाटली म्हणून कन्फर्म करण्यासाठी त्याच्या पानटपरीच्या मागे बघीतले तर मला फक्त एक शेत दिसले. त्यातून उस नुकताच काढलेला होता. उस काढतांना बैलगाडीने केलेला रस्ता होता. बाकी डांबरी सडक तर सोडाच पण साधी खडीही तेथे नव्हती. मी त्याला त्याबाबत विचारले तर तो आपल्या मतावर ठाम होता. मी पण जास्त काही विचारले नाही. कदाचित पुढून चांगला रस्ताही असायला हरकत नव्हती. नकाशातही लोय गाव या ठिकाणाच्या जवळच दिसत होते. तसे कालच मी लोय गावी विरूद्ध दिशेने आलेलोच होते. त्या शेतातून एकदोन मोटरसायकलवाले पण गेलेले दिसले. मी तेथूनच जाण्याचे ठरवले. शेतातील रस्तातून / बांधावरून मी 'डर्ट ट्रॅक रेस' प्रमाणे २ किमी गाडी चालवली. थोडे पुढे गेल्यानंतर एक गाव लागले. ते लोय हेच गाव होते. मागे वळून बघीतले असता माझे बरेच अंतर वाचल्याचे नजरेस आले. गावाच्या दुसर्‍या टोकाला आश्रमशाळा होती. शाळेत गेल्यानंतर कालचे न भेटलेले मुख्याध्यापक भेटले. त्यांनी पटापट मला सह्या दिल्या. आता जवळपास साडेसहा वाजले होते. मी त्यांना माझा पुढील नवापुरपर्यंत प्रवास कसा करावा याबाबत विचारले. त्यांनी लोयपासून सरळ पुढे जावून धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूरला जाता येईल असे सांगितले. रस्त्याने ट्राफीकही असते असेही सांगीतले. साधारण ते ६० ते ७० किमी अंतर असेल असे ते म्हटले. मला तो मार्ग नविनच होता. एकतर आता रात्र झालेली होती. कालसारखी फजीती नको होती. मी नकाशात बघीतले असता मला नंदूरबार मार्गे नवापूर किंवा कालचा रस्ता - खांडबारा मार्गे जंगलातून किंवा आता सांगीतलेला धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा रस्ता आदी तिन मार्ग उपलब्ध होते. अगदीच शेवटी न जाण्याचे ठरवले तर मुक्काम करण्यासाठी नंदुरबार होतेच. मला मोटरसायकलवरील प्रवासाची आवड आहे. रात्र जरी असेल तर थोडी रिस्क घेवून मी नविन मार्गाने म्हणजेच धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा निर्णय घेतला तो केवळ मुख्याध्यापकांनी चांगला मार्ग आहे व ट्राफीक असेल असे सांगितल्यामुळेच. कालच्या प्रवासात मला कोणीच रस्त्याने दिसले नव्हते. मी या नविन रस्त्याने जाण्याने कोणीतरी सोबत मला (मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार) भेटणार होती किंवा मला रस्त्याने वाहने तरी दिसणार होती.

आता सुर्य बुडाला होता. जवळपास साडे सात वाजायला आले होते. संधीप्रकाश जाऊन अंधार पडला होता. मी तडक धनोरा रस्त्याला लागलो. कालच मी बाजूच्या कोठली या गावाला गेलो होतो. तो रस्ता व गाव काही किमीच आत असेल. ३ किमी पुढे गेल्यानंतर मला खांडबारा कडे जाण्यार्‍या रस्त्याची चौफुली लागली. तेथूनच शिवाजी की संभाजी बिडी चा ट्रक खांडबार्‍याकडे पास झाला. तेवढीच काय ती वर्दळ. तसेच पुढे आलो. आता मी कालचा अनुभव घेवून खांडबारा रस्त्याने जायचे नव्हते तर लोयच्या मुख्याध्यापकांनी सांगितलेल्या 'वर्दळीच्या' रस्त्याने उच्छलमार्गे जायचे ठरवले होते. पुढे तीन एक किमी आल्यानंतर रस्त्यात एक जीप थांबलेली दिसली व त्यातले प्रवासी खाली उतरलेले दिसले. मी काही बरे वाईट झाले का ते पहायला थांबलो. जीपमध्ये काहीतरी बिघाड झालेला होता. ती प्रवासी जीप होती. त्यातील एका माणसाने मला वेलदा टाकी पर्यंत मला लिप्ट विचारली. मला तर सोबत हवीच होती. तो माणूस माझ्या मागे बसला. त्याच्या हातात काहीतरी सामान व प्लॅश्टीकच्या बादल्या होत्या. तो माणूस स्थानिक होता. पुढेच त्याचे गाव होते. मी त्याला पुढील मार्गाबाबत विचारले. त्याने सांगितले की, 'पुढे नवापुरला जाण्यासाठी साधारणता: सत्तर ऐंशी किमी जावे लागेल. मी काही या रस्त्याने कधी गेलो नाही रस्ता चांगला आहे. आता उसतोड करण्यासाठी या भागातून मजूर व त्यांचे तांडे पुढे गुजरात मध्ये याच मार्गाने जातात. तुम्हाला बरीच ट्रॅफीकही लागेल. मी तुम्हाला एकाद्या ट्रक च्या मागे लावून देतो म्हणजे तुम्हाला सोबतही होईल. काही घाबरायचे कारण नाही. रस्त्याने चोरी, लुटमार काही होत नाही. तरीही थोडे सांभाळून जा. थोडे जंगल आहे.'

तो माणूस चांगला बोलत होता. उच्च्चार पण चांगले होते. त्या बद्दल विचारले असता तो म्हणाला की 'मी बरेच वर्ष नाशिकमध्ये नोटप्रेस मध्ये कामाला होतो. आता मी व्हिआरएस घेतली व गावाकडे शेती बघतो.' बोलत असतांना त्याला थांबण्याचे 'वेलदाटाकी' हे ठिकाण आले. आता मी गुजरात राज्याच्या हद्दीत आलो होतो. रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी पाण्याची टाकी होती. त्यावरूनच त्या भागाला वेलदाटाकी म्हणत असावे. आजूबाजूला परिसरात तापी नदीच्या पात्राचे पाणी व उकई धरणाचे बॅकवॉटर आलेले आहे. रात्रीच्या अंधारात मला दिसले नाही. तो माणूस उतरला. बाजूलाच एक टपरी होती. त्यात काही आदिवासी लोकं बसलेली होती. त्या माणसाने मला चहा पिण्याची विनंती केली. मी पण थोडावेळ आजूबाजूची परिस्थिती पाहण्यासाठी उतरलो. चहा घेताघेता तो इतर आदिवासींशी त्यांच्या भाषेत बोलला. त्याने सांगितले की आत मजुर घेवून ट्रक जातील. काहीवेळाने एक ट्रक मजुरांना घेवून आला. त्या माणसाने त्यातील ड्रायव्हरशी मसलत केली व मला त्या ट्रकच्या मागेपुढे राहायला सांगितले. मी त्याचा निरोप घेतला. ट्रक मधील मजुर आता चहा बिडीसाठी खाली उतरले.

मी पुढे रस्त्याने वर्दळ आहेच असे समजून पुढे निघालो. नाहितरी आता मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. रस्ता हा काही फार उत्तम होता असे नाही. म्हणजे १० चा १५ च्या लायकीचा होता. रस्त्याने छोटे छोटे खड्डे खुपच होते. त्यामुळे सरळ गाडी चालवणे शक्य नव्हते. पण बाजूला अंधार असल्याने पुरेशा उजेडाअभावी मोटरसायकलच्या हेडलाईट मध्ये त्या खड्ड्यांना टाळणेही अशक्य होते. गाडी खड्य्यांतूनच चालवणे भाग होते. रस्त्याने काहीच ट्रॅफीक साइन्स नव्हते. ना रेडीयम चे पट्टे ना कसली खुण. मोटरसायकलचाच काय तो उजेड. तो मागचा ट्रक तर अजूनही मला क्रॉस झालेला नव्हता. (संपुर्ण प्रवासात मला एकही वाहन पुढे क्रॉस करून गेलेले नव्हते.) मी तशीच गाडी दामटत होतो. कुठले गाव दिसत नव्हते की काही जिवंतपणाची खुण दिसत नव्हती. एक दोन बस स्टॉप दिसले. बाकी कसलाही उजेड नाही. आपल्याकडील रात्रीच्या प्रवासात खेडेगावातील शेतातील घरांमधील /विहीरींवरील लाईट तरी दिसतो. येथे तसल्या काहीच खाणाखूणा दिसत नव्हत्या. मी एका मोठ्या डोंगराच्या सपाट माथ्यावरून चालण्याचा मला भास होत होता. अन डोंगरमाथ्यावर थोडीच शेती वस्ती असते? आजूबाजूला नजर टाकली तर फक्त मोठ्या मोठ्या वृक्षांच्या काळ्या कभीन्न आकृत्याच दिसत होत्या. मध्येच रस्त्याला उतार लागत होता. त्या कडे बघीतले की मनात धडकी बसायची. मी देवाला एकच प्रार्थना करत होतो की गाडीला काही होवू देवू नको. पंक्चर तर नकोच नको. मला ते परवडणारे नव्हते. तसे काही झाले असते तर मी कोठे आसरा घेतला असता? अजूनपर्यंत एकही वाहन येथून गेले नव्हते. फारफार तर आठएक वाजले असतील. तरीही एकही माणूस मला दिसला नव्हता. या रस्त्याने येण्यापेक्षा नंदुरबारला मुक्काम केला असता तर परवडले असते असा विचार मनात येत होता. मी तर आता निम्मा रस्ता पार केला होता. माघारी जाणे वेडेपणाचे होते. मी तसाच पुढे जाण्याचा विचार पक्का केला. काही किमी पुढे गेल्यानंतर मला एक गाव लागले. त्या गावाच्या आसपास भरपुर पाणी होते. ते उकाई धरणाचेच पाणी होते. बांधावरून गेल्यानंतर एक दोन तरूण मुले रस्त्याने येत होती. मी त्यांना उच्छल / नवापुर बद्दल विचारले असता त्यांनी दिशानिर्देश करून मला पुढे जाण्यास सांगितले. आता रस्ता चांगला होता. माझ्या मनात धिर आला. पुढे उच्छल गाव लागले असावे कारण मी फक्त मोटर सायकल चालवत होतो. आजुबाजूला काय आहे त्याचे मला भान नव्हते. तशातच मी नवापुरच्या रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागात पोहोचलो. माझ्या मनावरचा ताण फटक्यात नाहिसा झालेला होता. एका छोट्या रस्त्याने मी नवापुरात पोहोचलो. तेथील भाग मला अपरीचीत होता. प्रवासामुळे माझी थोडी दिशाभूल झालेली होती. तेथेच काही दुकानाबाहेर युवक बसलेले होते. त्यांना मी दत्तमंदिर कोठे असल्याबद्दल विचारले. त्यांनी मला रस्ता सांगितला. मी योग्यरीतीने मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो होतो.

घड्याळात बघीतले तर रात्रीचे साडेनऊ झालेले होते. जेवण तयारच होते. मी सकाळपासून काहीच खाल्लेले नव्हते. चतुर्थीच्या उपासाची खिचडी तशीच गाडीच्या डिक्कीत होती. रस्त्यात जो काही चहा झाला तोच माझ्या पोटात होता. एकुणच मला कडकडीत उपास घडलेला होता. जेवताजेवता सासरेबुवांनी मला आजचा येण्याचा मार्ग विचारला. मी उच्छलमार्गे आल्याचे समजताच त्यांनी मला कोठेतरी मुक्काम करायला पाहिजे होता असे सांगितले. त्या भागातील जंगलात अस्वले व इतर जनावरे असल्याचे सांगितले. मी सुखरूप परतलो याचेच मला अप्रूप वाटले. त्यांनी मला उद्या कोठे कोठे जायचे ते विचारले. उद्याचा माझा दौरा थेट सातपुडा पर्वतात होता. त्यासाठी त्यांनी एकटे न जाता बरोबर मला माझ्या मेहूण्यांना घेवूण जाण्याची सुचना केली. सातपुड्यातील जंगलाबद्दल मी पण ऐकून होतो. मी काही माझे मत न मांडता त्यांची सुचना मान्य केली.

क्रमश:

मागील भाग:
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

प्रवासभूगोलआस्वादलेखअनुभव

प्रतिक्रिया

रेवती's picture

15 Dec 2009 - 6:49 am | रेवती

छानच चाललीये मालिका!
तुमच्याबरोबर आमचाही प्रवास चालयाय्......कधी महाराष्ट्र तर कधी गुजरात!

रेवती

मदनबाण's picture

15 Dec 2009 - 8:15 am | मदनबाण

दफोराव वाचतोय...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

उमराणी सरकार's picture

15 Dec 2009 - 10:09 am | उमराणी सरकार

आता पुढचा टप्पा धडगाव का?
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

कानडाऊ योगेशु's picture

15 Dec 2009 - 11:03 am | कानडाऊ योगेशु

प्रवासवर्णनामध्ये तसे नाट्य नाहीये पण तरीदेखील वाचनीय झाले आहे.काही काही ठिकाणी माझे अनुभवही जुळल्यामुळे एकक्षण मीच प्रवास करतो आहे असे वाटले.
आणि प्रत्येक भागाचा समारोप सासरेबुवांच्या संवादानेच करण्याची पध्दत आवडली.
देसी इंडियाना जोन्स म्हणावे का तुम्हाला! :D

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

धनंजय's picture

16 Dec 2009 - 1:06 am | धनंजय

अनुभव वाचतो आहे...